प्रवेशिका - २४ ( prasad_mokashi - कुणास सांगू गीता... )

Submitted by kaaryashaaLaa on 6 October, 2008 - 22:51


कुणास सांगू गीता कृष्णा सुचतच नाही
अर्जुन कोणी लायक येथे दिसतच नाही

कसा पुरावा लपवावा अपुल्या भेटीचा?
श्वासातिल प्रणयाचे अत्तर उडतच नाही

या दोघांची गाठ कुणी अन कशी बांधली?
मनामागुनी शरीर दुबळे, पळतच नाही!

पडझड चालू झाली की मी शोधत असतो
भूकंपाचे केंद्र कधीही मिळतच नाही

हास्य होवुनी ओठांवरती येतो , जातो
तो अश्रू जो डोळ्यांमधुनी गळतच नाही

तुझी आठवण; काळजातल्या तुळशीपुढला -
मंद दिवा जो वादळातही विझतच नाही

मिठीत घ्यावे दुःखालाही खुल्या दिलाने
त्याला कोणी सगासोयरा असतच नाही

फक्त लावती अंगारा भक्तीने भाळी..
कुणी उभ्याने उदबत्तीसम जळतच नाही

काय बिनसले तिचे नि माझे, तिलाच ठावे
आरशातली व्यक्ती हल्ली हसतच नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडलेले...

तुझी आठवण; काळजातल्या तुळशीपुढला -
मंद दिवा जो वादळातही विझतच नाही

मिठीत घ्यावे दुःखालाही खुल्या दिलाने
त्याला कोणी सगासोयरा असतच नाही

फक्त लावती अंगारा भक्तीने भाळी..
कुणी उभ्याने उदबत्तीसम जळतच नाही

जबरदस्त !!
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

मित्रहो,
खूप खूप धन्यवाद!

कार्यशाळेतल्या सर्वच गझला आज वाचल्या. अगदी एकापेक्षा एक आहेत. "क्या बात है!" असं ओठांवर येईल असा प्रत्येक गझलेत किमान एक शेर तरी आहेच. शेरातल्या कल्पना पण वेगवेगळ्या, नाविन्यपूर्ण आणि ताज्या.
सर्व गझलकारांचे अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

शेवटच्या दिवसापर्यंत मला काहीच सुचलं नव्हतं. नचिकेत रोज विचारायचा "काही लिहिलस का?" आणि माझं "नाही" ठरलेलं.
असो, या कार्यशाळेच्या निमित्ताने बर्‍याच महिन्यांनंतर माझ्याकडून काहीतरी लिहिलं गेलं.
पण पहिलं पारितोषिक मिळेल असे काही वाटलं नव्हतं.

सर्वांचे मनापासून आभार!

प्रसाद..

क्या बात है!!

सगळेच शेर आवडले.. केवळ अप्रतिम..

त्यातही विशेष आवडलेले --

"पडझड चालू झाली की मी शोधत असतो
भूकंपाचे केंद्र कधीही मिळतच नाही"

..

"मिठीत घ्यावे दुःखालाही खुल्या दिलाने
त्याला कोणी सगासोयरा असतच नाही"

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

अभिनंदन प्रसाद...:)

Pages