साक्षात्कार

Submitted by श्रीराम-दासी on 7 January, 2013 - 05:42

साक्षात्कार!

जगता जगता अगणित वेळा माणसाच्या आयुष्यात साक्षात्काराचे प्रसंग येतात. दैनंदिन जीवनात येण्यार्‍या सर्वसाधारण अनूभुतींना साक्षात्कारचे नाव दिले तर हा शब्द, त्याचा अर्थ, आणि त्या अर्थाचे गांभीर्य हे सगळंच अगदी बोथट होऊन जाईल. पण तरीही.. खरोखरच ज्याला ’साक्षात्कार’ म्हणता येईल असं आपल्या आयुष्यात कितीदा घडतं?

साक्षात्कार हा परमेश्वराशी निगडित असतो. संत ज्ञानेश्वरादी श्रेष्ठांना घडलेला परमेश्वरी साक्षात्कार एवढ्याचसाठी परमोच्च होता कि तो संपुर्ण जाणिवेनीशी, त्या त्या महात्म्यांच्या इच्छेच्या, साधनेच्या, उपासनेच्या फलरुपात त्यांना प्राप्त झाला. त्यात कुठलाही योगायोग नव्हता... अपघात नव्हता आणि उपकारही नव्हता! परमेश्वर हतबल होऊन स्वतः त्या महत्म्यांच्या साधनेपुढे नतमस्तक झाला... हे झाले साक्षात्काराचे परमोच्च स्वरूप!

पण... परमेश्वर तर सततच धडपडत असतो... कि माणसाने त्याला पुनःपुन्हा असे हतबल करावे! जगता जगता माणसाला घडणारे हे साक्षात्कार त्या परमेश्वराच्या अविरत धडपडीचेच साक्ष असतात! माणसाच्या आत... अंतर्मनात प्रकट होण्याची धडपड! पण त्यासाठी गरज असते ती माणसानेही आपले ह्रदय संपुर्ण रिकामे करून श्रीरामाला तेथे कायमची जागा करुन देण्याची! एवढे एकच पाउल माणसाला टाकायचे असते. पण हेही ज्यांना जमत नाही... आणि ज्यांना जमते... त्यांच्यातला फरक म्हणजे सामान्य माणसातला आणि संतांतला फरक!

अत्यंत सोपं वाटणारं हे एक पाउल संपुर्ण साक्षात्काराच्या दिशेनं टाकणं एवढं अवघड का होऊन बसावं?

कारण सरळ आहे... परमेश्वराची प्रतिष्ठापना करायची झाली तर प्रतिष्ठापनेची जागा पवित्र आणि शुचिर्भुत असावी लागते. घरातला देव्हारा गोमुत्राने धुवून, फ़ुलांनी आणि रांगोळीने सजवून शुचिर्भुत करता येतो. त्यामुळे तेथे देवाला प्रतिष्ठापित करणे फारच सोयिस्कर. वर रोजच्या रोज पुजा-अर्चा, आरत्या, तेलवात वगैरे केलं की देव खुष! आणखिन वर काही व्रतवैकल्ये करावीत... नवससायास करावेत... म्हणजे तर देव अगदिच प्रसन्न होईल. आणि मग एखाद्या गोष्टीतल्या जादुगारासारखा माणसाच्या मनातल्या सर्व ईच्छा तात्काळ पुर्ण करील!

पण त्याहीपेक्षा महत्वाचं... या सगळ्या गदारोळात माणसाच्या अंतर्मनातलं अपावित्र्य झाकलं जाईल... लपून राहील!

माणूस जितका या वरवरच्या दांभिक गोष्टींत जास्तीत जास्त रुतलेला असतो, तितकिच त्याच्या आतली ही बोचरी अपवित्रतेची जाणीव तीव्र आहे असे समजावे! माणसाला ठाऊक असतं की परमेश्वराची प्रतिष्ठापना व्हावी. किंवा किमान त्याचे आगमन तरी व्हावे एवढे आपले अंतर्मन शुचिर्भुत नाही! तिथे अनेक वासना आहेत... मत्सर आहे... लोभ आहे! आपल्या आतुन कळत-नकळत घडलेल्या पापांची गठडी आहे! निर्घुणता आहे, क्रुरता आहे! आणि हा सर्व पसारा आवरणं, निस्तरणं आणि या सगळ्या घाणीची विल्हेवाट लावणं माणसाला निव्वळ अशक्य वाटत राहतं.

अशा अवस्थेत मन शुचिर्भुत कसे करणार? आणि अशा घाणीनं भरलेल्या मनाचं दार परमेश्वर अनेकदा ठोठाऊन गेला तरी दार उघडून कुठल्या तोंडाने त्याचं स्वागत करणार? घरात अचानक एखादा महत्त्वाचा पाहूणा यावा आणि आपलं अस्ताव्यस्त पसरलेलं, घाण झालेलं घर त्याला दिसू नये त्याला घरात न घेता आपणच घराच्या बाहेर पडावं, किंवा त्या पाहूण्याची बाहेरच्या बाहेर भेट घेऊन त्याला तिथुनच कटवावं तसं माणूस वरवरच्या उपायांमध्ये रमलेला रहातो. हे म्हणजे आपल्या घरात जागा नाही म्हणून पाहूण्याला हॉटेलवर उतरवल्यासारखं आहे!

असं करु नकोस कधीच! श्रीरामाला जर कुठे तुझ्या आयुष्यात जागा हवीच असेल तर ती तुझ्या आत! तुझ्या अंतर्मनाची स्वच्छता कर. आचारांचंच नव्हे तर विचारांचंही सोवळं पाळ! श्रीरामाला जे मान्य नाही त्याला तुझ्या मनातही स्थान देऊ नकोस! हे अवघड आहे... पण आवश्यकही आहे!

पुढच्या वेळेस श्रीराम तुझ्या दाराशी येईल तेंव्हा दार सताड उघडून हसतमुखानं त्याला तुझ्या आत प्रवेश दे. त्यानंतर मग साक्षात्कारासाठी देव्हार्‍यासमोर बसून आराधना करण्याची गरज तुला कधीच भासणार नाही!

॥श्रीराम जय राम जय जय राम॥

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणूस जितका या वरवरच्या दांभिक गोष्टींत जास्तीत जास्त रुतलेला असतो, तितकिच त्याच्या आतली ही बोचरी अपवित्रतेची जाणीव तीव्र आहे असे समजावे!>> + १

मानसपूजा मनापासून केली तर मला वाटते दांभिकपणे केलेल्या कर्मकांडांपेक्षा जास्त पुण्य लाभेल Happy

छान.