माझा पहिला परदेश प्रवास : ७ (द गोल्डन बुध्द आणि द रिक्लायनिंग बुध्द.)

Submitted by ललिता-प्रीति on 7 October, 2008 - 23:53

द गोल्डन बुध्द आणि द रिक्लायनिंग बुध्द.

रोज आम्ही तयार व्हायच्या आत ऍना हजर असायची. त्यादिवशी मात्र सकाळी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला तरी तिचा पत्ता नव्हता. थोड्याच वेळात तिचा फ़ोन आला की तिच्या यायच्या रस्त्यावर एक अपघात झाला होता आणि ती रहदारीत अडकली होती. मग काय, आमच्याजवळ वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण एव्हाना सगळ्यांच्या एकमेकांशी अर्धा-पाऊण तास गप्पा मारण्याइतपत ओळखी झालेल्या होत्या. कुणी 'फ़ोटो सेशन्स' सुरू केली, कुणी गटागटाने गप्पा मारत बसले.
ऍना पोचली तोपर्यंत १० वाजून गेले होते. लगेच आम्ही निघालोच. आज आम्ही सगळेजण 'भगवान बुध्द के सामने मत्था टेकने' जाणार होतो!! आम्हाला मिळालेल्या 'डे टू डे' कार्यक्रमानुसार आजच्या 'बॅंकॉक सिटी टूर' मध्ये बुध्दाची देवळंच जास्त होती. 'देऊळ' म्हटलं की माझा अर्धा उत्साह संपलेला असतो. पण त्यादिवशी ठरवलं की 'देवळात जायचंय' असं मनात न आणता 'एका वेगळ्या शैलीचं बांधकाम पहायला जातोय' असं म्हणून जायचं. आणि खरंच, त्या देवळांची रचना वगैरे सगळंच वेगळं होतं.

त्यादिवशी माझी आणि अजयची जागा व्हॅनमध्ये होती. ती छोटी असल्यामुळे बसच्या बरीच पुढे निघून आली. बस मात्र रहदारीत अडकली. मग आम्ही बसची वाट पाहत एके ठिकाणी थोडावेळ थांबलो. तो बॅंकॉकच्या मुख्य रस्त्यांपैकी एक असावा.आठ पदरी वाहतूक सुरू होती. दुतर्फा झाडं लावलेली होती. चौकात राजा-राणीचं मोठ्ठं चित्रं लावलेलं होतं. (अशी राजा-राणीची चित्रं बॅंकॉकमध्ये ठिकठिकाणी दिसली.) संपूर्ण रस्ताभर पिवळे झेंडे फडकत होते. त्या पिवळ्या रंगाचं एक कारण होतं. यंदा थायलंडचा राजा आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. राजा-राणी वर थाई लोकांचं भारी प्रेम. त्याच्या सन्मानार्थ अनेकजणांच्या अंगातपण पिवळे कपडे होते. रस्त्याच्या डाव्याबाजूला भल्या-थोरल्या परिसरात राजवाडा पसरलेला होता. ड्राइव्हरनं सांगितलं की कुठलेही शाही सोहोळे, मिरवणूका, परदेशी पाहुण्यांचं स्वागत हे सगळं त्या परिसरात, त्या रस्त्यावर होतं. काही दिवसांपूर्वी थाई पंतप्रधान परदेशात असताना याच राजाने लष्कराला उठावात मदत केली होती.
'उठाव ...!!' खरंच की .... मी विसरूनच गेले होते!! आम्ही निघायच्याआधी ८-१५ दिवस हा उठाव झाला होता. इतर वेळेला त्या बातमीकडे मी लक्षंही दिलं नसतं फारसं, पण तेव्हा मात्र मी २-३ दिवस बेचैन झाले होते हे मला आठवलं. त्यासंबंधी नंतर आठवडाभर पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यासुध्दा मी इतक्या लक्षपूर्वक वाचल्या होत्या की जितक्या त्या परदेशात असलेल्या त्यांच्या पंतप्रधानांनी पण वाचल्या नसतील. 'बॅंकॉक-पट्टाया रद्द करावं लागतंय बहुतेक' इथपर्यंत माझी विचारांची गाडी येऊन पोचली होती तेव्हा - तोच हा राजा काय!! मी चित्रातल्या राजाच्या चेहेऱ्याकडे पुन्हा नीट पाहिलं. ७५व्या वर्षी असलं काही करण्यासाठी अंगात हिम्मत पाहिजे!!

बस दिसल्यावर आम्ही पुन्हा निघालो. ५-१० मिनिटांत एका प्रवेशद्वारापाशी आमच्या गाड्या थांबल्या. ते ३-४ देवळांचं बनलेलं असं एक संकुल होतं. प्रथम आम्ही गेलो 'द रिक्लायनिंग बुध्द' पहायला. दारात चपला काढल्या. (चपला काढल्यावर मात्र खरंच देवळात आल्यासारखं वाटलं!) आत एक ४५ मि. लांब, १४-१५ मि. उंच अशी बुध्दाची उजव्या कुशीवर पहुडलेली प्रचंड मूर्ती होती. तिची भव्यता आपल्या श्रवणबेळगोळच्या बाहुबलीच्या भव्यतेशी नातं सांगणारी होती. त्या बुध्दाच्या डोक्याखालच्या उशीची उंचीच ८-१० फ़ूट होती. कुठल्याही प्रकारे ती आख्खी मूर्ति कॅमेऱ्यात मावेना. भिंतींवर चित्ररूपी कथा रंगवलेल्या होत्या - थाई पुराणातल्या असाव्यात बहुतेक. तिथून बाहेर पडलो.

समोरच 'द गोल्डन बुध्द' होता.

4042-03.jpg

साडे-पाच टन शुध्द सोन्यात घडवलेली मूर्ती - बाप रे! इतकं असूनही कुठेही सुरक्षा-व्यवस्था वगैरेचा मागमूसही नव्हता. 'थायलंड-ब्रह्मदेश लढाईत टिकून राहिलेलं ते एकमेव देऊळ आहे' अशी माहिती कळली. थायलंड-ब्रह्मदेश यांच्यात विळ्या-भोपळ्याचं सख्यं आहे भारत-पाकिस्तान सारखं. ही माहिती मात्र मला नवीन होती. ब्रह्मदेशने लढाईत सगळी देवळं नष्ट करायला सुरूवात केल्यावर त्या देवळातल्या बुध्दाच्या मुख्य मूर्तीवर सिमेंटचा थर चढवण्यात आला आणि त्यासारख्याच अजून काही नुसत्या सिमेंटच्या मूर्ती बनवण्यात आल्या. त्यामुळे हल्लेखोरांना खरी मूर्ती कुठली ते कळलं नाही आणि ते तसेच तिथून निघून गेले..... थायलंडमध्येही देवळात गेल्यावर लोक उदबत्या लावतात, गुडघ्यावर बसून मनोभावे नमस्कार करतात हे तिथे कळलं. पु.लं.चं एक वाक्य आठवलं - देश, धर्म, जात, प्रांत कुठलाही असो, त्या सर्वशक्तीमान परमेश्वरापुढे झुकताना प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर लीनतेचे एकच भाव असतात.

प्रत्यक्ष मूर्ती किंवा नमस्कार यापेक्षा मला साहजिकच देवळाचा परिसर, वास्तुशैली इ.त जास्त रस होता. परिसर अतिशय स्वच्छ होता. बुध्द धर्मातल्या प्रत्येक महापुरुषाचं एक-एक स्मारक उभं केलेलं होतं. कळसांची रचना, आकार, त्यावरचं कोरीव काम खूपच वेगळं आणि सुंदर होतं;

4042-05.jpg

मुख्य म्हणजे 'नवीन काहीतरी पाहिलं' हा आनंद देणारं होतं.

१२ वाजत आले होते. देवळाच्या बाहेर पडलो तर बाहेर एक शहाळंवाला दिसला. जवळ पाण्याच्या बाटल्या असूनही साहजिकच आदित्यला त्याची तहान लागली. पण त्यामुळे त्या माणसाला फायदाच झाला. कारण, आदित्यने घेतल्यावर आमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याच्याकडून शहाळी घेतली. तो नारळ पसरट गोल आकाराचा, मोठा आणि बाहेरून पण पांढऱ्या रंगाचा होता. पण निसर्गाची काय कमाल आहे - हजारो कि.मि. अंतर पार केल्यावर नारळाचं बाह्य रूप बदललं पण आतल्या पाण्याची चव मात्र तशीच मधूर, ताजंतवानं करणारी!!!

तिथून निघालो. अजून एका बुध्दाच्या देवळाला भेट दिली. हे देऊळ मात्र थोडं आपल्या देवळांसारखं होतं - म्हणजे दगडी पायऱ्या, बाहेर दुकानं वगैरे.
जेवायची वेळ होत आली होती. पोटात कावळे 'करी पॉट,करी पॉट' असं ओरडायला लागले होते. परतताना आमची व्हॅन कुठल्या-कुठल्या गल्ली-बोळातून आली. तो संपूर्ण भाग पुण्यातल्या रविवार पेठेसारखा होता. फक्त रविवार पेठेत मिनी स्कर्टमधल्या पोरी दिसत नाहीत, इथे होत्या. इतकाच काय तो फरक!!

जेवणानंतरचा वेळ मोकळा होता - खरेदी इ. साठी. दोन्ही आज्ज्यांना 'बिग सी' ला जायचं होतं. पण मोकळा वेळ म्हटल्यावर आदित्यला लगेच स्विमिंग आठवलं. मग त्याची रडारड आणि शेवटी तह - आदल्या दिवशी आजोबांनी मॉल पाहिला होता म्हणून ते आदित्यसाठी हॉटेलवरच थांबले आणि पाचच्या सुमाराला आम्ही चौघं निघालो. रस्ता अगदीच सोपा होता. आदल्या रात्री आम्ही बराच मोठा वळसा घालून गेलो होतो असं लक्षात आलं. तरीही जाताना रस्त्यातल्या खाणाखुणा लक्षात ठेवत चाललो होतो. वाटेत चार पादचारी पूल लागले. 'चार पुलांनंतर डावीकडे वळायचे' अशी खूणगाठ मनाशी बांधली आणि मॉलमध्ये शिरलो. थोडी-फार खरेदी केली.
'४०-५० बाथ मध्ये टुकटुकनं हॉटेलवर परत येता ये‍ईल' असं सौ.शिंदेनी सांगितलं होतं. थायलंडमधली टुकटुक म्हणजे आपल्या सहा आसनी रिक्षाच्या आकाराची तीन आसनी रिक्षा! म्हटलं - चला, टुकटुक तर टुकटुक. तर तो टुकटुकवाला परदेशी लोक पाहिल्यावर अव्वाच्या सव्वा भाडं सांगायला लागला. बरं, 'आम्ही रोज जातो, ४० बाथच होतात' असं म्हणायची पण सोय नव्हती!! शेवटी गुपचुप चालतच निघालो. अपेक्षेप्रमाणे, '३ पुलांनंतर वळायचं की ४?', 'हा गेला तो दुसरा की तिसरा?' असे सगळे वाद पार पडले. नाहीतरी, त्यादिवशीचा आमचा वादावादीचा कोटा पूर्ण व्हायचाच होता.
हॉटेलवर पोचलो तर पाण्यात यथेच्छ डुंबून आदित्य आमची वाटच पाहत बसला होता.
रात्री जेवण हॉटेलच्याच डायनिंग-रूममध्ये होतं. तिथे एका कोपऱ्यात एक माणूस मोठ्ठ्या पियानोवर कुठलंतरी इंग्रजी गाणं म्हणत बसला होता. त्याच माइकवर आमच्या गृपपैकी एका काकांनी एक मराठी गाणं म्हटलं. त्यांनी त्या माणसाला गाण्याची पट्टी वगैरे काहीतरी सांगितलं असावं. कारण त्याने त्या गाण्याला पियानोवर बऱ्यापैकी साथ दिली. इतका मोठा पियानो मी प्रथमच पाहत होते. एकदम झकास होता!! मग जवळ जाऊन थोडावेळ तो वाजणारा पियानो निरखत उभी राहिले.

..... तो 'झकास' पियानो आमचं सामान आवरणार नव्हता रूमवर जाऊन. त्यामुळे नाइलाजास्तव तिथून निघावं लागलं. रात्री बॅग आवरली. विमानप्रवास म्हणून एक-एक कपड्यांचा जोड पुन्हा हॅन्डबॅगेत ठेवला. कारण, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 'जीवन में एक बार जाना था सिंगापूर ...'

त्यात, थायलंडला टाटा करून निघण्यापूर्वी विमानतळावर एक 'अनपेक्षित गोष्ट' घडणार होती ....

गुलमोहर: 

मला आवडलि तुमचि शैलि. प्रत्येक गोष्ट अगदि जिवंत करुन सांगताहात. तुमच्या बरोबर आम्हिहि सहलिला होतो अस वाटतय :).