दाटते आहे निराशा (तरही)

Submitted by वैवकु on 18 November, 2012 - 11:31

वाटते आहे... "नको संसार" हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

ती मला अन मी तिला काळीज हरतो
भावनांचा खेळतो व्यापार हल्ली

शेर माझे केवढे खपतात ! बहुधा ;
दुःख माझे लागते चवदार हल्ली

जिंदगी असतेच हे माहीत होते
मरणही दिसते मला दुश्वार हल्ली

आणखी काही नको एकांत दे रे
विठ्ठलाला मागतो जोहार हल्ली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी काही नको एकांत दे रे
विठ्ठलाला मागतो जोहार हल्ली

मागतो नाही वैभवशेठ..... घालतो.

जोहार करणे किंवा जोहार घालणे...... जोहार मागणे हे खटकतंय.

बाकी गझल आवडली.

सर्वान्चे खूप खूप आभार
___________________________________

डॉ. साहेब आपाण सान्गत आहात ते माझ्यासठी नवीन आहे .मी त्याबाबतीत विचार करतो आहे
शेर सुचला तेन्व्हा जोहार या शब्दाचे क्रियापद काय असते ते मला नेट्वर सर्च करून सापडले नाही मला वाटायचे /अजूनही वाटते जसा जोगवा मागतात तसा जोहार मागतात म्हणून . मी कन्फ्यूज आहे . 'जोहार' साठी आजवर कोणते क्रियापद वापरले गेले आहे याचे उदाहरण जर मिळाले तर अवश्य कळवाल का प्लीज !!

मार्गदर्शनासठी ऋणी आहे

आपला कृपाभिलाषी , नम्र
-वैवकु

जोहारबाबत मलाही आवडेल अधिक जाणून घ्यायला. त्या शब्दाचा अर्थ काय, तो कसा योजला जातो इत्यादी.

धन्यवाद

प्रा देवपूरकराना पाचारण करूयात का ?

त्यान्च्याकडे अशाकामी उपयोगात येतील असे सन्दर्भग्रन्थ असतील असे मला वाटते .व ते नक्की मदत करतील याची खात्री आहेच!
शुभस्य शीघ्रम !!
आताच फोन लावतो त्याना !!

वैभव, तुझी शिकण्यातली कळकळ आवडली परंतू शब्दाचा वापर कसा करायचा ह्याची शंका असल्यास असे शब्द अभिव्यक्तीकरीता न वापरलेले कधीही चांगले. मोह टाळता आला पाहिजे, कसे?

बाय द वे त्या जोहारच्या शेरात पहिल्या ओळीत बदल सुचतो आहे अजून थोडा वेळ विचार करून स्वीकारीन म्हणतोय.

दे असा एकान्त की नसशील तूही
विठ्ठलाला मागतो जोहार हल्ली
______________________________________________

अवान्तर: बेफीजी तुमचा कालचा एस एम एस मिळाला शेर आवडला
"मी तुझी गम्भीर कविता.......
मस्तच शेर आहे गालातल्या गालात बराच वेळ हसत होतो !
___________________________________________

कणखरजी अपले म्हणणे शिरोधार्य !!प्रयत्न करतो आहे पण मोह जाता जात नाही
कृपाशिर्वाद असू द्यात

आपला
वैवकु

अहो बेफीजी प्रथमतः माझाही गैरसमज झालेला
मग मी तो शेर(हा शेर आहे हे वाचतावाचताच समजले होते) पुन्हा गम्भीरतेने वाचला मग लक्षात आले की गम्भीर कविता करणर्‍या/ ती गम्भीरपणे करणार्‍या एखाद्या शायरास उद्देशून केला आहे हा ..मग म्हटले मी यात कुठेच बसत नाही ..मग हा शेर माझ्यासाठी नाही हे कळून चुकले ..अन हसत सुटलो Lol

पण शायराने केलेला शेर माझ्यासाठी आहे असे वाटणे म्हणजे त्या शेराचे यश म्हणावे लागेल.

पूर्वी नाही का, निळू फुल्यांना पडद्यावर बघितले की बायका शिव्या द्यायला लागायच्या. म्हणजे जिवंत दाद का काय ते!

होय कणखरजी
पण तिथे जसे निळूभाउ असत म्हणून बायकाना अधिक संताप येई तसे इथे बेफीजी असतात म्हणून लोकांची अमळ जास्तच चिडचिड होते

म्हणजे एखाद्या क्रियेस प्रतिक्रिया देताना ती क्रिया कोणत्या व्यक्तीने केलेली आहे यालाही भरपूर (किंबहुना सर्वाधिकच!!)महत्त्व असते असे मला म्हणायचे आहे

___________________________

वदणे हा शब्द प्रोफेसरांमुळे पुनर्रूढ होत चाललेला आहे. Lol

आणखी काही नको एकांत दे रे
विठ्ठलाला मागतो जोहार हल्ली<<<<<<

वैभवा! तुझा हा शेर आम्हास समजला नाही......
तुझ्या मनातील खयाल गद्यात सांगशील काय?
असो.
आता जोहार शब्दाविषयी थोडेसे.......
जोहारणे असा शब्दप्रयोग वापरतात ज्याचा अर्थ होतो वंदन करणे.
जोहार हा शब्द नोकर राजाला वंदन करताना योजतात.....'वीरा' या अर्थी. महार, चांभार हे वंदन करताना हा शब्द नमस्कार या अर्थी योजतात. मूळ मराठी शब्द आहे जयहर.
जोहार किंवा जोहर (अरेबिक शब्द आहे जौहर) याचा अर्थ होतो जवाहीर, रत्ने इ.
जवाहि-याच्या धंद्याला देखिल जोहार/जोहर असे म्हणतात.
फारसी शब्द जोहर पासूनही जोहार शब्द आला असावा ज्याचा अर्थ होतो निकराच्या वेळी बायकापोरांचे अग्निदिव्य करण्याचे, विशेषत: रजपूत हिंदू वीरांचे कृत्य, अग्निसात होणे, रजपूत स्त्रियांचे अग्नि प्रवेश करणे.
टीप: वरील विवेचन लक्षात घेता वैभवा तुझे विठ्ठलाकडे नेमके काय व कसे मागणे आहे हे शेरात नीट प्रतीत होत नाही. गद्य अर्थ कळवलास तर तात्काळ कटपिस शेर सुचवायला आवडेल! (थट्टेने म्हणतोय रे बाबा!)
आता आम्हास रहावत नाही म्हणून लिहितो.....
जोहार काफियाचा शेर आम्ही आमच्या पिंडानुसार असा लिहिला असता.......हा तुझ्या शेरास पर्याय नाही!
शायरीच्या अग्निदिव्यातून जातो.....
विठ्ठला! करतोच मी जोहार हल्ली!

आमचा नामोल्लेख केलास म्हणून हा अनाहूत लेखनप्रपंच!
............प्रा.सतीश देवपूरकर

विजयरावांसाठी.......
विजयराव!
आपल्याही लोकिकाविषयी आम्ही काय वदावे?
तूर्तास जोहाराविषयी आमच्या स्वल्पबुद्धीनुसार आम्ही वरीलप्रमाणे वदलो. आता आपणही काही तरी यावर वदावे!
..................................................................

महार हे सवर्णांना वाकून मुजरा करत ज्यास ''जोहार घालणे'' किंवा ''जोहार करणे'' असे म्हटले जायचे.
महार,
मांग्,
तराळ,
ढोर,
चांभार, हे महाराष्ट्रात तर,
जाटव समाजाचे लोक उत्तर भारतात ठाकूर्,बनिया किंवा ब्राम्हण लोकांस जोहार घालायचे/करायचे.

वैभव, आवडली गझल, विशेषतः

वाटते आहे... "नको संसार" हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

शेर माझे केवढे खपतात ! बहुधा ;
दुःख माझे लागते चवदार हल्ली

जिंदगी असतेच हे माहीत होते
मरणही दिसते मला दुश्वार हल्ली

हे शेर खूपच सुंदर. ..

>>आणखी काही नको एकांत दे रे
विठ्ठलाला मागतो जोहार हल्ली >>
- याबद्दल. जोहार 'घालतात' , चोखामेळांचं 'जोहार मायबाप जोहार ' आठवतंय . इथे तुम्ही एकांत मागण्यासाठी विठ्ठलाला जोहार घालताय असा अर्थ लागतो, जो वेगळा असला तरी चुकीचा वाटत नाही.ते मुळात एक निर्हेतूक अभिवादन आहे, महारांनी अंगिकारल्याने त्यात एक तत्कालीन लीनता सूचित होते.

>> ती मला अन मी तिला काळीज हरतो
भावनांचा खेळतो व्यापार हल्ली >>
इथे जरा व्यापारापेक्षा जुगार सूचित होतोय आधल्या ओळीतल्या 'हरण्याच्या ' संदर्भामुळे असं माझं वै.म..
खूप लेखन शुभेच्छा.

जोहार हा निर्हेतूक असतो.... त्यातून समोरच्याबद्दलचा आदर व्यक्त केला जायचा. मला अमुक पाहिजे म्हणून जोहार घालतोय असे नसायचे. या शेरात निर्हेतूकपणा नाही म्हणून खटकतो आहे.

शेर माझे केवढे खपतात ! बहुधा ;
दुःख माझे लागते चवदार हल्लीमा>>>>>>>>> फारच ताकदीचा शेर

आणखी काही नको एकांत दे रे
विठ्ठलाला मागतो जोहार हल्ली>>>>> हा भक्ति भावाचा कळस आहे ..

"खेळ मांडीयेला " या अभंगात विठ्ठल भक्तांची उन्मत्त (आणि उन्मुक्तही) भावावस्था -(ज्यात दैहिक अहंकाराचा लवलेश नाही) - वर्णन करतांना तुकोबा एके ठिकाणी "मातले वैष्णव वीर " असे लिहितात . हे मातने देहाचे नसते. ही एक विलक्षण अवस्था असते. या अवस्थेत सामान्य सभ्यतेला वाव नसतो . ज्या दोघांच्या संबंधात जे काही घडत असते ते विलक्षणच असते . अशावेळी सभ्यता कोसळते. एरवी देवाला आपण त्याच्या आत्यंतिक श्रेष्ठत्वामुळे नमस्कार करतो . ज्याला "जोहार" असेही म्हणतात . या जोहारात , नमस्कारात ... करणार्‍याचा शुद्ध विनय असतो . काही साध्य करण्यासाठी केलेली ती तडजोड नसते . समोरच्याच्या खर्‍याखूर्‍या श्रेष्ठत्वाची -जोहार, नमस्कार-ही आपण दिलेली कबुली असते . ती शब्दाने दिली जात नाही . त्यासाठी झुकणे ,वाकणे ही आनंददायी गोष्ट आपण स्वीकारतो स्वताहून .
देहातीत अवस्थेत नमस्काराची जोहाराची क्रिया उलटीही होऊ शकते . श्रेष्ठ व्यक्ति कनिष्ठालाही नमस्कार करू शकते . जोहार घालू शकते . उदा. पंढरीच्या लोका नाही अभिमान l पाया पडती जन एकमेका ll
माझी लहान पुतणी आहे . वय-3 वर्ष . माझ्याकडे येणार्‍या थोर लोकांना मी वाकून नमस्कार करतो हे ती अनेकदा बघते .एकदा तिने मला बोबड्या शब्दात तिच्या पायाकडे हात दाखवत मला नमस्कार करायला संगितले . मी तत्क्षणी तिच्या इवल्या इवल्या पायावर डोके ठेवले . मी वयाने मोठा . पुतणी वयाने खूप लहान . ज्या निरागसतेने तिने मला वाकवले ,झुकवले त्यात कुठलाही दैहिक अहंकाराचा भाव नाही . अर्थातच आमच्याही डोक्यात तो नाही . मलाही वाकण्यात आनंद .एक प्रकारची मजा . ज्ञानोबा म्हणता तसे "घेणे देणे सुखची"असे काहीसे ..
काहीसा असाच भाव वैभवजींचा विठ्ठलाला जोहार घालायला लावण्यात आसावा . (असे मला वाटते.) बहुदा . एका निरागस मस्तीची ही प्रतिक्रिया असावी .
मस्त गझल .
चु.भू.दे.घे.

जोहार करतो मायबाप जोहार असा शब्द आहे.
जोहार एक प्रकारचे आर्जवच आहे.
प.पू. सदगुरु पल्हाद महाराज यांचे उपासना पुस्तकात असे अनेक जोहार दिले आहे. तिथे करतो हा शब्द आहे.

जोहार म्हणजे आपल्यापेक्षा मानाने/वयाने/ हुद्द्याने मोठ्या असलेल्या व्यक्तीला दंडवत घालणे..
चोखोबांचा जोहार मायबप जोहार...

उपयुक्त चर्चा...!

------------------

गझल ठीक ठाक वाटली वैवकु..
तुमच्या ह्याहून अनेक सुंदर गझला वाचल्या आहेत.

क्षमस्व.