या लिखाणाची प्रेरणा - मामींचा खोटं कधी बोलू नये हा बाफ . त्या बाफवर प्रतिसाद देत असतानाच हे सगळं *स्फुरत गेलं ( आठवलं म्हटलं तरी चालेल
).
-------------------------------------------------------------------------------------------------------------
ती... एक झुळूक
==============
उमेदवारीच्या काळात एका कंपनीत नोकरीला होतो. त्या कंपनीत एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिचं नाव.. आपण एस म्हणूयात तिला. सगळ्यांनाच (प्लीज नोट) एस खूप आवडायची. तिलाही ते माहीत असल्यानं ती भाव बिव खायची. तिच्याशी बोललं तरच बोलणार, हसलं तरच हसणार वगैरे. स्वत:हून कधी कुणाशी ती बोलल्याचं आठवत नाही. सौंदर्य ही अशी एक सत्ता आहे कि मॅनेजर्स वगैरेही तिला ब-यापैकी रिस्पेक्ट देत असत.
बरेच जण तिच्यामागे होते. यातले काही ओपन तर काही क्लोज मध्ये होते. ओपन वाले म्हणजे दिलकी बात थेट बोलून मोकळे झालेले (हाय रिस्क हाय गेन) आणि क्लोजवाले म्हणजे.. लो रिस्क वाले ! या सर्व इच्छुकांमध्ये दीवाना मस्ताना खूप चालायचं. कारखान्यासारख्या रूक्ष ठिकाणी संबंध यायचा तो फक्त लोखंडाशीच. अशा ठिकाणी एखादी सुंदर मुलगी असणे म्हणजे रणरणत्या वाळवंटात एखादी सुखद झुळूक असावी असंच वाटायचं. म्हणून तिला मी झुळूक हे नाव ठेवलेलं होतं. पण आमच्यातल्या गळेकापू स्पर्धेमुळे या नावाची पार्श्वभूमी तोडूनमोडून तिच्या कानावर ते व्यवस्थित पोहोचवण्यात आलेलं होतं. याचा फटका सुरूवातीला चांगलाच बसला होता.
मी अर्थातच क्लोजमधला होतो . धाडस होत नसल्याने क्लोजमधला ! झाकली मूठ सव्वालाखाची असं आमचं धोरण होतं. नाहीतर उगीच तेलही गेल आणि तूपही गेलं अशी आपली गत व्हायची असा एक मध्यममार्गी विचार होता तो ( गाढ्वही गेलं ...हे बोटात आलं होतं पण ओठातच ठेवलं). त्या वेळी बरंचसं थिंकिंग हे विशफुल थिंकिंग असायचं ( काही लोक तर सरत्या वयातही ते करताना दिसतात ).
घरी जाताना एसला लिफ्ट द्यावी असं एक स्वप्न होतं. पण ती दीड तास लवकर सुटायची त्यामुळं ते शक्य नव्हतं. मग येताना तरी लिफ्ट द्यावी असा विचार मनात यायचा. पण ती कुठून येते वगैरे माहीत नव्हतं आणि यायचा जायचा रस्ता एकच असेल तर विचारता येतं. ती कुठल्या तरी बसस्टॉप वर उभी असावी , त्याच वेळेला आपण तिथे पोहोचावं आणि " अरे तू या बसस्टॉपला ?" असं म्हणत तिला लिफ्ट द्यायची तयारी दाखवावी असं मनात होतं. त्यासाठी बरीचशी माहिती काढणं गरजेचं होतं. ओळखीचं रूपांतर गाढ मैत्रीत होणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरूवात झाली. हे अर्थात ओपनवाल्यांच्या ( आणि क्लोजवाल्यांच्याही - ते काही टीममेट नव्हते सहकार्य करायला) लक्षात न येऊ देता बिनबोभाट व्हायला हवं होतं.
ती कामावर वेळेच्या आधी अर्धा पाऊणतास यायची. हे आधी माहीत नव्हतं. एकदा गप्पांच्या ओघात चुकून तिने ते सांगितलेलं. कदाचित माझ्या भोळसट चेह-याला फसून असावं. आपल्याला काय! महत्वाची माहिती हाती आली होती हे महत्वाचं. मग काय ! डोक्यात विचारचक्र फिरायला लागलं. त्यावेळी नव्या नव्या "आयडिया" कराव्याशा वाटायच्या. मुलींना तर काय डोकंच नसतं, त्यांना काय कळणार ? बरं, तिच्या चेह-यावर पण मठ्ठपणाचे भाव असायचे ( पण ते किती घातकी होते हे नंतर वेळोवेळी कळत गेलंच ). मग हळू हळू तिचा बस नंबर विचारून घेतला. पुणे मनपावरून ती बस पकड्त असे. तिथपर्यंत दुस-या बसने यायची. ओपनवाल्यां पासून थोडी मोकळीक मिळून तिच्याशी सलगी वाढवायला याहून मोठा चान्स नव्हता.
डोक्यात काही आयडिया आली कि स्वत:च्या बुद्धीमत्तेवर प्रसन्न व्हायचं वय ते ! मनपाकडे येणारी तिची बस यायच्या आधी अर्धा तास मी तिथे जाऊन थांबू लागलो. तिची बस वरून दिसली कि मनपाच्या इथे एक झाड आहे, तिथे लपून बसायचो. तिथून जिन्यावरून उतरणा-या लोकांचे पाय दिसायचे. एसचे सिंड्रेला टाईप पांढरे शूज चटकन ओळखू यायचे. मग ती हळू हळू दुडक्या चालीने चालत जवळ यायला लागली कि ह्रुदयाची धडधड एकदम तेज व्हायची. ऍटॅक वगैरे येतो कि काय असं वाटायचं. तिचं माझ्याकडे लक्ष नसायचं. ती मला क्रॉस करून पुढे जायची. या पोरी एकदम बिनडोक ! मी इथे लपलेला तिला दिसलेलो सुद्धा नसायचो. ती पुढे गेली कि मी झाडाच्या बुंध्याआड मागे मागे जात टुणदिशी उडी मारून तिला गाठायचो. मग पुढचा उगाचच संवाद व्हायचा.
" अरे ! काय योगायोग आहे ना " टाईप काहीतरी सुरुवात व्हायची संभाषणाला. त्यावर ती अगदी मनापासून वगैरे हसून "अय्या ! आज इतक्या लवकर ? सूर्य कुठे उगवला आज " असं विचारायची. पण अर्थातच मी ते मनावर घ्यायचो नाही. हिला आपली हुषारी कळालेली नाही याचाच आनंद असायचा. खरं तर आईही हाच प्रश्न विचारायची कि हल्ली इतक्या सकाळी का जातोस कामाला ?
बस मोकळीच असायची. तिच्या पुढच्या सीटवर बसून तिच्याशी गप्पा मारताना मान खूप दुखायची. एकदा ती पुढे बसलेली आणि मी मागे ! तिला मान वळवायला लागल्यावर तिने लगेच तक्रार केली. मग घाबरत घाबरत सरळ तिच्या शेजारी जाऊन बसलो. तिच्या ओढणीच्या स्पर्शानेही करंट बसल्याचं अजून आठवतंय. मग रोज सरळ शेजारीच बसू लागलो. एव्हाना चांगलीच भीड चेपली होती. हात हातात घेऊन भविष्य सांगणे, हातावर पेनने चित्रं काढणे इथपर्यंत मजल गेली होती.
एकदा धाडसाने तिच्या हातावर नऊ चौकोन काढले. हे चायनीज भविष्य आहे म्हणून बिनधास्त ठोकून दिलं. एकेक प्रश्न विचारत गेलो. कुठले तीन हिरो आवडतात ? कुठल्या तीन हिरॉइन्स आवडतात. मग त्यांची नावं चौकोनात भरली. यातला सर्वात आवडता/ती हिरो/इन कोण या प्रश्नाचं उत्तर बोटावर लिहीलं. दुस-या हातावरही अशीच बरीच माहीती भरली. शेवटी तिला आवडणा-या तीन साबणांची माहीती विचारली. त्यातला सर्वात आवडता साबण कोणता हे विचारून घेतलं. मग उरलेल्या बोटांवर बरीच गणितं केली आणि भविष्य सांगितलं कि तू आता कंपनीत गेल्याबरोबर लक्स साबणाने तुझे दोन्ही हात धूणार आहेस. त्यावर आधी ती कन्फ्युज झाली, नंतर आपला हात भरलाय हे लक्षात येऊन प्रचंड चिडली. ती चिडल्यावर आता मेलो असं वाटून भीती वाटली पण नंतर अचानक ती इतकी खळाळून हसली कि वाटलं बस्स... जग जिंकलं !!
आता ती काय म्हणतेय म्हणून उत्सुकता लागलेली. तर तिने साळसूद प्रश्न विचारला. " हल्ली गाडी घेऊन नाही येत ?" त्या गुगलीवर माझी विकेटच गेली. त्या प्रश्नावर जे जे सुचेल ते ते सांगायचा प्रयत्न करत होतो आणि ती चेहरा शक्यतो कोरा ठेवत ऐकत होती. पण तिच्या डोळ्यातलं मंद हास्य नंतर ती हसणार नाही याची गॅरण्टी देत नव्हतं. असे दोन तीन महीने गेले.
कसं कोण जाणे हे बसप्रकरण ओपनवाल्यांना कळालं. मग एके दिवशी एक ओपनवालाही बसला दिसला. तिने मला लांब बसायला सांगितल्याने माझा नाईलाज झाला. त्या ओपनवाल्यावर मी मनातून चांगलाच चडफडतलो. तो ही माझ्याकडे खाऊ कि गिळू अशा नजरेने पाहत होता. हळू हळू बरेच ओपनवाले त्या बसला दिसू लागले. नंतर काही तिच्या शेजारी बसून प्रवास करायची तशी संधी मिळालीच नाही. तिच्या शेजारी बसून प्रवास करताना ती बस म्हणजे एअरबस वाटायची. शक्यतो मोकळीच असल्याने चार्टर्ड प्लेन असल्यासारखा भास व्हायचा. आता इथून पुढे ते शक्य नाही हे लवकरच ओळखून मी पुन्हा गाडीने येऊ लागलो.
तिच्या डिपार्टमेण्टला काही न काही काम काढून जाणं हे सर्वांचं आवड्तं काम होतं. बसच्या ओळखीने मला आता कामाची सबब सांगावी लागत नव्हती. तिच्याकडे जाऊन हक्काने पाचेक मिनिटं गप्पा टाकणं हे रोजचंच झालं होतं. खूपदा तिला मनातलं सांगावंसं वाटायचं, पण तिची भीतीदेखील वाटायची. आपण खूप चम्या आहोत असं वाटून स्वतःवरच चीडचीड व्हायची. मात्र, एक ना एक दिवस ती आपलीच होईल असं माझं मन माझ्याच मनाला दिलासा देत असायचं. काही तरी असं व्हावं कि तिने म्हणावं "व्वाव ! बात है इस लडकेमे !"
तिला इंप्रेस करायची संधी शोधण्याचं काम चालूच असायचं. तिला सलमान खान आवडायचा हे तिनं सांगितलं होतं. ते पक्कं लक्षात ठेवलेलं होतं. त्या वेळी सलमान ऐश्वर्याच्या मैत्रीची चर्चा चालू होती. हम दिल दे चुके सनम आणि ताल येऊन गेलेले होते. ऐश्वर्या रायला गटवलं म्हणून सलमानवर रागच होता पण एसला आवडतो म्हटल्यावर नाईलाज होता.
एकदा एका व्यवहारासंदर्भात मित्रांबरोबर भोरला गेलो होतो. रजा टाकली होती. तिथे फिरताना सलमानखान, सुभाष घई, ऐश्वर्या राय यांच्या जमिनीबाबत समजलं. सलमानखानचं नाव ऐकताच डोक्यात काहीतरी क्लिक झालं. डोकं वेगात काम देऊ लागलं. दुस-या दिवशी कामावर गेल्यावर नेहमीप्रमाणे तिच्या डिपार्टमेण्टला चक्कर टाकली. तिने "कुठे गेला होतास काल " म्हणून विचारलं. बस्स, मी याच प्रश्नाची वाट बघत होतो. लगेचच ठरवून आल्याप्रमाणे तिला सगळी "कथा" सांगितली. भोरच्या ट्रीपचं वर्णन करत तिला मोबाईलवरून काढलेले फोटो दाखवले. मग सलमानवाली जमीन दाखवली. इथपर्यत ष्टोरी व्यवस्थित चालली होती. तिच्या चेह-यावर अपेक्षित भाव दिसत होते. त्यामुळं हुरूप आला.
मग हळूच विचारलं "काल मला तिथे कोण भेटलं असेल ?"
तिने अगदीच मठ्ठ चेहरा करत नाही सांगता येत अशा अर्थाची खूण केली.
मी मग आणखी ताणत ओळख ओळख म्हणत राहीलो.
तिने हरल्यासारखे भाव दाखवत सांग आता तूच म्हटल्यावर मी तिला आश्चर्याचा धक्का दिला.
" काल तिथे दुपारच्या सुमारास सलमान खान भेटला !! त्याची जमीन आहे ना तिथं. आमची ओळख झाली. त्याच्याशी मी शेकहँडही केला. हा बघ त्याचा मोबाईल नंबर !!" एजंटकडून घेतलेला मोबाईल नंबर दाखवून तिला इंप्रेस केलं होतं. (मला वाटलं ती विचारेल, बघू कुठला हात हातात घेतला होतास ... वगैरे वगैरे )
पण तिच्या चेह-यावर अगदी चमत्कारीक भाव होते. बरेंचसे हसू दाबल्यासारखे. मी विचारलं " काय झालं ?"
ती म्हणाली " अरे, काल ना दुपारी मी लवकर घरी गेले होते. टीव्हीवर फिल्मस्टार्स आणि क्रिकेटर्स यांची लाईव्ह मॅच (क्रिकेट कि फुटबॉल ते आता आठवत नाही) मुंबईत चालू होती. त्यात सलमानही खेळत होता. कालच मला कळालं कि त्याला टक्कल आहे ते... सॅड ना ? "
नंतर दिवसभर माझ्याकडे पाहून ती फिस्सदिशी हसत होती. कॅण्टीनमधे तर तिची एक जाडी मैत्रीण माझ्याकडे वळून वळून पाहत हसत होती. जेवण झाल्यावर दोघी माझ्याशी बोलायला आल्या होत्या. भरल्या कॅण्टीनमधे ती माझ्याकडे येताना पाहून सगळ्यांच्या नजरा आमच्याच टेबलावर खिळल्या होत्या. लोकांना काहीच माहीत नव्हतं. मात्र, दोघींच्या चेह-यावरचे भाव पाहून माझ्या भरल्या पोटातही खड्डा पडला.
"हल्ली दिसत नाहीस रे बसला ?" या प्रश्नाने उडालोच. मी पुन्हा गडबडलो आणि सुचेल तसं थातूर मातूर बोलून वेळ मारून नेली. त्यावर तिचा पुढचा प्रश्न तयारच होता. चेह-यावर अगदी गोड हसू होतं.
" लवकर यायचास रे तेव्हां !"
" हो ना ! हल्ली जमतच नाही "
" आपली रोज गाठ पडायची नाही का ?"
" हो ना ! काय योगायोग होता ना ? "
"हो ना ! कसं काय रे ?"
" बहुतेक तुझ्या घरापासून आणि माझ्या घरापासून मनपाला येणा-या बसचं टायमिंग मिळतंजुळतं असेल "
"असेल बै तसंच! "
" हो ना !"
" नाहीतर बसत असशील कुठेतरी लपून झाडाच्या आडोशाला... तसं तर नव्हतास ना करत ? कुणाचं काय सांगावं !! "
आणि दोघी जे चेकाळल्यासारख्या हसत सुटल्या कि मा़झ्या चेह-यावरचे सगळे रंग उडाले.
एकतर कॅण्टीन ! जेवायच्या वेळेत सैलावलेले कामगार. त्यात ती माझ्याकडे आलेली म्हणून शिव्याशापही ! इतक्या लांबूनही त्या सराईत नजरांना माझ्या चेह-यावरचे उडालेले रंग स्पष्ट दिसले असणार यात शंकाच नव्हती. ज्यांना दिसले नसतील त्यांच्यासाठी त्या दोघींचं हसणं पुरेसं बोलकं होतं. आता शिव्याशाप थांबून एक पत्ता कट झाल्याचा आनंद त्या दिवशी सर्वांना झालेला असणार याबद्दल मला खात्रीच होती.
मी लवकरच ती नोकरी बदलली.
आज हे सगळं आठवलं तरी हसू येतं मात्र त्या दिवसात भयंकर खजील झालो होतो सगळं ओमफस्स झालं म्हणून ! सगळं संपलं असं वाटत होतं. जगाचा अंत झाल्याची भावना झाली होती. पोरगी पक्की बेरकी होती. मुलींना बरीच अक्कल असते हे तेव्हाच समजलं. पुढे पुढे तर बरंच काही समजत गेलं. दिवाना मस्ताना गेम जोरात असताना मी तिला एक गिफ्ट दिलं होतं. तिने आधीच मोठे असलेले डोळे आणखी मोठ्ठे करीत आश्चर्यचकीत होत त्या गिफ्टचा स्विकार केला. खूप वेळेला थॅंक्सदेखील म्हणाली. त्या वेळीही असाच हवेत होतो. नंतर कंपनी सोडल्यावर कळालं कि तिने प्रत्येकाच्या गिफ्टचा स्विकार इतक्याच "प्रेमाने" आणि आश्चर्याने केला होता !
मनात विचार यायचे, आपण इतके साधेसुधे.. आपल्यालाच अशी बेरकी कन्या का बरं भेटावी ? खरंच त्या वेळी कसली तरी भीती वाटायची. नोकरीला लागायच्या आधी एकदा एका मैत्रिणीला मुळशीला यायची गळ घातली होती. मुळशीलाच का तर ब-याच जणांच्या मुळशी ट्रीपची वर्णनं ऐकली असल्याने आपणही एखाद्या मुलीबरोबर मुळशीला जाऊन यायला हवं असं वाटू लागलं होतं. त्या मैत्रिणीच्या खूप मिनतवा-या केल्यावर ती यायला तयार झाली. मित्राकडून गाडी घेतली ( अशा कामाला मित्रप्रेम उफाळून यायचं सर्वांचं ). पण पौड आल्यावर वडिलांचा उग्र चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. एक भीतीची लाट मनाला थडकून गेली आणि नंतर एकदम अपराध्यासारखं वाटू लागलं. अरेच्या आपले वडील मर मर मरताहेत आणि आपण पोरगी फिरवतोय ? हे असले विचार मनात येऊन मी मागे फिरलो. ती मैत्रीण प्रचंड वैतागली. एक तर ती यायलाच तयार नव्हती. आली तेच लेक्चर बुडवून.. आणि आता हे असं !
असे उच्च विचार असून देखील व्ह्यायचं तेच झालं. पिताश्रींचे एक ब्रह्मे नावाचे सहकारी भूगावला राहत असत. त्यांनी नेमकं मला चांदणी चौकात पाहीलं होतं आणि ओळखलंही. या घडामोडी मला घरी गेल्यावरच कळाल्या. त्या दिवशी असा काही उद्धार झाला घरात कि ज्याचं नाव ते. भित्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीची प्रचिती आली. पण पुन्हा मुलींच्या वाटेला जायचं नाही अशी प्रतिज्ञा करूनही एसच्या बाबतीत हे सगळं घडलं होतं.
नोकरी बदलल्यावर पुढची नोकरी लाभदायी ठरली. त्यानंतर स्थिरावत गेलो. व्यवसाय सुरू केला. मागचे अनुभव जमेस धरता पुन्हा पोरगी या प्रकाराच्या वाटेला गेलो नाही. मधल्या काळात लग्नही झालं. एस पेक्षाही सुंदर आणि सालस बायको मिळाली. छानसा संसार सुरू झाला. पण म्हणतात ना कि जुनी पापं उफाळून वर येतात ते !!
एक दिवस घरी आलो तर बायको काहीच बोलेना. सारखीच डोळ्याला पदर वगैरे लावायची. मला काहीच समजेना. दोन दिवस हा प्रकार झाल्यावर मी तडकलो आणि हे काय चाललंय म्हणून विचारलं तर उलटंच झालं. तिने एसचं नाव घेतलं. कोण आहे ती या प्रश्नावर माझी पाचावर धारण बसली. हिला कुणी काही सांगितलं कि काय ? ओपनवाल्यांनी खुन्नस अशी काढली कि काय अशा प्रश्नांनी भंडावून सोडलं. श्वास गळ्यात अडकले होते. पायाला कंप सुटला होता.
तिने रडत रडत एक पत्र हातात दिलं. मी उघडून वाचलं अरे हे तर आपलंच अक्षर ! बघू तरी काय लिहीलंय ते म्हणून वाचलं तर...
"प्रिय एस
तुला प्रिय असं म्हणायचं धाडस करतोय. हे पत्रं तुला लिहीणारच नव्हतो. पण सांगायचं धाडस होत नव्हतं. तुला पहिल्यांदा पाहिल्यापासूनच मी वेडा झालो आहे. सारखे तुझेच विचार मनात येतात. कशातच लक्ष लागत नाही. गाडी चालवतानाही आजूबाजूला तूच दिसतेस. कधीतरी ऍक्सिडेंट होईल असं वाटतं. तू दोन मिनिटं बोललीस तरी मला ते २४ तास जगण्यासाठी पुरेसं असतं. पण ज्या दिवशी तू भेटत नाहीस त्या दिवशी मी वेडापिसा होतो. अन्न पाणी यावरची वासना केव्हाच गेली आहे. माझ्या या आजाराचं औषध फक्त तू आणि तूच आहेस..
क्झजस क्झ्क्जस अस्क्झ्क्जु असोइ न्ह्द्स अस द्स्ड्स द्सुह कगत्सिद्स अजफ्व्स्द द्ज्द्श्गसस इ. इ. इ.
तुझा आणि फक्त तुझाच
- एक वेडा "
सगळाच आनंदी आनंद लिहून ठेवलेला होता पत्रात. त्यात तिला पाहण्यासाठी कसा लपून बसायचो वगैरे वगैरे सगळा इत्थंभूत कबुलीजबाब पण होता. संपूर्ण अनटोल्ड लव्ह स्टोरी !! अगा जे घडलेचि नाही ते असं भूत बनून छळायला आलं होतं. च्यायला कधी लिहीलं आपण हे ? हे सगळं ती हसल्यानंतर जे डिप्रेशन आलेलं तेव्हाच लिहीलेलं असणार. त्या वेळी काहीच समजत नव्हतं. फक्त ते हसणं वेळी अवेळी कानावर यायचं.
पण ते पत्र कधीच तिला दिलं नव्हतं. कसं कोण जाणे त्या कंपनीच्या कागदपत्रांसोबत एका कॅरीबॅगेत ते न सापडण्यासारखं ठेवलेलं होतं. मलाही पुन्हा ते कधीच दिसलं नव्हतं. पण बायकोच्या हातात कसं काय आलं ?? आजही हा प्रश्न छळतोय. पोलीस डॉग आणि बायको यांच्यापासून काहीही लपून राहत नाही. त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवच आला.
ते प्रकरण मिटवता मिटवता इतकी दमछाक झाली जितकी इंग्लंडविरुद्ध टीम इंडीयाचीही झाली नसेल. पु ना गाडगीळ सराफ यांचे सहकार्य आणि आयनॉक्सचे सौजन्य यामुळे रणभूमीवरच्या युद्धाचे तहात रूपांतर झाले. तरीही शीतयुद्ध कालीन इशारे अजूनही चालूच असतात. त्या एका पत्रामुळे संसाराच्या पीचवर कायमच बॅकफूटला जाऊन डिफेन्सिव्ह खेळण्याचा करार आमच्या टीममधे झालाय. आजही चुकून एखादी सिक्सर बसली कि रशियाचे अध्यक्ष अमेरिकेला त्या एका विशिष्ट ब्रीफकेसची धमकी द्यायचे ना तसा त्या पत्राचा उल्लेख अजून होत असतो. आता त्यातही काही विशेष राहीलेले नाही म्हणा ! आपला नवरा योग्य मार्गावर आहे याची बायकांना खात्री असते.
काहीच महिन्यांपूर्वी त्या जुन्या कंपनीतल्या एका सहका-याच्या वास्तुशांतीचं आमंत्रण आलं आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही दोघेही गेलो होतो. बायकोइतकीच मलाही ती भेटेल का याची उत्सुकता होती. आता अर्थातच तशी काही ओढ नव्हती. मात्र वेड्या वयातल्या आठवणींच्या साक्षीदार असलेल्या गोष्टी, व्यक्तींबद्दल एक हळवा कॉर्नर मनात असतो. त्यात ते पहिलं वहिलं प्रेमपात्र ! जरी असफल प्रेम असलं तरी ! सर्वांना भेटून खूप बरं वाटलं त्या दिवशी. बरेच जुने मित्र भेटले. यजमानांच्या घराचे तोंडभरून कौतुकही झाले.
मग लक्षात आलं कि सर्वांच्या मनात असला तरी कुणीच तिचा विषय स्वत:हून काढत नव्हतं. मी ही ठरवलं होतं बायकोची आणि तिची ओळख करून द्यायची. तिच्यापेक्षा सुंदर बायको मला मिळालीय हे तिला एकदा कळायला हवंच होतं ( तूने बेदर्दी से ठुकरा दिया लेकिन देख मै कितना खुशनसीब निकला याचा अहसास तिला द्यायचा होता म्हणजे तिने काय मिस केलं हे तिच्या लक्षात आलं असतं).
निघण्याची वेळ झाली तरी ती आली नाही तसं न राहवून मी एका जवळच्या मित्राकडे तिचा विषय काढला. तसा तो गंभीर झाला.
"तुला माहीत नाही ?"
"काय ?"
" खूप वाईट झालं "
" काय झालं ?"
" तिचं लग्न झालं नाही. कुठलंच स्थळ तिला पसंत पडत नव्हतं. खूप हाय एक्स्पेक्टेशन्स होत्या तिच्या. बहुतेक मंगळही असावा. वय वाढत चाललं होतं. त्यात सिक्युरिटीच्या हेडशी तिचं अफेअर सुरू झालं. "
" कोण ते कॅप्टन पिल्ले ?? अरेरे ! ते तर दुप्पट वयाने तरी असतील तिच्यापेक्षा !"
" हम्म ! पुढे त्यांच्यात काय झालं माहीत नाही. एचआरडी पर्यंत वाद गेला होता. पिल्लेची बायको, कॅप्टन पिल्ले आणि एस यांच्या सारख्या मिटींगा व्हायच्या. कंपनीने चौकशी करून एसलाच कामावरून काढून टाकलं. पुढे काहीच कळलं नाही तिच्याबद्दल. शेवटची बातमी आली ती तिने सुसाईड केल्याची !"
जबरदस्त धक्का बसला होता. कुठेतरी आत चटका लागला त्या बातमीने !
आता तो सगळा भूतकाळ असला तरी मनाची हे ऐकायची तयारी नव्हती. घरी जाताना गाडी चालवताना त्या दिवशी सगळीकडे तीच दिसत होती, अगदी पत्रात लिहील्यासारखी. बायको सारखी ती नाही आली म्हणून विचारत होती पण तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याची कसलीच घाई वाटत नव्हती. काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. कुठेतरी जाऊन एकांतात बसावंसं वाटत होतं. उगाचच कारण नसताना मन खात होतं. अपराध्य़ासारखं वाटत होतं. जे काही झालं त्याला सर्वस्वी तीच जबाबदार होती, तरीही कुठेतरी मनाला टोचणी लागली होती. त्याच वेळी स्वत:च स्वत:ची समजूत घालायचं काम दुसरं मन करत होतं. त्या दिवसाने खूप गंभीर केलं, अंतर्मुख केलं. टोचणी कसली याचं उत्तर मिळत नसल्याने अस्वस्थ वाटत होतं.
आणि एक दिवस टीव्ही बघत बघत मुलं, बायको यांच्याशी मस्ती चालली असताना अचानक उत्तर मिळालं. मी सुखात होतो. अगदी सुखात! आणि ती ? खरंच काही संबंध नव्हता, तिच्या शोकांतिकेला मी जबाबदारही नव्हतो, पण असं वाटलं खरं.. एकदाच हिय्या करून तिला विचारलं असतं तर ?? कुठेतरी वाटत होतं कि ती हो म्हणाली असती. त्या वेळी प्रपोझ केलं असतं तर कदाचित आज ती असती.
टोचणी कशाची याचं उत्तर मिळालं याचंच समाधान वाटत होतं. मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. जिच्यासाठी एकेकाळी वेडा झाललेलो तिच्या शोकांतिकेबद्दल आता तितकंसं दु:खं वाटत नव्हतं. होती ती फक्त चुटपुट ! त्या दिवशी मनाच्या या खेळाच खरोखर नवल वाटलं आणि मग मी पुन्हा इतरांप्रमाणेच माझ्या विश्वात दंग झालो.
ती मात्र कधी नव्हतीच अशी सर्वांसाठी विस्मरणात गेली होती... एखाद्या विरून गेलेल्या क्षणिक झुळुकीसारखीच!
- Kiran
तळटीप : या लिखाणावर साहीत्यिक संस्कार टाळून जसं स्पुरलं तसंच वाचकांसाठी द्यावंसं वाटलं.
* - टायपो दुरूस्त केला. (निंबुडाला धन्यवाद)
धन्यवाद मित्रहो मी_नताशा -
धन्यवाद मित्रहो
मी_नताशा - काल्पनिक किंवा सत्यकथा यापैकी जे हवं ते समजू शकता.
मस्तच.
मस्तच.
Kiran .. ya profilechi
Kiran .. ya profilechi created link pahata ye nahi. Kay karan asel?
Pages