नाव नसलेली कथा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
  • माहेर दिवाळी २०११ मधे प्रकाशित.
  • रोटरी क्लब पर्वती, पुणे चा २०११ च्या दिवाळी अंकांतील सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार.
  • दिवा प्रतिष्ठानच्या दिवाळी वाचक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार.

ही कथा इथे प्रकाशित करायची परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिक आणि मेनका प्रकाशन यांचे मनापासून आभार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

मितूनं शेवटचं पान वाचलं. परत वाचलं. खांदे उडवले आणि पुस्तक बंद केलं. यावेळेला नरहरीनी तिच्या आधीच हे पुस्तक वाचलं होतं. पुस्तकभर लाल पेनाने खुणा, रेघा करून ठेवलेल्या होत्या. लाल शाईनी अधोरेखित केलेल्या प्रत्येक ओळीओळीतून नरहरी तिला शिक्षा देऊ पाहतोय असं वाटत होतं. तिचा संताप होत होता. खुणा केलेलं पुस्तक बघितल्यावर मितूचं असंच होणार हे नरहरीला माहीत असणार आणि कुठेतरी लपून नरहरी तिचा वांझोटा संताप बघत असणार याचीही मितूला खात्री होती.

तिला झडझडून जाब विचारायचा होता नरहरीला ‘पुस्तकावर खुणा केल्यासच का? आणि केल्यास त्या केल्यास पण त्याच शब्दांवर, त्याच ओळींवर का केल्यास?’

परत पूर्वीचा खेळ. ज्या खेळापायी मितूनं जीवघेणा घाव सोसला होता. मुळापासून उन्मळून पडली होती या खेळात मितू. त्याला कारणही नरहरीच होता आणि तिला सावरणाराही नरहरीच.
नरहरी तिच्या लांबच्या नात्यातला. आजोबांची एक लांबची बहीण नवरा गेल्यावर माघारी आली. सख्ख्या भावाने हात झटकले आणि आजोबा तिला घरी घेऊन आले. तिच्या हाताला धरून तिचा अंगठ्याएवढा लेक नरहरीही आला. कोकणातल्या मोठ्या खात्यापित्या घरात कामावे तो सामावे न्यायाने ती मिसळून गेली. नरहरीची जबाबदारी आजोबांनी घेतली. मितूचे बाबा मुंबईत शिकत होते तेव्हाची ही गोष्ट. बाबांचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरी मिळाली आणि मितूच्या आईशी लग्न करून मितूचे बाबा मुंबईतच राह्यले. यथावकाश मितूचा जन्म झाला. झबल्याटोपड्यातल्या मितूला घेऊन तिचे आईबाबा पहिल्यांदा गावी आले तेव्हा खाडीतल्या धक्क्यापासून वर डोंगरात असलेल्या घरापर्यंत दहा वर्षांचा नरहरीच तिला आपल्या हातात सांभाळून अलगद घेऊन आला होता. नंतर दर सुट्टीत येणार्‍या मितूची नरहरी वाट बघायचा.

--------------

इथपर्यंत लिहून झालं आणि मी थांबले. सुरूवात तर बरी वाटत होती. मी स्वत:वरच खुश झाले. आता जरा ब्रेक घ्यायला हवा. पुढचं आत्ता सुचत नव्हतं किंवा जे सुचत होतं ते या परिच्छेदांची वाट लावणारं होतं. तसंही इतर कामं वाट बघतायतच.

मी आजवर मोजक्या कथा लिहिल्या होत्या. रग्गड कविता लिहिल्या होत्या. लेखिका होण्याचं असं काही माझं स्वप्न नव्हतं पण लिहिलेलं वाचणार्‍याला बरं वाटत होतं आणि ते बघून जरा छान बिन वाटायचं म्हणून मी परत लिहायचे. कधी कधी आता लिहिल्याशिवाय झोप लागणार नाही/ जेवण जाणार नाही म्हणूनही लिहायचे. तर कधी मंत्रचळ लागल्यासारखंही लिहायचे. आजची सुरूवात केलेली कथा यातल्या कशालाच अपवाद नव्हती. बरेच दिवसात कथा लिहिलेली नव्हती हे अजून एक कारण होतं.

नेहमीप्रमाणेच इतर कामं करतानाही माझ्या डोक्यात मितू आणि नरहरी अडकून होतेच. तान्ह्या मितूला नऊदहा वर्षाचा नरहरी उचलून घरापर्यंत आणायचा इथपासून काय काय घडलं असेल त्यांच्यात? काय बोलले असतील एकमेकांशी दोघं? आजोबांच्या घरातला आश्रित असलेला नरहरी मितूच्या आयुष्याची अपरिहार्यता का बनला असेल? प्रश्नांना अंत नव्हता आणि मितू घट्ट ओठ मिटून होती.

--------------

नरहरी हुशार होता. आजोबांनी त्याला शाळेत घातला होता. शाळा आणि अभ्यास सांभाळून उरलेल्या वेळात बागा शिंपणं, गुरांचं करणं आणि बाकीची सगळीच कामं नरहरी पटापट शिकला. नरहरी बारावी झाला आणि पूर्ण वेळ बागा, गुरं बघायला लागला. बाहेरून का होईना पण आजोबांनी त्याला पदवी पुरी करायला लावली.

नरहरी लपून बसायचा आणि दोन वर्षाची मितू त्याला शोधून काढायची. मितू पाच वर्षाची होईतो नरहरी तिच्यासाठी खाऊ लपवून ठेवायला लागला. आणि तो शोधायसाठी खुणा सुद्धा. नरहरीने अश्या खुणा पेरणे आणि ज्यात त्यात खुणा शोधत मितूने काय असेल ती गंमत शोधून काढणे हा दरवर्षीच्या सुट्टीतला हक्काचा खेळ असायचा त्यांचा. मितूला वस्तू सापडेपर्यंत चालायचा. एक वस्तू सापडली की परत पुन्हा नवीन खेळ. दोघांच्यातली ती जमाडी जम्मत होती कुणाला न सांगण्याची.

आजोबांकडे खूप पुस्तकं जमवलेली होती. मितू थोडी मोठी झाल्यावर नरहरी पुस्तकात खुणा लपवायचा. कधी एखादं चित्र असलेल्या पानाचा कोपरा दुमड. कधी एखाद्या ओळीच्या खाली रेघा मारून ठेव. हे कोणी केलंय आजोबांना समजायचं नाही. पुस्तकांना छळलेलं आजोबांना कधीच आवडायचं नाही. नेमकी मितू पुस्तकांच्यात लुडबुडताना त्यांना सापडायची. आजोबांचा संताप ओसंडत असायचा पण मितूला बघितल्यावर त्यांना रागावणं जमायचं नाही. ते आपलं तिला समजवायचा प्रयत्न करत रहायचे आणि मितू तोंडावर हात धरून खुदखुदत रहायची.

--------------

सुरूवात केल्यानंतर एकदोन महिन्यांनी मितू आणि नरहरीला समजून घेण्याच्या नादात मी मितूचं बालपण आखून काढलं. ती माझी नेहमीची पद्धत होती. मी कधीच ठरवून लिहायला बसायचे नाही. पहिला परिच्छेद तर अक्षरश: जसा सुचेल तसा कोरून काढायचे रिकाम्या हवेतून. मग त्यात उगवलेल्या नावांना हळूहळू आकार उकार द्यायला सुरूवात करायचे. कधी प्रसंगांमधून तर कधी सरळ माहितीतून. एकदा ही सुरूवात झाली की ही उगवलेली नावंच व्यक्तिरेखा बनून माझा हात धरून पुढे घेऊन जायची. आताही तसंच होईल याची मला खात्री होती. मितू, नरहरी या नावांवरून मी मितूच्या आजोबांच्या कोकणातल्या घरी पोचले होते. मितू आणि नरहरीमधे कसला तरी खेळ चालवायचा होता तो आखायला मात्र माझी मीच सुरूवात केली होती.

काहीतरी लपवणे आणि कुणीतरी ते शोधणे अश्या प्रकारच्या खेळांचं मला उगाचच जाम आकर्षण. शोधाशोधीच्या, चित्रविचित्र क्लूजच्या गेम्समधे मी कायमच ढ होते. त्यामुळेच हे आकर्षण असावे कदाचित. काही असो शोधाशोधीचा खेळ सुरू केला होता. या खेळातच काहीतरी तिढा निर्माण व्हायला हवा होता.

मी लिहीत गेले. बरीच पानं भरली. मितू एम ए झाली. नरहरीने पदवी पूर्ण करून बराच काळ लोटला. मितूची आजी फोटोत जाऊन बसली. मितूचे आजोबाही बरेच म्हातारे झाले. आजोबा, नरहरी, पुस्तकांची खोली असं एक जग, शहर-कॉलेज-परदेशातलं शिक्षण-आईबाबा-मित्रमैत्रिणी अश्या मितूच्या शहरातल्या जगाच्या बरोबरीने समांतर धावत होती. मितूच्या सुट्टीतल्या भेटींपुरतीच ही दोन जगं एकत्र यायची. एवढा सगळा प्रपंच कागदांवर मांडला तरी अजून खेळाचं गणित काही उलगडत नव्हतंच. कथा तसूभरही पुढं सरकत नव्हती. माझ्याकडे बर्‍याच घटनांचा ढीग जमला होता. पण तरी अजून मितू मुळापासून उन्मळून पडण्याची घटना हाताला लागत नव्हतीच. सुरूवातीच्या परिच्छेदांमधेच मी सांगून बसले होते मितू आणि नरहरी कुठे पोचणार ते. आता तिथपर्यंत जाण्याचा रस्ता शोधणं हेच उरलं होतं.

-कथेची सुरूवात बरी झाली म्हणून पुढची चार-पाच पानं फारसं काहीच न घडणारी कथा कोण का वाचेल?
-सतत काहीतरी घडतच राह्यलं पाहिजे. घटनेनंतर घटना येतच राह्यली पाहिजे एवढंच असतं का कुठल्या कथेमधे?
-कथा ही घटनांची साखळी असते तेव्हा एकानंतर एक घटना येणारच ना?
-नुसती घटनांची साखळी म्हणजे कथा नव्हे.
-तर मग सांग बालिके कथा म्हणजे काय?
-एक प्रवास ज्याला सुरूवात मध्य शेवट असेल.
-आता मला झोप आली. तरीही सांगते सुरूवात मध्य आणि शेवट अशी व्यवस्थित मांडणी असली तरच कथा होते असं नाही. या मांडणीशिवायही कथा होऊ शकतेच. सुरूवात मध्य आणि सुरूवात असंही असूच शकतं कथेमधे.
-पण तरी तो एका टप्प्याचा शेवट असतो त्यामुळेच तर कथा संपते तिथे.
-बर तसं. पण पुढे काय? कथा म्हणजे अजून काय हवं?
-वर्णन व्यक्तिरेखांचं, घटनांचं, भावनांचं..
-अजून?
-संघर्ष. वाद. कॉन्फ्लिक्ट
-त्याशिवाय कथा शक्य नाही?
-नाही.
-नक्की?
-नसावी म्हणजे..
-घटनांची साखळी, सुरूवात मध्य शेवट, प्रवास, वर्णन, संघर्ष इत्यादी म्हणजे कथा?
-स्वभावत: वादग्रस्त संकल्पना या विषयाचं लेक्चर नकोय.
-मग आता काय?
-लिहायला लागणे. पुढे जाणे.

पुढे म्हणजे कुठे? मितू हुशार होतीच. बुद्धिला, ज्ञानाला महत्व देणार्‍या घरात वाढली. भरपूर शिकली. लग्न, करीअर आणि आयुष्याचे सगळे निर्णय संपूर्णपणे मितूवर सोपवून ‘तुझ्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठींबाच असेल’ असं आनंदाने सांगणार्‍या घरात तिचं व्यक्तिमत्व जोपासलं गेलं. या टप्प्यावर आलेल्या मितूचं आता पुढे काय करायचं? आता तिची वाट नरहरीपर्यंत कशी पोचवायची?

नरहरी पदवीपर्यंत शिकला. आजोबांची आंब्याची कलमं, काजू आणि शेती सगळंच बघायला लागला. पुढे घोळ नकोत म्हणून त्याला आजोबांनी वेळेतच त्याला बर्‍याच हिश्श्याचा मालकही बनवलं. तिच्या जन्मापासून नरहरी तिला ओळखत होता. दर सुट्टीतला तिचा खेळगडी होता. पण सुट्ट्या सोडून नरहरीचा आणि मितूचा संपर्क संदर्भातूनच येई.

अश्या नरहरीला मितूची अपरिहार्यता कसं बनवायचं?

असं काहीतरी व्हायला हवं ज्यात मितू उध्वस्त होऊ शकेल. ज्यात नरहरीचा हात असेल आणि तरीही नरहरीच तिला सावरेल. असं झालं तरंच नरहरी मितूची अपरिहार्यता बनेल.

मितू कशाने उध्वस्त होईल? आईवडिलांची, नशिबाची, सधनतेची, उत्तम शिक्षणाची साथ लाभलेली मुलगी नक्की कश्या प्रकारे किंवा कश्यामुळे उध्वस्त होऊ शकते? एखादी मुलगी कश्याने उध्वस्त होईल? कोणीही व्यक्ती कशाने उध्वस्त होईल?

कुठल्याही व्यक्तीला जवळच्या काही व्यक्ती असतात. काही अगदी हृदयाशी बाळगलेल्या वस्तू, वास्तू, घटना असतात. अश्या व्यक्ती आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू, वास्तू, घटनाच नष्ट झाल्या, खोट्या ठरल्या तर अतीव तुटलेपण येऊन माणूस उध्वस्त होऊ शकतो.

प्रत्येक व्यक्तीच्या काही धारणा असतात, काही गोष्टींवर विश्वास असतो. या धारणांवर, या विश्वासांवर माणूस आपलं आयुष्य आखत असतो. या धारणाच फोल ठरल्या, आपण ज्यावर विश्वास टाकला त्या गोष्टीच पोकळ निघाल्या तर पायाच निखळल्यासारखा माणूस उध्वस्त होतो.

एखादा भयंकर आघात व्यक्तीला उध्वस्त करू शकतो जसे की अपघातात एखादा अवयव जाणे किंवा मुलगी असेल तर तिच्यावर बलात्कार होणे.

आईवडिलांची, नशिबाची, सधनतेची, उत्तम शिक्षणाची साथ लाभलेली मुलगी या सगळ्यात संपूर्ण उध्वस्त होईल? बलात्काराने संपूर्ण उध्वस्त होईल? तिची झगडण्याची उर्मी नष्ट होईल? एखादी व्यक्ती केवळ अपरिहार्य म्हणून ती गळ्यात बांधून घेण्याइतकी उध्वस्त होईल?

मितू कशाने उध्वस्त होईल?

मितूवर बलात्कार झाला तर ती नक्कीच जखमी होईल. तिच्या उडण्याच्या वेगाला खीळ बसेल पण थोडीशीच. आईवडील, आजोबा, बुद्धी सगळ्याच्या मदतीने ती सावरेल त्यातून. अजून प्रगल्भ होईल. पण संपूर्ण उध्वस्त होणार नाही. नरहरीच सावरू शकेल इतकी उध्वस्त होणार नाही.

पण बलात्काराबरोबरच किंवा बलात्काराशिवायही आईवडिल, आजोबा नाहीसे झाले तर? जखम खोल असेल अजून. वेळ लागेलच. पण सावरेल. त्यातून बुद्धी नाहिशी कशी होईल? ती असतेच ना.

म्हणजे या सगळ्याबरोबरच आयुष्य ज्यावर आखलंय त्या धारणा, ते विश्वास कोलमडायला हवेत. कोणीतरी जवळचं एकदम उलटं फिरायला हवं. उलटून सपकन वार केल्यासारखं फिरायला हवं. आता नरहरीच तिला उध्वस्त व्हायला कारण व्हायला हवा तर तोच उलटा फिरायला हवा.

नरहरी उलटा फिरेल म्हणजे काय घडेल? नरहरी मुळात आहे तरी कसा?

मितू अगदी तान्ही असताना नऊदहा वर्षांचा नरहरी तिला खाडीतल्या धक्क्यापासून डोंगरातल्या घरापर्यंत अलगद घेऊन आला. त्याच अलगदपणाने त्याने तिला खेळवलं असणार. आठ नऊ वर्षाने लहान असलेल्या मितूशी त्याचं कधी भांडण झालं नसणार. छोट्या मितूने हट्ट केले असतील तर नरहरीने पुरवले असतील. मितूचे पाय दुखले तर नरहरीने पाठुंगळी घेतलं असेल. आजोबांची शिस्त, शाळा, कामं या सगळ्यातून वर्षभर तो मितूची वाट बघत असणार आणि सुट्टीच्या काळात नरहरीचं शेपूट असणार छोटी मितू.

नरहरी अगदी लहानपणी आईच्या हाताला धरून आजोबांच्या गावात आला त्यानंतर मोठा होईतो त्याने गाव पण कधी सोडलं असेल की नाही कुणास ठाऊक. आजोबांनी कधीही जाणवू दिलं नसलं तरी आपण आश्रित आहोत आणि तरीही त्यांनी आपलं पालनपोषण, शिक्षण सगळं यथाशक्ती केलंय याची जाणीव नरहरीला असणारच.

मितू काय असेल नरहरीसाठी? दरवर्षी मुंबईहून येणारं धमाल मजेशीर गाठोडं? छोटी मैत्रिण जिची सगळीकडे हुंदडताना काळजी घ्यायला हवी अशी? खेळगडी? की मालकांची नात? दरवर्षी मितू त्याच्या जगाबाहेरचे अनुभव गोळा करून घेऊन त्याला येऊन सांगत असेल. दर वर्षी तिच्याकडच्या गमतींची पोतडी मोठी होत गेली असेल. गाव, झाडंमाडं, शाळा यापलिकडे आपलं जग वाढतच नाहीये हे नरहरीला कधीतरी टोचलं असेल का? त्याची खंत वाटली असेल? किंवा थोडा हेवा मितूचा?

मितू मोठी होत गेल्यावर नरहरी काय विचार करत असेल तिच्याबद्दल? तेव्हाही ती छोटी मैत्रिण असेल? तेव्हाही तेवढंच साधंसोपं राह्यलं असेल? मितूच्या जन्मापासून मितू गावात सुट्टीला येण्याची वाट नरहरी दरवर्षी पहायचा. ओढ होतीच. जीव होताच त्याचा मितूवर. मितू मोठी झाल्यावर तिचा हेवाही वाटत असेल, उत्सुकताही वाटत असेल आणि ओढही. आणि थोडाफार हक्क? हक्क वाटत असेल त्याला तिच्यावर?

मितूचं आभाळ मोठं मोठं होत चाललेलं बघून नरहरीला आनंद होत असेल पण आपण तिच्या जगाचा भागच नाही आहोत, केवळ ठिपक्याइतकेही उरणार नाही आहोत याची जाणीव त्याला त्रास देत असेल? हो बहुतेक. पण या जाणिवेपोटी तो मितूला कायमचं बांधून घालण्याइतका, तिचे पंख कापण्याइतका निर्दय बनेल? तो स्वत:हून कदाचित नाही बनणार पण कुणीतरी त्याला तसं बनवलं तर? कुणी म्हणजे कोण?

आता या कुणीतरीचं उत्तर शोधायचं तर नरहरीची माणसं शोधावी लागतील. आजोबा, आजी, नरहरीची आई ही त्याची अगदी पहिली माणसं आणि कदाचित गावातली काही मित्रमंडळी. या यादीतून आजी आजोबांना काढायला हवं कारण त्याने कथा अगदीच अतर्क्य होत जाईल. आजी, आजोबा आपल्याच एकुलत्या नातीला अडकवून ठेवण्याइतके निर्दयही नाहीत आणि पारंपारीक तर त्याहून नाहीत. मग राह्यली नरहरीची आई आणि गावातली मित्रमंडळी. नरहरीच्या आईला मुलाच्या भविष्याची चिंता सतावत असणार. पण आजोबांनी त्याला त्याचा हिस्सा वेळेवारी तोडून दिलेला असल्याने तो काही प्रश्न उदभवत नाही. नरहरीचं लग्न हा मात्र तिच्यासाठी महत्वाचा विषय. ते मितूशीच झालं तर उरलेल्या हिश्श्यावरही नरहरीची मालकी येइल असं काहीतरी तिच्या डोक्यात घोळत असेल तर? थोडक्यात नरहरीच्या आईला मालिकांच्यामधली कडवट आणि कारस्थानी खलनायिका बनवायचं.

तशी ती झाली की ती नरहरीच्या मनात मितूशी लग्न हा किडा सोडणार. आजोबांना त्याची कुणकुण लागली तरी नरहरीवर आणि मितूवरही विश्वास असल्याने ते स्वस्थ बसणार. पण तो किडा नरहरीच्या मनात प्रचंड घाणेरड्या प्राण्याचे रूप घेणार. नरहरीचा मितूवरचा जीव, मितूबद्दलची ओढ हे एका विचित्र वेडाचे रूप घेणार. पण हे सगळं मितूसाठी ‘उलटं फिरून सपकन वार’ प्रकारातलं होण्यासाठी मितू नरहरीबद्दल नक्की काय विचार करते हे स्पष्ट होणं महत्वाचं आहे.

मितूचा तो संरक्षक, सुट्टीतला खास मित्र इतका खास की लहानपणी ती त्याचं शेपूटच असावी सुट्टीत. हे झालं पण पुढे मितू मोठी झाल्यावर काय? तिचाही जीव असणारच त्याच्यावर. त्याला पर्याय नाही. सगळ्या शहरात वाढलेल्या आणि गावात मुळं असलेल्या, गावी सुट्ट्यांपुरतेच राह्यलेल्या मुलामुलींप्रमाणेच मितूसाठीही गावची प्रत्येक गोष्ट ही प्रत्यक्ष स्वर्गातून अवतरल्यासारखी असणार. माणूस म्हणून घडत असतानाच्या काळातल्या सुंदर आठवणी, शिकवण इत्यादी सगळंच. या सगळ्याचा आजीआजोबांच्याइतकाच महत्वाचा भाग नरहरी. त्यामुळे मोठी होत गेल्यावरही तिच्यासाठी तो मित्रच राहणारही. असा मित्र की जो आपल्याला कधीच दगा देऊ शकत नाही. कधीच विरूद्ध वागू शकत नाही. आपण कुठेही गेलो जगाच्या पाठीवर तरी ह्या मित्राचं आपल्यावर लक्ष असणार त्यामुळे आपण कधी चुकीचं वागून आयुष्याचा खेळखंडोबा करून घ्यायचा नाही आणि आपल्या मित्राला अपयश द्यायचं नाही. असं काहीतरी मितूला त्याच्याबद्दल वाटायचं किंवा म्हणजे वाटत असणार.

आता मी योग्य वळणावर आलेय. नरहरी आणि मितूला एकमेकांबद्दल नक्की काय वाटतं, नकी काय अपेक्षा होत्या/ आहेत हे एकदा शोधून काढल्यावर सप्पकन वार करणं सोपं आहे.

मितूचं आकाश वाढत जातंय म्हणल्यावर नरहरी ते कापायचा, मितूला आपल्यातच अडकवायचा प्रयत्न करणार. किंवा त्याची तशी इच्छा तरी असणार. ती समोर आल्यावरच मितू सटपटणार. ती इच्छा पूर्ण होत नाहीये म्हणल्यावर नरहरी घाईघाईत अस्वस्थपणे अशी काही कृती करणार ज्याने मितू मुळापासून उखडून निघेल. आणि त्याच क्षणाला नरहरीला आपली चूक लक्षात येईल. तो तिला त्या धक्क्यातून बाहेर काढेल. मग कश्यातरी प्रकारे मितू स्वत:ला त्याच्याशी बांधून घेईल.

इथपर्यंत मी माझा विचार खेचला एकदाचा. आता कथेला व्यवस्थित दिशा मिळाली होती. जिथे जायचं तिथपर्यंतची सगळी महत्वाची स्टेशनं ठरवून झाली होती. आता फक्त विस्तार की आलीच कथा हातामधे. मी थोडसं हुश्श केलं. दिवस बराबिरा गेला.

बिंदू जोडून चित्र पूर्ण करायला बसले. एका बिंदूकडून दुसर्र्‍याकडे जायचं तर सहज वाटलं पाहिजे पण अगदी आधीच कळून येइल इतकं सोपंही नसायला हवं. लोकांना वाचताना ‘वाटलंच मला’ किंवा ‘असं होणार हे कळतंच होतं’ असं नाही वाटलं पाहिजे. हे ही सोप्पं नव्हतं तेवढं.

नरहरीची आई कडवट बाई बनून आली कागदावर. नरहरीच्या मनात ती विष पेरू लागली. मितूशी लग्न करून सगळी इस्टेट नरहरीची व्हावी यासाठी गणितं मांडू लागली. नरहरीवर त्याचा परिणाम होऊ लागला. त्याचं मन मितूकडे दुप्पट वेगाने ओढ घेऊ लागलं. आजोबांना शंका आल्यावर ते चिडचिडायला लागले.

--------------

मितू परदेशात शिकायला जाणार. कधीच आपल्या हातात लागणार नाही हे कळल्यावर नरहरी तळमळला. नरहरीने शोधाशोधीच्या खेळाची मदत घेतली. खुणा पेरून ठेवल्या योग्य ठिकाणी की मितू त्याच्यापर्यंत पोचेल. त्याच्यापर्यंत पोचली मितू की तो तिला सांगणार होता आपल्या मनातलं सगळं. कसंही का होईना आपल्या मनासारखं करून घेणारंच होता. आजोबा, मितूचे आईबाबा कोणाकोणाची फिकीर करणार नव्हता. मितू त्याला हवीच होती. मितू बिचारी भोळी भाबडी तिला कशाची शंका येणार? तिला काय कल्पना नरहरीच्या मनात असं काही असेल? ती बिचारी त्या शोधाशोधीच्या खेळात सड्यावर पोचली. सड्यावरच्या देवांची पूजा आता नरहरीच करतो हे माहित होतं तिला. नरहरी होताच तिथे. पण नेहमीसारखा नव्हता.

--------------

एका बिंदूपासून सुरू केलेली रेघ दुसर्‍या बिंदूला नेऊन जोडताना शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्याला कळलं नाही पाहिजे कुठे चाललोय ते. पण तो बिंदू जोडला गेला की ह्या बिंदूशिवाय पर्यायही नाही याची खात्री पटली पाहिजे. उगा खेचल्यासारखी रेघ जाता कामा नये. इथे मात्र वेगळंच दिसत होतं. खेचाखेच प्रचंड होत होती.

-इतकी शाळा केलीस माझी. दुसरं काय होणार!
-मितू इतकी का फिस्कारतेय?तुझ्याभोवतीच तर सगळं रामायण घडतंय आणि तुझी शाळा?
-नाहितर काय? हुशारी, बुद्धी आहे म्हणे मला? आणि तरी विशीबाविशीतली मी संस्कृत नाटकाच्या अल्लड षोडशा नायिकेसारखी मी कशाचाही सुतराम क्लू लागणार नाही अशी भोळी भाबडी?

एक तुच्छ कटाक्ष टाकून मितू कथेतल्या व्यक्तिरेखा जिथे गायब होतात तिथे गेली.

कथा हातात आल्यासारखी वाटली होती आणि गेली निसटून. आली नव्हतीच कथा हातात मुळात त्यामुळे निसटायला काही नव्हतंच.
मग आता?
आता मितूला शोधणे. तिने मूर्खात काढलंय आणि आपण तेवढ्या मूर्ख नाही असा दावा आहे तर शोधा.
एवढा वेळ काय केलं मग?
त्याला घटना असं म्हणतात. फक्त घटना तपासणं, आखणं म्हणजे व्यक्तिरेखा धुंडाळणं नव्हे.

काय आहे मितू? मोकळ्या वातावरणात वाढली आणि तिच्याकडे बुद्धी आहे. विचारांच्यातला प्रचंड मोकळेपणा टॉनिक म्हणून मिळाल्यावर कशी वाढू शकतात मुलं? कुठल्याच विचारांवर बंधनं नाहीत. कुठल्याच प्रयोगांना आडकाठी नाही. प्रत्येक गोष्टीचा भरपूर विचार करण्याचं मात्र बंधन. तरीही चुकायची, पडायची पूर्ण मुभा. हे सगळं आयुष्यातल्या शिक्षण, करीअर, समाजातला वावर, मित्रमैत्रिणी, छंद, लैंगिक कल, लग्न, कपडे, नटणेमुरडणे सगळ्या सगळ्यासाठी तसंच.

पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अमाप प्रयोग केलेले असणार. अनेक अनुभव घेतलेले असणार. मग भाबडेपणा उरला असेल?
तरी वय शेवटी बाविस-तेवीसचंच ना. जग बदलण्याचा, जिंकण्याचा रोमँटिसिझम शिल्लक असेल पण नरहरीच्या मनात काय ते समजूच नये असा भाबडेपणा नाहीच ना?
ते समजल्यावर धक्का बसेल ना पण?
कदाचित बसेल कदाचित नाही पण मुळापासून उन्मळून पडण्याइतका नाही. पंधरासोळाची असल्यापासून शंका आलीच असणार.
पण एवढा विचार करायला बाकीच्या जगातून वेळ तर मिळाला पाहिजे. वीसबावीस वयाला गोष्टी समजून आल्यावर कुणाला आपल्याबद्दल काय वाटावं यात आपण काही करू शकत नाही पण आपण नकार देऊ शकतो ही समज असणारच मितूकडे.
पण मग नरहरीने जबरदस्ती केली असेल तर?
तिचा संताप होईल. त्याचा खून करावासा वाटेल. आजोबांना सांगून ती त्याला हाकलून लावायला बघेल. पण अपरिहार्यता म्हणून आयुष्यभर गळ्यात वागवणार नाही.
कदाचित जे समजून आलंय ते नकोसं नसेलच तर?
छे मितूला नरहरी कसा काय आवडेल?
आवडेलच असं नाही पण त्याला आपण हवे आहोत यात इगो सुखावत असेल तर?
इतकी इन्सिक्युअर नाहीये मितू. किंवा मग त्याला आपण हवे आहोत हे कळल्यावर आवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल तर?

जर चुकून कुठे मितूलाही नरहरी आवडू लागला असेल तर मग तो तिची अपरिहार्यता का बनेल?
अनेक अपरिहार्य जोडपी बघत नाही आपण?
पण कथेचा मुद्दा तो आहे का?
तो तिला अगदी पार ‘प्रेमात बुडणे’ अश्या प्रकारे आवडत नसेल पण बघू तरी या नात्याचं काय होतंय म्हणून ती प्रयोग करत असेल?
आणि आपण प्रयोगातलं बाहुलं आहोत हे नरहरीला समजल्यावर नरहरी दुखावून वार करेल?
प्रयोगात सगळ्याच गोष्टी येऊन गेल्यावर मग होईल तो वार मितूवर नसेल तर स्वत:वर करेल नरहरी. कारण मितूवर वार करता येण्यासारखं काही उरलं नसेल.

मितू भोळीभाबडी नाही असं ठरलंय. म्हणजे तिला खलनायिका बनवायलाच हवी असं नाही.
जर काहीतरी उलथापालथ करणारं घडवायचं असेल तर कुणीतरी बिघडायलाच हवं.
कोणीही बिघडलेलं नसलं तरी उत्पात घडू शकतातच की.

मितू आणि नरहरी दोघंही बिघडलेले नाहीत. दोघेही दुष्ट नाहीत आणि भोळेभाबडेही नाहीत. एकमेकांबद्दल ओढ आहे आणि नाहीच्या मधली त्यामुळे एकत्र येणं हे खरंतर तसं गरजेचं नाही. तरीही काहीतरी उत्पात होऊन ते पुढे जाऊन एकत्र आहेत. एकमेकांना छळण्यासाठीच एकत्र असावेत अशी दाट शक्यता. पण नातं बिघडल्यानंतरही निभावण्याची अपरिहार्यता हा या कथेचा मुद्दाच नसल्याने तिकडे जायची गरज नाही. मग कथेचा मुद्दा काय? मितू नक्की कोण? नरहरी नक्की काय विचार करतोय?

केलेले सगळे विचार, बांधलेले सगळे आडाखे, आखलेले सगळे बिंदू फुकाचे वाटायला लागले. मितू आणि नरहरी मला ओळख पण देईनासे झाले. इतके की त्यांची नावं मितू आणि नरहरीच आहेत की अजून काही हा गोंधळ व्हायला लागला. त्यांच्याबद्दल लिहायला मजाच येईनाशी झाली. बंदच केली मी वही.

स्वत:च्या लिखाणाविषयी एकदम रोमँटिक दु:ख होऊन मी कथा लिहूच शकणार नाही अशी माझी खात्री पटली. त्यामुळे यापुढे कधीही कथा लिहिणार नाही अशी उगाच प्रतिज्ञाही मी केली. बाकी आयुष्याला सुरूवात केली. पाह्यलं तर सगळं जग सुखाने चालत होतंच.

मग एक दिवस परत कोर्‍या वहीने खुणावले आणि मी नव्याने कथा लिहायला सुरूवात केली.

--समाप्त

- नीरजा पटवर्धन

प्रकार: 

छान. आवडली Happy
विचारप्रक्रिया सुरेख मांडली आहेस.
(अजून थोडा 'इटॅलिक्स'मधला मजकूर आला असता, तर बहार आली असती असं वाटलं. म्हणजे, दीर्घ विचारप्रक्रियेतील काही मुद्दे त्या मजकुरातून वाचकांपर्यंत पोहोचलेले - असं काहीतरी.)

वाचली होती तेव्हाही आवडली होती,
निर्मिती जेव्हा ठरवून केली जाते त्यामधल्या प्रवासाचे टप्पे या कथेत आले आहेत.

अशोक यांनी सूचित केलेला मुद्दा मला अशा प्रकारे जाणवतो- जेव्हा निर्मिती एका अपरिहार्य अशा आवेगातून येते, तेव्हा तीच आपल्याला खेचत नेते. जसं चि.त्र्यं.चं म्हणणं-'मी त्याला पांगळा केला नाही, तो झाला.'
हे तरल तादात्म्य महान कलाकृतीला जन्म देऊ शकतं.

'कलेतली अपरिहार्यता सुंदर, जीवनातली गूढता.'

आठवली ही कथा... Wink

मागच्या दिवाळी अंकात वाचलेली होतीच. आता पुन्हा वाचतानादेखील आवडली.

मला पण हा फॉर्म आणि कॉन्सेप्ट एकदम स्मार्ट वाटला, आवडला! सायो म्हणते तसे मधे मधे लेखिकेचे विचार लांबले असे वाटले खरे. पण हा एकूण प्रयोग आवडलाच!

ठीक आहे नीरजा...

~ माझा प्रतिसाद मीच त्रयस्थाच्या चष्म्यातून पाहिला तर तो बराचसा समीक्षा धर्तीचा झालेला आढळेल, त्यामुळे एक सर्वसामान्य वाचक या भूमिकेतून एकूणच त्या मांडणीकडे पाहात आहे.

कथेला पारितोषिक/पारितोषिके मिळणे ही निश्चित्तच अभिनंदनीय बाब असते पण त्याचबरोबर ती घटना लेखकाचा लिखाणासाठीचा हुरुपही वाढविणारी असल्यामुळे त्यांचे मूल्य नक्कीच अधिक आहे. तरीही कथेच्या अंतरंगापेक्षा जर तिच्या 'फॉर्म' मुळे ते पारितोषिक दिले गेले असल्यास लेखकाच्या दृष्टीने ते योग्य नव्हे. अशा दोनचार यशस्वी कथांमुळे लेखक मग 'ब्रॅण्ड नेम' बनते. मी तुमच्या कथेकडे 'कथा' म्हणून पाहात आहे. मर्ढेकर आणि रेगे ही अशी दोन नावे आहेत ज्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना सतत जाणवते की त्या दोघांची या क्षेत्रातील विलक्षण क्षमता + त्यांच्या लिखाणाचा फॉर्म यांची अशी काही सांगड बसली होती की त्यांच्या लिखाणाला शंभर वर्षे होत आली तरी त्यातील पानापानातून 'अर्थ' शोधला जात आहे.

मर्ढेकरांनी 'फलाटदादा' पाहिला पण ते त्याच्या प्रेमात पडले नव्हते.....रेगे 'सावित्री' आणि 'रेणू' च्या प्रेमात होते. तुमच्या कथेतील 'लेखिका' नरहरीच्या नसेल पण मितूच्या प्रेमात नक्कीच पडल्याचे दिसते....नव्हे ती पडलेली आहेच. मितूला ती कसल्याही प्रकारे दुखवू इच्छित नाही. मितूसाठी ती घटनांची साखळी बनविण्याच्या खटाटोपात जरूर आहे, तथापि त्या साखळीमुळे तिच्या आंतरसालीलाही भावनिक धक्का बसणार नाही याची लेखिका काळजी घेताना दिसते. मग नरहरी या पात्राचे योजन कशासाठी आहे ? तो काही 'कुरिअर' नक्कीच नाही. जरी दहा वर्षांनी नायिकेला सीनिअर असला तरी त्याची स्वतःची अशी ठेवण, अस्तित्व कथेत आहेच. तो मितूच्या मागे लागल्याचे कुठे सूचित होत नाही. मात्र दुसरीकडे मितू त्याला 'प्रयोगातलं बाहुलं' करण्यास पाहते ही स्थिती सहजगत्या घडत नसून खुद्द लेखिका तशी पाळी आणीत आहे की असे वाटत राहते...... कारण ? कारण लेखिकेचा मितूबाबतीतील हळवेपणा.

दोघेही दुष्ट नाहीत हे निरिक्षण योग्य.....प्रश्न असा आहे की लहानपणापासून एकत्र वाढलेले हे दोन जीव एकमेकाविषयी कोणत्या कारणामुळे दुष्टत्व राखतील? मितू चांगली एम.ए. आहे तर नरहरीदेखील अक्षरशत्रू नाही. शिक्षण आणि वय या दोन्ही घटकांनी ते चांगलेच प्रौढ झाल्याचे स्पष्ट दिसतेच. राहता राहिला प्रश्न ज्येष्ठांच्या त्या दोघांविषयीच्या मतांचा, तर तिकडून हिरवा कंदिल दिसत असल्याचा खुणा आहेतच.

एका बिंदूपासून दुसर्‍या बिंदूपर्यंतचा हा प्रवास लेखिकेला ".....अ‍ॅन्ड दे बोथ लिव्ह हॅपिली देअरइनआफ्टर...' असा दाखवायचा आहे [असे माझे एक वाचक म्हणून झाले] पण ती मितूत अशी काही अडकून पडली आहे की, नरहरीबरोबर ती गेलीच तर इकडे लेखिकाच तळमळेल. त्यामुळे ती 'कथा' पूर्ण न होऊ देणे यात एकप्रकारचे आत्मिक समाधान मानत आहे असे वाटते. "यापुढे कथाच लिहिणार नाही' अशी प्रतिज्ञेपर्यंत ती येते म्हणजे तिचे पात्रावर जडलेले प्रेम अचाट आहे. जरी पुन्हा नव्याने कोरे कागद तिला खुणावत असले तरी मागील अनुभवाचीच पुनरावृत्ती होऊच शकणार नाही याची खात्री लेखिकेला ओळखणारे निकटवर्तीय देऊ शकणार नाही असे चित्र दिसते.

साहित्याच्या दृष्टीने मग हे अपयश ठरते. लेखक/लेखिका ज्यावेळी अलिप्त राहून आपल्या पात्रांच्या सुखदु:खाकडे पाहिल त्याचवेळी तो/ती त्यांचे रेखाटन ताकदीने करू शकेल. स्टाईनबेकने ते 'ग्रेप्स ऑफ राथ' मध्ये दाखविले आहे. जी.एं.च्या एका नायकाला अशी अनुभूती येते की, "इतरांचा प्रवास संपतो आणि रस्ता राहतो, माझ्याबाबतीत मात्र रस्ता संपला, पण प्रवास मात्र चालूच राहणार....."

ही अवस्था वरील कथेतील लेखिकेची होईल की काय अशी भीती वाटते. मितूचा प्रवास कधीतरी संपेल....नरहरी सोबत असेल वा नसेल, त्यात फरक पडत नाही, मात्र तिच्या जन्मदात्रीचा, लेखिकेचा तगमगीचा प्रवास तसाच कायम राहील, रस्ता असो वा नसो.

[प्रतिसाद आवडला नाही, तरीही जरूर कळवा, वा इथेही लिहा....मला अजून 'केळीचे.....' स्मरण का व्हावे याचे कोडे आहेच, त्याचाही शोध घेता येईल या निमित्ताने]

अशोक पाटील

अशोककाका, खरंच खूप आभार.
एवढा विचार करून माझ्या लिखाणाबद्दल कुणी सांगत असेल तर प्रतिसाद न आवडण्याचा प्रश्नच कुठे येतो? मला विचार करायला नवीन मुद्दे मिळतात. नवीन दृष्टीकोनही मिळतात. उपयोगच होतो.

ह्या कथेसंदर्भाने सांगायचं तर या कथेकडे मी कसे बघावे याबद्दल मी अजून ठाम निर्णयाला नाही. ही एक ठराविक टप्प्यापर्यंतची प्रक्रीय कथास्वरूपात इथे मांडलीये. पण माझी स्वत:ची प्रक्रीया संपत नाहीच. तशीही ती प्रत्येक लिखाणागणिक पुढे जात असतेच पण या कथेची (मितू-नरहरीच्याच नव्हे तर लेखनप्रक्रियेच्याही) प्रक्रीयाही माझ्यासाठी अजून चालू आहे. तर असो.

लेखिका मितूच्या प्रेमात पडलेली आहे हे मला तुम्ही म्हणेतो लक्षात आलेले नाही. पण विचार करू बघता ती शक्यता नाकारता येत नाही किंवा निदान जे लिहिलंय त्यातून तसा समज होण्याची शक्यता तर आहेच आहे.

इतरांचा प्रवास संपतो आणि रस्ता राहतो, माझ्याबाबतीत मात्र रस्ता संपला, पण प्रवास मात्र चालूच राहणार.....

मितूचा प्रवास कधीतरी संपेल....नरहरी सोबत असेल वा नसेल, त्यात फरक पडत नाही, मात्र तिच्या जन्मदात्रीचा, लेखिकेचा तगमगीचा प्रवास तसाच कायम राहील, रस्ता असो वा नसो.
<<<<

हे मात्र अपरिहार्य दिसते. पण व्यक्तिशः मला कलाकार वॉनाबी म्हणून ते स्वागतार्हही वाटते.

वाढीव अपेक्षांसह कथा वाचायला घेतली होती कारण लेखिकेच्या या बक्षिसांबद्दल स्वतःचेच अभिनंदन करणार्‍या पोष्टीं अनेकदा इतरत्र पाहिल्या होत्या. शिवाय वरही ते लिहिले आहेच. पण कथा त्या मानाने फुसकी आहे. कथेतल्या लेखिकेचे विचारविश्व अगदीच सब्स्टँडर्ड वाटले.

"नरहरीची आई कडवट बाई बनून आली कागदावर. नरहरीच्या मनात ती विष पेरू लागली. मितूशी लग्न करून सगळी इस्टेट नरहरीची व्हावी यासाठी गणितं मांडू लागली" यासारखे बरेच विचार तर मराठी सिरिअलछाप वाटले.

फॉर्ममुळे थोडा उठाव, पण सबस्टन्स चा अभाव, आणि बाकी नुसताच आव असे थोडक्यात म्हणता येईल.

शनिवारपासून कथा वाचत आहे. तुकड्या - तुकड्यात किंवा सलग अशी काहीवेळा वाचली. अर्थात पूर्ण वाचली. श्री अशोक यांचे प्रतिसादही वाचले. त्यांचे प्रतिसादही विचारप्रवर्तक असतातच. त्यातून लेखन करणारा होता त्याहून प्रगल्भ होतो असे वाटते.

प्रथमच मायबोलीवरील एका कथेबाबत बरेच लिहावेसे वाटले. माझ्या समजुतीनुसार व कुवतीनुसार लिहीत आहे. चु भु द्या घ्या.

============

मूळ कथेचा, जिला पारितोषिक प्राप्त झाले आहे, फॉर्म किंवा पॅटर्न फार आवडला. पारितोषिकासाठी अभिनंदन! कथेची जडणघडण हीच कथा हा फॉर्म मला तरी नवीन होता. मनात असे वाटायचे की या विषयावर हार्डकोअर लिहावे, विशेषतः कवितेवर असे लिहावे (कविता कशी रचली जाते, मनात कशी येते, का येते, तिला 'कविता' हेच स्वरुप द्यावे हे कसे व का ठरते, कविता सुचते कशी, सुरू कुठे होते आणि संपते कुठे या सर्वाबद्दल. लिहीनही, पण या विधानाला कृपया 'मीपणा' असे समजले जाऊ नये असे प्रतिसाद वाचणार्‍यांना आवाहन). कथा लिहिणे हे तितकेच जिकीरीचे आहे.

या फॉर्मचे वैशिष्ट्य असे की कथानकाचा आत्मा कह्यात नसताना रचायला घेतलेल्या कथेच्या जडणघडणीवर तटस्थपणे स्वतःच केलेले भाष्य! कथानकाची दिशा पूर्वार्धात ठरत नाही. कथानकाला विशिष्ट दिशा असावी हे ज्या पातळीला ठरते तोवर कथेतील पात्रांच्या व्यक्तीरेखेतील गुण - अवगुण ठळकपणे नोंदवले गेलेले असतात. कथानकाचा आत्मा लेखिकेच्या मनात ठळक झालेला नसतानाच मात्र तोवर जितके लेखन केले गेलेले आहे त्या लेखनातून समोर आलेल्या पात्रांचे कॅरॅक्टर व त्यांची जडणघडण ठळक झालेली असते. यामुळे पुढे कथानकाची दिशा ठरते तेव्हा मर्यादा आलेल्या जाणवतात. मर्यादा व त्यामुळे लेखिकेला पात्रांच्या मूळ सांस्कारीक जडणघडणीशी व स्वभावाशी खेळावे लागणे यात लेखिकेचे आतल्याआत होत असलेले युद्ध प्रामाणिकपणे नोंदवलेले आहे. हे युद्ध नोंदवताना पुन्हा लेखिकेची स्वतःची सांस्कारीक जडणघडण, स्वभाव, अनुभवविश्व व सभोवताल यांचा प्रभाव त्या युद्धावर पडलेला स्पष्ठी होत आहे. (अर्थात, येथे कोणीही तटस्थपणा ठेवू शकेल असे वाटतच नाही, कारण माणूस स्वतःपासून भिन्न, त्रयस्थ होऊन लिहू लागला तर पात्रांशी समरस होणार नाही).

माझ्यामते तरी कथा येथे संपली. म्हणजे मूळ कथा येथे संपली. लेखिकेच्या मनात प्रश्न तसेच राहिले येथे कथा संपली असली तरी वाचकासाठी ते प्रश्न स्वतःचेही वाटावेत इतपत प्रभावशाली मांडणी करूनच लेखिका सांगता करते. मितु आणि नरहरीत नेमके काय होते, नरहरीची आई खलनायिका होणे बरोबर आहे का वगैरे कथेतील कथेबाबत चर्चा करणे हा या प्रतिसादाचा पुढील भाग असल्यामुळे तो नंतर! सध्या या फॉर्मबद्दल व कथेच्या जडणघडणीत लेखिकेने स्वतःसमोरच उपस्थित केलेल्या मुद्यांबद्दलः

१. अनेकदा मनस्थिती अशी असू शकते की अनेक गोष्टींचा आढावा समाविष्ट असलेले असे काहीतरी महत्वाचे लिहावेसे वाटत आहे. या मनस्थितीत लेखिका प्रथम कथा लिहायला घेते असे दिसते. मला असे वाटते की हे दिसायला आकर्षक असले तरीही माझ्यातरी पचनी पडले नाही. कविता व कथा यात 'कंटेंट'संदर्भातील हा ठळक फरक मानला जावा की कथेचा आत्मा हा कुठेतरी अस्पर्श, अदृष्य अवस्थेत मनःपटलावर रेंगाळलेला असतो. निव्वळ काव्यात्म व्यक्तीकरण हे कथेच्या आत्म्याचे स्वरूप असू शकत नाही. त्यामुळे कविता पुढे कशी जाईल हे जसे अनेकदा कवी ठरवू शकत नाही किंवा स्वतःच्या मनावर सोडून देतो, तसे कथेचे होणे मला शक्य वाटत नाही. कथेला सुरुवात, मध्य व अंत असावा की नसावा ही निव्वळ बाह्य बाब झाली. पण कथेत काहीतरी ठोस संदेश, काहीतरी ठोस चित्रचितारणी किंवा काहीतरी ठोस व प्रभावी निरिक्षण (जे समाजासमोर वास्तव आणण्यासाठी वगैरे असू शकते, असे) असते व असायला हवे. मितु उद्ध्वस्त होणे व तेही नरहरीमुळे ही लेखिकेची मानसिक गरज ज्या पातळीला इन्ट्रोड्यूस झालेली आहे त्या पातळीला ती व्हायलाच नको असे मला वाटते. ठीक आहे की अनेक प्रकरणे लिहून हातावेगळी करेपर्यंत दिशा कोणती घ्यायची हे ठरू शकत नाही. पण कुठे जायचे आहे हे पहिले अक्षरही लिहायच्या आधी संकल्पनेच्या पातळीवर स्वच्छ असायला हवे असे माझे मत आहे. याचे कारण केवळ मी म्हणतो वगैरे असे नसून त्याला टेक्निकल बेस आहे. लिहिण्याची उर्मी आणि कथानकाचा अंतिम मुक्काम या दोन बाबी एकसंघपणे मनःपटलावर प्रवेशतात असे मला वाटते. त्या वेगवेगळ्या येत नाहीत, येऊ शकत नाहीत. आपल्या नकळतपणे आपण घेत असलेल्या अनुभुतींचे अदृष्य मिश्रणच आपल्याला लिहायला प्रवृत्त करत असल्याने 'प्रथम बालकाचा जन्म व नंतर त्यात चैतन्य येणे' असे होऊ शकत नाही. ते बालक नऊ महिनेही सजीवच व चैतन्यमयच असते आणि जन्मतःही ते तसेच असते. लेखिकेला हा प्रश्न पडलेला मात्र प्रभावीपणे दिसत नाही की मी हे का लिहायला घेतले होते. मितू कशी उद्ध्वस्त होईल, कोण त्यास कारणीभूत ठरेल, मितू उद्ध्वस्तच का व्हायला हवी हे सगळे प्रश्न पडतात, पण हे सगळे मी का लिहीत आहे हा प्रश्न नीटसा किंवा अजिबातच अ‍ॅड्रेस झालेला मला तरी दिसत नाही आणि तो तसा व्हायला हवा होता असे ठामपणे वाटते.

२. लेखिका स्वतःलाच विचारत असलेले प्रश्न व देत असलेली उत्तरे हे युद्ध रोचकपणे उतरलेले आहे. प्रोसेस ऑफ एलिमिनेशनने एक एक पात्र कथेच्या आत्म्यापासून दूर जाऊन शेवटी फक्त कथेचा आत्मा लिहायला दिशा ठरवावी लागण्याच्या पातळीपर्यंत लेखिका पोचते व दूर दिवा दिसत असलेल्या बोगद्यात उभी असल्यासारखी वाटते हे फार आवडले. ही पातळी लेखिकेने स्वतःवर आणायलाच नको होती असे मत मुद्दा क्रमांक एक मध्ये मी नोंदवले आहे. पण ही पातळी आलीच तर काय? हे या मुद्यात नोंदवू पाहात आहे. अशी पातळी लेखिकेवर आल्यावर लेखिका शेवटी कथा लिहिणे सोडण्याचा निर्णय घेते. पण त्यातही हुरहूर आहे. हारल्याची भावना खचितच नाही, पण श्री अशोक म्हणतात त्याप्रमाणे पात्रांच्या प्रेमात पडणे आहे. पण मला तर वाटते असे प्रेमात पडल्याशिवाय सकस कसे लिहिता येईल? त्यामुळे लेखिका नरहरीच्या आईला खलनायिका बनवण्यापर्यंत जाते. आजवर न भरलेला रंग कदाचित त्या पात्रात भरू पाहते. नरहरी आईच्या प्रभावात किती येईल यावर कमी विचार करताना दिसते आणि मितू नरहरीमधील तो बदल कसा स्वीकारेल यावर खूप विचार करताना दिसते. अचानक चित्रातले तुकडे आकाराने आणि रंगाने वेगवेगळे होऊ पाहतात. ही डचमळ मस्त आलेली आहे. काही असो, इतक्या पुढच्या पातळीला आमुलाग्र बदल घडवून आणणे हेही आव्हानच!

आता मूळ कथेतील कथेबाबतः

एक आम कथा तीव्र वळणे घेऊन येणार आहे इतके मात्र लेखिकेचे कुठेतरी तिच्याही नकळत ठरल्यासारखे पहिल्यापासून वाटले. पण सांस्कृतीक व सामाजिक विचारांच्या जाळ्यात अडकलेल्या वाचकाला कदाचित नरहरी आणि मितूचे लग्न किंवा तशी नरहरीची इच्छा असणे पटायचे नाही. नरहरीचे पात्र गढूळ नाही. ते गढूळ करायचा प्रयत्न त्याच्याच आईने केला तरीही ते किती गढूळ होईल यावर बर्‍याच घटकांचा जवळून परिणाम होणार आहे. आजोबा, मितू, खुद्द नरहरी, मितूचे अमाप वाढलेले आकाश व त्यातील इतर न रेखाटलेली पात्रे, इस्टेट, नरहरीचे मर्यादीत विश्व, त्याला असलेल्या मितूच्या गरजेचा 'पती-पत्नी' हा कदाचित त्यालाही न मानवणारा रंग इत्यादी इत्यादी!

कथेचा सांगाडा ठरलेला नसला तरी हाडपेर ठरलेले आहे असे काही मला वाटले. नरहरीला गूढ केले जावे का या प्रश्नात अडकावेसे वाटले. कोणत्या पातळीला तो गूढ व्हावा, नरहरीकडून झालेला (लेखिकेच्या मते होऊ शकणारा) बलात्कार मितू केवळ असहाय्यपणेच सोसेल का असे वाटले. इस्टेटिसाठी लहान बहिणीप्रमाणे भासणार्‍या आजच्या विश्वातील एका आपल्याहून प्रगत विचारांच्या मुलीला नरहरी लग्नाचे विचारताना चाचपडेल असे वाटले. ती आपल्यात अडकणार नाही अश्या विचारांनी त्याला ते अवसानच येणार नाही असे वाटले.

मला मितूपेक्षा नरहरी हे पात्र विचारात पाडत आहे. मितू सामान्य वाटत आहे मला नरहरीपुढे. नरहरीच्या तुलनेने अडाणी मनात (सांस्कृतीकदृष्ट्या अडाणी, नव्या युगापासून काहीसा लांब असल्याने वगैरे, शैक्षणिकदृष्ट्या नाही) काय कोंडलेले असू शकेल याचे कुतुहल आहे. तो रेप करणार नाही असे ठामपणे वाटते. तो लग्नाचेही विचारणार नाही असेही वाटते. त्याचे मन आईने सोडलेल्या 'किड्यामुळे' कलुषित होणार नाही असेही वाटते. पण तो निव्वळ साधा, सोपा वाटत नाही हेही खरेच. (यावरही कदाचित लेखिकेच्या अंतर्मनातील प्रश्नोत्तरे वाचण्याचा प्रभाव असेल, पण तो झटकला तरी नरहरी विचारात पाडतो असे लक्षात आले). मला असेही वाटले की नरहरी हा सदमा चित्रपटातील श्रीदेवीप्रमाणे काही काळ वेडा वगैरे होऊ शकेल का! हे वेडे होण्यामागे मितू आपल्या हातातून गेली याचे आत कोंडलेले व व्यक्तच न करता आलेले दु:ख असेल का? दोन सजीवांच्या निखळ नात्यामध्ये नवी दुनिया, नवे आकाश आले म्हणून चिडलेला भोळसट नरहरी खून करेल का मितूचा? त्याची एक साधी अपेक्षा, की लहानपणीचे निखळ नाते मितूने कायम मनात ठेवून नरहरीला तिच्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान द्यावे, ही अपेक्षा भंगल्यामुळे तो स्फोटकासारखा वागेल का? की नेस्तनाबूत होईल? की वेडापिसा होईल की सारासार विचार करू शकेल? तो ती रिक्तता कशी भरून काढू शकेल? मला नरहरीची कीव आली. ही कथा अर्धीच राहिली हे बरेच झाले की काय असे स्वतःच्याच ठाम मतांविरुद्ध काहीतरी वाटले.

बाकी बक्षीस, पुरस्कार आपल्या जागी आहेतच. लेखिकेच भाष्य मला आता मात्र (हे वरचे लिहून झाल्यानंतर) अपुरे का वाटत आहे कळेना!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

.

नंदिनी, मला तुमच्या दोन विधानांमध्ये विसंगती आढळली.

ती विधाने अशी:

>>>आधी पात्ररचना ठरवून त्याभोवती घटनांचे जाळे विणणे हे फार मजेदार असू शकते. (जे वरच्या कथेमधे घडत आहे) पात्ररचना करताना आपली पात्रे एकदा तयार केले की वेगवेगळ्या घटनांच्या बास्केटमधे टाकून ते पात्र कसे रीअ‍ॅक्ट करते ते बघणे हे कथा लिहिण्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग.<<<

>>>मला म्हणूनच नीरजाने निवडलेला हा फॉर्म आवडला.<<<

यात विसंगती ही आहे, की 'आधी पात्ररचना ठरवून मग पात्र कसे वागते ते पाहणे' हे नीधप यांनी केलेले नाही. तसे त्यांच्या कथेतील लेखिकेचे झाले ही त्यांची कथा आहे. म्हणजे, त्यांच्याच त्याच कथेबद्दल बोलायचे तर 'नीरजा (किंवा लेखिका) हे कथेतील पात्र कथा रचताना कोणकोणत्या विविध मानसिक अवस्थांना पोहोचते व कोठे कसे गोंधळते व स्वतःशी चिंतन करते' हे दाखवणे मूळ कथेतमध्ये त्यांचे 'निश्चीतपणे' ठरलेले आहे. त्यांनी निवडलेला फॉर्म तो नव्हे. त्यांच्या कथेतील लेखिकेने तो (कथा लिहिताना तीवर स्वतःच भाष्यही करणे हा) फॉर्म निवडलेला आहे. ( लेखिका या त्या स्वतःचही असू शकतात,म्हणजे हा नीरजा यांचा स्वानुभवही असू शकतो). पण 'कथा रचताना माझे असे झाले' हे सांगणे त्यांचे निश्चीत आहे. अनिश्चीत आहे ते लेखिका या पात्राने रचलेल्या कथेतील पात्रांचे वर्तन , जे तुम्ही इन्टरेस्टिंग म्हणत आहात.

तुमच्या पहिल्या उतार्‍यातील शेवटच्या विधानाशी सहमत असून माझ्या मूळ प्रतिसादात ती बाबही समाविष्ट झालेली आहे असे नमूद करतो. Happy

-'बेफिकीर'!

कथेचा "फॉर्म" नवीन आहे. हा फॉर्म आवडला. त्याचबरोबर अनेक विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रतिक्रियाही आवडल्या.

अशोककाका _________/\______________ मानाचा मुजरा.

कथेचा फॉर्म वेगळा आहे......!

बेफिकीर, तुमच्या मोठ्या पोस्टपासून सुरूवात करते.
मुद्द्यांचे क्रमांक सुरू व्हायच्या आधीच्या परीच्छेदांपैकी >>> या फॉर्मचे वैशिष्ठ्य असे..... <<< इथून सुरू होणार्‍या परिच्छेदाशी सहमत. जे म्हणायचं होतं तेच पोचलंय नक्की.

मुद्दा क्रमांक १ बद्दल काही बाबतीत सहमत आहे तर काही बाबतीत नाही.

>>> कविता पुढे कशी जाईल हे जसे अनेकदा कवी ठरवू शकत नाही किंवा स्वतःच्या मनावर सोडून देतो, तसे कथेचे होणे मला शक्य वाटत नाही. कथेत काहीतरी ठोस संदेश, काहीतरी ठोस चित्रचितारणी किंवा काहीतरी ठोस व प्रभावी निरिक्षण (जे समाजासमोर वास्तव आणण्यासाठी वगैरे असू शकते, असे) असते व असायला हवे. <<<
हे पटले नाही. म्हणजे कथेच्या लिखाणाची सुरूवात (कथेची नव्हे) ही अशीच स्वतःच्या मनावर, आकार घेत जाणार्‍या व्यक्तीरेखांवर सोडावी लागते. निदान मी तरी आजवर असंच करत आलेय.

मितु उद्ध्वस्त होणे व तेही नरहरीमुळे ही लेखिकेची मानसिक गरज ज्या पातळीला इन्ट्रोड्यूस झालेली आहे त्या पातळीला ती व्हायलाच नको असे मला वाटते. <<< मान्यच पण याचे उत्तर तुमच्याच पुढच्या वाक्यात आहे. >>> ठीक आहे की अनेक प्रकरणे लिहून हातावेगळी करेपर्यंत दिशा कोणती घ्यायची हे ठरू शकत नाही.<<<
लेखिकेचे एक्झॅक्टली असेच घडले असावे.

मात्र >>> पण कुठे जायचे आहे हे पहिले अक्षरही लिहायच्या आधी संकल्पनेच्या पातळीवर स्वच्छ असायला हवे असे माझे मत आहे.<<< हे वाक्य वरच्या मुद्द्याशी फारकत घेतेय असे वाटले.

लेखिकेला हा प्रश्न पडलेला मात्र प्रभावीपणे दिसत नाही की मी हे का लिहायला घेतले होते. मितू कशी उद्ध्वस्त होईल, कोण त्यास कारणीभूत ठरेल, मितू उद्ध्वस्तच का व्हायला हवी हे सगळे प्रश्न पडतात, पण हे सगळे मी का लिहीत आहे हा प्रश्न नीटसा किंवा अजिबातच अ‍ॅड्रेस झालेला मला तरी दिसत नाही आणि तो तसा व्हायला हवा होता असे ठामपणे वाटते. <<<
कदाचित ती जिथे सध्याची कथा संपवली गेली त्याच्यापुढची पायरी असू शकेल? मुळात कथा लिहायला सुरू होतानाची पहिली हार आणि त्यातून परत प्रयत्नाला सुरूवात हा एवढाच इथल्या कथेचा शेवट आहे. परत प्रयत्नाला सुरूवात केल्यावर हे सगळे प्रश्न लेखिकेला पडू शकतात. किंवा रादर या कथेचे अजून काही लोणचे घालायच्या प्रयत्नात मी असल्याने मी खात्रीने सांगू शकते की लेखिका या प्रश्नांकडे या कथेच्या नंतरच्या पायरीवर गेल्यावर बघते आहे.
पहिल्या टप्प्यात बघत नाही कारण जी सुरूवात आहे त्या सुरूवातीच्या काही परिच्छेदांच्या बांधणीच्या प्रेमात अडकल्यासारखी ती झालेली आहे. हे कुठल्याही लेखकाचे होते ना? आपल्याच नक्षीच्या प्रेमात पडल्यावर सुरूवातीला तृटी दिसत नाहीत. ज्यावर डोलारा उभारलाय तो पाया दिसतोय सुंदर पण पोकळ आहे हे भान यायला वेळ लागतोच. म्हणजे असं मला वाटतं.

क्रमांक दोन पासून पुढच्या मुद्द्यांबद्दल आभार. सहमत म्हणण्यापेक्षा विचारात पाडले आहे हे नक्की.

मस्त form नि concept नीरजा. सुरूवातीच्या पॅरानंतर कुठे उलगडत जाईल हे लक्षात आले तरी कशी उलगडते हा माझ्यासाठी सर्वात खिळवून ठेवणारा भाग होता.

"मग एक दिवस परत कोर्‍या वहीने खुणावले आणि मी नव्याने कथा लिहायला सुरूवात केली. " ह्या शिवायही आवडली होती. हा माझ्यासाठी cliche झाला होता पण तुझे वरचे "कदाचित ती जिथे सध्याची कथा संपवली गेली त्याच्यापुढची पायरी असू शकेल? मुळात कथा लिहायला सुरू होतानाची पहिली हार आणि त्यातून परत प्रयत्नाला सुरूवात हा एवढाच इथल्या कथेचा शेवट आहे. परत प्रयत्नाला सुरूवात केल्यावर हे सगळे प्रश्न लेखिकेला पडू शकतात" हे वाचून तू काय विचार केला असशील ह्याची कल्पना येतेय.

नीधप,

तुम्हाला आणखी एक प्रतिसाद द्यावा लागणार आहे माझ्या प्रतिसादावर.

कारण तुम्हाला माझा प्रतिसाद नीट समजलेला नाही.

(तो मलाच नीट लिहिता आलेला नाही असे यथाशक्ती तरी वाटत नाही, पण एलॅबोरेट करायचे झाले तर करता येईल, करेनही)

(एक अवांतर - मायबोलीवर तुमच्या सदस्यत्वाभोवती असलेल्या एका सूक्ष्म वलयाच्या प्रेमात पडून तुम्ही माझ्या प्रतिसादाला प्रत्युत्तर - प्रत्युत्तर या शब्दात काहीही अ‍ॅरोगन्स नसतो, फक्त वाटायला वाटतो, त्यामुळे तो मला तर मुळीच अभिप्रेत नाही - केलेले आहेत असे माझे मत आहे). ते तसे अजिबात नाही हेही शक्य आहे, पण ते तसे नसले तर कथेच्या आत्यंतिक प्रेमातून तुमचा प्रतिसाद आलेला दिसतो.

(किती सोप्पे आहे नाही? दुसर्‍याचा प्रतिसाद पुरेसा वाटला नाही की त्याला आपला प्रतिसाद समजलाच नाही असे म्हणणे? - मी निव्वळ 'तेवढेच' केलेले नाही आणि इन फॅक्ट 'ते' केलेलेच नाही).

'माहेर'मधून हे झाले नसते. हे व्हावे अशी इच्छा असावीच असे काही नाहीच. मुळातच काही का व्हावे? कलाकृती आहे, कलाकृती आहे. मीही संधीसाधूच! पण चर्चेला फोरम उपलब्ध आहे, मायबोलीचे आभार. तसेही यातून मंथनच होणार, कोणी आमुलाग्र बदलेल असे नाही, आपण आपल्यात आणखीन काय काय सामावून घ्यायचे त्याची परिमाणे विस्तारू शकतील असा अंदाज!

स्वतःला वेगळ्या काढाल या अपेक्षेत हा प्रतिसाद लिहिला.

-'बेफिकीर'!

कारण तुम्हाला माझा प्रतिसाद नीट समजलेला नाही. तो मलाच नीट लिहिता आलेला नाही असे यथाशक्ती तरी वाटत नाही,<<<
हे तुमचे मत आहे. जागतिक सत्य नाही.

तुम्ही लिखाणाबद्दल बोलत होतात म्हणून मी उत्तर दिले. आता वैयक्तिक पातळीवर उतरला आहात तर माझ्याकडून तुमच्याशी चर्चा बंद.

वा! कथा वाचायला मजा आली .. नी, तुझ्या कथा कायम नविन प्रयोग (शैलीतले, कथेत सादर केलेल्या गोष्टीतले, विचारांचे) वाटतात .. बक्षीसांबद्दल अभिनंदन .. Happy

बेफिकीर, तुमचं पहिलं पोस्ट आवडलं ..

वेगळी आणि इंटरेस्टिंग गोष्ट नीरजा..
यात लेखिका हे पात्र असल्यामुळे तिनं कसा विचार करावा आणि तिच्या मनात कथेची प्रोसेस कशी चालावी यावर चर्चा करण्यात मला अर्थ वाटत नाही.
शिवाय वाचकांना मानसिक सवयीमुळे लेखिका या पात्राच्या मनात काय चाललेय यापेक्षा मितू आणि नरहरीचे काय होते याबद्दल जास्त उत्सुकता असणार.. आणि ती अपेक्षा अर्धवट राहिल्याने ते कन्फ्युज असणार.
पण लेखिका या पात्राची घालमेल माझीही कथा लिहीताना होते त्यावर काय करावे अशी चर्चा कुणी सुरू केली तर मात्र काही महत्वाचे मुद्दे समोर येतील.

Pages