हिच तर गंमत असते........

Submitted by सौ. वंदना बर्वे on 10 November, 2012 - 03:45

मंदा बऱ्याच दिवसांनी भेटली. प्रेमविवाह केल्यापासून ती एवढी खूष होती की विचारू नका. मनासारखा जोडीदार मिळाला होता. दोघेही कमावती होती. सगळं हेवा वाटावा एवढं सुरळीत चाललेलं. पण जेंव्हा भेटली तेंव्हा तिचा मूड काही ठीक नव्हता.

"तो कसं असा वागू शकतो?"
"काय झालं?"
"एवढा सुशिक्षित, सो कॉल्ड सभ्य, मी....."
"अगं नीट सांग काय झालं"

नंतर तिनं जे सांगितलं त्याने मी हादरूनच गेले. वरवर दिसणार सौख्य हे दूरून दिसणाऱ्या डोंगराएवढच साजरं होतं.

मंदाचं प्रेम ती नोकरी करीत असताना शेखरशी जमलं. तो त्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने तिच्या ऑफिसमध्ये यायचा. सुरूवातीच्या हाय हॅलो नंतर ओळख वाढली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. ते दोघे प्रेमात कधी पडले त्यांचं त्यानाही कळलं नाही. शेखरशी माझा जास्त परीचय नाही. मंदाच्या बोलण्यातून, ती त्याच्याबद्दल भरभरून बोलायची तेंव्हा, संसारात पडली तेंव्हा ती जे शेखरबद्दल माझ्याशी बोलायची, शेअर करायची त्यावरून तो स्वभावाने कमांडींग होता. जे मिळवायचय त्याच्यासाठी जिवाचं रान करणारा. मनस्वी. मोठ्या जिद्दीनं त्यानं त्याचा व्यवसाय उभा केला होता. आमची मंदा त्यामानाने म्हटलं तर हळवी म्हटलं तर रागीट. पटकन राग यायचा तिला. अजूनही येतोच. एखादी गोष्ट मनाशी घट्ट धरली की धरलीच. ती काही केल्या तिच्या डोक्यातून जात नाही. ती काढणं ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही. त्यावरकड बाईसाहेबांना कुणी डॉमिनेट केलेलं चालत नाही. तिचे निर्णय ठाम असतात. बदल इतरांनी करणं हे तिला मान्य होत नाही.

काहीसे विरोधी, विसंवादी व काही अर्थाने पूरक असे स्वभाव असलेली ही जोडगोळी एकत्र, हातात हात घालून पणजीत फिरताना पाहिली की आम्हा मैत्रिणींना खूप बरं वाटायचं. प्रामाणिकपणे सांगायचं तर हेवा वाटायचा. असं नाही की दोघांची कधी प्रेमात आकंठ बुडालेले असताना भांडणं होत नसत. मतभेद हे व्हायचेच. बऱ्याचदा तोच माघार घ्यायचा. मंदा मग आम्हा मैत्रिणींना भरभरून सांगायची त्याच्याबद्दल, त्याच्या समजूतदारपणाबद्दल. कधी कधी त्याला चिडवायची, डिवचायचीसुध्दा. प्रेमात हिच तर गंमत असते, असं वरून आम्हालाच ऐकवायची.

एकदा असच त्यांचं कशावरून तरी जोरदार भांडण झालं. ती भेट संपेपर्यंत काही ते मिटलं नाही. आम्हा मैत्रिणींच्याकडे रडूबाई आली. तिच्यामते तिचं चुकल नव्हतं. तिला त्याला दुखवायचं नव्हतं, संबंध तोडणही तिला आतून छळत होतं. भांडणात असलेला आपला मुद्दा सोडवतही नव्हता. अशी विचित्र परिस्थिती झाली होती. "अगं तो रागावून गेला म्हणजे आणि आलाच नाही परत तर. मला नाही राहता येणार त्याच्याशिवाय" हे एका बाजूने तर त्यासाठी तडजोड करायलाही ती तयार नव्हती. शेवटी तोच आला. त्याने सॉरी म्हटलं. मग मंदा म्हणाली माझही जरासं चुकलच. जणू काहीच झालं नाही अशा अविर्भावात दोघंही आम्हां मैत्रिणींना टाटा करून गेले. आम्हीही आमची स्वत:ची समजूत घातली, प्रेमात हिच तर गंमत असते.....

लग्नानंतर एकमेकांवर असलेल्या प्रेमाव्यतिरिक्त भांडण हा प्रकारही सोबतीला होताच. फक्त बदलत होती ती कारणं. मंदाला एवढ्यात मूल नको होतं. त्याला हवं होतं. सुरूवातीला कमी प्रमाणात कुरबुरी सुरू झाल्या. नंतर क्रमाक्रमाने वाढत गेल्या. परिणामत: शेखरचं धंद्यावर लक्ष कमी झालं. तिथे घसरण सुरू झाली. नुकसानीचा काळ सुरू झाला. त्याची चिडचिड आणखी वाढली. घरातली भांडणं आणखी वाढली.

"मला मूल नको म्हणजे नको"
"पण का?"
"हा विषय हजारदा झालाय, माझं प्रमोशन जवळ आलय. दोन प्रोजेक्टवर काम सुरू आहे. करियरच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर मी रिस्क घेणार नाही."
"तुझ्या व्यवहारी विचारानेच सांगतोय, आपलं आजचं वय पाहता. आपण थकायच्या आधी आपलं मूल त्याच्या पायावर उभं नको का रहायला?"
"शेखर, मुलं मोठी होतातच, त्यासाठी मी करियर का बरबाद करू?"
"तुला जॉब सोडायला कोण सांगतय"
"आई होणं एवढं सोपं असतं का? मला माझ्या कामावर करियरवर कॉन्संट्रेट करायला हवं. दुर्लक्ष परवडणार नाही."

हा विषय एवढा वाढत गेला, एवढा विकोपाला गेला की एका निसटत्या क्षणी शेखरनी मंदावर हात उचलला.

"सांग ना वंदू, हा रानटी पुरुषीपणाच नाही का?" मंदाच्या बोलण्याने मी भानावर आले.

तिची समजूत कशी काढावी हेच समजेना. दोघही सुशिक्षित. त्यानं मंदाला मारावं हेच मला पटत नव्हतं. भले मग ते एक थापट का असेना, पण हात उगारणं हे नवऱ्या बायकोच्या नात्यातल्या मर्यादा सोडणारं होतं. त्याचं समर्थन करणं शक्यच नाही. त्याचबरोबर त्यासाठी संसार तुटावा असही वाटत नव्हतं.

मी तिची कशीबशी समजूत काढली. माझी समजूत काढणं मला जमेना. बऱ्याचदा आपल्याहून वेगळ्या व्यक्तिला सांगणं खूप सोप्पं असतं. स्वत:शी चाललेला वाद हा काही केल्या संपत नाही. स्वत:लाच स्वत:ची समजूत घालता येत नाही.

सभ्य सुशिक्षित मध्यमवर्गिय कुटुंबात नवऱ्याने बायकोवर हात उगारणे किंवा कष्ट करून, चार घरची धुणी भांडी करून संसार चालविणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्याने दारू पिउन तुडविणे हा प्रकार एकाच पातळीवरचा नाही का? हा सुशिक्षित म्हणून एक थापट लगावतो तो अशिक्षित, दारूडा म्हणून तुडव तुडवतो. फरक मार किती व कसा खाल्ला एवढाच उरतो. दोनहीकडे रानटीपणा तोच, असंस्कृतपणा तोच.

भांडण हे नवरा बायकोत असतच. बरेचदा तो संसाराचा पाया असतो. न पटणारा स्वभाव, आवडनिवड एकमेकांच्या विरुध्द असते. एकमेकांच्या काळजीपोटी, एक करतोय ते दुसऱ्याला चुकीचं वाटतं म्हणून होतात. संसाराला पोषक भांडण कधी विकोपाला जात नाही. हिंस्र होत नाही. वाद मग ते साहित्यातले असो, इतिहासातले असो मुद्दे संपले की गुद्यावर येतात. पतीपत्नीच्या पवित्र नात्यात ही घाण येवू देता कामा नये. मुळात एकमेकांच्या उणीवा समजून त्याठीकाणी आपण ती उणीव भरून काढणं म्हणजे संसार. समजून घेण्यातला सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. "मी" चं "आम्ही" होवूच देत नाही. भांडणात आईबाप काढताना ते "तुझे" असतात. तेच "आमचे" म्हटले की ते आईवडिल होतात. हेच प्रत्येक बाबतीत, प्रत्येक नात्यात, प्रत्येक गोष्टीत. माझं, तुझं ऐवजी ते आमचं झालं तर अनेक वाद, भांडणं मिटतील. निदान किमानपक्षी विकोपास तरी जाणार नाहीत. प्रत्येक भांडणाचा शेवट गोड झाला तर नवरा बायकोव्यतिरिक्त इतरही सहज म्हणतील, प्रेमात आणि संसारात हिच तर गंमत असते........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वंदना बर्वे,

नवर्‍याशी भांडण झाल्यावर मंदाने मैत्रीणींकडे येऊन रडारड करणं हे बालिशपणाचं वाटतं. (मानसिक) अल्पवयीन बालिकेने केलेल्या भांडणातून पुढे कट्टी होईल की गट्टी काही सांगता येत नाही.

आ.न.,
-गा.पै.

मंदाला एवढ्यात मूल नको होतं. त्याला हवं होतं. सुरूवातीला कमी प्रमाणात कुरबुरी सुरू झाल्या. नंतर क्रमाक्रमाने वाढत गेल्या.>>>

ह्यावरूनच लग्नाच्या आधी भावी नवरा-बायकोंनी हनिमूनला कुठे जाणार, बेडरूमला कोणता रंग द्यायचा, तुला कोणता रंग/ पदार्थ आवडतो, आपल्या आवडीनिवडी कश्या छान जुळतात या चर्चा करतांना पुढे मुल हवे कि नको, हवे तर कधी हवे, किती मुले हवीत, दोघांचे भविष्याचे प्लान (म्हणजे पुढे काय करायची इच्छा आहे इत्यादी), देवाधर्मावर किती विश्वास आहे, घरात सध्या स्त्रियांचे काय स्थान आहे (विशेषत: मुलाच्या), दोघांपैकी कोणासही काही शारीरिक व्यंग आहे का, कुठल्या गोष्टींची तुम्हाला अतिशय चीड/ किळस आहे (उदा. मांसाहार करणे,अन्न टाकून देणे इत्यादी) इत्यादी गोष्टींविषयीही बोलायला हरकत नाही असे वाटते.. नाही का??

प्रत्येक गोष्टीत. माझं, तुझं ऐवजी ते आमचं झालं तर अनेक वाद, भांडणं मिटतील.>>

जेव्हा दोघांमध्ये मतभिन्नता असेल तेव्हा माघार कोणी घ्यायची किंवा दरवेळी कोणी एकानेच का घ्यायची हाही मतभिन्नतेचा किंवा वादाचाच मुद्दा असू शकतो नाही का??
(वाचा http://www.maayboli.com/node/39308)

गिफ्टः

दूसरे संस्थलोंपर बहुत जल्द या कम समयमें बहुतही ज्यादा "धागे" निकालने वालोंको "डायरियाँ" गिफ्ट की जाती है. इस उच्च प्रथा को यहाँ लाना मुझे उचित लग रहा है.

(राष्ट्रभाषाप्रेमी) इब्लिस.