इंद्रवज्र

Submitted by हर्पेन on 10 November, 2012 - 06:16

Indra Vajra.jpgइंद्रवज्र !

होय, आम्ही इंद्रवज्र पाहिले.... आणि तेही तोरण्यावरून...

त्याचं असं झालं... आमचा एक दहाबारा जणांचा हौशी लोकांचा कंपू जवळजवळ गेले वर्षभर महिन्यातून एकदा असं कुठेतरी गडकिल्ल्यावर जातोय. साधारण दोनेक महिने आधी ठरवतो कुठे जायचं ते. या वेळी खरंतर अगोदर योजल्याप्रमाणे दोन दिवसांची भटकंती रतनगडावर करायची ठरत होती. आणि पुढच्या महिन्यात हरिश्चंद्रगडावर जायचं, असं ठरवलं होतं. ह्या दोन्ही गडांवर जायचं खूप महिन्य़ांपासून ठरत होतं. तो मु्हूर्त शेवटी आता या महिन्यात सापडला होता. सगळ्यांनाच तिकडे जायचं होतं. पण काही मित्रांना सलग दोन दिवसांची भटकंती गैरसोयीची ठरत होती. त्यांच्यासाठी म्हणून मग ते दोन्ही गड पुढे ढकलण्यात आले. (म्हणजे त्या गडांवर जाणं !) मग ठरलं, की कुठल्यातरी एक दिवसात होईल अशा गडावर जाऊयात....मग सर्वानुमते ठरलं, की तोरण्यावर जाऊयात.

तोरणा ऐकीव माहितीनुसार चढायला जरा अवघड या सदरात मोडणारा असल्याने, लवकर निघून उन्हाचा तडाखा चालू व्हायच्या आत गड सर करता आला तर बरं, या विचारांनी पाच वाजता निघायचं ठरवलं आणि त्यावर अंमलदेखील केला. त्या दिवशी म्हणजे रविवारी पहाटे पाच सव्वापाचलाच आम्ही म्हणजे गौरी-हर्षद लिमये, देवयानी-प्रशांत, शुभदा-मंदार (मॅन्डी), मृणाल, चिन्मय, इरावती, चैतन्य, सुनील आणि मी (हर्षद पेंडसे) असे तीन गाड्यांमधून वेल्ह्याकडे रवाना झालो.

पायथ्याशी पोचल्यावर चहाबाज लोकांचं चहापाणी झाल्यावर गडाकडे रवाना झालो. वाटेत नेहमीप्रमाणे आदी, मध्य आणि अंत्य असे तीनेक गट तयार झाले. मॅन्डी आणि चैतन्य हे सर्वात पुढे; मी, इरावती, शुभदा आणि प्रशांत हे मध्य गटात हो्तो आणि बाकी सर्व अंत्य गटात होते. गड उंच या सदरात मोडणारा आणि त्याचं प्रचंडगड हे नाव सार्थ करणारा! त्यातच हवेतला दमटपणा आमचा कस पहात होता. वाटेत एका ट्प्प्य़ावर आल्यावर धरणाच्या पाण्याचा नजारा आणि वारा दोघेही एकत्रच आले आणि तनामनाला सुखावून गेले. इथून थोडं पुढे गेल्यावर मॅन्डी आणि चैतन्य यांचा आवाज मात्र येत होता, पण धुक्यातून ते दिसत मात्र नव्हते. ते पार वर पोचले होते. पुढची चढाई मात्र जरा अवघड असली तरी वारा, धुकं आणि सावलीतली वाट यामुळे सुसह्य झाली आणि आम्ही एकदाचे गडावर पोचलो.

गडावर पोचता पोचता परत त्यातल्या त्यात आमचे दोन गट झाले, मी आणि इरावती आधी पोचलो अन प्रशांत शुभदा थोडे मागे राहिले. आम्ही वर पोचल्या पोचल्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला असलेल्या तोरणजाईचे दर्शन घेतलं. जवळपास नजरेच्या टप्प्यात आदिगटातले दोघे दिसेनात, हाळीलाही ओ देईनात, मग मी अन इरावतीनं ठरवलं की शुभदा प्रशांत जोडीला येइ द्यावं. असं म्हणून जरा दम खाइतोपर्यंत आलेच ते! दरवाज्याला लागून असलेल्या जिन्यानं दरवाज्याच्या डोक्यावरून तटबंदीच्या भिंतीवरून उतरून, ज्या बुरुजावर मॅण्डी-चैतन्य दिसले होते त्या दिशेला चालायला सुरू केलं. तटबंदीच्या भिंतीवर, सोनसळी सोनकीच्या फ़ुलांच्या गच्च ताटव्याच्या मधून जेमतेम पाऊल टेकवता येईल, एवढीच जागा मधे उरली होती. त्यावरून चालताना डाव्या बाजूस असलेल्या दरीतून धुक्याचे लोटच्या लोट कल्लोळ उठल्यागत सतत येत होते. स्वर्गातली पाउलवाट अशीच असावी, असं सहज वाटून गेलं. उजव्या बाजूला निळं आकाश, गच्च हिरवं रान, सोनकीची सोनेरी किरणांमुळे खरोखर सोन्यासारखी भासणारी फ़ुलं, मधूनच असणारी आकाशी रंगाची फ़ुलं, काळा कातळ, डाव्या अंगास शुभ्र असे पण झिरझिरीत पासून ते दाट असे सतत बदलते असे धुक्याचे पडदे, रंगांची नुसती उधळण होती आमच्या आजूबाजूला. केवळ स्वर्गीयय असंच ते वातावरण होतं. हे सर्व कमी होतं म्हणून की काय, पण सहज डाव्या बाजूला नजर गेली, तर इंद्रधनुष्याचे सप्तरंग दिसल्यासारखा भास झाला.... भास कसला न काय... खरंच होतं इंद्रधनुष्य आणि ते पण गोल वर्तुळाकार, आणि माझी सावली पण दिसत होती. माझ्या सावलीच्या डोक्याभोवती तेजोवलयं असावीत, अशी सप्तरंगी वलयं.. क्षणभर काही कळेचना आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला... अरे! हे तर इंद्रवज्र! हे इकडे कुठे? हे तर हरिश्चंद्रगडावर कोकणकड्यावरून दिसतं... पण हेच ते... नक्कीच...

तशीच ही पश्चिम दिशेस असलेली दरी, त्यातून वर येणारं बाष्पभरलं धुकं / ढग, तसाच हा आपल्यामागून उगवणारा अन त्याच्या किरणांमुळे आपली सावली दरीत पाडणारा सूर्यदेव, होय हे नक्कीच इंद्रवज्र आहे. आजवर ज्याबद्दल केवळ फक्त ऐकलं होतम, ज्याचं छायाचित्र नुकतेच पेपरात दुर्मीळ घटना म्हणून बातमीसोबत पाहिलं होतम, तेच हे... केवळ आज नशीब जोरावर असल्यामुळे आपल्याला दिसतंय...

त्याला मान देण्यायोग्य असा खणखणीत आवाज काढून ओरडलो," अरे, हे बघा इंद्रवज्र... ही बघा आपली सावली.. अन त्याभोवती असलेली सप्तरंगी वर्तु्ळं घेऊन दिमाखदार दिसणारं इंद्रवज्र! मग काय... नुसती धावपळ... म्हणजे जाग्यावरूनच... हो, मला पण दि्सतंय..... ही हाताची सावली बघ कशी... भारी थ्रीडी ईंग्लिश पिक्चरला मागे टाकेल अशी ईफ़ेक्ट देत्येय...अशा कॉमेंट्स... येणाऱ्या प्रत्येक झुळकेबरोबर हा धुकयाच्या पडद्यावरचा खेळ पुसला जायचा अन नव्या झुळकेबरोबर नव्या धुक्यावर पडद्यावर नव्याने उमटायचा.... असं दोनचार वेळा झालं आणि भान आलं की, अरे कॅमेरा आहे आपल्याकडे, फोटो तर काढूयात... मग कॅमेरयाचा क्लिकक्लिकाट... इंद्रवज्र पण आम्हाला साथ देत होतं. अगदी भरपूर फ़ोटो काढेतोपर्यंत..... मन पूर्ण भरेतोवर... हा स्वर्गीय सुखाचा आनंद मनाच्या कुपीत पुरेपूर भरून घेतलाय. राहील आता तो शेवटपर्यंत...

Indra Vajra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिसला ग बाई दिसला.

आधी फोटो नव्हता.

छान.

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः ।
स्वस्ति नो ब्रिहस्पतिर्दधातु
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

एकच नंबर...कसले लकी आहात तुम्ही....
अजिबात कल्पना नसताना इंद्रवज्र पहायला मिळाले...
नुसत्या कल्पनेनीच कसंतरी होतयं....

असं दोनचार वेळा झालं आणि भान आलं की, अरे कॅमेरा आहे आपल्याकडे, फोटो तर काढूयात.

नशिब लवकर भान आलं ते Happy
ग्रेट जॉब डन....

काय असते हे इंद्रध्वज?
शास्त्रीय माहिती द्या ना पटकन कोणीतरी?
किंवा एखादी गूगाळायला लिंक द्या ना ..
मी हे नावच पहिल्यांदा ऐकतोय..

इंद्रवज्र हा एक अदभुत चमत्कार आहे निसर्गातला. पावसाळ्याच्या सुरूवातीला ज्यावेळी आपण उंचावर असू आणि ढग खालती असतील अशा वेळी ते दिसण्याची शक्यता असते. (शंभरात एकदा) त्यावेळी आपल्याला पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसते. आणि विशेष म्हणजे ढगांवर आपली सावली आणि त्याभोवती इंद्रवज्र असा अद्भूत प्रकार असतो.
मला आता नक्की आठवत नाही पण बहुदा इंग्लिश कर्नल स्पाईक्स (चूभूदेघे) याने ते कळसूबाईवर पाहिल्याची नोंद केली आहे. गोनीदांनीही त्याचे वर्णन केले आहे.

Fogbows form in the same way as rainbows, but they are formed by much smaller cloud and fog droplets which diffract light extensively. They are almost white with faint reds on the outside and blues inside. The colours are dim because the bow in each colour is very broad and the colours overlap. Fogbows are commonly seen over water when air in contact with the cooler water is chilled, but they can be found anywhere if the fog is thin enough for the sun to shine through and the sun is fairly bright. They are very large—almost as big as a rainbow and much broader. They sometimes appear with a glory at the bow's centre

http://en.wikipedia.org/wiki/Fog_bow

साती, वत्सला, आशुचँप, आम्ही खरोखरच नशिबवान ठरलो. आम्ही दोन वर्षांपुर्वी गेलो त्यावेळेस हे लिहिले होते.

अगदी 'आज अचानक गाठ पडे' अशी अवस्था झाली होती. कारण जे काही इन्द्रवज्राच्या बाबतीत वाचले होते ते हरिश्चन्द्रगडाबाबत होते.

आशुचँप, कर्नल साईक्सला देखील ते कळसुबाईवर नव्हे तर हरिश्चन्द्रगडावरील कोकणकड्यावरुन दिसले असे वाचनात आले आहे.

दिनेशदा, खरतर फोटो फार काही भारी आला नाहीये, पण Record Shot म्हणतात तसा घेतलाय आपला झालं.

अंड्या - इन्द्रध्वज नव्हे आंबा१ नी म्हटल्याप्रमाणे इन्द्रवज्रच, पण गुगाळुन शास्त्रीय माहीती मिळेलच असे नाही, मी प्रयत्न केला होता, ही फक्त आपल्याकडे आढळणारी घटना असल्यामुळे असावे कदाचित.

खरेतर मायबोलीकर विद्वान मंडळींकडून काही माहिती मिळेली तर बघावी म्हणूनच हा लेख इथे टाकला आहे. वर्णनपर असल्यामुळे ललित या सदराखाली टाकला आहे. ह्याला अजुन वेगळ्या स्वरुपात वेगळ्या सदरा अंतर्गत टाकण्याने उपयोग होणार असेल तर तसेही सुचवावे.

मस्तच रे Happy

यावर्षी जुलै महिन्यात कश्मिरची भटकंती करून मुंबईत परत असताना महाराष्ट्राच्या हद्दीत विमान आल्यावर (आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने) एका बाजुला सूर्यदेव मध्ये आमचे विमान आणि दुसर्‍या बाजुला पाण्याने भरलेला ढग. त्या ढगावर गोलाकृती इंद्रधनुष्य आणि त्यात बरोब्बर मध्ये विमानाची सावली!!! ते गोलाकार इंद्रधनुष्य जसजसे मोठे होत होते तसतशी विमानाची सावलीही मोठी होत होती :-). विलक्षण दृष्य होते. Happy कॅमेर्‍याने टिपण्याचा खुप प्रयत्न केला पण यश नाही आले, सरळ कॅमेरा बंद केला आणि डोळ्यांत ते सर्व दृष्य साठवले. Happy Happy

आशुचँप, कर्नल साईक्सला देखील ते कळसुबाईवर नव्हे तर हरिश्चन्द्रगडावरील कोकणकड्यावरुन दिसले असे वाचनात आले आहे. >>>>>माझ्याही Happy

माहितीबद्दल धन्यवाद...
चूकून वज्रचे ध्वज झाले..
शब्दच पहिल्यांदा ऐकला ना..

पण जाम भारी आहे राव..
नशीबवान आहात..
आता हे बघितल्याबिगर मी मरायचो नाही..

मस्त! फोटोत व्यवस्थित कल्पना येतिये.
बारिक तुशार उडवणार्‍या कारंज्यात पहाटे किंवा संध्याकाळी असेच सप्तरंग दिसू शकतात. पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं!

मस्तच.. हर्षद तुम्ही भाग्यवान आहात.

कोकणकड्यावरून इंद्रवज्र दिसतं असं खूप ऐकलं होतं आणि त्यासाठी आम्ही मित्रांनी विविध वेळांना हरिष्चंद्रगडाच्या वार्‍या पण केल्या पण कहीही ते दिसलं नाही.

फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद.

जिप्सी- आशुचँप तुमचे एकमेकांना टुकटुक लय भारी!

बाकी सर्व मंडळी आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

पण ह्याची शास्त्रीय माहिती कशा प्रकारे मिळवता येईल, कोणत्या संस्थेमध्ये किंवा विद्यापीठात सम्पर्क साधला असता कार्यभाग साधेल ते कुणी सांगेल तर बरे होईल.

Pages