सखे ...

Submitted by प्रगो on 18 January, 2013 - 08:19

वळणांवळणांवरती सखे
तव आठवणींची भरती सखे
कसे विस्मरू सांग तुला मी
हे श्वास श्वास तुज स्मरती सखे |

पाऊस हा घनगर्द सखे
अन् तुझ्या मिठीचा गंध सखे
कसा सुटावा असा रेशमी
तव बाहुंचा बंध सखे

रक्तवर्णित तव लज्जित चर्या
श्वासा श्वासांवरि भीति सखे
अनामिकशा त्या ओढीने
रोमांचित तव कांती सखे

चिंब चिंब ही तुझी कुंतले
चेहर्‍यावरी मम रुळती सखे
थेंब थेंब हा तुला स्पर्षता
न कळत होई मोती सखे

थरथरत्या तव अधरांची
मग पडे घट्ट ती मिठी सखे
असे गुंतलो एकामेकीं
जणु जन्मांतरीची भेटी सखे

श्रावणातल्या सायंकाळी
मला गवसले मीच सखे
विरुन गेले तुझ्यात अलगद
सायुज्यता का हीच सखे

ही भोगाची उर्मी म्हणु की
तल्लीनतेची समाधी सखे
की त्याच्याही पलकडली, मी
राधा , तु घनश्याम सखे

------------------------------------------

नाहीस जरी तू इथे सोबती
नाहीस जरी तू माझी सखे
माझे माझे कशा म्हणु मी
माझी "मी" च तुझी सखे !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरिजा छान लिहिता की.....
बेफीजींशी सहमत

@असो: असो ! असो !! भावना पोचल्या .......बिचारी कधी नाही ते लिह्ते आहे अन् तुम्ही तिला घाबरवताय कसले ??

सुरेख.

वाह!
अजून मीटरमध्ये यायला हवंय काव्य.
उदा. कसे विस्मरू सांग तुला मी- हे श्वास श्वास तुज स्मरति सखे.
ह्यात 'मी' नसला तर छान मीटरमध्ये वाचता येतंय.

शेवटच्या कडव्यावरून माझीच एक कविता आठवली-
होता वसंत तेव्हा, आता वसंत आहे,
नाहीस तू समोर, इतकीच खंत आहे |

धन्यवाद !
सर्व प्रतिसादकांचे आभार !

शेवटच्या कडव्यावरून माझीच एक कविता आठवली-

>>> अरे मित्रा , ते तुझ्याच एका कवितेतल्या कडव्या वरुन प्रेरित आहे पण ह्या तु म्हणतोस त्या नाही
ते कडवे हे " माझे माझे कशा म्हणु मी , तुझेच सगळे , तुझेच सगळे , तुझे तुझे पण माझ्यापाशी "

असो .:)
आता वरीजनल स्फुर्ती नाय आपल्याकडं त्याला काय करणार Biggrin
" की राजहंसाचे चालणे | जगी झालिया शहाणे |
म्हणोनि काय कवणे | चालुचि नये || "

धन्यवाद !!