मधमाशांचा हल्ला: गिर्यारोहक ठार

Submitted by भटक्या अनुराग on 12 November, 2012 - 00:00

त्र्यंबकेवर तालुक्यातील डांग्या सुळका सर करत असताना मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ८० फूट दरीत कोसळून मुंबईतील मुलुंडमधील ​ गिर्यारोहक संदीप पाताडे ( २१ ) याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली . या ग्रुपमधील चार जखमींना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले .

मुलूंड येथील रहिवासी असलेला संदीप आणि डोंबिवली येथील संजय लोकरे , राहुल मेश्राम , सुर्दशन माळगावकर तसेच सुमेश ढमाले हे पाच सहकारी वाडीवऱ्हे येथील डांग्या सुळका सर करण्यासाठी आले होते . शनिवारी पहाटे येथे दाखल झालेल्या या ग्रुपमधील सहकाऱ्यांनी वाडीवऱ्हे परिसरातील एका शाळेत मुक्काम केला . सकाळच्या सुमारास गावात चहापाणी केल्यानंतर संदीप व सहकारी सुळक्याकडे गेले . १३५ मीटर उंच असलेल्या सुळक्यावर क्लाइंबिंग करून ते मध्यावर पोहोचले असताना अचानक त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला चढवला . संदीप ही क्लाइंबिंग लीड करत होता त्यामुळे मधमाश्यांचे सर्वात जास्त लक्ष्य तो ठरला . मधमाश्यांचे असंख्य डंख सहन न झाल्याने त्याने आपल्या रोपची क्लिप काढली . त्यामुळे तो थेट ८० फूट खोल दरीत कोसाळला . त्यातच त्याचा मृत्यू झाला . त्याचे इतर सहकारीदेखील मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले . मात्र त्यातील एकाने नजीकच्या मोहाळा गावात जाऊन गावकऱ्यांची मदत आणली . तसेच इतरांनी ​ आपल्या मित्र परिवाराला फोनवरून घटनेची माहिती दिली . नाशिक शहरातील वैनतेय या गिर्यारोहण संस्थेच्या संजय अमृतकर , दयानंद कोळी , प्रणव भानोसे , हेमंत पोखरणकर , प्रवण वामनाचारी आणि संतोष चव्हाण यांनाही या घटनेची माहिती मिळाली . ते अॅम्ब्युलन्स व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी पोहचले . जखमींना रात्री उशिरा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले . रविवारी सकाळी संदीप पाताडेचे पोस्टमार्टम करण्यात आले . त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी ठाण्याला रवाना करण्यात आले . घटनेबाबत वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

:-(.

काल सिनेमातला अजय देवगण आठवला.. निसर्गप्रेमाच्या नावानं निसर्गाला डिस्टर्ब करत फिरु नका.

आ़़जच सकाळी पेपरात वाचले. मुलुंडचा का तो? अरेरे. घरच्यांची काय अवस्था असेल. ऐन दिवाळीच्या तोंडावर. वृत्तांत वाचून तुम्ही सर्व माहीत आहात त्यामुळे काळजी वाटली.

-

दु:खद घटणा.
हेम ने याबद्दल शनिवारीच माहिती दिली होती भटकंती कट्टा वर. तो बॉडी रेस्क्यु साठी गेला होता. Sad

संदिप पाताडे माझ्या एका मित्राचा चुलत भाऊ आहे...!!! राहुल मेश्राम ला मी मेसेज केला होता तो म्हणाला आम्हि आता या घटनेतुन सावरत आहोत असे म्हणाला...!!! Sad

अशावेळी काय करायला हवे पण?>>> +१
हा मधमाश्यांचा हल्ला फारच अनपेक्षीत असावा. आणि अशा परिस्थितीत काय कारवे ते सुचले पण नसेल गिर्यारोहकांना.
माबो भटक्यांपैकी कोणाला या गोष्टिचा अनुभव, असा मधमाश्यांचा हल्ला कसा टाळता येईल किंवा असा हल्ला झालाच तर त्या वेळी काय करावे या बद्दल काही माहीती आसेल तर कृपया इथे द्या. सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा.

अनुराग....

ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने समस्त पाताडे कुटुंबियांवर दु:खाचा जो डोंगर कोसळला आहे त्याची कल्पना मी आणि इथले सर्वच सदस्य करू शकतात. अकल्पित असाच हा प्रसंग. शक्य झाल्यास संदीपच्या कुटुंबियांपर्यंत आमच्या भावना जरूर पोच कराव्यात.

काही वर्षापूर्वी अशाच एका जीवावरच्या प्रसंगातून मी गेलो होतो. फरक इतकाच की संदीप आणि त्याचे मित्र सुळका सर करीत होते, तर आमची वीसबावीस मित्र आणि कुटुंबियांची टीम पन्हाळा गडावरील सहलीचा आनंद उपभोगत होती. पन्हाळ्यातील "तबक उद्यान" ज्यानी पाहिले आहे त्याना तेथील झाडांची गर्दी तसेच दाटपणा माहीत असेलच. तर तिथे दुपारच्या भोजनाचा आनंद घेणारी किमान ४०-५० लोक होती. बहुतेकांनी घरूनच जेवण करून आणले होते, पण एका कुटुंबातील लोकांनी तिथेच काटक्या आणि पाचोळा गोळा करून चूल तयार केली. त्या चुलीतून निघणार्‍या धुरामुळे झाडावरील मधाच्या पोळ्याला इजा पोचली आणि त्या मधमाशांचा काळ्या ढगासारखा संतापाने उडालेला थवा आम्ही पाहिला. एकमेकाला ओरडून सावध करेपर्यंत त्यानी बागेत हजर असलेल्या जवळपास सर्वांवर माशांनी हल्ला चढविला. सार्‍यानी भोजन तिथेच टाकून तिथून पलायन केले होते. नशीब इतकेच त्या मोठाल्या गांधीलमाशा नव्हता {संदीप आणि त्याच्या मित्रांना चावलेल्या माशा ह्या नक्कीच गांधील जातीच्या असणार....कारण त्यांचे चावे जीवघेणे असते}, पण ज्या पध्दतीने त्या डसल्या ते पाहता त्यांच्या चाव्यात नक्कीच जखम करण्याची क्षमता होती. लहान मुलांना काखेत घेऊन पळणार्‍या स्त्रियांची फार केविलवाणी अवस्था झाली होती....नशीबाने एकदोन चाव्यावरच निभावले होते.

तेथील रखवालदारांनी हा गहजब पाहिला....व वेळीच ओरडून 'स्वतःच्या अंगावर बाटल्यातील पाणी मारत मारत वाकडे तिकडे पळा.....' असा घोष करण्यास सुरुवात केली. हा एक चांगला उपाय होता असे सिद्ध झाले. ओल्या अंगावर माश्या दंश करीत नाहीत असे दिसले.

असो. या निमित्ताने अशा प्रसंगातील एक सुटकेचा उपाय सांगायची संधी मिळाली म्हणून हा सविस्तर प्रतिसाद. नंतर सारे काही शांत झाल्यावर, ज्यांच्या हातावर मानेवर दंश दिसले त्यावर त्या रखवालदारांनीच मग खोबरेल तेलात बुडवून ओल्या हळदीचे लेपण दिले.....त्याने चांगलाच गारवा पडला. इच्छुक पर्यटकांनी अशी तरतूद सोबत जरूर करावी.

संदीप पाताडे याच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो.

अशोक पाटील

या घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने मदतीसाठी गेलो. दुर्दैवाने संदिपचा जागीच मृत्यू झालेला होता. इतर ४ जणांना शासकिय रुग्णालयात लगेच दाखल केले. काल त्यांनाही प्राथमिक उपचारांनंतर सोडण्यात आले. मुंबईतूनही आणखी वेगवेगळ्या संस्थांचे तज्ञ गिर्यारोहक तातडीने हजर झाले, त्यांचीही बरीच मदत झाली. सगळ्यात महत्त्वाची मदत गावकर्‍यांची झाली जी अशा वेळी महत्त्वाची ठरते.

बापरे! Sad

संदीप पाताडेच्या आत्म्यास शांती लाभो!

अशोक., चांगली माहीती. एखादे मधमाश्या प्रतिसारक (bee repellent) औषध वा मलम काढण्याच्या दिशेने काही संशोधन झाल्याचे कुणास ठाऊक आहे का?

-गा.पै.

Pages