संयुक्ता मुलाखत : गुमर अ‍ॅकॅडमी - संस्थापक आणि संचालिका - दीप्ती गुमर

Submitted by _मधुरा_ on 7 January, 2013 - 09:32

दीप्ती गुमर, सॅन होजे, कॅलीफोर्निया ईथे स्वतःची प्रीस्कूल चालवतात.

प्रचंड सकारात्मक दृष्टीकोन, काहीतरी करून दाखवायची जिद्द, त्यासाठी घेतलेले कष्ट, शिकलेले नवीन आभ्यासक्रम यांच्या जोरावर त्यांनी स्वतःची मोठी प्रीस्कूल सुरू केली. त्यांच्या ईलेक्ट्रॉनीक्स ईंजीनिअर ते प्रीस्कूल डीरेक्टर ह्या प्रवासाविषयी त्यांच्याशी केलेली बातचीतः
IMG_3502.JPGनमस्कार. तुम्ही मुळच्या कुठल्या, शिक्षण कुठे झाले? अमेरिकेत कधी आलात?

माझा जन्म नागपूरचा. पण शालेय शिक्षण मध्यप्रदेशातल्या लहान गावांतून झालं. वडील शिक्षक होते आणि त्यांची नोकरी फिरतीची होती. नंतर ईंजिनीयरींग महाराष्ट्रातील कोल्हापूर जवळच्या ईस्लामपूर मधून झालं. मी ईलेक्ट्रॉनीक ईंजिनीयर आहे. मग लग्न होऊन अंबालाला आले. माझा नवरा मुनीष, पंजाबी आहे. आम्ही दोघं १९९९च्या सुमारास दिल्लीत काम करत होतो. मी डीआरओ मध्ये ज्यु. सायंटीस्ट होते. खरं तर मुनीषना अमेरिकेत यायचे होतं, मग ते २०००मध्ये इथे आले आणि जून मध्ये मग मी ही आले. आले तेंव्हा माझी मोठी मुलगी फक्त ६ महिन्यांची होती.

अमेरिकेत आल्यावर सुरुवातीचे दिवस कसे होते?

सुरुवातीला इथे फारच जड गेलं. मी कॉलेज मधून बाहेर पडल्यापासून काम करत होते. सुरुवातीला आमच्याच कॉलेज मध्ये शिकवत होते. लग्नाच्या वेळी दोन महिन्यांची सुट्टी घेतलेली. पण इतर सर्व वेळ काम करत होते. दिल्लीत जॉब मिळेपर्यंत लहान मुलांच्या गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या शिकवण्या घेतल्या. मला रिकामं बसायला आवडत नाही. आणि मुलांना शिकवायला, त्यांच्याबरोबर काम करायला फार आवडतं.
इथे आल्यानंतर सगळचं नवीन! रुळायला वेळ लागला. मुनीष तेंव्हा सॅन फ्रांसिस्कोत जॉब करत आणि सकाळी लवकर जाऊन रात्री उशीरा येत. आम्ही एकट्याच असायचो - मी अन् किमया. ना कोणी मित्र मैत्रिणी ना कोणी नातेवाईक. त्यात मी एच४ विसावर आलेले. म्हणजे जॉबही करू शकत नव्हते. मग मी शिकायला सुरुवात केली. मला ASIC designing मध्ये काम करायचं होतं. भारतात पण मी VHDL करत होते. त्यातच मला करियर करायचं होतं. पण तेंव्हा नेमकी मंदी होती. '९११ ट्वीन टॉवर' घटना घडलेली. जॉब मार्केट मध्ये अनुभवी लोकांची कमतरता नव्हती. तेंव्हा मला ब्रेक मिळायची शक्यता फार कमी होती. त्याच सुमारास मला दुसरी मुलगी झाली, ध्रिती. या सर्वांत ४-५ वर्षे गेली. पण मी सतत काही ना काही शिकत राहिले.

मग डेकेअर च्या व्यवसायाकडे कश्या वळलात?

जेंव्हा किमया तीन-साडेतीन वर्षांची होती, तेंव्हा मला तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यात रुची वाटू लागली. मी तिच्या बरोबर आर्ट्स अ‍ॅन्ड क्राफ्टस प्रोजेक्ट्स करू लागले, बरीच पुस्तकं, ईंटरनेट वर वाचून तिला नवीन नवीन शिकवू लागले. माझ्या मते, मी ते खरचं उत्तमरीत्या करत होते. तेंव्हा शेजार-पाजार्‍यांनी विचारलं, सुचवलं की मी चाईल्ड केअर/ डे केअर सुरू करावं. तोपर्यंत माझे EAD आले आणि मी खरोखरच विचार करू लागले. मला कोणतीही गोष्ट उगीच करायची म्हणून करायची नव्हती. मग मी लायसन्स कसा मिळवता येईल ते पाहिलं. इतर लोकं जे ह्या व्यवसायात आहेत त्यांना जाऊन भेटले.

म्हणजे तुम्ही कोणाला सहायक म्हणून काम केले का?

नाही, मी कधीच कोणाला सहायक म्हणून काम केलं नाही. आता वाटतं, करायला हवे होते! बर्‍याच गोष्टी लवकर शिकून झाल्या असत्या. पण एका अर्थाने ते बरंच झालं म्हणा. माझ्या पाहण्यातल्या डे केअर चालवणार्‍यांनी क्लासेस वगैरे घेतले नव्हते. त्यांनी बेबी सिटींग सुरु केलं होते. पण मी ते नाकारलं. मला right path घ्यायचा होता, कारण आता मी त्यातच माझं करीयर करायचं ठरवलं होतं.


प्रीस्कूल टीचर हे करीयर करावं हे ठरवण्याची प्रक्रिया काय होती? कधी वाटलं का - की ह्यातच पूर्णवेळ करियर करावं, किंवा कधी जाणवलं की हेच आपल्या आवडीचं क्षेत्र आहे?

प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यावेळेला एवढं strongly वाटलं नव्हतं. माझी इच्छा ईंजिनियरींग मध्येच करियर करायची होती. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे शक्य होत नव्हतं. २ लहान मुली, एकच जण कमावता, इथे बाकीची काही मदत नसणे यामुळे, माझं ईंजिनियरींग मधलं उच्च शिक्षण त्यावेळी शक्य नव्हतं आणि माझं असलेलं शिक्षण पुरेसं नव्हतं असं मला जाणवत होतं. शिवाय मला माझ्या मुलींच्या बाबतीत कुठलीच तडजोड मान्य नव्हती.

यामुळे डेकेअर काढायचं ठरवलं गेलं का?

नक्कीच! माझी आई working mom होती आणि मला घरी ठेऊन जात असे. तिनं आयुष्यभर काम केलं. पण त्यामुळे माझ्या वाट्याला ती खूप आली नाही, आणि माझ्या मुलींच्या बाबतीत मला हे होऊ द्यायचे नव्हते. जे आता खरं पाहता होतंय (ह्यावर दिप्ती गोडशी हसली)
मग माझं आयुष्य त्यांच्या भोवती, child development च्या भोवती फिरू लागलं. मग ठरवलं की करायचं तर नीटच!. माझी ईंजिनियरींग बॅकग्राऊंड असल्याने याची काहीच माहिती नव्हती. मग मी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. ऑनलाईनही खूप वाचन केलं. 'डी अ‍ॅनझा' कॉलेजमधे बेसिक कोर्सेस घेतले आणि मग छोटं घरगुती डे केअर उघडलं, सनीवेल मध्ये. मग मला जाणवलं की मी अजून चांगलं काम करू शकते. यात पुढे कसं जावं ते कळत नव्हतं, म्हणून मी परत कॉलेज जॉईन केलं. छोट्या पाळणाघराचं मोठ्यात रुपांतर करायचं ठरवलं. पण आहे ती जागा पुरत नव्हती. म्हणून घर घ्यायचं ठरवलं. त्यातच एक मोठी खोली पाळणाघरासाठी वापरायची ठरवली. मी स्वतः back yard design केलं, मुलांसाठी सुरक्षित रचना केली. ज्यामुळे मुलांच्या sensory needs जोपासल्या जाऊन त्यांची उत्तम वाढ होईल. वाळू, मऊ दगड अशी विविध textures आणली. आणि खूप मस्त facility तयार झाली.
मी लहान मुलांचं फर्निचर घेतलं म्हणजे त्यांना एकाच वेळी शाळेचा आणि घराचा फील येईल.
मग चार वर्षं मी हे मोठं पाळणाघर तिथेच चालवलं. हे सुरू करायच्या आधी! It was always going forward and never stopping at any point. जेव्हा केव्हा मला वाटे की आता झालं, तेव्हा मला पुढचं करायची, अधिक आव्हान स्वीकारण्याची ओढ लागे आणि ते कसं करता येईल अशी चक्रं माझ्या डोक्यात फिरत. I can not stop.. thats my problem! मला नाविन्याची प्रचंड आवड आहे.

collage1.jpgआता जरा व्यवसायाकडे वळूयात. जेंव्हा पहिल्यांदा डे केअर सुरु केलं तेंव्हा ( आणि आताही ) येणार्‍या मुलांचा वयोगट काय होता?

जेंव्हा सुरू केलं तेंव्हा सहा आठवड्यांचं बाळ सुद्धा सांभाळलं आहे. माझ्या दोन मुली तेंव्हा पाच आणि अडीच वर्षाच्या होत्या. सहा महिन्यांच्या बाळांपासून ३-४ वर्षांची मुले येत असत. माझ्या मते ४ वर्षांनंतर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डे केअर पुरत नाही आणि त्यांनी प्रीस्कूल मध्ये जावं. तिथं जास्ती structured program असतो.
इथे ह्या शाळेत आम्ही वय वर्ष २ ते पहिल्या इयत्तेसाठी तयार ( साधारण पाच- साडेपाच वर्षं )अशी मुलं घेतो.
काही मुलं इतर पब्लीक स्कूल मध्ये किंडरगार्टन करून इथे आफ्टर स्कूल केअर साठी येतात.

तुम्ही जेंव्हा घरी डे केअर चालवायचात तेंव्हा तुमच्या मुलींची प्रतिक्रिया काय होती? आपली आई इतरांचं पण करतीये, आपला वेळ वाटला जातोय असं त्यांना वाटायचं का? एक आई म्हणून तुम्ही याकडे कसे पहायचा?

(हसून) सुदैवानं असं कधी झालं नाही. त्यांना जेलसी वाटली नाही. माझी धाकटी सुरुवातीपासून तिथेच वाढली, तिच्यासाठी तेच नॉर्मल होतं. तिला वाटायचं डे-केअर तिचं स्वतःचं आहे. तर मोठी, मोठ्या ताई सारखी वागायची. ती लहानांना गोष्टीची पुस्तकं वगैरे वाचून दाखवायची. किंवा आम्ही खेळ खेळायचो तेंव्हा ती लीडर व्हायची. तसं पाहिलं तर लहान मुलांबरोबर कसं वागायचं हे त्यांना त्यांच्या लहानपणीच आत्मसात झालं.
पण त्यानंतर त्या जेंव्हा शाळेत जायला लागल्या, तेंव्हा घरी कायम आवाज असायचा. त्यात माझाही अभ्यास सुरु होता. ( अजूनही सुरू असतो ) त्यामुळे आमचं घर म्हणजे एक तर अभ्यास नाही तर मुलं असं झालेलं. आणि माझी मोठी मुलगी जेंव्हा पाचवीत जाणार होती, तेंव्हा वाटलं की आता डे-केअरसाठी दुसरी जागा ( घर सोडून) घ्यायची वेळ आली आहे. तो पर्यंत माझं चार वर्षाचं कॉलेज झालं होतं आणि २ वर्षांचा अनुभवही मिळाला होता.
मग मी आजूबाजूला कशा पद्धतीच्या फॅसीलीटीज आहेत ते पहायला सुरुवात केली. माझ्या ४ मैत्रीणीना डे-केअर सुरू करायला प्रोत्साहित केलं. आज बे एरिया मध्ये त्या चौघींची डे-केअर्स सुरु आहे. You should always influence others to do something good. त्यांची मदत करा. पहिलीच पायरी सगळ्यात अवघड असते. सुरुवात कशी करायची!. मी त्यांना सांगायचे पहिलं पाऊल उचला. Go here. sit, listen and read through it. त्यांना माझ्यामुळे रस्ता कळला होता. त्यातल्या खाचाखोचा मला माहित झाल्या होत्या. अजूनही त्या माझा सला घेतात. त्या कधी कधी लायसन्सींगवाल्यांना विचारायच्या आधीही मला विचारतात, की अशा परिस्थिती आहे काय करू. आता माझं डे केअर grandmother day care झालंय. Happy

लहान मुलं म्हटली की जास्तीची जबाबदारी असते ( आणि liability ) आणि त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीज बरोबर काम करावं लागतं, जसं की ईंश्युअरन्स कंपन्या, फॅसीलीटी लायसन्सींग, सीटी/ काऊण्टी काऊन्सील. तर तो अनुभव कसा होता?

प्रीस्कूलसाठी सर्व ठरलेलं असतं, पण डे-केअरसाठी मला फार शोधाशोध करावी लागली. दुसर्‍या राज्यामधून ईंश्युअरन्स काढावा लागला. जो थोडासा महागही होता. पण करायचं तर नीटचं करायचं या माझ्या तत्त्वासाठी मी तो घेतला.

प्रीस्कूल म्हणजे, शाळा हा एक भाग झाला, दुसरा भाग जो की business/ entrepreneurial/ administrative म्हणू, तो सर्व तुम्ही स्वतः पाहिला की मुनीषनी मदत केली?

oh yeah! त्या साठी लागणारं शिक्षण मी मिळवलं, अनुभव मिळवला. शाळा नक्की कशी हवी ते मला पक्कं माहित होतं. पण स्वतःची शाळा कशी उभी करायची यात मुनीषची खूप मदत झाली. माझ्यापेक्षा त्यांना बिझनेस जास्त कळतो. त्या बाबतीत त्यांचं वाचन माझ्यापेक्षा जास्त होतं (आहे) , आणि (हसून), माझ्यापेक्षा त्यांच्याकडे वेळही जास्त होता!
आम्ही बर्‍याच गोष्टींचा विचार केला. रिटेल जागा बघून रिनोवेट करावी का? आणि फक्त जागेचा प्रश्न नाहिये. बर्‍याच इतर गोष्टीही असतात. लायसन्सींग प्रमाणे, सीटी कोड प्रमाणे ती अद्ययावत करून घ्यावी लागते.
हे नक्कीच सोपं नव्हतं. मुख्य प्रश्न होताच, पैशाचा!

भांडवल कसं उभं केलं? सीटीचे minority women साठी काही प्रोग्रॅम असतात त्याचा उपयोग झाला का?

(हसून) खिशात साठवलेले सगळे पैसे ओतून टाकले. स्मॉल बिझीनेस लोन घेतलं. minority women entrepreneur चे बेनिफीट्स मिळाले. कसं असतं की डे-केअर घरी चालवता येतं पण प्रीस्कूल म्हटली की, स्वतंत्र जागा लागते. मग ती शाळा तुम्ही from scratch उभी करू शकता किंवा असलेली विकत घेऊ शकता. भरपूर पैसे असले की वाट्टेल ते करता येतं. हवं तसं architecture, डिझाईन, इंटेरीअर असं सगळं मिळतं आणि एवढंच नाहे तर सीटी, फायर डिपार्ट्मेंट अशा अनेक लोकांकडून वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. सगळ्यांचे वेगळे नियम असतात. त्यात बसावं लागतं. पण माझ्याकडे तो ऑप्शन नव्हता. घराच्या जवळपास, बजेट मधे बसणारं शोधणं, फार अवघड होतं.

franchise घेण्याचा विचार केलेलात का?

केलेला नं. पण मला ते फारसं रुचलं नाही. एक तर त्यांचा cookie cutter program असतो. त्यांचीच philosophy, methodology follow करावी लागते, आणि प्रिमीयम पण खूप असतात. आपल्याकडे कंट्रोल राहत नाही. पण एक आहे की आपल्याला सगळ तयार मिळतं. पण त्यांना जितके पैसे द्यायचे, त्यात मी माझं स्वतःचं नक्की आणि चांगल्या रितीने उभं करू शकेन ह्याचा मला विशवास होता. पण ते होणार कसं? हा मोठा प्रश्न होताच!
एका स्मॉल बिझीनेस लोन ऑफिसरना भेटले. त्यांनी खूप मदत केली. अजून एक मृनीशचा मित्र, ज्याची स्वतःची आयटी कंपनी आहे, त्यानंही खूप मदत केली. त्यांच्या मते पैसे उभे करणे हा मोठा प्रश्न नव्हताच मुळी!
मग शोध चालू असताना, आता जी शाळा आहे ती जागा मिळाली. पण ही मोठी शाळा आहे, आणि (विकत घेण्यासाठी) रक्कम फार मोठी होती. फारच मोठी होती. घरापासून अंतरही मला हवं त्यापेक्षा जास्त होतं. मी तयार नव्हते, पण नवरा म्हणाला की lets go for it! Together! स्वतःवर विश्वास ठेवला की सर्व काही होईल. मला माहित होतं की मला काम करायचंय. त्याला माहीत होतं की हे होऊ शकेल. बास. एवढे पैसे, एवढी रिस्क, पण आम्ही उडी घ्यायची ठरवली. मग पुढची शोधाशोध सुरू झाली. बँक! बर्‍याच ठिकाणांहून नकार आला, कारण मी आधी शाळेत डिरेक्टर म्हणून काम केले नव्हते. बर्‍याचजणांनी मला सांगितलं की लोक खूप उत्साही असतात, शाळा सुरु करतात, पण ते बिझनेस करू शकत नाहीत मग चार सहा महिन्यात त्यांना बंद करावी लागते. त्याकाळात, इथलं हाऊसिंग मार्केट कोसळत होतं, आणि आम्ही बिझनेस सुरू करणार होतो. बर्‍याच बँकांनी तोंडावर नाही म्हणून सांगितले. आणि या जागेच्या मालकांकडून पण प्रेशर होते, की तुम्ही हालचाल नाही केलीत तर दुसर्‍यांना विकून टाकू. सहा महिने लागले!

तर जेंव्हा पहिल्यांदा शाळा सुरु करावी वाटली, ते ती उभारली, हा काळ किती होता?

२ वर्षे!
पण ते गरजेचं होतं. माझी शाळा ७४ मुलांना एका वेळेस प्रवेश देऊ शकते.

collage2.jpgतुम्ही म्हणालात की शाळा सुरु करण्याच्या आधी, प्रीस्कूलचा काही अनुभव नव्हता, तर जाहिरात कशी केली? सुरुवातीला किती मुलं होती आणि त्यात कशी वाढ झाली?

आता आहे ती शाळा आधी ख्रिश्चन शाळा होती. मी जेंव्हा विकत घेतली तेंव्हा मी तिला रेग्युलर प्रीस्कूल मध्ये बदलली. एक तर मला स्वतःला ख्रिश्चॅनिटी बद्दल काही माहित नाही आणि लहान मुलांनी कशावर आणि किती श्रद्धा ठेवावी हे त्यांच्या पालकांवर सोपवावं असं माझं प्रामाणिक मत आहे. इथे येणारी बरीच मुले ख्रिश्चॅनिटी मुळे येत असत, तसंच बरीच मुले घराजवळ आहे, फॅसिलीटी चांगली आहे, अशा कारणाने येत असत. त्यात भारतीय वंशाची फक्त पाच मुलं होती. एकूण ५६ मुलांपैकी जवळ जवळ ३० मुलांनी शाळा बंद केली, जेंव्हा त्यांना कळलं की हा ख्रिश्चन प्रोग्रॅम नाही आहे. पण त्याचा फयदा असा झाला की, जास्त लोकं यायला सुरुवात झाली कारण हा प्रोग्रॅम कोणत्या एक धर्मावर आधारीत नव्हता. माझ्या काही भारतीय मित्र-मैत्रीणींनी त्यांची मुले पाठवायला सुरुवात केली. आणि बघता बघता संख्या वाढली. अर्थातच हे रातोरात नाही झालं. जवळ जवळ एक वर्ष लागलं जम बसायला.

शिकवण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती/ फिलॉसॉफी असतात.(उदा. मॉन्टेसरी). तुम्ही कोणत्या गोष्टीवर भर देता, की स्वतःची एक वेगळीच पद्धत राबवता?

मॉन्टेसरी खूपच वेगळी पद्धत आहे. मी हायस्कोप पद्धतीवर भर देते. ती जास्त शैक्षणीक आहे, माझ्या मते. ( अर्थात भारतात ज्या कल्पना आहेत त्यापेक्षा बरीच वेगळी आहे ) पण खरं सांगू का? पालकांना जास्तीत जास्त शैक्षणीक पद्धती हवीच असते.
खास करून सिलीकॉन वॅलीत, जिथे सगळे आय टी मधले, डॉक्टर्स असे उच्चशिक्षीत लोक आहेत. पण मला असं वाटतं की, फक्त अ‍ॅकॅडॅमीक असून चालत नाही, क्रिएटीवीटीसुद्धा हवी, म्हणून मग मी हाय स्कोप ची मुल्यं वापरून, माझी स्वतःची पद्धती सुरू केली - creative academics : lots of hands on sensory arts and science activities.

सगळी मुले सारखी नसतात, मग या पद्धतीत तुम्ही हळू प्रगती करणारे, किंवा जास्त पुढे असणार्‍या मुलांबरोबर कसं काम करता?

माझ्या मते, मुलांच्या क्षमतेपेक्षा तुम्ही त्यांना जास्त पुश करू शकत नाही. आणि त्यासाठी त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. ही काही रेस नव्हे. पण तरी त्यांना ते जे काही करतात त्यात आत्मविश्वास यायला हवा. काही मुलं लीडर असतात. काही सुचना व्यवस्थीत पाळतात, काहींना संगीतात गती असते तर काहींना वाचनात किंवा गणितात. मग जेंव्हा आम्ही "फ्री टाईम" देतो, तेंव्हा वर्गात या गोष्टी पटकन दिसून येतात. मग आम्ही त्यांना तसे उत्तेजन देतो.

शाळेत सध्या किती शिक्षक आहेत?
एकूण आठ आणि मी नववी.


तुम्ही अजून शिकवता की आता फक्त व्यवस्थापनाचं बघता?

मी नियमीत शिकवत नाही आता, पण शिक्षकांना मेंटर करते. ( ह्याचेही कोर्सेस केले आहेत मी.) कारण होतं काय, की बर्‍याचदा, शिक्षकांची त्यांची एक पद्धत ठरलेली असते, मग मला ज्या पद्धतीने प्रोग्रॅम राबवायचा आहे, तो हेतू नीट साध्य होतोय ना, हे पहावे लागते. त्यांचे लेसन्स तपासावे लागतात. माझी फिलॉसॉफी वर्गात पोहोचतीये ना - हे पहावे लागते. मुलांच्या आवडींनुसार त्यात बदल करावे लागतात. गुमर अ‍ॅकॅडॅमी च्या फेसबूक पेजवर आम्ही वेळोवेळी वर्गात काय चालते ह्याचे अपडेट टाकतो, म्हणजे पालकांनाही कळेल

लहान मुलांसाठी शिक्षक म्हणजे आईच्या बरोबरीचे असतात. तर तुम्हाला आलेले काही अनुभव सांगाल का? ज्यामुळे तुम्हाला भरून आलं, अभिमान वाटला या क्षेत्रात आल्याचा.

(हसून) अर्थातच! एक बघ, कोणा दुसर्‍यांच्या लहान मुलांना मिठी मारणं फार अवघड असतं. तुमच्यात आणि त्यांच्या विश्वासाचा धागा विणल्याशिवाय ते तसं करू देत नाहीत. त्यांना आवडत नाही. पण त्यांना ते हवं असतं, तो विश्वास हवा असतो. अजूनही मी वर्गांतून चक्कर मारताना काही मुले, पळत पळत येऊन मला बिलगतात. I love that! त्यातच सर्व आलं!
माझ्याकडे मोजमाप नाहीये, पण मला वाटतं "जिंदगीमे सबसे ज्यादा हग्स मुझे मिलनेवाली है." अगदी दोन अडीच वर्षांची चिमुरडे, जे माझ्यापर्यंत पोहचूही शकत नाहीत, किंवा ज्यांना बोलता ही येत नाहिये की मी आलीये, ते पायात घुटमळतात. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना इतकं छान वाटतं म्हणून सांगू! आणि दोन मुलींची आई असल्यामुळे माझ्या हातून आपसूकच ममतेचा हात फिरवला जतो. या वयात शिक्षणाबरोबर त्यांना प्रेम, माया, ममता यांचीही गरज असते. कधी कधी आम्ही ग्रूप हग करतो. मी गुढग्यांवर त्यांच्या उंचीला येईन अशी बसते. I love my kids. शाळेतल्या प्रत्येक लहानग्याबरोबर माझं पर्सनल असं बॉन्डींग झालं आहे. एक नातं जुळलं आहे. खरचं फार मस्त वाटतं.

मग इंजिनीयरींग सोडल्याचं फारसं वाईट वाटत नसेल नां आता?

अगदीच तसं नाही. मला गणिताची प्रचंड आवड आहे. ( माझ्या मुलींसाठी ती कदाचित जरा जास्तच आहे ). मला गणित शिकवायलाही फार आवडतं. पण आता पाहिलं तर वाटतं बरंच झालं. मला जिथे आधी जायचं होतं - आयटी, कम्प्यूटर्स, फार रुक्ष वाटतं आता, फक्त तुम्ही आणि मशीन्स. इथं तसं नाहीये. इतका जिव्हाळा! आणि instant results!
मला एक असाईन्मेंट होती की, लहान मुलं कसं म्हणतील तसं गाणं तयार करायचं, त्यांना जास्त आपुलकीचं वाटावं म्हणून, जसं की ते पून म्हणतील, स्पून ला. एल मुलगी म्हणायची:
ईच्ची बिच्ची पायडर, बेन्ट्प वॉटं पाऊट,
डोन केम ड नेन,नॉद दद ऑऊट,
मी खूप छान रीतीने ते स्क्रीप्ट केलं. डी अ‍ॅन्झा कॉलेज मध्ये त्याचं फार कौतुक झालेलं.

या शाळेत special needs kids आहेत का?

हो आहेत ना. मी सॅन्टा क्लारा मध्ये अशा मुलांचे संगोपन करायचे क्लासेसही केले आहेत.
काही मुले speech delayed आहेत किंवा slow in reaching development mile stones अशी आहेत किंवा काहींना मेडीकल कंडीशन्स आहेत. मी shelter homes मध्ये रहाणार्‍या मुलांसोबतही काम केले आहे. सिंगल पेरेन्ट किंवा फॉस्टर पेरेन्ट्स बरोबर रहाणार्‍या मुलांसोबतही काम केले आहे.
लहान मुलांबरोबर काम करणं खूप आनंद देणारं असलं तरी कधी कधी अशा वातावरणातून आलेल्या मुलांबरोबर काम करणं फारच अवघड असतं.
कधी कधी पालक जास्त ओपन नसतात. त्यांना वाटतं, की ते त्यांच्या मुलांबरोबर योग्य तेच करत आहेत. आणि काही अंशी ते खरंही असतं. त्यांची मुलं त्यांना, इतरांपेक्षा जास्त माहीत असतात. पण तरी कधी कधी त्यांच्याबरोबर मिटींग्स घ्याव्या लागतात. हे असं होतंय, झालंय आणि तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल वगैरे त्यांना सांगावं लागतं.
एक मुलगा होता की त्याला बर्‍याचदा ब्लड ट्रांस्फ्यूजन लागे. त्याच्या बॅगपॅक मधे बर्‍याच गोष्टी असत आणि त्यातून त्याच्या शरीरात एक नळी असे. पण बाकीच्या मुलांना ते नीट समजत असे. कोणीही त्याच्या बॅगपॅक ला हात लावला नाही. पण त्याच्याशी नीट खेळत असत. त्यालाही इतर मुलांमधे मिसळण्याची, त्यांच्याशी खेळण्याची गरज आहेच की!

शाळा सुरू करण्यातल्या challenges and stress विषयी काही सांगाल का?

Endless challenges आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे, घरातून बाहेर पडायचं होतं. मी घरी डे केअर चालवत होते, तेंव्हा बर्‍याचदा भारतीय कपड्यात असायचे. आता ते चालत नाही. तुम्हाला ड्रेस कोड पाळावा लागतो. तुम्ही कसे दिसता यालाही फार महत्त्व आहे. मी मेकप ही करत नसे, तो करायला शिकले. स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायला शिकले. आधी बरीच शाय होते. पण या व्यवसायात आल्यावर बोलकी झाले. आता तर मी कोणाशीही कितीही वेळ बोळू शकते (हसत).
"घर" हळू हळू लांब चाललय. मुली मोठ्या होत आहेत. बर्‍याच गोष्टी त्या मॅनेज करतात. पण त्यांची काळजी कशी घेऊ हा विचार सतत असतो. नॅनी ठेवली आहे. बाहेर काम करून घरी जाऊन स्वयंपाक, आवरा-आवरी ते ही जास्त चॅलेंजींग झालयं.
इथेही म्हणजे शाळेत, तुमची तत्वे इतर शिक्षकांबरोबर जुळतीलच असे नाहे. त्यात ८ बायकांबरोबर काम करणे चॅलेंजींग आहे. कधी गॉसिपिंग, आणि बर्‍याचदा त्या जास्त expressive असतात. वेगवेगळ्या कम्युनिटीतील पालकांबरोबर काम करणे चॅलेंजींग आहे. विएत्नामीज, चायनीज, कोरीअन, हिस्पॅनिक वगैरे. कधी कधी डम्ब शेराडस खेळून, लिहून, चित्र काढून कम्युनिकेशन करावे लागते. कधी मला त्यांचे नीट कळत नाही, कधी माझ्या थिक अ‍ॅक्सेंट मुळे त्यांना माझे नीट कळत नाही.
काही वेळेस मी पालकांकडून त्यांच्या भाषेतल्या रोज वापरातल्या गोष्टी लिहून घेते, जसे दुदू, जेवण, पॉटी वैगरे आणि मग मुलांशी संवाद साधता येतो. कधी त्यांना लिहून देते की हे शब्द घरी वापरा म्हणून.
शाळेत कसं शिकवावं या बद्दल पालकांच्या काही अपेक्षा असतात. कधे कधे तेही चॅलेंजेंग असतं.
एक मुलगी होती, फॉस्टर केअर मधून आलेली. प्रचंड expressive होती. काही खात नसे, पीत नसे, सतत वेगवेगळ्या गोष्टी सांगे, जोरजोरात. ती अशी का होती, माहीत नाही. कुणाचेच ऐकत नसे. एक दिवस जोरजोरात रडत होती. मी जवळ गेले, तिला दोन घास भरवले. हमसून हमसून मला बिलगली. त्यादिवशी तिनं पहिल्यांदा नीट खाल्लं. मला म्हणाली, मीस दीप्ती, "Next time, I'll be nice to you". मला काय करावं सुचेना. डोळ्यात पाणी आलं. आतापर्यंत आलेला सगळ्यात वेगळा अननुभव होता हा. घरी गेल्यावर मुनीषना सांगीतलं. मला बळ हवं होतं. आणि ते येतंही, अनुभवातून! अशा गोष्टी तुम्हाला कोणी शिकवत नाहीत. मुलं नाती शिकवतात!

यापुढचे प्लॅन काय आहेत?

शाळा सुरू होऊन फक्त दीड वर्ष झालंय, तर सध्यातरी नीट सेटल होणं हे पहिलं काम आहे. मला नक्कीच गुमर अ‍ॅकॅडमीची अजून सेंटर्स उघडायची आहेत. थोड्या मोठ्या मुलांसाठी आफ्टर स्कूल प्रोग्रॅम सुरु करायचे ही मनात आहे. पाहू कसं होते ते.

इतर संयुक्तांना काय संदेश द्याल?

आयुष्यात discipline ला फार महत्व आहे. आपल्याला जे करायचं ते ध्येय सतत डोळ्यासमोर हवं. मग तिथे कसं पोचायचं ह्याचं नीट प्लॅनींग करायचं. उगीच करायची, म्हणून कुठलीही गोष्ट करायची नाही. त्याचं नीट शिक्षण घ्यायचं. असं म्हणतात की एक बाईच एका बाईची शत्रू असते, पण ह्याउलट मी म्हणते की, एक बाईच एका बाईची मैत्रीण असते. माझ्या उमेदीच्या काळात, एका बाईला जीम ला जायला वेळ मिळत नसे, तर मी आणि तिने मिळून एक पॅक्ट केली. मी तिची मुलं सांभाळणार तेंव्हा ती जीमला जात असे, आणि ती माझी मुलं सांभाळेल तेंव्हा मी अभ्यास करत असे. दोघींना ह्याचा आपापली ध्येये गाठण्यात उपयोग झाला. मला जेंव्हा लोन घ्यायची वेळ आलेली, आणि बँका धडाधड नकार देत होत्या तेंव्हा एक बँक तयार झाली, पण अट होती की ६ महिने शाळा चालवू शकीन एवढे पैसे हवे, तेंव्हा माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ते पैसे उभे केले.
स्वतः तर काम कराच पण इतर लोकांना प्रेरित करा. सगळ्यांना मदत करा. तुमच्या अडचणीतून धडा घेऊन लोकांना सांगा.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझा मुला़खत घेण्याचा पहिलाच अनुभव होता. आणि ८०% मुलाखत ईंग्रजी आणि हिंदीतून झाली. तेंव्हा भाषांतर करण्याचाही पहिलाच अनुभव होता. बरच काही शिकायला मिळालं. संयुक्ताने ही संधी दिल्याबद्दल संयुक्ताचे आभार. नानबा मुळे दीप्तीशी ओळख झाली. तसंच तिने मुद्रित शोधनासाठीही बरीच मदत केली, म्हणून तिचे विशेष आभार.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

** संयुक्ताच्या माध्यमातून स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचे एक वेगळे व्यासपीठ मायबोलीने उपलब्ध करून दिले आहे. व्यवसाय, करियर, आरोग्य, सल्ला-मार्गदर्शन, आधार, मदत, माहिती, संवादाच्या माध्यमातून स्त्रियांना व्यक्त होण्याचे, जाणिवा प्रगल्भ करण्याचे प्रयत्न संयुक्ताच्या माध्यमातून सातत्याने चालू असतात. आज अडीचशेहून अधिक स्त्रिया संयुक्ताच्या सदस्या आहेत व या व्यासपीठाचा लाभ घेत आहेत. नव्या मैत्रिणी मिळवत आहेत. मायबोलीवरील कोणीही स्त्री सदस्या संयुक्ताचे सभासदत्व घेऊ शकते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान मुलाखत. दिप्तीचे विचार किती स्पष्ट आहेत. शिवाय अगदी नव्या करिअरमध्ये इतका आत्मविश्वास! खरंच प्रेरणादायी आहे.
अनेक शुभेच्छा Happy

माझ्या ४ मैत्रीणीना डे-केअर सुरू करायला प्रोत्साहित केलं. आज बे एरिया मध्ये त्या चौघींची डे-केअर्स सुरु आहे. You should always influence others to do something good. त्यांची मदत करा. >> दीप्ती, तुमचे खूप कौतुक वाटते..
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!

आयुष्यात discipline ला फार महत्व आहे. आपल्याला जे करायचं ते ध्येय सतत डोळ्यासमोर हवं. मग तिथे कसं पोचायचं ह्याचं नीट प्लॅनींग करायचं. उगीच करायची, म्हणून कुठलीही गोष्ट करायची नाही. त्याचं नीट शिक्षण घ्यायचं. >>>
खूप आवडलं.

मस्त मुलाखत! धन्यवाद मधुरा!!

khupach chhan jhali aahe mulakhat...... uttam wa sakaratmak vichar mirale wachayla. ...All the best Deepti Happy

मस्त मुलाखत... खरंच प्रेरणादायी आहे.! Happy
माझ्या ४ मैत्रीणीना डे-केअर सुरू करायला प्रोत्साहित केलं. आज बे एरिया मध्ये त्या चौघींची डे-केअर्स सुरु आहे. You should always influence others to do something good. त्यांची मदत करा. >> हे खुप आवडले .

खूप आवडली मुलाखत.

एका छान प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद मधुरा. >>> + १

Neat!! I think this could be shared with all rather than limiting it to Sanyukta...

धन्स Happy
नानबा मुळे दीप्तीशी ओळख झाली. तसंच तिने मुद्रित शोधनासाठीही बरीच मदत केली, म्हणून तिचे विशेष आभार.
thanks नानबा.

मधुरा, छान झालीये मुलाखत.
दिप्तींच्या धडाडीचं मनापासून कौतूक वाटलं. त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा! > ++१

मधुरा, अतिशय सुंदर... एका उमद्या, स्त्रीशी छान ओळख करून दिलीयेस. भाषांतर खरच ओघवतं आहे... जमलयच...
दिप्तींना खूप शुभेच्छा. माणूस घडवण्याच्या त्यांच्या कार्यात त्यांना यश मिळत राहूदे.

Pages