इंद्रवज्र

Submitted by हर्पेन on 10 November, 2012 - 06:16

Indra Vajra.jpgइंद्रवज्र !

होय, आम्ही इंद्रवज्र पाहिले.... आणि तेही तोरण्यावरून...

त्याचं असं झालं... आमचा एक दहाबारा जणांचा हौशी लोकांचा कंपू जवळजवळ गेले वर्षभर महिन्यातून एकदा असं कुठेतरी गडकिल्ल्यावर जातोय. साधारण दोनेक महिने आधी ठरवतो कुठे जायचं ते. या वेळी खरंतर अगोदर योजल्याप्रमाणे दोन दिवसांची भटकंती रतनगडावर करायची ठरत होती. आणि पुढच्या महिन्यात हरिश्चंद्रगडावर जायचं, असं ठरवलं होतं. ह्या दोन्ही गडांवर जायचं खूप महिन्य़ांपासून ठरत होतं. तो मु्हूर्त शेवटी आता या महिन्यात सापडला होता. सगळ्यांनाच तिकडे जायचं होतं. पण काही मित्रांना सलग दोन दिवसांची भटकंती गैरसोयीची ठरत होती. त्यांच्यासाठी म्हणून मग ते दोन्ही गड पुढे ढकलण्यात आले. (म्हणजे त्या गडांवर जाणं !) मग ठरलं, की कुठल्यातरी एक दिवसात होईल अशा गडावर जाऊयात....मग सर्वानुमते ठरलं, की तोरण्यावर जाऊयात.

तोरणा ऐकीव माहितीनुसार चढायला जरा अवघड या सदरात मोडणारा असल्याने, लवकर निघून उन्हाचा तडाखा चालू व्हायच्या आत गड सर करता आला तर बरं, या विचारांनी पाच वाजता निघायचं ठरवलं आणि त्यावर अंमलदेखील केला. त्या दिवशी म्हणजे रविवारी पहाटे पाच सव्वापाचलाच आम्ही म्हणजे गौरी-हर्षद लिमये, देवयानी-प्रशांत, शुभदा-मंदार (मॅन्डी), मृणाल, चिन्मय, इरावती, चैतन्य, सुनील आणि मी (हर्षद पेंडसे) असे तीन गाड्यांमधून वेल्ह्याकडे रवाना झालो.

पायथ्याशी पोचल्यावर चहाबाज लोकांचं चहापाणी झाल्यावर गडाकडे रवाना झालो. वाटेत नेहमीप्रमाणे आदी, मध्य आणि अंत्य असे तीनेक गट तयार झाले. मॅन्डी आणि चैतन्य हे सर्वात पुढे; मी, इरावती, शुभदा आणि प्रशांत हे मध्य गटात हो्तो आणि बाकी सर्व अंत्य गटात होते. गड उंच या सदरात मोडणारा आणि त्याचं प्रचंडगड हे नाव सार्थ करणारा! त्यातच हवेतला दमटपणा आमचा कस पहात होता. वाटेत एका ट्प्प्य़ावर आल्यावर धरणाच्या पाण्याचा नजारा आणि वारा दोघेही एकत्रच आले आणि तनामनाला सुखावून गेले. इथून थोडं पुढे गेल्यावर मॅन्डी आणि चैतन्य यांचा आवाज मात्र येत होता, पण धुक्यातून ते दिसत मात्र नव्हते. ते पार वर पोचले होते. पुढची चढाई मात्र जरा अवघड असली तरी वारा, धुकं आणि सावलीतली वाट यामुळे सुसह्य झाली आणि आम्ही एकदाचे गडावर पोचलो.

गडावर पोचता पोचता परत त्यातल्या त्यात आमचे दोन गट झाले, मी आणि इरावती आधी पोचलो अन प्रशांत शुभदा थोडे मागे राहिले. आम्ही वर पोचल्या पोचल्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला असलेल्या तोरणजाईचे दर्शन घेतलं. जवळपास नजरेच्या टप्प्यात आदिगटातले दोघे दिसेनात, हाळीलाही ओ देईनात, मग मी अन इरावतीनं ठरवलं की शुभदा प्रशांत जोडीला येइ द्यावं. असं म्हणून जरा दम खाइतोपर्यंत आलेच ते! दरवाज्याला लागून असलेल्या जिन्यानं दरवाज्याच्या डोक्यावरून तटबंदीच्या भिंतीवरून उतरून, ज्या बुरुजावर मॅण्डी-चैतन्य दिसले होते त्या दिशेला चालायला सुरू केलं. तटबंदीच्या भिंतीवर, सोनसळी सोनकीच्या फ़ुलांच्या गच्च ताटव्याच्या मधून जेमतेम पाऊल टेकवता येईल, एवढीच जागा मधे उरली होती. त्यावरून चालताना डाव्या बाजूस असलेल्या दरीतून धुक्याचे लोटच्या लोट कल्लोळ उठल्यागत सतत येत होते. स्वर्गातली पाउलवाट अशीच असावी, असं सहज वाटून गेलं. उजव्या बाजूला निळं आकाश, गच्च हिरवं रान, सोनकीची सोनेरी किरणांमुळे खरोखर सोन्यासारखी भासणारी फ़ुलं, मधूनच असणारी आकाशी रंगाची फ़ुलं, काळा कातळ, डाव्या अंगास शुभ्र असे पण झिरझिरीत पासून ते दाट असे सतत बदलते असे धुक्याचे पडदे, रंगांची नुसती उधळण होती आमच्या आजूबाजूला. केवळ स्वर्गीयय असंच ते वातावरण होतं. हे सर्व कमी होतं म्हणून की काय, पण सहज डाव्या बाजूला नजर गेली, तर इंद्रधनुष्याचे सप्तरंग दिसल्यासारखा भास झाला.... भास कसला न काय... खरंच होतं इंद्रधनुष्य आणि ते पण गोल वर्तुळाकार, आणि माझी सावली पण दिसत होती. माझ्या सावलीच्या डोक्याभोवती तेजोवलयं असावीत, अशी सप्तरंगी वलयं.. क्षणभर काही कळेचना आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला... अरे! हे तर इंद्रवज्र! हे इकडे कुठे? हे तर हरिश्चंद्रगडावर कोकणकड्यावरून दिसतं... पण हेच ते... नक्कीच...

तशीच ही पश्चिम दिशेस असलेली दरी, त्यातून वर येणारं बाष्पभरलं धुकं / ढग, तसाच हा आपल्यामागून उगवणारा अन त्याच्या किरणांमुळे आपली सावली दरीत पाडणारा सूर्यदेव, होय हे नक्कीच इंद्रवज्र आहे. आजवर ज्याबद्दल केवळ फक्त ऐकलं होतम, ज्याचं छायाचित्र नुकतेच पेपरात दुर्मीळ घटना म्हणून बातमीसोबत पाहिलं होतम, तेच हे... केवळ आज नशीब जोरावर असल्यामुळे आपल्याला दिसतंय...

त्याला मान देण्यायोग्य असा खणखणीत आवाज काढून ओरडलो," अरे, हे बघा इंद्रवज्र... ही बघा आपली सावली.. अन त्याभोवती असलेली सप्तरंगी वर्तु्ळं घेऊन दिमाखदार दिसणारं इंद्रवज्र! मग काय... नुसती धावपळ... म्हणजे जाग्यावरूनच... हो, मला पण दि्सतंय..... ही हाताची सावली बघ कशी... भारी थ्रीडी ईंग्लिश पिक्चरला मागे टाकेल अशी ईफ़ेक्ट देत्येय...अशा कॉमेंट्स... येणाऱ्या प्रत्येक झुळकेबरोबर हा धुकयाच्या पडद्यावरचा खेळ पुसला जायचा अन नव्या झुळकेबरोबर नव्या धुक्यावर पडद्यावर नव्याने उमटायचा.... असं दोनचार वेळा झालं आणि भान आलं की, अरे कॅमेरा आहे आपल्याकडे, फोटो तर काढूयात... मग कॅमेरयाचा क्लिकक्लिकाट... इंद्रवज्र पण आम्हाला साथ देत होतं. अगदी भरपूर फ़ोटो काढेतोपर्यंत..... मन पूर्ण भरेतोवर... हा स्वर्गीय सुखाचा आनंद मनाच्या कुपीत पुरेपूर भरून घेतलाय. राहील आता तो शेवटपर्यंत...

Indra Vajra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त हर्षेन,

तुम्ही खरच भाग्यवान आहत. इंद्रवज्र पाहिलतही आणि कॅमेऱ्यात साठवलतही.

अप्रतिम.

मस्त Happy

हर्पेन, सुंदर वर्णन..आणि अनुभव तर खिळवून ठेवणाराच ! विमानातून मीही एकदा पाहिलं होतं, त्या आठवणीला उजाळा मिळाला !(पण याला इंद्रवज्र म्हणतात हे माहीत नव्हतं !)

भारी! Happy

वॉव...हर्पेन असलं काही तरी असतं हेच माहिती नव्ह्तं . फार सुंदर दिसतंय ते इन्द्रवज्र!
आणि छान लिहिलंय्स!

काल पुणे-सातारा रोडवर भर दुपारी याचा अनुभव घेतला -
21eb202f-4f2f-4c14-bb98-d6ab9bf29f80.jpgce3a7c8c-9236-4a7f-895e-683383f7096c.jpg

फोटो मोबाइलवरुन काढले असल्याने क्वालिटि बेताचीच आहे.

वाह!

याला "खळे पडणे" असेही म्हणतात, चंद्र वा सूर्याला खळे पडणे...
आईच्या सांगण्यानुसार हे दिसणे अशुभकारक मानले जाते. म्हणजे सामुहिक/समाजाच्या दृष्ट्या काही विपरित घडण्याचे पूर्व संकेत असे मानले जाते. याबाबत माझा अभ्यास नाही.

शुद्ध रक्त राजा यांच्या एका माहितीपुर्ण लेखाची नोंद करून ठेवत आहे.त्यात बरीच वाढीव माहिती मिळेल.
इंद्रवज्र - Indravajra
https://www.maayboli.com/node/70554

Pages