जे होते तेच आपले नाते होते...

Submitted by अ. अ. जोशी on 10 November, 2012 - 10:26

जे होते तेच आपले नाते होते
की केवळ ते दळणारे जाते होते

ती लुटूपुटूची जरी लढाई होती
का आत मनाच्या घुसले पाते होते

रुतलेले बाण शोधले कुठून आले
ते भरलेले आपलेच भाते होते

शब्दांची नव्हती चूक जराही कुठली
ते आले त्या ओठांना दाते होते

सोडलेस तू पाहून रिकामी पाने
ते तुझ्यासहित केलेले खाते होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल छानच!

तरीही----

ती लुटूपुटूची जरी लढाई होती
पण आत मनाच्या घुसले पाते होते....असे
किंवा
ती लुटूपुटूचीच जर लढाई होती
का आत मनाच्या घुसले पाते होते...असे जास्त थेट झाले असते असे वाटते

ते आले त्या ओठांना दाते होते>> इथेही दोन सर्वनामे प्रभावी वाटत नाहीत.... आलेले करता आले असते सुरुवातीला

शेवटचा स्पष्ट पोहचला नाही

कृ.गै.न.

ते आले त्या ओठांना दाते होते...

हा मिसरा नाही समजला

उर्वरीत गझल भन्नाट!

ती लुटूपुटूची जरी लढाई होती
का आत मनाच्या घुसले पाते होते...व्व्व्व्व्वा!

रुतलेले बाण शोधले कुठून आले
ते भरलेले आपलेच भाते होते.....क्या बात!

गा गागा गागा गागा गागा गागा
असा जर क्रम वाचनाचा होत असेल तर , मतल्यातील पहिल्या ओळीत गडबड होते आहे का ?
मात्रा बावीस बरोबर येताहेत ,पण क्रम इकडे तिकडे होतोय का ? प्लीज मला वाचतांना जाणवले म्हणून नोंदवतोय

जे होते तेही अपुले नाते होते >>>> यात मात्रा बावीस आणि फ्लो ही साधला जातो॰
की केवळ ते दळणारे जाते होते..

तिसरी द्विपदी वाचतांना ही प्रवाहीपणा येत नाही ..
कृ.गै.न.
खयाल खूप छान . रचना आवडली.

जोशीबुवा
तुमचे शेर किंचित उशिरा घुसतात आणि रुतून बसतात. खूप मजा येते तुमच्या गझला वाचताना. मात्र "दाते" खटकला.

देसले साहेब मला असे वाटते की असे वृत्त असेल (फक्त गा ...ल नाही )....तर बहुधा मी आता खाली दिले आहे तसे अखण्ड मानावे वाचताना मात्र शब्द सम्पला तिथे थाम्बावे ...मला असे का वाटते नाही माहीत !!

गागागागागागागागागागागा

आधीच्या प्रतिसादात मी जश्या प्रकारे ही लगावली('गा' वली.. :))टाईप केली होती ती माझी चूक होती असे मी मानतो!!

सर्वांना मनापासून धन्यवाद!

*** दातेबद्दल....

शब्द ज्या ओठांतून आले त्या ओठांना दाते होते. त्यामुळे अर्थातच ते शब्द खरवडून बाहेर आले.
ते चे प्रयोजन शब्दांसाठी आहे.
असो.
पुन्हा एकदा धन्यवाद!

@वैभवराव,

दोन्ही बरोबर आहे.

@शाम

शेवटच्या शेरात, पाने हा शब्द जेवण्याची पाने नसून, खाते ज्या वहीत भरले जाते ती पाने असा घ्यावा.
ज्या खात्याची रिकामी पाने पाहून तू सोडलेस, ते खाते तुझ्यासहित केलेले खाते होते. (म्हणजेच, मी एकटा जबाबदार नाही.)

धन्यवाद!!

प्रतिसाद सकारात्मक घेतल्या बद्दल धन्यवाद.

कारण चर्चेतून शिकणे असे मला अभिप्रेत असते... त्याचा अर्थ अक्कल काढणे असा झाला की .. संवादाची जागा वाद घेतो. आणि हाती काहीच लागत नाही. असो.

पुढील गझलेच्या प्रतिक्षेत!