सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला - २

Submitted by निंबुडा on 9 January, 2013 - 06:32

सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला - १. हा भाग मोदकने लिहिला होता.

शोना/ बंटी/ बाबू/ गोडू मंटू/ पिल्लाडू आणि अजून काय काय,

नक्की कोणत्या नावाने मायना लिहू? जाऊदे नुसतंच माझ्या पिल्ला, असं लिहिते!

'तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला असलेला अर्थ तुला सांगून किंवा लिहून समजेल का?' असा वेडा प्रश्न मी स्वतःला आता कधीच विचारत नाही. कारण 'आई, तू मला खूप आवडतेस!' ह्या तुझ्या एका गोड वाक्यातून तुला ह्या संवेदनेची जाणीव असल्याचे मला समजते आणि म्हणूनच आज तुझ्यासाठी हे लिहितेय!

माझे आणि तुझ्या बाबाचे रोज सकाळी उठून आवरून ऑफिसला निघून जाणे आणि रात्री उशीरा घरी परतणे आता तुझ्या चांगलेच अंगवळणी पडले आहे. त्यातही सुदैवाने माझी घरी येण्याची एक ठरलेली वेळ आहे, पण तुझ्या बाबाची ती तशी नाही. तुला हवे तेव्हा आणि तुझ्या इच्छेने तुझे आई-बाबा घरी तुझ्याजवळ नसणे ह्याची तू मनाविरुद्ध का होईना सवय करून घेतली आहेस. त्यामुळेच मी घरी पोचल्याच्या क्षणापासून ते रात्री झोपेपर्यंत तुझे माझ्या अवती-भवती गुंजारव करत राहणे, मी इतर कुणाशीही समोरासमोर किंवा अगदी फोनवरही बोललेले तुला न खपणे, मी कितीही दमून-भागून व आला दिवस किती वाईट घालवून आलेली असेन तरी तुझ्या गावी त्याचा मागमूसही नसणे ह्याबद्दल मला खरे म्हणजे कधीच कुठलीच तक्रार करावीशी वाटली नाही पाहिजे. हां! तरीही कधी कधी चिडचिड जरूर होते! रात्री मी ऑफिसमधून आल्यानंतर तुझ्या आजी-आजोबांच्या घरापासून ते आपल्या घरापर्यंत जाताना तुला, कधी मी उचलून घ्यावेसे वाटत असते, कधी मी तुला रमत - गमत लांबच्या रस्त्याने घरी न्यावेसे वाटत असते, कधी रस्त्यातल्या गाड्या बघत तुझा हात धरून नुसते उभे रहावेसे वाटत असते, कधी रस्त्यातल्या कुत्र्याला हाड, हाड करत त्याच्या मागे पळावेसे वाटत असते तर कधी माझ्या हाताला धरून लोंबकाळायचे असते. किती एक खोड्या सूचत असतात तुला! कधी कधी मानसिक व शारीरिक रीत्या आई इतकी दमून गेलेली असते, की कुणीतरी आपल्याला अलगद उचलून घरातल्या पलंगावर ठेवावं आणि पाठ टेकल्या टेकल्या सुखाने झोपी जावं असं तिला वाटत असेल, ह्याची जाणीवही तुझ्या चिमुकल्या मनाला नसते. त्यामुळे दिवसभर आई-बाबा तुला मिळत नाहीत, तेव्हा आई समोर असल्याचा प्रत्येक क्षण तुला मनमुराद जगून घ्यावासा वाटतो, तर त्याला बांध घालणारी मी तरी कोण? म्हणून मग घरी पोचेस्तोवर तुझ्याशी दिवसभरातल्या गप्पा, कधी कधी शॅडो गेम खेळणे (हाताच्या बोटांचे चित्र-विचित्र आकार करून स्ट्रीट लाईट्स च्या उजेडात रस्त्यावर पडणार्‍या सावल्या निरखणे), कधी कधी रेस लावून तू आधी घरी पोचतोस की मी असा गेम खेळणे, तर कधी कधी माझ्या ऑफिसमधल्या घटना मी तुला गंमतीशीर स्वरुपात सांगणे असे तुला रिझविण्याचे नाना उपाय करत आपण घरी पोचतो.

काल असेच घरी पोचलो तेव्हा अंगात जेवायचीही ताकद उरली नव्हती. दगदग, श्रम, बरे वाटत नसणे, ऑफिसमधल्या कामांमुळे मानसिक थकवा आलेला असणे, ट्रेन मधून घरी येइस्तोवरच्या प्रवासाचा शीण ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून खरेच काल उशीत तोंड खुपसून रडावेसे वाटत होते. पण तुला नेहमीप्रमाणेच माझ्याबरोबर खेळायचे होते, मी मोबाईलवर तुझ्यासाठी काही नवा गेम डाऊनलोड केलाय का ते तुला चेक करायचे होते, नवीन गोष्ट ऐकायची होती. आणि मी मात्र तुला नाना रीतीने विनवण्या करीत होते की, 'पिल्लू, आज नको ना. आज मी दमलेय खरंच! आज नुसते गोष्ट ऐकत लगेच झोपूया नं!' पण तू हट्ट करतच राहिलास. आणि एका क्षणी माझ्या अश्रुंचा बांध तुटला. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होते आणि मी असहाय्य , गलितगात्र अशी पलंगावर नुसतीच बसून राहिले होते. तुझे लक्ष गेले तसे माझ्या गालांवरून ओघळणार्‍या अश्रुंना हात लावत निरागसपणे विचारलेस, 'आई, तुला बाऊ झालाय?'
तुझ्या त्या नुसत्या स्पर्शाने आसवांचा पूर महापूरात रुपांतरीत झाला. तुझ्या चिमुकल्या मनोविश्वात 'बाऊ होतो तेव्हाच व्यक्ती रडते.' हे सूत्र फिट्ट बसले आहे. तसे म्हटले तर ते खोटेही कुठे आहे. खरंच बाऊ झाला होता मला.

तुला मनसोक्त वेळ देता येत नसल्याच्या गिल्ट चा बाऊ
नोकरी आणि संसार ह्या तारेवरच्या कसरतीतून अध्ये मध्ये येणार्‍या असहाय्यतेचा बाऊ
तुला प्रसंगी वयापेक्षा मोठे असल्यासारखे वागावे लागण्यातल्या हतबलतेचा बाऊ

किती नावं घेऊ? पण अश्या कुठल्याच गोष्टींचा मोठ्यांना बाऊ करून चालत नसते रे, पिल्ला! सर्वच जण वेगवेगळ्या वेळी जीवनाच्या अनेक टप्प्यांवर अश्या कितीक बाऊंना सामोरे जातात. तेव्हा तुझ्यासारखे समजून घेणारे जवळ असले ना की कुठल्याच आईला ह्या बाऊंची भीती वाटत नाही बघ! इतके हळवे असणे हा ही ह्या जगात अवगुणच आहे रे! आणि तुझी आजी सांगते की ह्या बाबतीत तू माझाच नमुना आहेस. संध्याकाळी दिवेलागणीला, काळोख पडायला लागला की माझ्या आठवणीने तू हमखास कातर, हळवा होतोस, हे तुझ्या आजीकडूनच समजले मला! म्हणून हल्ली ऑफिसमधून संध्याकाळी तुला फोनही करत नाही मी. मलाही मग नुसता तुझा आवाज ऐकूनच हळवे व्हायला होते. 'आई, तू घरी कधी येणार?' ह्या तुझ्या प्रश्नाला 'अजून पुढच्या चार तासांनी, बाळा' असे उत्तर देताना घशात आलेला दाट आवंढा आधी गिळावा लागतो. कारण 'लगेच येणार! पाचच मिनिटात!' वगैरे खोटे तुला मजेतही सांगायला नको वाटते. कारण तुझ्या बालमनाला मोठे लोक कधी खरे बोलत आहेत व कधी आपली गंमत करीत आहेत, ह्याचा अंदाज नसतो आणि मग मी प्रॉमिस केल्याप्रमाणे लगेच घरी आलेले नसेन तर तुझा हिरमुसला आणि 'आई, तू माझ्याशी खोटं बोललीस' ह्या अर्थाचा रुसलेला चेहरा पाहण्याची हिंमत आणणे कठीण जाते. (मला आठवतेय परवा रात्री आपला बाबा तुला नि मला बाईकवरून फिरवत असताना तुझ्या डे केअर च्या काकूंच्या घरावरून बाईक जात असताना तू विचारलेस, 'भिडे काकूंच्या घरावरून आपण का जातोय?' तर मी मजेत म्हटले की, 'तुला आज रात्री भिडे काकूंकडे सोडणार आहे. तू आज रात्री त्यांच्याकडेच झोप!' तर इतका वेळ बाईकवर बसून मस्ती आणि आवाज करणारा तू एकदम चिडीचूप झालास. 'मला नको ना तिथे सोडूस!' असे म्हणत आपण रडलो तरी सरते शेवटी आपल्याला तिथेच जावे लागतेच, हे ग्रुहितक मान्य करून टाकले आहेस बहुतेक. त्यामुळे ह्या वेळी निषेधही नोंदवला नाहीस. नुसताच गप्प झालास. तुझी ती शांतता आम्हा दोघांनाही दुखावून गेली. मजेमजेतही तुझ्याशी असले खोटे परत बोलता कामा नये हा धडा आम्ही दोघेही त्या क्षणी शिकलो.)

'हो! सोनू, मला बाऊ झालाय!' ह्या माझ्या उत्तरावर मग लगेच तुझा पुढचा प्रश्न आला.
'बघू, कुठे झालाय बाऊ?'
तुझा इवलासा हात माझ्या हृदयापाशी नेऊन म्हटले, 'ह्या इथे!'

हृदयाला पडलेली घरं तुला दिसली नसली तरी जाणवली असावीत! कारण मला मिठी मारून म्हणालास,
'मग तू माझ्या मांडीत डोकं ठेव. तू कसं मला जवळ घेतेस तसं मी तुला थोपटतो!'

फक्त सव्वा तीन वर्षे वयात कुठून इतके उमज आणलीस, बछड्या! आपल्याला बरे नसताना आई-बाबा कसे आपल्याला जवळ घेतात, तसंच आज आईला बरं वाटत नाहीये तर आपण तिला जवळ घ्यायला हवंय इतका विचार तुझ्या चिमुकल्या मेंदूने इतक्या भर्रकन कसा केला? काय नव्हते तुझ्या त्या जादूई स्पर्शात? दिवसभरातल्या सर्व वाईट घटनांमुळे मनात निर्माण झालेला राग, चिडचिड, दु:ख, अपमान, वेदना अजून काय काय नकारात्मक भावनांचा एका क्षणात निचरा होण्याचे सामर्थ्य होते त्यात! 'बाबा घरी नसला तरी मी तुझ्या सोबत आहे!' हा दिलासा होता त्या स्पर्शात! 'मी लहान असलो तरी मीही विचार करतो आणि वातावरणातली, तुझ्या मनातली स्पंदने मी पकडू शकतो व त्यांचा अर्थ समजू शकतो' ही सहसंवेदनेची भावना होती त्या स्पर्शात! जेवण्-बिवण सगळं विसरून त्या आश्वासक स्पर्शाची अनुभूती घेत घेत काल मी तुझ्या कुशीत झोपले. एरवी 'तू माझ्या कुशीत झोपलेला असणे' हे चित्र बघायची सवय असलेल्या, रात्री उशीरा येणार्‍या बाबाला ही उलटी गंगा पाहून आश्चर्य वाटले होते. ओट्यावर असलेल्या जेवणाला हातही न लावलेला दिसणे हे दुसरे आश्चर्य होते.

अगदी गेल्याच महिन्यात घडलेला एक प्रसंगही मला इथे प्रकर्षाने आठवतोय. आठवडाभर तुला स्पेशल वेळ देता येत नाही, म्हणून शनिवार-रविवार हे खास तुझ्याबरोबर खेळण्यासाठी, तुला वेळ देता येण्यासाठी राखून ठेवण्याचा आम्ही केलेला पण दोघंही कसोशीने पाळतोय. कुठल्याही कामासाठी बाहेर पडायची वेळ आली तरी तुला घेऊनच बाहेर पडायचे धोरण अवलंबतोय. पण एका रविवारी आम्ही दोघेही खूपच दमलो होतो. आठवडाभर ऑफिस, प्रवास, घरातली कामे ह्यामुळे व आठवड्याश्या शेवटी घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, रात्री सलग दोन दिवस झालेली जाग्रणे ह्यामुळे वैतागलो होतो. रविवारी दुपारी सुस्तावलो होतो. तू ही आमच्याजवळ दोन घटका शांत झोपावंस म्हणजे आम्हालाही थोडा वेळ आडवे होता येईल असे वाटत होते. आणि नेमके तेव्हाच तुला अजिबात झोपायचे नव्हते. तुला पलंगावर त्याच वेळी तुझ्या गाड्या फिरवायच्या होत्या. 'आई-बाबा, उठा ना. मला झोप येत नाहीये. मला झोपायचं नाहीये.' चा धोशा तू सतत लावला होतास. आणि आम्ही मात्र 'आता बर्‍या बोलाने झोप हं का! आई-बाबा दमलेत! कळत कसं नाही तुला?' चा पाढा म्हणत बसलो होतो. शेवटी मनात नसतानाही थोडा वेळ एकटा एकटा खेळलास. अर्ध्या एक तासात अर्धवट गुंगीत असलेल्या मला गदगदून उठवलेस आणि पुन्हा स्वतःबरोबर खेळण्याचा हट्ट करू लागलास. माझाही रागाने पारा चढला. त्यात झोप अनावर होत असल्याने पण अर्धवट झोपेतून उठल्याने डोके जड झाले होते. पण तुझा बाबा गाढ झोपेत होता, म्हणून रागाने चरफडत उठले आणि तुला घेऊन दिवाणखान्यात येऊन टिव्ही लावून दिला व स्वतःही बघत बसले. थोडा वेळ तू टिव्हीत गुंतलास, पण पुन्हा तुझी तीच 'आई, माझ्याबरोबर खेळ ना. आपण ड्रॉईंग करूया ना!' ची भुणभुण सुरू झाली. तो पर्यंत टिव्हीच्या पडद्यावर दिसणार्‍या सिनेमात मी रंगून गेले होते. तुला नादाला लावायला म्हणून एक चित्रकलेची वही आणि काही रंग आणूनन तुझ्यासमोर टाकले आणि मी पुन्हा माझे लक्ष टिव्हीवर एकवटून बसले. तिकडे तुझा बाबा ढाराढूर होता! दुसरा काही पर्यायच समोर नसल्याने तू ह्या नवीन क्रियेतही स्वतःचा जीव जमेल तितका वेळ रमवून घेतलास. मग मात्र तुझेही भान सुटले. अचानक आक्रस्ताळेपणा, वस्तू इकडे-तिकडे फेकून देणे, क्रेयॉन चे रंग तोडून टाकणे, चित्रकलेच्या वहीची पाने टरकावणे, डायनिंग टेबलच्या काचेवर चढून थयथयाट करणे, खुर्च्या खाली पाडणे असे हिंसक चाळे करू लागलास. त्यामुळे माझा अजूनच संताप संताप झालास. 'बाप्पा बघतोय बरं का! जो आई-बाबांचं ऐकत नाही, त्याला तो पनिश करतो!' वगैरे नेहमीच्या कॉमेंट्रीलाही तू दाद देत नव्हतास. ह्या आवाजाने उठून बाहेर आलेल्या बाबाला काय वाटले माहीत नाही, पण तुला घेऊन आत गेला आणि मृदू आवाजात विचारले,' आम्ही तुझ्याकडे लक्ष देत नाही आहोत, म्हणून तू असं वागतो आहेस का, सोनू?' त्याने असे विचारले मात्र आणि तुझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. मग बाबाला घट्ट चिकटून म्हणालास, 'तुम्ही दोघंही माझ्याकडे बघतच नाही आहात. मी एकटाच खेळतोय. कुणीच माझ्या बरोबर खेळत नाही.' असं म्हणून हमसून हमसून रडू लागलास. आम्हा दोघांकडेही खरेच ह्यावर बोलायला शब्दच नव्हते! 'सॉरी' हा शब्दही तुझी क्षमा मागायला थिटा होता. आई-बाबा घराची गाडी रुळावर ठेवायला काय कसरती करत आहेत, हे जाणवण्याचे किंवा ही गोष्ट खिजगणतीत असण्याचे तुझे वय नाही किंवा आमची तशी अपेक्षाही असली नाही पाहिजे, हे कधी कधी आम्हीही विसरून जातो. आणि त्याचा नकारात्मक परिणाम बाळा, तुझ्यावर होतो. ह्याची काय आणि कोणत्या शब्दांत माफी मागावी? तुला आम्ही दोघेही जवळ घेऊन इतकेच म्हणू शकलो की, 'सोनू, आम्ही मुद्दाम तसे करत नव्हतो रे! खरंच सॉरी!' तेव्हा 'बाबा, तुम्ही मला खूप आवडता!' हे तुझे पेटंट गोड वाक्य पुन्हा म्हटलंस आणि आम्हाला एकदम भरून पावल्यासारखे झाले. 'पण तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाही की मला वाईट वाटतं!' इतकं बोलून बाबाला चिकटलास तेव्हा आम्ही दोघंही नुसत्या नजरेतून एकमेकांना इशारा देत होतो, की हा धडा ह्यापुढे कायमचा लक्षात ठेवायचा! घसाच इतका दाटून आला होता की दोघांनाही शब्द फुटणे मुश्किल झाले होते. त्यानंतर मग तुझा चेहरा कुरवाळत 'पिल्लू, तू ही मला खूप आवडतोस!' असे तुझ्या बाबाने म्हटल्यावर तुझा लगेच बुमरँग प्रश्न आला, 'बाबा, तुम्हाला आई पण आवडते ना!' बापरे, सोन्या तुझ्या डोक्यात किती किती आणि काय काय चाललेलं असतं! बाबाने आपण त्याला आवडत असल्याची कबूली दिल्यानंतर आईही आवडत असल्याची कबूली दिली पाहिजे, म्हणून तुझा पुढचा प्रश्न लगेच तयार होता. त्यानंतर तुझा बाबा आता लक्षात ठेवतो की 'मला तू खूप आवडतोस!' नंतर आईही त्याला आवडत असल्याचा उल्लेख व्हायला हवाय. म्हणजे मग बंटू ची गाडी खुश! Happy

मध्यंतरी रेणू दांडेकर ह्या लेखिकेचे 'मूल - घडताना, वाढवताना' हे पुस्तक वाचनात आलं तेव्हा त्यात लेखिकेने एक विचार मांडला होता. 'लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते' हे विचार तिला पटत नाही. तिच्या मते मातीच्या गोळ्याला भावना नसतात, ते बोलू शकत नाही, विचार करू शकत नाही. पण लहान मुल हे सर्व करू शकते, त्यामुळे आपण मुलांना घडवितो, हा आपला केवळ भ्रम आहे. लेखिकेच्या मते, लहान मुलेच आपल्याला घडवत असतात - एक पालक म्हणून! सुरुवातीला पालकत्त्वाचा कुठलाच अनुभव नसताना हळू हळू आपल्या पाल्याला समजून घेत, त्याच्या मनोविश्वाशी एकरूप होत, त्याच्या क्रिया-प्रतिक्रियांना अनुभवत पालक म्हणून आपण एक एक टप्पा पादाक्रांत करत जातो.

आम्हा दोघांनाही हे विचार रुचले आणि पटले देखील होते. एका चुकीच्या गृहतकाचा भ्रमाचा भोपळा लेखिकेने फोडला होता. आणि जेव्हा जेव्हा असे प्रसंग आपल्या तिघांच्या आयुष्यात घडतात तेव्हा तेव्हा पिल्ला, तुला मनापासून 'थँक यू' म्हणावेसे वाटते. आजवर पालक म्हणून आम्ही जसे काही आहोत ते तुझ्यामुळे आहोत. 'आई-बाबा, तुम्ही दोघेही मला खूप आवडता!' ह्या तुझ्या वाक्याला प्रतिसाद म्हणून फक्त इतकंच म्हणेन, 'सोनू, तू ही आम्हाला खूप खूप खूप आवडतोस!'

--तुझी 'शुभाआई'
(बाबाला 'वैभवबाबा' आणि मला 'शुभाआई' ही नामाभिधाने तूच दिलेली! Happy आणि आम्हा दोघांना ती फार फार आवडतात. अगदी कान्हा जसा त्याच्या आईला यशोदामैया म्हणायचा तसं 'शुभाआई' हा शब्द ऐकताना वाटतं! Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

आमच्या घरच्या संवादांची आठवण आली. सानिकाही बर्‍याचदा कविताआई म्हणते. सध्याचा काळ म्हणजे आपण त्यांचे आयडॉल असण्याचा काळ म्हणून दरवेळी काही बोलताना समोर टिपणारे टिश्युपेपर सारखे दोन डोळे/कान/मन्/बुद्धी दिसत रहाते. तरी पण बच्चा तू आमच्या कडे आयडॉल म्हणून बघत असलीस तरी वी आर नॉट गॉड, नो बडी इज ब्लॅक ऑर व्हाईट प्रत्येकात चांगलं वाईत, प्लस मायनसेस असतातच हे सांगताना आधी वाटलेलं तिला कळणार नाही पण खरतर मुलांना बरच काही कळतं.

खूपच मनापास्नं लिहिलंयेस शुभाआई, एक मनात आलं हे वाचताना..
आपल्या संवेदनाक्षम हुशार लहानग्याला जर विश्वासात घेऊन बाळशब्दात सांगितलं की बाळा तुझ्यासाठीच् या आमच्या नोकर्‍या, बाहेर असणे, या घरासाठी अन तुझ्या भविष्यासाठीच हे दमणे श्रमणे तर त्याला ते नक्कीच कळेल.. तेव्हढे अकालप्रौढत्व परिस्थितीने दिलं असेल मुलांनाही..
शुभेच्छा.
Happy

छान लिहीले आहेस निंबुडा. अगदी बाळाच्या भावना, त्याच्या मनात काय आहे हे एक आई म्हणुन समजुन घेतलेत, तुमच्याही मनाची घालमेल कळते. पण मग यावर काहीच उपाय नाही का? नोकरीची तशी आवशक्यता नसेल तर आता नोकरी सोडली तर नाही का चालणार? बाळ मोठे झाल्यावर आता तुम्ही जे काम करता तेच तुम्हाला नाही मिळणार, पण दुसरे काही करु शकाल. आजकालची मुले समजुतदार आहेत त्यांना सांगितले तर कळेल...तो समंजसपणा मुलांनी दाखवावा अशी अपेक्षा आपण का ठेवावी? यावर खुप बोलण्यासारखे आहे. पण आपल्या मुलाचे विचार जर तुम्ही इतके समजुन घेता मग नोकरीचा हा अट्टाहास कशासाठी??
मोदक चा पहिला भाग ही खुप आवडला. आई-वडिल आपल्या नातवाचे करतात ,त्यांच्यामुळे आम्ही नोकरी करु शकतो. ही जाणीव आहे हेच खुप आहे.

निंबुडे, खूप खूप पोचलं... टोचलं. मुलं आपल्याला घडवतात हे तर खरच... आई-बाप होण्याचे क्लासेस नाहीत. एक मऊ मातीचा गोळा हातात येतो आणि आपण एकदम आई-बाप होतो. आतून-बाहेरून थापटत, थोपटत आपल्यामते एक चांगलं माणूस घडवायचं... सोप्पं नाहीये.
जाई-जुई म्हणतेय तसं खरच सगळ्याच आई-वडिलांचं मनोगत लिहिलयस.

तुमच्या पिल्लाचे वय काय आहे? वेगवेगळ्या वयाची मुले डोळ्यासमोर आली..

बाकी लिहिलेय जबरद्स्त हृदयस्पर्शी यात शंका नाही... मात्र आमची वेळ येईल तेव्हाचे टेंशनही देऊन ठेवलेत राव..

काहीका असेना.. हेच आयुष्य आहे.. सारे आंबटगोडतिखटतुरट अनुभव घेत गेले की मगच या आयुष्याची आणि याने दिलेल्या प्रत्येक नात्याची किंमत राहते..

निंबुडे, तुझा आणि माझा मुलगा एकाच नक्षत्रावर जन्मलेत बहुदा.
सप्टेंबर २००९. माझा मुलगा पण अगदी अस्साच आहे, आईवेडा. आणि मला ' स्वातीआई' च म्हणतो.
हे वाचताना रडल्याशिवाय राहावले नाही.

माझ्या मनातलं गिल्ट आणखीन वाढवलंस यार...

माझी लेक रोज कणाकणाने वाढते आहे... पालथी पडली, रांगायला लागली, उठुन बसली.... आनंदी आठवणींचा एवढा खजिना तिच्यासोबत राहून वेचावासा वाटतो! पण त्यावेळी तिच्यापासून एवढ्या लांब... इथे ऑफीसात मी कुठला खजिना वेचत असते?

अवघड आहे गं... :'-(

निंबुडा, प्रत्येक आईची व्यथा Sad खरतर या गिल्टच्या चक्रातुन सुटका नाही

तू खूप छान, खूप मनापासुन लिहिलय. त्यामुळे पोहचतय.

प्रतिसाद दिलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद! Happy

तुमच्या पिल्लाचे वय काय आहे? वेगवेगळ्या वयाची मुले डोळ्यासमोर आली..
>>
अंड्या, लेखातच उल्लेख आहे. Happy

निंबुडे, तुझा आणि माझा मुलगा एकाच नक्षत्रावर जन्मलेत बहुदा.
सप्टेंबर २००९. >>
काय बोलते, अगं राजसही सेम! ११ सप्टेंबर २००९. रोहिणी नक्षत्र. तुमच्याकडे पण तेच का?

खर अप्रतिम.............!!!!!!

माझा मुलगा १ वर्षाचा आहे..... मी घरी गेल्यावर हसत हसत जवळ येतो.........
आणि सकाळी ड्रेस घातल्यापासुन रडायला सुर्वात करतो..............................मलाच खुप रडायला येत.
अस वाटत सकाळ कधीच होउ नये..........

निंबुडे, तुझा आणि माझा मुलगा एकाच नक्षत्रावर जन्मलेत बहुदा.
सप्टेंबर २००९. >>
काय बोलते, अगं राजसही सेम! ११ सप्टेंबर २००९. रोहिणी नक्षत्र. तुमच्याकडे पण तेच का?>>>>
माझा प्रथम पण १० सप्टेंबर २००९ असाच बोलतो तो पण !!
ऑफिसात बसुन डोळ्यातलं पाणी कसं लपवायचं????? Sad

ऑफिसात बसुन डोळ्यातलं पाणी कसं लपवायचं????? >>
स्वाती, अजिबात नाही लपवायचं. आईपणाच्या नैसर्गिक भावना मनात उचंबळल्या तर थोपवायच्या कशाला? भावनेचा बहर ओसरला की बॅक टू वर्क. Happy हवं तर सहसंवेदना जाणवू शकेल अश्या सखीला (किंवा आपल्या आईला) फोन करायचा, ५ मिनिटं बोलायचं! Happy

Pages