निश्चल

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

सकाळचे साडेसहा वाजले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर सूर्यनारायण नुकताच उगवला होता. खरंतर मला अजिबात उठायची इच्छा नव्हती. पण आता ड्युटीची वेळ झाली होती. सगळं आवरून मी रूमच्या बाहेर आले. हलकंसं धुकं उन्हाबरोबर लपंडाव खेळत होतं. त्यातच दवबिंदू हलकेच चमकत होते. दूरवरचा धबधबा मोत्यासारखा दिसत होता. माझ्या रूमबाहेरची दरी हिरवी शाल ओढून अजून साखरझोपेत होती. मी मात्र उठून कामाला लागले होते. अख्ख्या रीझॉर्टमधे इतक्या लवकर कुणीच उठले नसेल. इथे येणारे बहुतेक हनीमून कपल्सच. ते कशाला इतक्या पहाटे उठतील? मी आणि अभि जेव्हा गोव्याला गेलो होतो, तेव्हा काय केलं होतं? अभिच्या आठवणीसरशी अंगावर काटा आला. तीन वर्षें झालीपण? तीन वर्ष मी त्याच्याशिवाय जगतेय. एकत्र जन्ममरणाच्या शपथा घेतल्या होत्या आम्ही. आणि आज तो हे सारं तोडून निघून गेला. मी मात्र वाट बघत राहिले...... तो परत येणार नाही हे माहित असूनही... तिथेच.. त्याची वाट बघत.. तशीच निश्चल..

पाठून कुणाच्या तरी पावलाचा आवाज आला. मी पाठी वळून पाहिलं. "उठलीस पण एवढ्यात? मला वाटलेलं दुपारपर्यंत तरी डोळॆ उघडणार नाहीस.. कालची रात्रच तशी होती ना.." तो मिश्किलपणॆ हसला. त्याने हलकेच माझ्या गालावरून हात फ़िरवला. मला या क्षणी त्याचा स्पर्श सुद्धा नकोसा होता..
"अभिजीत.. प्लीज.." मी त्याचा हात झिडकारला आणि तिथून निघाले.

"सावरी..." त्याने आवाज दिला. पण मी थांबले नाही. स्वत:वरच मी चिडले होते. कदाचित त्याला हे समजलं असावं. तो तिथेच थांबला.

मी रूमवर आले. चेहर्यावर गार पाणी मारलं. पण तरी मन काही शांत झालं नाही. कुणीतरी नाश्ता आणून ठेवला होता. माझी त्याच्याकडे बघण्याची सुध्दा इच्छा नव्हती. मी खिडकीच्या जवळ खुर्ची टाकून बसून राहिले.

कुठून निघाले होते आणि कुठे पोचले होते. स्वत:शीच हिशोब मांडत बसले होते. हातात जमा काहीच नव्हतं. सगळं गमावलेली मी... आता काय मिळवण्याच्या पाठी होते कुणास ठाऊक?
रूमची बेल वाजली. दारात पिंकी होती. रीझोर्टची चीफ़ शेफ़, तिला काहीतरी सामान मागवायचं होतं,
मी काम सुरू केलं पण माझं लक्ष नव्हतं.
"आसावरी... काय झालय? तू फ़ार उदास दिसतेस.." ती म्हणाली.
"काही विशेष नाही. जरा घरची आठवण येत होती म्हणून..." मी सारवासारव करायचा प्रयत्न केला.

"मग घरी जात का नाहीस. सुट्टी घे ना.. इथे जंगलात रहायचं तर वैताग आहे.." पिंकी बडबडत होती.
माझं लक्ष नव्हतं. घर.. ते आता राहिलंच कुठे होतं? आई बाबाचं घर होतं. अभिचं घर होतं. आईबाबांचं घर सोडून अभिच्या घरात गेले होते. पण अभिच मला सोडून गेला होता.

"अभिजीत पण पुढच्या महिन्यात सुट्टीवर जाणार आहे," पिंकीच्या या वाक्याने मी भानावर आले.
खरंच तो म्हणाला होता... पुढच्या महिन्यात तो पुण्याला जाणार होता. येतेस का असंही विचारलं होतं.
"पिंकी.. तुझी लिस्ट बरीच मोठी आहे. इथे हे सगळं सामान मिळणार नाही. चार पाच दिवस लागतील." मी विषय बदलायचा प्रयत्न केला.
"ओके. पण लवकर.. आणि त्या फ़िशवाल्याला रोज फ़्रेश माल द्यायला सांग. परवा एक कस्टमर ओरडत होता."
पिंकीच्या येण्याचा मला फ़ायदा झाला होता.. कामाचं रामायण पडलं होतं. आता माझ्याजवळ विचार करायला वेळ नव्हता. स्वत:ला स्वत:पासून विसरण्यासाठी तर मी इथे आले होते ना..

दिवस सगळा असाच कामात गेला. जरी मी या रीजॉर्टची व्यवस्थापक होते तरी माझ्या हाताखाली कुणीच नव्हतं. सगळी कामं मलाच बघायला लागत होती. त्यातच दिल्लीवरून आलेल्या एका कस्टमरच्या पोटात दुखायला लागलं. जवळचं शहर म्हणजे बेळगाव.. तिथपर्यत त्याला घेऊन गेले आणि चेक अप करून आणलं.

हे जंगल रीजॉर्ट कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर होतं. पहिल्यांदा जेव्हा इथे आले तेव्हा हरवल्यासारखं झालं होतं मला. आई बाबा तर अशा ठिकाणी मी एकटी कशी राहू शकेन या प्रश्नात होते.. तर मी आता इथे मी एकटीच... या आनंदात. मस्त हिरवीगार दरी... मोठ्यामोठ्या रूम्स. एकमेकापासून मुद्दामच लांब ठेवलेली कॉटेजेस. आणि सभोवताली किर्र जंगल. अभि जर इथे आला असता तर कायम इथेच राहायचं असं म्हणाला असता... आणि म्हणून असेल पण मी इथे रहायचं ठरवलं.

इथे दिवस कसा जायच कळायचाही नाही... अवघा तीस जणाचा स्टाफ़ होता.. आता पावसाळा जवळ आल्यामुळे अर्धे लोक परत जाणार होते. फ़ारतर दहा बारा जण उरलो असतो आम्ही.

आजचंही काम आटोपलं आणि मी माझ्या रुमवर आले. अख्ख्या रीजॉर्टमधलं हे सगळ्यात दूरचं कॉटेज. माझं कॉटेज संपलं की सुरू व्हायची खोल दरी...

काळोखामधे मात्र दरी आहे की नाही ते समजायचंच नाही... आताही मी सगळे लाईट बंद केले आणि शांतपणे बेडवर पडून राहिले. अकरा साडे अकरा वाजले असावेत. रूमचा दरवाजा उघडला. मला कोण आलं ते बघायची वाटली नाही. माझ्या कॉटेजचा चावी माझ्याशिवाय फ़क्त अभिजीतजवळ होती.
"सावरी... " त्याने मला आवाज दिला.
"अभिजीत.. किती उशीर करतोस?" मी त्याच्या मिठीत शिरले.

परत एकदा अपराधीपणाची भावना मनात येऊन गेली. परत एकदा अभिजीतच्या उष्ण श्वासात ती जळून गेली. मी विधवा होते... पण म्हणून मला जगण्याचा हक्क नव्हता? का मी माझ्या सासू सासर्‍याच्या आणि आई वडीलाच्या डोळ्यात धूळ फ़ेकत होते? पण मी माझ्या उण्यापुर्या दहा महिन्याच्या संसाराच्या आठवणी घेऊन मी कसं अख्खं आयुष्य जगणार होते?

रात्र चढत गेली तसे सगळेच प्रश्न बाजुला पडत गेले. उरले ते फ़क्त देहाने देहाला दिलेले साद प्रतिसाद...

पहाटे जाग आली... तर अभिजीत उठून निघून गेला होता. आता मला झोप येणं अशक्य होतं डोळ्यासमोर मला माझा अभि दिसायला लागला होता. अभि आणि मी.. कॉलेजात असताना आमची ओळख झाली आणि कधी प्रेमात पडलो तेच समजलं नाही. त्याला नोकरी लागल्या लागल्या लग्न करायचं असं आम्ही ठरवलं होतं. सुदैवाने त्यालाही लगेच नोकरी लागली. आणि सहा महिन्यात आम्ही लग्न केलं. नव्या घरात मला कधीच परक्यासारखं वाटलं नाही. आईनी मला अगदी लेकीसारखं वागवलं. त्याना खरंतर मुलीची खूप हौस होती. पण अभि तर एकुलता एक.. मग मलाच मुलगी मानून खूप लाड करायच्या. सासरे तर त्याहून गमतीशीर होते. आणि अभि.... स्वर्ग म्हणजे काय ते मला पहिल्यादा समजलं होतं. खूप सुखात होते मी....

पण कदाचित हे दु:खाच्या आधीच सुख होतं... कारण एके रात्री अभिला ऑफ़िसवरून यायला उशीर झाला.. तसा तो हल्ली होतच होता काम वाढलं होतं म्हणून. पण रात्रीचे दीड वाजले तरी तो आला नाही. मी वाट बघून झोपी गेले तोच फ़ोन वाजला. बाबानी सगळी धावाधाव केली. अभिचे सगळे मित्र आले. माझे आईवडील पुण्यावरून आले. मला कित्येक वेळ नक्की काय चालू आहे तेच समजेना. आणि मग मला जेव्हा कळलं तोपर्यन्त अभि मला सोडून गेला होता... कायमचा. "आता जाउन येतो बघ,..." असं सकाळी म्हणाला होता आणि परतच आला नव्हता.

आई बाबा पारच कोलमडले होते. त्याच्याकडे बघणारं कुणी नव्हतं. मला परत पुण्याला पाठवायला ते तयार झाले पण मी नाही म्हणून सांगितलं. आता हेच माझं घर होतं. अवघी बावीस वर्षाची मी... पांढर्‍या कपाळाने रहायला शिकले. वेळ जावा म्हणून पुढे कसले कसले कोर्सेस केले. पण माझ्या आईवडलांना आणि सासूबाईंना माझी जास्तच काळजी होती... . हळू हळू माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली. खरं तर मला पुन्हा एकदा डाव मांडायची कसलीही इच्छा नव्हती. पण आई बाबाना तसं मला सांगताही येईना. त्याना माझ्या भविष्य बदलायचे होते.. मी भूतकाळातच जगायचा हट्ट धरून बसले होते.

माझी ही अवस्था माझ्या आई बाबाना बघवत नव्हती. खरं तर मी सुख आणि दु:खाच्या पलीकडे जाउन पोचले होते. मला अभिकडे जायला वेळ लागला नसता पण मग त्याच्या आईवडीलाकडे बघणारं कोण होतं?

"आसावरी.." एके दिवशी बाबानी मला आवाज दिला. मुळातच त्याचा स्वभाव कमी बोलण्याचा होता आणि आता तर अजिबात बोलत नसत.

"काय बाबा?" मी विचारलं.

"हे वाच" त्यानी मला एक पत्र दिलं. माझ्या आईने माझं नाव एका विवाह मंडळात नोंदवलं होतं. मला तिचा इतका राग आला होता. मला न विचारता तिने हे काम केलं होतं. पण बाबा आणि आई दोघे काहीच बोलले नाहीत. उलट आईंनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजावलं. सगळं आयुष्य बालवाडीच्या मुलांबरोबर घालवलं असल्यामुळे असेल कदाचित पण त्याना न सांगता बरंच काही समजायचं. माझ्या मनातली प्रत्येक भावना त्या चटकन समजून घ्यायच्या.

"आसावरी,,, अगं, एक माणूस गेलं म्हणून का आपलं जीवन थांबते? त्याचं इतक्याच दिवसाचं ऋण होतं त्याने फ़ेडलं.... आपलं अजून आहे असं समजायचं..." नाना तर्‍हेने त्या माझी समजून घालायच्या.. कधी मला पटायचं, कधी नाही. पण मी त्याना कधीच काही उलट बोलले नाही.
असंच परत एक पत्र आलं. नाशिकचा कुण्या बिजवराचं स्थळ होतं. आधी बाबानी मला विचारलं, "करायची ना पुढची बोलणी?"
मला नकार द्यायचा होता... पण बाबाच्या पुढे बोलायची हिंमत झालीच नाही. त्याची भिती नव्हती.. पण त्यांची माझ्याविषयीची ममता खूप काही सांगून गेली.

पण इतकं सहज माझं नशीब यापुढे नव्हतंच. या माणसाच्या आईने माझी पत्रिका मागितली होती. या आधी ती काढलीच नव्हती. बाबाच्या ओळखीतल्या एका माणसाला सगळी माहिती दिली. तो दोन तीन दिवसात घेऊन येतो म्हणाला....

मी पायर्‍या चढून वर आले. दुपारचा एक वाजला असावा. घरात कुणीतरी आलं होतं. मी दरवाजा उघडून आत जाणार तेवढ्यात माझी पावलं थबकली.
"हं... पत्रिका पाहून वाटलंच होतं मला. पण आता तुम्ही सांगितल्यावर विश्वास बसला. कठीण आहे हो... तुम्ही आधी पत्रिका पाहिली असती तर कदाचित सगळं टाळता आलं असतं... पण आता काय करणार? अहो, इतका कडक मंगळ.. कशी ही मुलगी संसार करेल? स्वत्:चं कुंकू स्वत्: पुसण्यतच हिला समाधान वाटेल आयुष्यभर..."

तिथल्या तिथे धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर किती बरं झालं असतं....
म्हणजे अभिच्या अकाली जाण्याला मी जबाबदार होते.???? जर मी त्याच्या आयुष्यात आलेच नसते तर कदाचित.... मी मारलं होतं त्याला... माझं कुंकू मीच पुसलं होतं. अभिच्या जाण्यापेक्षाही हे दु:ख मला असह्य झालं. मरणा मरणाच्या यातना देऊन गेलं.

इतके दिवस आयुष्याला जोडणारी कुठेतरी एक नाळ शिल्लक होती. त्या एका वाक्याने तीही तुटली. आई बाबानी जर मला दोष दिला असता तर कदाचित बरंच झालं असतं. पण त्यानी मला यातलं काहीच सांगितलं नाही.. माझीच मला अपराधीपणाची भावना गिळायला लागली.

तेव्हाच मी घर सोडण्याचा निर्णय घेतला.. कारण आता या घरात मी स्वत्:लाच परकी मानायला लागले होते. पण मला परत माहेरीपण जायचं नव्हतं...

आई बाबानी खूप समजावलं पण मी ऐकायला तयारच नव्हते. नेमकं त्याचवेळेला अभिच्या एका मित्राने हे रीजॉर्ट सुरू केलं आणि मी इकडे शिफ़्ट झाले. जागा बदलली तर माझं मन पण निवळेल म्हणून आईबाबा तयार झाले खरं...

मला त्या वातावरणापासुन दूर जायचं होतं. कारण तिथल्या प्रत्येक गोष्टीशी अभि निगडीत होता. पण जागा बदलली म्हणून मन थोडीच बदलतं. इथं आल्यावरही प्रत्येक वेळेस तो आठवायचाच. इथे खरंच खूप छान वाटायचं. एक तर कुणालाही मी माझा भूतकाळ सांगितला नव्हता. कारण मला स्वत्:ला त्या "बिच्चारी" नजरेची कीव येत होती. मला इथे आल्यावर पहाटे लवकर उठायची सवय झाली.
सकाळच्या प्रसन्न हवेत फ़िरायला खरंच खूप बरं वाटायचं. थंडीचे दिवस होते. त्यामुळे मी शाल ओडून एकदा अशीच भटकत होते.
"हाय.." पाठून आवाज आला.
मी वळून पाहिलं.
साधारण पंचविशीचा एक तरूण होता. असेल कुणी रीझॉर्टचा कस्टमर. पण मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं.
"हेलो" मी हसून उत्तर दिलं.
"यु मस्ट बी आसावरी.." तो म्हणाला.
मी नुसती हसले.
"अभिजीत.." मी चमकून पाहिलं. त्याने हात पुढे केला होता. मी थिजल्यासारखी त्याच्या कडे बघत होते. मूळचा गोरा रंग.. पण उन्हाने बराच रापलेला. काळे डोळे. आणि चेहर्‍यावर हसू..
"केव्हा आलात? आणि कधीपर्यंत.त आहात?" मी विचारायचं म्हणून विचारलं. चेहर्‍ञावर मनातली वेदना अजिबात न दाखवण्याचा प्रयत्न करत.
"काल रात्री आलो.. आणि कदाचित एक सहा महिने तरी इथे नक्कीच आहे.:" तो सहज म्हणाला.

"काय?" मी जरा जोरात विचारलं. "सहा महिने?"
"हो, कदाचित जास्तही लागतील." तो म्हणाला.
कदाचित तो माझी थट्टा करत असावा.
"कुठल्या कॉटेजला आहात?" मी विचारलं.
"त्या तिथल्या..." त्याने लांबवरती बोट दाखवलं.
"पण त्यात तर स्टाफ़साठी आहेत.." मी बोलले.
"मग?" त्याने माझ्याकडे पाहिलं.
कदाचित माझ्या चेहयावरचे प्रश्नचिन्ह त्याने वाचलं असावं.
"ओह.. मी अभिजीत.. इथला नवीन एकॉलोजिस्ट.."

"ओके.." मी बोलले. हा येणार असं मला कळवलं गेलं होतंच...
"आणि या नोकरीशिवाय मी इथे Ph D पण करतोय. या भागातल्या reptiles वरती."
मी आणि तो रेस्टॉरंट्पर्यन्त चालत आलो.
कॉफ़ी घेऊन होईस्तोवर मला त्याने त्याच्याविषयी बरंच काही सांगितलं. समोरचा ऐकतोय की नाही हे देखील न बघता त्याची टकळी चालू असाय्ची..... पिंकीने तर आल्या आल्या त्याला रेडीओ हे नाव देऊनसुद्धा टाकलं होतं. त्याला सगळेजण अभि म्हणायचे.. मी कधीच म्हटलं नाही.

अभिजीत केव्हा माझा मित्र झाला ते कळलंच नाही. सगळ्या स्टाफ़चा तसा तो लाडका होता. म्हातार्‍या गुरूकाकानी तर त्याला आपला मुलगाच मानलं होतं.
दिवसभर जंगलात भटकायचा.. कसले तरी किळसवाणे प्राणी गोळा करायचा. आणि त्याचे फ़ोटो काढायचा. भरीस भर म्हणून जो भेटेल त्याला हे प्राणी दाखवायचा... आता गांडुळात बघण्यासारखं काही असतं का.. पण नाही.. हा चक्क त्या गांडुळाबरोबर चहा पीत गप्पा हाणायचा.

पण त्याचं निसर्गावर खूप प्रेम होतं. अख्ख्या रीजॉर्टमधे एक जरी प्लास्टीकची पिशवी दिसली तरी तो भडकायचा. सुरुवातीला मला त्यात चिडण्यासारखं काय आहे तेच कळायचं नाही. पण हळू हळू त्याचं हे वेड लक्षात येत गेलं. रीजॉर्टमधे येणार्‍या सगळ्यांसाठी तो रात्री एक लेक्चर द्यायचा. माणसाने निसर्गावर केलेलं आक्रमण त्याचा दुष्परिणाम.. सगळं इतकं छान समजावून सांगायचा की बास...
अभिजीतच्या लेक्चरच्या शेवटी तो एक वाक्य सांगायचा..
"लक्षात ठेवा माणसाने निसर्गावर कितीही आक्रमण केलं तरी निसर्गाचं काहीही बिघडत नाही.. मात्र मानवाने जपून रहायला हवं कारण आज आपण विसरलोय की आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत... "
हे सांगतानाचा त्याचा आवेश मला खूप आवडायचा.
कधी कधी मी मनातल्या मनात अभिची आणि अभिजीतची तुलना करायचे. एक नाव सोडलं तर दोघात काहीच समान नव्हतं. पण तरीही.. मनातल्या मनात तुलना व्हायचीच.

अभिजीत आणि मी दररोज सकाळी फ़िरायला एकत्र जायचो. त्याचे आईवडील पुण्याला होते. एकच बहीण तिचंही लग्न झालं होतं. घरची परिस्थिती चांगली होती, म्हणूनच याच्या या जगावेगळ्या करीअरमधे येणं शक्य झालं होतं.

"आसावरी... तू या जंगलात का राहतेस?" त्याने एकदा मला विचारलं..
"का म्हणजे मला आवडत..." मी हसून उत्तर दिलं.
"नाही.. तुला इथं आवडत नाही..."
"असं तुला का वाटतं..." मी त्याला विचारलं.
"तू इथे आहेस कारण तू कशापासून तरी लांब जाण्याचा प्रयत्न करतेय्स.." त्याने धीरगंभीर आवाजात उत्तर दिलं...
"तुला असं वाटतं की तू इथे राहिलीस तर जगापासुन दूर आहेस.. "

मला कितीतरी वेळ त्याला काय उत्तर द्यायचं तेच सुचेना.. मी काहीतरी बोलून विषय बदलून टाकला....

त्या दिवशी मला उठायला उशीरच झाला. बाहेर आले तोवर उन्हं वर आली होती. रीज़ॉर्टमधले कस्टमर जंगल सफ़ारीला गेले होते. मी पिंकीला कॉफ़ी बनवायला सांगितलं. तेवढ्यात अभिजीत आला..
"अरे, तू सफ़ारीला गेला नाहीस?" ही टूर नेण्याचं काम त्याचं असायचं.
"नाही, थोडं बरं नाही म्हणून नाही गेलो." त्याचा आवाज पण एकदम खोल वाटला.
"काय झालं?" मी विचारलं.
"तीन दिवस झाले. ताप आहे," पिंकीने सांगितलं, "पण ऐकत अजिबात नाही, आज अगदी उठवतच नव्हतं म्हणून टूरला गेला नाही,"
"अरे मग मला नाही का सांगायचं? मेडीसीन्स आहेत माझ्याकडे." मी म्हणाले.
"नको, मला त्या मेडीसीन्सचा कंटाळा येतो.." त्याने उत्तर दिलं.
मी त्याच्या गालावर हात ठेवला. चांगलाच गरम होता तो.. पण माझ्या अंगावर शहारे का आले ते मलाच कळलं नाही..
मी त्याला मेडीसीन्स आणून दिले... पण का कोणास ठाउक मला तेव्हापासून त्याच्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस होईना. सतत तो त्याची नजर माझ्यावर रोखून आहे असंच वाटायचं.

मी शक्यतो त्याच्याशी बोलणं टाळायला लागले. मी विधवा आहे, मी मंगळी आहे हे स्वत्:च स्वत्:ला शंभरदा बजावायला लागले. कुठल्याही मोहात आता मला पडायचं नव्हतं. माझ्या अभिचा गेला होता.. पण मला आता कुणाचा ही बळी घ्यायचा नव्हता. माझा असल्या गोष्टीवरती कधीच विश्वास नव्हता... पण आता मात्र भिती बसत चालली होती..माझ्याच अजाणतेपणी.. असं म्हणतात की मन वार्‍यासारखं चंचल आहे, मी माझं मन दगडासारखं निगरगट्ट बनवत होते. जमलं असतं का मला हे? अभिजीतच्या नजरेतलं आमंत्रण मी केव्हाच ओळखलं होतं. पण तरीही जाणून बुजून मी अज्ञानी बनायचा प्रयत्न करत होते. स्वत्:लाच मी दगड बनवत होते....

मला स्वत्:ला सावरणं कठीण झालं होतं. कुठेतरी खोलवर आयुष्यामधे असणारी पुरुषाची गरज मलाही वाटत होती. पण तरीही मी समाजाला घाबरून होते. माझ्या आईवडलांना अभिच्या आईवडलांना घाबरून होते... . मात्र ही सगळी बंधने एका क्षणात तुटलीच.

रात्रीचे नऊ वाजले होते. कुणीतरी दरवाजा खटखटवला. एवढ्या रात्री माझ्या कॉटेजवर कोण आलं असेल म्हणून मी दरवाजा उघडला. बाहेर काळामिट्ट काळोख होता. आणि दरवाजात अभिजीत उभा होता.
"अभिजीत, तू काय करतोयस इथे?" तो काहीच बोलला नाही, फ़क्त दरवाजा धरून उभा राहिला.
"अभिजीत..?" मी परत आवाज दिला. तो एकटक माझ्याकडे बघत होता. "आत येऊ?" त्याने विचारलं.
"काय काम आहे?" मी आवाजात उसनं अवसान आणून विचारलं.
"काही नाही" तो तितक्याच शांतपणे म्हणाला.
"अभिजीत, हे बघ, मी इथे एकटी आहे आणि तुझं इतक्या रात्री इथे येणं शोभत नाही.. तू परत जा," मी ही दरवाज्यातच उभी राहिले.
"नाही जाणार.." तो म्हणाला. एखाद्या चाकूने मला थंडपणे कापल्यासारख्या आवाजात.
"हे बघ, अभिजीत.. मी एका घरची सून आहे. लग्न झालय माझं.. आता तरी परत जा..." माझा सूर आता विनवणीचा होता.. त्याने दरवाजा सोडला. माझ्या डोळ्यात भिती थरारून आली होती. एक मन म्हणत होतं त्याला परत जाऊ देऊ नकोस.. पण हे असं वागण्याचा हक्क मी गमावून बसले होते. की माझा तो समज होता. तो परत जाइल असं मला वाटलं. तो दोन पावलं पाठी सरकला. आणि त्याने माझा हात धरला... आणि मला कॉटेजच्या बाहेर ओढलं. त्याने बाहेरचा लाईट बंद केला. मी पूर्णपणे अंधारात होते. त्याचा चेहरा फ़क्त मला दिसत होता. त्याचे डोळे माझ्या चेहर्‍यात काहीतरि शोधत होते.

"आसावरी.. मला आता या क्षणी तू हवी आहेस.." तो हळूच कुजबुजला.

"अभिजीत.. प्लीज.." माझ्या आवाजातला दुबळा प्रतिकार मलाही जाणवला.

ती रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रात्र ठरली. पहाटे पहाटे मी अभिजीतला माझी सगळी कहाणी सांगितली. मी मंगळी असल्यामुळे हे झालं असं सांगितल्यावर तो दिलखुलास हसला...
"मूर्ख आहेस.. माझा अशा गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. आणि तूही ठेवु नकोस.. उगाच डोक्याला ताप.. " तो सहजतेने म्हणाला.
बेडच्या जवळच माझा आणि अभिचा एक फ़ोटो होता. मी तिकडे पाहिलं.... का कुणास ठाऊक.. मला अभि एकदम दिलखुलासपणे हसत असल्याचा भास झाला.

त्या रात्रीनंतर हे कायमच झालं. प्रत्येक रात्र ही अभिजीतच्या मिठीत आणि प्रत्येक दिवस त्या रात्रीच्या आठवणीत. अभिजीत मला खूप समजून घ्यायचा.. माझ्या भावनेची त्याला किंमत होती. मला तरी असं वाटायचं. आमच्या नात्याबद्दल तो कधीच काही बोलायचा नाही. विनाशब्दाचं असं हे नातं होतं. वासनेचं, शरीराचं, ज्यामध्ये भावनेला काहीच जागा नव्हती. जनावर होतो आम्ही.. समाजाने घातलेले सगळे निर्बंध मी तोडले होते.

पाप आहे की पुण्य? माझी "गरज" हा माझा शाप असू शकते का? नवर्‍याबरोबर भावनांचीही चिता जाळावी लागते का? किती प्रश्न मनात उठत होते. आणि उत्तर मिळायची अपेक्षाच नव्हती... प्रश्नच इतके भयाण तर उत्तरे किती भयानक...

कधी कधी मी मनातले सगळं अभिजीतला बोलून दाखवायचे.. तो नुसता हसायचा... त्याच्या मते मी एखाद्या गोष्टीचा जरूरीपेक्षा जास्त विचार करायचे. असेलही.. पण माझं हे स्वरूप माझ्या सासरी किंवा माहेरी समजले तर काय होईल.. विचारानेच माझा थरकाप उडायचा. कदाचित त्यांनी मला समजून घेतलं असतं. पण माझं मध्यमवर्गीय दुबळं मन मलाच कसल्याकसल्या भिती घालत होतं....

तशी कुणाचीच भिती नव्हती.. मी जसे हवे तसे वागायला मोकळी होती.. पण मायेचा धाक फ़ार विचित्र असतो.. आई बाबाना जर कळलं तर ते मला काय म्हणतील याची धास्ती होती.. काही झालं तरी त्याच्या आयुष्यतून अभिला घालवायला मीच कारणीभूत होते ना...... तो विचार करायचा नाही असं ठरवलं तरी तोच विचार नाचायचा मनामधे. भेसूरपणे आणि बीभत्सपणे...

"वेडी आहेस.. हे मंगळ वगैरे सर्व झूठ असतं. आकाशातल्या तार्‍याना काय करायचय आपलं जीवन घेऊन..." अभिजीत माझी समजून काढायचा.. पण तरीही माझं मन कधीतरी मलाच कोंडीत पकडायचं... कधीच मन अचानक उडी घ्यायचं... जर अभिजीतने मला लग्नासाठी विचारलं तर.. काय उत्तर देईन? त्याचा पत्रिकेवर विश्वास नव्हता. पण माझा बसत चालला होता.. आणि पुन्हा असं काही झालं तर....

कित्येकदा मी एकटीच रडत बसायचे. अभिची खूप आठवण यायची. तो जर मला सोडून गेला नसता तर... किती सुखी संसार होता माझा.. जास्त काही अपेक्षा नव्हती मला.. घर नवरा आणि मुलं यातच मी सुखी होते...
दर महिन्याला येणार्‍या त्या क्षणाबरोबर जाणीव व्हायची की मी विधवा आहे... आणि विधवेला आई होण्याचा हक्क नसतो.. जरी जवळ पुरूष असला तरी. आई होण्यासाठी बापाचं नाव जास्त जरूरी असतं.... सगळे घाव सोसूनदेखील दगडासारखं जगायचं होतं.

अभिजीत आज पुण्याला जाणार होता. त्याचं काम जवळ जवळ संपत आलं होतं. त्याला विद्यापीठामधे जाऊन त्याचं काम सबमिट करायचं होतं. पुण्यामधे त्याला चार पाच दिवस लागले असते पण एक गोष्ट जवळ जवळ नक्की झाली होती की अभिजीत आता लवकरच हे रीझॉर्ट सोडून कायमचं जाणार होता.

जशी जशी त्याची जायची वेळ जवळ येत गेली तशी तशी माझ्या मनात एक भिती येत गेली. तशी त्याला एखाद दुसरा आठवडा सोडून रहायची सवय होती पण आता मात्र परत एकटीने जगायचं??

माझ्या मनाला मी कसंही समजावलं असतं पण शरीराचं काय? वाघिणीला जशी रक्ताची चटक लागते तशी मला अभिजीतची लागली होती. आता परत त्याच्या शिवाय जगायचं.. जसं जसं त्याचं Ph D चं काम पूर्ण होत आलं तसं त्याचं माझ्या कॉटेजवर येणंही थांबलं. रात्रभर त्याचं काम चालू असायचं आणि मी मात्र इथे जागी तळमळत असायचे.

तो पुण्याला जाण्या आधी मला भेटायला आला. त्याच्या कुशीत शिरून मी खूप रडले. तो मला शांतपणे थोपटत राहिला. त्याचा स्पर्श किती आश्वासक होता. आणि मी किती वेडी? हातातल्या वाळूला जितका धरायचा प्रयत्न केला जातो तितकीच ती हातातून निसटते.... अभिजीत माझा कधी नव्हताच.. मग त्याच्या जाण्याने मी का रडत होते? दगड बनायचं ठरवत असताना मी का मेण बनत होते?

"सावरी,.. तू पण चल माझ्याबरोबर पुण्याला... तेवढाच तुला चेन्ज होईल..." त्याने माझी समजूत कढली
"नको.. मी पुढच्या महिन्यात जाणार आहे. सुट्टी घेऊन.... " मी त्याला सांगितलं.
"तिथे भेटशील मला?" त्याने विचारलं.
"नाही.."
"का?"
"प्लीज.. अभिजीत... तुला माहीतीये ना मग तरी असं विचारतोस?"
"कारण मला तू पुण्यात भेटशील याची खात्री आहे.. सावरी.. तू माझ्याशिवाय नाही जगू शकणार.." तो माझ्या डोळ्यात बघत म्हणाला....

अभिजीतला पुण्याला जाऊन जवळ जवळ महिना होत आला. तो मला फ़ोन वगैरे करेल ही मला अपेक्षा मला कधीच नव्हती. त्यामुळे जेव्हा त्याचा पहिल्यादा फ़ोन आला तेव्हा मी जरा चमकलेच. नंतर दोन तीन दिवसा आड त्याचा मला फ़ोन येतच होता. फोनवर पण तो किमान अर्धा तास तरी बोलत बसायचा... पण त्याने मला फ़ोन केला की पिंकी अस्वस्थ दिसायची. मी तिला कारणही विचारलं. पण ती काहीच बोलली नाही. फ़क्त "त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नको.. साप आणि पुरुष कधी चावतील त्याचा नेम नाही" असं काहीतरी बोलली. वारंवार विचारून सुद्धा तिनं मला काहीच उत्तर दिलं नाही. काय कारण असावं? कदाचित माझ्याप्रमाणेच अभिजीतचे तिच्याबरोबरही संबंध असतील.. नाना शंका कुशंका माझ्या मनात रेंगाळायला लागल्या.

परत परत मी मनाला एकच प्रश्न विचारला.. एकच उत्तर मिळालं. मला अजूनच अस्वस्थ करत...
त्या दिवशी रूम बॉय माझा फ़ोन आल्याचं सांगत आला.. मी फ़ोन घेतला. पलीकडे सासूबाई होत्या.
"अगं आसावरी... कुणाला नाही तर मला तरी सांगायचं.." खूप दिवसानी त्यांचा आवाज खुश होता. मला काहीच कळेना..
"आई... काय?" मी विचारलं.
"अगं तुझा तो मित्र घरी आला होता... रीझॉर्टवाला.." त्याचं नाव घेताना त्या किंचित अडखळल्या.
"कोण अभिजीत?" मी माझ्या नकळत बोलून गेले. पुढच्याच क्षणी भितीची एक लहर जीव घेऊन गेली. तो घरी का गेला होता आणि त्याने घरी काय सांगितलं?

आईंच्या आवाजातून उत्साह ओसंडून वाहत होता. "आधी मला खरंच वाटेना. मी त्याला म्हटलं सुद्धा माझी लेक असं काही असेल तर मला आधी सांगेल. पण मग..."

"आई.. काय बोलताय तुम्ही? मी म्हणजे.. तसं काही.. अहो,.. मला...." माझे पाय कापत होते. डोकं अचानक गरगरायला लागलं. मी कोसळतेय की काय असं मला वाटायला लागलं.

"अगं वेडाबाई घाबरतेस काय अशी? तुझ्या आयुष्यात नवीन कुणी आलं तर आनंदच आहे आम्हाला.."

माझ्याच नकळत मी हुंदका दिला.
"अहो, बघा, रडतेय ती..." आईनी बाबाकडे फ़ोन दिला.
"आसावरी, अगं रडू नकोस. हे बघ, तो आज घरी येऊन गेला. मुलगा चांगला आहे. आईवडील ही भेटायला येत आहेत. तुझ्या आई वडीलाशीही बोलणी चालू आहेत. त्याचा मुहुर्तावर वगैरे विश्वास नाही. त्यामुळे रेजिस्टर पद्धतीने लग्न करायचं असं तो म्हणतोय.. "

"काय?" माझ्या हातातून फ़ोन खाली पडला. कितीतरी वेळ मी तिथेच उभी होते. आई, बाबा, अभि, सगळ्याचे चेहरी माझ्याभोवती फ़िरत होते. मी कुठे आहे आणि काय आहे हेही मला कळेनासं झालं. अभिजीत माझ्या घरी लग्नाची बोलणी करायला गेला. का? मला न सांगता? एवढा मोठा निर्णय घेण्या आधी त्याने मला सांगितलंही नाही. विचारलं तर नाहीच.

मी अख्खी रात्र जागुन काढली. अभिबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येत होता. मधेच कुठेतरी अभिजीत यायचा. त्याचं हसणं बोलणं.... मधेच एक माणूस ओरडत यायचा.. "ही विधवा आहे.. मंगळी आहे.. स्वत्:चं कुंकू पुसण्यातच हिला समाधान वाटेल." स्वप्नांतून जागं झालं की रात्रभर मनाचे खेळ चालूच.

दोन तीन दिवस असेच गेले. दिवस रात्र एकच विचार.. मी हे लग्न करू की नको? अभिजीतबरोबर झोपताना काहीच विचार केला नाही.. पण त्याच्याबरोबर आयुष्य घालवताना मात्र मी अखंड विचार करत होते.

अभिजीतने मला उद्या सकाळी येणार म्हणून फोन केला होता.. मला पहाटेच जाग आली. माझा निर्णय जवळजवळ झालेलाच होता... पण का कुणास ठाउक खूप भिती वाटत होती त्याच्बरोबर मी जे काही करतेय ते बरोबर करतेय हे ही पटत होतं.

नेहमीप्रमाणे मी सकाळी फ़िरायला निघाले. पावसाळा दोन तीन दिवसावर होता. त्यामुळे ढगाळ वातावरण होतंच. सूर्य उगवला तरीही ऊन नव्हतंच. डोंगर माथ्यावर ढग उतरले दिसत होते. कदाचित आज पावसाचा पहिला शिडकावा होईल. कदाचित होणारही नाही...

मी आज मुद्दाम पांढरीशुभ्र साडी नेसले. बाहेर किंचित थंडी होती म्हणून हिरवी शाल ओढली. अख्ख्या रीझॉर्टवर फिरून आल्यावर मी दरीच्या जवळ आले. शांतपणे तिथेच उभी राहिले. आयुष्याचा हिशोब मांडत होते. किती वेळ तिथे थांबले होते मलाच माहित नव्हतं. हळू हळू सूर्य वर चढत होता. ढगाच्या आडून चमकत होता. माझ्या मनातल्या आठवणीसारखा.

"सावरी.... सावरी.." पाठून आवाज आला. कुणाचा हे सांगायला नकोच..
पण मी वळून पाहिलं नाही, तशीच शांत उभी राहिले.
"इथे का उभी आहेस?" तो अगदी माझ्या पाठी येऊन थांबला. "अख्खं रीझॉर्टभर शोधतोय मी तुला... सावरी माय डार्लिंग.." त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. एखाद्या सापाला झिडकारावं तसा तो मी हटवला. इतक्या वेळाचा माझा संताप आता माझ्या डोळ्यात उतरला होता..
"कोण आहेस तू?" मी थंडपणे विचारलं.
"म्हणजे?" तो किंचित चमकला.
"माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारा तू कोण आहेस?" माझा आवाज अजूनही शांत होता.
"सावरी, तुला म्हणायचय काय? तुझ्या सासरचे माहेरचे सगळे तयार आहेत.."
"पण मी तयार आहे?" मी त्याचं वाक्य मधेच तोडलं.
"म्हणजे.... सावरी प्लीज, माझा मंगळ कुंडली गोष्टीवर विश्वास नाही...."
"माझाही नाही.... "
"तू काय बोलतेस मला कळत नाही. "
"कसं कळणार? कधी विचारलस तू मला? सांगितलस मला? निर्णय घेण्याआधी आणि नंतर ही... माझ्याशी संवाद साधावा असं तुला का वाटलं नाही?"
"सावरी.... हे बघ तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि.."
"अभिजीत... माझं तुझ्यावर प्रेम नाही. गैरसमजातून बाहेर ये." मी त्याच्या डोळ्यात बघत सांगितलं.

"सावरी..."
"हो अभिजीत, आणि मला हे ही ठाऊक आहे की तुझं माझ्यवर प्रेम नाही..."
"तू मुर्खासारखं बोलतेयस"
"ओह. रीअली? मी मूर्ख आहे आणि तू फ़ार शहाणा.. सुधारक... विधवा आणि मंगळी मुलीबरोबर लग्न करायला तयार झालेला... अभिजीत.. तू मूर्ख आहेस."
"सावरी, माझ्या घरचे तयार नव्हते तरी मी त्याना पटवून दिलय की मला तुझ्यासोबतच.."
"आईबाबांना पटवून देण्याआधी माझ्याशी यावर बोलावंसं देखील तुला वाटलं नाही.. त्याची गरजच तुला भासली नाही?"
"काय बोलतेस काय तू? एक तर तुझ्यासाठी मी अख्ख्या घराशी भांडतोय आणि तू मात्र मनाला येतील ते आरोप माझ्यावर लावत सुटली आहेस. "
"आरोप? अभिजीत, खरं तेच बोलतेय मी... तू खूप हुशार आहेस यात वाद नाही... पण मला ही थोडी फ़ार अक्कल देवाने दिलीच आहे ना? ज्या माणसाला लग्नासारख्या गोष्टीचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेताना मला सामिल करून घ्यावंसं वाटत नाही त्याच्याबरोबर आयुष्य काढण्यामधे मला काडीचाही इंटरेस्ट नाही.. "
"सावरी, हे बघ, तू अजून लहान आहेस, एवढं मोठं आयुष्य तू एकटी कशी काढणार आहेस?"

"मलाच का हा प्रश्न? मी बाई आहे म्हणून?? मी विधवा आहे म्हणून? की मी एकटी कशी राहीन म्हणून... जो पर्यन्त एखाद्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं तोपर्यन्त तिला जगायचा अधिकार नसतो का? कुणाची तरी कुबडी घेतल्याशिवाय तिला चालता येतच नाही का? आजवर जगले तशी अजून जगू शकेन. जगण्यासाठी अन्न वारा पाणी हवं असतं. कोणाच्या नावाच्या शिक्क्याची गरज नसते जगायला... "
माझा आवाज भरून आला. माझ्या नकळत.

"सावरी, तुझा काहीतरे गैरसमज होतोय. माझ्याबरोबर चल. कॉफ़ी घे. मग आपण या विषयावर चर्चा करू.. ठीक आहे?" त्याचा आवाज कमालीचा समजूतदार झाला होता "मी याबाबतीत तुझ्याशी आधी बोलायला हवं होतं. चूक झाली माझी"

"नाही, अभिजीत,... हा विषय मला इथेच संपवायचा आहे. अभि गेल्यापासून एकटं राहण्याची शिक्षा मी भोगतेय. तुझ्याबरोबर झोपून मी स्वत्:ला नासवलं आहेच पण आता तुझ्या नावासोबत माझं नाव जोडून मी मलाच त्या चुकीची इतकी मोठी शिक्षा देणार नाहीये."

"सावरी.... अगं असं काय करतेस? मी खूप खुश ठेवीन तुला. कशाचीही कमी पडू देणार नाही.. just believe me"

"नाही अभिजीत.... मी हा खेळ पुन्हा खेळणार नाही. माझी इच्छाच नाही. अभिवर माझं खूप प्रेम होतं रे.. पण तो मला सोडून गेला म्हणून त्याच्याबरोबर माझं प्रेमही गेलं का? मला तुझी गरज शारीरिक पातळीवर होती. मनानं मी कायम त्याचीच राहिले. आहे आणि यापुढेही राहीन,"

"सावरी... मी तुला म्हटलं का की तू त्याला विसर म्हणून? पण माझं तुझ्या वर खरंच प्रेम आहे. "

"बास,,,, अभिजीत, अजून खोटं बोलू नकोस. तू मला कितीही समजावयाचा प्रयत्न केलास तरी मी हे कधीच मानणार नाही की तुझं माझ्यवर प्रेम आहे. तसं असतं ना तर त्या रात्री कॉटेजवर आला नसतास. दिवसाढवळ्या सर्वांसमोर मला तुझ्या प्रेमाची कबूली दिली असतीस. तुझ्या वासनेला मी प्रेम समजायची चूक कधीच केली नाही. प्रेम काय अस्तं याचा अनुभव आहे मला.... आपल्यामधे जे काही होतं ते प्रेम कधीच नव्हतं. "

"सावरी.. झाल्या गोष्टी विसर. नव्याने आयुष्याकडे बघ.."

"अभिजीत, मी नव्यानेच तर आयुष्याकडे बघतेय. आणि आता सगळं कसं स्पष्ट दिसतय मला. कुणाचीही मदत न घेता मला माझं जीवन जगायचं आहे. त्यासाठी जे हवं ते करायची माझी तयारी आहे"

"सावरी, तुला वेड लागलय" त्याचा आवाज किंचित चढला. "तू काय बोलतेस ना ते तुलाच कळत नाहीये"

"हो, असेलही. पण म्हणुन या वेडाच्या भरात मी तुझ्याशी लग्न नाही करणार."
माझाही आवाज तितकाच चढला.

"सावरी.. तुला माझ्याशी लग्न करावं लागेल.. नाहीतर.." त्याने प्रत्येक शब्द अत्यन्त शांतपणे उच्चारला.
"नाहीतर काय?"

"मी सगळ्याना स्पेशली तुझ्या सासू सासर्‍याना जाऊन सांगेन की किती रात्री तू माझ्याबरोबर रंगवल्यास..." त्याच्या चेहर्‍यावर एक हलकंच स्मित होतं. धूर्तपणाचं.

"अवश्य... अवश्य जाऊन सांग. त्याना आधीच समजलेलं उत्तम की त्याच्या जावयाची काय लायकी आहे ती... तू जाऊन सिद्ध कर. अभिजीत, तुझ्या माहितीसाठी म्हणुन सांगते... एक वेळ आली होती की ज्यावेळेला मला वाटलं की मी तुझ्या प्रेमात पडतेय. शरीराचं नातंच तसं असतं. तुला नाही कळणार.. त्यासाठी स्त्रीचा जन्म घ्यावा लागतो. तुम्ही या सगळ्या क्रियेत अलिप्त राहू शकता. पण स्त्रीला शरीर आणि मन या वेगळ्या गोष्टी नसतात. आणि मग शरीराचं नातंच भावनिक होऊन जातं.
पण आता माझ्या मनात असला काहीही गोंधळ नाही. मी स्वत:ला पूर्णपणे ओळखलेलं आहे. मला आता खरंच तुझी आणि तुझ्या सो कॉल्ड प्रेम नावाच्या कुबडीची गरज नाही. अभिजीत, तुला फक्त मी मिरवण्यसाठी हवे आहे. बघा, मी किती सुधारक.. बघा मी किती फॉरवर्ड आधुनिक विचारांचा.. तुझ्यासाठी मी फक्त एक कलेक्टिबल आहे. बरोबर?"

अभिजीतच्या चेहयावरचे स्मित गायब झाले.

"अभिजीत, तुझ्या प्रेमाचा मुखवटा मी केव्हाच ओळखल होता. तुझ्याकडून मला आयुष्यभराच्या साथीची अपेक्षा कधीच नव्हती. आणि जेव्हा तू लग्नासाठी विचारलंस तेव्हा तर कमालच वाटली.... किती सहजतेने तू हा विचार केलास की मी तुला नाही म्हणूच शकणार नाही म्हणून.... पण अभिजीत.... मी नकार देत आहे. तुझ्यासारख्या पुरूषाबरोबर आयुष्य घालवण्यापेक्षा मी एकटी जगणं पसंद करेन. प्रश्न राहिला तो माझ्या गरजांचा... तुला जशी इथे आसावरी मिळाली तसं मलाही अजून कुणीतरी मिळेलच. ज्या क्षणी मी स्वत:लाच प्रेम आणि वासनेमधला.. नातं आणि व्यभिचार यांच्या व्याख्या करायला शिकले तेव्हाच माझ्या जगण्याचे अनेक प्रॉब्लेम सॉल्व झाले.. तेव्हा अभिजीत आपलं नातं इथपर्यन्तच होतं. बाय.."

हे सगळं त्याला अनपेक्षित असावं. त्याच्या चेहर्‍यावर मला प्रेमभंगाच्या दु:खापेक्षा त्याचा इगो हर्ट झाल्याचं दु:ख जास्त दिसत होतं.... माझा निर्णय बरोबरच होता याची मला खात्री पटली..

"सावरी... तू पस्तावशील एक दिवस.." तो निघताना म्हणाला.

"माझं आयुष्य बघायला मी समर्थ आहे. आपण त्याची काळजी करू नका" मी आवाजात कृत्रिमपणा आणत म्हटलं..

तो पाठी वळून निघाला.
मी शांतपणे तिथेच उभी राहिले. घेतलेला निर्णय बरोबर की चूक हे येणारा काळच ठरवणार होता. सध्या माझ्या हातात काय होतं? काहीच नाही. हलकेच वारा वाहत होता. मी तशीच शांत उभी होते. दगडासारखी. निश्चल.

समाप्त.

प्रकार: 
शब्दखुणा: 

क्रमशः Sad जुन्या मायबोलीतली हे वाचून स्क्रोल करुन बघायलाही गेले नाही नाहीतर मी संपूर्ण कथा येईपर्यंत वाचायला जात नाही. लवकर पोस्ट कर पुढचा भाग Happy

अगो, सॉरी. Sad मागच्या अनेक कथांप्रमाणे या कथेचा शेवटदेखील बिघडला होता. तो दुरूस्त करतेय. पण शीर्षक बदलते.

अगं सॉरी काय Happy मला वाटले तू फक्त इथे पेस्टच करणार आहेस आणि लोकांना कथा आठवतेय का ते बघायला तू आत्ता पहिला काही भागच पोस्ट केलास.

थोडीशी बुचकळ्यात पडले. अशा शेवटाची अपेक्षा केली नव्हती ( म्हणजे तिचा नकार देण्याचा निर्णय नव्हे तर त्या निर्णयापर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो. ) पण ह्यामुळेच कथा आवडली Happy
मधलं ते पिंकीचं कॅरॅक्टर अ‍ॅबरप्टली आणि गुंडाळल्यासारखं आलं असं मात्र वाटलं.

म्हणजे तिचा नकार देण्याचा निर्णय नव्हे तर त्या निर्णयापर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो.<< हा प्रवास नीट आलाय का या कथेमधे? जुन्या माबोवर हे अगदीच पपलूटाईप झालं होतं.... म्हणून शेवटचा सीन बराचसा एडिट केलाय.

आरएमडी, मोरपिसे पण चालूच आहे. Happy

धन्यवाद, किरण.

अभिजीत आधीपासुन खुप समजावून घेतोय असे दाखवलेले मग अचानक तो असा यु टर्न का मारतो?

असो, कथा खुप आवडली. शेवट जास्त आवडला. मुळ कथा वाचली नव्हती त्यामुळे ती बरी की ही ते ठरवता येणार नाही.

आणि आता जुन्या मायबोलीत जाऊन शोधणारही तरी कुठे? जाऊदे, मला हा शेवटच जास्त आवडला.

जुन्या मायबोलीतली 'निश्चल' जास्त आवडली होती >> आयला, खरं की काय??? मला त्याचा शेवट बिल्कुल आवडला नव्हता. लई लॉजिकल लोचे होते त्यामधे. कथा संपल्यावर(!!!!) स्वाती आंबोळेनी त्यावर फार उत्तम प्रतिसाद दिला होता.

साधना, तो कुठे यु टर्न मारतो. ती मारते. मुळात नात्यामधे समोरच्या गृहित धरत जाणं चूक हे कित्येकांना लक्षातच येत नाही..

आवड्ला शेवट ..:)
मुळात नात्यामधे समोरच्या गृहित धरत जाणं चूक हे कित्येकांना लक्षातच येत नाही.. >> +१

तुम्ही या सगळ्या क्रियेत अलिप्त राहू शकता. पण स्त्रीला शरीर आणि मन या वेगळ्या गोष्टी नसतात. आणि मग शरीराचं नातंच भावनिक होऊन जातं.
>> मस्तच आहेत या दोन ओळी.
मला कथा प्रचंड आवडली..

तुझ्या कथेतल्या सगळ्या नायिका एकदम मनस्वी असतात. Happy

जुनी कथा वाचलीये . पण आठवत नाहिये.
हि पण खुप आवडली. दक्षिणा ला +१ . मला पण तुझ्या सगळ्या नायिका प्रचंड आवडतात.

नंदिनी, चांगली कथा आहे. अभिजीतचा स्वार्थीपणा स्पष्टपणे दाखवायला हवा होता. मात्र त्यामुळे कथा अधिक भाकितेय (प्रेडिक्टेबल) झाली असती. पण तरीही खूपशी वस्तुस्थितीशी जुळणारी वाटते.
आ.न.,
-गा.पै.

दुसर्याला ग्रुहित धरु नये हा मुद्दा पटला पण अभिजीत ग्रुहित धरत होता असे वाटले नाही. त्याने लग्नाचा विषय तिच्या बरोबर काढलेला असावा असे "मंगळ बिंगळ सब झुट" या भाषणावरुन वाटते.
शिवाय नायिका सांगते की "जर माझ्यावर प्रेम असते तर सर्वांसमोर मला मागणी घातली असतीस"
तो तिच्या आईवडिलांना आणि सासुसासर्यांना विचारुन तेच तर करतोय असे वाटुन जाते. (ते नायिकेला लगेच फोन करुन मागणीविषयी बोलणार असे अपेक्षित आहे.) यात लपवालपवी वाटत नाही .
एखादा मुलगा नायिकेला सासु सासर्यांना विचारायला अवघडल्यासारखे होउ शकेल म्हणुन हे करु शकतो आणि त्यांची मान्यता मिळवण्याचे सर्प्राइझ द्यायची भावना पण असु शकते.

यात एका वीक क्षणाला दोघांकडुन चुक झाली त्याचे खापर तिने त्याच्यावर फोडले असे थोडे वाटते.

ही विसंगती असुन पण गोष्टीत भावलेला भाग नायिकेचे मनस्वीपण हा आहे. तिचा निर्णय हा तिचा स्वतःचा आहे (जरी मला हा चुकीचा वाटतोय कारण स्वार्थ असा जास्त काही जाणवत नाही, आणि त्यांचे प्रेम आहे असे पण जाणवते).

नंदिनीच्या नायिका मला आवडतात, त्या विचारी असतात पण थोड्या शंकेखोर पण असतात.
मोरपिसे मधली नायिका पण तिच्यावर नेहेमी माया करुन तिच्या कुटुम्बियाना सतत मदत करणार्या चाचांच्या हेतुबद्दल शंका बाळगुन असते हे असेच आठवले.

दुसर्याला ग्रुहित धरु नये हा मुद्दा पटला पण अभिजीत ग्रुहित धरत होता असे वाटले नाही. त्याने लग्नाचा विषय तिच्या बरोबर काढलेला असावा असे "मंगळ बिंगळ सब झुट" या भाषणावरुन वाटते.
शिवाय नायिका सांगते की "जर माझ्यावर प्रेम असते तर सर्वांसमोर मला मागणी घातली असतीस"

तेच तर!!!!!!!!!!!!!!!!! आपण एखादीशी शरीर संबंध ठेवतोय म्हणजे आता आपण तिच्याशीलग्न करायचे, हे नॉर्मल स्वप्न बघणारा पुरुष गाढव ठरला.... आणि शरीर संबंध हे केवळ मजा म्हणून ठेवले, लग्न न करणे हा ऑप्शन मला उपलब्ध असला पाहिजे, हे म्हणणारी बाई मात्र आधुनिक स्त्री ठरली!!!

मायबोलीवरच्या एकंदर कथांमध्येच उच्छुंखल बायका जास्त ' लाइक' व्हायला लागल्या आहेत... माझ्या पोरीने स्वयंपाक का करावा, असे म्हणणारी ती कोण थेरडी, बेफिकिर यांच्या कथेतील स्वतःचे पोर सोडून जाणारी कुणी मुक्त महामाया .... आता ही एक भर पडली... शरीर संबंधासाठी पुरुष हवा, पण त्याने लग्न मात्र करायचे नाही! अशा बायकांसाठी बाजारात प्लॅस्टिकची खेळणी मिळतात आजकाल... उगाच एखादा पुरुष का आयुष्यातून उठवायचा? स्त्री मुक्ती झिंदाबाद!

असो..

दुसर्याला ग्रुहित धरु नये हा मुद्दा पटला पण अभिजीत ग्रुहित धरत होता असे वाटले नाही. त्याने लग्नाचा विषय तिच्या बरोबर काढलेला असावा असे "मंगळ बिंगळ सब झुट" या भाषणावरुन वाटते.
शिवाय नायिका सांगते की "जर माझ्यावर प्रेम असते तर सर्वांसमोर मला मागणी घातली असतीस"

तेच तर!!!!!!!!!!!!!!!!! आपण एखादीशी शरीर संबंध ठेवतोय म्हणजे आता आपण तिच्याशीलग्न करायचे, हे नॉर्मल स्वप्न बघणारा पुरुष गाढव ठरला.... आणि शरीर संबंध हे केवळ मजा म्हणून ठेवले, लग्न न करणे हा ऑप्शन मला उपलब्ध असला पाहिजे, हे म्हणणारी बाई मात्र आधुनिक स्त्री ठरली!!!

मायबोलीवरच्या एकंदर कथांमध्येच उच्छुंखल बायका जास्त ' लाइक' व्हायला लागल्या आहेत... माझ्या पोरीने स्वयंपाक का करावा, असे म्हणणारी ती कोण थेरडी, बेफिकिर यांच्या कथेतील स्वतःचे पोर सोडून जाणारी कुणी मुक्त महामाया .... आता ही एक भर पडली... शरीर संबंधासाठी पुरुष हवा, पण त्याने लग्न मात्र करायचे नाही! अशा बायकांसाठी बाजारात प्लॅस्टिकची खेळणी मिळतात आजकाल... उगाच एखादा पुरुष का आयुष्यातून उठवायचा? स्त्री मुक्ती झिंदाबाद!

असो..

आणि मंगळी आहे तर बाईने रडत कशाला बसायचे? मंगळ दाह शांत करायला कोणता यज्ञ करावा, याचे ज्ञान असलेले गुरुजी मायबोलीवर धाग्या धाग्यावर पडलेत ! त्यातला एक गाठायचा !

Biggrin

आंबा३, हे माझे वैयक्तिक रंगीबेरंगी पान आहे. इथे आपली मते लिहिली नाहीत तर बरे होइल.

धन्यवाद.

निलिमा, मोरपिसे मधली नायिका पण तिच्यावर नेहेमी माया करुन तिच्या कुटुम्बियाना सतत मदत करणार्या चाचांच्या हेतुबद्दल शंका बाळगुन असते हे असेच आठवले. तिला चाचांच्या हेतूबद्दल अद्याप शंका नाही. तिच्या वडलांना मात्र बिझनेसमधे फसवले आहे असा गैरसमज असतो. कथा जशीजशी उलगडत जाइल तसा हा पार्ट अजून क्लीअर होत जाईल. कीप रीडींग!!! Happy

कथेवरच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अभिजीतला ती नकार देते तो लग्नासाठी. मुळात प्रत्येक नात्याला नाव द्यायलाच हवं का? आणि जर ते द्यायचंच असेल तर अभिजीतने सर्वात आधी हा विषय तिच्याकडे काढायला हवा होता असं तिचं मत आहे. सुरूवातीला तिची दोलायमान स्थिती लिहिल्यामुळे तिचा हा निर्णय कदाचित धक्कादायक अथवा चुकीचा वाटू शकतो. कदाचित तुम्ही म्हणता तसा स्वार्थीपण असेल. पण तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि ती त्या निर्णयावर ठाम आहे, माझ्या कथेमधल्या नायिका शंकेखोर आहेत की नाहीत ते मलाच माहित नाही. पण त्या "परिपूर्ण" आणि "आदर्श" नाहीत हे मात्र नक्की. किंबहुना, त्या जशा आहेत त्यांच्या गुणदोषासकटच आहेत. Happy

आंबा३ मला इथे स्त्रीपुरुष वाद चालु करायचा नाही आहे प्लीज. नंदिनी संयत उत्तराबद्दल आभार, मी फक्त निरीक्षण लिहिले. आणि नायिका परिपुर्ण नसुदेत छान आहेत.

Pages