काय मग दिवाळी स्पेशल?

Submitted by मुंगेरीलाल on 26 November, 2012 - 11:33

दिवाळीपूर्वीचा आठवडा. थंडीनं जोर पकडलाय आणि वातावरणात उत्साहाच्या जणू रांगोळ्या घातल्या जातायत, आशेचे आकाशकंदील झगमगतायत. अशातच एका मित्रानं नेहेमीचाच प्रश्न विचारला,

“काय मग यंदा तुमची दिवाळीची खरेदी?”

“यंदा काहीच नाही”, यावर तोही समजूतदार असल्यासारखा हसला आणि विषय तिथेच राहिला. घरी आल्यावर मात्र माझं चालू झालेलं विचारचक्र मला स्वस्थ बसू देईना. नाही म्हणायला जवळच्या मंडळींना सालाबादप्रमाणे कपडे घेऊन झाले होते. फराळाचे पदार्थ ऑर्डरचे पैसे देऊन फक्त घरी आणून टाकायचे बाकी होते. आणखी काय असतं दिवाळी म्हणजे? आजकाल नात्यातली, ओळखीची अर्धी-अधिक मंडळी सुट्ट्यांची संधी साधून कुठेतरी फिरायला गेलेली असतात आणि उरलेली कुणीतरी घरी भेटायला येईल या खोट्या आशेत आपापल्या घरी वाट पाहत बसून असतात.

सकाळी उठून पेपर उघडावा तर वेगवेगळे मोबाईल, कॅमेरे, भलेमोठे फळे वाटावेत असे चपटे रंगीत टीव्ही आणि काय काय... इतकं गोंधळून जायला होतं की काय करावं काही समजत नाही. प्रत्येक जाहिरातदार रंगसंगती आणि कल्पकतेची पराकाष्ठा करत हे ठसवत असतो की आमचं उत्पादन घेऊनच दिवाळी साजरी करा. पूर्वी अर्धे पैसे साठवून आणि अर्धे कसेबसे हात-उसने घेऊन वर्ष-वर्ष वाट पाहून वस्तू घेतली जायची. थोडा गरजेचा आणि थोडा हौसेचा मामला असायचा. पण नवी वस्तू घेतली नाही तर दिवाळी साजरी झाली नाही असं विशेष नसायचं. त्यामुळे सणाच्या दिवसातही कस्टमरला दुकानाची पायरी चढल्यावर मान मिळायचा, कारण घेणाऱ्यांची भाऊगर्दी नसायची. आवर्जून कोकाकोला, गोल्ड स्पोट मागवलं जायचं. दुकानातून वस्तू घरी आली की आख्खा शेजार गोळा व्हायचा. टीव्ही, फ्रीज असो की साधा कॅरम, सगळ्यांना त्या वस्तूचा हक्कानं उपभोग घेण्याची इच्छा असायची आणि ती त्यांच्या डोळ्यात पाहून घेणाऱ्याला एक समाधानाचं सुख व्हायचं.

काळ बदलला. बँकेचं स्टेटमेंट, पॅनकार्ड आणि दोन फोटो दिल्यावर कर्जात लपेटून कुणालाही काहीही मिळू लागलं आणि आता दिवाळी कशी करणार? यंदा काय घेतलं या प्रश्नाचं उत्तर काय देणार? तर या भावनेनं किंकर्तव्यमूढ होऊ नये म्हणून बाजार आणि मिडिया मदतीला तयार आहेच. आणि त्याच्यात भर घालायला आजू-बाजूची खरेदी करुन प्रोत्साहित करणारी आणि ती स्वतः न करताही दुसऱ्याला उगीचच उद्युक्त करणारी मंडळी असतातच. दिवाळीच काय, वर्षातला एकही सण यातून सुटत नाही. तुम्ही जर सतत काही विकत घेतलं नाही तर तो सणच नाही.

या सगळ्याचा परिणाम होतोच. मग आपल्याला हळूहळू वाटायला लागतं, खरंच खूप दिवसात काही खरेदी केलं नाही. घर जीर्णोद्धार करायला झालंय, कित्ती जुन्यापान्या वस्तू बाळगत बसतो आपण वेड्यासारख्या. डिजिटल क्यामेरा आहे हो, पण तो पार मागच्या दिवाळीला घेतलाय आणि फक्त १० मेगापिक्सेल आहे. (खरंतर अगदी ओशाळायला होतं असं जाहीरपणे सांगायला). आणि तो ८० हजार मोजलेला एलीडी टीव्ही आहे खरा, पण ३-डि नाहीये ना आणि स्मार्ट पण नाही. नवे काय सॉलिड टीव्ही आलेत आणि तेही अवघ्या दीड-दोन लाखात. भल्यामोठ्या स्क्रीन वर क्रिकेट, फुटबॉल सामने पहायची काय शान असते महाराजा, शिवाय फेसबुक, युट्युब वगैरे. मग असं वाटायला लागतं की एक घेऊन भागणार नाही. पुढच्या खोलीत मोठा ४४ इंची, दोन्ही बेडरूम्स मध्ये एक-एक ३२ इंची आणि किचन मध्ये एक आटोपशीर २२ इंची. बास, कटकटच नको. जो जे वांछील तो ते पाहो – स्वयंचित्तचॅनल!

टॅबलेट पीसी तर प्रत्येकाला ज्याचा त्याचा ७ इंची हवाच आणि एखादा घर म्हणून १० इंची. घर इतकं शांत आणि सुसंस्कृत होतं अशानी, प्रत्येकजण आपापल्या टॅबवर वाय-फायच्या साथीनं काय-बाय करत बसेल खाली मान घालून. पूर्वी सगळं घर एका कॉम्प्यूटरपाशी गोळा व्हायचं पण सध्या लॅपटॉपवर ब्राउझिंग करताना घरातली मंडळी आजू-बाजूनी आणि मागं उभं राहून बघतात, तर ते कम्फर्टेबल वाटत नाही. स्पेस आणि प्रायव्हसीच्या कल्पना बदलल्या आहेत ना त्यामुळे कसंतरीच वाटतं असं कुणी पीप केलं की. अगदी आरशात सुनमुख बघतात ना घोळका करून, तसं वाटतं.

कधी काळी घेतलेल्या म्युझिक सिस्टीम धूळ खात पडलेल्या असतात. त्यांची अडगळ वाटायला लागते. आजकाल एक गाणं सगळ्यांनी मिळून ऐकण्याचा पेशंस राहिलेला नसतो. मग आपापली आवडती गाणी एकतर आपापल्या गाडीत नाहीतर आय्पोड नाहीतर मोबाईलवर हेडसेट लावून अगदी हॉल मध्ये ऐकतोय अशाच आभासात ऐकता येतात. कुणाशी गाण्याचा प्रकार किंवा त्याच्या आवाजाची लेवल याबाबतीत तडजोड करायचा प्रश्नच येत नाही. मोबाईल तर सगळ्यांचेच बदलायला झालेत घरात. सगळ्यांची मॉडेल्स जुनाट झालीयेत “६-६” महिन्यापूर्वीची. मग एकमेकांना येता-जाता भेटवस्तू काय असावी हे पण सूचकपणे सांगणं चालू होतं. हेच प्रेम व्यक्त करण्याचं साधन होऊन बसतं आणि हीच समृद्धीची आणि नाविन्याची ओढ असं जाणीवपूर्वक ठसवलं जातं. उच्च-मध्यमवर्गीय होण्याच्या हव्यासापायी आपण आता गच्च-मध्यमवर्गीय होत जातो. खूप खूप विकत घेऊन घर गच्च भरून टाकायचं आणि त्याच्या ढिगाकडे डोळे भरून पहात राहायचं, बस्स, इतकाच सणांनचा अर्थ उरतो.

घरासमोर एक इंडिका असते पण तिला काही मित्रांनी जुनाट ट्रक म्हणून चेष्टेत हिणवल की हिचा लांबच्या प्रवासाला काही उपयोग नाही शिवाय तिच्यात ड्रायविंग प्लेझर ही शून्य हेही पटतं. मग स्वतःसाठी एक आटोपशीर होंडा-जाझ, हिच्यासाठी आय-१० आणि हायवेसाठी गेला बाजार एक प्रशस्त इनोव्हा घ्यायचं मनात घोळत राहतं. लहान लहान पोरं परदेशी गाड्या कडेवर बसूनच ओळखतात आणि आई-बाप कौतुकानं ते सुचवतील ती मोडेल्स घेण्याचा गंभीरतेने विचार करतात.

हळूहळू पूर्वी ज्यांना आयुष्यभर वाट पहावी लागायची ती सगळी स्वप्नं २-३ दिवाळ्यातच घरात येऊन पडतात. मग न घेण्यासारखं काही उरतं न काही दाखवण्यासारखं काही उरतं. आजू-बाजूला आणि नात्यातही हीच स्थिती असल्यानं कुणी काही घेतल्याचं पाहून कौतुक करण्यासारखंही काही रहात नाही आणि दिसलंच काही तरी त्याचं कौतुक वाटण्याच्या आत, हे आपण कधी घ्यायचं (फक्त आज संध्याकाळी कि विकेंडला, त्यापेक्षा जास्त नाही) याचे वेध लागतात. समोरच्यानी पुढे केलेला पेढा ‘मला गोड खायचं नाही’ म्हणून नाकारायचं मात्र आवर्जून भान राहतं, जे मुलांबरोबर पिझ्झा खाताना विसरून जातं. कदाचित यामुळेच मंडळी दिवाळीत दूर भटकायला जात असावीत का? असेल कदाचित. नव्हे तसंच असावं. नाहीतर फिरून आल्याआल्या लोक तिथले फोटो फेसबुकवर का बरं टाकत असतील? काहीतरी विकत घेऊन दाखवण्या सारखं शिल्लक राहिलं नाही तर मग काय पाहिलं ते दाखवण्यासाठीच ना?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग घरातल्या माणसांनाही फेबुवर भेटा असं होइल >>>

माधवी - एकाच घरात रहाणारे नवरा बायको एकमेकांना फेबूवर वाढदिवसाच्या शुभेछा देतात.

सुपर्ब.............
पु.लेशु. एकदम रीयालीटी आहे ही.
मी I-phone 3G S घेतला तेव्हा मला माझा कलिग बोलला की 'पागल है क्या तु I-phone 5 लॉच हो गया है और तु ये क्या उठाके लेके आई है.?"
त्याचा "ये" ऐकुन माझा पार कचरा झाला. खुप हिरमोड झाला होता माझा. पण मी खुप खुश होते माझ्या नव्या मोबाईल मध्ये. मग काही महिन्यानी तोच लंगुर येउन मला म्हणाला की 'अरे I-phone 5 का रीव्हु बोहोत खराब है. ५ & ४ दोनो सेम है!'
ह्या जमान्यात लोक आपली राहीली नाहित. सगळे ह्याच प्रयत्नात असतात की आपण कोणाला कधी कमी लेखु आणि घालुन पाडुन बोलु. त्यामुळे मी दिवळी ला काय घेतलं आणि काय केल हे फक्त स्व:ताच स्वःताला सांगुन हसायचं असतं. लोकांना सांगितलं तर ते एकतर चेष्टा करतात किंवा आपल्यावर जळुन आपली टेर खेचतात. पुर्वी सारखी मित्र आणि शेजारी मिळणं फार कठीण होवुन बसलं आहे हल्ली.

एकाच घरात रहाणारे नवरा बायको एकमेकांना फेबूवर वाढदिवसाच्या शुभेछा देतात. >>> नताशा यामधे नेहमीच शो ऑफ किंवा फालतुपणा नसतो. ज्या घरामधे नवरा-बायको-मुलं वेगवेगळ्या कमिटमेंटस/करियर्समुळे वेगळ्या शहरात किंवा देशांमधे रहातात त्यांना हे करावंच लागतं. नवर्‍याबरोबर टाइम फिक्स करुन चॅट करायला लागणं किंवा वेगवेगळ्या टाइमझोनमधे असल्यामुळे फेबुवर विश करणं नाइलाजही असु शकतो. Happy

मुंगेरीलाल, नेहमीप्रमाणे मस्तच लिहिलंय.
काय घेतलं दिवाळीला या प्रश्नाचा आता वीट यायला लागलाय.
तसंही वर्षभर काहीना काही खरेदी चालूच असते.
पूर्वी फक्त दिवाळी टू दिवाळी किंवा फारतर वाढदिवस या दोन कारणांशिवाय खरेदीच व्हायची नाही तेव्हा भयंकर अप्रूप असायचं.

ती दिवाळी आठवणीतच आता. Sad

मित्रहो, लेख आवडल्याचं वाचून खूप आनंद झाला. कितीतरी दिवसांपासून ही अनावश्यक खरेदीची चढा-ओढ एक व्यसन बनून तिची सांगड सणाच्या आनंदाशी घातली जात असलेली जाणवून अस्वस्थ वाटत होतं, त्याला कुठेतरी व्यक्त करावसं वाटत होतं. मनमोकळ्या व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया वाचूनही छान वाटलं. मनापासून धन्यवाद.

लेख पुर्णपणे पटला नसला तरी आवडला. कारण मला तुमचं लेखन आवडतंच Happy
अनावश्यक खरेदीची चढा-ओढ एक व्यसन बनून तिची सांगड सणाच्या आनंदाशी घातली जात असलेली जाणवून अस्वस्थ वाटत होतं>> +१

मी सुद्धा दिवाळीनंतर पार्ल्यात अशीच एक पोस्ट टाकली होती- "दिवाळीत काय घेतलं? डिझायनर कपडे-पर्फ्युम्स, सोनेचांदी, ४०+इंची एलइडी टीव्ही, वॉशिंग मशिन्-मावे, मॉड्युलर किचन्स, कार्-दुचाकी, फ्लॅट का अजून काही?" दिवाळीनंतर ऑफिसात आल्यावर असल्याच चर्चा सुरु होत्या अन मी यातलं काहीच न घेतल्यामुळे "बिचारी" ठरले Uhoh नाही म्हटलं तरी नवे कपडे घेतलेच होते. लोकांनी यातलं काही घ्यायला माझी अजिबातच हरकत नसते किंवा मला स्वतःलाही असले प्रकार घेण्यात इंटरेस्ट आहेच. पण यातलं काहीच घेतलं नाही तर "अरेरे दिवाळी काही खास झाली नाही एकुण " असं जे काय वाटतं लोकांना त्याचं जरा आश्चर्य वाटतं.

छानच लिहिलंय. एकदम मार्मिक.
गच्चमध्यमवर्गीय - शब्दप्रयोग आवडला Happy

नताशा यामधे नेहमीच शो ऑफ किंवा फालतुपणा नसतो. ज्या घरामधे नवरा-बायको-मुलं वेगवेगळ्या कमिटमेंटस/करियर्समुळे वेगळ्या शहरात किंवा देशांमधे रहातात त्यांना हे करावंच लागतं. नवर्‍याबरोबर टाइम फिक्स करुन चॅट करायला लागणं किंवा वेगवेगळ्या टाइमझोनमधे असल्यामुळे फेबुवर विश करणं नाइलाजही असु शकतो.>>>
मनिमाऊ, मी हे एकाच घरात रहाणार्याबद्दल लिहिले आहे आणि दर वेळॅस नवर्‍याबरोबर टाइम फिक्स करुन चॅट करायला लागत असेल तर थोडे थांबून ह्या life style चा विचार करण्याचे गरज आहे.

वाचता वाचता मन अंतर्मुख होत गेलं. मलाही आमचा पहिला एल्.पी.जी. गॅस आणला तेंव्हाची आठवण झाली. सगळ्यानी चहा घेतला होता. नंतर टेपरेकॉर्डर आणला तेंव्हाही बघायला सगळे जमले होते. पेढे चहा देऊन झाल्यावर सगळ्यांनी छान छान गाणे टेप करण्याचा सल्ला दिला. आणि लगेच काही जणानी त्यांच्याकडे असलेल्या कॅसेट्स आणून दिल्या. देणे घेणे सुरु झाले. त्याच्यात काय आनंद असतो, किंवा सगळ्यानी मिळून एखादा सिनेमा, क्रिकेटची मॅच पहाण्यात काय आनंद आहे ते आताच्या पिढीला काय समजणार. हम दो हमारा एकचा जमाना आहे. घरात समानांची गर्दी चालेल पण माणसांची गर्दी नको असते. खूप खूप छान लेख.

खुप मस्त लिहीता तुम्हि... अ प्र ति म

मला gagdetchi आवड आहे ...पण मी नेहमी विचार करते DO I Need it? OR I want it? and if answer is want then I dont buy it..
...तुमची need and want चा फरक कळला की आपोआप नको त्या खरेदीला आळा बसतो...पण विंडो शोप्पिन्ग काही सुटत नाही..:)

हे कोरियात अधिकच जाणवते... नवे ते हवेची खुपच ओढ आहे इथल्या लोकांना. आपल्यासारखी सोन्याचि हौस नाही त्यामुळे कदाचित परवडत असावं Happy

a rally thought provoking...
हा लेख वाचुन मला, ईयत्ता ८ वी ला अस्ताना मराठी च्या पुस्तकात वाचलेला धडा आठवला, नाव नक्की आठवत नाही पण पु. ल. देशपान्डे चा, विनोदि .. त्यात त्यानि शेवटी म्हटलय की, मनुश्य हा खरेदित आन्न्द मानणारा प्राणि आहे... पण तुम्हि वर्णन केलय त्याला addiction म्हणता येईल..

>>>>उच्च-मध्यमवर्गीय होण्याच्या हव्यासापायी आपण आता गच्च-मध्यमवर्गीय होत जातो. <<<<
छान्....

Pages