चारचौघी - ४

Submitted by बेफ़िकीर on 11 January, 2013 - 07:58

पंधरा दिवस झाले, पण निली आणि जया एकमेकींशी एक अक्षर बोललेल्या नव्हत्या. सिम आणि जो ने बराच प्रयत्न केला समेटाचा, पण निष्फळ ठरला. शेवटी प्रत्येकजण आपापल्या उद्योगात गुंतून गेली. 'बोलतील तेव्हा बोलतील' ही पॉलिसी सर्वांनीच स्वीकारली. पण त्या रात्री निलीने केलेले अनुभवकथन, जयाने मांडलेले विचार आणि शेवटी निलीने तिचा केलेला अपमान या सर्वांमुळे एक गढूळ वातावरण रूममध्ये तयार झालेले होते. या पंधरा दिवसात जो ला ते तीन जणांचे मोटरसायकल घेऊन आलेले टोळके एकदाही दिसले नाही. तसेही ती एकदाही उशीरा आलीच नाही ऑफीसमधून!

मात्र या पंधरा दिवसात अलगदपणे एक फरकही पडला. जो चा बॉस भसीन याच्या रिलेशनमधील ज्या मुलीला होस्टेलवर रूम हवी होती ती प्रियंका नावाची मुलगी शेजारच्याच रूममध्ये राहायला आली. दिवसा कॉलेजला जायची आणि संध्याकाळपासून यांच्याच रूमवर ती तळ ठोकायला लागली. प्रथम प्रथम लाजरीबुजरी आणि नवखी असलेली केवळ एकोणीस वर्षांची प्रियंका हळूहळू त्यांच्यात रुळली इतकेच नव्हे तर तिला पिया म्हणून हाक मारणेही सुरू झाले. जो आणि निलीला ला ती अर्थातच ताई म्हणायची, बाकीच्यां दोघींना नावाने हाक मारायची. पिया चांगलीच चुणचुणीतही होती आणि घरची परिस्थितीही बरी असावी तिच्या! भसीन तिच्या आईचा मावस भाऊ होता पण तितकेसे संबंध नव्हते. केवळ होस्टेलवर रूम मिळवण्यापुरती चौकशी करण्याइतके व मदत घेण्याइतकेच संबंध होते. हळूहळू पियाचे व्यक्तीमत्व सगळ्यांना कळायला लागले आणि रूममधील गढूळता कमी कमी होत शेवटी एक दिवशी ती रूम स्वच्छ स्वच्छ हासली. याचे कारण गेल्या काही दिवसात पियाने सगळ्यांना गाण्याच्या भेंड्या खेळायला लावल्या, पत्ते कुटायला लावले, जोक्स सांगितले, एकदा तर चक्क रूममध्येच रुमाल पाणी खेळल्या सगळ्या. शेवटी कर्मचारी वर येऊन गप्प बसवून गेले त्यानंतर खूप वेळ सगळ्याजणी हासत होत्या. हळूहळू निली आणि जयालाही आपल्या अबोल्यातील फोलपण जाणवू लागले आणि एके सकाळी निली जयाशी बोललीही. जयानेही हसून उत्तर दिले आणि रूममध्ये पूर्वीसारखे चैतन्य वावरू लागले. या सगळ्याचे श्रेय लहान पियाला द्यायला कोणाचा इगोही आड आला नाही. आणि आज रात्री दहा वाजता आपापले डबे खाऊन झाल्यावर पिया जो कडे पाहात सगळ्यांना उद्देशून म्हणाली....

"ताई बोअर होतंय"

"या वयात?" - जो

"वयाचा बोअर होण्याशी काय संबंध? चार वर्षाची मुले नाही भोकाड पसरत कंटाळली की?" - पिया

"ए तू पसर ना भोकाड! आम्ही बघतो. पाय वगैरे आपट. भ्यँ करून वेडावाकडा चेहरा करून रडायला लाग. वस्तू फेक. शेंबूड गळूदेत जरा" - सिमने खिदळत सांगितले. तश्या सगळ्याच खिदळल्या. उद्या तसाही रविवार असल्याने एक निली सोडली तर कोणालाच काम नव्हते. हल्ली निलीची 'लवकर निजे त्याला...' ही पॉलिसीही चक्क दिड तासाने डिफर झालेली होती आणि साडे अकरा वाजता तिच्या पापण्यांना पेंगायची सवय लागलेली होतॉ.

"आधी तू पसर भोकाड, मी तुला फॉलो करते" - पिया

"पसरा पसरा, दोघी भोकाड पसरा, येऊचदेत मॅडम वर" - निली.

सिमला तशीही लाजलज्जा नव्हतीच. ती जमीनीवर बसली आणि हात आणि पाय आपटत चेहरा रडका करून रडू लागली. ते दृष्य पाहून सगळ्या खदखदून हसायला लागल्या आणि स्वतः सिमही रडता रडता हसू लागली.

"पण का पसरायचं भोकाड? मला कंटाळाच नाही आलेला तरीही?" - सिम

"अधेमधे रडून भावनांचा निचरा करणे तब्येतीसाठी चांगले असते असे म्हणतात" - जयाने तत्वज्ञान शिकवले.

"ते लग्न ठरलेल्यांसाठी चांगले असते, आमच्यासाठी नाही" - सिम!

पियाने इमॅजिनेशन एक्स्टेंड केली.

"कल्पना कर निलुताई. राहुल आणि जया फिरायला बागेत गेलेले आहेत. भेळवाला उभा आहे. रम्य वातावरण आहे. पण राहुल भेळ घ्यायला तयार नाही आहे. आता जया हिरवळीवर बसून भोकाड पसरत आहे"

"हं! मग राहुल तिला थोपटून जवळ घेत आहे" - जो

"बाऽस, आता बाऽऽस" - जयाने चापले.

पियाचे डोके विचित्र होते. म्हणाली.

"बोअर होत असले की चित्रविचित्र आयडिया काढायची. आम्ही असेच करायचो शाळेत"

"कसली आयडिया आता?"

"उद्या सकाळी उठल्यापासून प्रत्येक वाक्यात 'मसाला' शब्द वापरायचा"

पाचहीजणी चेकाळून हासल्या.

"म्हणजे कसे?" - जया

"म्हणजे समजा तू निलूताईआधी आंघोळीला चालली असलीस तर निलुताईला तू म्हणायचेच, मी आधी मसाला आंघोळ करते, मग तू कर"

"म ऽ सा ऽ ला ऽ आंघोळ हा हा हा". जयालाही हासणे आवरत नव्हते.

"जी तो शब्द न वापरता वाक्य बोलेल तिने एक रुपया काढून टेबलवर ठेवायचा. एका वाक्याला एक रुपया"

"ह्याला काही अर्थ नाही"

"ऐक तर? रात्री जवळपास शंभर एक रुपये जमतात की नाही बघ. त्याची पार्टी करायची."

"शंभर रुपयात कोणत्या गावाकडे पार्टी होते म्हणे?"

"अगं थोडा मसाला घालायचा आपण वर"

सिम हसू लागली.

"आत्तापासूनच सवय करा"

"हो हो... निली... तू जरा मसाला झोप घे आता"

"ऑफीसमध्ये नाही हां? ते नाही धरायचे" - जो

"का? दीप अंकलनी बोलावले की म्हण की? आलेच मसाला मारके" - पियासाठी भसीन दीप अंकल होता.

'मसाला मारके' शब्द ऐकून जो ने पियाला धपाटा दिला तशी सिम खदखदून हासली.

"ऑफिस यातून कॅन्सल"

"चालणार नाही... नाहीतर आत्ताच दोनशे रुपये ठेव टेबलवर ... ऑफीसमध्ये दोनशे वाक्ये बोलत असशीलच की?"

"शहाणीच आहेस... मला भसीन म्हणेल... बत्तीस क्लेम्स राहिलेत... मग मी काय म्हणू? दोन दिवसात मसाला करते त्या क्लेम्सचा?"

"हिला राहुल म्हणेल पुढच्या आठवड्यात मी येतोय... मग जया म्हणेल ये की मसाल्या... "

"म साल्या की मसाल्या?"

"साला आपला, मसाला जयाचा"

"शी:"

"आपल्या होस्टेलचे नांव काय पडेल मग?"

"मसाला मुलवानी लेडिज होस्टेल"

"मसाला लेडिज मुलवानी होस्टेल"

"लेडिज मुलवानी होस्टेल मसाला"

"ई! मेन्यू कार्डवरचा पदार्थ वाटतो हा"

"दीप अंकल चकचकीत शेव्हिंग करून आले की जो ताई म्हणेल, काय मसाला चिकणे दिसताय?"

"गप गं??? भसीन येता जाता झापतो मला. त्याच्यासमोर हिम्मत होईल का माझी नुसता मसाला शब्द म्हणण्याची?"

"चला मग... झोपा आता मसाल्याचे.. उद्या मसाला सकाळी मी इथे पाऊल टाकल्यापासून मला हा शब्द प्रत्येक वाक्यात ऐकू आला पाहिजे... आणि बोलताना अजिबात मसाला हसायचे नाही"

स्त्रीत्वाचे पाच खळखळते झरे पुरुषप्रधान संस्कृतीपासून एका आवरणात असतानाच हळूहळू खळखळत शांत झोपी गेले.

सकाळी सर्वात आधी नेहमीप्रमाणे निली उठली. पाठोपाठ जया. मग जो उठून दात घासत टेरेसमध्ये गेली. सिम अजूनही अस्ताव्यस्तपणे लोळतच होती. पियाने दार वाजवले. उठल्या उठल्या दार वाजले म्हणजे 'मसाला दार वाजलेले असणार' हे सगळ्यांना कळले. निलीने दारात कोण आहे हेही न बघता नुसती कडी काढली आणि आवरायला लागली. पिया आत येऊन आळसटल्यासारखी बसून नुसती बघत राहिली. बोलत कोणीच नव्हते. कारण बोलले तर मसाला हा शब्द घालून बोलावे लागणार होते. त्यामुळे नुसत्याच चौघी खुसखुसत आवरत होत्या. सिम ला जाग आली. इकडे तिकडे बघत तिने जो ला विचारले.

"किती वाजले?"

'एक रुपया टाक' चा जल्लोष झाला. सेकंदात सिमची झोप उडाली. आज धमाल येणार होती हे तिच्या लक्षात आले. आता तीही अबोलपणे आवरू लागली. पिया आळसटलेली असली तरी बारीक लक्ष ठेवून होती चौघींवर! बया फारच द्वाड होती. प्रथमच चौघींना समजले, की एक शब्दही न बोलता आपण व्यवस्थित आवरू शकतो.

बोलायची अशी काय गरज असते? उगाच काहीतरी वाक्ये फेकत फेकत का आवरायचे? उलट चांगली एनर्जी वाचते न बोलल्यामुळे. बोलायचेच नसल्यामुळे काय बोलायचे या विचाराने मेंदूही दमत नाही आणि मन एकाग्रही करता येते. या 'मसाला' शब्दाच्या बंधनामुळे मौनाचे महत्व उगाचच समजत होते चौघींना!

पण केव्हातरी बोलावे लागणारच होते. आणि ती वेळ निलीवर सर्वात आधी येणार हेही सगळ्यांना माहीत होते. कारण रविवार असल्याने तिला एकटीलाच कामावर जायचे होते. बाकीच्या तश्या निवांत होत्या.त्यामुळे सगळ्या निलीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. अगदी मसाला लक्ष!

आलीच ती वेळ! होस्टेलच्या आक्का चहा आणून द्यायच्या त्यांना नेहमीप्रमाणे उशीर झाला. निलीने कॉरिडॉरमध्ये उभे राहून त्यांची दोन तीन मिनिटे वाट पाहिली. मग आतल्या कठड्यावरून खाली बघत हाक मारली.

"मसाला आक्काऽऽ"

आत सगळ्याजणी टाळ्या देत हासल्या. तेवढ्यात लठ्ठ म्हातार्‍या आक्का जिना चढून वर प्रकटल्या. पियाला तेथे बघून त्यांच्या कपाळावर दोन आठ्या चढल्या. पिया काही त्यांना आवडायची नाही. म्हणाल्या.

"तू कशी गं इथे इतक्या सकाळची?"

"मसाला चहा प्यायला आली आहे"

"इथे नाही मिळत मसाला चहा, दुकानात जाऊन प्यायचा, इथे साधा"

पिया काहीच बोलली नाही. जयाने वीस रुपये काढून अबोलपणे आक्कांच्या हातावर ठेवले. पाच कप चहा ठेवून आक्का निघून गेल्या. एरवी किलबिलाटाने भरलेली ही रूम आज इतकी निर्मळ शांत का आहे हे आक्कांना समजत नव्हते. सगळ्या चहा पीत एकमेकींकडे बघत बसल्या. शेवटी जयाच म्हणाली.

"हे मसालामुळे काही बोलताच येत नाहीये"

हळूहळू सगळ्यांचे आवरून झाले. काहीही न बोलता आवरून झाल्याचे नावीन्य आणि त्यामागची पार्श्वभूमी सगळ्यांना खुसखुसवत होती. शेवटी निली बाहेर पडताना म्हणाली.

"बाय मसाला"

'बाय मसाला'ने रूम दुमदुमली. मसाला शब्दाच्या मजेला मागे सारून एक एक जण रूममधून बाहेर पडली. नऊ वाजता जो बाहेर पडली तेव्हा तिने किल्ली पियाकडे दिली आणि आणि प्रत्येकजण तिला जिथे जायचे होते तेथे निघून गेली. जया पार्लरला चालली होती. जो मार्केटमध्ये. सिमच्या एका मित्राचा बर्थडे होता. सकाळपासूनच तिकडे धिंगाणा करणार होते सगळे.

स्वतःच्या रूममध्ये न जाता पियाने स्वतःचा सेल ऑन केला, दोन चार कॉल्स केले, मेसेजेस केले आणि सिमचा अल्बम पाहात तेथेच लवंडून पुन्हा गाढ झोपी गेली.

==============================

एलाईटच्या स्टॉपवर बसमध्ये चढल्यापासूनच जो चिडलेली होती. अशोक नावाचा कंडक्टर अधेमधे त्या बसमध्ये असायचा. आजवर त्याचे तिला झालेले स्पर्श हे हेतूपुरस्पर आहेत या निष्कर्षापर्यंत जो केव्हाच आलेली होती. त्यामुळे तो सरकेल त्याच्या विरुद्ध बाजूला सरकायचे हे तिचे ठरलेले होतेच. पण गर्दीचा फायदा घेऊन एक शाळकरी मुलगा आता खेटून उभा राहिलेला होता. जो ला आश्चर्य वाटले त्या मुलाचे. जेमतेम नववी दहावीतला असावा. पण असा काही खेटून उभा होता जणू बसमध्ये अजिबातच हलायला जागा नव्हती. जो बाजूला झाली. तोवर कंडक्टर तेथे आला आणि तिकीट देताना त्याने जो कडे अश्या नजरेने क्षणभर बघितले की बसमध्ये फक्त तो आणि ती असते तर जणू झडपच घातली असती त्याने. कुठे होस्टेलची रूम आणि कुठे या सार्वजनिक जागा! तरी निदान बोंब मारली तर दहा हात पडले असते त्या कंडक्टरवर! त्याचमुळे तोही जरा जपूनच होता. 'मसाला' या शब्दाचा जो आणि बाकीच्याही तिघींना केव्हाच विसर पडलेला होता. त्याबद्दल काय सहज खोटे बोलता आले असते की हळू का होईना पण प्रत्येक वाक्याबरोबर मी तो शब्द उच्चारत होते. वास्तविक खरंच मोठ्याने उच्चारला असता तर वेडगळासारखे दिसले असते. बसच्या घामट आणि कुबट वातावरणातून जो बाहेर पडली आणि उन्हाने आपला तडाखा दिला. गॉगल चढवून जो झपाझप मार्केटकडे जायला निघाली. तिच्या मनात विचार होते त्या शाळकरी मुलाचे. काय येत असेल त्या मुलाच्या मनात? त्याला यातले काय कळत असेल? की फक्त स्पर्श हवासा वाटत असेल? आपले वय आणि शाळेचा युनिफॉर्म पाहून आपली कोणाला शंकाच येणार नाही ही खात्री असेल का त्याला? संस्कार नसतीलच का होत? की संगत वाईट लागत असेल? आणि आज रविवारची शाळा कुठली? मग तो नुसताच याच गोष्टीसाठी आई वडिलांना खोटेच शाळा म्हणून सांगून बाहेर पडला असेल का? त्या मुलाबद्दल आपण कोणाला काही सांगितले असते तर कोणी विश्वास तरी ठेवला असता का? की आपणच एक लगावून द्यायला हवी होती त्याला? काही असो, त्याचे ते उभे राहणे समर्थनीय नक्कीच नव्हते. याचे कारण आपण जेव्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याच्या नजरेत एकाचवेळी अपराधी, हपापलेल्या आणि पलायनवादी अश्या सर्वच भावनांचा गढूळपणा आपल्याला दिसलेला होता हे नक्कीच. इतकी वर्षे मुरलेली आपली नजर नक्कीच आपल्याला फसवणार नाही. सर्वांग व्यवस्थित झाकून आपण फिरतो तर ही लगट होते, तर सिमचे काय होत असेल? सिम कशी स्वतःला वाचवत असेल? की दुर्गावतार धारण करत असेल? असे कोणते शहर, असे कोणते स्त्रीचे वय आणि अश्या कोणत्या ठिकाणी चांगली माणसे राहतात की जेथे हे प्रश्नच भेडसावणार नाहीत?

दोन दिवसांनी राहुल येणार होता आणि एक दिवस मित्राच्या रूमवर राहून दुसर्‍या दिवशी परत जाणार होता म्हणून जया जरा बरे दिसावे या प्रयत्नात पार्लरला गेली होती. आपण कितीही प्रयत्न केला तरी फार चांगल्या दिसत नाही हे तिला माहीत होते. पण राहुलही काही मोठा स्मार्ट नव्हताच. एकमेकांना शोभले की बास हे तिला पटले होते. कोवळ्या वयात पडत असलेली स्वप्ने आणि स्वीकारायला लागणारे वास्तव यांच्यातील तफावतीवर ती मनातच खिन्नपणे हासत स्वतःला आरश्यात न्याहाळत पार्लरच्या मुलीला सूचना देत होती. चेहर्‍यात हळूहळू पडत चाललेल्या फरकामुळे तिच्या विचारांमध्येही फरक पडत गेला आणि मन पोचले राहुलच्या घरचे प्रथम बघायला आले होते त्या प्रसंगापाशी. आजवर अनेक स्थळे पाहून आणि अनेक स्थळांना दाखवून तो अनुभव जमेस असला तरी अनेक ठिकाणी आपण नाकारल्या गेलेलो आहोत या अनुभवाने चेहर्‍यावर मुळातच एक घाबरलेपण आणि एक निराशा यायची. त्यात वय जरा जून. एकंदर परिणाम आपणच काही मुलांना नाकारण्यातही व्हायचा. आता असे वाटते की राहुलपेक्षाही अनेक उजवी स्थळे येऊन गेली. परफेक्ट कोणीच नसते. अजून पाहू अजून पाहू च्या चक्रात अडकून शेवटी आपण राहुलला पसंत केले. पसंत करण्याची कारणे तरी काय होती? घरच्यांचा निर्वाणीचा आग्रह, मुलाला नोकरी असणे आणि मुलानेही पसंत केलेले असणे! बास, या व्यतिरिक्त काहीही नाही. पण साखरपुडा झाला, दोन वेळा स्वतंत्र भेट झाली तासाभराची! माणूस, त्याचे विचार समजले. बरे वाटले. एकमेकांमध्ये काहीतरी चांगली केमिस्ट्री आहे असे उगीचच की काय पण जाणवले. दोघे मिळून काहीतरी करू असे त्याच्या बोलण्यात येत होते हे पाहूनही आपण सुखावलो. त्याने त्याच्यापरीने त्याच्या आयुष्यात आपल्याला स्थान देऊन टाकलेले होते. तसेच, आपण आपल्या परीने त्याला! एकुण काय, विशेष काही भिन्नत्व नाही हे दोघांमधील साम्य होते आणि याहून काही खास चांगले घडण्याची शक्यता नसल्याने हाच प्रस्ताव सर्वात चांगला ठरत होता, इतकेच. आता आहे ते कॅरी करणे आणि नीट कॅरी करणे यातही दिलचस्पी निर्माण होत होती. किती किरकोळ सुखे असतात माणसाची! आजवर आई वडील आणि भावाच्या देखरेखीखाली वावरल्यानंतर आता अचानक जगाच्या मानवी समुद्राच्या एका थेंबाशी जोडले जायचे आजन्म आणि दोघे मिळून काहीतरी निर्माण करायचे. त्या निर्मीतीमध्ये स्वतःला गुंतवायचे. प्रत्येक टप्प्याला नवी जबाबदारी, नवे कर्तव्य आणि नवे सुखसमाधान! हेच आयुष्य आहे.

निली नवीनच आलेल्या मुलीला बोलते करायचा प्रयत्न करत होती. अत्यंत सुंदर असलेल्या या विशीच्या मुलीवर गेली सहा महिने एका शेठने रेप केलेला होता. तिला शासकीय नोकरी लावून द्यायच्या आमीषाने! चक्रात अडकत अडकत ती मुलगी शेवटी या मानसिकतेपाशी पोचली होती की नोकरी देऊच नका पण मला आता सोडून द्या. दया येऊन त्या शेठने तिला सोडून दिले होते आणि पैशाच्या बळावर तो पोलिसांना पटवून सुट्टा राहिलेला होता. काही बायकांनी या मुलीला येथे आणून सोडले होते आणि सोडताना जणू घरातली घाण रस्त्यावर फेकावी तसे चेहरे केलेले होते. त्या मुलीच्या प्रकृतीवरही घातक परिणाम झालेले होते. कोणाच्याही स्पर्शाने ती थरथरत होती. मधूनच किंचाळत होती. मधूनच रडत होती. बराच वेळ शून्यात वेड्यासारखी बघत बसून राहात होती. फक्त पाणी तेवढे पीत होती. निलीसमोर जणू आणखीन एक निली येऊन बसलेली होती. स्वतःलाच सावरावे तसे निली त्या मुलीला सावरू पाहात होती. त्याच प्रयत्नांत असताना पुन्हा एकदा तेच जिणे जगत होती. पुरुषांबद्दलचा कमालीचा तिरस्कार आता त्याहीपलीकडे पोचलेला होता. अर्थहीनतेने तिचे विश्व व्यापून गेलेले होते. जगण्याचा अर्थ शोषले जाणे असाच आहे ही भावना पुन्हा एकदा ठळकपणे निर्माण झाली होती. मनात तर असे येत होते की या मुलीची सुटका जणू मृत्यूनेच होईल. तोंडात लाळ जमा झाली होती आणि जगावर थुंकावेसे वाटत होते. रांडा देतात तश्या शिव्या द्याव्याश्या वाटत होत्या पुरुषजातीला. आणि एवढे सगळे करून हे असेच चालत राहणार हा आयुष्याचा फोलपणाही स्वीकारावा लागत होता. एका कोपर्‍यात जाऊन निली एकटीच बराच वेळ रडत बसली.

दोनच मुली आणि चार मुले असलेल्या त्या ग्रूपमधील दोन मुलींपैकी एक सिम होती. समोर आशिष असे नांव असलेला बर्थ डे चा भला मोठा केक कापला जाण्याच्या प्रतीक्षेत विसावलेला होता. सकाळी दहालाच बीअरच्या बाटल्या कचाकच फुटलेल्या होत्या. कोणीतरी वेगवेगळ्या ट्यून्स लावून ट्राय करत होते. अजून दान्सचा मूड जमत नव्हता. ती दुसरी मुलगी चेतवणारा पोषाख घालून प्रत्येक मुलाची सलगी आवडीने मान्य करत होती. जणू त्यातूनच तिचा इगो सुखावत असावा. आशिष कोणाचीतरी वाट पाहात असावा. शेवटी प्रतीक्षा संपली आणि गोयल सर आत आले. गोयलांनी भले मोठे प्रेझेंटचे पुडके आशिषच्या हातात दिले आणि हॉल पुन्हा विशेसनी दुमदुमला. गोयल हे मॉडेल्स पुरवणारे मोठे काँट्रॅक्टर होते. सर्व मित्रमैत्रिणींकडे पूर्ण दुर्लक्ष करत आशिष गोयल यांच्या जणू सेवेतच रुजू झाल्यासारखा त्यांना हवे नको ते बघू लागला. केकचा पहिला घासही त्यांना भरवलाच गेला. दिड बीअर आणि थोडा खाना घेऊन गोयल तासाभराने निघून गेले आणि जाताना आशिषला एक चांगली असाईनमेन्ट द्यायचे कबूल करून गेले. ते गेल्या गेल्या ती दुसरी मुलगी आशिषच्या गळ्यातच पडली. तिच्या मते आता आशिषवर जान कुर्बान करून तिचेही भविष्य फळफळणार होते. हे सर्व वर्तन, वातावरण, संस्कृती सिमच्या नीट व जवळून परिचयाची होती. कोणी आगाऊपणा करत नाही तोवर काँटॅक्ट्स सुधारत राहतील हे बघणे हा तिचा येथे बसून राहण्याचा हेतू होता. ती इन्व्हॉल्व्ह्डच नव्हती असे नाही. तीही हसून टाळ्या देत होती, थोडीशी बीअर घेत होती आणि किंचित डान्सच्या मूडमध्येही आलेली होती. पण तिच्या मनाला काहीतरी सलत होते, काहीतरी बोचत होते. एक देव नावाचा मुलगा तिच्याशी जरा जास्तच लगट करू पाहात होता. सिमला जाणवले की वाढदिवसाची पार्टी उधळली गेली तरी आणि या ग्रूपमधून कायमचा डच्चू मिळाला तरी बेहत्तर, पण बहुधा दहा पंधरा मिनिटांतच त्या मुलाचा नक्षा उतरवायला लागणार होता. दोन हात आपल्या कंबरेवर ठेवून त्याने डान्स करणे हे ती समजू शकत होती, पण सतत तोंडाजवळ तोंड आणून किस घेण्याचा हेतू प्रदर्शीत करणे तिला मान्य नव्हते. शक्य तितक्या 'गैरसमज होणार नाही' अश्या शैलीने त्याच्यापासून दूर व्हायचा तिने दोन चारदा प्रयत्न केला पण त्याने तिला जरा अधिकच जवळ ओढले. ते दृष्य पाहून एक दोघे हासलेही. त्यावर सिमला तात्पुरते हसावे लागले. पण एका क्षणी तिने साफ सांगितले. मी आता जरा खुर्चीवर बसत आहे, तू डान्स कर, मला सोड! देवने ऐकले नाही आणि त्याने तिला अधिक जवळ ओढले. आता वैचारीक आणि मानसिक प्रतिकाराची वेळ गेलेली होती. शारीरिक प्रतिकारच आवश्यक होता आता. सिमने सरळ ताकदीने स्वतःची त्याच्या हातून सुटका करून घेतली आणि खुर्चीवर जाऊन बसली. मात्र तसे करताना तिने कटाक्षाने स्वतःच्या चेहर्‍यावरचे स्मितहास्य तसेच ठेवले. काही झाले तरी गोयलांशी जवळून संबंध असलेला आशिष आणि त्याचा ग्रूप हा तिच्या करीअरसाठी महत्वाचा होता. देव आता एकटाच नाचू लागला. त्याला समीर जॉईन झाला. आशिष त्या दुसर्‍या मुलीला घेऊन डान्स करू लागला. बाकीचे बघत बसलेले होते. सिमच्या मनात विचारांची गर्दी झाली.

मला का असे वाटत नाही की आशिषला आपणच आपल्या जवळ ओढावे? मला माझ्यातले काहीतरी जपले जावे असे का वाटते? मीच आक्रमक झाले तर तो काय संधी सोडणार आहे थोडाच? मग मी काय जपत राहते स्वतःतले? शरीर की प्रतिमा? शरीर आज ना उद्या कोणाच्या तरी हवाली होईलही. मित्र किंवा नवरा. व्हॉटेव्हर! पण प्रतिमा? प्रतिमा या चारजणांच्या हवाली करायला नको वाटते आहे का मला? मग ते त्या मेघनाला का वाटत नाही आहे? ती का जपत नाही आहे स्वतःला? पण ते न जपूनही ती कुठे मोठ्या स्थानवर पोचलीय? ती आपल्याइतकीच सुंदर आणि आकर्षक आहे. मग तिने स्वतःची प्रतिमा नक्की कधी आणि का मलीन करून घेतली असेल? आत्ता तिला पाहणार्‍या कोणालाही वाटू शकेल की या चौघांपैकी प्रत्येकाबरोबर ती झोपलेली आहे. अशी प्रतिमा निर्माण करून घेऊन ती काय मिळवत आहे? तिला देव स्वतःजवळ का ओढत नाही आहे? आशिष तिच्याकडे विशेष का लक्ष देत नाही आहे? सगळे काय करत आहेत? कोणता आनंद मिळवत आहेत? करीअर या एकाच धाग्याने एकत्र बांधला गेलेला हा ग्रूप आपापसात जमून करीअरचा काहीही संबंध नसलेल्या ऑकेजनला नेमका कोणता आनंद प्राप्त करून घेत आहे? तरुणाईच्या जोषात मिळणारा आनंद? याचा चांगलाच परिणाम करिअरवर होईल असे प्रत्येकाला का वाटत आहे? समजा गोयल सर येणार नसते तर मेघना अशीच वागली असती का? आपण येथे आलो असतो का? आपण का आलो आहोत? गोयल सर येणार म्हणून की आशिष महत्वाचा वाटतो म्हणून की आशिष मित्र आहे म्हणून? आशिष मित्र आहे का? कोणती मैत्री त्याने निभावलेली आहे? इतके प्रश्न का पडत आहेत मला? मी खुळ्यासारखी प्रश्नांमध्ये का हारवत आहे? मुक्तपणे आला क्षण का जगत नाही आहे? कोणते पारंपारीक राजस्थानी कडक संस्कार मला एखाद्या मुलाच्या मिठीत विसावून डान्स करण्यापासून रोखत आहेत? कोण विचारणार आहे इथे मला की तू अशी कशी वागत आहेस म्हणून? जर कोणीच नाही तर माझ्यातले काय मला असे वागण्यापासून परावृत्त करत आहे? आणि का?

व्यत्यय आला तिच्या प्रश्नावलीत! कारण आशिषने धावत जाऊन रेकॉर्ड बंद करून सगळ्यांना खुणेनेच गप्प करून सांगितले की गोयल सरांचा त्याला कॉल आलेला आहे. त्याने स्वतःचा सेल हातात घेऊन कॉल अ‍ॅक्सेप्ट केला आणि म्हणाला....

"येस सर... आशिष हिअर"

"......"

"हू?"

"सर... दॅट्स मेघना..." - मेघनाकडे हात उडवून पाहात आशिष म्हणाला... मेघनाच्या डोळ्यांत चमक आली...

"....."

"अच्छा अच्छा... सर हर नेम इज सिम... सिमेलिया जैन... जैन जैन... येस सर.. "

"......."

"शुअर सर.. हे... यू हॅव अ‍ॅन अल्बम ऑफ यूअर्स राईट नाऊ?"

आशिषचा हा प्रश्न सिमला उद्देशून होता. मेघनाच्या डोळ्यांतली चमक आता सिमच्या डोळ्यांमध्ये ट्रान्स्फर झाली. सिम सळसळत म्हणाली.

"ओह इट्स नॉट विथ मी राईट नाऊ... बट आय कॅन हॅव इट सेन्ट टू सर"

"सेन्ड इट देन... सर... शी इज सेन्डिंग इट टू यू... ऑफिस? राईट सर..... व्हेन सर?"

"....."

"राईट सर... थँक यू व्हेरी मच सर"

आशिषने स्वतःशीच समाधानाने हासत सेल ऑफ केला. अपेक्षेप्रमाणेच सिमचा उत्साहाने आकंठ भरलेला प्रश्न त्याच्या आणि सगळ्यांच्याच कानांवर आदळला.

"व्हॉट डिड ही से टू यू?"

सिमचे डोळे अती जिज्ञासेने आणि उत्सुकतेने विस्फारले गेलेले होते.

"ही वॉन्ट्स यू टू गिव्ह अ टेस्ट टुमॉरो... बी पंक्च्युअल अ‍ॅन्ड रीच हिज ऑफिस अ‍ॅट इलेव्हन, विथ द अल्बम ऑफकोर्स... "

"वॉव्ह..."

सगळेजण, मेघनासकट, सिमकडे धावले. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. वाढदिवस आशिषचा आहे की सिमचा असे वाटावे इतका वर्षाव!

सिमच्या मनात कारंजी उडत होती उत्साहाची. जे कदाचित होऊही शकेल असे सांगून आशिषने सगळ्यांना बोलावलेले होते ते सगळ्यांपैकी फक्त सिमच्या बाबतीत झालेले होते. गोयल सर आल्याक्षणापासून मनात निर्माण झालेले टेन्शन, त्यांनी काहीही विचारपूस न केल्याने जमलेले नैराश्य आणि देवने सलगी केल्यामुळे आलेला राग हे तिन्ही एका क्षणार्धात निवळल्याचा परिणाम म्हणून सिमच्या कपाळावरून घामाचा एक थेंब घरंगळत तिच्या कानापाशी आला. अजून खरे तर निश्चीत काहीच नव्हते. नुसती टेस्ट होणार होती. पण प्रत्यक्ष इथे असताना गोयल सरांनी काहीही न बोलणे आणि नंतर अगदी विचारपूर्वक आठवून आठवून आशिषला सिमसाठी फोन लावणे हे त्यांच्या फोनमध्ये तथ्य असल्याचे निदर्शक वाटत होते सिमसकट सगळ्यांनाच! सिमेलिया जैन! अ प्रॉमिसिंग करीअर अहेड! सिमने मनाशीच हे विचार दोनतीनदा घोळले. दोन्ही गालांवर दोन्ही हातांची ओंजळ दाबून ती अविश्वास प्रकट करत होती. विस्फारलेल्या डोळ्यांमध्ये आशिषबद्दल कृतज्ञता होती. अभिनंदनाच्या वर्षावामुळे आलेला लाल गुलाबी आनंद होता. नंतर एकच हात दोन्ही ओठांवर दाबून धरत तिने अजूनही विश्वास बसत नसल्याचे सूचित केले. ऑफ ऑल द पीपल, ही सिलेक्टेड मी! हा आनंद दुधाला उकळी फुटावी तसा चेहर्‍यावरून ओसंडत होता.

"धिस इज माय रिटर्न गिफ्ट टू यू सिम"

आशिष डोळे मिचकावत म्हणाला. सिमला शरम वाटली. एक कार्ड आणण्याशिवाय तिने आशिषसाठी काहीही आणले नव्हते. आता त्याला आपण काय गिफ्ट देऊ शकणार? आधीच तो श्रीमंत! ओशाळल्यासारखी सिम आशिषकडे आणि खाली बघत राहिली. मेघनाने सर्वांदेखत विचारले.

"बट व्हेअर इज हर गिफ्ट टू यू?"

नको तोच प्रश्न नको त्याच पद्धतीने सामोरा आला. सिम पटकन म्हणाली...

"इतक्या सकाळी आणता आली नाही... आज संध्याकाळी नक्की आणते गिफ्ट"

हे ऐकून आशिष आपले दोन्ही हात फैलावत म्हणाला...

"यू वॉन्ट टू मेक मी वेट फॉर अ किस टिल इव्हिनिंग?"

टाळ्या आणि आवाजाचा जल्लोष झाला. एकंदर परिस्थितीत सिमपुढे पर्याय राहिलेला नव्हता. स्पष्टपणे नाही म्हणणे हे दुखावणे होते. हासत हासत नाही म्हणणे हे ताठा दाखवण्यासारखे होते. आणि दोन्ही प्रकार तिला आत्ता शोभणारे नव्हते कारण गोयल सरांसमोर उद्या द्यायची असलेली टेस्ट हे आशिषचे कर्तृत्व होते.

एक किस! दॅट्स नथ्थिंग! इतके सगळे जण इथे आहेत. गोयल सरांनी आपल्याला बोलावणे धाडलेले आहे हेही सगळ्यांसमोर घडलेले आहे. आशिषमुळे हे झालेले आहे हेही सर्वांना माहीत आहे. अश्या परिस्थितीत आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात या मैत्रीपूर्ण उपकारांची परतफेड सर्वांसमक्ष फक्त एक किस घेण्याने होणे यात काहीही विशेष नाही. सिम स्वतःलाच सांगत होती. तेही तिचे हे सगळे विचार निमिषार्धात चाललेले होते. आशिषचे फैलावलेले हात अजूनही आमंत्रणाच्याच पोझिशनमध्ये होते. लाजेने ओठ मुडपले जाऊन सिम एका बेसावध क्षणी त्याच्या मिठीत शिरली आणि तिने स्वतःहून आपले ओठ त्याच्या ओठावर ठेवले.

पाचच सेकंदात पाणी पाणी झालेली सिम आशिषपासून दूर होत पालथ्या हाताने आपले ओठ पुसत लाजून इतरांकडे बघत खुर्चीकडे जाऊ लागली..... पण... तिला काहीही कल्पना नव्हती की पुढ्यात काय वाढून ठेवलेले आहे...

मागून अचानक विळखा पडला हातांचा तिच्या कंबरेभोवती... दचकून मागे पाहीपर्यंत ती आशिषच्या दोन्ही हातात उचलली गेली... सुटण्याची तडफड निष्फळ ठरत असताना आशिष तिला परोपरीने सांगत होता...

"इट्स नथ्थिंग.. इट हॅपन्स... वुई ऑल आर इन द ग्लॅमर वर्ल्ड सिम... द होल इंडस्ट्री विल नो यू अ‍ॅज द बेस्ट एव्हर मॉडेल सिमेलिया... अ‍ॅन्ड यू वूड थँक मी ऑल्वेज... सिम... लिसन टू मी... लिसन... धिस इज जस्ट लाईक फ्रेंड्स... इट्स नथ्थिंग राँग सिम... "

बाकीचे हासून आशिषला दाद देत होते. नेमके काय चाललेले आहे हे सिमला समजेनासे झालेले होते. आशिषने आत्ता आपल्याकडून अशी काही अपेक्षा ठेवणे हे ह्या सगळ्यांना योग्य आणि अभिनंदनीय का वाटत आहे? मी असे केले तरच मी खरी दिलदार मैत्रीण ठरेन असे ह्या सगळ्यांना का वाटत आहे? आशिषच्या पकडीतून सुटणे पूर्णपणे अशक्य होते. सुटकेचा प्रयत्न करतो आहोत व तोही त्वेषाने, हे दाखवणे म्हणजे शहाणपणाही होता आणि मूर्खपणाही. प्रश्न फक्त हाच होता की शहाणपणा करून गोयल सरांच्या ऑफरवर पाणी सोडायचे की मूर्खपणा करून आशिषवर कौमार्य उधळायचे? आपल्यासाठी महत्वाचे काय आहे? काय जपायला हवे आहे आणि काय त्यागले तरी चालणार आहे? सर्वांच्या मते शरीर त्यागले तरी चालणार आहे असे दिसत आहे. आपली माँ आणि भैय्या असते तर या आशिषला त्यांनी कापून काढला असता. भैय्यांनी तर आपल्यालाही कदाचित देहदंडाची शिक्षा जागच्याजागी दिली असती. आपल्याला काय करायचे आहे? काय हवे आहे आपल्याला? विचारांच्या वादळात कधीतरी आशिषच्या हातांच्या पकडीतूनच ती वरच्या मजल्याकडे जाणार्‍या जिन्यावर पोचली. तिला उचलूनही आशिष अगदी सहज जिना चढू शकत होता. तोंडाने, 'यू विल लव्ह इट सिम, इट हॅपन्स' असे काय काय म्हणत होता. क्षणार्धात सिमला त्याच्या हाताम्च्या पकडीतच घेरी आली. तिची मान कलंडून त्याच्या छातीच्या उजव्या भागावर तिचे तोंड विसंबले. डोक्यात राक्षस असलेल्या आशिषला हा तिने दिलेला ग्रीन सिग्नल वाटला. जो तिने कसलाही प्रतिकार न करता, आशिषचे उपकार स्मरून व त्याचे दास्यत्व स्वीकारून दिलेला होता. घेरी आलेल्या अवस्थेतच सिम एका आलिशान बेडवर ठेवली गेली. दार उघडेच ठेवून आशिषने तिचा टीशर्ट एका हाताने काढून टाकला आणि तो तिच्यावर झेपावला. बारा वाजत आलेले होते. केव्हातरी सिमला जाग आली. काहीतरी खूप दुखत होते. अस्ताव्यस्त पडलेली होती ती. खालच्या मजल्यावरून चेकाळलेल्या आवाजातील किंचाळ्या आणि कोणत्यातरी कर्कश्श ट्यून्स ऐकू येत होत्या. सिमचे डोळे विस्फारतच राहिले. स्वतःकडे तिने पाहिले आणि ती नखशिखांत हादरली. अंगावर एकही कपडा नव्हता. घड्याळात पाहिले तर अडीच वाजलेले होते. मांड्यांखाली रक्ताचे डाग होते. शरीरावर आग आग होत होती. कपडे कुठेही कसेही पडलेले होते. अंगातले बळ गेलेली सिम कशीबशी उठून बसली. कानावर हात दाबून तिने खालचे आवाज ऐकूच येऊ नयेत याचा निकराचा प्रयत्न केला. पण ते असह्य आवाज येतच राहिले. मिळतील तसे कपडे सिम कसेबसे अंगावर चढवत राहिली. अंगात त्राण नव्हते. काय झाले आहे, कोणी कोणी केले आहे, कसलाही अंदाज नव्हता. आपण बेडवर अश्या अवस्थेत असताना रूमचे दार उघडेच होते याचा अर्थ सरळ होता. ज्याला ज्याला इच्छा असेल त्याने त्याने ते केलेले असणार होते. डोळ्यांमधून ना अश्रू निघत होता ना तोंडातून हुंदका! आपण आपली अब्रू स्वतःच वेशीवर टांगू दिली आहे हे सिमच्या लक्षात आलेले होते. असह्य वेदनांमधून श्वास घेत घेत तिने आरश्यात पाहिले. शेजारी ठेवलेले पाणी घटाघटा प्यायले. बाथरूममध्ये जाऊन तिने पाण्याने खसाखसा तोंड धुतले. पुन्हा टीशर्ट काढून स्वतःच्याच स्तनांवरील ओरखाडे काही वेळ निरखत राहिली. जनावरे! तिच्या मनात त्या सर्वांबद्दल त्या क्षणी हेच विशेषण येऊ शकले. जमेल तितकी नीट दिसत ती बाहेर आली. जिना उतरला की पर्स हातात घेऊन एक शब्दही कोणाशी न बोलता थेट दारातून धावत सुटायचे तिने ठरवलेले होते. पण पाऊल उचलताना वेदना होत होत्या. कशीबशी कठड्याला धरत ती खाली आली. धिंगाणा चाललेला होता. मेघना कुठेच दिसत नव्हती. आशिष आणि त्याचे तीनही मित्र किळसवाणे हावभाव करून ट्यूनवर नाचत होते. जहरी परंतु जखमी नजरेने क्षणभर त्यांच्याकडे पाहात ती जमेल त्या वेगाने दाराकडे वळली आणि....

...... सिमेलिया जैनचा दगडी पुतळा झाला जणू... भावनाहीन.. चैतन्यशून्य... निर्जीव...

सोफ्यावर सिगार ओढत आणि तिच्याकडे पाहून तोंडभर हासत असलेले पण त्या हासण्याचे एकही लक्षण डोळ्यांमध्ये नसलेले गोयल सर तिला म्हणाले.........

"यू आर सिलेक्टेड... फॉर अ रिनाऊन्ड कॅलेंडर बेबी... बट यू विल हॅव टू वेअर अ बिकिनी... विल यू?"

रेकॉर्ड्स बंद झालेल्या होत्या.... चारही मुले स्टँड स्टिल अवस्थेत सिमेलियाचे उत्तर ऐकायला अधीर झालेली होती... गोयल सरांच्या चेहर्‍यावरचे डोळ्यांमध्ये न पोचू शकणारे रुंद स्मितहास्य तसेच कायम होते... आणि सिमेलिया जैनचे उत्तर राजस्थानच्या कर्मठ संस्कृतीवर थुंकत त्या दहा कानांमध्ये शिरले...

"येस सर... आय विल"

===========================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठरवलं होतं पुर्ण होईपर्यंत वाचायची नाही
पण न राहून वाचायला घेतलीच
प्लिज खंड नको या कादंबरीत तरी...

आवडतेय तरी कसं म्हणु?
खुप विचित्र अनामिक तकलीफ होतेय मनाला वाचताना
कदाचित हा ही एक प्रतिसादच आहे