झिम्मा - आठवणींचा गोफ

Submitted by Adm on 26 December, 2012 - 13:45

मागे झी-मराठीच्या किंवा कुठल्यातरी अवॉर्ड सेरेमनीमधल्या प्रमुख पाहुण्यांनी बोट भरकटून एका निर्जन बेटावर अडकेल्या दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. हे मित्र त्या बेटावर अडकून पडतात आणि कोणीतरी आपल्याला शोधायला येईलच या आशेवर निवांत असतात. निर्जन बेटावर भरपूर लाकडं आहेत आणि बोटीत अवजारंही आहेत म्हणून एकजण वेळेचा सदुपयोग करून लाकडाच्या खुर्च्या बनवतो. दुसरा बेटावरचं रम्य वातावरण बघत हरखून जातो आणि बेटाच्या दुसर्‍या बाजुला जाऊन एक भलमोठं आणि सुंदर शिल्प बनवतो. काही वेळाने ह्या दोघांचा शोध घेत गावकरी खरच बेटावर पोचतात. पहिल्याने केलेल्या खुर्च्या पाहून खुष होतात आणि सगळ्या खुर्च्या लगोलग विकत घेऊन टाकतात. नंतर बेटाच्या दुसर्‍या बाजुला जातात आणि तिथे असलेलं शिल्प पाहून निश:ब्द होतात. पुढे अनेक जण ते शिल्प पहायला येऊ लागतात आणि त्या बेटाला शिल्पकाराचं म्हणजे दुसर्‍या मित्राचं नाव दिलं जातं. गोष्टीचं तात्पर्य काय तर अगदी गरज असेल तेव्हाच आणि तेव्हड्याच खुर्च्या बनवाव्या पण त्यात अडकून न पडता निरंतर टिकणारं शिल्प बनवायचा ध्यास घ्यावा. ही गोष्ट अगदी लक्षात राहिली आणि ती सांगणार्‍या प्रमुख पाहुण्या विजया मेहताही! त्या आधी विजया मेहतांचं नाव फक्त आज्जीच्या तोंडून 'बॅरिस्टर नाटकात मावशीचं काम करायची..' एव्हड्या एकाच संदर्भात ऐकलं होतं. ते वगळता त्यांच्याबद्दल ना काही ऐकलं होतं ना कुठल्या नाटक/सिनेमात त्यांना पाहिलं होता. पुढे 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात रंगभुमीवर दीर्घकाळ काम करणार्‍या काही अभिनेत्री, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी, उषा नाडकर्णी, ह्यांनी विजया बाईंचं नाव आदराने घेऊन, त्या गुरुस्थानी असल्याचं सांगितलं. थोड्याच दिवसात विजया बाईंच आत्मचरित्र 'झिम्मा' प्रकाशित होणार अशी बातमी आली आणि पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या ते घेऊन वाचायचं हे ठरवून टाकलं.

'झिम्मा - आठवणींचा गोफ' अश्या शीर्षकाच्या पुस्तकाची सुरुवात करताना बाई आधी वाचकांना शुभेच्छा देतात!!! तर शेवटी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नटसंच, प्रेक्षक आणि त्या स्वतः अश्या सर्वांनी मिळून खेळलेल्या नाटकरूपी झिम्म्याचा खेळ वाचकांच्या मनात गुंजत राहो अशी आशा व्यक्त करतात. बाईंची कारकिर्द सुमारे पन्नास वर्षांची. त्यामुळे कामाचा आवाकाही मोठा. त्यात शिक्षण, प्रायोगिक रंगभुमी, प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रकल्प, लोकमान्य रंगभुमी, माध्यमांतरे आणि संस्थांची संचालकपदे अश्या बर्‍याच गोष्टी. शिवाय महत्त्वाच्या वैयक्तिक घटना. ह्या सगळ्यांचा लेखाजोखा मांडणं म्हणजे मोठच काम. पण नुसत दस्तैवजीकरण न करता गप्पांच्या बाजात सांगितलेल्या घटना उत्सुकता कायम ठेवतात. हे आत्मचरित्र बेबी, विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहता चार टप्प्यांमध्ये लिहिलं आहे. ह्यातलं 'विजया मेहता' हे त्यांचं आजचं रुप. आणि म्हणून बाकीच्या तिघींबद्दल तृतीय पुरुषी एकवचनात लिहिलं आहे. स्वतःच्या गतरुपांकडे असं त्रयस्थ नजरेने पहाणं मला फार आवडलं.

विजया बाईंच्या बालपणीच्या म्हणजे बेबीच्या गोष्टी सुरस आहेत. जयवंत परिवाराच्या मोठ्या कुटुंबकबिल्याची आणि बाईंवर प्रभाव पाडून गेलेल्या व्यक्तींची वर्णनं येतात. भिवंडीचं घर, मुंबईचं घर, तिथलं वातावरण ह्यांची सुरेख वर्णनं आपल्या डोळ्यासमोर त्या जागा उभ्या करतात. पुढे पुढे नाटकांच्या नेपथ्यांबद्दलचीही अशी वर्णनं वाचून न कळत आपण तो रंगमंच डोळ्यासमोर बघायला लागतो आणि बाईंनी वर्णन केलेले प्रवेश रंगमंचावर कसे घडत असतील ह्याची कल्पना करायला लागतो.

विजू जयवंत आणि विजया खोटे ह्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्येत्तर काळ. बाई म्हणतात संपूर्ण भारतात ह्या काळात सांस्कृतिक 'चळवळी' सुरु होत्या, जवळ जवळ सर्व कलाप्रकारांमध्ये चांगल्या गोष्टी घडत होत्या, नवनवे कलाकार उदयाला येत होते आणि त्यांची पिढी अश्या वातारणात वाढली ही त्यांच्याकरता अतिशय भाग्याची गोष्ट होती. ह्या सगळ्याचच छोटखानी रूप म्हणजे भुलाबाई इंस्टिट्युट. शिक्षण सुरु असताना अगदी न कळतच बाई नाटकात येऊन पडल्या, पुढे इथल्याच झाल्या आणि त्यांना घडवण्यात ह्या इमारतीचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे चित्रपट माध्यमात काम करायला लागल्यावर 'वास्तू बोलतात, आपल्याला मार्गदर्शन करतात.' असं बाईंचं ठाम मत पडलं त्याची सुरुवातही कदाचित भुलाबाई इंस्टिट्युट पासुन झाली असावी.

विजया खोटे आणि मित्रमंडळींनी मिळून सुरु केलेल्या 'रंगायन'चा प्रवास पुढील भागात उलगडतो. सुरुवातीच्या काळात पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या अतिशय भिन्नकुळी नाटककारांच्या एकांकिका 'रंगायन'ने केल्या. बाईंमधल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेची तसेच प्रशासकाची जडणघडण ह्या भागांमध्ये पहायला मिळते. दिग्दर्शनाची विशिष्ठ पध्दत, नेपथ्याबाबतचा काटेकोरपणा, तालमींमधली शिस्त, भुमिकेमधली 'बॉडी इमेज' शोधण्याचे प्रयत्न, नाट्यसंहितेवर प्रयोग पूर्ण बसेपर्यंत केलेले काम ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्प्या पध्दतीने उलगडून सांगितलेल्या आहेत. वयाने आणि अनुभवाने तुलनेने तरूण दिग्दर्शिकेने पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसाख्या दिग्गजांना प्रसंगी संहितेत बदल करायला लावलेले पाहून बाईंच्या ठाम विचारांचे आणि धैर्याचे कौतूक वाटते.

भारत आणि पूर्व जर्मनी दरम्यान असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण करारा अंतर्गत केल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये बाईंनी अनेक संस्कृत, मराठी, जर्मन नाटके भारतात तसेच जर्मनीत केली. त्यानिमित्ताने त्यांनी अनेक मित्र जोडले. नंतर नंतर तर त्यांना पूर्व जर्मनीतली गावे आपले माहेरच वाटू लागली. ह्या सगळ्या प्रकल्पांदरम्यानचे अनुभवही अतिशय वाचनीय आहेत. शांकुतल, मुद्राराक्षस, हयवदन अशी अस्सल भारतीय नाटकं जर्मन कलाकार कसे सादर करत असतील ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नवर्‍याबरोबर इंग्लंडला असताना बाईंनी नाट्यप्रशिक्षण घेतले. तिथले अनुभव, तिथे पाहिलेल्या नाटकांची अतिशय सुरेख वर्णनं पुस्तकात दिली आहेत.

रंगायन बंद पडल्यानंतर बाईंनी व्यवसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं परंतु ह्या रंगभूमीला 'व्यवसायिक' न म्हणता 'लोकमान्य' रंगभुमी म्हणायचं ठरवलं. ह्या लोकमान्य रंगभूमीवर बाईंनी 'मला उत्तर हवं', 'अखेरचा सवाल', 'जास्वंदी', 'महासागर', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'संध्याछाया', 'हमिदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'पुरूष', 'वाडा चिरेबंदी' अशी अनेक अजोड नाटकं दिली. इतके वेगवेगळे विषय! ह्या नाटकांबद्दल, त्यांच्या संहितेबद्दल, नटसंचाबद्दल, नाटक बसवताना दिग्दर्शनाच्या दृष्टीने केलेल्या विचारांबद्दल, नेपथ्याबद्दल, नाटकांच्या शेवटाबद्दल. प्रयोगांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल, तालमींदरम्यान लागलेल्या ठेचांबद्दल बाईंनी अगदी विस्ताराने लिहिलेलं आहे. पुस्तकामधला लोकमान्य रंगभूमीबद्दलचा हा भाग मला सर्वात जास्त आवडला. काही काही नाटकांबद्दल वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो.

पुढे दूरर्शनकरता काही कार्यक्रमांवर तसचं काही चित्रपटांवर बाईंनी काम केलं. त्यांच्याच काही नाटकांचं रुपांतर चित्रपटांमध्ये केलं. हे वेगळं माध्यम हाताळताना स्वतःच्याच कलाकृतींमध्ये कसे बदल केले, कुठला भाग माध्यम बदलामुळे जास्त खुलला, कुठला भाग नीट झाला नाही ह्यांबद्दलची माहिती पण छान आहे. ह्या माध्यमांमध्ये तुलना जरूर केली आहे पण आमचं जुनं तेच सोनं असा सुर कुठेही जाणवला नाही.
पुस्तकातला सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे बाईंची एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची कारकीर्द. ह्याबद्दल मात्र खूपच कमी लिहिलय. तो भाग अगदीच गुंडाळल्यासारखा वाटतो. तब्बल बारा वर्षांच्या कारकिर्दीत सांगण्याजोगं एव्हडच घडलं का? असा प्रश्न पडतो. एव्हड्या मोठ्या कारकिर्दीत बाईंना अनेक जण भेटले. भेटलेल्या मंडळीबरोबर आलेले चांगले अनुभव लिहिलेले आहेतच पण खटकलेल्या गोष्टी उदा. तेंडूलकरांबरोबर तुटलेली युती, भक्ती बर्वेंचा खटकलेला अभिनय, नेपथ्यकार गोडश्यांबरोबर झालेले मतभेद, वैयक्तिक आयुष्यातले काही प्रसंग इ. कुठलीही सनसनाटी निर्माण न करता पुस्तकात नमुद केलेल्या आहेत. स्वतःच्या चुकाही कबूल करण्यात बाईंना काहीही कमीपणा वाटलेला नाही, एव्हडच काय स्वतःच्या फसलेल्या/पडलेल्या नाटकांचा आढावा एका वेगळ्या प्रकरणात घेतलेला आहे. मी आधी वाचलेल्या चरित्र/आत्मचरित्रांच्या तुलनेत वैयक्तिक आयुष्याबद्दल जरा कमी लिहिलय का काय असं वाटलं पण कला/व्यवसाय ह्यांच्याबद्दल सांगण्यासारखं इतकं असताना, वैयक्तिक आयुष्याबद्दल कोण कशाला सांगेल असंही वाटलं.

पुस्तक वाचल्यावर काही प्रश्नही पडले. पुस्तकात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण घेवाणीचे करार, राष्ट्रीय पातळीवरचे कलाविषयक उपक्रम, राज्यसभेतल्या खासदारांनी नाट्यसंस्थेला अनुदान मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न वगैरे बाबींचे उल्लेख येतात. हल्ली अश्या काही गोष्टी होत नाहीत का? तसच विजयाबाईंनी सांगितलेल्या नाटकांच्या गोष्टींमध्ये इतकं वैविध्य आहे! अश्या प्रकारची नाटकं लोकमान्य रंगभुमीवर हल्ली तयारच होत नाहीत का?

सध्या काही कलाकार मंडळी जुनी नाटकं नव्या संचात परत रंगभुमीवर आणण्याचे उपक्रम करत आहेत. बाईंची तसेच इतरही गाजलेली नाटकं मिळतील तितकी पाहून घ्यायची असं हे पुस्तक वाचल्यावर ठरवलं आहे. त्यावेळच्या प्रयोगांमधून प्रेक्षकांना मिळायची ती अनुभूती नाहीसुद्धा मिळणार कदाचीत, पण मिळतं आहे तितकं तरी बघुन घ्यायचं ठरवलय!
------------------------------------------------------------------------------------------------------------------
'झिम्मा' नुकतच वाचून संपवलं. बाईंच्या कामाचा आवाका इतका मोठा आहे की त्याबद्दलच्या पुस्तकाचं परिक्षण/ परिचय/रसग्रहण माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पुस्तक वाचून संपल्यावर जे मनात आलं ते लिहिलय. मायबोलीवरचे अनेक जण सध्या 'झिम्मा' वाचत आहे. त्यांनाही पुस्तक वाचल्यावर काय वाटलं हे वाचायला नक्की आवडेल.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

हे पुस्तक मायबोली खरेदीवर उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/Zimma.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या परिच्छेदात मांडलेली भूमिका पूर्ण लेखात जाणवते आहे. लेख आवडला.
तरीही <त्या आधी विजया मेहेतांचं नाव फक्त आज्जीच्या तोंडून 'बॅरिस्टर नाटकात मावशीचं काम करायची..' एव्हड्या एकाच संदर्भात ऐकलं होतं. ते वगळता त्यांच्याबद्दल ना काही ऐकलं होतं ना कुठल्या नाटक/सिनेमात त्यांना पाहिलं होता>strange
कृपया विजया मेता कराल का?

अरे वा! मी आत्ता पाहिलं हे...
छान लिहिलंयस. Happy
विजयाबाईंबद्दल विशेष काहीच माहिती नसलेल्या वाचकाला 'झिम्मा' वाचून काय वाटतं - याचं उदाहरण म्हणून हा लेख पाहता येईल.

मलाही या पुस्तकाबद्दल लिहायचं आहे. पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर इथे प्रतिसादातच लिहिलं तर चालेल का?

पराग,
खूपच सुरेख रसग्रहण केले आहेस ..मी झिम्मा वाचले.झिम्मा चे प्रकाशन झाले त्यानंतर लगेच च मी हे पुस्तक घेतले आहे.खरे तर हे पुस्तक कोणतेही पान मधुनच उघडुन वाचावे.आपोआप लिंक लागते असे आहे..विजया बाईंच्या आयुष्याचा नाटकमय पडदा इतका प्रचंड व्यासाचा आहे कि त्याचे मोजमाप करणे अशक्य..बाई नाटक "जगल्या "व अजुनही तितक्याच प्रगल्भ आणि समर्थ वाणी च्या जोरावर जगत आहेत.
पुस्तक वाचुन झाल्यावर त्यांची नाटकं पुन्हा एकदा पहावीत असे वाटत आहे..आता पुन्हा पाहिली तर नविन अर्थ उमजेल असे वाटत आहे.

सुंदर लिहिलेय.
त्या पुस्तकाचा उल्लेख लोकसत्ता मधे आल्यापासून माझ्या यादीत आहे ते.

मी खुप भाग्यवान आहे. त्यांची बॅरीष्टर, संध्याछाया, अखेरचा सवाल, हमिदाबाईची कोठी, अभिज्ञान शाकुंतलम, वाडा चिरेबंदी, पुरुष अशी नाटके प्रत्यक्ष बघितली आहेत. त्यांनीच केलेले हमिदाबाईकी कोठी, हवेली बुलंद थी आणि स्मृतिचित्रे या दूरदर्शनवरच्या कलाकृती बघितल्या आहेत. पेस्तनजी / रावसाहेब चित्रपट बघितले आहेत.

फक्त पुर्वीची जास्वंद / मादी वगैरे नाटके नाही बघता आली.

अतिशय प्रामाणिक आत्मचरित्र वाटले.

बाईंची लिहिण्याची शैली बघून मला निधपची आठवण झाली.

लहानपणीच्या काही आठवणी, फारोख मेहतांनी आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले तेव्हाची आठवण अशा काही आठवणी हृद्य आहेत.

हयवदन आणि नागमंडल हे भाग वाचावेसे वाटले नाहीत. का माहित नाही.
एन. सी. पी. ए. च्या तेरा वर्षांबद्दल काहीच माहिती नाही. मलाही पराग म्हणतो तसे शेवटी शेवटी गुंडाळल्या सारखे वाटले. जाडजूड पुस्तक असले तरी आणखी पन्नास एक पाने चालली असती. Happy

वाचकांना नीट समजावे म्हणून नाटकातले प्रसंग काही ठिकाणी त्यांनी वर्णन केले आहेत. त्यातले नाट्य उलगडून दाखवण्याची हातोटी थक्क करते. ( म्हणूनच त्या इतक्या उत्तम दिग्दर्शक असाव्यात!)

अनेक ठिकाणी स्वतःचेच कौतुक करून घेतले आहे.. पण समहाऊ ते खटकले नाही. कारण ते खरेच तसे असावे असेच आहे. (बाईंचे व्यक्तिमत्व, वलय जबरदस्त आहे :))

मला अतिशय आवडणारा पु.लंचा "खुर्च्या" हा न-नाट्यावरचा महान विनोदी लेख हा विजयाबाई आणि माधव वाटवे यांनी अभिनय केलेल्या त्याच नावाच्या प्रायोगिक न-नाट्यावरचे स्पूफ आहे हे या पुस्तकात वाचल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. (त्यात विजयाबाई होत्या हे समजल्याने!)
झिम्मा मधे बाई आणि माधव वाटवे यांचा खुर्च्या मधला फोटो आणि फोटोतला या दोघांचा मेक अप पाहून पु.लं ना हे स्पूफ का लिहावेसे वाटले असेल याची थोडी कल्पना येते Happy

खूप दिवसांनी एखादे मराठी पुस्तक वाचल्यावर वाचल्याचे समाधान मिळाले. (अवचटांच्या स्टुडिओ नंतर)

मला अतिशय आवडणारा पु.लंचा "खुर्च्या" हा न-नाट्यावरचा महान विनोदी लेख हा विजयाबाई आणि माधव वाटवे यांनी अभिनय केलेल्या त्याच नावाच्या प्रायोगिक न-नाट्यावरचे स्पूफ आहे हे या पुस्तकात वाचल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. >>>

मला पण!

प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांना धन्यवाद. Happy

मयेकर, बदल केला आहे.
strange >>>> चालायचच ! Happy

नंदिनी, पूनम नक्की लिहा..

ललिता.. इथे प्रतिक्रियेत नक्कीच लिहू शकतेस (परवानगी कसली विचारतेस ??!).. फक्त टिआरपीचं काय बघ काय ते... Wink

HH.. प्रतिसाद आवडला.. Happy

पुलंचा तो खुर्च्या स्पूफ वाचला होता, तेव्हाच कुणाशीतरी चर्चा करत असताना बाईंच्या या नाटकाबद्दल समजलं होतं. पण प्रायोगिक रंगभूमी हा आपला प्रांत नसल्याने तेव्हा ते जास्त लक्षात राहिलं नव्हतं. झिम्मा वाचताना ते परत आठवलं. मला आता तो खुर्च्या लेख पुन्हा एकदा वाचायचा आहे.

आता पुस्तकाबद्दल:

मी एकाच बैठकीत पुस्तक वाचून संपवलं असल्याने मला हे पुस्तक फार तुकड्यातुकड्यात वाटलं. बेबी आणि विजू जयवंत याच्याबद्दल लिहिताना बाई अगदी मनमोकळेपणाने लिहितात. बेबीच्या काही आठवणी आणि निरीक्षणं तत्कालीन समाजाबद्दल तर आहेतच त्याचबरोबर त्या समाजामधून होणारे बदलही फार सूक्ष्मरीत्या टिपलेले आहेत. मध्ययुगीन मानसिकतेकडून एकविसाव्या शतकात होणारा हा प्रवास फार रोचक आहे. बाई स्वत: कुठही "आमच्या काळी... "चा आलाप लावताना दिसत नाहीत. उलट नवनवीन माध्यमांबद्दल अजूनही उत्सुकतेने माहिती करून घेत असताना दिसतात. बेबीच्या आठवणी वाचून पुस्तकाबद्द्लच्या अपेक्षा वेगळ्याच होत्या, मात्र नंतर विजया खोटे आणि विजया मेहता या प्रवासामधे एक तटस्थपणा येत गेलेला आहे.

स्वत: भूमिका केल्या नाटकांबद्दल आणि स्वत: दिग्दर्शित केलेल्या नाटकांबद्दल बाई अगदी भरभरून बोलतात, त्या नाटकांच्या तालमीदरम्यान, प्रयोगादरम्यान आणि दौर्‍याच्या दरम्यान गमतीजमती सांगत असताना मधेच कुठेतरी "नाटका"शी संबंधित अशा फार महत्त्वाच्या गोष्टी सांगून जातात. लिहिताना उगाच आता फार गंभीर झालय, एखादा विनोदी किस्सा टाकावा असं केलेलं दिसत नाही.

बाईंनी एका ठिकाणी लिहिलय "भावविवशता आणि भावनोद्रेक यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे" झिम्मा वाचताना हे बर्‍याचदा जाणवतं. रंगायन फुटल्याचे प्रकरण, हरीन खोटे यांचा मृत्यू, स्वत:ची फसलेली नाटकं याबद्दल बाईंनी त्रयस्थपणे लिहिलेलं आहे. ही त्रयस्थता त्यांना नाट्यदिग्दर्शनातून मिळाली असावी. पण तरीही त्यांची मूळची दिलखुलास आणि रंजक शैलीमुळे पुस्तक वाचनीय आहे.

बाईंनी "नाटक करण्यासाठी" अक्षरश: जळी स्थळी काष्ठी पाषाणी स्फूर्ती घेतलेली आहे. भूमिका जिवंत करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत थक्क करत जातं. खरतर ही हनत त्या इतक्या आत्मीयतेने करतात आणि तेदेखील अगदी एंजॉय करत की त्याला मेहनत का म्हणावं? पण तरीदेखील हमीदाबाईंची कोठी, बॅरीस्टर, शितू, नानी, क्ताबाई, यासारख्या नाटकांमधून आपल्या व्यक्तीमत्त्वापेक्षा पूर्णपणे भिन्न व्यक्तीमत्त्वे साकारताना त्यांनी केलेला अभ्यास आणि निरीक्षणं ही या पुस्तकामधून आपल्यापर्यंत पोचतात.

बाईंच्या कामाचा प्रचंड आवाका मात्र या पुस्तकातून दिसत नाही. कदाचित "हे केलं मग ते केलं" अशा स्वरूपामधे लिहिल्यामुळे असेल पण बाईंनी रंगभूमीला दिलेले नविन मापदंड, केलेले वेगवेगळे प्रयोग (एक्स्परीमेंट्स), मराठी रंगभूमीच्या वाढलेल्या कक्षा याचे विवेचन पुस्तकांत येत नाही. हे पुस्तक वाचून एकेकाळी मराठी रंगभूमी किती समृद्ध होती आणि लोकमान्य असो वा प्रायोगिक दोघांनाही असणारा रसिकाश्रय आणि मानसन्मान किती मोठा होता, हे पाहिलं तर आताच्या रंगभूमीमधे असे प्रयोग का केले जात नाहीत हा प्रश्न पडतो अर्थात मराठी रंगभूमी ही मराठी टेलीव्हिजन आणि चित्रपटांपेक्षा अजूनही कितीतरी सरस आहे हे त्यातल्या त्यात समाधान.

पराग पटलं तुझं पुस्तकाबद्दलचं विवेचन. नंदिनी, हह ने सुद्धा छान लिहिलं आहे.

मला हे पुस्तक डॉक्युमेन्टेशनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे वाटले. एनसीपिएचा भाग त्या दृष्टीने अजून सविस्तर हवा होता हे म्हणूनच पटले.

रंगायनचा कालखंड योग्य त्या आत्मियतेनं, हव्या त्या ठिकाणी त्रयस्थपणा राखून, आत्मपरिक्षण करुन लिहिला आहे. तरीही तो भाग लिहिताना बाईंच्या मनावर ताण असावा हे वाचताना जाणवते. साहजिक आहे कारण रंगायनचे फुटणे, त्यावरुन संबंधितांनी एकमेकांवर केलेले आरोप हा खेळ गेली कित्येक वर्षं चालूच आहे. आता विजयाबाईंच्या पहिल्यांदाच मांडल्या गेलेल्या भूमिकेतून त्यावर पडदा पडायला हरकत नाही. रंगायनचे विखरणे त्यांच्या आणि सर्वांच्याच किती जिव्हारी लागलेले होते तेही यातून खूप स्पष्टपणे जाणवते.

विजय तेंडुलकरांच्या 'गिधाडे' नंतरच्या नाटकांबद्दलचे विजयाबाईंचे परखड आणि स्पष्ट मत आवडले आणि पटलेही.

अनेक वर्षांपूर्वी दुर्गा खोटेंचे आत्मचरित्र वाचले होते. त्यात विजया खोटेंचा उल्लेख अनेक वेळा झाला होता. दुर्गाबाईंचे आणि विजयाबाईंचे नाते एकाचवेळी गुरु-शिष्या, सासू-सून असे अनेकपदरी असल्याने त्या नात्याला खूप वेगवेगळे रंग आहेत. दुर्गाबाईंच्या आत्मचरित्रातून ते दिसले होतेच आता विजयाबाईंनीही ते इतके मनोवेधक मांडले आहेत त्यामुळे त्या लोभस नात्याची फ्रेम पूर्ण झाल्याचेही वेगळे समाधान 'झिम्मा' मधून मिळते.

भूमिकांबद्दलचे बाईंचे विवेचन मला श्रीराम लागूंच्या लमाणमधल्या विवेचनापेक्षा जास्त आवडले. श्रीराम लागूंचे लिखाण बुद्धीवादी-परखड आहे पण ते काहीसे, खरं तर खूपच कोरडे आहे. बाईंनी मात्र आत्मियतेचा फार सुरेख ओलावाम इतर कलाकारांचा जिव्हाळा त्यात ओतला आहे. हमिदाबाईंची कोठी बद्दल वाचताना ते प्रकर्षाने जाणवते.

मला सर्वात आवडलेला भाग म्हणजे विजयाबाईंची सिनेमा माध्यमातील कामगिरीबद्दलचा त्यांचा सगळा अनुभव. अत्यंत मोजके, फक्त तीन सिनेमे. पण काय कमाल क्रिएटीव्हीटीचे, मेहनतिचे दर्शन होते त्यातून. पेस्तनजी सिनेमाचं मेकिंग फार सुंदर उतरलय. हमिदाबाईच्या भूमिकेचा स्त्रोत कसा मिळाला याचंही वर्णन खूप काही शिकवून जाणारं.

'झिम्मा' चे खरं तर दोन भागही यायला हरकत नव्हती/नाही. कालखंड प्रदीर्घ आहे. कारकीर्द त्याहून प्रदीर्घ. सोन्यासारखी लखलखीत. एका पुस्तकात ती मावणे केवळ अशक्य. तरी विजयाबाईंनी आणि अंबरिश मिश्रांनी मेहनतीने हे काम पूर्ण केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानावे तितके थोडे. .

लेख आणि त्यावरचे प्रतिसादही आवडले. हे पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. पाहू कधी योग येतो ते.

(आयनेस्को नावाचा खरंच एक नाटककार होता, हे वाचून मलाही पुलंचा तोच लेख आठवला होता Happy - http://en.wikipedia.org/wiki/The_Chairs)

आवडला रे परिचय. मागे तन्वीर पुरस्काराच्या वेळी त्यांच्या आठवणी ऐकून त्यांच्याबद्दल अजून वाचलं/माहित करून घेतलं पाहिजे असं ठरवलं होतं. आता बघू कधी मिळतंय हे वाचायला. मराठी पुस्तकांची ई-बुक्स कधी येणार?

नंदिनी, शर्मिला मस्त पोस्ट्स.. Happy

नंदन, विजिगीषु.. धन्यवाद ! Happy
मराठी पुस्तकांची ई-बुक्स कधी येणार? >>> काही काही प्रकाशनं इ-बुक्स वर काम करत आहेत. फाँटमुळे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत.. ते जरा सोपं झालं की जास्त इ बुक्स यायला लागतील.

मी वाचत आहे सध्या. कमाल पुस्तक आहे!
आत्मियता तसेच त्रयस्थपणाचा अफलातून संगम आहे पुस्तकात.

विजया मेहता या नावामागे आपोआप येणारा आदर व काही नाटकांची नावं , काही तुरळक उल्लेख सोडता ,मला शून्य माहीती होती बाईंच्या कामाबद्दल असेच म्हणावे लागेल. त्यामुळे मी कंप्लीट अवाक आहे पुस्तक वाचताना. किती झोकून व कळकळीने हे प्रचंड क्रिएटीव्हीटीचे काम करत आहेत त्या हे सगळं. हेवा वाटला! Happy

(पुस्तक वाचताना काय शिकले हे शब्दात नाही सांगता येणार, पण काहीतरी मोलाचे शिकायला मिळतंय हे नक्की.)

मला पुस्तक आवडलं.

अगदी 'बिट्वीन द कव्हर्स' म्हणतात त्या पद्धतीने वाचून काढलं. 'सेतू स्नेहाचे' या ऋणनिर्देशाच्या भागातलं पहिलंच वाक्य 'लेखन हा माझा प्रांत नव्हे' काही खरं नाही. बाईंनी या पुस्तकाच्या निमित्ताने अतिशय रंजक आणि चित्रदर्शी लिखाण केलं आहे. शैली अगदी समोर बसून गप्पा माराव्यात तशी आहे. त्यात कुठेही आढ्यता नाही की मानभावीपणा/खोटी नम्रता नाही. एनसीपीएच्या टीडीसी (थिएटर डेव्हलपमेन्ट सेन्टर) मधे त्यांच्या नावे एक विभाग आहे. त्यात त्यांच्या नाट्यप्रयोगांची सूची, परीक्षणं, मुलाखती/भाषणं, कार्यशाळांचे वृत्तांत अशी सगळी माहिती एकत्र आहे. त्या माहितीचा उपयोग हे पुस्तक लिहिताना झाला असा उल्लेख या भागात येतो. साहजिकच या पुस्तकाचा हेतू जंत्रीवजा दस्ताएवजीकरण करणं हा नाही.

प्रस्तावनेत ('लिहू मी लागते') त्या 'मी हे का लिहित आहे' याचा एक स्वतःशीच धांडोळा त्या आपल्या साक्षीने घेतात. निरनिराळ्या माध्यमांतून 'नाट्या'शी त्यांची नाळ सतत जोडलेली राहिली. या प्रवाहात व्यक्तिगत आयुष्य आणि कार्यक्षेत्रात आलेले अनुभव, गाजवलेलं कर्तृत्व, जोडलेले ऋणानुबंध यांचे ओघ मिसळले. त्यांनी एकमेकांना आणि लेखिकेला समृद्ध केलं. तो सगळा प्रवास वाचकाच्या जोडीने पुन्हा अनुभवायचा एक प्रयत्न - असं या लेखनाचं स्वरूप त्यांनी ठरवलेलं दिसतं. त्यांना घडलेलं 'मॅजिक ऑफ थिएटर' वाचकाशी शेअर करणं इतका सरळसोपा हेतू या लिखाणाचा आहे.

नाटकाचा 'खेळ' हा त्याच संहितेबरहुकूम वारंवार होत असला तरी प्रत्येक वेळी कसा नवीन आणि जिवंत अनुभव असतो ते सांगताना केरळमधल्या 'मुडियाट्टू' विधीचं वर्णन त्या करतात. रांगोळीने काढलेल्या देवीची मनोभावे पूजाअर्चा करायची आणि मग ती रांगोळी पायांनी पुसून टाकायची असा हा विधी. काल केलं ते नुसतं विसरायचं नाही तर पायदळी तुडवून नाहीसं करायचं आणि आज तोच परकाया प्रवेश नव्याने करायचा हे सोपं नाही. भल्याभल्यांना ते जमत नाही. मग नट आपल्या प्रतिमेच्या, आपल्या शैलीच्या, ठराविक प्रतिसादांच्या प्रेमात पडून अभियनयाचं हे मर्म विसरतो. नाट्यविषयक शिबिरांतून बाई हे शिकल्या आणि तोच वारसा आपल्या शिष्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहता यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले काही संदर्भ येतात ते 'बाई' कशा घडत गेल्या याच शोधात. विजू नऊ दहा वर्षांची असताना बडोद्याच्या राजकन्यांना किंवा एखाद्या भूमिगत कार्यकर्त्याला प्रत्यक्ष भेटल्याच्या कल्पित कथा रंगवून सांगत असे. 'लहान मुलं मारतात त्या "खर्‍या" थापा, आपण मोठी माणसं मारतो त्या खोट्या थापा' असं त्या इथे म्हणतात. नाटकातल्या 'व्हॉलन्टरी सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ'चं नातं या 'खर्‍या थापां'शी असतं, नाही का?

युरोपिअन स्कॉलर्सनी मानलेल्या नाट्यनिर्मितीच्या तीन पायर्‍या त्या सांगतात :
१. प्रोब - संहितेतील शोध आणि तालीम
२. प्रेझेन्टेशन - प्रत्यक्ष प्रयोग किंवा खेळ
३. असिस्टन्स - प्रेक्षकाचा सहभाग

ते 'मॅजिक ऑफ थिएटर' निर्माण होण्यात प्रेक्षकांचा वाटा इतका मोठा असतो! नट आणि प्रेक्षक दोघंही या अनुभूतीत रंगले की रंगमंचच नव्हे तर संपूर्ण नाट्यगृहाचं अवकाश भारलं जातं आणि मग त्यातून विद्युल्लतेसारखे काही विलक्षण प्रकाशमान क्षण अनुभवास येतात आणि अविस्मरणीय होऊन राहतात. नाटकाचं 'व्यसन' लागतं ते त्या क्षणांच्या गारुडातूनच.

जुन्या आणि नव्या 'स्कूल'च्या तसंच देशापरदेशांतील नटमंडळींबरोबर काम करायची संधी त्यांना मिळत गेली ही कदाचित सुदैवाची बाब, पण नीरक्षीरविवेकाने त्यातून काय निवडायचं हे समजणं हा मात्र त्यांच्या जन्मजात प्रतिभेचाच भाग असावा असं दिसतं. संस्कृत नाटकांच्या जर्मनीत केलेल्या प्रयोगांबद्दलची तसंच पीटर ब्रूक यांच्या महाभारताबद्दलची वर्णनंही अत्यंत वाचनीय आणि मननीय आहेत. काळ, भाषा, संस्कृती, समाजमन हे इतकं भिन्न असूनही कुठल्याही नाट्याच्या मुळाशी असलेल्या मानवी भावभावना या युनिवर्सलच असतात याची जाणीव विलक्षण प्रत्ययकारी पद्धतीने त्या मांडतात.

प्रायोगिक रंगभूमीनंतर व्यावसायिक - त्यांच्या शब्दात 'लोकमान्य' - रंगभूमीवर केलेलं पदार्पण, तसंच रंगमंच ते टेलीफिल्म, टीव्ही सीरियल, चित्रपट या माध्यमांतरांचा लेखाजोखाही यात येतो. यातल्या प्रत्येक माध्यमाची स्वत:ची एक 'लय' असते आणि निर्मितीच्या प्रत्येक पैलूत तिचं प्रतिबिंब पडावं लागतं - मग ते नेपथ्य असो वा अभिनयाची शैली. ही लय सापडली नाही तर मग सिनेमासुद्धा 'पडद्यावर केलेलं नाटक'च वाटत राहतं असं त्या म्हणतात.

संवादांचा, मौनाचा, रंगमंचावरील हालचालींचा, रिकाम्या अवकाशाचा वापर, नटाची देहबोली, बॉडी इमेज, एकाच वेळी अभिनेता आणि प्रेक्षक अशी दोन व्यवधानं बाळगणं, भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यासाठी व्यक्तिगत अनुभवांचा 'वापर' केला जाणं आणि तरीही त्यापासून अलिप्त राहणं, अभिनयाच्या निरनिराळ्या शैली, त्यांवरचा लोककलांचा प्रभाव, नेपथ्य - कपडेपट - प्रकाश - ध्वनी या सर्वांतून साधली जाणारी हार्मनी या आणि अशा अनेक तांत्रिक बाबींबद्दल त्या बोलतात, पण इतक्या सहजसोप्या भाषेत की वाचक आपोआप 'असिस्टन्स' देऊ लागतो आणि वाचताना 'मॅजिक' घडत जातं.

मी वाचले आहे हे पुस्तक...छान आहे...खुप शिकण्यासारखं आहे...विजया बाइंनी स्वता ऑटोग्राफ केलेली कॉपी आहे माझाकडे...त्यांच्या एका सेलिब्रिटी स्नेह्यांनी दिली आहे......

माबोच्या रथी-महारथींनी भरभरून लिहिलं आहे त्यामुळे पुस्तक वाचायची फार उत्सुकता लागली आहे.
सर्वांनीच फार छान आणि खूपच मनापासून लिहिलं आहे. सगळ्याच लिहिणार्‍यांना पुस्तक किती आवडलं आहे ते वाक्यावाक्यातून समजतय.

शर्मिला, मला 'लमाण'मधलं विवेचनही भारी आवडलं होतं. इथे बाई जे भावनाविवशता आणि भावनोद्रेकाबद्दल बोलतात, तोच नेमका मुद्दा लागूंनी फार मस्त स्पष्ट केला होता. नटमंडळी नेहमी 'भूमिकेत शिरण्या'बद्दल बोलतात. चिडलेल्या माणसाच्या भूमिकेत शिरणं म्हणजे स्वतः चिडणं नव्हे, तर हा माणूस चिडला की त्याला काय काय होईल, तो कसा बोलेल ते अभिनीत करणं. रोग जडवून घेणं नव्हे तर लक्षणं अभिनयातून दाखवणं. अगदी शल्यविशारदाच्या सुरीसारखं नेमकं (प्रिसाइज) वर्णन आहे ते.
मला वाटतं 'नटसम्राट'च्या अनुषंगाने लिहिलं आहे त्यांनी ते.

'लमाण'मधली सेन्सॉरशिपबद्दलची आणि कलेच्या सामाजिक बांधिलकीबद्दलची चर्चाही मला फार पटली आणि आवडली होता.

असो, हे या धाग्यावर कदाचित अस्थानी आहे, पण 'लमाण'चा उल्लेख आलेला पाहून अगदीच राहवलं नाही.
पराग, तुला नको असेल तर ही पोस्ट उडवेन. Happy

छान पुस्तक परिचय, पराग.
पुस्तक वाचण्याची खूप उत्सुकता आहे. पाहू कधी योग येतो ते. आईला ऑलरेडी वाचायला सांगितलं आहे.
शर्मिला, स्वाती, नंदिनी, हह ह्यांच्याही पोस्ट्स आवडल्या.

पुस्तक वाचल्यावर काही प्रश्नही पडले. पुस्तकात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण घेवाणीचे करार, राष्ट्रीय पातळीवरचे कलाविषयक उपक्रम, राज्यसभेतल्या खासदारांनी नाट्यसंस्थेला अनुदान मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न वगैरे बाबींचे उल्लेख येतात. हल्ली अश्या काही गोष्टी होत नाहीत का? तसच विजयाबाईंनी सांगितलेल्या नाटकांच्या गोष्टींमध्ये इतकं वैविध्य आहे! अश्या प्रकारची नाटकं लोकमान्य रंगभुमीवर हल्ली तयारच होत नाहीत का? >> खरंच, मलाही हा प्रश्न पडला आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

स्वाती, मस्त पोस्ट.. Happy
उडवू बिडवू नकोस.. विषयाला धरूनच तर आहे की! लमाण बद्दल आधीही ऐकलं होतं. वाचायला हवं.

मो.. धन्यवाद.. Happy

Pages