रखडलेलं लिखाण

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

हे लिहायचं बरेच दिवस मनात आहे आणि या ना त्या कारणाने राहूनच जातय...
(२६ सप्टेंबर २००८)

शेवटी आज मुहूर्त सापडलेला दिसतोय!! दिसतोय म्हणण्याचं कारण, म्हण़जे आजसुद्धा लिहून संपवेनच अशी काही खात्री वाटत नाहीये. बघूयात कसं काय जमतंय - कारण, पहिली ओळ लिहून बरेच दिवस तशीच ठेवलेली - पुढे काहीच नाही!! कधी कधी लिहायचं मनात असतं, विषयही घोळत असतो डोक्यात, पण हव्या तश्या शब्दांत मांडता येईल की नाही याची खात्री वाटली नाही, की मग लिहिण्यामधली मजा निघून गेल्यासारखी वाटते. मग ठप्प! म्हणजे काही गहन विषय मांडणार नसते - तसलं काही फारसं जमतच नाही म्हणा मला, पण साधं, सोपंही नेमकं मांडायला जमलं पाहिजे की! अणि अर्थात, आळशीपणाही आहेच. असो. तर, हे दोन अनुभव प्रवासात आलेले. त्रयस्थ दृष्टीतून पाहताना, बरंच काही शिकवून गेलेले. अनुभवही काही जगावेगळे, महान वगैरे नाहीत, पण अजूनही मनात घोळतात. कधीतरी मधेच आठवतात. इथे लिहावेसे वाटले म्हणून...
(२८ सप्टेंबर २००८)

मनाजोगतं जमत नाहीये असं वाटतंय, मग लिहायलाही अळंटळं, म्हणून तारखा!! किती दिवस लागणार दळण संपायला बघूयात, हा विचार त्यामागे!! Lol Proud

तर, पुण्याच्या लोहगाव विमानतळावर थांबले होते. नेहमीसारखंच विमान दिल्लीहून उशीरा सुटलं होत, उशीरा पुण्याच्या हवाई अड्ड्यावर पोचणार होतं आणि तिथून नेहमीसारखं उशीरा सुटणारही होतं. एव्हाना आता याची सवय झालेय, थोडंस अंगवळणीच पडलय म्हणाना, आणि मला यात विमान कंपन्यांचीही शंभर टक्के चूक असेल असं वाटत नाही. अर्थात, उद्या सगळा कारभार सुधारला, तर हवंच आहे म्हणा! पण अगदी खूप शिव्या देण्याइतकंही काही नाही हेही खरंच. विमानतळावर एखादी मागची कोपर्‍यातली खुर्ची पकडून, निवांत बसून एकूणच सगळा माहौल निरखण्यात खूप गंम्मत असते. पुन्हा सोबत एखादे आवडणारे पुस्तक असले तर मग कशाला कंटाळा येतोय!!

असो. मूळ मुद्दा सोडून अवांतरच जास्त लिहितेय. uhoh.gif

तर, त्याही दिवशी अशीच बसले होते विमानतळावर विमान कधी सुटतंय याची वाट बघत. सुरक्षा तपासण्या वगैरेचे सोपस्कार संपले होते. कधी नाही ते गर्दीही नव्हती. अख्खा विमानतळच मस्त, शांत, निवांत वाटत होता. तितक्यात एक चार पाच वर्षांचं पिल्लू आपल्या आई आणि आज्जीसकट आलं. पिल्लाच्या चेहर्‍यावर प्रचंड उत्साह आणि उत्सुकता! एकदम हसरा चेहरा, इकडे तिकडे सगळीकडे भिरभिरणारी नजर. एकदम चैतन्याचा स्रोत! पेंगुळल्या, संथ अश्या त्या वातावरणात एकदम काहीशी जान आल्यासारखं झालं, पण आई आणि आज्जी एकदम परीटघडीची इस्त्री छाप!! चेहर्‍यावर आम्ही विमानातनं प्रवास करतो.. असे काहीसे भाव. माझ्या शेजारची एक खुर्ची सोडून बसले. सामान मधल्या खुर्चीवर. हे सामान वगैरे खुर्च्यांवर ठेवणारे लोक म्हणजे जरा अतिच असतात, असं माझं एकूणच निरिक्षणावरुन बनलेलं मत आहे. कधी कधी तर बसायलाही जागा नसते, आणि यांची सामानं बसायच्या जागांवर!! रेल्वे फलाटावरही हे नमुने दिसतील!! तर, मंडळी स्थानापन्न झाली.

पण, छोटुला भलताच गोडांबा होता! एकदम गट्टूकलाल!! सुरुवातीला अगदी छान्या, छान्या मुलासारखं हाताची घडी, तोंडावर बोट असं तिथल्या एका खुर्चीवर बसून झालं, पण तेह्वाही मान जितक्या अंशात फिरु शकते, तितक्या अंशात फिरवून सगळीकडंच निरिक्षण सुरुच होतं. पाचेक मिनिटांतच शहाणपणाचं ओझं पिल्लाला सांभाळणं जरा जडच व्हायला लागलं. हळूच तिरकी नजर आई आणि आज्जीकडे ठेवत खुर्चीतच चुळबुळायला सुरुवात झाली. हळूच खुर्चीतून खाली उडीपण घेऊन झाली! चेहर्‍यावर जरा तरतरीपण आली पिल्लाच्या!
(३ ऑक्टोबर २००८)

वाटलं होतं तसच झालं! काल तर लिहिलंच नाही काही.. तर, श्टोरी पुढे -

मग हळू हळू पिल्लू इकडे तिकडे बागडायला लागलं, गर्दी नसल्यामुळे बागडायला फुल टू स्कोप होता!! पण जसजसं पिल्लू खुलायला लागलं, तसतशी परीटघडीच्या इस्त्र्या नाराजीने विसकटायला लागल्या. मी मनात, आता पिल्लू ओरडा खातय वाटतं, म्हणेपर्यंत पिल्लूने ओरडा खाल्लाच!! ते एकवेळ ठीक आहे, पण इस्त्र्या एकदम इंग्लिशमधूनच सुरु!! आणि ओरडतानापण जी एक आपलेपणाची भावना असते ती काय कुठे दिसतच नव्हती!! म्हणजे पिल्लाला काय एकदम मिठीत घेऊन समजवा, असं म्हणत नाही मी, तसं करायलाही हरकत नव्हतीच खरं तर, पण हे भलतच कोरडं प्रकरण होतं, आणि ते जाम खटकलं. बरं, असाही काही भयानक उच्छाद मांडला नव्हता पिल्लानं, पण त्यातही गंम्मत म्हणजे आई, आज्जी इंग्लिशमधून शिस्त शिकवत होत्या, खरं तर त्याच्या माथी मारत होत्या, आणि पिल्लू शुद्ध मराठीमधून न थकता उत्तरं देत (उलट उत्तरं नव्हे!) त्यांच समाधान करत होतं, स्वतःची बाजू पटवून देत होतं. खूप कौतुक वाटलं मला. शेवटी इस्त्र्या थकल्या आणि गप्प बसल्या. पिल्लू परत एकदा खेळाकडे वळलं.

इतक्यात पिल्लूला एक दुसरं पिल्लू मिळालं खेळायला!! आपल्या आई बाबांबरोबर एक छोटुली गोबरुली आली होती. त्यांचंही विमान बहुधा उशीराच येणार होतं, आणि ही छोटूली एकदम सही होती, आल्या आल्या गट्टूकलालशी दोस्ती करुन इथे तिथे मस्त बागडंबागडीला सुरुवात. खूप धमाल आली त्यांची बागडंबागडी पहायला. इतके मस्त हसत होते खऴखळून! धावत होते, पडत होते, परत उठून नाचत होते! किती मनमोकळं वागत होते! मला चक्क त्या दोघांचा मनापासून हेवा वाटला. नेहमीचे उगीच अतिशय गंभीरपणे वावरणारे मोठया लोकांचे चेहरे पाहण्यापेक्षा हे खूप छान वाटत होतं. मनातल्या मनात मीही त्यांच्याबरोबर रिंगा रिंगा रोझेस... मधे भाग घेतला.

पण, मम्मीची कोरडी शिस्त जरा अतिच कोरडी असावी. तिने लगेच पिल्लूला मी आता डॅडला फोन लावून तुझी तक्रार करतेय, असे सांगितले. मला वाटले, असंच सांगतेय घाबरवायला, पण पिल्लूचा लगेच उतरलेला चेहरा, कावरीबावरी नजर आणि अगदी काकुळतीला येऊन केलेल्या "नक्को ना गं मम्मी.. " अश्या विनंत्या बघून हे खरंच आहे समजेपर्यंत मम्मी डॅडशी फोनवर बोलून अगदी गंभीर स्वरात - अर्थात इंग्लिशमधेच - तक्रार करत होती आणि डॅडने पिल्लूला फोनवर बोलावलं. खरं सांगायचं तर मलापण मम्मीचा एकदम राग आला होता!! बरं, आज्जीने तरी नातवाची जरा बाजू घ्यायची ना?? तेपण नाही!! तीपण इंग्लिश ओरडा देण्यात मग्न!! असली कसली आज्जी??? आता पलिकडून डॅड काय ओरडणार, याची धाकधूक मलाच वाटायला लागली...

"हॅलो डॅडू..." चाचरतच पिल्लू बोललं, आणि बघता बघता पिल्लाचा घाबरा, कोमेजला चेहरा परत फुलायला लागला की!! डॅडूला पिल्लू सगळ्या गंमती जमती सांगत होतं, अश्शी उडी मारली न् तश्शी उडी मारली न् धावलो मी मस्त...!! नवीन मैत्रीण मिळालीय, आणि ती आणि मी कशा उड्या मारुन ढुमाक्कन् (पिल्लूचाच शब्द! Happy ) खालीच बसतोय, मज्जाच येतेय, आपणपण करुयात असं मी आलो की, हेही सांगून झालं!! माझ्या समोरच काही पावलांवर उभं राहून या गप्पा सुरु होत्या. माझी हळूच आईकडे - नव्हे, मम्मीकडे नजर वळली, तीच परीटघडी बघून किंचित खट्टूच व्हायला झालं. आज्जीच्या डोळ्यांत पण फारसं कौतुक दिसत नव्हतं... ये बात तो बिलकुल हजम नै हुई!!

पण, डॅडू आणि पिल्लूचं एकदम गुळपीठ दिसत होतं आणि सगळ्या गप्पा मराठीतूनच चालल्या होत्या. अगदी दिलखुलासपैकी. मस्त वाटलं, अगदी याsssहू करून ओरडावसं वाटलं!!! कोणीतरी पिल्लाशी त्याच्या भाषेत बोलणारं आणि त्याच्या बरोबर ढुमाक्कन् खाली बसणारं पण आहे तर! डॅडूशी गप्पा संपवून गट्टूकलाल परत एकदा खेळात गुंगले. त्याबद्दल अजून दोन तीनदा अस्सखल इंग्लिशमधून ओरडापण खाल्ला. एवढं त्या छोट्याला डांबायची काय गरज त्यांना वाटत होती, मला काहीच कळू शकलं नाही. ज्या छोटूलीबरोबर तो सुखाने खेळत होता, तिच्याशीदेखील त्यांच वागणं बरोबर नव्हतं, ते तर जामच खटकलं, तेवढयात तिच्या आई वडिलांचं लक्ष गेलं आणि त्यांनी तिला बोलावून घेतलं. काही काही लोकांना दिलखुलास वागण्या बोलण्याचं वावडं असतं का?? इतक्या लहान मुलाच्या मनात मोठेपणाच्या इतक्या तद्दन फालतू अन् खोट्या कल्पना का भरवायच्या?? (त्यांचं आपल्या छोटूशी काय बोलणं सुरु होतं, आणि त्याला जे "समजावणं" सुरु होतं, ते मी ऐकू शकले होते, त्यावरुन हे विधान करतेय. )

तेवढ्यात माझी विमानात चढायची वेळ झाली. मनातल्या मनात छोटूला बेस्ट लक दिलं, मनात आलं, ह्याची हसरी वृत्ती कधीच नाहीशी होऊ नये... मला त्याच्याशी हातही मिळवायचा होता, पण मनातली उर्मी मनातच ठेवली, न जाणो त्याच्या मम्मी, आज्जीला आवडलं नाही तर, म्हणून.... छोटू कसा असेल, असं मनात येतंच कधी कधी अजूनही.

आणि बरोब्बर याउलट दुसरा अनुभव. बंगलोरच्या विमानतळावर बसले होते. अर्धा पाऊण तास वेळ काढायचा होता. एक आई आपल्या लेकीला घेऊन आली. तीन चार वर्षांची भावली एकदम चुणचुणीत होती!! माझ्या समोरच्या खुर्च्यांवर दोघी बसल्या. भावलीही इकडे तिकडे धावत होती. आईचं बरोबर लक्ष होतं, पण भावलीला मनसोक्त बागडायलाही आडकाठी केलेली दिसली नाही. उलट, आईही मुलीबरोबर हसत होती, बसल्या जागेवरुनच लेकीशी संवाद साधत होती, बघायलाही इतकं लोभसवाणं वाटत होतं! खेळून खेळून भावली दमली आणि आईच्या कुशीत शिरुन, तिच्या खांद्यावर मान ठेवून दोन मिनिटांत मस्तपैकी झोपून गेली. ज्याप्रकारे त्या आईने तिला कुशीत धरली होती, तिच्या केसांवरुन इतक्या मायेने हात फिरवत होती... तिची ती लेकीबद्दलची माया, आत्मियता अगदी माझ्यापर्यंत पोचली! एकदम एक उबदार भावना मनात उभी राहिली. ते दृश्य मनात साठवत, खूप समाधानानं मी विमानात चढायच्या रांगेत उभी राहिले. माझ्या त्या दिवसाची सुरुवात ह्या मायलेकींमुळे अगदी मस्त झाली होती!

अनुभव अगदी साधेच आहेत, त्यातून उपदेशपरही मला काही सांगायचं वगैरे नाही किंवा आपापल्या मुलांशी कोणी कसं वागावं ह्यासंबंधीही टीकाटिप्पणी करायची नाही! एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी ते अनुभव जसे घेतले, तेह्वा माझ्या मनात आलेल्या विचारांसकट, ते तुम्हां सर्वांना सांगावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच, बाकी काही नाही! बरेच दिवसांपासून हे लिहायचं राहून गेलं होतं, खरं तर, लिहू की नको, असं लिहिणं बरोबर आहे की नाही, ह्याची स्वतःच्या मनाशी खात्री होत नव्हती. आज संपलं लिहून.
(६ ऑक्टोबर २००८)

विषय: 
प्रकार: 

छान!
विमानतळावर त्या मोठ्यांचे त्रस्त चेहरे बघण्यापेक्षा ह्या लहान मुलांचे चेहरेच किंवा त्याना इथे तिथे पळताना,त्यांच्या चेहर्‍यावरील हाव भाव बघायला ज्यास्त मजा येते. specially आपण सुद्धा कंटाळून आधीच उशीर झालेल्या flights ची वाट पहात असतो.

माझा सुद्धा हा फेव टाइमपास आहे विमानतळावर. कोणी ना कोणी छोटूकली असतातच आजू बाजूला. आणि काय काय पिल्ले इतकी cute n smart असतात ना.. की विमानाला उशीर झालाय हेच विसरायला होते.
असेच एकदा खरोखर्(हा जोक नाहीये) एका छोटीकलीने उत्तर दीले, बहुधा तीन-चार वर्षाची असेल.. कुठल्या विमानतळावर नक्की आठवत नाही.. whats your mother toungue? असा मी प्रश्ण विचारला? गम्मत म्हणून.

दोन मिनीटेच गोंधळल्यासारखे बघून लगेच तीने तिच्या आईकडे बोट दाखवून म्हटले thats is my mother and this is my toungue(स्वताची जीभ बाहेर काढत दाखवत. ) Happy
Innocence kills really!

छान लिहिलंयस. Happy
तुझा अनुभव वाचून एकदम अमोल गुप्ते आणि त्याचा मुलगा आठवला.

आयटे छान लिहिलयंस.. Happy
पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा..

डॅडू Happy
आवडल लिखाण, मजा असते या वाट पाहण्यात पण Happy

आयटे,
छान खरडलयस. न रखडता वाचल.

माझ्या लेकीने सांताकॄझच्या एअरपोर्टवर जोरात ' मम्मा , लूक व्हॉट मच्छरसिंग इज डुइंग! ' असं म्हटलं होतं. खुर्च्यांच्या खाली घुसून काहीतरी कचरा उचलणारा धाकटा अन सगळ्यांना ऐकू जाइल एवढ्या आवाजात बोलणारी थोरली दोघे माझ्याबरोबर नाहीतच असा अनुभव करता यायला हवा होता त्या दिवशी Sad

आयटी, मस्तंच लिहिलय.

इस्त्री केलेल्या आई-आज्जी सारखेच काही बघे पण असतातच इस्त्री केलेले. त्यांना कोणाची लहानगी बागडायला लागली की त्रास होतो.

छान वर्णन...मलाही असे अनुभव आलेले आहेत...!

मस्त. ते इंग्रजीतून बोलणे वगैरे वाचून असे वाटले की विमानातून चालल्यामुळे उगाचच काही तरी उच्चभ्रूपणा दाखवायचा प्रकार असावा. निदान काय प्रतिक्रिया होते ते पाहण्यासाठी त्या मुलाशी हात मिळवणे वगैरे करायला हवे होतेस. पण कदाचित त्या लहान मुलाने उगाचच बोलणी खाल्ली असती Happy

आपल्याकडे पूर्वी रेल्वेत फर्स्ट क्लास मधून किंवा विमानातून महामख्खपणे बहुतेक लोक प्रवास करत असत. पण मी मागे एक दोन वेळा बंगलोर ला गेलो तेव्हा चक्क विमानात लोक गप्पा वगैरे मारत होते!

पण वेळ काढायला विमानतळ महाबोर वाटतो मला. रेल्वे स्टेशन वर (ते ही जरा बर्‍यापैकी गाड्यांची ये जा असलेल्या) २-३ तास सहज जातात.

आयटी,
मस्त लिहीलयस. असल्या इस्त्रा सगळीकडे असतात खुपदा, त्यांच्याबरोबर प्रवास करायचा असेल तर फार बोर होते आणि गोंडस मुले असतात आजुबाजुला तेव्हा मात्र मजा येते, त्यांना खेळतांना बघतांना वेळ गेलेला कळतपण नाही.

परागकण, धन्यवाद Happy
>>thats is my mother and this is my toungue(स्वताची जीभ बाहेर काढत दाखवत. )
मनुस्विनी, Lol
दक्षिणा, समीर, चिन्नु, जिंदगीरॉक्स तुमच्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद.
श्यामली, अगदी गं Happy
कांत, न रखडता वाचलंत, म्हणून धन्यवाद! Happy आलात का मेक्सिकोमधून परत?
शोनू, कसली भन्नाट लेक आहे गं तुझी! मी तर खूप हसले असते!! Lol रडकी स्मायली का देतेस?? मज्जा गं!! Happy
अमोल, महामख्खपणे प्रवास! Proud हो, अशाच महामख्ख होत्या त्या इस्त्र्या!!! Proud एकदम चपखल बसणारा शब्दय!
रुनी, खरंय. आता तुझ्या रंगीबेरंगीवर कधी देतेस वाचायला?? Happy
शिंडीबाय, याsssबयाssss!!! तुला आवाडालं का काय?? कित्ती गार वाटलं जीवाला न् काय!! येत र्‍हा गं!

आयटी.... खुपच सुंदर लिहिले आहेस...
आपण मोठे स्वतः आपले बालपण विसरून जातो अणि आपल्या मुलांकडुन ही तशीच अपेक्षा करतो...
मुलाना मुलांसारखे जगु द्यावे... फुलु द्यावे.. मोठे झाल्यावर मोठ्यांसारखे (ईस्त्री) वागायचे आहेच की. नाही का?

आयटे, झक्कास लिहिलयस.
मलातरी वाटतं की आपल्या आत आत एक मूल दडलेलच असतं. वावरु द्यावं त्याला इथं-तिथं.
आवश्यकता असते तेव्हा मोठ्यांसारखा सखोल वगैरे काय म्हणतात तो विचार बिचार करून वागायला हरकत नाही... पण कायम कान देऊन बुडित बजेट ऐकल्यासारखं चेहरा केलेली माणसं बघितली की वाईट वाटतं.... एव्हढ्याचसाठी की.... अरेरे मोठी झाली की ही माणसं... त्यांच्या स्वतःलाच न झेपण्याइतकी Sad

छान लिहिलयस.
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

अश्या २०-२२ वर्षाच्या पुरूष इस्त्र्या पण असतात हं. नुकतंच शिक्षण संपवून कामाला लागलेल्या असतात. आणि त्यामुळे त्यांना एकदम जबाबदार वाटत असतं.
अश्यांचं नावंच मी 'जबाबदार' ठेवलेलं आहे. एक कॅटॅगरीच 'जबाबदार' ही!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

खुप छान आयटे ! Happy
बच्चाकंपनीकी जय हो !!!
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

आयटी,

छान अनुभव आणि तो चांगल्याप्रकारे शब्दबद्ध केलायस. मस्तच.
फक्त एकच गोष्ट मला खटकली. जरी लिहायला, लिखाण पुर्ण करायला अनेक दिवस लागले असले, तरी ते मधे मधे लिहीले नसते तरी चालले असते. लिखाणाचा किंवा वाचनाचा जो एक flow असतो, तो खुंटतो त्यामुळे.

=== I m not miles away ... but just a mail away ===

नितीन, दाद आभार.
अज्जुक्का, खी.. Proud
योग्या, मीनू, sas, मिहीर धन्यवाद. मिहीर, पुढच्या वेळेस लक्षात ठेवते. सूचनेबद्दल धन्यवाद Happy

खूप मस्त!
मला असे छान अनुभव सिन्नर-नाशिक बसप्रवासातही रोज यायचे.
कॉलेजमधून दमून निघालो तरी अशी गोडुली पिल्लं बघून छान फ्रेश वाटायचं.कधी कधी तर आम्ही त्यांना उचलून वगैरे घेऊन खेळायचोसुद्धा!
..प्रज्ञा

उत्तम! मलाही असं निरीक्षण करायची सवय आहे पण लक्षात ठेऊन लिहायला जमत नाही.

वा! फार च छान! Happy

God made Man and tailor made Gentleman! Wink

एकदम अप्रतिम उतरवला आहेस अनुभव.. आणि ते मधले मधले "ढुम्माकन" वगैरे शब्द तर खुपच आवडले.
खुप उशिरा रिप्लाय देतेय....
---------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......