धूसर एक वाट.....

Submitted by Anvay on 11 December, 2012 - 05:14

जरा घाईतच विनय बस स्टऐन्ड वर पोहचला. थोड्याच वेळात बस निघाली.
खिडकीजवळचे सीट मिळाल्याने आणि संध्याकाळची वेळ असल्याने गार वार्याची झुळूक
जाणवत होती. कधी आपल्याच विचारात तो हरवला हे त्याचे त्यालाच कळले नाही.
`सहा महिन्यापूर्वी सगळे विश्वच वेगळे होते ,,, तिला भेटण्या आधी
....रितिका !!! आता आठवतही नाही कधी अचानक ओळख निर्माण झाली आणि भेटणे सुरु
झाले. सर्व जाणिवांच्या पलीकडले होते , त्याच्या आणि कदाचित तिच्याही. अबोल
असा तो तरीही तिला पाहताच काहीतरी बोलावेसे वाटे. तिच्याशी विचार शेअर करावेसे
वाटत. कधी ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले कलेच नाही. दर वीकेंडला मग भेटीगाठी
नित्याच्याच झाल्या. दिवस पटापट उलटत होते. आणि अस्वस्थपणा वाढत होता.
मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्याचे त्यालाच कळले नाही. तिच्यापासून
किती दिवस हे लपून ठेवणार ह्या अस्वस्थपणाने आनंदाची जागा घेतली होती ....
तिला सांगून टाकावे . पण मग तिची प्रतिक्रिया काय असेल. कदाचित तीही आपल्यावर
प्रेम करत असावी. एकदा विचारून तर बघू , पण मग ती दुखावली तर ..आणि तिने
मैत्रीही तोडली तर ..' विचारांच्या ह्या गर्तेत असताना कधी स्टोप आला हे
कळलेदेखील नाही .

आज रविवार असल्याने कॉफी शॉपमध्येही गर्दी होती. विनय तिची वाट बघत होता. सहज भेटायला म्हणून त्याने तिला बोलावले होते. आज कसेही करून तिला तो सांगणार होता. लांबूनच तिला येताना त्याने पहिले. तिनेही स्मित केले आणि त्याच्या टेबलवर येऊन बसली. थोडा वेळ इथल्या तिथल्या गप्पा झाल्यावर त्याने मूळ मुद्याला हात घातला. 'अग, आज मला तुला थोडे सांगायचे होते अर्थात तुझी हरकत नसेल तर....'
'अरे त्यात हरकत कसली..बोल...' ती उत्तरली.
'तुला बर्याच दिवसांपासून सांगायचे होते, पण धीर होत नव्हता. फार कमी वेळात आपली दाट मैत्री झाली. आणि ...'
'मी कधी तुझ्या प्रेमात पडलो हे मलादेखील कळले नाही'
एक मोठा पॉझ घेऊन पुन्हा तो बोलू लागला. 'मला माहित नाही की तुझ्या मनात काय आहे. पण मी माझ्या भावना दडपून अस्वस्थपणे जगू शकत नाही. तुला त्या सांगणे गरजेचे होते. '
तिच्या चेहऱ्यावरचे स्मित एवाना लोप पावले होते. त्याने आपले बोलणे सुरूच ठेवले ..
'तुझे माझ्यावर प्रेम...' वाक्य पूर्ण होण्याच्या आतच 'नाही....माझे तुझ्यावर प्रेम नाही आणि तुही हा विचार सोडून दे. मी असा विचार कधी केला नव्हता. आणि ह्यापुढे एक शब्दही बोलू नकोस' तिचा आवाजच सूरही वाढला होता.
'अग, पण ऐकून तर...' त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण 'मला आता ह्या विषयावर आता काहीही ऐकायचे नाही आणि ह्यापुढेही जरी पुन्हां भेटलो तर ह्या विषयावर मला काही बोलायचे नाही.' एका दमात तिने सगळे सांगून टाकले. पाच मिनटे दोघांत निशब्द शांतता पसरली. त्याचा तर सगळा धीरच गेला होता तिचा तो अवतार बघून. कॉफी संपून तो म्हनाला, 'सॉरी, पण मला तुला दुखवायचा हेतू नव्हता. मी फक्त माझ्या भावना सांगितल्या. आता ह्यापुढे काय बोलणार.......' पुढचे वाक्य त्याने अर्धवटच सोडले.
काही मिनिटांच्या स्तब्धतेनंतर 'चल निघतो आता' एवढे बोलून तो जाऊ लागला.
त्याच्या त्या पाठमोर्या आकृतीकडे बघून काय माहित पण तिच्या नकळत तिचे डोळे पाणावले......कंठ्तून एक आव्वाज देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला..पण आवाजच बाहेर आला नाही.....
त्याची पाठमोरी आकृती धूसर दिसत होती .... पण तो लांब गेल्याने की डोळ्यांतल्या आसवांनी हे मात्र न उलगडणारे कोडेच होते !!

-अन्वय

Group content visibility: 
Public - accessible to all site users