ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १४

Submitted by स्वप्ना_राज on 29 November, 2012 - 01:09

बृच्छ जो धुंडे बीजको, बीज बृच्छके माही
जीव जो धुंडे पीवको, पीव जीवके माही

कबिरांचं हे वचन कलियुगात सुध्दा लागू होतं का? कोणास ठाऊक. बस आणि ट्रेन पकडायची घाई, ऑफिस ते घराचं दार ह्यांच्यामधला पार दमवणारा प्रवास, आपल्याला पुरून वर उरणारा कामाचा रगाडा, रात्रीचा दिवस आणि दिवसाढवळ्या कुठे टेकायला मिळालं की रात्र करणारे पेंगूळलेले डोळे, कुठे कर्जाच्या ईएम्आयची चिंता तर कुठे वयाच्या पंचविशीत लागलेली पाठीची अन मानेची दुखणी, हे कमी म्हणून की काय सगळ्या नात्यांचा पार गुंता होऊन बसलेला, तो सोडवायला वेळही नाही आणि असता तरी कसा सोडवायचा हेही माहीत नाही. ह्या सगळया धबडग्यातून देवाला शोधू पहायची हिम्मत ज्या कोणात असेल त्याला किंवा तिला माझा साष्टांग नमस्कार. आणि त्यातून त्याला किंवा तिला तो देव स्वत:तच सापडला तर त्या देवाला शिरसाष्टांग नमस्कार. आजकाल सोन्याचे कळस, सोन्याचा मुकुट आणि सोन्याच्या पादुका असल्याशिवाय देव देवळातही फिरकत नाही म्हणतात.

----------------

सीप्झकडे जाणारी बस पार खच्चून भरली होती. खरं तर भरलेल्या बसमध्ये शिरायचं नाही हा माझा शिरस्ता. पण त्या दिवशी आधीच वेळ झालेला. त्यातून बस म्हणजे काही लोकल ट्रेन् नव्हे. एक गेली तर पाच मिनिटांनी दुसरी यायला. त्यामुळे स्वत:चीच भीष्मप्रतिज्ञा मोडून 'हर हर महादेव' म्हणत मी आत घुसले. एक मान, एक हात आणि एक टक्कल पडलेलं डोकं ह्याच्यातून वाट काढत कंडक्टरला पैसे देणे आणि तिकीट पदरात पाडून घेणे ह्या दोन्ही अशक्यप्राय गोष्टी करून झाल्यावर मी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि आसपासचं कोणी उतरायच्या बेतात आहे कां ह्याची टेहळणी सुरु केली. यथावकाश ह्या प्रयत्नांना यश येऊन मला बसायला जागा मिळाली. गड सर् झाल्याच्या आनंदात मी बॅगपॅकमधून पुस्तक काढणार तेव्हढ्यात कोणीतरी खांद्यावर हात ठेवला. थोडंसं वैतागत मी वर पाहिलं. तर 'लखलख चंदेरी' एव्हढ्याच शब्दात वर्णन करता येईल अशी साडी नेसलेल्या आणि बप्पीदा मान खाली घालतील एव्हढे दागिने नखशिखांत ल्यालेल्या कोणी एक काकू तोंडभरून हसत उभ्या.

'बोंबला! आता ह्यांना बसायला जागा द्यायला लागणार. माझं नशिबच फुटकं. लटका आता पुढचा अर्धा तास. ' आमचा स्वत:च्याच मनाशी सटीसामाशी होणारा 'शब्देविण संवादु' असा वैतागाचाच कां असावा ह्याचं उत्तर त्या सर्वज्ञानीं परमेश्वराजवळही सापडायचं नाही. मी उठायची तयारी केली. 'अरे, नही नही बेटा. बैठो बैठो. मुझे अभी उतरनाही है'. पुन्हा तोंडभरून हसत काकू. 'मग?' हा एकशब्दी प्रश्न माझ्या ओठावर ना येता चेहेर्‍यावर उमटला असणार कारण काकूंनी हातातली पेटी माझ्यासमोर धरली. पेटीत पेढे. 'लो ना बेटा. मन्न्त मांगी थी. पूरी हो गयी.' आता तिच्या ह्या मन्नतीचा माझ्याशी काय संबंध हे मला कळेना. वर 'ह्यांना बरा बाप्पा पावतो. आम्ही काही मागायला गेलो की ह्याचा आपला सदा नन्नाचा पाढा' असा असूयेचा सूर मनाचा गाभारा की काय असतो म्हणतात त्यात उमटलाच.

त्यातून काकूंनी पेटी माझ्या एव्हढी तोंडासमोर धरलेली की आणखी उशीर केला तर एखादा पेढा टुण्णकन उडी मारून आपणच माझ्या तोंडात जातो की काय असं वाटायला लागलं. माझ्या डोळ्यासमोर धूर ओकणार्‍या गाड्यांच्या भर ट्रॅफिकमधून पेढ्यांची उघडी थाळी नाचवत जाणारे देवाचे सेवक आले. 'बाप रे! ह्याच्या हातातून ही थाळी पडली तर रे' ह्या माझ्या प्रश्नाला 'मग काय? उचलून परत ठेवत असेल थाळीत' हे बंधुराजांचं उत्तरही आठवलं. मग 'दूषित खव्याने बनवलेल्या पेढयातून विषबाधा' आणि 'पेढयातून गुंगीचं औषध देऊन प्रवाशांना लुबाडले' ह्या दोन्ही हेडलाईन्स सोबतीने डोळ्यांसमोर झळकल्या. 'प्रसादाला नाही म्हणू नये' हे आज्जीचे शब्द आठवले. सेकंदभरात माझं 'वढाळ' मन एव्हढ फिरून आलं तरी समोर पेढा तसाच.

'अरे, नही आन्टी. रहने दिजीये' मी निष्फळ प्रयत्न केला.
'बेटा, प्रशाद को ना नही बोलते'

ह्यावर काय बोलणार? मी मुकाट्याने एक पेढा उचलला. 'उनको भी देना' म्हणजे मी एक पेढा खिडकीच्या सीटवर बसलेल्या बाईला द्यावा असा आदेश. त्या बिचार्‍याबाईने माझ्याकडे प्रश्नार्थक चेहेरा करून बघताच 'लिजिये, प्रशाद को ना नही बोलते' हे मी तिला ऐकवलं. का ते मला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही सांगता यायचं नाही. एकाकडून दुसर्‍याकडे असं करत करत ती पेटी पुढल्या काही सीटस् फिरली. दोन स्टॉपनंतर रिकामी पेटी घेऊन हसत काकू उतरल्या. आणि मी?

'हा पेढा खाऊन आपल्याला काही होणार तर नाही ना' ही चिंता, 'प्रसाद खाऊन कधी कोणी आजारी पडत नाही' हा विश्वास आणि 'तो पेढा मी खायला हवा होता की नाही' हा संभ्रम अश्या परस्परविरोधी भावनांचा गुंता घेऊन त्या दिवशी ऑफिसला गेले. डोक्यातल्या इतर अनेक गुंत्यांसारखा हा गुंता आजतागायत सुटायचाच आहे.

-----

'साईबाबाको मानती हो?' विचारणारी माझ्या जिवलग मैत्रिणीची आजी होती.
'वो शिर्डीवाले? कभी जानेकां मौका नही मिला'. साईबाबांबद्दल मी न्यूट्रल आहे हे आणखी कोणत्या शब्दांत सांगता आलं असतं हे अजूनही मला ठाउक् नाही.
"शिर्डीवाले नही. पुत्तूपुर्थीवाले' आजींच्या नजरेत थोडी कीव आणि 'ही कसली मैत्रीण केली आहे आपल्या नातीने' हा भाव स्पष्ट वाचता आला.
'पुत्तूपुर्थीवाले?' हा पोटातला प्रश्न ओठांवर आला असता तर आजींनी बहुधा मला तत्क्षणी घराबाहेर काढलं असतं. पण माझी मैत्रीण कृष्णासारखी धावून आली.
'अम्मामा......' म्हणून तिला तेलुगुत काहीतरी सांगून तिने माझी सुटका करून मला तिच्या खोलीत नेलं.
"पुत्तूपुर्थीवाले साईबाबा?' दबकत मी तिला विचारलंच. माझी ही मैत्रीण पक्की नास्तिक आहे. त्यामुळे तिने मला 'judge' करण्याचा प्रश्न नव्हता. मग तिने ह्या साईबाबांचा इतिहास आणि तिच्या आजीआजोबांची त्यांच्यावर असलेली भक्ती वगैरेबद्दल सांगितलं. ही माझी आणि पुत्तूपुर्थीच्या साईबाबांची पहिली ओळख.

मध्ये काही वर्ष गेली. मग एक दिवस साईबाबांच्या निधनाबद्दल वाचलं. मैत्रिणीशी बोलताना तिचे आजीआजोबा अंतिम दर्शनाला जाऊन आल्याचं कळलं. आणि एके दिवशी कोपऱ्यावरच्या स्टेशनरीच्या दुकानातून फोटोकॉपीज् काढून बाहेर पडते तो समोरच्या झाडाखाली साईबाबांचा फोटो ठेवलेला. फोटोला फुलं आणि उदबत्ती. बरं, झाड ही सार्वजनिक मालमत्ता. फोटो कोणी कधी लावला कसं कळणार? आता 'मंदिर यही बनायेंगे' झालं नाही म्हणजे मिळवलं असं म्हणत मी घरी आले. मग हापिसात जाता-येता नेहमीच साईबाबांचं दर्शन व्हायला लागलं. पण श्रध्दा ही काही अजब चीज असते. धावत्या बसमध्ये तोल सांभाळायला जागा नसली तरी वाटेत लागणार्‍या देवळासमोर पडायची परवा ना करता घाईघाईत कां होईना पण हात जोडले जातात तसे सिग्नल लागून बस किती वेळ एखाद्या चर्चसमोर थांबली तरी नाही जोडले जात. निदान माझे तरी नाही. ख्रिश्चनांचा देव वेगळा, हिंदूंचा वेगळा आणि मुसलमानांचा वेगळा असं नसतं हे मान्य असतं आपल्याला पण कळून वळत नसतं. त्यातून आमच्या घरी, नातेवाईकांत, अगदी ओळखीच्या लोकांतही साईबाबांची, शिर्डीच्या किंवा पुत्तूपुर्थीच्या, भक्ती नाही. म्हणूनही असेल कदाचित पण दररोज दर्शन होत होतं तरी माझे हात कधी साईबाबांसमोर जोडले गेलेच नाहीत. बरोबर का चूक? कोणी सांगावं?

असो. काही दिवसांनंतर फोटो झाडाखालून झाडावर आला. फुलांच्या जोडीने हार आले. आता मंदिराचा वाद सुरु होणारच ह्याची मला खात्री पटली. आणखी काही आठवडे गेले. आणि साईबाबांच्या मालमत्तेबाबतचा वाद सुरु झाला. पेपरात कधी हे छापून यायचं तर कधी ते. माझी भूमिका तटस्थ असल्याने एक ब्रेकिंग न्यूज ह्यापलीकडे मी ह्याबाबत फारसा विचार केला नाही. थोड्याच दिवसांत फोटो झाडावरून झाडाखाली आला. उदबत्त्या गायब झाल्या आणि फुलांची संख्याही रोडावली.

आणि मग एके दिवशी फोटो गायब झाला. कोणी काढला? का काढला? येता जाता हा प्रश्न मला अनेक दिवस पडत राहिला. उत्तर मिळणार नव्हतंच कधी. आजकाल त्या झाडावरून मी अनेकदा पुढे जाते. पण तो फोटोही आठवत नाही आणि तो प्रश्नही. डोक्यातल्या अनेक् प्रश्नांच्या भेंडोळ्यात हा आणखी एक प्रश्न. ज्यांची उत्तरं मिळायला हवीत असे अनेक प्रश्न जिथे अनुत्तरीत आहेत तिथे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं म्हणून फारसं अडण्यासारखं नाहीच. मी रोज सकाळी उठणार आहे, ऑफिसला जाणार आहे, काम करणार आहे, परत संध्याकाळी घरी येणार आहे, नेहमीसारखी डाराडूर झोपणार आहे. कुठल्याही प्रश्नावर फार काळ झोप उडवून घेणं परवडत नाही आजकाल.

-----

"आय एम रिचीन्ग ऑफिस इन अनदर टेन मिनीट्स. आय विल कॉल यू देन' फोन बंद करून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तो श्वास वरच्यावर अडकला. आहे तिथेच थांबले मी फुटपाथवर. आणि डोळे फाडफाडून बघत राहिले. फुटपाथच्या कडेला एक लाकडी देव्हारा होता आणि त्यात गणपतीची मोठी दगडी मूर्ती. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. बाप्पाला इथे कोणी ठेवलं असेल? का? काय करू? ऑफीस पाच मिनीटांवर आणि घर दहा. घरी परत जाणं शक्य नव्हतं. नाहीतरी एव्हढा मोठा देव्हारा ठेवायला मुंबईच्या फ्लॅटमध्ये जागा कुठली असायला? कट्ट्यावर एका बाजूला छोट्या देव्हार्‍यात देव बिचारे अंग चोरून बसलेले. ऑफिसात नेणंही शक्य नाही. काय करू? काय करू? ऑफिसला जायला उशीर होत होता आणि तिथनं पाय निघता निघत नव्हता. तरी शेवटी निघाले. कां माहीत आहे? मी नुसती बोलबच्चन आहे. बोलेन खूप पण करायची वेळ आली की पाय मागे येतो. वळून वळून बघत राहिले पण ती मूर्ती उचलून घ्यायची हिम्मत काही माझ्यात नव्हती. 'लोक काय म्हणतात ह्याची मला परवा नाही' असं म्हणते मी एरव्ही आणि वागतेही तशीच. पण जेव्हा ते लोक माझ्या समोर नसतील तेव्हाच. इथे मला ती मूर्ती उचलताना रस्त्यावरच्या लोकांनी बघितलं असतं ना. लोक काय म्हणतील?

ऑफिसमध्ये पोचले आणि एका मैत्रिणीला फोन केला. तिचं आणखीच काही तर्कट. 'अग, काय माहीत कोणी ठेवली असेल, का ठेवली असेल. कदाचित कुठे भंगली असेल मूर्ती. अशी घरात ठेवू नये म्हणतात.' 'मग म्हणून काय रस्त्यावर ठेवायची?' माझा उगाचच संताप. 'हे बघ, तू नसतं शुक्लकाष्ठ मागे लावून घेऊ नकोस.' मी फोन ठेवला. कामं उरकत राहिले तरी डोळ्यांसमोरून तो देव्हारा आणि मूर्ती हलेना. सगळ्या जगाचा दु:खहर्ता तो. मखरात ठेवा, कोपर्‍यात ठेवा, वंदा नाहीतर निंदा. तो अचल. पण मला उगाच तो असहाय्य, एकाकी, पोरका वाटायला लागला.

दुपारच्या जेवणाला घरी जातानासुध्दा ती मूर्ती तिथे होती. पावसाचे दिवस. मला विसर्जनाच्या मिरवणुकीत चिटूकल्या गणपतीमूर्तींच्या डोक्यावर छत्री ठेवून त्यांना भिजू न देण्याची धडपड करणारी माणसं आठवली. तीही माणसं, ती मूर्ती इथे आणून ठेवणाराही माणूस आणि तिकडे दुर्लक्ष करून जाणारी मी आणि रस्त्यावरची इतरसुध्दा माणसंच. का आम्ही माणसं नाही? विचार करून करून डोकं गरगरायला लागलं. आईकडे विषय काढला तर ती म्हणाली 'होतो ग त्रागा कधीकधी माणसाचा. देवावरचा विश्वास उडतो.' 'अग हो, पण म्हणून हे असं करायचं?' मला तर काही सुचत नव्हतं. नुसता त्रागा होत होता. पुन्हा त्याच वाटेने ऑफिसला जायला नको वाटत होतं. तरीही मी गेले - जेवण करून परत गेले आणि संध्याकाळी घरी गेले.

रात्री डोक्यात विचारांचं नुसतं काहूर माजलं. त्रास, दु:ख, कटकटी सगळ्यांच्याच आयुष्यात असतात ना? एखादी चांगली गोष्ट घडली तर आपण दरवेळी देवाचे आभार मानतोच असं नाही. आपला उत्कर्ष होतो, प्रगती होते, पैसा येतो - सगळं सगळं होतं ते आपल्या स्वत:च्या कर्तृत्वाने. 'मी हे केलं, मी ते केलं'. पण एखादी गोष्ट मनाविरुध्द झाली की लागतो देवाच्या नावाने खडे फोडायला. ती आपली चूक नसते बरं, देवाची करणी असते. ह्याहूनही पुढे जाऊन देव-बिव सगळं झूट आहे. नुसती दगडाची मूर्ती आहे असं वाटायला लागतं. नास्तिक लोकांचं बरं असतं. देव नाहीच म्हणतात आणि मोकळे होतात. ते परवडलं. पण एखाद्या आस्तिक माणसाला नास्तिक होताना पाहणं फार क्लेशकारक असतं. ती मूर्ती रस्त्यावर आणून ठेवणार्‍या व्यक्तीचं असंच झालं असेल का? असं काय भयानक घडलं असेल तिच्या आयुष्यात?

सकाळ झाल्यावर पाय ओढत मी ऑफिसच्या दिशेने निघाले. पुन्हा ती मूर्ती रस्त्याच्या कडेला पहावी लागणार आणि आपण काही करू शकणार नाही ह्याचं सावट मनावर होतं. पण त्या कोपर्‍यावर आले आणि पहाते तो काय? देव्हारा तसाच होता पण आत मूर्ती नव्हती.

ज्या व्यक्तिने ती मूर्ती तिथे ठेवली होती ती येऊन घेऊन गेली? का बाप्पाचा कोणीतरी भक्त नुसताच हळहळला नव्हता तर त्याला आपल्यासोबत घेऊन गेला होता? ह्याही प्रश्नाचं उत्तर मिळणं अशक्यच होतं.

आज मी त्या ऑफिसात नाही. पण अजूनही कधीमधी त्या रस्त्याने जाते, येते. कधी आपल्याच विचारात असेन तर हा प्रसंग आठवतसुध्दा नाही. कधी आठवतो. खूप अस्वस्थ वाटतं. मग मी असा विचार करते की कुठल्यातरी भक्ताच्या घरातल्या देव्हार्‍यात बाप्पाची ती मूर्ती विराजमान झाली असेल, तिची यथास्थित पूजा होत असेल, तिला फुलं वाहिली जात असतील, उदबत्तीच्या सुवासाने सगळा देव्हारा भरून जात असेल. तेव्हढ्यापुरतं बरं वाटतं. पण मग परत अस्वस्थता दाटून येते.

ह्या आठवणीसोबत ती आता कायमचीच रहाणार.

-------------

कबीर म्हणतात

संसय करौ न मै डरौ
सब दुख दिये निवार
सहज सुन्न मे घर किया
पाया नाम आधार

आमच्या आयुष्याची कथा काय सांगावी? सदोदित 'हे बरोबर की चूक' हा संशयकल्लोळ आहे. नोकरी जाते का रहाते ह्याची, पैसे कमी तर पडणार नाहीत ना ह्याची, जवळची प्रेमाची माणसं दुरावतील ह्याची, मरणाची, कधी कधी तर नुसती अनामिक भीती आहे. नुसता रुमाल जरी हरवला तरी हळहळ वाटते एव्हढी भौतिक गोष्टींची आसक्ती आहे. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी घाईघाईत जोडलेले हात आणि रात्री अंथरुणाला पाठ टेकताच झोपेच्या आधीन होण्याआधी पुटपुटलेली प्रार्थना ह्यापलीकडे देवाच्या नावाचा आधार नाही. मग दु:ख तळ ठोकून राहिलं तर तक्रार कोणाकडे करायची?

-----

वि.सू. १ - कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास क्षमस्व
वि.सू. २ - ह्याआधीच्या पन्न्यांची लिंक माझ्या विपूत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच मस्त.

आमच्या आयुष्याची कथा काय सांगावी? सदोदित 'हे बरोबर की चूक' हा संशयकल्लोळ आहे. नोकरी जाते का रहाते ह्याची, पैसे कमी तर पडणार नाहीत ना ह्याची, जवळची प्रेमाची माणसं दुरावतील ह्याची, मरणाची, कधी कधी तर नुसती अनामिक भीती आहे. नुसता रुमाल जरी हरवला तरी हळहळ वाटते एव्हढी भौतिक गोष्टींची आसक्ती आहे. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी घाईघाईत जोडलेले हात आणि रात्री अंथरुणाला पाठ टेकताच झोपेच्या आधीन होण्याआधी पुटपुटलेली प्रार्थना ह्यापलीकडे देवाच्या नावाचा आधार नाही. मग दु:ख तळ ठोकून राहिलं तर तक्रार कोणाकडे करायची?>> अगदी +१

स्वप्ना.....," जियो".........!!!!!!

हा पन्नाही खूऊऊऊऊप आवडला...
तुझ्या विचारांत किती शक्ती आहे आणी ते बरोब्बर शब्दात पकडण्याची खूबी ही आहे तुझ्याकडे

' सोनेपे सुहागा' यालाच म्हणतात ना??? Happy

खूप छान लिहीतेस ग! तुझं लिखान वाचताना, मी ते वाचतेय असं कधी वाटतच नाही ..... असं वाटत की तु बोलते आहेस न मी ऐकते आहे.. Happy

फारच छान स्वप्ना....खूप दिवसांनी टाकलास पुढचा पन्ना....
नेहमीसारखाच सुरेख जमलाय...
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींनी मनात माजणारे विचारांचे काहूर शब्दात पकडायला मस्त जमलाय तुला....
अजून येऊ देत....

तुझ्या पन्नांचा पंखा Happy

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणताय तसं ह्यावेळी खूप दिवसांनी पन्ना लिहिला. त्यामुळे पूर्वीसारखंच जमेल की नाही ही शंका होती. अनुभवही असे की नेमकं काय वाटतंय किंवा खुपतंय ते शब्दांत नीट मांडताही येत नव्हतं. Sad पण तुम्हाला सगळ्यांना आवडलं म्हणजे माझे विचार थोड्याफार प्रमाणात तुमच्यापर्यंत पोचवता आले तर मला. Happy

पुढचा पन्ना लवकर लिहायचा प्रयत्न नक्की करेन.

Pages