गुडबाय फॉरेव्हर!

Submitted by साजिरा on 18 December, 2012 - 03:34

बिछान्याची आग जणू
तळपायांपर्यंत,
मेंदूत चारेक लाख भुंग्यांची भुणभूण,
तळमळ ठाण मांडते
डबल बोनस देऊनही
विक्राळ तोंडाने
संपाच्या घोषणा देणार्‍या
कामगारांगत.
*

डबल बोनस
म्हणजे काय माठभरून दारू नव्हे रेऽ.
वाईन प्लस व्हिस्की प्लस बियर प्लस रम प्लस व्होडका
असं कॉकटेल तुझ्या
काकाने केलं होतं का कधी च्यायला?!
*

आता झालं असंय
की सुमारे दोनेक हजार घनफूट अंधार
या खोलीत दाटीवाटीने
भरून राहिलाय.
साधासुधा अंधार नव्हे,
ताकदवान अंधार.
गडद. भयंकर. अभद्र ओल्या वासाचा.
*

डोळे मणभर ओझ्याच्या पापण्या
दूर ढकलून त्या घनफूटांच्या घनतेचा
अंदाज घेताहेत,
तोच ते लखो भुंगे
हातभर अंतरावरून जाणार्‍या
डेंजरसली हाय व्होल्टेज केबलसारखे
टर्रऽर्रऽऽ किंचाळतात..
साला या दहशतवादी अंधाराचं
काहीतरी केलंच पाहिजे.
*

पाय फरशीवर टेकल्यावर
अहाहा!
थेट भूगर्भातून आल्यागतचा
शांत स्निग्ध थंडावा.
पुढच्या क्षणी मात्र तो फितूर!
मग ती हाय व्होल्टेज केबल
फारच अर्जंट असल्यागत
टर्रऽर्रऽऽ करत पायातून खाली.
काही खरं नाही,
काही खरं नाही.
पाय उचललेच पाहिजेत.
काहीतरी केलंच पाहिजे.
*

हा.
एक आहे करण्यासारखं.
हा खिडकीचा पडदा दूर सारावा.
म्हणजे खिडकीच्या धारदार कडेने
खास्सकन कापलेला चंद्र
आपलं शुभ्र-चंदेरी रक्त
या घनफूटांमध्ये भळाभळा सांडेल.
तेवढाच बदला.
चंद्राचा. रक्ताचा. घनफूटांचा.
*

रक्ताच्या पुराने तर
थेट पायाशी लोळण घेतली.
भट्टीगत तापलेली
अन अग्यावेताळ ज्वलनशील रक्त
खेळवणारी ही पावलं
अजूनही कुणालातरी
पूजनीय वाटतात..?!
हाऽ हाऽ हाऽऽ
च्यायला लाथ मारीन तिथं रक्त काढीन आता!
समजलात काय?
*

चला, पावलं तर भक्कम झाली.
आता जरा रॅगिंग घेऊन
त्यांना फरशा मोजायचं काम द्यावं.
एका फरशीत अशा पंचवीसशे फरशा बसवायच्या,
आणि त्यातली एकेक फरशी पंधराशे वेळा मोजायची!
चला लागा कामाला.
*

हा, तर अंधारा,
अब तू बोल.
हरामी स्साला..
एकेक वस्तूचं रूप घेऊन
कसा चोरासारखा बसलास नाही?
चंदेरी रक्ताला घाबरलास काय?
कुठे गेली तुझी ती अभद्र घनफूटं?
ये समोर. ये ये.
तू आहेस तिथं माहितीये मला.
कपाटांच्या मागे. टेबलाच्या खाली. बेडच्या बाजूला.
माझ्या फरशा दडवल्या होत्यास ना?
पादाक्रांत करतोय बघ मी त्या पुन्हा!
*

आता एकदा 'पादाक्रांत' म्हणल्यावर
कसं अगदी किंगली फिलींग आलंय.
आजुबाजूला हुजरे असल्यागत,
नि समोर दरबार भरल्यागत.
आता राजाच्या नजरेनं
मस्त बघावं इकडे तिकडे.
धडावर जाडजूड मान असल्याच्या रुबाबात.
*

मान सवयीने कपाटाकडे वळतेच च्यायला.
काचेपलीकडे रांगेत सेवेसाठी हजर
जीए, सारंग, पुलं, वपु, नेमाडे..
सावंत, माटे, पेंडसे, पाध्ये नि कोणकोण.
त्यांच्यामागे अदृश्य, सुप्तरूपात असल्यागत
धडधाकट, वेडेवाकडे, कार्टून्स काढल्यागत
वर्डस्वर्थ, शेक्सपीयर, शेले..
डस्टोयव्हस्की, टॉलस्टॉय, कीट्स, मार्क्स, कांट..
हाऽऽ हाऽऽ हाऽऽऽ
खी-खी-खीऽऽऽ
हीऽ-ही हीऽ
पितळ उघडं पडलं की राव..
तेही जवळजवळ अंधारातच!
*

सेवेकर्‍यांना आज राहू दे तिथंच.
आपण मस्त न्याहाळावं..
राजा व्हायचं ठरलंय ना, मग?
आता हा बेड.
हे स्टडीटेबल.
हे कपाट. ही खुर्ची.
यांचं काहीतरी करू.
*

कसलं कपाट नि टेबल नि खुर्ची.
असं वळचणीला सारं सामान लोटून देऊन
काटेरी हिवाळ्यात
थंड चटके देणार्‍या फरशीवर
बुडावर ठिगळं लावलेली हाफ चड्डी घालून
धडे घोकता, कविता तोंडपाठ
नि रामरक्षा घडाघडा आली पाहिजे.
तरच खरा तू च्यायला
तुझ्या बापाच्या पोटचा.
*

मातीच्या भिंती पोतारता आल्या पाहिजेत.
अंगण नि परसदार सारवता आलं पाहिजे.
त्यासाठी कढया भरून पांढरी माती नि शेण
डोक्यावर धरून आणता आलं पाहिजे.
झाडूच्या निम्मीच उंची असली
तरी सारं घर झाडून लख्ख करता आलं पाहिजे.
तरच खरा तू च्यायला
तुझ्या बापाच्या पोटचा.
*

जास्वंदीच्या फुलाचा रस काढून
लिटमस पेपर करता आला पाहिजे.
शेळीच्या लेंड्या, टुस्से नि रिकाम्या आगपेट्यांचे
हुसेनच्या तोंडात मारतीलसे
आयटम करता आले पाहिजेत.
निवडणूक प्रचाराच्या
रंगीबेरंगी लीफलेटांच्या
भऽर्र भिंगर्‍या करता आल्या पाहिजेत.
भिंगर्‍या पायाला लावून
भिन्नाट पळता आलं पाहिजे.
तीळ-चुरमुर्‍याच्या लाडूसाठी
लाळ गाळता आली पाहिजे.
तरच खरा तू च्यायला
तुझ्या बापाच्या..
*

मोगर्‍याचं फूल जमिनीवर पडलेलं पाहून
हलकेच उचलता आलं पाहिजे.
ते नाकाशी धरून
जगप्रवास करता आला पाहिजे.
कसकसले वास प्राणपणाने
दुर्मिळ असल्यागत शाही कुप्यांत ठेवल्यागत
छातीशी जपून ठेवता आले पाहिजेत.
तरच खरा तू..
*

आलीच साली ही फुक्कटची दुखणी..
घनफूटं सारत कापत
या समोरच्या रिकाम्या खुर्चीवर
दाटीवाटीने बसून
तोंड वेंगाडायला..
हे करता आलं पाहिजे,
नि अलाणंफलाणं
अमकंढमकं झालं पाहिजे..
ती खुर्ची काय तुमच्या बापाची काय रे?
हाऽऽट साला भेंचोत.
जबतक बैठनेको ना कहा जाय,
तबतक चुपचाप खडे रहो!
*

रॅगिंग बंद करून
आपणच त्या खुर्चीवर बसू.
वेगळं पर्स्पेक्टिव्ह,
वेगळा आयाम,
वेगळा अँगल,
वेगळा विचार,
वेगळा आचार,
असं सारं करू.
आता हे कसं अगदी मस्त रीतसर
पोटभरू विचारवंतांगत झालं.
शेवटी काय,
पोट भरल्याशी मतलब.
शिवाय ती खुर्ची ऑक्युपाइड राहील हे एक.
म्हणजे कसं,
की ना रहेगा बांस, ना बजेगी..
*

बेडकडे बघत राहिल्याने,
की तळपाय फरशीवरून वर घेतल्याने
कळत नाही.
पण पुन्हा आग पेटल्यागत वाटतेय.
चार लाख भुंग्यांसोबत आता
पाच लाख काजवेही आलेत
आणि सार्‍यांमिळून त्या बेडवर
संमेलन भरवताहेत
तुझ्या शरीराच्या रेषांवर
भुंग्यानी ताल धरलाय..
अन काजव्यांनी रोषणाई केलीय.
तुझ्या केसांनी केलीय तुझी लाज
अजून समृद्ध..
अजून राजस..
अजून आदिम..
अजून पवित्र..
*

मग लख्ख काजवे आहेतच.
पण सोबत गुढ अंधार. सुवासिक अंधार.
कृष्णविवरातला.
निर्णायक. आदिम. प्राचीन. घनगर्द.
*

रक्ताचे लोट उसळतच आहेत
तर आता नुकतीच आलेली
आठवणही सांगतो.
तुझ्या स्तनाग्रांत मला तुझं
अख्खं व्यक्तिमत्व दिसतं,
असं मी तुला एकदा म्हटलं
तेव्हा काहीतरीच म्हणून
तू उडवून लावलंस.
नंतर मात्र मोठ्ठं पत्र लिहिलंस,
मग माझ्यासमोर वाचू नकोस
म्हणून बजावलंस.
आणि हजारो फुलांच्या वाट्याचं
एकाच वेळी हसलीस.
आठवतं?
आता ते बाहेर काढायची
माझी तरी हिंमत नाही.
माझ्याआत हे रक्ताचे लोट,
बाहेर वाहणारे हे चंदेरी पाट,
अन वळचणीला कोनाकोपर्‍यांत
ते हजारो घनफूट
बसलेच आहेत टपून
माझी मजा बघायला.
*

पत्र काढलं नाही, म्हणून काय झालं?
अन मी खुर्चीवर बसलोय म्हणून काय झालं?
ही सारी साली फुकटची दुखणी
आलीच दाटीवाटीने
कुठेकुठे जागा सांभाळून बसत
फिदफिदत, माझ्याकडे बघत,
चेटकिणी-खवीसांचे
अभद्र आवाज काढत.

आणि तुला काय वाटलं..?
तू आज मला
गुडबाय फॉरेव्हर करून गेलीस तेव्हा
वेलमोगरे नि
दुर्मिळ शाही कुप्या नि
हजारो फुलांचं हसू देऊन गेलीस.. असं?

तुझं हे असं वाटणं म्हणजे
त्या अंधाराच्या घनफूटांपेक्षा हॉरिबल.
तर ते तुझ्या तशा वाटण्याचं
सध्या जरा नंतर बघतो.
या गडद घनफूटांचं काय करायचं
ते आधी जरा निवांत ठरवतो.

तसा वेळ अजून भरपूर आहे.
तो संपवायचा केव्हा
एवढाच फक्त प्रश्न.
***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदिस अबाबाच्या हॉस्पीटलमधील बेडवर पडून
लुसलुशीत शरीराच्या नर्सेसचे नितंब निरखत
मनानेच त्यांना घुसळवत
मी बरा होऊ पाहात होतो
वगैरे!

दिलीप चित्रेंची आठवण झाली ही कविता वाचून. बरीचशी कविता आकर्षक वाटली. शेवटी मात्र ते माठभरून कॉकटेल जे कोणाचा काकाही करत नाही ते पिऊन लडखडल्यासारखी वाटली. आकड्यांचा सिग्निफिकन्स मात्र लक्षात येत नाही आहे अजूनही. 'दोन हजार' घनफूटच का? चार लाख भुंगेच का? वगैरे!

एकुण आठवणीतील कविता आवडली हे शेवटचे इंप्रेशन!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(बाकी भेंचोत स्तनाग्रे वगैरे उल्लेख वास्तवदर्शीत्वाच्या ओढीने पेरले की काय असेही वाटून गेले).

म्हणजे खिडकीच्या धारदार कडेने
खास्सकन कापलेला चंद्र
आपलं शुभ्र-चंदेरी रक्त
या घनफूटांमध्ये भळाभळा सांडेल.
तेवढाच बदला.
चंद्राचा. रक्ताचा. घनफूटांचा.
>> हे अफाट आवडलं.
तरच तू खरा..., दुर्मिळ शाही कुप्या वगैरे वाचून तुझ्या कथा वाचताना जशी तुझी सिग्नेचर अचानक सापडते तसं वाटलं.
असा गुडबॉय फॉरेव्हर झाल्यावर शिल्लक राहिलेल्या प्रचंड मोठ्या पोकळीचं करायचं काय? अशा नुसत्या विचारानेच आलेल्या भयानक निष्क्रीयतेचं तंतोतंत वेगवान क्रियाशील वर्णन. हा कॉन्ट्रास्ट बॅलन्स बेफाट अवघड आहे. साधलास.

असा गुडबॉय फॉरेव्हर झाल्यावर शिल्लक राहिलेल्या प्रचंड मोठ्या पोकळीचं करायचं काय? अशा नुसत्या विचारानेच आलेल्या भयानक निष्क्रीयतेचं तंतोतंत वेगवान क्रियाशील वर्णन.<<< सहमतच!

पणः

हा कॉन्ट्रास्ट बॅलन्स बेफाट अवघड आहे. <<< याला कॉन्ट्रास्ट बॅलन्स का म्हणत आहात ते कृपया सांगा. निष्क्रीयता ही कवितेतील एक जाणीव म्हणून पुढे येते तर क्रियाशील वर्णन ही कवीची हातोटी आहे. पहिली 'अवस्था' आहे आणि दुसरा 'संवाद'! त्यांच्यात गुणात्मक किंवा रंगात्मक तुलना अशक्य आहे. मला तर असे वाटते की ते दोन्ही एकच आणि मॅचिंग असे आहेत.

कवितेने सुरूवातीला पकड घेतली, उत्सुकता वाढवली पण नंतर लांबीचा कंटाळा आला. कधी एकदा संपतेय असे वाटू लागले.

पद्य - हा फॉर्मॅट कमी शब्दात अधिक सांगण्यासाठी असावा असे म्हणावेसे वाटले.

अनेक प्रतिमा फार आवडल्या.

चु.भू.द्या घ्या