ऑर्किड्सचा उत्सव.
घरी रोज सकाळी कानाशी किमान अर्धा तास गजर वाजल्याशिवाय झोपेतून न उठणारी मी, गेले ७-८ दिवस मात्र फ़ोनवरून गजर वाजायच्या आत जागी होत होते.
त्यादिवशीपण अशीच सहा वाजताच जाग आली. बाहेर चांगलं उजाडलं होतं. जाग आल्यावर पहिलं काम काय तर खिडकीतून बाहेरचं दृश्य पहायचं. मी पडदे सारले आणि सिंगापूरनं पहिला सुखद आश्चर्याचा धक्का दिला. सकाळी सहा-सव्वासहालासुध्दा रस्त्यांवरचे सिग्नल्स सुरु होते आणि मुख्य म्हणजे ज्या काही एक-दोन तुरळक गाड्या येत-जात होत्या त्या ते इमानदारीत पाळत होत्या - अगदी दुचाकीवालेसुध्दा लाल दिव्याचा मान राखत होते. सक्काळी-सक्काळी, रस्ता रिकामा असताना, वाहतूक पोलीस आसपास दिसत नसताना मनावर एवढा ताबा ठेवायचा म्हणजे खायचं काम नाहीये!!! अशी महान कामं सहजासहजी जमत नाहीत - त्यासाठी अंगी शिस्त बाळगावी लागते!! सिंगापूरच्या प्रगतीचं तेच तर पहिलं मुख्य कारण आहे - वैयक्तिक पातळीवरची शिस्त!! त्याबाबत असलेल्या कडक नियमांची झलक आम्हाला आदल्या दिवशी ऐकायला मिळालीच होती. त्यांची अंमलबजावणी पण तितक्याच तत्परतेने आणि ताबडतोब होत असणार त्याशिवाय तो दुचाकीवाला तसा तिथे लाल दिवा पाहून थांबला नसता.
पण, 'परदेशात गेल्यावर तिथल्या प्रत्येक गोष्टीची आपल्या देशाशी तुलना करावी का?' असाही प्रश्न पडतो. दुसऱ्या देशात गेल्यावर आपल्याला मूठभर त्याच गोष्टी दाखवल्या जातात ज्या पाहून आपण यजमान देशाचे कौतुक करू. आपल्याकडे चार दिवस मुंबई बघायला आलेल्या परदेशी पाहुण्याला आपण दक्षिण मुंबईतच फिरवून आणणार ना!! धारावीला नाही नेणार ......
हे सगळे विचार तिथे उभ्याउभ्या एक-दोन मिनिटांत माझ्या मनात झळकून गेले......
सगळं आवरून, नाश्ता वगैरे करून हॉटेलच्या बाहेर आलो. लॉबीतून रस्त्यावर येण्यासाठी ८-१० पायऱ्या उतराव्या लागायच्या. त्या पायऱ्यांच्या एका बाजूला सामानासाठी एक छोटासा सरकता पट्टा होता. गरज असेल त्याप्रमाणे त्याची दिशा वर किंवा खाली अशी बदलता यायची. त्या पट्ट्यावरून घसरगुंडीसारखं किमान एकदातरी वरखाली करण्याची आदित्यची फार इच्छा होती.
नऊ-साडेनऊला निघालो. मुख्य रस्त्याला लागल्यावर गाईडच्या बडबडीपेक्षा आपसूकच बाहेरच्या दृश्याने जास्त लक्ष वेधून घेतलं. दिवसा सिंगापूर फारच देखणं आहे. टोलेजंग, आकर्षक इमारती, स्वच्छ आणि रुंद रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं, कुठेही तुंबलेली वाहतूक नाही की भकाभक धूर ओकणाऱ्या गाड्या नाहीत. वाहतूक पोलीस कुठेही दिसला नाही आणि तरी सकाळच्या गर्दीची वेळ असूनही सगळं सुरळीत चाललेलं होतं. पायी चालणारा एकही माणूस दिसला नाही. एकंदरच तिथे माणसं कमी आणि झाडं जास्त दिसली दोन दिवसांत!! ते सुंदर रस्ते बघावेत की माना उंचावून त्या छानछान इमारती बघाव्यात ते कळेना.
त्यादिवशी आम्हाला 'बोटॅनिकल गार्डन' आणि तिथली ऑर्किड्स पहायला जायचं होतं. 'ऑर्किड्स' आपल्याला तशी फारशी परिचयाची नाहीत. मी तर नैसर्गिक ऑर्किड्सपेक्षा कृत्रिमच जास्त पाहिली होती. पण तिथे त्यादिवशी डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटलं. 'बोटॅनिकल गार्डन' अश्या साध्यासुध्या नावाच्या त्या बागेत फुलांचा एक नितांत सुंदर उत्सवच होता.
किती रंग आणि किती प्रकार .... काय पाहू, किती फ़ोटो काढू असं झालं होतं. तिथे 'सेलेब्रिटी ऑर्किड्स' असा एक विभाग होता. जेव्हा कुठलीही सुप्रसिध्द व्यक्ती सिंगापूरला आणि त्या बागेला भेट देते तेव्हा त्या-त्या व्यक्तीच्या हस्ते तिथे एक ऑर्किडचं रोप लावलं जातं, त्या व्यक्तीच्या नावाची पाटी तिथे रोवली जाते आणि त्या रोपाला त्याच नावाने पुढे ओळखलं जातं. जगातली अनेक सुपरिचित नावं तिथे निरनिराळ्या पाट्यांवर लिहिलेली दिसली. त्यांत एक 'इंदिरा गांधी ऑर्किड' अशीपण पाटी होती.
सुकलेल्या पाना-फुलांचा कुठेही कचरा नव्हता. पायवाटेवर एखाद्दुसरं वाळकं पान दिसलं रे दिसलं की कुठूनतरी झाडलोट करणारी एखादी बाई यायची आणि ते उचलायची.
त्या बागेत एक हरितगृह पण होतं जिथलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा थोडं कमी ठेवलेलं होतं. खास पर्जन्यवृक्षांच्या अनेक दुर्मिळ जाती तिथे लावलेल्या होत्या. तिथेच Venus Fly Trap आणि Pitcher Plant ही दोन झाडं पहायला मिळाली. ते पाहून आदित्य तर आनंदाने ओरडलाच. या कीटकभक्षक झाडांबद्दल नुकताच तो शाळेत शिकला होता ना!! त्याने मला मुद्दाम त्या दोन झाडांचे फ़ोटो काढायला लावले.
त्याला ते शाळेत नेऊन त्याच्या 'सायन्स टीचर'ला दाखवायचे होते. मला म्हणाला - "माझ्या वर्गात आता मी एकटाच आहे की ज्याने ही झाडं प्रत्यक्ष पाहिलीयेत." कुणाला कुठल्या गोष्टीत आणि कसा आनंद गवसेल काही सांगता येत नाही!!!
त्या हरितगृहातून बाहेर पडलो. मग गाईडनं आम्हाला सिंगापूरचं राष्ट्रीय फूल दाखवलं. मात्र आधीची सगळी फुलं पाहिल्यावर ते फूल अगदीच साधं वाटलं. त्याला राष्ट्रीय फुलाचा दर्जा का द्यावासा वाटला असेल काही कळलं नाही....
ऑर्किड गार्डन मधून निघायची वेळ झाली होती. एका तासात लगेच जायचं? तो आख्खा दिवस तिथेच घालवता आला असता तर किती बरं झालं असतं!!
तिथून आम्हाला अजून एक 'सिंगापूर स्पेश्यल' गोष्ट पहायला जायचं होतं ती म्हणजे Merlion - मासा आणि सिंह यांचं मिश्रण असलेलं एक शिल्प जे सिंगापूरच्या अनेक जाहिरातींत आपण पाहतो.
बोटॅनिकल गार्डनमधून बाहेर पडलो तेव्हा ढग दाटून आले होते आणि खूप उकडत होतं. पावसाची शक्यता वाटत होती. मनात म्हटलं - 'पावसापायी पुन्हा कोलंबोसारखी कुठली चुटपूट नको लागायला.' 'ऑर्चर्ड रोड' वरून आमची बस निघाली. हा म्हणजे सिंगापूरचा अगदी खास भाग. अनेक मोठ्यामोठ्या कंपन्यांची, बॅंकांची कार्यालयं तिथे आहेत. हल्ली अनेक हिंदी चित्रपटांतून सिंगापूरचं जे दर्शन घडतं ते याच भागातलं असतं. एका मोठ्या चौकाला फेरी मारून बस जात होती. त्या चौकात एक मोठं, वर्तुळाकार, दुमजली उंचीचं कारंजं संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सुरू होतं आणि त्याचं दृश्य खूपच सुंदर असतं असं कळलं..... आम्ही फक्त ७-८ तास लवकर पोचलो होतो तिथे ... !!! आदित्यला अचानक शोध लागला की 'क्रिश' चित्रपटात ह्रितिक रोशन 'क्रिश'च्या वेशात तिथूनच उंच आकाशात झेप घेतो. चला...म्हणजे ऑर्चर्ड रोडवर त्यालाही लक्षात ठेवण्यासारखं काहीतरी सापडलं!! नाहीतर त्या छानछान इमारती आणि रस्ते पाहण्यात त्याला बिलकुल रस नव्हता.
.... दरम्यान पावसाची एक सर पडून गेली होती. ऑर्चर्ड रोडवरून बस 'सीन' नदीच्या काठी आली. तिथे आम्ही उतरलो. Merlion चा कुठे मागमूसही नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तरी ते एक बऱ्यापैकी मोठ्या आकाराचं शिल्प होतं. बरं, इतकावेळ बसमधून लांबूनपण एकही झलक दिसली नव्हती.
नदीकाठी खाली जायला पायऱ्या होत्या...म्हणजे Merlion पहायला नदीकाठच्या सिंगापूरी घाटावर उतरायचं होतं तर!! पाऊस पडून गेल्यावर आपण आपल्या रस्त्यांवरून सहज चालूही शकत नाही. पण तिथे आम्हाला काहीही फरक पडला नाही. कुठेही पाणी साचलेलं नव्हतं, चिखलाचा तर प्रश्नच नव्हता. 'चिखल' हा शब्द तरी तिथे लोकांना माहीत असेल की नाही कोण जाणे! बागकामाच्या अभ्यासक्रमात शिकायला आलेल्या माळ्यांना आधी 'चिखल' म्हणजे काय तेच शिकवत असतील!!
खाली उतरून शंभरएक पावलं चालून गेलो, रस्ता उजवीकडे वळला आणि अचानक Merlion समोर उभा ठाकला.
सुमारे २५-३० फ़ूट उंचीचं ते पांढरं शिल्प म्हणजे 'सिंगापूरची शान' समजलं जातं. त्याच्या सिंहाच्या आकाराच्या तोंडातून सतत पाण्याचा एक मोठा फवारा बाहेर उडत असतो. पाण्याचा सतत संपर्क असूनही कसलीही घाण नाही की शेवाळं नाही ... एकदम स्वच्छ!! उंच, आधुनिक इमारतींच्या पार्श्वभूमीवर छान वाटत होता पहायला. थोड्या वेळाने जाणवलं की माझ्या डोळ्यांसमोर हा Merlion नव्हता, थोडा मोठा होता .... मग तो कुठला?? गाईडला विचारलं तर ती म्हणाली की सिंगापूरला तसे दोन आहेत पण पाणी उडवणारा हाच. त्याक्षणी तरी तो आकार पाहून माझा थोडा विरसच झाला.
समोर 'सीन' नदीचं रुंद पात्र होतं. लोकांना उभं राहून निरीक्षण करायला लोखंडी कठडा होता. पलिकडच्या काठावरपण गगनचुंबी इमारती दिसत होत्या. त्यातल्या एका इमारतीकडे बोट दाखवून आदित्यनं मला सांगितलं की मगाचच्या त्या कारंज्यापासून उडलेला क्रिश त्या इमारतीवर उतरतो. चला, म्हणजे हे ही बरं झालं ... त्याचा मगाशी अर्धवट राहिलेला शोधही पूर्ण झाला.
तिथे २-३ फ़ोटो-बिटो काढले आणि निघालो. आदित्य भूकभूक करायला लागला होता ... पायऱ्या चढून पुन्हा रस्त्यावर येण्यापूर्वी वाटेत खाण्यापिण्याची दुकानं होती, ती त्याने जातानाच हेरून ठेवली होती!! पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. रस्त्यात फार वेळ बस उभी करायला परवानगी नव्हती. त्यामुळे गाईडने चलायची घाई केली.
तिथून मग जायचं होतं 'चायना टाऊन' आणि 'लिट्ल इंडिया' पहायला ... व्यापारासाठी म्हणून १९व्या शतकात तिथे येऊन राहिलेल्या अनुक्रमे चिनी आणि भारतीय लोकांच्या 'सिंगापूरचा जुना गावभाग' वाटतील अश्या त्या वसाहती होत्या. तिथे पोचेपर्यंत पुन्हा पावसाची एक सर येऊन गेली. 'लिट्ल इंडिया'त एक देऊळ पहायचं होतं. बाह्य रूपावरून ते देऊळ दक्षिण भारतीय धाटणीचं वाटलं. आदित्यला फारच भूक लागली होती त्यामुळे मी आणि अजय देवळात जाण्याऐवजी त्याच्यासाठी काही खायला मिळतंय का ते पाहायला लागलो. दरम्यान आदित्यला एक cold drinks चं दुकान दिसलं होतं. मग त्याने आपला 'काहीतरी खाण्या'ऐवजी 'काहीतरी पिण्या'चा मनसुबा जाहीर केला. एखाद्या टोपलीत उरलेसुरले कांदे-बटाटे ठेवावेत तसे त्या दुकानात cold coffee चे कॅन्स ठेवले होते विकायला. किंमत अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती - १.२५ सिं. डॉलर्स फक्त. त्यामुळे मला शंका आली. म्हणून मी तिथल्या विक्रेतीला "माल ताजा आहे ना?" असं विचारलं, तर तिला त्या प्रश्नाचा रागच आला. कदाचित ’जुना माल विकणे’ हा सुध्दा एक गुन्हाच असेल तिथे, कुणी विकताना सापडला तर काही शे किंवा काही हजार दंड असेल, पण ते मला कसं कळणार ना!! मी माझं शंकानिरसन नको का करून घ्यायला?? जरा घुश्श्यातच तिने सुटे पैसे (की डॉलर्स) परत केले. त्या सगळ्या अनोळखी नाण्यांच्या किमती शोधून हिशोब बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेईपर्यंत आदित्यची cold coffee पिऊन झाली सुध्दा!! त्या आघाडीवर आता थोडा वेळ शांतता राहणार होती.
बसच्या दिशेने चालायला सुरूवात केली. डावीकडून एक गल्लीवजा रस्ता मुख्य रस्त्याला येऊन मिळत होता. तो ओलांडण्यासाठी मी डावीकडे पाहिलं तर त्या दिशेने एक चकाचक कार येत होती. म्हणून मी थांबले. तर गंमत म्हणजे मला चालत रस्ता पार करायचा आहे म्हटल्यावर त्या कारवाल्यानं वेग कमी केला आणि मी निघून जाण्याची वाट पाहत चक्क तोच थांबला. दिवसात दुसऱ्यांदा मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या थांबण्याचं कारण मला जरा वेळाने कळलं. मनातल्या मनात त्याच्या सौजन्याचं कौतुक करत मग मी पुढे चालायला लागले.
दुपारचा एक-दीड वाजत आला होता. आदल्या दिवशीच्याच रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. जेवणानंतर तासाभरात निघायचं होतं - सेन्टोसा आयलंडला भेट द्यायला.
पुन्हा तसेच बसनं छानछान रस्ते, झाडं बघत आम्ही 'माउंट फ़ेबर'च्या रस्त्याला लागलो. 'माउंट फ़ेबर' - सिंगापूर बेटावरची एकमेव टेकडी ... त्यामुळे त्याचं त्यांना केवढं अप्रूप!! एक छोटासा घाट चढून बस त्या टेकडीच्या माथ्यावर पोचली. तिथून 'केबल कार'ने सेन्टोसा आयलंडला जायचं होतं. त्याआधी आम्ही एकदाच केबलकारमध्ये बसलो होतो - रायगडावर जाताना. ही त्यापेक्षा थोडी वेगळी होती - म्हणजे तिथे मोठा डोंगर चढून गेलो होतो, इथे एक लांब-रुंद खाडी पार करून जायचं होतं. 'रविवार असल्यामुळे गर्दी असेल' अशी गाईडने पूर्वसूचना दिलेली होती. त्यामुळे रांगेत उभं राहण्याची तयारी करून गेलो तर तिथे अवघी २०-३० माणसं दिसली!! ही कसली गर्दी? हा तर शुकशुकाट झाला!! 'गर्दी' म्हणजे कशी किमान शे-सव्वाशे माणसं तरी पाहिजेत!! अक्षरशः ५-१० मि. रांगेत उभं रहावं लागलं ...
केबल कार मध्ये बसून 'माउंट फ़ेबर' स्टेशनमधून बाहेर पडलो आणि खाली सिंगापूर बंदराचं झकास दृश्य दिसलं. आमच्या बरोब्बर खाली मोठीच्यामोठी Star Cruise उभी होती. पर्यटनासंबंधीच्या अनेक लेखांत त्याच्याबद्दल वाचलं होतं. तिथल्या डेकवर उभी असलेली माणसं छोट्याछोट्या ठिपक्यांएवढी दिसत होती. वाटेत एक स्टेशन लागलं. काहीजण उतरले, काही चढले. आम्हाला पुढे जायचं होतं.....थोड्या वेळाने डाव्या हाताला अचानक त्या दुसऱ्या मोठ्ठ्या Merlion ची झलक दिसली. सकाळपासून माझ्या नजरेसमोरून जी आकृती हालत नव्हती ती हीच!! पुन्हा ५-१० मि. हवेत लटकत पुढे सरकल्यावर आमचं स्टेशन आलं.
सेंटोसा हे सिंगापूरचंच भावंड - तसंच स्वच्छ, तसंच हिरवंगाऽऽर !! प्रथम जायचं होतं Wax Museum पहायला. त्याच्या प्रवेशद्वारापाशीच एक पुरातन कार्यालयीन खोलीचा देखावा उभा केलेला होता. फार पूर्वी ब्रिटीश, भारतीय, चिनी आणि मलाय - अश्या चार वंशाचे दर्यावर्दी व्यापारी सर्वप्रथम सिंगापूरच्या बेटावर पोचले. सिंगापूरच्या जडणघडणीत या चारही वंशांचा महत्वाचा वाटा आहे. तर त्या काळी त्यांच्या वापरात असलेल्या टेबल-खुर्च्या, लेखन साहित्य अश्या सगळ्या वस्तूंचं ते एक छोटेखानी प्रदर्शनच होतं. तिथून आत गेल्यावर सर्वात आधी एक पाच मिनिटांचा त्याच काळाचं वर्णन करणारा माहितीपट दाखवला गेला. तिथून पुढे गेल्यावर मेणांच्या पुतळ्यांच्या वापर करून तेव्हाच्या लोकजीवनातले निरनिराळे देखावे उभे केलेले होते. तेव्हाच्या गोदी कामगारांचं जीवन, न्यायनिवाड्याच्या पध्दती, वेगवेगळे सणवार - हे सगळं तिथे पहायला मिळालं.
तिथून बाहेर आल्यावर 'मरीन वर्ल्ड' पहायला गेलो. कल्पना करा की खोल समुद्रातल्या एखाद्या काचेच्या पारदर्शक बोगद्यातून आपण चाललोय, भोवती लहान-मोठे असंख्य मासे फिरताहेत ... तर कसं वाटेल तसा तो एक अफलातून अनुभव होता!! एक ८६ मी. लांबीचा ऍक्रिलिकचा बोगदा होता. त्या बंदिस्त बोगद्यातून आपण चालत जायचं. बाहेर आपल्याभोवती संपूर्ण पाणी असतं आणि त्यात सगळे जलचर विहरत असतात. समुद्र, त्यातल्या वनस्पती, खडकाळ तळ याची इतकी हुबेहूब प्रतिकृती बनवलेली होती की मी बराच वेळ 'आपण खऱ्या समुद्रातच उतरलो आहोत' असंच समजत होते. तो माझा गैरसमज आदित्यनं दूर केला!!! बोगद्यातल्या रस्त्यावर अर्ध्या भागात सरकता पट्टा होता...चालायचा कंटाळा आला की त्याच्यावर जाऊन उभं रहायचं. The Crocodile Hunter - स्टीव्ह आयर्विनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला 'स्टिंग रे' तिथे पाहिला. आमच्या डोक्यावरून तो जाताना लक्षात आलं की त्याच्या पंखांचा घेर एका मोठ्या छत्रीएवढा होता.
सरकता पट्टा आणि निरनिराळे मासे - या दोन आकर्षणांमुळे आदित्य त्या बोगद्यातून दोनदा फिरून आला. बोगद्यातली फेरी संपल्यावर बाहेर पडायच्या मार्गावर भिंतींवर अनेक छोटी-छोटी aquariums लावलेली होती. म्हणजे त्यांची एक बाजू फक्त भिंतींवर दिसत होती. त्यामुळे त्या जणू हलणाऱ्या तसबीरीच वाटत होत्या!! हाताच्या मुठीत मावतील असे Jelly Fish आणि अंगठ्याच्या आकाराचे Sea Horse त्यात तरंगत होते ..... बघण्यासारखं इतकं होतं पण शेवटी पाय दुखायला लागले म्हणून आवरतं घ्यावं लागलं.
मरीन वर्ल्ड मधून बाहेर पडल्यावर समोर एक छोटी बाग होती. तिथून तो दुसरा Merlion व्यवस्थित दिसत होता. ती बागपण अनेक हिंदी चित्रपटांत दिसते. तिथे एका ठिकाणी जमिनीवर अमेरिकेतल्या महत्वाच्या शहरांच्या दिशा आणि त्या जागेपासूनचे त्यांचे अंतर अशी माहिती रंगवून ठेवलेली होती. कॅलिफ़ोर्निया तिथून साधारण चौदा हजार कि.मी.वर होते. मला ते अंतरांचे आकडे वाचून लगेच विमान, इकॉनॉमी क्लास ह्या सगळ्या गोष्टीच आठवायला लागल्या आणि तिथून मी काढता पाय घेतला .....
सहा वाजत आले होते. सिंगापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची एक झलक आता पहायला मिळणार होती. आता आम्हाला जायचं होतं 'म्युझिकल फ़ाऊंटन शो' पहायला. चक्क एका 'बस स्टॉप' वर जाऊन उभे राहिलो. 'रविवार आहे, गर्दी आहे, बसमध्ये पटकन चढावं लागतं, बस जास्त वेळ थांबत नाही' या गाईडच्या सूचना आम्ही ऐकून सरळ सोडून दिल्या !! 'गर्दी आणि सार्वजनिक वाहतूक' या विषयाच्या परिक्षेत आम्ही सगळे तिच्यापेक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो असतो. आपल्या एखाद्या 'आराम बस'च्या तोंडात मारेल अशी ती तिथली सार्वजनिक वाहतूक करणारी बस आली. एकदम रुंद आणि मस्त ऐसपैस !! फक्त बसायला बाकं अगदी कमी आणि उभं रहायला मात्र भरपूर जागा ... हादरे, गचके बसायचा तर प्रश्नच नव्हता, रस्ते लोण्याहूनही मऊ होते .... पोटातलं पाणीपण हललं नाही. १०-१५ मि.त आमचा 'इश्टाप' आला.
'म्युझिकल फ़ाऊंटन शो' सुरू व्हायला अजून बराच वेळ होता पण योग्य जागा पकडण्यासाठी आम्ही तिथे जवळजवळ तास-दीड तास लवकर गेलो होतो. तेवढा वेळ मात्र जरा कंटाळवाणा गेला. दिवसभर दमणूक झाली होती, जरा चहा-कॉफ़ी प्यावी म्हटलं तर कुठे मिळाली नव्हती, थोडी भूकपण लागली होती. काहीतरी बडबड करून, गप्पा मारून मी आदित्यचा किल्ला लढवला तासभर. पूर्ण अंधार पडून 'शो' सुरू झाल्यावर मात्र त्याचा कंटाळा गेला. सगळेच पाऊण-एक तास हरवून गेले होते.
आठाच्या सुमाराला 'शो' संपला. दुपारी 'माऊंट फ़ेबर'पाशी सोडलेली बस बाहेर आमची वाट पाहत उभी होती. येताना केबलकारनं आलो तरी सिंगापूरला परतताना बसनं जायचं होतं. जाताना सीन नदी, तिच्यावरचा तो सकाळचा घाट सगळं पुन्हा दिसलं. हॉटेलपाशी उतरून आधी थेट जेवायला गेलो.
हॉटेलच्या रूमवर परतल्यावर मी नेहेमीच्या सवयीनं झोपण्यापूर्वी खिडकीत जाऊन उभी राहिले. रेस्तरॉंसमोरच्या रस्त्यावर दिवाळीनिमित्त केलेली रोषणाई तिथून छान चमचम करताना दिसत होती. सिग्नल्स तसेच चालू होते. मध्यरात्री २-३ वाजता सुध्दा ते पाळले जाताहेत का ते पहायची माझी फार इच्छा होती. पण झोपणं आवश्यक होतं. आडवं पडल्यावर बंद डोळ्यांसमोरून संध्याकाळचा तो मोठ्ठाच्या मोठ्ठा 'स्टिंग रे' पोहत गेला .....
ललित -
ललित - प्रिति,
कोणत्या वारी तुम्ही होता सिंगापोरात? न्यु पार्क हॉटेलचा परिसर जर रविवारी संध्याकाळी बघितलात तर गर्दी काय असते ते कळले असते..... जवळपास १०,००० + ( होय... दहा हजार आणि जास्त) जण रस्त्यांवर्ती दिसले असते...
सिंगापोरचि जी छबि लोकांच्या मनात आहे, ती संपुर्ण चुकिची नसली तरी बरीच खोटी आहे......
>> सिग्नल्स पाळले जातात ......
संध्याकाळि कधि बिच रोड - बेन कूलन - रॉचर रोड ह्या भागात फिरा.... सिग्नल्स कसे पाळु नयेत ह्याच प्रात्यशिक मिळेल. हे भाग सेंट्रल बिजनेस डिसट्रिक्ट आहेत जिथे मोठ्याल्या कंम्पनिंची कार्यालये आहेत..
(आणि हो... सिंगापोरात सिग्नल्स २४ तास चालु असतात आणि ते बरेचदा पाळले हि जातात.)
>> स्वछता.....
लिटिल इंडिया परिसर बघा... टिपिकल आहे.... रस्तोरस्ती गुटखा/पानाच्या पिचकार्या इथे हि दिसतील... आणि हो.... त्यासाठि कोणालाहि दंड होत नाहि...
"जे वॉकिंग" (रस्त्यांमधुन चालणे) लिटिल इंडिया/चायना टावुन ह्या भागांसाठी लागु होत नाही...(बरेचदा इतर भागांसाठिही लागु होत नाहित.)
सार्वजनिक ठिकाणि बसुन तुम्ही मद्यपान करु शकता... कोणिही काहिहि आडकाठि करणार नाही....
>>>>आपल्याकडे चार दिवस मुंबई बघायला आलेल्या परदेशी पाहुण्याला आपण दक्षिण मुंबईतच फिरवून आणणार ना!! धारावीला नाही नेणार ......
एकदम बरोबर....
बाकी लेखनशैली खरच खुप छान आहे.... थायलंड-सिंगापोरचे बरेच बारकावे टिपलेत......
किंग औफ
किंग औफ नेट,
तुमचे अनुभव हे तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतरचे / अनेकदा तिथे जाऊन आल्यानंतरचे आहेत. मी लिहिलंय ते ४-२ दिवस गेलेल्या पर्यटकाच्या दृष्टिकोनातून. तुमच्या प्रतिक्रिया वाचून माझ्या लेखातलं एक वाक्य मात्र सिद्ध होतं की
'दुसऱ्या देशात गेल्यावर आपल्याला मूठभर त्याच गोष्टी दाखवल्या जातात ज्या पाहून आपण यजमान देशाचे कौतुक करू'
तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. अश्या उलटसुलट प्रतिक्रिया आल्याच पाहिजेत. त्यातच माझ्या खरडण्याचं सार्थक आहे.
वा! लेखन शैली अतिशय सुंदर,
वा! लेखन शैली अतिशय सुंदर, ओघवती !!