मी आणि आंबाडीची भाजी ( एक लघुकथा )

Submitted by दिनेश. on 14 November, 2012 - 05:21

काळण्याची भाकर, आंबाडीची भाजी

अगं, ती तर लई ग्वाड लागती.

अवं, नुसतीच काळण्याची भाकर अन नुसतीच आंबाडीची भाजी
वर तेलाची धारच नाही, मला दादला नको गं बाई, नवरा नको गं बाई..

शाहीर साबळे यांच्या आवाजातले, नाथांचे हे भारुड, मी लहानपणी रेडीओवर अनेकदा ऐकत असे, त्यावेळी
आईकडे मी, आंबाडीची भाजी कर, म्हणून हट्ट करत असे. आईला हि भाजी अर्थातच माहीत होती, पण ती
त्यावेळी मुंबईत मिळत नसे. मग मलकापूरला गेलो, कि आजीला सांगू, असे सांगत ती माझी समजूत काढत
असे.

मलकापूरला जाणे व्हायचे ते मे महिन्यात आणि त्यावेळी, उन्हाळ्यात तिथे फारच कमी भाज्या मिळत.
मी अगदी लहानपणीच, कट्टर शाकाहारी बनलो होतो, मला काय करुन घालायचे, असे आजीला वाटायचे.
मुंबईचा म्हणून ती माझ्यासाठी, पुरणपोळी, घारगे असे गोडाधोडाचे पदार्थ करायची. पण मला तर शिळी
भाकरी, शिळी आमटी, भाताची करप असे काहीतरी हवे असायचे. आजीला वाटायचे, हे कसे द्यायचे, याला.
मग मी रुसायचो.

पण एका मे महिन्यात, तिला आंबाडीची भाजी मिळाली. तिच्या हातची भाजी आणि भाकरी, मला
इतकी आवडली, कि मी त्या भाजीचा चाहताच झालो.

पुढे मुंबईतही हि पालेभाजी मिळू लागली. गावाला मिळाली होती, ती हिरव्या देठाची, तर मुंबईत मिळते, ती
लाल देठाची. लाल देठाची भाजी, जास्त आंबट असते, तिची पाने उकडून ते पाणी, फेकावे लागते.
हिरव्या देठाची, थेट फोडणीला दिली तरी चालते.

आई करते त्यावेळी या भाजीत, काळे वाटाणे, तुरीची डाळ, शेंगदाणे, भाताच्या कण्या असे बरेच काही घालते.
तिला तर अप्रतिम चव येते आणि शिळी भाजी तर आणखीनच रुचकर लागते. पुढे मी स्वतः करायला लागलो,
त्यावेळी या पद्धतीने तसेच, बेसन, दाण्याचे कूट घालूनही करु लागलो.

डॉ. डहाणूकरांनी पण या भाजीची आणखी एक साधीशी कृती लिहिली होती ( पांचाळ पद्धतीची ) ती पण
करुन बघितली होती.
बाकीच्या पालेभाज्यांपेक्षा हि खुपच वेगळ्या चवीची तर असतेच, पण हिची उस्तवार पण फार नसते.
पाने मोठी असल्याने, खुडायला पण सोपे जाते. ही भाजी चिरायची पण नसते.
( ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. भेंडी, कापूस, जास्वंद या वर्गातली हि भाजी आहे. पाने साधारण
भेंडीच्या पानासारखी, पण आकाराने लहान असतात. चवीला हि भाजी, आंबट असते. पण खुपच चवदार लागते.)

भारतात होतो, त्यावेळी भाजी मिळायचा प्रश्नच नव्हता. मस्कतला गेलो, त्यावेळी तिथे, ऑथॉरिटी फॉर
मार्केटींग अ‍ॅग्रीकल्चरल प्रोड्यूस, या संस्थेच्या दुकानात हि भाजी बघितली. ताबडतोब ती घेतलीच. पण
हे अप्रूप इथेच संपले नाही.

एका रमदान ( रमझान ) महिन्यात, रोजा सोडताना, माझा सुदानी मित्र एक लाल रंगाचे सरबत पित असे. त्याने एकदा मला ते प्यायला दिले. रंग आणि चव थेट, आपल्या अमृतकोकमाची. मी त्याला विचारले, कसले
करतोस, तर त्याने मला लालसर रंगाची काही सुकलेली पाने दाखवली आणि त्याचे नाव करकाटे, असे सांगितले.

मी रातांब्याच्या झाडाचे, फळांचे वर्णन त्याला सांगितले. कोकणात, अमृत कोकम कसे करतात, ( अर्ध्या वाट्या करुन, त्यात साखर भरून वगैरे ) ते सांगितले. पण त्याच्या मताप्रमाणे, ते झाड वेगळे. असे काही खास
करकाटे साठी करावे लागत नाही. ही पाने, पाण्यात घातली, कि लगेच पाण्यात तो रंग आणि चव उतरते.
त्याने मला त्याचे, प्रात्यक्षिकही दाखवले.

उपास सोडताना ते पितात, कारण त्याने पित्त शमते, असे तो म्हणाला. म्हणजे उपयोग, चव, रंग याबाबतीत
समानता होती. पण झाड वेगळे, यावर तो ठाम होता. मला त्याने काही पाने पण दिली.

ओमानला, मग मस्कत फेस्टिवल होऊ लागले. त्या काळात तिथे, ओमानमधल्या खेडेगावातील देखावे
तयार केले जात. अशा एका उत्सवात, मला तिथल्या एका बाजारात, एक माणूस, सुंदर लालसर रंगाची,
मोदकासारख्या आकाराची फळे विकत बसलेला दिसला.

कुठलेही फळ बघितले कि मला ते खायचा अनावर मोह होतो. मी त्याला विचारले, कि या फळाचे नाव काय आणि कसे खायचे ? तर तो म्हणाला, याचे नाव करकाटे आणि या फळाचा गर नव्हे तर साल खायची.
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. माझ्या मित्राने दिली होती, ती पाने नव्हती, तर या फळाच्या साली
होत्या.

मी जास्तच उत्सुकता दाखवल्यावर त्याने मला त्या फळाचे रोपटे दाखवले. आपल्याकडच्या आंबाडीच्या
भाजीपेक्षा बरेच मोठे होते ते पण पाने तशीच होती. मी एक पान खाऊन बघितले, तर चव आंबाडीचीच.
( आंबाडीची भाजी निवडताना, मी अजूनही कोवळी पाने तशीच कच्ची खातो, त्यामूळे चव माहित होतीच.)

आता मला, हा सगळा उलगडा झाला. आंबाडीच्याच फळांना, ते लोक करकाटे म्हणतात.
पण आपल्याकडच्या बाजारात मात्र कधीही हि फळे, मला दिसली नाहीत. मुंबईत नाही आणि गावातल्या
बाजारातही नाहीत.
पण लक्ष्मीबाई धुरंधर आणि कमलाबाई ओगले, दोघींच्याही पुस्तकात ( हजार पाककृती आणि रुचिरा ) आंबाडीच्या बोंडाचे सरबत आहे. त्या दोघींनी याचे अभिनव उपयोग पण लिहिलेले आहेत. म्हणजे
आपल्याकडे, पूर्वापार हे सरबत केले जातेय.
पुढे बाजारात, अमृतकोकम बाटलीत मिळू लागले. मला कोकणात पारंपारीक रितीने केलेले अमृत कोकम आणि
आंबाडीच्या बोंडाच्या पाकळीचे सरबत, या दोघांच्या चवीतला किंचीत फरक माहीत असल्याने, मला तरी
असे वाटते, कि बाजारी अमृत कोकम, आंबाडीच्या बोंडापासूनच करत असावेत.

डॉ. मीना प्रभूंच्या "इजिप्तायन" मधे, इजिप्तमधल्या या "चहा"चे वर्णन आहे. तो चहा म्हणजे करकाटेच असणार, याबद्दल मला खात्री होती. गोव्याला, एका स्लाईड शो ला त्या भेटल्यावर, मी त्यांना मुद्दाम हे सांगितले होते.

पुढे मस्कतमधे, मदर्स रेसिपीचे, गोंगुरा पिकल मिळू लागले. आंध्र पद्धतीचे, आंबाडीच्या भाजीचे हे लोणचे,
माझ्यासाठी अतिजहाल तिखट होते. मग मस्कतमधे मुबलक मिळणारा खजूर ( जेवढ्यास तेवढा ) त्यात मिसळून मी, माझ्यापुरचे अप्रतिम चवीचे, रसायन करत असे.

दूबईला एका सुपरमार्केटमधे, मला वाळवलेले करकाटे दिसले. ते साधारण २ किलोभर मी घेतले, आणि माझ्या
किचनमधे ते नेहमी असे. आता मला कधीही, ताजे "अमृत कोकम" करता येते.

नंतर आफ्रिकेत, इतर स्थानिक पालेभाज्या मी खात असे. पण आंबाडीची भाजी मात्र दिसली नाही. नैरोबीचे
भाजी मार्केट तर शेकडो प्रकारच्या, भाज्यांनी ओसंडून वहात असते. भारतीयच नव्हे तर युरोपियन आणि चायनीज भाज्यांचीही, तिथे रेलचेल असते. पण आपली, आंबाडीची भाजी मात्र कधी दिसली नाही.

नायजेरियात, भाज्यांची इंग्लिश नावे अगदी चपखल आहेत. उदा. वॉटर लिफ ( आपली मायाळू ) बिटर लिफ ( साधारण मेथीच्या चवीची भाजी ) सेंट लिफ ( ओव्याच्या वासाची भाजी ) पंपकिन लिफ ( भोपळ्यासारख्या एका वेलीची पाने. या वेलीची पाने आणि भल्या मोठ्या फळातल्या बिया खातात, फळातला गर खाण्याजोगा नसतो.) पण तरी आंबाडीची भाजी दिसत नसे.

लेगॉसच्या भाजीबाजारातून घरी जाताना, आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांवर माझी बारीक नजर असे. एकदा
मला ( बहुतेक रमझानच्याच दरम्यान) एका विक्रेत्याकडे, ढिगाने करकाटे दिसले. ज्या अर्थी ते ढिगाने होते,
त्या अर्थी, ते स्थानिक उत्पादन होते. आणि करकाटे होते म्हणजे भाजी पण असणार, अशी मला आशा वाटली.
असेच एकदा वेगाने जात असताना, मला एका भाजीवाल्याकडे ती दिसलीच. मी ड्रायव्हरला गाडी मागे घ्यायला लावली. तिथे तिचे नाव आहे, याग्वा. ( परत चौकशी करता येईल म्हणून, नाव विचारून घेतले.)
योगायोगाने, अन्नपूर्णाच्या लेखिका, मंगला बर्वे यांचे जावईबापू, माझ्या घरी होते. आम्ही
दोघांनी, मनसोक्त भाजी खाल्ली ती.

ही कहाणी इथेच संपत नाही.

गेल्या रविवारी, अंगोला मधल्या स्थानिक बाजारातही ती दिसली. लाल पानाची नव्हती, तर हिरव्या पानाची.
मक्याचे पिठही असतेच, इकडे. नाव मात्र कळले नाही, कारण माझा प्रश्नच, भाजीवालीला कळला नाही.
म्हणजे मला विचारता आला नाही.

खुप खुप वर्षांनी, आजीने केला होता तसा बेत केला. मिरच्या, लसूण यांच्या फोडणीवर परतलेली आंबाडीची भाजी आणि मक्याची भाकरी... अर्थात आजीच्या हातची चव कुठून आणू ?

( आंबाडीची हिरवी फळे, जी खास करुन श्रावणात मिळतात, त्यांचा आणि या भाजीचा संबंध नाही. त्याचे मोठे झाड असते. कोकणात, खास करुन गोव्यात, त्याचे रायते, गोकुळाष्टमीला करतात. तसेच, एका अतिथोर लेखिकेच्या, अतिअप्रतिम अशा " आस्था आणि गोवारीची भाजी " या कथेशीदेखील, माझ्या या लघुकथेचा, संबंध नाही. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!!....(भाजीच्या रेसिपीज आणि इतकी सारी माहिती दोन्हीही!)

दा, मी येणार तुमच्याकडे माहेरपणाला!!..:स्मित:

Happy सही!

छान

छान लेख, मला सुद्धा खुप आवडते अंबाडिची भाजि, आई हिरवि पाने थोडि चोळुन (रस काढुन) वाळवुन ठेवते ती मला वर्षभर कधिहि वापरता येतात. हि पाने उकडुन घेतलि कि तुरिचि डाळ, लसुण्,कांदा, दाण्याचे कुट घालुन झक्कास भाजी तयार होते. तांदळाच्या कण्या घालुन केलेल्या भाजीपेक्शा मला अशी कोरडि भाजी खूप आवडते. सॅन फ्रॅनसिस्को च्या फार्मर मार्केट मधे बर्‍याचदा उन्हाळ्यात चायनि़ज लोकांकडे दिसलि आहे हि भाजि. डेक्क्न हेम्प असे काहितरि नाव असते, नीट आठवत नाहि.

भाजी करणं सोडा, आम्हाला नीट खाताही येत नाही हो चवीने. अन तिच्यावर इतकं लिहायचं पण?
टोपी काढण्यात आलेली आहे (हॅट्स ऑफ)
दिनेशदा, ते पुस्तक लिहिण्याचं काय झालं पुढे?

दिनेशदा, आमच्या एच के रिजनमध्ये या भाजिला पुंडिपल्ल्या म्हणतात.
माझी आवडती भाजी झालिय कारण इथली पद्धत नो ऑईल आहे.
तीन चार मुठी तूरडाळ धुऊन उकडायला ठेवायची. शिजत आली की अंबाडीची भाजी पाने तोडून टाकायची.
थोड्यावेळाने मिरच्या लसूण कुटून टाकायचे मिठ टाकायचे. अधूनमधून घोटायचे. ज्वारी नाहीतर बाजरीच्या भाकरीबरोबर
़खायचे.
डाएटची ऐशी तैशी करायचीच असेल तर छोट्या कढल्यात तेलात भरपूत तळलेल्या लसणाची चरचरीत फोडणी करून ओतून घ्यायचि. किंवा तीळाच्या तेलात तिळाचीच फोडणी करून वरून ओतून घ्यायचे.
मदर रेसिपिचे घोंगुरा पिकल खूपच आवडते.

अंड्याला शाकाहारी व्हावेसे वाटू लागलेय हे सारे वाचून... जबरदस्त.. !!

कुठलीली पालेभाजी विथ भाकरी ... आपली फेवरेट आहे तसेही..

आंबाडीच्या फळांची माहिती झाली. दिनेशदा तुमचे लेख वाचून नविन काहीतरी कळतेच. आता शोध घेतो त्या फळांची. असो.. आई टाकून देते पण आंबाडीचे नुसते शिजवलेले देठ खायला/चोखायला मजा येते तिखट-मिठाबरोबर.

नाथांचे भारुड चपखल आहे. तेलाशिवाय आंबाडीची भाजी - कसेसेच वाटते (पण खाल्ले आहे.)

साती - माझे तर मत असे आहे की सर्व पालेभाज्या तेलाशिवाय करता येतात.. करून बघाच.

छान लेख. आमच्याकडे भाजीवाल्या विकायला घेउन बसतात. मी दोन्-तिन वेळा आणून तांदूळ घालून आणि लसणीची फोडणी देउन भाजी केली होती. अप्रतिम लागते.

माझी आई पण ही भाजी खूप सही करते अगदी तुम्ही लिहिलय तशी, काळे वाटाणे, डाळ, दाणे, भाताच्या कण्या, लसूण घालून. आमच्या घरी माझ्या आई बाबांना अश्या वेगवेगळ्या भाज्या खायची आवड आहे. त्यामुळे मायाळू, भारंगी, चुका, चाकवत ह्या पालेभाज्या आणि कारंदी, कोनफळ, कणघरं, कर्टुली, परवरं, ढेमस अश्या फळभाज्या अनेकदा आमच्या घरी होतात. Happy त्या सगळ्याची आठवण झाली. आता भारतात गेले की आईला आंबाडीची भाजी करायला लावणार नक्की... Happy तोंडाला पाणी सुटले.... स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स

मला आठवते आंबाडीची भाजी मी लाहाणपणी माझ्या गावाला म्हणजे सातारयात पहिल्यादा खाल्ली नंतर ती पुण्यात पण मिळायला लागली, पण इथ ती मिळत नसल्याने खुप वर्ष खाल्लीच नाही Sad

मस्तय. मी कधी आंबाडीची भाजी खाल्ली नाहिये. खाल्ली असेल तर लक्षात रहाण्याजोगी चव आवडली नसेल. पण आता हा लेख वाचून करून बघणार. Happy

छान लेख Happy

मलाही अंबाडीची भाजी आवडते. आई करायची भाताच्या कण्या आणि लसणीची फोडणी घातलेली भाजी.
इथे मिळत नाही पण अंबाडी Sad

दिनेश,
अतिशय सुरेख लेख. वाचताना तोंडाला पाणि सुटलं. Happy
मलाही आंबाडीची भाजी प्रचंड आवडते. पण ओळखता येत नाही Sad आणि करताही येत नाही. कमलाबाई ओगले धावून येतील म्हणा मदतीला पण भाजी ओळखायची कशी तेच माहित नाही.

आमच्याकडे तर अंबाडीची फक्त भाजीचं नाहीतर भाकरी देखील आई करते. आता तर आई माझ्याकडे राहते म्हणून ही भाजी आम्ही दर आठवड्याला एकदा तरी करतो. आई ह्यात बाजरी किंवा ज्वारी घालते. पण इथे ज्वारी मिळत नाही. बाजरी विपुल प्रमाणात मिळते.

पण आपल्याकडच्या बाजारात मात्र कधीही हि फळे, मला दिसली नाहीत. मुंबईत नाही आणि गावातल्या
बाजारातही नाहीत.>> ही फळे मी लहानपणापासून पाहून आहे. आमच्या घरी भाजी आणि फळे एकत्रच यायची. आई बोंडांसगट भाजी तोडून आणायची.

पण लक्ष्मीबाई धुरंधर आणि कमलाबाई ओगले, दोघींच्याही पुस्तकात ( हजार पाककृती आणि रुचिरा ) आंबाडीच्या बोंडाचे सरबत आहे. त्या दोघींनी याचे अभिनव उपयोग पण लिहिलेले आहेत. म्हणजे
आपल्याकडे, पूर्वापार हे सरबत केले जातेय.>> इथे सिंगापूरात सब्जा, संत्र्याची सुकवलेली साल आणि अंबाडीचे बोंडे एक तासभर पाण्यात ठेवून ते पाणी पितात. पोटासाठी हे शरबत चांगले असते.

इथे कुंडीतही हे झाड लावतात. मागे मी फेसबुकावर एक छायाचित्र टाकले होते.

दिनेशदा,

अतिशय सुरेख लेख. वाचतानाच तोंडाला पाणी सुटलं.

आंबाडीची भाजी कशी ओळखायची ?

कोणी फोटो डकवेल काय ?

अंबाडाच्या भाजीला आमच्याकडे पुंडीपल्ल्याचटणी म्हणतात. चटणी का म्हणतात ते माहित नाही. भाजी अप्रतिम लागते यात वाद नाही.

बदामीच्या बनशंकरीला अंबाडीच्या भाजी-भाकरीचा नैवेद्य असतो. दुपारच्या वेळात तिथे गेलं की बायका टोपलीतून भाकरी, भाजी आणी मडक्यातून दही विकत असतात. चवीला अर्थात छानच. सातीने लिहिलय तशी ही भाजी अजिबात तेल न वापरता करतात.

हो ही अंबाडीच आहे दक्षिणा. गुगलवर गोंगुरा किंवा अंबाडी अशाच्या अशाच नावानी शोध घेतली की लगेच इमेजमधे चित्रे दिसतील. देवनागरी शब्द वापर मात्र.

आमच्या विदर्भात अंबाडी चिक्कार आहे. मुळीच वाण नाही.

अरे वा, सगळ्यांची आवडती भाजी आहे तर हि. शांकली कधीही..

दक्षे, फोटोत आहे ती आंबाडीच.

बी, सिंगापूरच्या भाजीबाजारात मी बघितली होती हि. आणि हे सरबत पोटासाठी खरेच चांगले. उन्हाळ्यात तर खासच.

हिच्या बिया असतात पण बाजारात मूळासकट जुडी मिळाली, आणि ती खोचली तर सहज जगते.

आता, मलाही नव्यानव्या पाककृती मिळाल्या, इथे.

Pages