ओट्स ,कॉर्नफ्लेक्स चॉको-कुकीज..

Submitted by सुलेखा on 16 January, 2013 - 04:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी ओट्स.
१ वाटी कॉर्न फ्लेक्स्.[इथे हनी कॉर्न -फ्लेक्स घेतले आहेत.]
१ वाटी कणिक.
३/४ वाटी पिठीसाखर.[आवडीप्रंमाणे घ्यावी.]
२ टेबलस्पून मध..
१ टेबलस्पून लोणी.
१ टेबलस्पून कोको पावडर.
१ टेबलस्पून बदामाचे तुकडे.
चिमुटभर मीठ.
१/२ टी स्पून बेकिंग पावडर.
१/४ टी स्पून बेकिंग सोडा.
१ टी स्पून वॅनिला इसेन्स.

क्रमवार पाककृती: 

साहित्याच्या मानाने कृति फारच सोपी आहे..या कुकीज ची चव "आयकिया"त मिळणार्‍या कुकीज सारखी मऊसर अशी आहे.
ओटस मावेत १/२ व १/२ मिनिट असे एक मिनिटासाठी भाजुन घ्यायचे .पहिल्या अर्ध्यामिनिटानंतर चमच्याने परतुन घ्यायचे आहेत.
कॉर्न फ्लेक्स,ओट्स मिक्सर मधुन फक्त एकदाच फिरवुन घ्यायचे.
एका मोठ्या बाऊलमधे कणीक,कोको पावडर,मीठ,बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा घालुन चमच्याने छान एकत्र करावे.
आता त्यात भाजलेले ओट्स,कॉर्न फ्लेक्स,पिठी साखर,मध,लोणी,वॅनिला इसेन्स ,बदाम तुकडे घालुन कालवावे.
पिठीसाखर ,मध व लोण्यामुळे हे मिश्रण ओलसर होते . त्याचा एक गोळा तयार करावा.
एका बेकिंग ट्रे ला तूपाचे कोटींग करुन त्यावर या गोळ्याच्या लहान लहान पेढ्यासारख्या कुकीज करुन ठेवाव्या.दोन पेढ्यांमधे अंतर ठेवावे.कारण बेक होताना या कुकीज पसरतात.हा बेकिंग ट्रे मायक्रोव्हेव मधे ठेवावा आणि फुल पॉवर वर १ मिनिट बेक करावा.बेकिंग ट्रे मावे बाहेर काढुन रॅक वर थंड करावा.
झटपट मऊसर चॉको कुकीज तयार आहेंत.
ots-cornflex kookij 4Jan 2013.JPG
आल्याचा गरम ,कडक चहा किंवा वाफाळलेल्या कॉफी बरोबर खूप्पच छान लागतात.लहान मुलांच्या खाऊच्या "छोट्या'डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

अधिक टिपा: 

मी अगदी ताजे लोणी-त्यात थोडासा पाण्याचा अंश होता वापरले आहे.तसेच मध अगदी पातळ आहे.त्यामुळे मिश्रण व त्यात पिठीसाखर असल्याने लगेच छान ओलसर झाले.जर मिश्रण घट्ट असेल तर २ टेबलस्पून किंवा लागेल तितके दूध /साय घालता येईल.

माहितीचा स्रोत: 
स्व-प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म्म्म..... इतक्या टेम्पटींग दिसताहेत.....करुन बघितल्याशिवाय चैन पडणार नाहीये Happy

मावे convection नसेल तरी चालेल का? म्हन्जे preheat न करता cookie बेक होतील का नीट?

हो चालेल.मी प्री-हीट न करता केल्या आहेत.ओलसर पणा कमी वाटला तर अगदी थोडे --चमच्याने -दूध घाल.तयार गोळा फार ओलसर नसावा.

अगदी टेम्प्टिंग दिसताहेत त्यामुळे अटेम्प्ट केला जाईल Happy

फुलपॉवरवर एक मिनिट बेक : म्हणजे मायक्रोवेव्ह करायचं की ग्रिल?

मी १/२ वाटी स्ट्रॉबेरी ओट्स, १ वाटी स्ट्रॉबेरी कॉर्नफ्लेक्स, १ वाटी कणिक, १/२ वाटी वितळवलेले बटर, १/२ वाटी साखर, २-३ थेंब वॅनिला इसेंस, १/२ चमचा बे.पा आणि १/८ चमचा बे.सो. घालून केल्या. कन्वेक्शन मोडवर ५ मि. बेक केल्या १५० डिग्रीवर. मस्त खुसखुशीत झाल्या.
चव घेऊन उरलेल्यांचा फोटो....
cookies.jpg

अल्पना,भरपुर होतात.मी पेढ्याच्या आकाराची कुकी केल्यावर ती इतकी पसरुन दुप्पट होते ..

धन्यवाद.
लेकाच्या शाळेत ख्रिसमस पार्टीसाठी पाठवायचा विचार करतेय. उद्या करुन बघते थोड्याश्या.

मस्त आहे ही पाकृ... इतक्या दिवसांत कशी दिसली नव्हती मला आश्चर्यच आहे.

कणीक वापरायची आणि मायक्रो मोडवर करायच्या... भारी टेम्प्टिंग आहे. मी करणार नक्कीच..

मस्त होतात या कुकीज. आणि अगदी नो कटकट रेसेपी आहे. लागनार्‍या जिन्नसांमध्ये थोडाफार बदल झाला /केला तरी बिघडत नाहीत (माझ्या नाही बिघडल्या).

मी आज करायला घेतल्यावर लक्षात आलं ओट्स संपत आलेले होते (पाव वाटीपेक्षा कमीच निघाले). मग अर्धी वाटी ओटस + म्युसेलीघेतली, अर्धी वाटी स्ट्रॉबेरी कॉर्नफ्लेक्स + चॉकोज (मुन्स अँड स्टार), अर्धी वाटी कणिक, दिड टेबलस्पुन अमुल बटर, एक टेबलस्पुन मध, १-२ चमचे कोको पावडर, १/४ टी स्पुन पेक्षा किंचीत जास्त बेकींग पावडर आणि १/८ टी स्पुन पेक्षा किंचीत जास्त बेकींग सोडा. (अगदी चिमुटभर जास्त घेतलं होतं दोन्ही दिलेल्या प्रमाणापेक्षा), व्हॅनिला इसेंस, अक्रोडाचे तुकडे आणि बदामाचे काप, ७५ % वालं डार्क चॉकलेट थोडं किसून आणि थोडे तुकडे करुन (चॉकलेटच्या स्लॅबमधला अगदी दीड तुकडा उरला होता तो वापरला). थोड्ंस दुध (चमचाभर असेल).

१ मिनीट १० -१५ सेकंद हाय पॉवर वर मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्या कुकीज. या प्रमाणात ३०-३२ कुकीज झाल्या.

DSCN1640.JPG

मस्तच! नक्कीच करून बघीन.
नियती, अल्पना.....सगळ्या मुलींच्याही अगदी सुबक जमल्यात.

मी पण केल्या या कुक्या.. छान झाल्यात. माझ्याकडचा मध थोडा घट्ट होता, त्यामुळे दूध घालावे लागेल की काय वाटत होते, पण नाही लागले. ताज्या लोण्याचा ओलावा पुरला बहुतेक. जमेल तेव्हा फोटो टाकते नक्की.