माझा पहिला परदेश प्रवास : ३ (रजनीकांत, रावण आणि अल्काझार शो.)

Submitted by ललिता-प्रीति on 6 October, 2008 - 00:36

रजनीकांत, रावण आणि अल्काझार शो.
जाग न यायला काय झालं होतं ... मला पावणेतीनलाच जाग आली. उठून आवरून खाली आलो. अवेळी उठल्यामुळे २-३ मंडळींचे विधी उरकायला जरा वेळ लागला आणि निघायला थोडा उशीर झाला. पण कदाचित ते सगळं गृहित धरूनच तीन वाजताची वेळ सांगण्यात आली होती. सातच्या विमानासाठी तीन वाजता उठावं लागत होतं ... काही मूठभर नतद्रष्ट लोकांमुळे जगभर विमानप्रवास करणाऱ्या लाखो लोकांना झोप घ्यायला वेळ मिळत नव्हता ...

बस निघाली ... अजयचा त्रास मागील पानावरून पुढे चालू होता. मला आता मळमळत नव्हतं पण बाहेर अंधार होता. त्यामुळे वाऱ्यावर डोलणारी श्रीलंकेची शेतं पहायची राहिली ती राहिलीच !!!
'कोलंबोत एक दिवस-एक रात्र' हा नुसता भोज्ज्याला शिवण्यासारखा प्रकार झाला होता. यायचं-जायचं 'श्रीलंकन'चं बुकिंग केल्यामुळे ते पॅकेज फुकट मिळालं होतं आणि 'फुकट' या शब्दाला भुलला नाही तर तो माणूस कसला !!! खरं तर 'श्रीलंकन'चं तसंच पॅकेज घ्यावं लागतं असं नंतर कळलं. तरी, त्यातल्या त्यात, 'एअर इंडिया' पेक्षा 'श्रीलंकन' खूपच चांगलं आहे असं अजय म्हणाल्यामुळे जरा बरं वाटलं !!! घरातून निघाल्यापासून आत्तापर्यंतचा दिनक्रम पाहिल्यावर मनाला एक शंका चाटून गेली की आजी-आजोबांना घेऊन येण्यात आपण चूक तर नाही केली ? आपल्यालाच जागरणाचा इतका त्रास होतोय तर त्यांचं काय होत असेल ?? पण सुदैवाने पट्टायानंतर तसं काही झालं नाही, अजय पण पुन्हा माणसांत आला, पण ते सगळं पुढे ...

तर, २४ तासांच्या आत पुन्हा आम्ही विमानतळावर होतो. पण आज नवीनच उत्सुकता होती - दिवसाच्या विमानप्रवासाची !!! पुन्हा एकदा डिपार्चर कार्ड, बोर्डिंग पास, इमिग्रेशन, सिक्युरिटी, सामानाची तपासणी आणि या प्रत्येक ठिकाणी रांगा - सगळं पार पडलं. रोजचे आपले कसे प्रातर्विधी असतात, तसे हे प्रत्यक्ष विमान प्रवासापूर्वीचे प्रातर्विधी आहेत. ते सगळं केल्याशिवाय मजा नाही. तरी बरं, तिथे बोर्डिंगचे चारच दरवाजे होते - पुढे बॅंकॉक, सिंगापूरला तर ते गेट गाठण्याच्या नादात, जशी वेळ असेल त्याप्रमाणे, प्रभातफेरी/सायंफेरी व्हायची सगळ्यांची.

इथे एक विनोद म्हणजे बोर्डिंग पास मिळाल्यानंतरचं जे वेटिंग लाऊंज होतं तिथे टॉयलेट्सच नव्हती. कुणाला जायचं असेल तर दारातल्या कारकुनाकडे आपला बोर्डिंग पास द्यायचा, तिथून बाहेर पडायचं, शंकासमाधान झालं की पुन्हा आपला बोर्डिंग पास घेऊन आत यायचं. त्या दिवशी एक तर सकाळची वेळ, त्यात आम्ही भर मध्यरात्री हॉटेलवरून निघालेलो, त्यात बरीच आजी-आजोबा मंडळी ... त्यामुळे तो तिथला कारकून सारखा बोर्डिंग पासेस घेत होता, परत देत होता !!!
हळूहळू भूक लागायला लागली होती. नाश्त्याचं पॅक मिळणार होतं पण 'ते इथे की विमानात' ते माहीत नव्हतं. सर्वांच्या सुरूवातीच्या आतबाहेर वाऱ्या झाल्यावर नाश्ता मिळाला - प्रत्येकासाठी एक-एक मोठा केकचा तुकडा ... 'सकाळी सहा वाजता भुकेपोटी केक खायचा?' - ये बात हजम नहीं हो रही थी !! पण खाण्यावाचून पर्याय नव्हता. अजयने तिथेही काही खाल्लं नाही. गेल्या चोवीस तासात थोड्या फळांव्यतिरिक्त त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं.

Flight No. UL 422 - Now Boarding असं दिसल्यावर आदित्य टुण्णकन उडी मारून उठला. त्याला कारणही तसंच होतं - 'आजच्या विमानात व्हिडिओ गेम्स खेळता येतील' असं त्याला शिंदे काकूंनी सांगितलं होतं !!! बोर्डिंग गेट पासून विमानापाशी जायला बस होती. त्या बसमधून सगळे 'इश्ट्यांडिंग प्याशिंजर' पाच मिनिटांत विमानापाशी पोचले. फक्त श्रीलंकेतच विमानात शिरण्यासाठी जिना चढावा लागला. इतर ठिकाणी बोगदे होते. पायथ्यापाशी उभं राहून पाहिल्यावर विमानाचा नाकाकडचा भाग छान दिसत होता. मुख्य म्हणजे आपण विमानाच्या असं इतके जवळ कधी येत नाही. त्यामुळे फ़ोटो काढायची इच्छा होती पण 'परवानागी असेल की नाही' अशी शंका आली. कॅमेरा गळ्यात नव्हता आणि 'फ़ोटो काढला तरी चालतो' हे कळून बॅगमधून तो बाहेर काढेपर्यंत जिन्याच्या २-३ पायऱ्या चढून झाल्या होत्या. परत मागे फिरणं मला प्रशस्त वाटलं नाही. अजून तेवढी निर्ढावले नव्हते ना मी ... पण तेव्हा तिथे फ़ोटो काढता आला नाही याची मला अजून चुटपूट लागून राहिली आहे ...
हे विमान आदल्या दिवशीपेक्षा मोठं आणि प्रशस्त होतं. २+४+२ सीट्स होत्या. ठराविक अंतरावर टी.व्ही. स्क्रीन्स होते आणि प्रत्येक सीटच्या पुढ्यात छोटा स्क्रीन आणि रिमोट होता. आदित्यचे हात आता नुसते शिवशिवत होते पण 'टेक ऑफ़' होईपर्यंत थांबायचं होतं.

पहिल्या प्रवासात त्रास न झाल्यामुळे मी या वेळी जरा खिडकीतून बाहेर वगैरे पहायचं ठरवलं होतं. खिडकीतून समोरच विमानाचा पंख दिसत होता. आधी थोडं 'पिचिक' झालं - की खालचं विहंगम दृश्य पाहता येणार नाही म्हणून; पण नंतर लक्षात आलं की टेक ऑफ़ आणि लॅंडींगच्या वेळी पंखांपाशी पण काही यांत्रिक हालचाली सुरू असतात. दरम्यान कधी, कसल्या हालचाली होतात ते बाबांनी मला सांगितलं होतं. ही सीट मिळाली नसती तर ते सगळं पाहता आलं नसतं. त्यामुळे ते 'पिचिक' कुठल्याकुठे विरून गेलं. टेक ऑफ़चा खऱ्या अर्थाने अनुभव घेण्यासाठी मी तयार होते ...
आता त्या 'कै-च्या-कै' वेगाचं काही वाटत नव्हतं. अगदी ठरवून टेक ऑफ़च्या क्षणी खिडकीबाहेर बघितलं ... जे दिसलं ते थक्क करणारं होतं!! खाली दिसणारं दृश्य डोळ्यांत साठवावं की ज्या सुपिक डोक्यातून ही विमान नावाची वस्तू अवतरली होती त्या मानवाच्या मेंदूला सलाम ठोकावा हे कळेना. जमिनीवरच्या सगळ्या गोष्टी हळूहळू छोट्याछोट्या होत गेल्या. काही मिनिटांतच आम्ही वर आणि ढग खाली होते. मध्येच वैमानिकाने 'आता श्रीलंकेतला सर्वात उंच पर्वत दिसेल' असं सांगितलं. त्याचं नाव नाही कळलं पण खिडकीतून दिसला मात्र मस्त!!
इकडे मोठ्या टी.व्ही.स्क्रीन्सवर जगाचा भौगोलिक नकाशा आणि त्यात विमानाची दिशा आणि आगेकूच दिसत होती; थोड्या वेळाने विमानाची उंची, वेग (जो प्रचंड होता), वाऱ्याचा वेग, बाहेरचं तापमान (जे अतिशय कमी होतं) इ. माहिती दिसत होती. त्यानंतर पुढे विमानाच्या नाकाजवळ लावलेल्या कॅमेऱ्याने दिसणारं दृश्य दिसत होतं. त्या सगळ्या गोष्टी पहायला-वाचायला भलतीच मजा येत होती.
आधीच ते विमानाचं धूड आणि केवढा तो त्याचा एक-एक पंख; त्यात इतका वेग आणि बाहेर इतकं कमी तापमान; अश्या परिस्थितीत आपला रजनीकांत त्या पंखावर उभा राहून मारामारी करतो, अमिताभ, धर्मेन्द्र खाली लटकत खलनायकाचा पाठलाग करतात आणि हे सगळं आपण अक्कल गहाण ठेवून बघत असतो! रजनीकांतची मारामारी आठवून त्याक्षणी मला जाम हसू आलं!!!
तेवढ्यात खाणं-पिणं यायला सुरूवात झाली पण त्या क्षणी सगळेच त्याची वाट पाहत होते. पुन्हा एकदा अजयने काहीही खाल्लं नाही. 'आता काय करावं या माणसाला' ते मला कळेना.
पोट भरलं, पुन्हा नकाशे, बाहेरचं दृश्य ... वेळ मस्त चालला होता. आता विमानप्रवास म्हटलं की मला माझा हा प्रवास आठवेल नेहमी.
दरम्यान तिकडे आदित्य व्हिडिओ गेम्सच्या वेगळ्याच विश्वात हरवला होता.
आता हळूहळू खिडकीतून घरं, शेतं, रस्ते दिसायला सुरुवात झाली होती. वैमानिकाने लॅंडिंगची सूचना दिली. वरूनच विमानतळाची भव्यता लक्षात येत होती.

MALESIA__129.jpg

१०-१५ मिनिटात विमान उतरले. पुन्हा एकदा 'आयुबोवान' वगैरे ऐकत आम्ही बाहेर पडलो.

बॅंकॉकचा सुवर्णभूमी एअरपोर्ट, एक-दीड महिन्यापूर्वीच खुला झालेला - केवढा भव्य, प्रचंड ... आंतरराष्ट्रीय विमानतळ असे असतात!!! आपला मुंबईचा विमानतळ आठवला - आंतरराष्ट्रीय विमानतळ तसे असतात??? दोन्ही विमानतळांची तुलनाच शक्य नाही. प्रथम दर्शनाने मी तर जाम भारावून गेले. समोरच मोठाच्यामोठा 'डीमन गॉड'चा पुतळा होता ... म्हणजे आपला रावण!!!

MALESIA__006.jpg

त्या परिसरात असे ८-१० पुतळे उभे आहेत. मी एक-एक गोष्ट निरखत होते. तेवढ्यात माणसांची ने-आण करणारे सरकते पट्टे आदित्यला दिसले. एकापुढे एक असे ३-४ होते बहुतेक; तो लगेच त्या पट्ट्यांवरून दोन फेऱ्या मारून आला. आधी एकटाच गेला, दुसऱ्या फेरीला दोन्ही आज्ज्यांनाही बरोबर घेऊन गेला.
इमिग्रेशनपाशी पोचलो. बाप रे ... आधीच्या लाऊंजला भव्य म्हणायचे, तर याला काय म्हणायचे असा प्रश्न पडला. तिथून पुढे आलो तर ... तिथला लाऊंज आधीहून भव्य!! तिथून विमानतळाचे इतर मजलेपण दिसत होते. आमच्या डोक्यावर २-३ मजले सोडून मग वरच्या मजल्यांवरून गाड्यांची वाहतूक सुरू होती - पहावं ते नवलच!!! आमची बस यायला अवकाश होता. आता मात्र अजयला दोन दिवसांत प्रथमच काहीतरी खावंसं वाटलं. पहाटे कोलंबोला मिळालेला केक त्याने तिथे बसून खाल्ला. दरम्यान मी डॉलर्स देऊन थाई बाथ घेतले. बाथ आणि आपल्या रुपयाची किंमत साधारण सारखी आहे. त्या अनोळखी चलनाच्या नोटा निरखण्यात थोडा वेळ गेला. 'बस आली' असा निरोप मिळाला आणि आमची बसच्या दिशेने 'मध्यान्ह फेरी' सुरु झाली. वाटेत खालच्या मजल्यांवर नेणारे सरकते पट्टे लागले. आदित्य लगेच खूष!!
बाहेर पडलो .... मागे वळून पाहिले - विमानतळाचा पसारा नजरेत मावत नव्हता. एक बस आणि एक छोटी व्हॅन - अशी व्यवस्था होती. बस सुरू झाल्यावर सौ. शिंदेनी आमच्या गाईडची ओळख करून दिली - अनंता रुकसानसुक ऊर्फ ऍना. आता पुढचे पाच दिवस पट्टाया-बॅंकॉक सहलीत ती आमच्या सोबत राहणार होती.

'सव्वा दीखा, सव्वा दीख्रब' ... तिनं थाई भाषेत आमचं स्वागत केलं. पाठोपाठ 'नमस्ते' म्हणायला पण विसरली नाही. थाई भाषेत एखाद्या बाईला 'हॅलो' म्हणायचं असेल तर 'सव्वा दीखा' म्हणतात आणि एखाद्या पुरुषाला 'हॅलो' म्हणायचं असेल तर 'सव्वा दीख्रब' म्हणतात.
या ऍनाने पुढच्या पाच दिवसात आम्हाला आपलंसं करून टाकलं. गेली दहा वर्षे ती शिंदेना थायलंडमध्ये मदत करतीये. काही हिंदी, काही मराठी शब्द तिने आत्मसात केले होते. अर्थात, तो तिच्या कामाचाच एक भाग असणार म्हणा. आपल्या कामात ती एकदम चोख होती पण व्यावसायिक कमी, घरगुती जास्त होती. कुठल्याही ठिकाणी चुकामूक हो‍ऊ नये आणि तिला शोधणे आम्हाला सोपे जावे म्हणून तिने जवळ एक निळ्या रंगाची छत्री ठेवली होती. त्याला ती 'नीदी छत्ली' म्हणायची. एखाद्या ठिकाणाहून निघायची वेळ झाली की 'तला, तला' असं ओरडून आम्हाला बोलवायची ... म्हणजे 'चला, चला'!!! एकदोन दिवसांतच आम्ही सगळे तिच्यासारखे बोलायला लागलो होतो.
आम्हाला प्रथम जायचे होते पट्टायाला. 'पाटीया' हा त्याचा खरा उच्चार आम्हाला ऍनामुळेच कळला.
बॅंकॉकहून बसने पट्टायाला जायला अडीच-तीन तास लागतात. बाहेर कडक ऊन होतं. बसपण खूप तापली होती. ऍनाने सांगितले की थायलंडमध्ये उन्हाळा हा एकच ऋतु!!! बाप रे ... कल्पनाच करवली नाही. मग त्यापेक्षा आपली वापीची थंडीही परवडली!!

बॅंकॉकमधले रस्ते, उड्डाणपूल, रस्त्यांवरची स्वच्छता सगळंच पाहण्यासारखं होतं. शहरातून बाहेर पडल्यावर हमरस्त्यावर एका ठिकाणी चहापाण्यासाठी आम्ही थांबलो. 'सेवन-इलेवन' नावाच्या दुकानातून मी पाणी, केळ्याचे गोड चिप्स, बिस्किट्स असं काही-बाही विकत घेतलं. मध, साखर असलेले ते चिप्स पाहून समस्त छत्रे पुरूष खूष झाले. 'सेवन-इलेवन' हे तिथले 'चितळे बंधू मिठाईवाले' असावेत. त्या भागात 'सेवन-इलेवन'च्या दुकानांची साखळी आहे. तशीच दुकाने आम्हाला सिंगापूर, मलेशिया मध्ये पण दिसली.
थाई पोरींची वेशभूषा पूर्णपणे पाश्चात्य शिवाय अंगावरच्या कपड्यांची संख्या आपल्या देशापेक्षा कमी ... त्यामुळे काऊंटरवर पैसे देताना साहजिकच माझं लक्ष त्यांनी वेधून घेतलं!!! त्यात नोटा-नाणी परिचयाची नव्हती. मी त्या काऊंटरवरच्या माणसापुढे जवळचे काही बाथ मांडून ठेवले. त्याच्या लक्षात आलं. त्याने इमानदारीत जेवढं बिल झालं होतं तेवढी नाणी त्यातून उचलून घेतली आणि 'थॅन्क यू, मादाऽऽऽम' म्हणाला. थाई माणसं वाक्यातला शेवटचा शब्द लांब ओढतात; निदान इंग्रजी बोलताना तरी. थाई भाषेत काय करतात ते कळणं अशक्यच होतं. दक्षिण भारतीय भाषेचं आपण 'यंडु-गुंडु' असं वर्णन करतो, थाई भाषेला काय म्हणायचं काही कळलं नाही.
तिथून निघालो. वाटेत 'मिनी सयाम' पहायला थांबलो - ('मीऽऽनीऽऽ सायाम' - ऍनाच्या भाषेत). प्रवेशद्वारापाशी पुन्हा दोन 'डीमन गॉड'चे मोठेच्यामोठे पुतळे दिसले. थायलंडचं जुनं नाव सयाम होतं - त्यामुळे 'मिनी सयाम' म्हणजे पुरातन थायलंडमधल्या काही गोष्टी छोट्या स्वरूपात पहायला मिळतील असं वाटलं होतं. पण तिथे जगभरातल्या महत्वाच्या वास्तुरचना छोट्या स्वरूपात उभ्या केलेल्या होत्या - अगदी हुबेहूब आणि अप्रतिम. आयफ़ेल टॉवर, पिसाचा झुकता मनोरा ते सिडनी ऑपेरा हाऊस पर्यन्त सगळ्या. तिथे आम्हाला साधारण तासभर थांबायचं होतं पण तेवढा वेळही कमी पडला.

तिथून पुढे तासाभराच्या अंतरावर पट्टाया. 'एक जगप्रसिध्द पर्यटनस्थळ' हे बीरुद सोडलं तर पट्टाया हे तसं अगदी छोटंसं शहर आहे. समुद्रकिनाऱ्याच्या कडेकडेने थोडा वेळ रस्ता होता. लांबून समुद्रकिनारा खूपच सुंदर दिसत होता ... शिवाय रस्ता आणि लगेच समुद्राचं पाणी होतं. मधला वाळू हा प्रकार अगदीच नगण्य होता. तिथून आमचं The Golden Beach Hotel ५-१० मि.च्या अंतरावरच होतं.
तिसऱ्या मजल्यावर आमच्या खोल्या होत्या. १५-२० लोकांना घेऊन जाणारी, दरवाजे आपोआप बंद होणारी मोठी लिफ़्ट पाहून आदित्यचे डोळे पुन्हा चमकले. मुलांना किती छोट्याछोट्या गोष्टींत उत्सुकता असते!! पण त्याहीपूर्वी, प्रवेशद्वाराचे मोठे काचेचे दरवाजे जे त्यांच्या समोर उभं राहिल्यावर आपोआप उघडणारे होते- ते पाहून पण तो खूष झाला होता. पुढच्या दोन दिवसांत खाली आलं की त्याचा एकच खेळ होता - थोडं पुढेमागे करून ते दरवाजे उघड-बंद करायचे पण पूर्ण उघडू द्यायचे नाहीत किंवा पूर्ण बंदही हो‍ऊ द्यायचे नाहीत.
हॉटेलच्या खोल्या कोलंबोपेक्षाही प्रशस्त आणि मोठ्या होत्या. बाल्कनीतून समुद्र मात्र दिसत नव्हता. चहा-कॉफ़ी पिऊन लगेच आम्हाला 'अल्काझार शो' पाहण्यासाठी बाहेर पडायचं होतं.

संध्याकाळी सहा वाजता पुन्हा आमची बस निघाली. अतिशय अरुंद अश्या ४-६ गल्लीबोळातून वळणं घेत आम्ही त्या शोच्या प्रेक्षागृहापाशी पोचलो. आमचा बसचालक भलताच कुशल होता. अरुंद रस्ते, पदपथावरचे विक्रेते - या सगळ्यांतून एक बस जेमतेम जाईल इतकीच जागा होती. पण तो फारच सफाईने चालवत होता.

'अल्काझार शो'विषयी मी पूर्वी कधीतरी एकदा पेपरमध्ये वाचलेलं होतं. त्यामुळे मला त्याबद्दल थोडी कल्पना होती. मुळात तो संगीत आणि प्रकाशयोजनेच्या सहाय्याने सादर होणारा एक अतिशय देखणा नृत्याविष्कार आहे.

MALESIA__025.jpg

थायलंडमध्ये तृतीयपंथीयांची समस्या खूप जटील आहे. म्हणून सरकारने त्यांना या शोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ७०-८० कलाकार तास-दीड तास दिव्यांच्या झगमगाटात, लेसर किरणांच्या चकचकाटात गायन आणि नृत्याचे कार्यक्रम सादर करतात. १-२ अपवाद सोडले तर कुठेही हिडीस, अचकटविचकट हावभाव नव्हते किंवा अश्लीलता नव्हती. त्या अपवादांकडेसुध्दा माझं लक्ष गेलं ते तीन म्हातारी माणसं आणि एक शाळकरी मुलगा बरोबर होता म्हणून. नाहीतर त्यापेक्षा कितीतरी हिडीस नृत्यं आपल्या हिंदी चित्रपटात असतात. एकूणएक कलाकार तृतीयपंथी आहेत यावर विश्वास बसणार नाही इतकी सफाई होती त्यांच्या हालचालींत. नंतर त्यांच्या नृत्यांपेक्षा रंगमंचावरचा तो लखलखाट जास्त लक्षात राहिला. ८.३० ला शो सुटला. बाहेर प्रचंड गर्दी आणि गर्दीत ९९% भारतीय लोक!! ऍना आणि तिची 'नीदी छत्ली' नसती तर आमची चुकामूक अगदी हमखास झाली असती.
पुन्हा हॉटेलवर आलो, जेवलो.

थायलंडमधला पहिला दिवस खूप धावपळीचा पण अविस्मरणीय गेला होता. दुसऱ्या दिवशी आम्हाला समुद्रावर जायचं होतं.
२३ ऑक्टोबर संपत आला होता. २० तारखेनंतर आज आम्ही रात्रीची पूर्ण झोप घेणार होतो ज्याची आम्हाला सगळ्यांनाच अतिशय गरज होती ...

गुलमोहर: 

मस्त चालंलयं ललिता-प्रीति! अजून वाचायला आवडेल.

तुमच्या बरोबर आमसही सहल होते आहे. छान, पूर्ण करा लवकर.

मस्त लिहीले आहे!

काही मूठभर नतद्रष्ट लोकांमुळे जगभर विमानप्रवास करणाऱ्या लाखो लोकांना झोप घ्यायला वेळ मिळत नव्हता ...>>> हे जबरी!