लाईफ ऑफ पाय

Submitted by डॅफोडिल्स on 10 December, 2012 - 18:09

लाईफ ऑफ पाय चा ट्रेलर पाहिल्या पासुन फार उत्सुकता होती. ‘पाय’चे पाण्यातील प्रवासाचे रंजक अनुभव बघायला म्हणून पहिल्याच आठवड्यात लगेचच थ्रीडी पाहिला. नॉट वर्थ ! थ्री डी नसता तरी चालला असता.

समुद्रावरची काही दृष्य फार उत्तमरित्या चित्रीत केली आहेत. चित्रीकरण चांगले आहे. प्राण्यांबरोबरची तसेच इतरही दॄष्ये टेक्नीकली किती खरे किती खोटे सांगता येत नाही.

यान् मार्टेल च्या लाईफ ऑफ पाय या पुस्तकावर आधारीत कथानक आहे. मी पुस्तक वाचले नाहिये. पण चित्रपट ठिकठाक आहे. इरफान खान, तब्बु, सुरज शर्मा सारख्या भारतीय कलाकारांचे काम आवडले. रिचर्ड पार्कर भारिये Lol

चित्रपटाच्या सुरवातीला लहान मुलांचे चांगले मनोरंजन होते. मधे मधे जरासा कंटाळवाणा आहे.चित्रपत पहाताना कधी "टायटॅनीक" आणि कधी "कास्ट अवे" ची आठवण येते. एक दोन वेळेला काही चुकचुकाट (गुफ अप्स) सोडले तर साहसकथा आवडणार्‍यांना नक्की आवडेल.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा | 28 December, 2012 - 09:39
वाह वाह कल्पू
देव (existence of coscience) हा अनुभवायचा विषय आहे चिकित्सेचा नाही.
>> +१.
>> +१

डॅफो, हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. चित्रपटाचे पीजी रेटिंग ( खरं तर पीजी रेटिंग असेल तरी आठ वर्षांच्या वरच्या मुलांसाठी योग्य आहे असे तिथे लिहिलेले असते पण तरी लहान मुलांना जायला बंदी नसते. )आणि प्राणी ह्यामुळे कदाचित मुलाला बरोबर नेऊनच बघितला असता. मी पुस्तक वाचलेले नाही. इथल्या प्रतिक्रियांवरुन साधारण अंदाज आला आणि एकटीनेच जाऊन बघितला. तो निर्णय अतिशय उत्तम होता. एक म्हणजे चित्रपट खूप जास्त सिंबॉलिक आहे आणि दुसरे म्हणजे संथ आहे. छान एकाग्रतेने बघता आल्यामुळे चित्रपट चांगला पोचला.
वर लिहिल्याप्रमाणे व्हिज्युअल ट्रीट आहे. थ्रीडी इफेक्टस सुरुवातीला आवडले पण नंतरनंतर कथेत गुंगत गेल्यामुळे की काय फारसे जाणवले नाहीत. मला मध्येमध्ये लांबल्यासारखा वाटला त्यामानाने शेवटी ते आभासी बेट सोडण्यानंतरचा भाग बर्‍यापैकी पटापट हलला असं वाटलं.

इथल्या काही पोस्टस वाचून मला चित्रपट एंजॉय करण्याच्या / कळण्याच्या दृष्टीने कथेची कल्पना यायला हवी असे वाटले होते त्याप्रमाणे मी कादंबरीबद्दल विकीवर वाचून गेले होते. तसे केले ते फार उत्तम केले असे मला व्यक्तिशः वाटले कारण चिनूक्सने लिहिल्याप्रमाणे त्या प्राण्यांचे हावभाव बोलके आहेत. पाय आणि रिचर्ड पार्करचे आमनेसामने येणे, त्यांच्यातला झगडा, संवाद, नंतरची हतबलता ह्यात अर्थांचे अनेक पदर आहेत. खरंतर आख्खा चित्रपटच हळुवार पापुद्रे उलगडत बघण्यात मजा आहे.

नताशा, निलिमा आणि कल्पू फार सुरेख पोस्टस. चित्रपट बघताना जाणवलेल्या अजून काही समांतर जागा आठवल्या तर नक्की लिहेन.

एकदा तरी आवर्जून बघावा असा चित्रपट.

स्पॉयलर अलर्ट. चित्रपट न पाहिलेल्यांनी कृपया वाचू नका.

मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवलेली एकसंध थीम म्हणजे 'लाईफ ऑफ पाय' हा पायचा नास्तिकतेपासून आस्तिकतेपर्यंत झालेला प्रवास. त्याच्यात एक शंकेखोर ( skeptic ) दडला आहे. त्याला केवळ इतर सांगतात म्हणून देवावर, धर्मावर विश्वास ठेवायचा नाही तर स्वतः देवाच्या अस्तित्वाची शहानिशा करायची आहे. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूची माणसं मात्र रेडिमेड तत्वांवर विश्वास ठेवणारी आहेत. त्याच्या वडिलांच्या बोलण्यातून, वागण्यातून ही आंधळेपणाने विश्वास टाकायची वृत्ती अगदी सहज दिसते. काकांनी सांगितलेल्या कुठल्याश्या पॅरिसच्या स्विमिंग पूलची कहाणी ऐकून प्रभावित होऊन ते मुलालाही तेच नाव देतात.
खरं म्हणजे पायलाही त्या गोष्टी ऐकायला आवडते. त्यांवर विश्वास ठेवावासा वाटतो. पण वाघ म्हणजे पायच्या अस्तित्वाचा रॉ, कुठलेही संस्कार नसलेला भाग त्याला सहजासहजी देवावर विश्वास ठेवू देत नाही. तो माणसाळलेला नाही. आक्रमक आहे. पाय ह्या वाघाला ( आपल्यातल्या शंकेखोराला ) अगदी सुरुवातीला खाद्य देऊ बघतो. हे खाद्य म्हणजेच आपल्याला समाजाकडून देव-धर्माबद्दलची जी शिकवण चमच्याने भरवली जाते ती. त्यावेळी त्याचे वडील त्याला मागे खेचतात आणि सांगतात की हे धोक्याचे आहे. तू जर त्या वाघाला स्वतःच्या हाताने खाद्य द्यायला गेलास तर तो वाघ तुझाच हात खाऊन टाकेल. तुझ्यातला शंकेखोर तुझ्यातल्या देवभोळेपणावर मात करेल. त्याला हा वाव मिळू द्यायचा नाही. दोरीला बांधून आख्खा बोकड ( तयार शिकवण ) त्याच्यासमोर ठेवायचा आणि आपण चार हात लांब उभे राहायचे.
पायला हे पटत असतेही आणि नसतेही. मग सुरु होतो एक आंतरिक संघर्ष ज्यात तो समाजापासून स्वतःला वेगळे काढतो आणि धडपड सुरु होते स्वतःशीच संवाद साधण्याची, स्वतःच्या विचांराशी दोन हात करण्याची. त्याच्यातला रॅशनल सेल्फ त्याला सांगत असतो की देव-बिव सब झूट आहे. ती आक्रमकता त्याला सहन होत नाही. इररॅशनल राहण्यात, आस्तिक असण्यात एक सुख असते, एक आधार असतो ज्यावर विसंबून तुम्ही स्वस्थ राहता. रॅशनॅलिटी ह्या इररॅशनल विचारांना खाऊन टाकू नये म्हणून मग तो वाघाला मासे खाऊ घालू लागतो. हिंदू धर्मात मत्स्यावतार म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार ( हा संदर्भ चित्रपटात आहेच ) ख्रिश्चन धर्मातही मासा हा जीझस ख्राईस्टचे प्रतिक आहे. अतिशय खडतर प्रयत्नांनंतर स्वतःतल्या शंकेखोराला माणसाळवण्यात त्याला यश येते. दिवसेंदिवस वाघ खंगत जातो आणि त्याच्याबरोबर पाय स्वतःही. निपचित पडलेल्या वाघाला बघून पायला त्याची कणव वाटते आणि जाणीव होते की ह्याच्याशिवाय आपणही जगू शकणार नाही. मनात परत एक वादळ उठते आणि ते सहन करायची ताकद गमावून बसलेला पाय त्याला शरण जातो.
जाग आल्यावर पाय पोचलेला असतो एका बेटावर. तो खूश होतो. त्याला वाटते की आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या एकमेकांना छेद देणार्‍या विरोधी विचारांसह आपण इथे सुखाने राहू शकू, वादळ अखेरीस शमले आहे. पण जसजशी रात्र होते तसं त्याच्या लक्षात येतं की आपल्यातला शंकेखोर वाघ, आस्तिक जगात राहून देवधर्माची लक्तरं फाडत राहिला ( माशांचे सांगाडे ) तर आपल्याही व्यक्तिमत्त्वाच्या चिंध्या व्हायला वेळ लागणार नाही ( त्याला सापडलेला माणसाचा दात ). हे मुक्कामी पोचल्यासारखे वाटणे खोटे आहे. अर्थात त्याची नाव तो परत अथांग समुद्रात लोटतो. लढायची शक्ती संपल्यावर ही नाव जेव्हा परत किनार्‍याला लागते तेव्हा 'इररॅशनली जगणे हेच सुखाचे असते.' हे पूर्णपणे उमजलेला त्याच्यातला रॅशनल भाग अत्यंत अलिप्तपणे त्याला सोडून जातो आणि नावापासूनच इररॅशनल असलेला 'पाय' हेच योग्य आहे हे कळूनही त्याची खंत आयुष्यभर बाळगून राहतो. गृहितकं मान्य केलेला पाय त्यानंतर सुखी, कुटुंबवत्सल आयुष्य जगताना दाखवलाय Happy

निलिमा..
माझ्या पोस्ट मधलं तेव्हडच एकच वाक्य कोट करू नका... पुढे लिहिलेलं "ती सांगायला फार वेळ लावला असं वाटलं. ते काहितरी वेगळ्या पद्द्यतीने दाखवायला हवं होतं." हे ही वाचा ! मी त्या अल्टरनेट स्टोरीच्या सादरीकरणद्दल बोलतो आहे... !

कल्पू, नताशा, अगो पोस्ट छान आहेत. Happy

स्पॉयलर अलर्ट:

नताशा,निलिमा, अगो ,चिनुक्स अबिनंदन ........अतिशय महत्त्वाचे प्रतिसाद !!

मला पुस्तकाबद्दल माहीत नव्हते ३ डी पाहिला आवडला हिंदीत

शेवटचा डायलोग मस्तय इरफान म्हणाला "कौनसी स्टोरी अच्छी लगी ?"वगैरे
तो समोरचा मणुस म्हणाला "जिसमे शेर है!"

दोघानी स्माईल केले...... मी विचार करू लागलो ते का बुवा हसले म्हणून!!

मी एक कवि माणुस ......."शेर" चा दुसर अर्थ शेरोशायरीचा शेर हा लगेच आठवला .......तत्त्काळ विठ्ठल आठवला .( माझा शेर=माझा विठ्ठल हा माझ्या मनातला एक वैयक्तिक अर्थ)......माझ्या मते तो शेर =वाघ म्हणजेच देव आहे

ज्या जगात देव आहे अशी कल्पना केली जाते ते जग ;तो नाही आहे या जगापेक्षा अधिक सुंदर आहे ...असा अर्थ लागला !!!!

सत्य- शिव- सुंदर यातला निदान एक धागा तरी उलगडतो हा चित्रपट पाहिल्यावर

पाहताना आवर्जून ३डी च पहावा !!!!

स्पॉयलर अलर्ट -

चित्रपट विज्युअल ट्रीट आहे पण अनेक गोष्टी नीट कळत नव्हत्या. इथल्या नताशा, निलीमा यांच्या पोस्टींवरून बराच उलगडा झाला. मला लागलेला अर्थ असा:

ही एका माणसाच्या आयुष्याची कहाणी आहे. सर्वसामान्य पिसीन जगाचे टप्पे-टोणपे खात स्वतःची ओळख बनवतो - पाय. एका मुक्कामापर्यंत पोहचतो पण प्रवास संपतो का? नाही, तो तर सुरूच रहातो. पुढचे प्रश्न असतात देव म्हणजे नक्की काय? त्याला भेटायचे, मिळवायचे कसे? स्वतःची ओळख बनवणे खूप कठीण होते पण त्याचे सुनिश्चीत उत्तर होते - पाय / ३.१४ सारखे. पण देवाच्या बाबतीतल्या प्रश्नाला मात्र नक्की उत्तर नव्हते. अधिक अधिक शोध केला तर उत्तर त्या परमेश्वराच्या अधिक अधिक जवळ जाणारे होते पण त्याच्या पर्यंत पोहचवणारे मात्र नव्हते (नेति, नेति). मग त्या मार्गावर धर्म भेटले. त्यांनी उत्तर दिले नाहीच उलट गोंधळ मात्र वाढवून ठेवला.

असाच शोध चालू असताना पशूत्वाची ओळख झाली. हवा, पाणी, अन्न या प्रत्येक जीवाच्या मुलभूत गरजा. हवा सहज उपलब्ध असते, पाणी पण बर्‍याच वेळा थोड्या प्रयत्नाने मिळू शकते. पण अन्नासाठी संघर्ष हा करावाच लागतो. प्रसंगी तो क्रूर असतो पण वास्तव असतो. प्रवास पुढे चालूच रहातो.

मग मरणप्राय संकट येते. टाकीचे घाव बसायला लागतात आणि देव भेटायला लागतो. आपल्यातच अंगभूत असलेले माणूसपण आणि जगण्यासाठी लागणारी विजीगिषू वृत्ती - जी हिंस्र पशूसारखी असते - दिसतात. दोघेही अगदी विरोधी असतात - वेज आणि नॉनवेज अन्नाएवढे. पण ते एकाच होडीवर स्वार असतात. कोण संपणार? कोण टिकणार? संघर्ष सुरू होतो त्या दोघात. माणूसपणाला संधी येते त्या जगण्याच्या हिंस्र वृत्तीला संपवून टाकायची. पण तोपर्यंत त्याने ओळखलेले असते की ती वृत्तीही माझ्याएवढीच सच्ची आहे. ती जगलीच पाहिजे. ती असली तरच मी जिवंत राहीन. मग माणूस तिला तिची हद्द ठरवून देतो. दोघेही आपापली मर्यादा ओळखून रहातात. अंतिम मुक्कामाकरताचा प्रवास सुरूच रहातो. खूप प्रवास होतो पण देव भेटलेलाच नसतो. मणूस आणि जिवनसंघर्ष-वृत्ती दोघेही अत्यंत थकून जातात त्या प्रवासात. आणि मग अचानक ते पोहचतात सिद्धीच्या बेटावर. तिथे सगळे विपूल आणि सहजसाध्य असते. अगदी चमत्कार वाटावे एवढे. माणूस आणि जिवनसंघर्ष-वृत्ती दोघेही ताजेतवाने होतात. 'इथेच राहूयात', माणसाला वाटते. पण लवकरच त्याला कळते हे बेट त्याला अडकवून ठेवेल, त्याला संपवून टाकेल, आत्तापर्यंतचा प्रवास व्यर्थ जाइल. माणूस त्या बेटातून बाहेर पडतो. अर्थात जिवनसंघर्ष-वृत्ती पण बरोबर येतेच. परत प्रवास सुरू.

मग येतो एक मुक्काम. त्या मुक्कामी इतके दिवस साथीला असणारी जिवनसंघर्ष-वृत्ती त्याला सोडून जाते. उरतो फक्त माणूस - देवाचा अंश!

मस्त अर्थ सांगितले आहेत सगळ्यांनी. आणखी आठवडाभर तरी राहो तो चित्रपटगृहात, म्हणजे मला बघता येईल.

मी ही पाहिला ३ डि मधे आवडला, काही वेळा रेंगाळल्या सारखा वाटला पण पुढे काय होणार ही उत्सुकता ही वाटत राहीली
३डी इफेक्टस पण चांगले दाखवलेत

नानबा, इंटेरेस्टिंग. नक्की लिही. आत्ता थोडे पुस्तकाबद्दल वाचत होते. रिचर्ड पार्कर हे नाव, बोटीचे नाव ह्या सगळ्यालाही खूप संदर्भ आहेत. एकंदरित इंटरप्रिटेशन्सन काढाल तितकी कमी आहेत. हे पुस्तक लिटरेचर बीए- एमए ला अभ्यासक्रमात नक्की लागणार ( कदाचित असेलही सध्या. ). अशा पुस्तकांवर उहापोह करायला खूप मजा येते Happy

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
------
लिहिण्यापूर्वी कुठल्याही गोष्टीत दडलेला अर्थ हा प्रत्येकाला त्याच्या अनुभव विश्वानुसार, चष्म्यानुसार आणि आयुष्याबद्दलच्या आतापर्यंतच्या चिंतनानुसार दिसतो. त्यामुळेच तुमचा अर्थ आणि माझा अर्थ अगदी वेगळा असू शकतो. त्यात चूक बरोबर असण्यापेक्षा विचारधारेतला फरक इतकाच त्याचा अर्थ.
------------
तीन धर्मांवर विश्वास ठेवत असताना पाय "हा धर्म का तो धर्म" करत नाहिये, he is believing in all of them at the same time. He has the questions, but at the same time, he is a believer. तीन धर्म फॉलो करणं म्हणजे कशावरच विश्वास न ठेवणं हे त्याच्या वडिलांचं मत आहे, त्यांच्या अनुभवातून आलेलं पण म्हणजे ते पायकरता (खरतर प्रत्येकाकरता ) खरं असेलच असं नाही. कबीरांचं उदाहरण घ्या. त्यांच्या आंतरआत्म्या पर्यंत पोहोचण्याकरता त्यांनी हिंदू आणि मुसलमान धर्मातल्या काही गोष्टींचा आधार घेतला. दोन्हीही धर्म आंधळेपणानं फॉलो केले नाहीत, पण तरीही दोन्हीही धर्मात मिळून आंतरआत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं तत्व त्यांना सापडलेलं. तसच धर्म म्हणजे काय? जगण्याचा मार्ग का आपल्या गाभ्यात पोहोचण्याचा? जगण्याचा मार्ग म्हणून तीन धर्म फॉलो करणं शक्य नसेलही, पण गाभ्यात जाण्यासाठी अशी रिस्ट्रिक्शन्स असू शकतात का? पायला ह्याच उत्तर कुराणातल्या सुरांमधून, येशूच्या प्रेमातून, तो जन्मलेल्या हिंदू धर्मातल्या कथांमधून शांतता शोधताना आपसूकच गवसलय.

३ धर्मांवर विश्वास ठेवणारा पाय - वाघाच्या आतही आत्मा आहे हे समजून (किंवा त्याच्या वडलांच्या दृष्टीकोनातून अशा समजूतीत) आहे. वाघ म्हणजे त्याचा विश्वास (faith). ह्या सगळ्या धर्मांना आणि त्यांच्या शिकवणूकीनुसार सगळ्या प्राणीमात्रांना एका पातळीवर आणणारा विश्वास. जेव्हा पहिल्या सीनमधे पाय त्याला खायला देत असतो तेव्हा तो वाघाच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय.. he considers tiger (or whatever it represents) to be equal & also trustworthy.
The moment his father puts a lamb in there आणि वाघ झडप घालतो, त्याला त्या विश्वासाचं मुळ असणार्‍या गोष्टीचं हिंस्त्र रुप दिसतं आणि त्याच्या विश्वासाच्या चिंधड्या उडतात.
Isnt that how any religion can be! त्यातला हिंस्त्रपणा, क्रूरता - हे जाणवतं तेव्हा कळणारा हादरतोच..
(नंतरच्या सिनमधे तो वाचत असलेलं पुस्तक बघा.)

आणि मग बोटीवरचं नाट्य घडतं. हा त्याच्या आतलाही संघर्ष आहे. हाएना/कुक बद्दल बोलताना तो म्हणतो, वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की त्यानं माझ्यातल्या वाईटपणालाही बाहेर आणलं. इथे वाघाचं क्रौर्य म्हणजे वाईट म्हटलं नाहिये (कारण ती गरज होती). पण हाएनाचं कपट/स्वार्थ - ह्याला मात्र वाईट म्हटलय.
आणि तसं बघायला गेलं तर बोट म्हणजेही आपणच की. आपल्याच आत, एक माकड (प्रेम,ममता), हाएना (स्वार्थ, कपट), झेब्रा (अ बुधिस्ट मंक), आणि वाघ (जगण्यासाठीची, सर्ववायवलसाठीची धडपड, वेळप्रसंगी लागणारं क्रौर्य) असतच की. आपल्या कॉन्सायन्स नुसार आणि आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपली रुपं बदलतात. (मग ते कॅनिबल बेटही आपल्याकरताच सिम्बॉलिक)
त्याच बरोबर हा संघर्ष त्याच्या विश्वास(faith)/अविश्वास/चांगल्या-वाईटाची व्याख्या ह्या मधलाही आहे.
वाघाचं मरता मरता वाचणं म्हणजे विश्वासाला तडा जाता जाता - त्याचं तगणं.
वाघ म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत जगण्याची गरज, + स्वतःचं अस्तित्व - हाच खरा सजीवाचा धर्म.
पाय म्हणतो : "we" are dying Richard Parker - मी मरतोय नाही, तू मरतोयस नाही, आपण मरतोय कारण आपण म्हणजे शरीर थोडेच असतो? आपण म्हणजे आपल्या आतल्या बर्‍यावाईटासकट, आपल्या विचारांसकट, आपल्या विश्वासांसकटचे आपण.
ह्या आंदोलनात, लढाईत "आपण मरतोय".
जेव्हा शेवटची पावलं चालण्या इतकहं त्राण कधीकधी उरलेलं नसतं - तेव्हाच अनेकदा मुक्कामाचं ठिकाण येतं. It is required because now you deserve it. Esp. the inner journeys are NEVER easy. The answers are never readymade. They can not be stolen, can not be borrowed, never be taught. You can listen to others, you can read, but you will not understand unless you seek & find it out yourself.
In these journey our beliefs are smashed & reformed with better & greater understanding.
Isnt this what happened to Buddha when he became buddha? He strived to understand for years. He suffered & suffered & suffered , but did not understand.
But then came a moment - just looking at a simplest of living creature, an ant - he realized - this is what it is. Its just about living. That was the moment of his enlightnment. Perhaps I can not put it in words the way he felt it, because his journey & destination were no more different, but my journey is still a journey.

चित्रपटाच्या सुरुवातीला रिचर्ड पार्करचं हिंस्त्र स्वरुप बघून विश्वास उडालेला पाय - तो चित्रपटाच्या शेवटापर्यंत त्याच्या खर्‍या स्वरुपाला ओळखतो. जी जगण्यासाठीच्या संघर्षाची अपरिहार्यता आहे - ती त्याच्यापर्यंत पोहोचते. हाच खरा धर्म. ह्यात चूक बरोबर काही नाही. हे फक्त असणं आहे.
वाघ सोडून जातो तेव्हा तो मागेही वळून पहात नाही, कारण त्याच्या असण्याची गरज आता संपली आहे. आपल्यातलाच एखादा भाग आपल्याला सोडून जाताना जे दु:ख आपल्याला होतं तेच पायलाही होतं, but is there any other meaning to not saying a good bye? Is it because its gonna come back to us when the need arises for our own survival?

लाईफ ऑफ पायबद्दल विचार करताना मला एका झेन कवितेची आठवण आली:

Before a person studies Zen,
mountains are mountains and waters are waters;

After a first glimpse into the truth of Zen,
mountains are no longer mountains and waters are not waters;

After enlightenment,
mountains are once again mountains and waters once again waters.

पहिल्या सीनमधला पायचा विश्वास हा "before practising zen" सारखा आहे.
आणि शेवटच्या सिनमधला "झेन" झाल्यानंतरचा.

हे पुस्तक लिटरेचर बीए- एमए ला अभ्यासक्रमात नक्की लागणार ( कदाचित असेलही सध्या. ). अशा पुस्तकांवर उहापोह करायला खूप मजा येते

आमच्या हायस्कुलात Advanced Placement English च्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक होत. लेकीमुळे मला वाचायला मिळाल.

नानबा, वॉव. मस्त लिहिलं आहेस. तुझं इंटरप्रिटेशनही खूप आवडलं आणि पटलं देखील. अजून एक नवीन दृष्टिकोन दिल्याबद्दल धन्यवाद Happy

कल्पू, अरे वा Happy

हा धागा काढल्याबद्दल शतशः धन्यवाद डॅफोडिल्स Happy
नताशा, अगो, कल्पू, नानबा- तुमच्या सगळ्यांच्या पोस्ट्स मस्त आहेत.
सिनेमा बघताना, ती दुसरी कथा इतकी सहज सांगितली आहे की चटकन लक्षातच येणार नाही ती खरी आहे म्हणून.
मी पुन्हा पाहणार आहे हा सिनेमा आता. तुमच्या सगळ्यांच्या इंटरप्रिटेशन्समुळे नवीन वाटेल तो हे नक्की.
त्या 'आनंदी'चं काय इंटरप्रिटेशन होऊ शकेल? मोह?
तो ताल वाजवायचं विसरून जातो. मोहात गुंगलेल्या माणसाचंही परिस्थितीचं भान नाहीसं होतं.
तिच्या डान्स मधल्या कमळाचा अर्थ पायला उमगत नाही. त्या सीनचंही काहीतरी इंटरप्रिटेशन होऊ शकेल असं वाटतंय.

नानबा!-तुस्सी ग्रेट हो! मस्तच लिहलयस!

आनंदी हे पात्र पुस्तकात नव्हत. मात्र कमळ हे ज्ञानामुळे (wisdom या अर्थाने not knowledge) उमललेल्या ह्रदयाच प्रतीक आहे.

.

मी अगदी सहजच हा बाफ सुरु केला होता. मुद्दामच स्पॉयलर लिहिले नव्ह्ते किंवा चित्रपटाच्या कथेबद्दलही जास्त लिहिले नव्ह्ते. आज इथे एव्हढ्या पोस्ट्स वाचुन छान वाटलं.
अगो, नानबा मस्त पोस्ट्स. मला जसा समजला हा चित्रपट त्या पेक्षा वेगळी एव्हढी इंटर्प्रिटेशन्स असतिल वाटलं नव्हतं.

मी पुन्हा पाहणार आहे हा सिनेमा आता. तुमच्या सगळ्यांच्या इंटरप्रिटेशन्समुळे नवीन वाटेल तो हे नक्की. >>> मीही पुन्हा पाहिन Happy

मी पुन्हा पाहणार आहे हा सिनेमा आता. तुमच्या सगळ्यांच्या इंटरप्रिटेशन्समुळे नवीन वाटेल तो हे नक्की. >> मी पण वरच्या पोस्ट वाचून पुन्हा बघणार आहे. सगळ्यांचे प्रतीसाद मस्त आहेत.

अगो, नानबा फार मस्त लिहीले आहे!! मुव्ही पाहीला नाही, कधी पाहीन माहीत नाही.. पण तरीहि चर्चा वाचायला इंटरेस्टींग वाटत आहे!

डॅफोडिल्स आभार हा धागा काढल्याबद्दल . नानबा उत्तम विवेचन ! इतर प्रतिसादही छान!

मी लॅपटॉप वर पाहिला आज . त्यामुळे 3D इफेक्ट्स तितकेसे परिणामकारकरित्या नाही जाणवले,पण तरीही चित्रीकरण व पोस्ट-प्रॉडक्शन एकदम उच्च दर्जाचे आहे.

अनेक जणांनी सांगितल्याप्रमाणे पहिली व दुसरी गोष्ट यात पटकन पहिलीच आवडते ,पण सखोल विचारांती दुसरी गोष्ट आणि एकंदर चित्रपटाचा अर्थ व त्यातून व्यक्त होणारा भावार्थ लक्षात येतो.

सर्वांचे आभार......... परत बघताना निराळ्या दृष्टीकोणातून पाहता येईल !!!!!!!!!!!

आजच हा चित्रपट ३ डी मधे बघीतला.. प्रचंड आवडला...

नताशा, अगो व नानबा.. तुमचे सगळ्यांचे इंटरप्रिटेशन आवडले.. मुळात या चित्रपटाच्या कथेमधेच एवढी डेप्थ आहे की ती कथा बघणार्‍याला विचार करायला भाग पाडते...

मुळ पुस्तक वाचलेले नाही पण दिग्दर्शकाने अतिशय सुंदर रित्या कथा प्रेक्षकांपुढे सादर केली आहे. मला या चित्रपटाने पुर्ण दोन तास व ८ मिनिटे खिळवुन ठेवले होते.. त्यातले ३ डी इफेक्ट व चित्रिकरण स्टनिंगली सुंदर असुनही मला चित्रपट बघताना कथेच्या सादरीकरणानेच जास्त खिळवुन ठेवले असेच मी म्हणेन. सुरज शर्माने पाय व त्याचे अंतरंग अपल्यासमोर अतिशय प्रभावीपणे उभे केले आहे. इर्फान खानचा अभिनय सुद्धा मला आवडला.

अवश्य बघावा असा चित्रपट.

Pages