मधमाशांचा हल्ला: गिर्यारोहक ठार

Submitted by भटक्या अनुराग on 12 November, 2012 - 00:00

त्र्यंबकेवर तालुक्यातील डांग्या सुळका सर करत असताना मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ८० फूट दरीत कोसळून मुंबईतील मुलुंडमधील ​ गिर्यारोहक संदीप पाताडे ( २१ ) याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली . या ग्रुपमधील चार जखमींना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले .

मुलूंड येथील रहिवासी असलेला संदीप आणि डोंबिवली येथील संजय लोकरे , राहुल मेश्राम , सुर्दशन माळगावकर तसेच सुमेश ढमाले हे पाच सहकारी वाडीवऱ्हे येथील डांग्या सुळका सर करण्यासाठी आले होते . शनिवारी पहाटे येथे दाखल झालेल्या या ग्रुपमधील सहकाऱ्यांनी वाडीवऱ्हे परिसरातील एका शाळेत मुक्काम केला . सकाळच्या सुमारास गावात चहापाणी केल्यानंतर संदीप व सहकारी सुळक्याकडे गेले . १३५ मीटर उंच असलेल्या सुळक्यावर क्लाइंबिंग करून ते मध्यावर पोहोचले असताना अचानक त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला चढवला . संदीप ही क्लाइंबिंग लीड करत होता त्यामुळे मधमाश्यांचे सर्वात जास्त लक्ष्य तो ठरला . मधमाश्यांचे असंख्य डंख सहन न झाल्याने त्याने आपल्या रोपची क्लिप काढली . त्यामुळे तो थेट ८० फूट खोल दरीत कोसाळला . त्यातच त्याचा मृत्यू झाला . त्याचे इतर सहकारीदेखील मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले . मात्र त्यातील एकाने नजीकच्या मोहाळा गावात जाऊन गावकऱ्यांची मदत आणली . तसेच इतरांनी ​ आपल्या मित्र परिवाराला फोनवरून घटनेची माहिती दिली . नाशिक शहरातील वैनतेय या गिर्यारोहण संस्थेच्या संजय अमृतकर , दयानंद कोळी , प्रणव भानोसे , हेमंत पोखरणकर , प्रवण वामनाचारी आणि संतोष चव्हाण यांनाही या घटनेची माहिती मिळाली . ते अॅम्ब्युलन्स व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी पोहचले . जखमींना रात्री उशिरा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले . रविवारी सकाळी संदीप पाताडेचे पोस्टमार्टम करण्यात आले . त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी ठाण्याला रवाना करण्यात आले . घटनेबाबत वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच वाईट घटना. संदीपच्या आईवडिलांचा तर विचारही करवत नाही. Sad
प्रविणपा, तुम्हा सर्वांना यातून सावरण्याचे देव बळ देवो हीच प्रार्थना.

ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने समस्त पाताडे कुटुंबियांवर दु:खाचा जो डोंगर कोसळला आहे त्याची कल्पना मी आणि इथले सर्वच सदस्य करू शकतात. अकल्पित असाच हा प्रसंग. शक्य फारच वाईट घडले. अतिशय दु:खदायझाल्यास संदीपच्या कुटुंबियांपर्यंत आमच्या भावना जरूर पोच कराव्याआत्म्यास ईश्वर शांती देवो

अरे बापरे... आमच्या कडे काही बातमी वाचनात आली नाही कालपर्यंत... पण खुपच वाइट वाटले. बाकि लोकांनी आता त्यावर उपाय योजना करुनच पाउल उचलावे. Sad

सुन्न! संदीपच्या कुटुंबीयांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो ही देवाजवळ प्रार्थना!

संदीपला अश्रुपूर्ण श्रद्धांजली.

Sad

हेम च्या सूचना अचूक आहेत.
शिवाय शक्यतो, सेण्ट मारुन वगैरे जाणे टाळावे. (कपड्यांवर सेण्ट मारलेले असू नयेत.)
जवळपास कोणी येऊ शकू नये म्हणूनची ही पोळी खुप उंचीवर आडजागी असतात. अन ती कुठेही नजरेच्या आडही असू शकतात. माशांना आवाज/गोंगाट धूर इत्यादी सहन होत नाही, किन्वा त्यांना धोक्याची शंका आली तर त्या आक्रमक होतात.

>>> आशा करतो कि ह्या घटनेमुळे इतर गिर्यारोहकांच्या मनोबलावर परिणाम होणार नाही. अशी घटना यापुढे घडली तर काय करायचे याचे ते नक्की नियोजन करतील. <<<<<
बरोबर, परिणाम होणार नाही, व ज्यांचे वर परिणाम होऊ शकतो, अशान्नी अशा जोखमीच्या खेळात भागही घेऊ नये हेच उत्तम. मात्र परिणाम होणार नाही हे नक्की, व शक्य तितके नियोजन करतीलच.
खूप पूर्वीची गोष्ट आहे, माझ्या एका ज्येष्ठ मित्राचा चमू असाच कोणतातरी सुळका सर करायला गेला होता. खालून वर चढताना खडकाच्या ज्या चपट्या भागाला धरुन त्यावर चढण्यास एकाने डोके वर करुन आता पूर्ण अंग वर सरकवणार, तोच त्याला दिसले की त्याच खडकावर फुटभर अंतरावर एक नाग फडा काढून बसला आहे. घाईघाईने हा खाली सरकला, जास्त गोंधळला नाही, व नंतर मार्ग बदलुन तो सुळका सर केलाच केला. जर लक्ष नसते अन ह्याने सरळ त्या नागाला जाऊन मिठी मारल्याप्रमाणे भिडला असता तर? किंवा लक्षात आल्यावरही गोंधळल्यामुळे हात पाय वगैरे लटपटून सुटले असते तर? (मला आठवत नाही की दोर वापरला होता वा नव्हता). शेवटी नशिबाचा भाग येतोच.
यांच्याच एका प्रस्तरारोहणात, याचे गळ्यात तेव्हांचा भारीचा एसेल आर, अचानक दोरी वा पकड म्हणा काहीतरी सुटले, अन हा एका हुकातुन(?) ओवलेल्या दोर्‍याला लटकत राहिला, ते ही खाली डोके वर पाय या अवस्थेत, खाली खोलवर दरी इतकी की काही पडले तर आणणे हा विषय सोडून द्यावा, याचे गळ्यातिल कॅमेरा, जो देखिल हुकात अडकवला होता, पण निसटून व वजनाने / झटक्याने तुटून खाली पडला, त्याचे तुकडे तुकडे झाले. हा वाचला.
पण तरीही कुणाचेही जाणे बंद झाले नाही, कुणाच्याही मनावर परिणाम झाला नाही. तसा होऊ दिला जात नाही.

मात्र झाला तो प्रकार अत्यंत दुर्दैवी अपघात होता, अतिशय वाईट वाटले. इतक्या उमद्या जीवाचा अंत बाकिच्यान्ना हळहळवुनच सोडतो.

खरे तर आजकाल अपघात वगैरेच्या बातम्या वाचायलाच धीर होत नाही. त्या कुटुंबावर काय आभाळ कोसळले असेल याची कल्पनाच करवत नाही. देव त्यांच्या पठिशी राहो आणी संदिपच्या आत्म्याला शांती देवो.:अरेरे:

Pages