नवीन वर्ष सुरू झाले की जागतिक मनोरंजन क्षेत्राला वेध लागतात ते "ऑस्कर्स" च्या सोनेरी बाहुल्यांचे ज्याना जगभर मान्यता आहे आणि हॉलिवूडमध्ये पाय ठेवलेल्या वा ठेवणार्या प्रत्येक कलाकाराची, निर्मात्याची, दिग्दर्शकाची, सार्या गटातील तंत्रज्ञांची आयुषभराची इच्छा मनोकामना असते की आपणही किमान एकदा का होईना पण त्या भव्य झळाळत्या स्टेजवर मानाने जावे आणि "..ऑस्कर गोज टु" हे जादूमय शब्द ऐकत ऐकत ती लाडाची बाहुली मान्यवराकडून आपल्या थरथरत्या हाताने घेण्याचे भाग्य लुटावे. हॉलिवूड निर्मितीतीलच नव्हे तर परदेशस्थ विभागातही येणार्या चहुदिशांच्या प्रवेशिका पाहिल्यावर आपल्या चित्रपटाला त्या गटात 'ऑस्कर' मिळावे याचे स्वप्न भारतीय चित्रपटसृष्टीही पाहते.
बघताबघता ८५ व्या ऑस्कर पारितोषिकांचा डंका वाजू लागला आणि आज त्याची पहिली पायरी कमिटीकडून टीव्ही माध्यमातून दाखविण्यात आली....ती म्हणजे "ऑस्कर नॉमिनेशन्स". वर्षभर पडद्यावर आलेल्या चित्रपटांतून काही चित्रपट ऑस्कर कमिटी जगभरातून आलेल्या शिफारशीवरून 'नॉमिनेशन्स = नामांकन' जाहीर करते आणि मग फेब्रुवारीच्या ११ तारखेच्या प्रत्यक्ष विजेत्या पारितोषिक वितरण समारंभाच्या दिवसापर्यंत विविध माध्यमातून नॉमिनेशन्स मिळालेल्या विविध चित्रपटांबद्दल...त्यातील कलाकारांबद्दल, तंत्रज्ञांबद्दल चर्चेचे अगदी रान उठविले जाते.
या लेखात आपणही ज्या चित्रपटांना 'बेस्ट पिक्चर ऑफ द इअर' नामांकन मिळाले आहे, त्याबद्दलच विचार करू....कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदींच्या बाबतीत स्वतंत्र लेख लिहिणे गरजेचे आहे. इथे एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हा धागा फक्त 'ऑस्कर नॉमिनेशन्स' साठी असल्याने ज्या ९ चित्रपटांचा इथे उल्लेख होत आहे त्या सर्वांचे सविस्तर कथानक सांगणे शक्य नाही, किंबहुना ते योग्यही नाही. फक्त त्रोटक स्वरूपातील ओळख इतकेच त्याचे स्वरुप आहे.
"ऑस्कर नॉमिनी फॉर द बेस्ट पिक्चर"....
१. "लिंकन : LINCOLN "
स्टीव्हन स्पिअलबर्ग...हे नाव घेता क्षणीच चित्रपटाचा विषय कोणताही असला तरी त्याची भव्यता तो चित्रपट पाहण्याअगोदरच जगभराच्या चित्रपटप्रेमींच्या नजरेसमोर येते, इतके नाव स्पिअलबर्गने आपल्या कलात्मक आणि विषयाशी अनुरुप अशा चित्रणपद्धतीने मिळविले आहे. 'अब्राहम लिंकन' - अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षाविषयी माहिती नसलेली व्यक्ती या जगात विरळ म्हणावी लागेल. अमेरिकन सिव्हिल वॉर, नीग्रोना गुलमागिरीतून मुक्तता, रंगभेदाचे उच्चाटन करण्यासाठी लिंकनने केलेले अथक प्रयत्न आणि त्यातच विरोधकांनी केलेला त्याचा राष्ट्राध्यक्ष पदावरच असताना एका नाट्यगृहात केलेला पूर्वनियोजित खून. ह्या ठळक घटनापैकी स्टीव्हन स्पिअलबर्गने १८६५ च्या त्या चार महिन्याचा काळ चित्रपटासाठी निवडला असून अमेरिकन घटनेतील १३ व्या दुरुस्ती बिलाबाबत त्याने केलेला आटापिटा [ह्याच दुरुस्तीअन्वये नीग्रोना गुलामगिरीतून मुक्तता मिळणार असते]...आणि त्यावरून रीपब्लिकन व डेमोक्रॅट्स यांच्यातील डावपेच यांचे विलक्षण ताणाचे तसेच अगदी जणू त्याच काळात प्रेक्षकाला घेऊन जाण्याची त्याची हातोटी प्रेक्षकाला खिळवून ठेवते. तब्बल अडीच तासाच्या या चित्रपटात "संवाद" हाच प्रमुख कलाकार आहे. पात्रांचे संवाद हीच 'अॅक्शन' या चित्रपटाचे आकर्षण केन्द्र बनले आहे. डॅनिएल डे-लेविस या दोन ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने साकारलेला 'अब्राहम लिंकन' पडद्यावर पाहताना असे वाटत राहते की खुद्द लिंकनच ती भूमिका सादर करीत आहे, इतके साम्य डॅनिएलने दाखविले आहे. विशेषतः लिंकनचे लांबलचक संवाद कॅमेर्याच्या एकाच अॅन्गलने तसेच एकाच टेकमध्ये घेतल्याने त्याचे पाठांतर कौतुकास्पद म्हणावे लागेल.
विविध विभागासाठी एकूण '१२ नॉमिनेशन्स" लिंकन ने मिळविली आहेत.
२. "आमूर...AMOUR"
अगदी मराठी चित्रपटातून तसेच नाटकातून शोभेल अशी या चित्रपटाची कथा. ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित झालेला हा चित्रपट कहाणी सांगतो ते जॉर्ज आणि अॅना या वयाच्या ८० च्या दशकात असलेल्या संगीत शिक्षक जोडप्याची. त्यांची एकुलती एक मुलगी ईव्ह, जी स्वत:ही संगीत शिक्षिका आहे, परदेशी नोकरीत असते. हे वृद्ध जोडपे एकमेकाला सांभाळून जुन्या आठवणीवर जगत असते, त्यातच प्रेम...[आमूर = प्रेम] आणि एके दिवशी अॅनाला हृदयविकाराचा झटका येऊन ती विकलांग होते. तिच्या उर्वरित दिवसासाठी जॉर्ज करीत असलेले प्रयत्न आणि त्याचे हाल पाहून होणारी अॅनाची तगमग...अशी ही अत्यंत आपुलकीची सरळसोट वाटणारी कथा. वैशिष्ठ्य म्हणजे या चित्रपटातील अॅनाच्या भूमिकेसाठी 'इमॅन्युअल रिव्हा' ह्या फ्रेन्च अभिनेत्रीला 'बेस्ट अॅक्ट्रेस'साठीही नॉमिनेशन मिळाले असून सध्या ही अभिनेत्री ८५ वर्षाची आहे आणि जर तिला ही बाहुली मिळालीच तर ऑस्करच्या इतिहासातील पारितोषिक जिंकणारी सर्वाधिक वयाची अभिनेत्री म्हणून तिचा गौरव होईल.
एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स = ५
३. "लाईफ ऑफ पाय" - LIFE OF PI"
तैवान इथे जन्मलेल्या आणि आता अमेरिकन नागरिकत्व घेतलेल्या आन्ग ली या दिग्दर्शकाचा "क्राऊंचिंग टायगर, हिडन ड्रॅगन" तसेच 'सेन्स अॅण्ड सेन्सिबिलिटी" हे गाजलेले चित्रपट आपणास माहीत आहे. याच दिग्दर्शकाचा यंदाचा जगभर उत्पन्नाचे रेकॉर्ड केलेला आणि भारतीय कलाकारांच्या अदाकारीने नटलेला "लाईफ ऑफ पाय" हा जंगलपट जगभरातील समीक्षकांच्या दृष्टीने अतिशय गौरविला जात आहे. बेस्ट पिक्चरचा प्रबळ दावेदार असलेल्या या चित्रपटाची कहाणी म्हणजे सागरी दुर्घटनेमुळे एका युवकाच्या नशिबी आलेली अनपेक्षित सागरी भटकंती आणि त्याला मिळालेला एक तितकाच अनपेक्षित सागरी सहकारी...बंगाली वाघ. भारतात सर्वत्र गाजावाजा झालेल्या या चित्रपटाने ऑस्करपर्यंत झेप घेतली आहे त्यामुळे यंदाच्या शर्यतीकडे आपल्या भारतीय प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलेले असणार.
एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स : ११
४. अर्गो : ARGO
सम्राट शहाच्या उचलबांगडीनंतरचे धगधगते इराण, शाहला अमेरिकेकडून पाठिंबा मिळतोय म्हणून तेहरानच्या अमेरिकन दुतावासात इराणी अतिरेक्यांनी केलेला हल्ला आणि तेथील सुमारे ५० कर्मचार्यांना ओलिस म्हणून कैदेत ठेवणे...त्यातून सहा अमेरिकन राजनितितज्ज्ञांनी सुटका करून कॅनेडिअन वकिलातीमध्ये आश्रय घेणे...त्यांच्या सुटकेसाठी सीआयने केलेले प्रयत्न व त्या गटाचा नायक यांच्यातील द्वंद्व अतिशय वेगवाने चित्रीकरणाने पाहाणार्याला अक्षरशः खिळवून ठेवते.
एकून ऑस्कर नॉमिनेशन्स : ७
५. "बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" - Beasts of the Southern Wild

सहा वर्षाची एक मुलगी आणि भडक माथ्याचा तिचा बाप यांच्यातील 'हेट अॅन्ड लव्ह' पद्धतीची कथा फुलते ती समुद्रकिनारी असलेल्या त्यांचा कम्युनिटीला वादळाचा तडाखा बसतो त्या अनुषंगाने. आपले घर, वडील याना तर त्या नैसर्गिक कोपातून वाचवायचेच शिवाय वसाहतीत त्या वादळातून शिल्लक राहिलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठीचा आटापिटा... सहा वर्षाच्या 'हशपप्पी' या मुलीचे काम करणार्या क्वेन्झेन वॅलिस [जी या क्षणी ९ वर्षाची आहे] हिला तिच्या अविस्मरणीय अशा अभिनयासाठी "बेस्ट अॅक्ट्रेस" चे नामांकन मिळाले आहे. यदाकदाचित तिला हे ऑस्कर मिळाले तर इतक्या लहान वयात तसे मिळविणारी ती पहिली 'अभिनेत्री' ठरेल.
एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५
६. "जॅन्गो अनचेन्ड - Django Unchained"

"किल बिल, पल्प फिक्शन, इनग्लोरिअस बास्टर्डस..." आदी गाजलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकाचा - क्वेन्तिन टॅरॅन्टिनो - जॅन्गो अनचेन्ड हा ज्याला 'वेस्टर्न' धर्तीचा म्हटले जाते त्या जातकुळीतला चित्रपट. जॅन्गोचे काम केले आहे जेमी फॉक्स या अभिनेत्याने. कथानक घडते १८५८ मध्ये...अमेरिकेतील नीग्रोंच्या गुलामगिरीचा काळ. जॅन्गो त्याच गुलामगिरीत खितपत पडला असून तिथून तो आपल्या मदतकर्त्याने दिलेल्या सहाय्याच्या आधारे बाहेर पडतो आणि पत्नीच्या शोधार्थ निघतो...जी आता गब्बर अशा जमिनदाराच्या मळ्यात अन्य गुलाम स्त्रियांच्या समवेत काम करत असते. दोघांचीही वेगवेगळ्या ठिकाणी विक्री झालेली असते पण पत्नीला त्या कैदेतून मुक्त करण्यासाठी जॅन्गोने केलेली धडपड सांगणारी ही कहाणी. विशेष म्हणजे 'टायटॅनिक' फेम लीओनार्डो कॅप्रियोने त्या जुलमी मळेवाला जमिनदाराची नकारार्थी अशी भूमिका साकारली आहे.
एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५
७. ले मिझेराब्ल - Les Miserables

व्हिक्टर ह्युगो या जगप्रसिद्ध फ्रेन्च लेखकाची १८६२ मध्ये प्रकाशित झालेली ह्याच नावाची कादंबरी इथल्या बर्याच सदस्यांना माहीत असेलच. याच कादंबरीवरून वेळोवेळी तयार झालेल्या संगीतिकाही इंग्लंड तसेच युरोपच्या अन्य देशातही त्या त्या काळातील समाजाला भावल्या होत्या. एका मोठ्या कादंबरीवरून हा चित्रपट बेतला असल्याने त्याच्या कथानकाचा आवाकाही तसाच दीर्घ असल्याने थोडक्यात सांगायचे झाल्यास...काळ १८१५, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी ज्यॉं व्हॅल्जीनला काही काळासाठी 'पॅरोल' मिळते. बाहेर पडल्यावर एका चर्चमध्ये त्याला तेथील बिशप रात्रीपुरता सहारा देतो, पण त्याच्याकडे असलेल्या चांदीच्या शिक्क्यांचा व्हॅल्जीनला मोह पडतो, ते तो चोरतो, पण रंगेहाथ पकडला गेल्यावर जेलचा वॉर्डन जाव्हेर्ट त्याचे पॅरोल रद्द करून परत तुरुंगात डांबण्यासाठी आल्यावर बिशप 'त्याने चोरी केली नसून मीच त्याला जगण्यास काहीतरी मदत म्हणून ती चांदीची नाणी दिली' असे सांगितल्यावर नाईलाजास्तव त्याची सुटका करणे अधिकारीवर्गाला भाग पडते. अनपेक्षित अशा सुखद धक्क्याने व्हॅल्जीन सावरतो आणि स्वतःला नव्याने घडविण्याची शपथ घेतो. पॅरोलचा कालावधी संपण्यापूर्वी तो त्या अधिकार क्षेत्रातून बाहेर पडून वेषांतर करून विविध कामे करत करत एका छोट्या फॅक्टरीचा मालकही बनतो. पण तुरुंगाधिकार्याने जणू काही शपथच घेतलेली असते त्याला शोधून पकडून परत तुरुंगात घालण्याची. तोही त्याच्या मागावर निघतो. हा पाठलाग चालू असताना इकडे फॅक्टरीतील एक स्त्री कामगार फॅन्टाईन अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीसाठी धडपडत असते, जी दूर एका गावातील दयामाया न दाखविणार्या कुटुंबात काम करीत असते. फॅन्टाईनकडून तिच्या पालनपोषणासाठी वेळेवर आणि आवश्यक तितके पैसे येत नसल्याची सततची तक्रार ते कुटुंब करीत असल्याने जादाची कमाई व्हावी यासाठी नाईलाजास्तव फॅन्टाईन वेश्याव्यवसायही पत्करते. अर्थात त्या व्यवसायात अनिच्छेने उतरल्याने घाणेरड्या गिर्हाईकांशी तिचे भांडण होते आणि नेमके तिला अटक होते ती जाव्हेर्टकडूनच...तिथे व्हॅल्जेन तिला वाचवतो. दिसण्यात वागण्यात आमुलाग्र बदल झालेल्या व्हॅल्जेनला सुरुवातीला पोलिस अधिकारी ओळखत नाही...पण मग....कथानक पुढे सरकते. खूप मोठा आवाका आहे...पुढे तो त्या फॅन्टाईनच्या निराश्रीत मुलीचे पितृत्वही स्वीकारतो...इ.इ.
हॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांची यात मांदियाळीच आहे असे म्हटले तरी चालेल. बेस्ट पिक्चरसोबत ह्यू जॅकमनलादेखील 'बेस्ट अॅक्टर' चे नामांकन मिळाले आहे.
एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ८
८. "सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबुक" - Silver Linings Playbook

हा चित्रपट मी अद्यापि पाहिला नसल्याने पूर्ण कथानक माहीत नाही, तरीही ऑस्करच्या निमित्ताने जाणून घेतले की, विनोदी धर्तीची ही एक सुखान्तिका असून पॅट सॉलिटॅनो नामक नायक, जो नुकताच मेन्टल ट्रीटमेन्ट घेऊन घरी परत आला आहे, आणि आल्यावर त्याला समजते की त्याची पत्नी निक्की घर सोडून गेली आहे, वडील बेकार झाले आहेत आणि आता नोकरी नको तर स्वतःचे छोटेसे रेस्टॉरन्ट सुरू करण्यासाठी भांडवलाची जुळवाजुळव करीत आहेत. निक्की दुसर्याच्या प्रेमात पडली आहे, तर रेड हॅन्डेड सापडलेल्या त्या प्रियकराला तो बेदम मारहाण करतो तर सहकार्यांचा 'पुन्हा मानसिक स्थितीवर उपचार करून घे' हा सल्ला झिडकारून नव्या उमेदीने आयुष्य सुरु करत असताना त्याला टिफनी नामक एक विधवा भेटते. दोघेही संगीतप्रेमी असल्याने त्यांचे जुळतेही. टिफनी स्वत:च पॅट आणि निक्की यांचे मिलन व्हावे यासाठी प्रयत्नशील असते..संगीत स्पर्धेत भाग घेणे व त्यासाठी तयारी करण्यात पॅटचे मन जसे गुंतत जाते तसेच त्याला निक्की नव्हे तर टिफनीमध्येच आपली जोडीदारीण दिसू लागते....पुढे कथानक जाते.
थोडक्यात टिपिकल अमेरिकन फॅमिली ड्रामा म्हटले तरी चालेल.
[चित्रपटात पॅटवर मेडिकल उपचार करण्यार्या डॉ.पटेलची भूमिका साकारली आहे आपल्या अनुपम खेर यानी.]
एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ८
[या आठ नॉमिनेशन्समध्ये विशेष म्हणजे 'बेस्ट अॅक्टर, बेस्ट अॅक्ट्रेस, बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर, बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस' अशी चारही अभिनयासाठीची नॉमिनेशन्स मिळाली आहेत...ऑस्करच्या इतिहासातील ही अपूर्व अशीच घटना मानली जाते.]
९. "झीरो डार्क थर्टी - Zero Dark Thirty"

टिपिकल अमेरिकन थ्रिलर ड्रामा ज्याला म्हटले जाईल असा हा अॅक्शनपट. 'हर्ट लॉकर' या अतिशय गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन जिने केले होते त्या कॅथरिन बिग्लोचा हा चित्रपट. हर्ट लॉकरसाठी तिला २००९ चे 'बेस्ट डायरेक्टर' चे ऑस्कर मिळाले होते आणि तशा बहुमान मिळविणारी ती पहिली महिला ठरली होती. त्या यशानेच प्रेरित होऊन कॅथरिन झीरो डार्क थर्टीसाठी 'ओसामा बिन लादेन' हा विषय निवडून त्याला शोधून संपवायचा घाट घालणे आणि तो कसा यशस्वी केला गेला याचे चित्तथरारक कथानक म्हणजेच हा चित्रपट. जेसिका चॅस्टेन या अभिनेत्रीला या चित्रपटातील 'माया' च्या भूमिकेसाठी 'बेस्ट अॅक्ट्रेस' चे नामांकन मिळाले आहे.
एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५
~ तर असा हा ९ चित्रपटांचा आणि त्यातील कथानकांचा थोडक्यात घेतलेला आढावा. सध्यातरी 'लिंकन', अर्गो' आणि 'लाईफ ऑफ पाय' यांचे ऑस्कर शर्यतीतील पारडे जड दिसत असल्याची चिन्हे आहेत.
अशोक पाटील
मी उद्या आर्गो बघणार. "ले
मी उद्या आर्गो बघणार.
"ले मिझराब" डिव्हिडी आल्यावर..
आर्गो राहूनच गेला होता. ऑस्करी सिनेमे हे सहसा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये रिलीज होतात. सुट्ट्यांमुळे सहसा पाहिले जातात. समरमध्ये बाकी लहानग्यांचे आणि कमर्शियल गल्लाभरु येतात. आर्गो मध्येच येऊन गेल्याने राहिला. तो गोग्लो मिळाल्याने पुन्हा नेहमीच्या वेळांत काही सिनेमांमध्ये दाखवत आहेत. ऑस्कर सोहळा जवळ येईल तसं काहीवेळा $३५ ला ५ की ७ नॉमिनेटेड सिनेमे अशी वीकेन्ड डील्स काही ठिकाणी येतात.
चमन, तू 'बीस्टस्' ला फारच वर ठेवले आहेस. चांगला आहे. शॉर्ट असूनही जरा संथ वाटला. स्क्रीनप्ले आणि एडिटिंग हे चांगल्या सिनेमाचे महत्त्वाचे भाग आहेत, यात Django त्यापेक्षा उजवा आहे.
मला बिगेलो चा 'हर्ट लॉकर' जास्त आवडला होता. झीरो डार्क थर्टीही आवडलाच. अॅक्टिंगचे जेनिफर लॉरेन्सलाच मिळायला पाहिजे, जेसिका चॅस्टेन ठीक आहे, खास नाही. तिचे 'हेल्प' मधले काम मला जास्त आवडले. "प्लेबुक" मध्ये सर्वांचीच कामं छान झालीत. गोग्लो अॅवॉर्ड्समध्ये ड्रामा आणि कॉमेडी-म्युझिकल अश्या वेगळ्या कॅटेगरीज असल्याने वेगळ्या प्रकारचे उत्तम सिनेमे आणि अभिनय यांना दाद मिळून जाते. ऑस्करला सगळे एकाच पारड्यात! एखाद्या वर्षी वेगळ्या genre मधले तोलामोलाचे सिनेमे आले की हल्लीच्या काळात हे अॅवॉर्ड्स विभागले जातात की काय असे वाटते-
ही लिंक पहा-
http://en.wikipedia.org/wiki/List_of_films_that_won_the_Golden_Globe_and...
दोन्ही मिळालेले सिनेमे इथे ऑस्कर लिस्ट मध्ये काळ्या अक्षरात आहेत. २००४ पासूनची लिस्ट इन्टरेस्टिन्ग आहे.
अडेलला पर्याय नाही. गाणे इथे ऐकता येईल- http://www.last.fm/music/Adele/_/Skyfall
ऑस्करला सेरेमनीमध्ये ती गाणार आहेच. ग्रॅमीचा परफॉर्मन्स अप्रतिम झाला होता. तिची इतर गाणीही सुंदर आहेत.
अॅनिमेटेड मध्ये यंदा फारसे चांगले काही नव्हते. ब्रेव्ह, फ्रँकन्वीनी आणि पॅरॅनॉर्मन पाहिले. ब्रेव्ह टिपिकल डिस्नी, फ्रँकन्वीनी छान आहे, टिम बर्टन मूव्हीज फॅन असाल तर आवडेल.
यंदाच्या होस्टचे काय माहीत नाही.. एमी आणि टीनालाच सगळे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकावे.
पण बघायला मजा येईल.. दरवर्षीप्रमाणेच.
लोला आणि चमन.... तुम्हा
लोला आणि चमन....
तुम्हा दोघांच्याही विस्तृत पोस्ट्स वाचल्यावर "ऑस्कर्स" वर चर्चा करणे किती आनंददायी ठरू शकते याचा मला प्रत्यय आला. २५ फेब्रुवारी २०१३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजता 'पॅण्डोरा बॉक्स' खुला होणारच आहे, त्यावेळी ह्या झळाळत्या सोनेरी बाहुल्या कुणाच्या हाती स्मितहास्य करीत विसावतील हे समजेलच, तरीही आज नॉमिनेशन्सच्या निमित्ताने आपण व्यक्त करीत असलेल्या अंदाजयात्रेसोबत जाणे फार भावत आहे.
चमन यानी आपल्या प्रतिसादात केलेला एका अतिशय गुणी अभिनेत्रीचा - सॅली फिल्ड - आवर्जुन केलेला उल्लेख. "लिंकन" संदर्भात डॅनिएलच्या नावाचा डंका सर्वत्र दुमदुमत असतानाच त्याच्या तोडीस तोड 'फर्स्ट लेडी मेरी टॉडच्या भूमिकेसाठी....योग्य ती व्यक्तीरेखा दिसावी म्हणून.... तब्बल १५ किलो आपले वजन वाढवून घेणार्या आणि त्या भूमिकेशी तादात्म्य पावणार्या सॅली फिल्डच्या 'कमिटमेन्ट' ला सलाम करावा असेच आहे.
मेरी टॉडच्या पेहरावातील सॅली फिल्ड :
'मेरी टॉड' च्या भूमिकेसाठी सॅली फिल्डलाही 'सहाय्यक अभिनेत्री' गटात ऑस्कर नॉमिनेशन मिळाले असून यापूर्वीही तिने 'नॉर्मा रे' (१९७९) आणि 'प्लेसेस इन द हार्ट' (१९८४) मधील भूमिकांसाठी 'बेस्ट अॅक्ट्रेस ऑस्कर्स" जिंकली आहेत. 'नॉर्मा रे' मधील तिची भूमिका - अन्यायाविरुद्ध लढा देणारी फॅक्टरीतील एक स्त्री कामगार - तर जगभर गाजली होती.
@ लोला ~ अॅनिमेशनपटाबाबत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
अशोक पाटील
लोकहो , जर आमोर बघण्याची संधी
लोकहो , जर आमोर बघण्याची संधी मिळाली तर अजिबात सोडु , मला तर प्रचंड आवडला.
सर्वोत्कृष्ट सिनेमा - ऑर्गो
सर्वोत्कृष्ट सिनेमा - ऑर्गो
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अँग ली (लाइफ ऑफ पाय)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - डॅनिअस डे-लुईस (लिंकन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेनिफर लॉरेन्स (सिल्वर लाइनिंग प्लेबुक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ख्रिस्तोफ वॉल्त्झ (जँगो अनचेन्ड)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅन हॅथवे (ले मिझरॉब)
परदेशी चित्रपट- आमोर
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- लाइफ ऑफ पाय
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग- ले मिझरॉब
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग- झिरो डार्क थर्टी आणि स्कायफॉल
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- ऑर्गो
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन- लिंकन
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर- लाइफ ऑफ पाय
सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - स्कायफॉल
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- जँगो अनचेन्ड
सर्वोत्कृष्ट अडप्टोडेड स्क्रीनप्ले- ऑर्गो
सर्वोत्कृष्ट काच्युम डिझायनर- अना कॅरोनिना
सर्वोत्कृष्ट मेकअप- ले मिझरॉब
सर्वोत्कृष्ट व्हिज्युएल इफेक्ट्स- लाइफ ऑफ पाय
सर्वोत्कृष्ट अनमिटेड शार्ट फिल्म- पेपरमॅन
सर्वोत्कृष्ट अनिमेटेड फिचर फिल्म- ब्रेव्ह
सर्वोत्कृष्ट शार्ट फिल्म- कर्फ्यू
सर्वोत्कृष्ट डाक्युमेंटरी- इनोसंट
सर्वोत्कृष्ट डाक्युमेंटरी फिचर- सर्चिंग फॉर शुगर मॅन
यंदाचा 'बेस्ट अॅक्ट्रेस ईन
यंदाचा 'बेस्ट अॅक्ट्रेस ईन सपोर्टिंग रोल' मरिसा टोमेईला दिलेल्या ऑस्करपेक्षाही मोठा विनोद होता. सॅली फील्डचा परफॉर्मन्स फर्लांगभर तरी ऊत्कृष्ट होता.
आणि जेनिफर लॉरेन्सचे ऑस्कर विदरस्पूनला मिळालेल्या ऑस्करपेक्षा त्यामानाने जरा कमी विनोदी प्रकरण होते. फरक एवढाच की लॉरेन्स विदरस्पूनपेक्षा खरोखर चांगली अभिनेत्री आहे.
अँगली
निषेध.
अॅडेल, डॅनिअल-डे आणि आर्गो ह्यांना खरंचच काही चॅलेंज नव्हते.
Pages