परका (भाग ५ - शेवटचा)

Submitted by चौकट राजा on 12 December, 2012 - 01:43

भाग १ - http://www.maayboli.com/node/39477
भाग २ - http://www.maayboli.com/node/39482
भाग ३ - http://www.maayboli.com/node/39503
भाग ४ - http://www.maayboli.com/node/39562

वरून पुढे चालु
*****************************************************

"हाय विवेक!"

"अं.. हाय. तुम्ही??"

"आपण ह्या आधी असे प्रत्यक्ष भेटलेलो नाही त्यामुळे तू मला नाही ओळखणार. मी केदार.. केदार वर्तक."

"म्हणजे मी ज्याचं..?"

"हो. तोच मी. गेले दोन चार दिवस बराच कामात होतास म्हणून म्हटलं जरा निवांत होशील तेव्हा तुला भेटावं."

"तू बरीच खबरबात ठेवून आहेस माझी."

"अर्थात! त्यासाठी मला फार कष्ट पडत नाहित."

"म्हणजे?"

"सांगतो. सगळं सविस्तर सांगतो. पण त्याआधी धन्यवाद!"

"कशाबद्दल?"

"आईला आणि नेहाला मदत केल्याबद्दल. माझ्या डोक्यावरचा खूप मोठा भार हलका केलास तू."

"हम्म.. आता काय पाहिजे तुला?"

"काही नाही. तू आत्तापर्यंत केलंस तेच खूप आहे. आणि तू एवढं सगळं केल्यावर गेल्या दोन तीन महिन्यांचा खुलासा करणं माझं कर्तव्य आहे."

"ऐकतोय मी.. बोल..."

"माटे आजोबांनी तुला आमच्या घरची परिस्थिती सांगितलीच आहे. तेव्हा अजून मागे न जाता मी ८ ऑक्टोबरपासून सुरुवात करतो. बाकी जगासाठी तो दिवस नेहेमीसारखाच आला आणि गेला. पण आपल्या दोघांचं आयुष्यच त्या दिवशी बदलून गेलं. सोमवार होता तो. सकाळी नेहमीसारखा मी ऑफिसला पोचलो. लंचच्या सुमारास मला संपतराव जगदाळेचा फोन आला. माझ्या घराचं आधीच्या तीन महिन्याचं भाडं थकलं होतं. आणि त्या महिन्याचंही मी अजून दिलं नव्हतं. तुला तर जगदाळे माहिती आहेच. त्याला जगात पैशाशिवाय दुसरं काहिही कळत नाही आणि पैशासाठी तो वाट्टेल ते करू शकतो. हरामखोर साला. गेली दोन वर्ष मला छळतोय. अनेक दिवसांपासून मला त्याचा राग होता. नेहा पण म्हणायची कि त्याची नजर तिला सभ्य वाटायची नाही. एक दोन वेळा तर त्यानी तिला एकटीला गाठून उगाच सलगी दाखवायचा प्रयत्नही केला होता. पण परिस्थितीनी माझे हात बांधेलेले होते. नाहितर मी त्याला चांगला सरळ केला असता.
त्या दिवशीसुद्धा जगदाळेनी मला बरच ऐकवलं. म्हणाला उद्यापर्यंत पैसे नाही दिले तर घराबाहेर काढीन. एवढच बोलून थांबला नाही तर 'घरात तरूण बायको बसलीये तिला धंद्याला लाव म्हणजे पैसे मिळतील' असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. मी ठरवलं कि आता फार झालं. आज काय तो निकाल लावूनच टाकायचा. एकतर त्याचे पैसे द्यायचे नाहीतर त्याचा मुडदा पाडायचा. अर्थात, दुसर्‍या पर्यायापेक्षा पहिलाच जास्त सयुक्तिक होता त्यामुळे दिवसभरात मी ऑफिसमधल्या काही मित्रांच्या हातापाया पडून थोड्या पैशांची सोय केली. उधारीवरच मिळणार होते ते पैसे पण जगदाळेचं तोंड बंद करायला मला तेही चालणार होतं. एक मित्र संध्याकाळी घरी पैसे घेऊन येतो म्हणाला. संध्याकाळी मी ऑफिसहून घरी यायला निघालो. स्वारगेटला आलो आणि समोरच मला माझी पुढची बस सुटताना दिसली. दिवसभराच्या तणावामुळे असेल किंवा जगदाळेच्या कटकटीतून सुटकेच्या ओढीमुळे असेल, ती बस जाताना बघून माझा धीर सुटला. काहिही करून मला ती बस पकडायचीच होती. मी बसच्या दिशेने धावत सुटलो. बस जवळ पोचता पोचता मी मागच्या दारापाशीचा बार पकडला आणि पायरी वर उडी मारायला लागलो. कदाचित मला पळताना बघून असेल पण तेवढ्यात ड्रायव्हरनी गचकन ब्रेक मारला. एका क्षणी मी हवेत पुढे तर बसचं दार मागे अशी स्थिती झाली आणि पुढच्याच क्षणी माझ्या हाताला हिसडा बसून हात बार वरून निसटला. काही कळायच्या आतच मी बसखाली पडलो. आणि पुढच्याच सेकंदाला बसचं मागचं चाक माझ्या पोटावरून गेलं. अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं होतं. सर्वांगात पसरणार्‍या एका भयानक वेदनेची मला जाणीव झाली आणि मग डोळ्यासमोर अंधार पसरायला लागला.

विवेक, त्या शेवटच्या काही क्षणात मला माझं सगळं आयुष्य आठवलं आणि एकच विचार मनात आला कि मला जाऊन चालणार नाही. माझ्यामागे आई आणि नेहाचं काय होईल? आजारी आई, माझ्यासाठी माहेर तोडून आलेली आणि माझं घर सांभाळणारी माझी नेहा उघड्यावर येतील. जगदाळे त्यांचे हाल करेल....जगदाळे!! हे सगळं त्याच्यामुळे घडतयं. त्याला धडा शिकवल्याशिवाय मी जाणार नाही, माझ्या घरच्यांना त्याच्यापासून वाचवलचं पाहिजे. त्यासाठी जगलच पाहिजे. पण शरीराची साथ सुटत होती. आणि तेव्हा पहिल्यांदाच मला माझी, माझ्याच शरीराहून वेगळी अशी जाणीव झाली. सगळी इच्छाशक्ती एकवटून मी झेप घेतली. एकच क्षण असा गेला जेव्हा मला पिसासारखं हलकं वाटत होतं आणि पुढच्या क्षणी मी तुझ्यावर धडकलो."

"माझ्यावर?" विवेक म्हणाला.

"हो. माझा अपघात झाला तेव्हा तुझी गाडी मागून येत होती. अपघातानंतर पुढच्या एक दोन सेकंदात तु अपघाताच्या जागेच्या अगदी जवळून गेलास. तेव्हा तुझ्याबरोबर गाडीत काणे सुद्धा होते."

"८ ऑक्टोबरला, संध्याकाळी..... हां, आम्ही सातारा रोडला एक डिलिव्हरी देऊन घरी येत होतो. काणे म्हणाले कि अचानक माझा श्वास अडकला आणि काही सेकंद मी अक्षरशः डोळे पांढरे करून बसलो होतो. त्यांनी पटकन गाडी बाजूला घेऊन थांबवली. तोपर्यंत मी नॉर्मलला आलो होतो. पण माझं डोकं प्रचंड ठणकत होतं. काण्यांनीच मला घरी सोडलं, तेव्हा मला ताप आला होता. स्मिता उगाच काळजी करत बसेल म्हणून मी तिला सगळं सांगत बसलो नाही. आणि मग पुढचे काही दिवस मी आजारीच होतो."

"बरोबर."

"पण मग तुझा अपघात होत असताना मला दिसला नाही?"

"नाही. तुझं लक्षच नसावं त्या बाजूला. आणि तसही ते सगळं एवढ्या पटापट घडलं कि तुला काही कळायच्या आत तुम्ही पुढे गेलेला होता. नंतर तुम्ही पुढे जाऊन थांबलात तेव्हा तुझी स्वतःचीच परिस्थिती अशी होती कि तुला मागे उसळलेल्या गर्दीची कल्पनाही आली नाही. कदाचित काण्यांनी मागे सुरु झालेला गोंधळ बघितला आणि काहीतरी झालयं ज्यामुळे आता ट्रॅफिक जॅम होणार हे लक्षात येऊन पटकन ते तिथून तुला घेऊन निघाले. नक्कि काय झालं हे तेच सांगु शकतात."

"पण म्हणजे तेव्हा तू मेलास आणि तुझा...."

"करेक्ट. त्या दिवसापासून आपण एकत्र आहोत. काय झालं? तुझा विश्वास बसत नाहिये? माझाही नव्हता आधी. पण आता आहे."

"काहिही! मग तू आत्ता इथे माझ्यासमोर कसा....?"

"विवेक, आत्ता तू तुझ्या ऑफिसमधे डोळे मिटून बसला आहेस. आणि आपला हा संवाद तुझ्या मनात चालला आहे, हे जाणवतय का तुला?"

"ओह माय गॉड! नाही नाही... हे शक्य नाही!"

"शांत हो विवेक, पण हेच खरं आहे. मला कल्पना होती कि वास्तवाची जाणीव तुला होईल तेव्हा तु घाबरशील. म्हणूनच हे सांगायला मी योग्य संधीची वाट बघत थांबलो होतो."

"नाही नाही... तू काहिही बोलतो आहेस. अरे गेला महिनाभर चाललेली माझी ट्रीटमेंट काय उगाच होती?"

"हा हा.. डॉ. सामंतांना तुला नक्कि काय होतयं हे कधी कळालच नव्हतं. त्यांनी त्यांच्या माहितीतले नेहमीचे मार्ग वापरून बघितले आणि महिनाभरात तुला 'अ‍ॅटॅक' आला नाही म्हटल्यावर त्यांनी गृहित धरलं कि तू बरा झाला असशील. आलाच नंतर 'अ‍ॅटॅक', तर बघता येईल परत काय ते असा साधा विचार करून ते शांत राहिले."

"हे काय बोलतोयस तू?"

"सांगतो. विवेक, मला माझं असं स्वतंत्र भौतिक किंवा मटेरिअलिस्टिक असं रूप नाही. पण स्वतःची विचारशक्ती आणि सामर्थ्य आहे. खूपच सोपं करून सांगायचं तर माझं अस्तित्व हे कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टिम सारखं आहे. हार्डवेअर नसेल तर नुसतीच ऑपरेटिंग सिस्टिम काही करू शकत नाही. तसच एखद्या उपयुक्त शरीराशिवाय मी असूनही नसल्या सारखाच आहे. पण एक मात्र आहे, मी ज्या कोणत्या शरीरात असेन त्या शरीराच्या गुणदोषांसकट ते 'चालवतो'.

आता असं बघ कि आपल्या ह्या केस मधे तुझं शरीर ही एक ड्युएल बूट सिस्टिम झाली आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम एकाच कॉम्प्युटरवर असल्यासारखं झालय. पण एका वेळी एकच ऑपरेटिंग सिस्टिम चालते आणि ती चालते तेव्हा दुसरी पूर्ण निद्रिस्त असते. त्यामुळेच मी तुझ्या शरीरात प्रवेश केल्या नंतर तूझं शरीर कधी माझं आयुष्य जगायचं तर कधी तुझं स्वतःचं. पण एकमेकाच्या आयुष्याबद्दल आपण दोघही पूर्ण अनभिज्ञ होतो.

ह्या सगळ्याची मला जाणीव झाली ती डॉ. सामंतांच्या तुझ्यावर चाललेल्या हिप्नॉसिस ट्रीट्मेंटमुळे. खरं तर माझा तुझ्या शरीरात झालेला प्रवेश ही आपल्या दोघांसाठीही खुपच कष्टदायक घटना होती. एकाच शरीराच्या अधिकारासाठी आपण एकमेकांशी सतत स्पर्धा करत होतो. त्यामुळेच तुझं डोकं प्रचंड दुखत होतं.

पहिल्यांदा जेव्हा डॉ. सामंतांनी तुला हिप्नोटाईज केलं तेव्हा तूला म्हणजे तुझ्या मनाला त्यांनी शांत केलं आणि मला जाग आली. त्या हिप्नॉटिक अवस्थेत तुझं मन शांत झालं असलं तरी ते पूर्ण झोपलं नव्हतं. त्यामुळे तुझ्या उत्तरांमधे तुझ्या आणि माझ्या जगांची सरमिसळ होत होती. पहिलंच सेशन चालु असताना हळुहळु मला वास्तवाची जाणीव झाली. आणि परत एकदा मी पेटून उठलो. ह्या वेळी माझा राग होता नियतीवर! काय परिस्थितीमधे आणून ठेवलं होतं तिनी मला!. पण जशी जशी तुझी ट्रीटमेंट पुढे सरकत गेली तसा तसा मीही शांत होत गेली आणि तुझ्या मनाशी समांतर रहायला शिकलो. आता तुझ्या जागेपणी मीही स्वतंत्रपणे जागा असतो आणि तुझ्या नजरेतून तुझं जग बघू शकतो. त्यासाठी मी डॉ. सामंतांचे आभार मानले पाहिजेत."

"पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तू 'जागा' झालास तेव्हा तुला अपघाताबद्दल काही आठवलं नाही?"

"नाही आठवलं. विवेक, कधी कधी एखाद्या अतिशय प्रिय माणसाचा मृत्यु किंवा एखादी अनपेक्षित घटना घडून गेल्यावरही माणूस ते मान्यच करू शकत नाही आणि जणू तसं काही घडलंच नाही असा वागत रहातो. तसच माझं झालं. सिस्टिम रिसेट झाली म्हण ना. आणि एखादं दु:खद स्वप्न पडून गेल्यासारखं मी ते सगळं विसरलो. त्यामुळे मला पहिल्यांदा जेव्हा जाग आली तेव्हा मी नेहमीच्या सवयीप्रमाणे घरी गेलो... म्हणजे, तुझ्या शरीराला घेऊन माझ्या घरी गेलो. मला ह्याचा पत्ताच नव्हता कि मी माझ्या स्वतःच्या शरीरात नाहिये. तिथले लोक मात्र गोंधळून गेले कारण तुला, एका परक्याला त्यांच्या बारिक सारिक गोष्टींची माहिती होती."

"हम्म..मग आता पुढे काय?"

"पुढे काय म्हणजे?"

"म्हणजे तू असाच 'माझ्यात' रहाणार?"

"नाही मित्रा. माझं राहिलेलं काम झालं. नेहाला तु तुझ्याकडेच नोकरी दिली आहेस आणि आईच्या वृद्धाश्रमालाही तू देणगी देणार आहेस. झालच तर जगदाळेलाही मस्त चोपून काढलं आपण. आता मी जायला मोकळा झालो. माणसाच्या अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्या कि त्याला मुक्ती मिळते असं म्हणतात. चल, येतो मी. परत एकदा तुझे आभार."

*****************************************************

विवेक जागा झाला. त्याला मनापासून आनंद झाला होता. गेले तीन महिने चाललेला त्रास शेवटी संपला होता. बसल्या बसल्या तो जे काही घडलं ते आठवायला लागला.

"नियती पण अजब खेळ खेळते बुवा. कोण कुठला केदार वर्तक आणि माझ्या आयुष्यात तरी कसा यावा! आणि त्याच्यामुळे मी चक्क रस्त्यात मारामारी काय करतो, पोलीस कोठडीत काय जातो.. मग ट्रीट्मेंटच्या दरम्यान केदारची माहिती घ्यायला मी माट्यांकडे जातो काय, त्यांच्याकडून त्याच्या आई आणि बायकोबद्दल कळतं काय, मग अचानक एक दिवस मी वृद्धाश्रमाला देणगी द्यायला जातो काय आणि नेमकि त्याच वृद्धाश्रमात केदारची आई असते काय, नोकरीसाठी माझ्याकडे आलेल्या अर्जांमधे नेमका केदारच्या बायकोचा अर्ज असतो काय....एका नंतर एक सगळ कसं.....

एक मिनिट.. हे सगळं असं आपोआप घडलं? एवढे योगायोग? वृद्धाश्रमाला देणगी आणि नेहाला नोकरी ह्या दोन्ही गोष्टी मी स्वतःहून केल्या? नाही... शक्यच नाही! त्या माझ्याकडून करवून घेतल्या गेल्या. केदारनी करवून घेतल्या. हे चुकिचं आहे, अनैतिक आहे.

केदार, तुझ्या हे लक्षात आलं नाही का कि मी जशी मदत देऊ शकतो तशीच ती काढूनही घेऊ शकतो?

नाही, नाही ..मला तसं करता येणार नाही कारण केदारनी तो विचार आधीच केला असणार. असं होऊ शकतं ह्याची शक्यता लक्षात घेऊन तो कायम इथेच रहाणार आणि तसं होऊच देणार नाही ....... पण हा विचार मी करतोय का केदार करवतोय?

केदार.... केदार, तू आता मला वापरतो आहेस.... तू असं करू शकत नाहीस .... केदार!!!!!!"

दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडून विवेक खुर्चीत कोसळला आणि त्याच्या मनात एका मंद हास्याचा आवाज घुमत राहिला....

(समाप्त)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबोकरांनो, आयुष्यात कथालेखनाचा पहिलाच प्रयत्न केलाय. लिखाणात/कथानकात काही त्रुटी राहिल्या असल्यास जरूर सांगा. आपल्या सुचनांचे स्वागत आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून मांडलेल्या विचारात काही विसंगती आढल्यास ती माझ्या या विषयातील अज्ञानामुळे असेल.

अखी, चिमुरी, मनिषा, आबासहेब, अस्मिता, स्मितू, माधव, अन्ना, मोहन कि मीरा, बिनू, नानबा, प्राजक्ता_शिरिन, चनस, कविन, सस्मित, झकास्राव, नंदिनी, मी नताशा, विनायक परांजपे, मृदुला देसाई, विनिता.झक्कास, अंजली_१२ --- आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

Chhan Happy

इब्लीस Lol धुम २ सारखा भाग २ म्हणतेय चिमुरी

प्रेडीक्टेबल वाटण्याचे कारण पहिला भाग वाचल्यावर मला सचिन खेडेकरच्या एका सिनेमाची आठवण झाली. स्टोरी त्यावरुन लिहीली नाही आहेत हे माहीत आहे पण थॉट सिमीलर आहे म्हणून आठवला होता सिनेमा. त्यामुळे मला प्रेडीक्टेबल वाटली गोष्ट

फ्लो छान राखलात. पुलेशु Happy

कथा आवडली. Happy
एक सुचना करतेय बघा पटली तर. ५ भाग करण्यापेक्षा २-३ भागात विभागली असती तर शेवट अजुन धक्कादायक वाटला असता. होतं काय की इतके भाग बनवुन टाकले की जुन्या भागांतल्या घटनांची संगती तुटते आणि वाचकालाही उलटेसुलटे तर्क करायला वेळ मिळतो.

चौकट राजा... पहिलीच सिक्सर मारलीत तुम्ही. पहिला प्रयत्न वाटत नव्हता येवढी भट्टी चांगली जमली होती.. खुप मस्त...

शेवट जरा गुंडाळलात का?

मला वाट्त.. सचिन खेडेकर्चा तो सिनेमा म्हणजे म्रुगजळ....एक सुचना करतेय बघा पटली तर. ५ भाग करण्यापेक्षा २-३ भागात विभागली असती तर शेवट अजुन धक्कादायक वाटला असता. होतं काय की इतके भाग बनवुन टाकले की जुन्या भागांतल्या घटनांची संगती तुटते आणि वाचकालाही उलटेसुलटे तर्क करायला वेळ मिळतो...... चिगीशी सहमत...

मस्त झाली कथा. शेवट प्रेडीक्टेबल असला तरी तुम्ही दिलेली तर्कसंगती खूप वेगळी वाटली. संगणकीय भाषेमुळे माझ्यासारख्याला जास्तच आवडले ते स्पष्टीकरण.

पुढच्या कथेची वाट बघतोय. Happy

Stephenie Meyer यांची The Host ही कादंबरी अशाच कन्सेप्ट वर आहे. खूपच रंजक कादंबरी आहे. जमल्यास नक्की वाचा. पुढच्या वर्षी याच नावाने सिनेमा पण येतोय.

चौकट राजा, छान ओघवती कथा. पहीला प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरलाय. लिहीत रहा.

धन्यवाद मंडळी.

चिंगी, कल्याणी.गौरव -- आधी दोन-तीन भागातच टाकायचं ठरवलं होतं पण संवादांच्या माध्यमातून लिहित असल्यामुळे ते जमलं नाही. अगदीच मुद्दे काढून त्यांची वाक्य केल्यासारखं वाटत होतं. म्हणून मग लांबी वाढली. पुढची कथा लिहिताना हा मुद्दा लक्षात ठेवेन.

मोहन कि मीरा- शेवटच्या भागात एक अजून प्रसंग लिहिल होता पण मग फारच लांबण लागते आहे असं वाटलं म्हणून तो काढून टाकला.

अविकुमार - The Host वाचली नाहिये.. आता नक्कि वाचेन. धन्यवाद.

व्याकरणावर अजून मेहनत घेता येईल. सहज दिसलेलं एक उदाहरण...
"नेहा 'ची' आणि आई 'ची' मदत केली " नव्हे तर "नेहा 'ला' आणि आई 'ला' मदत केली"
"नेहाची आणि आईची मदत केली" हे हिंदीचं मराठीत केलेलं भाषांतर आहे.

Pages