मला भावलेले शरद पवार

Submitted by pkarandikar50 on 19 November, 2012 - 06:39

शरद पवारांचा १२ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने
मला भावलेले शरद पवार : प्रभाकर [बापू] करंदीकर

आमचे आणि पवार कुटुंबांचे संबंध नेहमीच निकटचे राहिले आहेत. माझे वडिल - कै. द.स. करंदीकर वकील - स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रिमांड होम, होमगार्ड, माळेगाव सहकारी साखर कारखाना, नाट्यसाधना, लायन्स क्लब, ऑस्ट्रेलियन मिशन, यांसारख्या अनेक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. माझी आई - कै. पद्माताई करंदीकर- या सर्व कामात सहभागी होत असे. माझ्या वडिलांनी स्वतः कधी कोणती निवडणूक लढवली नाही परंतु सुमारे तीन दशके ते तालुका काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष होते. महिला प्रचार आघाडीचे काम माझी आई सांभाळत असे. त्यामुळे निवडणुका आल्या की आमचे घर-दार प्रचाराच्या कामात दंग असे. त्या निमित्ताने, साहेबांचे आमच्या घरी नेहमी येणे-जाणे होत असे.
माझ्या आठवणी प्रमाणे, मी साहेबांना प्रथम जवळून पाहिले तो काळ १९६०च्या सुमाराचा असावा.निवडणुकीच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांच्या प्रभातफेर्‍या निघत. त्याचे मार्गदर्शन युवक काँग्रेसचे नेते या नात्याने साहेबांचे असे. पुढे १९६७ मध्ये साहेबांना अगदी तरुण वयात काँग्रेस पक्षाने आमदारकीचे तिकीट दिले. त्यावेळी तालुक्यातल्या काही ज्येष्ठ इच्छुकांची थोडी नाराजी झाली होती. कै. यशवंतराव चव्हाणांनी फोन करून माझ्या वडिलांना सांगीतले होते, " बंडोपंत, हा युवक फार हुशार आहे आणि कर्तबगार आहे. तो निवडून आला पाहिजे. तालुक्यातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची समजूत काढणे आणि सगळ्यांचा सहभाग मिळवणे ही तुमची जबाबदारी राहील!." सुदैवाने साहेब चांगल्या मतांनी निवडून आले.
निवडणुकांची धामधूम संपली तरी सामजिक आणि शैक्षणिक कार्यामुळेही पवार कुटूंबियांशी आमचा नेहमी संपर्क रहात असे. पुढे साहेबांच्या राजकीय कर्तृत्वाची कमान सतत चढती राहिली. ते आमदार झाले, मंत्री झाले आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झाले परंतु त्यामुळे कौटुंबिक संबंधात कोणताच फरक पडला नाही. दरवर्षी दिवाळीत घरी येऊन शुभेच्छा देण्याचा साहेबांचा शिरस्ता होता. माझ्या आईच्या निधनापर्यंत, म्हणजे २००३ पर्यंत त्यात कधी खंड पडला नाही.

मी बी.ए.ची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो, तेंव्हा साहेबांनी मला एम.बी.ए.चा कोर्स घेण्याचा सल्ला दिला होता आणि सांगीतले की. 'मुंबईच्या जमनालाल बजाज संस्थेत तुला अ‍ॅडमिशन मिळवून देतो.' पण त्यावेळी एम.बी.ए. विषयी फारशी कुणाला माहिती नव्हती आणि मला तर आय.ए.एस.कडे जायचे होते. त्यामुळे मी त्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली नाही. पुढे यु.पी.एस.सी. च्या परीक्षेला बसलो. ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळी साहेब दिल्लीत होते. तिथे वर्तमनपत्रात त्यांनी रिझल्ट पाहिला.प्रशासकीय सेवा [आय.ए.एस.] आणि प्ररराष्ट्र सेवा [आय.एफ.एस.] या सेवांच्या संयुक्त यादीत माझे नाव पहाताक्षणी साहेबांनी फोन करून माझ्या वडिलांना सांगीतले की, "बापूचे हार्दीक अभिनंदन. तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला म्हणावे, आय.ए.एस. चीच निवड कर.फॉरिन सर्व्हीसच्या मोहात पडू नकोस." साहेबांचा सल्ला मला मनोमन पटला.
यथावकाश आय.ए.एस. मध्ये 'काडर' ची निश्चिती झाली आणि सुदैवाने मला महाराष्ट्र काडर मिळाले. त्यामुळे नंतर मी प्रशासकीय सेवेत असताना अनेक प्रसंगी साहेबांशी माझे सतत संबंध येत राहिले आणि त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे मला जवळून निरीक्षण करता आले. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांची मते ते जाणून घेतात आणि शेवटी आपला निर्णय शांतपणे आणि ठामपणे घेतात. त्यानंतर मग त्या धोरणाची किंवा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात कोणतीही हयगय झालेली ते खपवून घेत नाहीत. वेळप्रसंगी कटु किंवा अप्रिय निर्णय घेतानाही ते कधी कचरत नाहीत. त्यामुळे एक खंबीर आणि विचारी नेता तसेच कुशल प्रशासक अशी त्यांची ख्याती देशभरात झाली आहे. त्यांच्या हाताखाली काम करताना अधिकार्‍यांना कसलेच 'टेन्शन' येत नाही, उलट त्यांचा उत्साह द्विगुणित होतो. आमचे निकटचे कौटुंबिक संबंध असले तरी त्याचा संबंध सरकारी कामकाजात त्यांनी कधीच येऊ दिला नाही. इतर अधिकार्‍यांप्रमाणेच त्यांनी मला सन्मानाने आणि ऋजुतेने वागविले.
महिला धोरण, उद्योग-धोरण, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण, रोजगार हमी योजनेद्वारा फळ-बागायत, उर्जा क्षेत्रात भरीव गुंतवणूक करणे, यांसारख्या विषयात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी स्वरूपाचे ठरले. यात त्यांचे 'द्रष्टेपण' दिसून येते. १९९१ चे नवे उदारमतवादी आर्थिक धोरण केंद्राने स्वीकारण्यापूर्वी सुमारे दीड-दोन वर्षे साहेबांनी औद्योगिक संघटनांच्या वार्षिक सभातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने बोलताना ज्या ठामपणे उदारीकरणाची आवश्यकता मांडली, ती ऐकून खुद्द उद्योगपतीही चकीत झाले होते. साहेबांच्या 'त्या' भाषणाची प्रत वाचल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी, 'तुम्ही नेहमी काळाच्या पुढे दोन पावले असता आणि आपली मते रोख-ठोकपणे मांडता' अशा शब्दात साहेबांचे अभिनंदन केले होते.

राजकीय पक्ष कोणतेही असले आणि त्या क्षेत्रात कितीही मतभेद असले तरी साहेब वैयक्तिक संबंध कसोशीने जपतात हे त्यांचे एक स्वभाव वैशिष्ट्य मी जवळून अनुभवले आहे. त्याचप्रमाणे कला, साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिंशी त्यांची अगदी जवळचे संबंध राहिले आहेत याचे प्रमुख कारण म्हणजे या सर्व विषयांचा ते बारकाईने अभ्यास करतात आणि रसिकतेने, जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेण्याची उच्च अभिरुची त्यांनी जोपासली आहे. राजकारण आणि प्रशासन, प्रवास, यात इतके व्यग्र राहूनही साहेबांचे वाचन थक्क व्हावे इतके विस्तृत आणि सखोल असते. त्यांच्या वाचनासाठी त्यांना कोणताच विषय वर्ज्य नसला तरी त्यांची आवड-निवड अगदी चोखंदळ असते.

राजकारणात, संभाषणात, वक्तव्यात 'डिसेन्सी'ची एक विशिष्ट पातळी कधीही न सोडण्याचा त्यांचा गुण इतर राजकीय नेत्यांनी घेतला तर मला वाटते की आपल्या राजकीय क्षेत्रात एक सुसंस्कृतपणा नक्कीच येईल. आज त्याची नितांत गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तर काय!
पण सत्तरच काय , दीड दोन हजार वर्षांपूर्वीची परिस्थिती इथे अवतरायाला हवी!! सारे कसे आपल्याला हवे तसे मस्त मस्त!!!

राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारीला शरद पवारांनी नम्रपणे नकार दिला आहे. विरोधकांतर्फे तसा प्रस्ताव आला होता.

https://www.newindianexpress.com/nation/2022/jun/14/sharad-pawar-refused...

भक्त बोलत आहेत , पराभवाची खात्री होती म्हणून नाही म्हटलं म्हणे

भक्तांना स्वप्नात येऊन ज्योतिरभास्कर बोलले का की ते हरणारच होते म्हणून

बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य

https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/maharashtra/in-baramati-shar...

पवार साहेबांनी महाविकास अघाडी सरकार मधून दाखवून दिलं की pro-business, pro- privatization, anti-quota सरकार कसं बनवावं. Much respect!

पवार साहेबांनी महाविकास अघाडी सरकार मधून दाखवून दिलं की pro-business, pro- privatization, anti-quota सरकार कसं बनवावं. Much respect!#### आदरणीय वंदनीय मोदी साहेबांनी 2014 पासून ह्याची सुरुवात केली आहे. अदानी चा कोळसा आयात करणार म्हटल्यावर लगेच 2.5% कर माफ करून टाकला. आता बो(म्ब)ला

Pages