काही-बाही

Submitted by अमेलिया on 20 November, 2012 - 04:45

कर तू ही तयारीला सुरुवात
घेऊन ये तुझ्याकडचेही काही तुकडे
माझ्या अस्तित्वाचे..
राहिलेच असतील
आठवणींच्या कोशात
अडकलेले चुकून कधी तर

एकालाही रेंगाळत ठेऊ नकोस चुकारपणे
सगळेच्या सगळे क्षण भरून घेऊन ये
ज्यांमध्ये भास होईल पुसटसाही
माझ्या असण्याचा

काळजी घे,
एखादा जरी राहिला ना मागे
तर पुन्हा माजेल सगळे तण

लक्षात ठेव,
मूठमाती देताना
चालतो गाळलेला एखादा अश्रू
तेवढाच मातीत घट्ट बसतो
गाडून टाकण्यासाठी जमवलेला
हळवा कचरा

थोडासा त्रास होईलही कदाचित
पण मग ओसाड माळरानावर
फिरकणारही नाही कोणी कधी

हे एक बरेय,
पुनर्जन्मावर विश्वास नाहीये
तुझा आणि माझाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users