कारण असावं लागतं...

Submitted by मुग्धमानसी on 28 December, 2012 - 05:02

प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...

माझं रडणं, माझं हसणं,
कधी खुप बोलणं तर कधी गप्प बसणं.
फुलासारखं कधी गदगदून बहरणं,
कधी गुदमरुन आतल्याआत झुरणं...
कुणालाच सांगायचं नसलं तरी स्वतःला ते सांगावं लागतं...
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...

एक फळ जेंव्हा झाडापासून तुटतं,
झाडावरुन नेमकं ते खालिच का पडतं?
चंद्र जेंव्हा पौर्णिमेला ऐन रंगात येतो,
समुद्र अंगात आल्यासारखा बेभान का होतो?
कमळाचं फुल नेहमी चिखलातच का फुलतं?
किरणांच्या हिंदोळ्यांवर सुर्यफुल का झुलतं?
सगळ्या प्रश्नांचं आपल्यापुरतं उत्तर आपण शोधावं लागतं,
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...

नितळ काळ्या कातळातून पिंपळपान फुटतं,
त्याला स्मरावं तेंव्हा... जेंव्हा आपलं मन तुटतं!
डोळ्यांमध्ये पापण्यांआड ढग जेंव्हा दाटून येतात...
गळाभरून पावसाचे थेंब जेंव्हा भरून येतात...
खोलुन टाकावं पापण्यांचं महाद्वार... अन् होऊ द्यावी बरसात...
मनसोक्त... काळीज हलेपर्यंत!
मनातल्या भेगांमध्ये पाणी झरेपर्यंत!
जगातल्या सगळ्याच पोकळ्यांना कधितरी भरावं लागतं...
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...

या वळणावर वळण्यालाही काहितरी कारण असेल...
वळणावर कोसळण्यालाही काहितरी कारण असेल...
काही साथी सुटण्यालाही काहितरी कारण असेल
मी ही अशी असण्यामागे काहितरी कारण असेल...
कुठे काही नसलं तरी मनाला असं समजवावं लागतं...
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users