"....अ‍ॅण्ड नॉमिनीज् आर....!!"

Submitted by अशोक. on 14 January, 2013 - 01:35

नवीन वर्ष सुरू झाले की जागतिक मनोरंजन क्षेत्राला वेध लागतात ते "ऑस्कर्स" च्या सोनेरी बाहुल्यांचे ज्याना जगभर मान्यता आहे आणि हॉलिवूडमध्ये पाय ठेवलेल्या वा ठेवणार्‍या प्रत्येक कलाकाराची, निर्मात्याची, दिग्दर्शकाची, सार्‍या गटातील तंत्रज्ञांची आयुषभराची इच्छा मनोकामना असते की आपणही किमान एकदा का होईना पण त्या भव्य झळाळत्या स्टेजवर मानाने जावे आणि "..ऑस्कर गोज टु" हे जादूमय शब्द ऐकत ऐकत ती लाडाची बाहुली मान्यवराकडून आपल्या थरथरत्या हाताने घेण्याचे भाग्य लुटावे. हॉलिवूड निर्मितीतीलच नव्हे तर परदेशस्थ विभागातही येणार्‍या चहुदिशांच्या प्रवेशिका पाहिल्यावर आपल्या चित्रपटाला त्या गटात 'ऑस्कर' मिळावे याचे स्वप्न भारतीय चित्रपटसृष्टीही पाहते.

बघताबघता ८५ व्या ऑस्कर पारितोषिकांचा डंका वाजू लागला आणि आज त्याची पहिली पायरी कमिटीकडून टीव्ही माध्यमातून दाखविण्यात आली....ती म्हणजे "ऑस्कर नॉमिनेशन्स". वर्षभर पडद्यावर आलेल्या चित्रपटांतून काही चित्रपट ऑस्कर कमिटी जगभरातून आलेल्या शिफारशीवरून 'नॉमिनेशन्स = नामांकन' जाहीर करते आणि मग फेब्रुवारीच्या ११ तारखेच्या प्रत्यक्ष विजेत्या पारितोषिक वितरण समारंभाच्या दिवसापर्यंत विविध माध्यमातून नॉमिनेशन्स मिळालेल्या विविध चित्रपटांबद्दल...त्यातील कलाकारांबद्दल, तंत्रज्ञांबद्दल चर्चेचे अगदी रान उठविले जाते.

या लेखात आपणही ज्या चित्रपटांना 'बेस्ट पिक्चर ऑफ द इअर' नामांकन मिळाले आहे, त्याबद्दलच विचार करू....कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदींच्या बाबतीत स्वतंत्र लेख लिहिणे गरजेचे आहे. इथे एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हा धागा फक्त 'ऑस्कर नॉमिनेशन्स' साठी असल्याने ज्या ९ चित्रपटांचा इथे उल्लेख होत आहे त्या सर्वांचे सविस्तर कथानक सांगणे शक्य नाही, किंबहुना ते योग्यही नाही. फक्त त्रोटक स्वरूपातील ओळख इतकेच त्याचे स्वरुप आहे.

"ऑस्कर नॉमिनी फॉर द बेस्ट पिक्चर"....

१. "लिंकन : LINCOLN "
ALincoln.jpg

स्टीव्हन स्पिअलबर्ग...हे नाव घेता क्षणीच चित्रपटाचा विषय कोणताही असला तरी त्याची भव्यता तो चित्रपट पाहण्याअगोदरच जगभराच्या चित्रपटप्रेमींच्या नजरेसमोर येते, इतके नाव स्पिअलबर्गने आपल्या कलात्मक आणि विषयाशी अनुरुप अशा चित्रणपद्धतीने मिळविले आहे. 'अब्राहम लिंकन' - अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षाविषयी माहिती नसलेली व्यक्ती या जगात विरळ म्हणावी लागेल. अमेरिकन सिव्हिल वॉर, नीग्रोना गुलमागिरीतून मुक्तता, रंगभेदाचे उच्चाटन करण्यासाठी लिंकनने केलेले अथक प्रयत्न आणि त्यातच विरोधकांनी केलेला त्याचा राष्ट्राध्यक्ष पदावरच असताना एका नाट्यगृहात केलेला पूर्वनियोजित खून. ह्या ठळक घटनापैकी स्टीव्हन स्पिअलबर्गने १८६५ च्या त्या चार महिन्याचा काळ चित्रपटासाठी निवडला असून अमेरिकन घटनेतील १३ व्या दुरुस्ती बिलाबाबत त्याने केलेला आटापिटा [ह्याच दुरुस्तीअन्वये नीग्रोना गुलामगिरीतून मुक्तता मिळणार असते]...आणि त्यावरून रीपब्लिकन व डेमोक्रॅट्स यांच्यातील डावपेच यांचे विलक्षण ताणाचे तसेच अगदी जणू त्याच काळात प्रेक्षकाला घेऊन जाण्याची त्याची हातोटी प्रेक्षकाला खिळवून ठेवते. तब्बल अडीच तासाच्या या चित्रपटात "संवाद" हाच प्रमुख कलाकार आहे. पात्रांचे संवाद हीच 'अ‍ॅक्शन' या चित्रपटाचे आकर्षण केन्द्र बनले आहे. डॅनिएल डे-लेविस या दोन ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने साकारलेला 'अब्राहम लिंकन' पडद्यावर पाहताना असे वाटत राहते की खुद्द लिंकनच ती भूमिका सादर करीत आहे, इतके साम्य डॅनिएलने दाखविले आहे. विशेषतः लिंकनचे लांबलचक संवाद कॅमेर्‍याच्या एकाच अ‍ॅन्गलने तसेच एकाच टेकमध्ये घेतल्याने त्याचे पाठांतर कौतुकास्पद म्हणावे लागेल.

विविध विभागासाठी एकूण '१२ नॉमिनेशन्स" लिंकन ने मिळविली आहेत.

२. "आमूर...AMOUR"
A3.jpg

अगदी मराठी चित्रपटातून तसेच नाटकातून शोभेल अशी या चित्रपटाची कथा. ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित झालेला हा चित्रपट कहाणी सांगतो ते जॉर्ज आणि अ‍ॅना या वयाच्या ८० च्या दशकात असलेल्या संगीत शिक्षक जोडप्याची. त्यांची एकुलती एक मुलगी ईव्ह, जी स्वत:ही संगीत शिक्षिका आहे, परदेशी नोकरीत असते. हे वृद्ध जोडपे एकमेकाला सांभाळून जुन्या आठवणीवर जगत असते, त्यातच प्रेम...[आमूर = प्रेम] आणि एके दिवशी अ‍ॅनाला हृदयविकाराचा झटका येऊन ती विकलांग होते. तिच्या उर्वरित दिवसासाठी जॉर्ज करीत असलेले प्रयत्न आणि त्याचे हाल पाहून होणारी अ‍ॅनाची तगमग...अशी ही अत्यंत आपुलकीची सरळसोट वाटणारी कथा. वैशिष्ठ्य म्हणजे या चित्रपटातील अ‍ॅनाच्या भूमिकेसाठी 'इमॅन्युअल रिव्हा' ह्या फ्रेन्च अभिनेत्रीला 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस'साठीही नॉमिनेशन मिळाले असून सध्या ही अभिनेत्री ८५ वर्षाची आहे आणि जर तिला ही बाहुली मिळालीच तर ऑस्करच्या इतिहासातील पारितोषिक जिंकणारी सर्वाधिक वयाची अभिनेत्री म्हणून तिचा गौरव होईल.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स = ५

३. "लाईफ ऑफ पाय" - LIFE OF PI"
A2.jpg

तैवान इथे जन्मलेल्या आणि आता अमेरिकन नागरिकत्व घेतलेल्या आन्ग ली या दिग्दर्शकाचा "क्राऊंचिंग टायगर, हिडन ड्रॅगन" तसेच 'सेन्स अ‍ॅण्ड सेन्सिबिलिटी" हे गाजलेले चित्रपट आपणास माहीत आहे. याच दिग्दर्शकाचा यंदाचा जगभर उत्पन्नाचे रेकॉर्ड केलेला आणि भारतीय कलाकारांच्या अदाकारीने नटलेला "लाईफ ऑफ पाय" हा जंगलपट जगभरातील समीक्षकांच्या दृष्टीने अतिशय गौरविला जात आहे. बेस्ट पिक्चरचा प्रबळ दावेदार असलेल्या या चित्रपटाची कहाणी म्हणजे सागरी दुर्घटनेमुळे एका युवकाच्या नशिबी आलेली अनपेक्षित सागरी भटकंती आणि त्याला मिळालेला एक तितकाच अनपेक्षित सागरी सहकारी...बंगाली वाघ. भारतात सर्वत्र गाजावाजा झालेल्या या चित्रपटाने ऑस्करपर्यंत झेप घेतली आहे त्यामुळे यंदाच्या शर्यतीकडे आपल्या भारतीय प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलेले असणार.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स : ११

४. अर्गो : ARGO
AArgo.jpg

सम्राट शहाच्या उचलबांगडीनंतरचे धगधगते इराण, शाहला अमेरिकेकडून पाठिंबा मिळतोय म्हणून तेहरानच्या अमेरिकन दुतावासात इराणी अतिरेक्यांनी केलेला हल्ला आणि तेथील सुमारे ५० कर्मचार्‍यांना ओलिस म्हणून कैदेत ठेवणे...त्यातून सहा अमेरिकन राजनितितज्ज्ञांनी सुटका करून कॅनेडिअन वकिलातीमध्ये आश्रय घेणे...त्यांच्या सुटकेसाठी सीआयने केलेले प्रयत्न व त्या गटाचा नायक यांच्यातील द्वंद्व अतिशय वेगवाने चित्रीकरणाने पाहाणार्‍याला अक्षरशः खिळवून ठेवते.

एकून ऑस्कर नॉमिनेशन्स : ७
५. "बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" - Beasts of the Southern Wild

A5.jpg
सहा वर्षाची एक मुलगी आणि भडक माथ्याचा तिचा बाप यांच्यातील 'हेट अ‍ॅन्ड लव्ह' पद्धतीची कथा फुलते ती समुद्रकिनारी असलेल्या त्यांचा कम्युनिटीला वादळाचा तडाखा बसतो त्या अनुषंगाने. आपले घर, वडील याना तर त्या नैसर्गिक कोपातून वाचवायचेच शिवाय वसाहतीत त्या वादळातून शिल्लक राहिलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठीचा आटापिटा... सहा वर्षाच्या 'हशपप्पी' या मुलीचे काम करणार्‍या क्वेन्झेन वॅलिस [जी या क्षणी ९ वर्षाची आहे] हिला तिच्या अविस्मरणीय अशा अभिनयासाठी "बेस्ट अ‍ॅक्ट्रेस" चे नामांकन मिळाले आहे. यदाकदाचित तिला हे ऑस्कर मिळाले तर इतक्या लहान वयात तसे मिळविणारी ती पहिली 'अभिनेत्री' ठरेल.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५

६. "जॅन्गो अनचेन्ड - Django Unchained"

A6.jpg
"किल बिल, पल्प फिक्शन, इनग्लोरिअस बास्टर्डस..." आदी गाजलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकाचा - क्वेन्तिन टॅरॅन्टिनो - जॅन्गो अनचेन्ड हा ज्याला 'वेस्टर्न' धर्तीचा म्हटले जाते त्या जातकुळीतला चित्रपट. जॅन्गोचे काम केले आहे जेमी फॉक्स या अभिनेत्याने. कथानक घडते १८५८ मध्ये...अमेरिकेतील नीग्रोंच्या गुलामगिरीचा काळ. जॅन्गो त्याच गुलामगिरीत खितपत पडला असून तिथून तो आपल्या मदतकर्त्याने दिलेल्या सहाय्याच्या आधारे बाहेर पडतो आणि पत्नीच्या शोधार्थ निघतो...जी आता गब्बर अशा जमिनदाराच्या मळ्यात अन्य गुलाम स्त्रियांच्या समवेत काम करत असते. दोघांचीही वेगवेगळ्या ठिकाणी विक्री झालेली असते पण पत्नीला त्या कैदेतून मुक्त करण्यासाठी जॅन्गोने केलेली धडपड सांगणारी ही कहाणी. विशेष म्हणजे 'टायटॅनिक' फेम लीओनार्डो कॅप्रियोने त्या जुलमी मळेवाला जमिनदाराची नकारार्थी अशी भूमिका साकारली आहे.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५

७. ले मिझेराब्ल - Les Miserables

A7.jpg
व्हिक्टर ह्युगो या जगप्रसिद्ध फ्रेन्च लेखकाची १८६२ मध्ये प्रकाशित झालेली ह्याच नावाची कादंबरी इथल्या बर्‍याच सदस्यांना माहीत असेलच. याच कादंबरीवरून वेळोवेळी तयार झालेल्या संगीतिकाही इंग्लंड तसेच युरोपच्या अन्य देशातही त्या त्या काळातील समाजाला भावल्या होत्या. एका मोठ्या कादंबरीवरून हा चित्रपट बेतला असल्याने त्याच्या कथानकाचा आवाकाही तसाच दीर्घ असल्याने थोडक्यात सांगायचे झाल्यास...काळ १८१५, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी ज्यॉं व्हॅल्जीनला काही काळासाठी 'पॅरोल' मिळते. बाहेर पडल्यावर एका चर्चमध्ये त्याला तेथील बिशप रात्रीपुरता सहारा देतो, पण त्याच्याकडे असलेल्या चांदीच्या शिक्क्यांचा व्हॅल्जीनला मोह पडतो, ते तो चोरतो, पण रंगेहाथ पकडला गेल्यावर जेलचा वॉर्डन जाव्हेर्ट त्याचे पॅरोल रद्द करून परत तुरुंगात डांबण्यासाठी आल्यावर बिशप 'त्याने चोरी केली नसून मीच त्याला जगण्यास काहीतरी मदत म्हणून ती चांदीची नाणी दिली' असे सांगितल्यावर नाईलाजास्तव त्याची सुटका करणे अधिकारीवर्गाला भाग पडते. अनपेक्षित अशा सुखद धक्क्याने व्हॅल्जीन सावरतो आणि स्वतःला नव्याने घडविण्याची शपथ घेतो. पॅरोलचा कालावधी संपण्यापूर्वी तो त्या अधिकार क्षेत्रातून बाहेर पडून वेषांतर करून विविध कामे करत करत एका छोट्या फॅक्टरीचा मालकही बनतो. पण तुरुंगाधिकार्‍याने जणू काही शपथच घेतलेली असते त्याला शोधून पकडून परत तुरुंगात घालण्याची. तोही त्याच्या मागावर निघतो. हा पाठलाग चालू असताना इकडे फॅक्टरीतील एक स्त्री कामगार फॅन्टाईन अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीसाठी धडपडत असते, जी दूर एका गावातील दयामाया न दाखविणार्‍या कुटुंबात काम करीत असते. फॅन्टाईनकडून तिच्या पालनपोषणासाठी वेळेवर आणि आवश्यक तितके पैसे येत नसल्याची सततची तक्रार ते कुटुंब करीत असल्याने जादाची कमाई व्हावी यासाठी नाईलाजास्तव फॅन्टाईन वेश्याव्यवसायही पत्करते. अर्थात त्या व्यवसायात अनिच्छेने उतरल्याने घाणेरड्या गिर्‍हाईकांशी तिचे भांडण होते आणि नेमके तिला अटक होते ती जाव्हेर्टकडूनच...तिथे व्हॅल्जेन तिला वाचवतो. दिसण्यात वागण्यात आमुलाग्र बदल झालेल्या व्हॅल्जेनला सुरुवातीला पोलिस अधिकारी ओळखत नाही...पण मग....कथानक पुढे सरकते. खूप मोठा आवाका आहे...पुढे तो त्या फॅन्टाईनच्या निराश्रीत मुलीचे पितृत्वही स्वीकारतो...इ.इ.

हॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांची यात मांदियाळीच आहे असे म्हटले तरी चालेल. बेस्ट पिक्चरसोबत ह्यू जॅकमनलादेखील 'बेस्ट अ‍ॅक्टर' चे नामांकन मिळाले आहे.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ८
८. "सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबुक" - Silver Linings Playbook

A8.jpg
हा चित्रपट मी अद्यापि पाहिला नसल्याने पूर्ण कथानक माहीत नाही, तरीही ऑस्करच्या निमित्ताने जाणून घेतले की, विनोदी धर्तीची ही एक सुखान्तिका असून पॅट सॉलिटॅनो नामक नायक, जो नुकताच मेन्टल ट्रीटमेन्ट घेऊन घरी परत आला आहे, आणि आल्यावर त्याला समजते की त्याची पत्नी निक्की घर सोडून गेली आहे, वडील बेकार झाले आहेत आणि आता नोकरी नको तर स्वतःचे छोटेसे रेस्टॉरन्ट सुरू करण्यासाठी भांडवलाची जुळवाजुळव करीत आहेत. निक्की दुसर्‍याच्या प्रेमात पडली आहे, तर रेड हॅन्डेड सापडलेल्या त्या प्रियकराला तो बेदम मारहाण करतो तर सहकार्‍यांचा 'पुन्हा मानसिक स्थितीवर उपचार करून घे' हा सल्ला झिडकारून नव्या उमेदीने आयुष्य सुरु करत असताना त्याला टिफनी नामक एक विधवा भेटते. दोघेही संगीतप्रेमी असल्याने त्यांचे जुळतेही. टिफनी स्वत:च पॅट आणि निक्की यांचे मिलन व्हावे यासाठी प्रयत्नशील असते..संगीत स्पर्धेत भाग घेणे व त्यासाठी तयारी करण्यात पॅटचे मन जसे गुंतत जाते तसेच त्याला निक्की नव्हे तर टिफनीमध्येच आपली जोडीदारीण दिसू लागते....पुढे कथानक जाते.

थोडक्यात टिपिकल अमेरिकन फॅमिली ड्रामा म्हटले तरी चालेल.
[चित्रपटात पॅटवर मेडिकल उपचार करण्यार्‍या डॉ.पटेलची भूमिका साकारली आहे आपल्या अनुपम खेर यानी.]

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ८
[या आठ नॉमिनेशन्समध्ये विशेष म्हणजे 'बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस' अशी चारही अभिनयासाठीची नॉमिनेशन्स मिळाली आहेत...ऑस्करच्या इतिहासातील ही अपूर्व अशीच घटना मानली जाते.]

९. "झीरो डार्क थर्टी - Zero Dark Thirty"

A9.jpg
टिपिकल अमेरिकन थ्रिलर ड्रामा ज्याला म्हटले जाईल असा हा अ‍ॅक्शनपट. 'हर्ट लॉकर' या अतिशय गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन जिने केले होते त्या कॅथरिन बिग्लोचा हा चित्रपट. हर्ट लॉकरसाठी तिला २००९ चे 'बेस्ट डायरेक्टर' चे ऑस्कर मिळाले होते आणि तशा बहुमान मिळविणारी ती पहिली महिला ठरली होती. त्या यशानेच प्रेरित होऊन कॅथरिन झीरो डार्क थर्टीसाठी 'ओसामा बिन लादेन' हा विषय निवडून त्याला शोधून संपवायचा घाट घालणे आणि तो कसा यशस्वी केला गेला याचे चित्तथरारक कथानक म्हणजेच हा चित्रपट. जेसिका चॅस्टेन या अभिनेत्रीला या चित्रपटातील 'माया' च्या भूमिकेसाठी 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस' चे नामांकन मिळाले आहे.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५

~ तर असा हा ९ चित्रपटांचा आणि त्यातील कथानकांचा थोडक्यात घेतलेला आढावा. सध्यातरी 'लिंकन', अर्गो' आणि 'लाईफ ऑफ पाय' यांचे ऑस्कर शर्यतीतील पारडे जड दिसत असल्याची चिन्हे आहेत.

अशोक पाटील

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ नंदिनी....

"बॉम्बे जयश्री...." ~ फार मोठे नाव झाले आहे जयश्रीचे सध्या दक्षिणेकडील चित्रनिर्मितीत.....पी.सुशीला या नावानंतर. विशेष म्हणजे जयश्रीचे सारे शिक्षण मात्र मुंबईत झाले आहे....[त्यामुळेच की काय त्यानी आपल्या नावात 'बॉम्बे' समाविष्ट केले असावे.]

"लाईफ ऑफ पाय" मधील अंगाईगीतासाठी त्याना मिळालेले नामांकन त्यांच्या कारकिर्दीचा गौरव करणारे आहेच. पण बॉम्बे जयश्री याना काट्याची टक्कर म्हणता येईल अशी द्यायची आहे ती 'स्कायफॉल' साठी याच गटात नामांकन मिळालेल्या अ‍ॅडेले अ‍ॅडकिन्सला. त्यातच 'बॉण्ड' पटाला अगदी १९६५ च्या 'थंडरबॉल' नंतर एकदाही ऑस्कर मिळाले नसल्याने आणि यंदा ते मिळण्याची शक्यता झाली असल्याने अ‍ॅडेलेच्या गाण्याची हवा गरम आहे असे म्हटले जाते.

तरीही आपण बॉम्बे जयश्रीसाठी आशादायी राहू शकतो.

अशोक पाटील

यातला फक्त अर्गो पाहिलाय आत्तापर्यंत.. मला आवडला तो.. पण चित्रपट रोचक होण्यासाठी काही प्रसंग उगीचच जास्त ड्रॅमॅटाइझ केले आहेत (खरं जे घडलं त्यापेक्षा जास्त) असं मला वाटलं. त्यामुळे याला बेस्ट पिक्चर नाही मिळणार असं वाटतंय.

<<बाकी... किरण राव हिने हिंदुस्थान टाईम्सला ऑस्कर संदर्भात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलेली "The grammar and the syntax of our movies are so different that there are very few films that can actually appeal to the world audience and, especially, to the Academy audience" ही कबुली प्रामाणिक वाटते. >>

असहमत. स्लमडॉग मिल्यनेर ला का बरं एव्हढी ऑस्कर्स मिळाली? त्यातहि भारतिय कलाकार, संगीत, कथानक होते.

आयएमओ, व्हॉट इज लॅकिंग इज गुड स्क्रिप्ट अँड स्टोरी टेलिंग.

बाकि लेख उत्तम!

स्लमडॉग मिलिनेअर ही भारतीय विषयावरची ब्रिटिश माणसाने केलेली फिल्म होती. भारतीय फिल्म नव्हती.
भारतीय कलाकार, संगीत, लोकेशन्स वगैरे होते पण पटकथा व दिग्दर्शन भारतीय नव्हते. व्हिजन भारतीय नव्हते.

माझा तोच मुद्दा आहे. एक ब्रिटिश करु शकतो - भारतीय कथा इ. वर, आणि ऑस्कर मिळवतो, तर भारतीय दिग्दर्शक का नाहि? ग्रामर अँड सिंटॅक्स हा किरण रावचा पॉइंट "मूट" आहे.

राज....

वर नीधप यांच्या मताशी सहमती व्यक्त करीत असतानाच मी देखील असेच सांगेन की, किरण राव यांचा संदर्भीय शेरा हा 'पूर्णपणे भारतीय निर्मिती' ला उद्देश्यून आहे....मग थेट ते मत अगदी 'मदर इंडिया' पासून यंदाच्या 'बर्फी' या भारतीय प्रवेशिकेबाबतीत असेल.

"स्लमडॉग.....' ला जरूर लक्षणीय अशा संख्येने ऑस्कर्स मिळाली होती, मग तशी "गांधी" लाही मिळाली होतीच. पण तो चित्रपटही भारतीय निर्मिती नव्हती हे तुम्हालाही माहीत असेलच.

बाकी तुम्ही म्हटल्याप्रमाणे "...गुड स्क्रिप्ट अँड स्टोरी टेलिंग...." हे मत मान्यच. किरण तरी दुसरे काय म्हणते ?

अशोक पाटील

किरण राव अवर मूव्हीज म्हणजे बॉलिवूडबद्दल बोलत असेल तर तिचं म्हणणं योग्य आहे. भारतीय सिनेमा म्हणत असेल तर बर्‍याच दिग्दर्शकांचे अपवाद करावे लागतील.
सध्या ती बॉलिवूडबद्दल म्हणतेय असं धरलं तर एक साधी गोष्ट जी प्रेक्षकांच्या गावी नसते ती म्हणजे चित्रपट दिग्दर्शकाच्या व्हिजनवर अवलंबून असतो.
आपली हिंदी इंडस्ट्री ही संपूर्णपणे स्टारशरण आहे. आपल्याला हवी तशी कथा, पटकथा, दृश्ये वळवणे, एडिटमधे फारफेर करणे हे सगळे स्टार्स/ त्यांचे एजन्टस करतच असतात. त्यामुळे तिचे म्हणणे योग्यच.

भारतीय चित्रपट निर्मिती आणि भारतात घडणार्‍या कथेवर केलेला स्लमडॉग मिलिनेअर यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

अरे वा! छान.
अशोकजी, तुम्ही पाहिले का सगळे मूव्ही?
पाय ला मिळणार नाय, आर्गोला गोग्लो दिले. सो आता लि़ंकनला देणार. ते ब्रिटिश डिरेक्टर, राजा, पीएम असले फार झाले तेव्हा आता लिंकन आणि Daniel Day-Lewis ( तो ब्रिटिश आहे Proud )

ट्रेलर्स आणि बाकी नॉमिनेशन्स इथे पहायला मिळतील-
http://oscar.go.com/nominees

http://oscar.go.com

आर्गोला गोग्लो दिले. सो आता लि़ंकनला देणार. >>> लोला +१ , माझा पण अंदाज तोच आहे , आर्गोची गोग्लो देऊन बोळवण केली आणि लिंकनचा मार्ग मोकळा झाला.
चांगला आढावा घेतलाय.

गेल्या काहि वर्षांचा रेकॉर्ड बघता लिंकन ला मिळेल कदाचित. बेस्ट अ‍ॅक्टर साठी डे-लेविस ला नक्किच. गेल्या वर्षी मेरिल स्ट्र्रीप (मार्गरेट थॅचर) त्या आधी कॉलीन फर्थ (किंग्स स्पीच). रिअल लाईफ पोरर्टेअल ला जास्त झुकतं माप असतं असं वाटतं. शिवाय स्पिलबर्ग आणि डे-लेविस दोघं मास्टर इन देअर क्राफ्ट. दोघेहि माझे फेवरीट. पिक्चर न बघताहि माझं अवॉर्ड त्यांनाच. स्मित

वा. खुप सुंदर ओळख. लाईफ ऑफ पाय ला मिळावे अशी खुप अपेक्षा आहे. पण स्पर्धाही तेवढीच तीव्र दिसतेय.
मला फक्त ला मिझरेबल बघायला मिळेल.

मी आमूर सोडून सगळे बघितले आहेत.

लाईफ ऑफ पायला मिळणार नाही आणि मिळायलाही नको.
जँगोला का निवडले ह्याचे फार आश्चर्य वाटले. (टॅरेंटिनोचा फॅन असूनही)

माझी क्रमवारी
१) अर्गो
२)लिंकन
२)झीरो डार्क थर्टी
४)सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक
५)बीस्ट्स ऑफ सदर्न वाईल्ड
६)लाईफ ऑफ पाय
७)ले मिझेराब्ल्ह
८)जँगो अनचेन्ड

ह्या कॅटेगरीत आमूर बहूधा लाईफ ऑफ पायच्या वरती बसू शकेल असे वाटते.
२००४ च्या क्रॅशसारखा 'सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक' डार्क हॉर्स ठरू शकतो.

बेस्ट डिरेक्टर आवर्डसाठीही मला ली बद्दल शंका वाटतेय. स्पीलबर्ग जिंकू शकेन.
पुन्हा रसेल आणि झेटलिन ईथे डार्क हॉर्स ठरू शकतात.

बेस्ट अ‍ॅक्टरसाठी मला वाटतं डॅनियल-डे बाकी सगळ्यांपेक्षा खूपच आघाडीवर आहे. त्यानंतर जॅकमन आणि ब्रॅडली कूपर. डेन्झेल वॉशिंग्टनचे नॉमिनेशन अजून एक आश्चर्य. (द मास्टर बघितला नाही)

अर्गो, स्पीलबर्ग, डॅनियल्-डे, चॅस्टाईन.

मी जर बेस्ट पिक्चर निवडणारा असतो तर वरच्या आठपैकी मी 'सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक' किंवा 'बीस्ट्स ऑफ सदर्न वाईल्ड' निवडला असता. डिरेक्शन मध्ये आंग-ली ऐवजी अ‍ॅफ्लेक किंवा बिगेलो ला नॉमिनेशन चालले असते.

चमन ,
अर्गोला मिळु शकला असता पण गोग्लो मध्ये त्याची आधीच निवड झालीय म्हणुन शक्यता कमी आहे.
डॅनिएल ने लिंकनचं पात्र अफलातुन साकारलयं. त्यामुळे बेस्ट अ‍ॅक्टरसाठी तोच.
बेस्ट डिरेक्टर आवर्डसाठीही मला ली बद्दल शंका वाटतेय. स्पीलबर्ग जिंकू शकेन. >>> माझही मत स्पीलबर्गला .
लीड अ‍ॅक्ट्रेस आमोर ची अ‍ॅना .

धन्यवाद मंडळी...

@ दिनेश ~ मी तुम्हाला व्यक्तीशः शिफारस करीन की तुम्ही किमान डॅनिएल डे लुईससाठी 'लिंकन' पाहावाच. एक क्षणभरही आपल्याला जाणवत नाही की पडद्यावर आपण 'अभिनय' पाहात आहोत.

@ गेहना ~ 'रीअल लाईफ पोर्ट्रेअल्स' ना झुकते माप मिळते हे तुमचे निरीक्षण योग्यच आहे. ती प्रथा तर अगदी १९३६ मध्ये पॉल म्युनी साकारलेल्या 'लुई पाश्चर' च्या भूमिकेपासून चालू आहे. जॉर्ज सी. स्कॉट...."पॅटन", बेन किंग्जले..."गांधी", फॉरेस्ट व्हिटेकर...."लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड".... इ. काही आणखीन् काही उदाहरणे.

@ चमन ~ लाईफ ऑफ पाय ला [मला वाटते] तांत्रिक गटातील काही ऑस्कर्स जरूर मिळतील....तेवढी करामत बंगाली वाघ करेल.

@ श्री ~ डॅनिएल डे-लुईसने साकार केलेली 'लिंकन' भूमिका केवळ अप्रतिमच आहे. तो यंदाच्या ऑस्करसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

.... आणि जर यदाकदाचित डॅनिएल डे-लुईसला या बेस्ट अ‍ॅक्टरचे ऑस्कर मिळाले तर ऑस्कर इतिहासात 'उत्कृष्ट अभिनेत्या'साठी तीन बाहुल्या पटकाविणारा तो पहिला अभिनेता ठरेल. आजपर्यंत फक्त ९ अभिनेत्यानी 'दोनदा' हा पुरस्कार मिळविण्याचा विक्रम केला आहे... या नऊजणात अर्थात डॅनिएल डे-लुईस आहेच.

अशोक पाटील

'बॉर्न...." मध्ये टॉम क्रूझ होता आणि त्याला ऑस्कर नॉमिनेशक मिळाले होते केवळ.

डॅनिएल डे लुईस ने 'माय लेफ्ट फूट [१९८९] आणि "देअर वुईल बी ब्लड [२००७]" या दोन चित्रपटातेल भूमिकेंसाठी बेस्ट अ‍ॅक्टरची ऑस्कर्स मिळविली आहेत. 'लिंकन' हा त्याचा तिसरा आणि विक्रमी ऑस्करपट होईल. .... [होईलही कदाचित]

अशोक पाटील

चित्रपटविषयक धाग्यावर सहसा न येणारा मी 'अशोक' नाव पाहून आलो आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुमचा व्यासंग किति सखोल असतो याचे पुन्हा एकदा दर्शन घडले. किति चांगली माहिति एका ठिकाणी वाचायला मिळाली! लिंकन हा सिनेमा बघायची इच्छा मला या वाचनातून निर्माण झाली हे तुमच्या लेखाचे यशच.

काय बोलू/लिहू या प्रतिक्रियेवर, भास्कर ?

धन्यवाद तर म्हणतोच, पण मला आनंद होतो तो यासाठी की तुम्हाला 'लिंकन' पाहाण्याची प्रबळ इच्छा झाली..... जरूर पाहा. व्यक्तीचित्रण म्हणजे काय असते याचा वस्तुनिष्ठ धडाच दिग्दर्शक स्टीव्हन स्पिएलबर्गने घालून दिला आहे. लिंकन यांच्या आयुष्यातील केवळ ४ महिन्याच्या कालावधीतील....तेही एका लॉ अमेन्डमेन्ट बिलावरील चर्चा.... संसदीय घटनेवर आधारित सत्यकथेवर चित्रपट निर्मिती करायची आणि तो तितकाच लोकप्रिय करायचा....हे कसब जितके स्टीव्हन यांचे तितकेच ती भूमिका साकारण्यार्‍या डॅनिएल डे लुईस या अभिनेत्याचेही.

चित्रपटात केवळ संवाद आणि संवादच असूनसुद्धा पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षकावरील आपली पकड सोडू देत नाही हे विशेष.

अशोक पाटील

धन्स मामाश्री............मस्त लीहीलाय...... Happy
मी यातले तीन पाहीलेत, आता हे वाचुन सर्वच पहाणार...... Happy

हा अर्गो पहायला हवा आणि आमुर मला फ्लॅशबॅक असेल असे वाटलेले......पण आता पहावाच असे वाटते.... Happy
लिंकन तर माझे आवडते व्यक्तीमत्व त्यामुळे ते मी पाहीलेच... Happy

व्वा.. मस्तच... एवढे चित्रपट पाहेन की नाही माहीत नाही.. पण नॉमिनीज ओळख आवडली.. चित्रपटांबद्दल ओळख करून दिली ते बरे झाले... फक्त लिंकन, बिस्टस ऑफ... , सिल्वर..., लाईफ... इतकीच नावे काय ती ऐकली होती नि थोडेफार माहित होते.. धन्यवाद Happy

१३ व्या अमेंडमेंटची बर्‍यापैकी माहिती होती परंतू कथेत बरेचसे बारीक सारीक पात्रं सारखे येत जात राहतात त्यामुळे प्रत्येकाची भुमिका समजावून घेतांना आणि घटनाक्रमाची लिंक ठेवतांना डॉक्युमेंट्रीचा फिल येत होता. पण बिल मंजूर करण्यामागचे नाट्य स्पीलबर्गने दोन तासात दाखवले ह्यासाठी त्याच्या डिरेक्शनला सलाम.
सॅली फिल्डनेही मेरी टॉड आणि तिचे डिप्रेशन आणि सो-कॉल्ड बायपोलार डीसऑर्डर चांगली दाखवली आहे. पण लक्षात राहतो तो फक्त 'लेविस'.

अर्गोचा ईंपॅक्ट जबरदस्त होता. थ्रिल अगदी असह्य होईपर्यंत ताणले होते, ईतके की ह्याच्यामधनं आता लवकर सुटका होवो, असं वाटू लागलं. सिनेमा म्हणून मला तो लिंकनपेक्षा जास्त ईंप्रेसिव वाटला.

घटना :- अर्गो, झीरो डार्क थर्टी
माणसं :- सिल्वर लाईनिंग्स प्लेबुक, आमूर(?)
घटना आणि माणसं :- लिंकन, बीस्ट्स ऑफ सदर्न वाईल्ड
नाट्य -: जँगो, लाईफ ऑफ पाय, ले मिझेराब्ल्ह

मला स्वतःला माणसं आणि त्यांचं वागणं केंद्रस्थानी ठेवणारे छोट्या कॅनवासवरचे सिनेमे फ्रेश आणि अपीलिंग वाटतात, आवडतात. घटनांच्या भोवती फिरणारे सिनेमे फार काळ लक्षात रहात नाहीत. घटना आणि ईमोशन्सचा व्यवस्थित बॅलन्स असलेले सिनेमे चिरकाल स्मरणात राहतात आणि अनेकवेळा बघितले जातात. जँगो, आणि लाईफ ऑफ पाय सारखे सिनेमे एक काही तरी कल्पना आणि त्यातल्या नाट्याभोवती फिरतात पण ते मनोरंजनापेक्षा काही जास्त देत नाहीत

आर्गो कदाचित लिंकनला Best Movie मध्ये मागे टाकू शकेल. आर्गोने गोल्डन ग्लोबला बेस्ट डिरेक्टर आणि सॅगला बेस्ट कास्ट आन्साम्बल मध्ये बाजी मारली आहे. गुड विल हंटिंगनंतर बेन अ‍ॅफ्लेकला परत एकदा ऑस्कर घेताना मला नक्कीच आवडेल. मधल्या काही वर्षांत वाट चुकल्यानंतर बेनचा खराखुरा कम बॅक. Come on 'Argo' naut!

चमन, मस्त पोस्ट. (घरात अब्राहम लिंकनचं चरित्रात्मक पुस्तक आहे ते काढून त्यातलं १३व्या अमेण्डमेण्टचं प्रकरण आता पुन्हा वाचणार.)
'लिंकन' काल इथे रिलीज झाला आहे. पण आपल्या इथे नॉमिनेटेड सिनेमे जेमतेम एखादा आठवडा असतात Sad

'बॉर्न...." मध्ये टॉम क्रूझ होता आणि त्याला ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते केवळ >>>

अरे हो की! दोन्ही सिनेमांना एकाच वर्षी नामांकनं होती, त्यामुळे घोटाळा झाला माझा. (गूगल करून मग पोस्ट टाकायला हवी होती Wink )१९८९चा ऑस्कर सोहळा (दूरदर्शनवर पाहिलेला), त्यात नॉमिनेशन्सच्या वेळेस त्या-त्या सिनेमांचे जे छोटेछोटे शॉट्स दाखवतात, त्यातही डॅनियल डे लुईसचा अभिनय चांगला ठसला होता मनावर.
असो.

(अवांतर - आज रात्री स्टार मूव्हीजवर 'वॉर हॉर्स' दाखवणार आहेत. (गेल्यावर्षीची नॉमिनेटेड फिल्म) पाहण्याचं ठरवलं आहे.)

Pages