रात्र....

Submitted by मुग्धमानसी on 17 December, 2012 - 01:43

रात्रीची भिती वाटते म्हणे सगळ्यांना...
पण मला मात्र भारी कौतुक वाटतं तिचं.
तिचं एकटेपण, तिची रंगहीनता, तिची भयाणता...
आणि या सगळ्यावर तिचं मात करुन उरणं!!

या रात्रीकडुन बरंच काही शिकायला मिळतं!!

दिवसावर सगळेच प्रेम करतात! कारण दिवसावर केलेलं प्रेम लख्ख प्रकाशात उजळलेलं असतं.
सुर्याच्या उदात्ततेशी, उत्तुंगतेशी निगडित असतं.
दिवसाच्या सोबतीला असतात कित्येक जीव,,, पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचा गलबलाट, लक्षावधी सजीवांचे लक्षावधी आवाज, आकार आणि जिवंत जाग्या भावना!!!

रात्रीच्या सोबतीला मात्र असते फक्त भयाण शांतता,,, जगण्याची इतिकर्तव्यता पार पाडत अव्याहत फुरफुरणारे श्वास, मिटलेले शांत डोळे, लक्षावधी स्वप्नांचे पोकळ ढग आणि कुठेतरी दोन जीव एकमेकांच्या वासनांची पुर्तता करित जीवनचक्र पुढे पुढे रेटणारे....

उत्तुंगता, उदारता, उदात्तता, महानता,,, सारी दिवसाच्या सुर्याचा ठेका!
रात्रीच्या चंद्राला मात्र मिळालेलं केवळ डागाळलेलं सौंदर्य...

उर्जा, शक्ती, अग्नी सारं फक्त दिवसाच्या उन्हाठायी!
रात्री पसरणार्‍या चांदण्याला मात्र समाधान मानावं लागतं अंगणात खुर्च्या टाकुन बसलेल्या काही मोजक्या जणांच्या निवांत दादीवर,,,,

पोवाडे, अभंग, भजनं सारी दिवसासाठी!
रात्रीच्या वाट्याला येतात फक्त दुबळ्या, हळव्या आणि सोप्या कविता...

केवढी उपेक्षलेली रात्र ही! तरिही निसर्गचक्रातली आपली भुमिका चोख बजावत रहाते! अगदी बिनतक्रार!

कधीकधी रात्री मध्येच स्वप्नांचे ढग फुटतात... मिटलेले डोळे उघडतात...
समोरच्या पिठूर चांदण्यात रात्र तेंव्हा खुद्कन हसते.
तिच्यासारखंच माझ्याही आत धुमसत असतं काहितरी....
माझ्याही आत जळत असतं, रडत असतं, तुटत असतं काहितरी...
पण मीही हसते खुद्कन... अगदी तिच्यासारखी...

स्वप्नांची सोबत सुटल्यावर भोवती दाटलेलं एकाकिपण रात्र तिच्या हसण्याने ह्ळुवार दुर करते.

त्या पोकळ स्वप्नांच्या फुग्यांची सोबत कायमची सोडुन...
मग मलाही करावी वाटते रात्रीची सोबत....
तिच्या कधिही न संपणार्‍या एकाकिपणात!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users