हरवलेल्या पाऊलखुणा...

Submitted by मुग्धमानसी on 2 January, 2013 - 01:20

इथं... इथं एक झाड होतं...
हिरव्या पानांचं... लाल लाल फुलांचं...
--- जळून गेलं! मागचा वणवा जरा मोठाच होता!

आणि... आणि इथला झरा...?
झुळूझुळू बोलक्या पाण्याचा...
---आटलाय आता. उन्हं फारच कडक!

मी विचारत राहीले, आणि तू सांगत राहीलास...
आपणच एकत्र चाललेच्या रस्त्यावर, आपल्या पाऊलखुणा मी शोधत राहीले...
आणि तू न थकता देत राहिलास... त्यांच्या पुसलं जाण्याची निमित्त्य!

पण मी कुठं विचारलाय तुला कसला जाब?
मी कुठं म्हटलंय तुला कि माझ्यासोबत जरा थांब...
तुझे साथी वेगळेच.... ते राहिलेत आता लांब!
खरा तू तिथंच आहेस... त्यांच्यासोबत... त्यांच्यासाठी...
तुझी वाटच वेगळी... कशा पडाव्यात आपल्या गाठी?

माझ्या सोबत थांबलाय तो फक्त तुझा अंश आहे...
माझ्या इथं असण्याला... तुझ्या नसण्याचाच दंश आहे...
हा दंश मला मला कसलीशी नशा धुंद देतो आहे,
हि नशाच माझ्या या जगण्याला दिशा देते आहे...

मी पुन्हा विचारलं...
या ठिकाणी एक घर होतं... उंबर्‍याला ओठंगून वाट पाहणारं...
आणि तू म्हणालास... ते? ते आहे अजून तिथंच... फक्त त्यानं दार मिटलंय आता...

मीही आता विचार करतेय... माझी स्वप्नं मिटून घेण्याचा....!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा एक सुंदर अविष्कार!
लैच भारी ग

आणि तू न थकता देत राहिलास... त्यांच्या पुसलं जाण्याची निमित्त्य!
>>>मस्त!