काय मग दिवाळी स्पेशल?

Submitted by मुंगेरीलाल on 26 November, 2012 - 11:33

दिवाळीपूर्वीचा आठवडा. थंडीनं जोर पकडलाय आणि वातावरणात उत्साहाच्या जणू रांगोळ्या घातल्या जातायत, आशेचे आकाशकंदील झगमगतायत. अशातच एका मित्रानं नेहेमीचाच प्रश्न विचारला,

“काय मग यंदा तुमची दिवाळीची खरेदी?”

“यंदा काहीच नाही”, यावर तोही समजूतदार असल्यासारखा हसला आणि विषय तिथेच राहिला. घरी आल्यावर मात्र माझं चालू झालेलं विचारचक्र मला स्वस्थ बसू देईना. नाही म्हणायला जवळच्या मंडळींना सालाबादप्रमाणे कपडे घेऊन झाले होते. फराळाचे पदार्थ ऑर्डरचे पैसे देऊन फक्त घरी आणून टाकायचे बाकी होते. आणखी काय असतं दिवाळी म्हणजे? आजकाल नात्यातली, ओळखीची अर्धी-अधिक मंडळी सुट्ट्यांची संधी साधून कुठेतरी फिरायला गेलेली असतात आणि उरलेली कुणीतरी घरी भेटायला येईल या खोट्या आशेत आपापल्या घरी वाट पाहत बसून असतात.

सकाळी उठून पेपर उघडावा तर वेगवेगळे मोबाईल, कॅमेरे, भलेमोठे फळे वाटावेत असे चपटे रंगीत टीव्ही आणि काय काय... इतकं गोंधळून जायला होतं की काय करावं काही समजत नाही. प्रत्येक जाहिरातदार रंगसंगती आणि कल्पकतेची पराकाष्ठा करत हे ठसवत असतो की आमचं उत्पादन घेऊनच दिवाळी साजरी करा. पूर्वी अर्धे पैसे साठवून आणि अर्धे कसेबसे हात-उसने घेऊन वर्ष-वर्ष वाट पाहून वस्तू घेतली जायची. थोडा गरजेचा आणि थोडा हौसेचा मामला असायचा. पण नवी वस्तू घेतली नाही तर दिवाळी साजरी झाली नाही असं विशेष नसायचं. त्यामुळे सणाच्या दिवसातही कस्टमरला दुकानाची पायरी चढल्यावर मान मिळायचा, कारण घेणाऱ्यांची भाऊगर्दी नसायची. आवर्जून कोकाकोला, गोल्ड स्पोट मागवलं जायचं. दुकानातून वस्तू घरी आली की आख्खा शेजार गोळा व्हायचा. टीव्ही, फ्रीज असो की साधा कॅरम, सगळ्यांना त्या वस्तूचा हक्कानं उपभोग घेण्याची इच्छा असायची आणि ती त्यांच्या डोळ्यात पाहून घेणाऱ्याला एक समाधानाचं सुख व्हायचं.

काळ बदलला. बँकेचं स्टेटमेंट, पॅनकार्ड आणि दोन फोटो दिल्यावर कर्जात लपेटून कुणालाही काहीही मिळू लागलं आणि आता दिवाळी कशी करणार? यंदा काय घेतलं या प्रश्नाचं उत्तर काय देणार? तर या भावनेनं किंकर्तव्यमूढ होऊ नये म्हणून बाजार आणि मिडिया मदतीला तयार आहेच. आणि त्याच्यात भर घालायला आजू-बाजूची खरेदी करुन प्रोत्साहित करणारी आणि ती स्वतः न करताही दुसऱ्याला उगीचच उद्युक्त करणारी मंडळी असतातच. दिवाळीच काय, वर्षातला एकही सण यातून सुटत नाही. तुम्ही जर सतत काही विकत घेतलं नाही तर तो सणच नाही.

या सगळ्याचा परिणाम होतोच. मग आपल्याला हळूहळू वाटायला लागतं, खरंच खूप दिवसात काही खरेदी केलं नाही. घर जीर्णोद्धार करायला झालंय, कित्ती जुन्यापान्या वस्तू बाळगत बसतो आपण वेड्यासारख्या. डिजिटल क्यामेरा आहे हो, पण तो पार मागच्या दिवाळीला घेतलाय आणि फक्त १० मेगापिक्सेल आहे. (खरंतर अगदी ओशाळायला होतं असं जाहीरपणे सांगायला). आणि तो ८० हजार मोजलेला एलीडी टीव्ही आहे खरा, पण ३-डि नाहीये ना आणि स्मार्ट पण नाही. नवे काय सॉलिड टीव्ही आलेत आणि तेही अवघ्या दीड-दोन लाखात. भल्यामोठ्या स्क्रीन वर क्रिकेट, फुटबॉल सामने पहायची काय शान असते महाराजा, शिवाय फेसबुक, युट्युब वगैरे. मग असं वाटायला लागतं की एक घेऊन भागणार नाही. पुढच्या खोलीत मोठा ४४ इंची, दोन्ही बेडरूम्स मध्ये एक-एक ३२ इंची आणि किचन मध्ये एक आटोपशीर २२ इंची. बास, कटकटच नको. जो जे वांछील तो ते पाहो – स्वयंचित्तचॅनल!

टॅबलेट पीसी तर प्रत्येकाला ज्याचा त्याचा ७ इंची हवाच आणि एखादा घर म्हणून १० इंची. घर इतकं शांत आणि सुसंस्कृत होतं अशानी, प्रत्येकजण आपापल्या टॅबवर वाय-फायच्या साथीनं काय-बाय करत बसेल खाली मान घालून. पूर्वी सगळं घर एका कॉम्प्यूटरपाशी गोळा व्हायचं पण सध्या लॅपटॉपवर ब्राउझिंग करताना घरातली मंडळी आजू-बाजूनी आणि मागं उभं राहून बघतात, तर ते कम्फर्टेबल वाटत नाही. स्पेस आणि प्रायव्हसीच्या कल्पना बदलल्या आहेत ना त्यामुळे कसंतरीच वाटतं असं कुणी पीप केलं की. अगदी आरशात सुनमुख बघतात ना घोळका करून, तसं वाटतं.

कधी काळी घेतलेल्या म्युझिक सिस्टीम धूळ खात पडलेल्या असतात. त्यांची अडगळ वाटायला लागते. आजकाल एक गाणं सगळ्यांनी मिळून ऐकण्याचा पेशंस राहिलेला नसतो. मग आपापली आवडती गाणी एकतर आपापल्या गाडीत नाहीतर आय्पोड नाहीतर मोबाईलवर हेडसेट लावून अगदी हॉल मध्ये ऐकतोय अशाच आभासात ऐकता येतात. कुणाशी गाण्याचा प्रकार किंवा त्याच्या आवाजाची लेवल याबाबतीत तडजोड करायचा प्रश्नच येत नाही. मोबाईल तर सगळ्यांचेच बदलायला झालेत घरात. सगळ्यांची मॉडेल्स जुनाट झालीयेत “६-६” महिन्यापूर्वीची. मग एकमेकांना येता-जाता भेटवस्तू काय असावी हे पण सूचकपणे सांगणं चालू होतं. हेच प्रेम व्यक्त करण्याचं साधन होऊन बसतं आणि हीच समृद्धीची आणि नाविन्याची ओढ असं जाणीवपूर्वक ठसवलं जातं. उच्च-मध्यमवर्गीय होण्याच्या हव्यासापायी आपण आता गच्च-मध्यमवर्गीय होत जातो. खूप खूप विकत घेऊन घर गच्च भरून टाकायचं आणि त्याच्या ढिगाकडे डोळे भरून पहात राहायचं, बस्स, इतकाच सणांनचा अर्थ उरतो.

घरासमोर एक इंडिका असते पण तिला काही मित्रांनी जुनाट ट्रक म्हणून चेष्टेत हिणवल की हिचा लांबच्या प्रवासाला काही उपयोग नाही शिवाय तिच्यात ड्रायविंग प्लेझर ही शून्य हेही पटतं. मग स्वतःसाठी एक आटोपशीर होंडा-जाझ, हिच्यासाठी आय-१० आणि हायवेसाठी गेला बाजार एक प्रशस्त इनोव्हा घ्यायचं मनात घोळत राहतं. लहान लहान पोरं परदेशी गाड्या कडेवर बसूनच ओळखतात आणि आई-बाप कौतुकानं ते सुचवतील ती मोडेल्स घेण्याचा गंभीरतेने विचार करतात.

हळूहळू पूर्वी ज्यांना आयुष्यभर वाट पहावी लागायची ती सगळी स्वप्नं २-३ दिवाळ्यातच घरात येऊन पडतात. मग न घेण्यासारखं काही उरतं न काही दाखवण्यासारखं काही उरतं. आजू-बाजूला आणि नात्यातही हीच स्थिती असल्यानं कुणी काही घेतल्याचं पाहून कौतुक करण्यासारखंही काही रहात नाही आणि दिसलंच काही तरी त्याचं कौतुक वाटण्याच्या आत, हे आपण कधी घ्यायचं (फक्त आज संध्याकाळी कि विकेंडला, त्यापेक्षा जास्त नाही) याचे वेध लागतात. समोरच्यानी पुढे केलेला पेढा ‘मला गोड खायचं नाही’ म्हणून नाकारायचं मात्र आवर्जून भान राहतं, जे मुलांबरोबर पिझ्झा खाताना विसरून जातं. कदाचित यामुळेच मंडळी दिवाळीत दूर भटकायला जात असावीत का? असेल कदाचित. नव्हे तसंच असावं. नाहीतर फिरून आल्याआल्या लोक तिथले फोटो फेसबुकवर का बरं टाकत असतील? काहीतरी विकत घेऊन दाखवण्या सारखं शिल्लक राहिलं नाही तर मग काय पाहिलं ते दाखवण्यासाठीच ना?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>उच्च-मध्यमवर्गीय होण्याच्या हव्यासापायी आपण आता गच्च-मध्यमवर्गीय होत जातो.

क्या बात... खूप दिवसांनी असं एक मार्मिक ललित वाचायला मिळालं.. लेखनशैली सुंदर आहे...

अप्रतिम!

छान!

>>पण तो पार मागच्या दिवाळीला घेतलाय आणि फक्त १० मेगापिक्सेल आहे. (खरंतर अगदी ओशाळायला होतं असं जाहीरपणे सांगाय>><<

हे हल्लीच मला कुणीतरी "फीलिंग" दिले. ..

गोष्ट फक्त ब्लॅक फ्रायडेची होती... झोप उडवून , लांब रांगेत उभी राहयची/जायची कल्पनाच मला सहन होत नाही. असो.

>>पूर्वी सगळं घर एका कॉम्प्यूटरपाशी गोळा व्हायचं पण सध्या लॅपटॉपवर ब्राउझिंग करताना घरातली मंडळी आजू-बाजूनी आणि मागं उभं राहून बघत>><<
आमचा पहिला कॉम्प्ची गोष्ट.. सेम. Happy

एकदम मार्मिक! Happy

मागच्या आठवड्यात मलाही हापिसातल्या एकाने असच फिलींग द्यायचा प्रयत्न केला, सॅमसन्ग गॅलॅग्झी बद्दल, माझ्याकडे एस२ आहे तर हा म्हणे मी तर एस३ पण बदलला आता नोट २ घेतलाय . तू काय चिटकून बसलीस त्या एस२ ला? Uhoh
मी म्हटलं, मी खुषंय की एस२ मध्ये....मला नकोय अजून स्पीड किंवा अजून क्लॅरीटीवाला कॅमेरा का अजून काय फिचर्...मला नोव्हेल्स वाचायला आवडतात, गेम खेळण्यापेक्षा! मग तो कटला हळूहळू Wink

पारंपारीक मॅन्ञूफॅक्चरीन्ग इन्डश्ट्रीत असल्याने दुसर्‍याला फिलिन्ग देण हे आमच्याकडे तसं कमीच.
आणि खिसा हलकाच् असल्याने खरेच घ्यायची का ह्या प्रश्नाच उत्तर १० वेळा हो आलं की मगच पुढचा विचार असल्याने अजुन तरी गच्च मध्यमवर्गीय झालो नाहिये.
पण लेख आवडलाच. कदाचित पुढे जाउन गच्च मध्यमवर्गीय व्हायच्या आधीचं अंजन म्हणुनही असेल. Happy

एक प्रसंग आठवला. आमच्या छोट्याशा भाड्याच्या घरात असतानाचा.
तब्बल ५ वर्षे वेटिन्गवरुन आमचा नंबर लागला आणि एलपीजी गॅस घरी आला.
सगळ्या शेजार्‍या बायका येवुन त्याला हळदीकुंकु लाउन त्याच्यावरच बनवलेला चहा पिउनच घरी परतले होते. Happy

क्या बात... खूप दिवसांनी असं एक मार्मिक ललित वाचायला मिळालं.. लेखनशैली सुंदर आहे...

अप्रतिम! >>>>>>> +१००००....

छान..

एक छान वाक्य (बहुदा नाच ग घुमा) शेअर केल्याशिवाय रहावत नाहिये Happy

शेवटी सुखाची व्याख्या काय? सुख हा एक फसवा आभास आहे. मुळात माणसाची सुखाची कल्पना नक्की हवी. दोघे असलो तरी दोघे असण्याचे दु:ख आणि एकटे असलो तरी एकाकीपणाचे.. मग सुख आहे तरी कशात? माणसाने अंतर्मुख होउन मनाचा तळ ढवळून याच उत्तर शोधायला हवं. नाहीतर सुख म्ह्णजे काय हे न समजता दुसर्‍याच्या सुखाच्या कल्पनेमागे आपण धावतो आणि होते फक्त दमछाक... आयुष्यभर....

खूप छान लेख आणि अनपेक्षितपणे वेगळा (मुंगेरीलाल कडून अशी अपेक्षा नव्हती :))

सुदैवाने मला Materialist गोष्टीची फारशी आवड नाही त्यामुळे माझ्या बाबा आदमच्या Happy जमान्यातला मोबाईल फोन, दूचाकी ह्याबद्दल कोणी हिणवले तरी मला काही फरक पडत नाही.

मुंगेरीसाब, सुंदरच लिहीलंत.
दैनंदिन जीवनातल्या गोष्टी तुम्ही मांडता, त्यामुळे आपलीच गोष्ट वाटावी अशी सहजता वाटातेच.

सुनमुख>> Rofl

खरंच, गॅट्जेट सॅव्ही होत जातो आहोत आपण सारे.. वीकेंडला संध्याकाळी घर आवरून ठेवताना लॅपटॉप्स, पेन ड्राईव्ह, कार्ड रीडर्स, आय पॉड, लेटेस्ट मोबाईल्स, सगळे चार्जर, वाय फाय राऊटर, ई बूक रीडर आवरताना वाटतं, हम दो और हमारे इन्ने सारे गॅड्जेट्स?? Proud

हे फक्त nostalgia म्हणुन ठिक आहे. पण पटलं नाही.
लेटेस्ट मोबाईल (किंवा इतर काही) घेण्यात काय हरकत आहे? प्रत्येकानी स्वतःची चादर पाहुन पाय पसरावे. फक्त दुसर्‍यानी घेतला किंवा हल्ली सगळेच घेतात म्हणुन घेणं immature वाटतं. पीअर प्रेशरला कधीपर्यंत बळी पडायचं ते प्रत्येकानं ठरवायच.
>> स्पेस आणि प्रायव्हसीच्या कल्पना बदलल्या आहेत...
i think its for good.

सुदैवाने मला Mअतेरिअलिस्त गोष्टीची फारशी आवड नाही त्यामुळे माझ्या बाबा आदमच्या जमान्यातला मोबाईल फोन, दूचाकी ह्याबद्दल कोणी हिणवले तरी मला काही फरक पडत नाही. >>> अगदी अगदी हेच!

ललित आवडलंच!

छान लिहीले मुंगेरीलाल. Happy विनोदाच्या अंगाने जाणारे पण विचार करायला लावणारे लिखाण आहे.

वा मुंगेरीलाल छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या

आमच्या घरी आलेला पहिला फोन तर अजून आठवतोय आख्या आळीत पार लांब पर्यंत जाऊन फोन आलाय म्हणून बोलवून आणायला लागायचं

टीव्ही तर न बोलून सोय क्रिकेटचा सामना एकट्याने कधी बघितलाच नाही त्या सर्वांसाठी आईने बनवलेला चहा

पण आता काळ बदलला आणि परिस्थिती सुद्धा बदललेय

मुंगेरीलाल
नेहेमीप्रमाणेच अ प्र ति म!
खरच विचार करायला पाहिजे.

पुढच्या खोलीत मोठा ४४ इंची, दोन्ही बेडरूम्स मध्ये एक-एक ३२ इंची आणि किचन मध्ये एक आटोपशीर २२ इंची. बास, कटकटच नको.

आणि

टॅबलेट पीसी तर प्रत्येकाला ज्याचा त्याचा ७ इंची हवाच आणि एखादा घर म्हणून १० इंची.

वाचुन वाटलं, बापरे नको नको! कल्पनाच करवत नाही. मग घरातल्या माणसांनाही फेबुवर भेटा असं होइल Sad

अतीशय सुंदर लेख. अगदी निवळशंख पाण्यासारखे नितळ विचार उमटले आहेत तुमच्या या लेखात. तुमचा आयडी पण खूप छान आहे. मुंगेरीलालचे ( दूरदर्शनचे ) जुने दिवस खूप छान होते.

माबोला बर्‍याच वर्षांनी एक छान लेखक मिळालाय.

Happy

Pages