बराकभाऊंच्या सत्कार समारंभाचे आमंत्रण

Submitted by धनश्री on 8 November, 2012 - 13:39

मंडळी, कालपास्न थोबाडबुकावर हा फोटू लयीच फिरतोय. इतका जबरदस्त फोटु तयार करनारा कलाकार कोन हाये कुनास ठावं?? पन आमी म्हनलं चला आपन पन करुन टाकू एक भव्य, दिव्य, जंगी सत्कार सोहळा!!! ही त्याची दवंडी.

ते आले, ते लढले, ते जिकले... जिकले...जिकले (हा एको आहे मंडळी.)
आमचे बराकभाऊ विलेक्शन जिकले
त्यानी घातली फार्वडची आरोळी
बगा त्या रोम्न्याची बसलीया दातखिळी
आता एकच आवाज, एकच श्वास... एकच श्वास... एकच श्वास (पुन्हा तेच, एको हो.)
बराकभाऊंनी घेतलाय देशशेवेचा ध्यास (---- चुकून "शेवेचा घास" असं वाचल्यास येणार्‍या दिवाळीवर ब्लेम करावे. Happy )

आमचं कारभारी मोट्टी स्वारी, सार्‍यांची त्येन्ला चिंता लई भारी - माणणीय सौभाग्यवती मिशेलआक्का आणि बाबा तुमचा आशिर्वाद - मलियाताई, साशादिदि आणि बो भाऊ!!!

यांचा सत्कार समारंभ करण्याचा जंगी पोग्राम आज वाशिंगटनात आयोजित करणेत आला आहे तरी आपण उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाडवावी.
आपले नम्र,
जोबाबा बायडन, वल्लारीबाई जानट, बिल्लुजी क्विंटन, हिलरीताई क्विंटन, आणि समस्त डेमोकडा परिवार.
(इथे या सार्‍यांचे नाम लावलेले, डोईवरन पदर वगैरे घेतलेले फोटो आहेत असं समजायचं.) Happy

तळटीपः वेळ मिळेल तसे सत्कार समारंभाचे वर्णन करायचा विचार आहे. पण ऑफिसचे काम, दिवाळीची तयारी इ. इ. कारणं फार मोठी आहेत. Happy तेव्हा वाचकांपैकी कुणाला काही स्फुरत असेल तर चला, या, लिहून टाका.
-------------------------------------------------------

मंडळी, तुमच्या प्रतिसादांनी खरंच खूप बरं वाटलं. आणि काल रात्री बसून एकटाकी हे लिहून काढलं. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादातून सत्कार समारंभात अनेक गोष्टींची भर पडली. तुमचे मनापासून आभार. रमेश भिडे यांचे विशेष आभार. त्यांच्या भाषणामुळे हा लेख चांगला झाला असे वाटते. Happy
-------------------------------------------------------

आज सकाळपास्नच वाशिंगटन लयीच सजून धजून बसलंय. पंचायतीकडनं सत्काराची जंगी तयारी केलीया. गावाबाह्येरच्या माळावर ह्यो मोट्टा मांडव घातलाय. त्येला निळी कमाण, निळ्या झालरी लावल्यात. गावात सगळीकडं गुड्या, तोरनं, पताका लावल्याती. मांडवासमोर शेनसडा घालून आमची पिंटी रांगोळी काडत बसलीया. त्या रांगोळीत फारवर्ड असं जोरात लिही असं तिला बजावून सांगिटलय. "ए पिंट्ये, आटप तुज, त्ये सायेब येतील बघ आता." ढोल, ताशे वाजवनारी मंडळी कधीची यून बसलीत. त्येंच्या ढोलावर पन फारवर्ड लिहून ठिवलय. राती मडोनाबाई एल्लेकर यांच्या लावनीचा कार्यक्रम ठिवला हाये. गावचे सरपंच, सगळे माणणीय सदस्य आपआपल्या घरी नटाय सजायला लागलीयेत. त्या वल्लारीबाई अन हिलरीबाई ४-४ तास काय करायल्येत द्येव जाने!! गावची सगळी मानसं पन आंघुळीपांघुळी करून सनावानी नटल्याती. ती शेजारची कमळी काय उगी नाक वर करून भाव खायली कुनास ठाऊक!! घटका, दोन घटका राहल्यात सायेब यायाला. तवा त्ये पाटलांचा देवड्या युवकपरमुख हाये न. आज त्यो नवीन कापडं घालून झाक दिस्तोय. त्यानं आता पोट्ट्यासोट्ट्यांना गोळा करून मिरवनुकीला न्येल हाये.

एकदम बारकुदादाची तुतारी झाली. आले, आले, आमचे लाडके सायेब आले. गावच्या वेशीवर ५ सवाशिनींनी त्येंच्या पायावर पानी घातलं. भाकरतुकडा ववाळून टाकला. औक्शन करुन पेडा भरवला. पाटलांची बैलगाडी सजवून, धजवून तयार व्हतीच. मंग त्यावर सायेब बसले. खरंतर गाववाल्यांनी मिशेलआक्का आणि पोरीबाळीस्नी पन आग्रह केला, पन वज्ज्यानं बैलं खालीच बसतील म्हून शान घाबरून त्ये सर्व चालतच निगाले. हा, पन त्यो बो भाऊ मातुर ऐटीत सायबांशेजारी बसला व्हता. त्येच्या कालरला एक निळा बो पन लावला. त्येला कुकवाचा टिळा लावला. त्येंन्ला ऊन लागू नय म्हून देवड्यान छत्री धरली व्हती. आनि ह्ये मोट्टी, दिमाकदार मिरवनुक निगाली. समदी डेमोकडा मंडळी संगतीन चालली. महिला बाईंडर आघाडी त्यामागून डोईवर पदर घेऊन निगाली. ह्ये गुलालाचा थाट अन ढंगडांग, चिकडांगच्या सोबात आमची पोट्टीसोट्टी नाचाय लागली. निस्ता हैदोस. पन काय त्यो त्येंचा रुबाब. काय त्ये दिसनं, काय त्ये हसनं बया बया. फेट्यामधलं त्ये रुप, हातं, गळा कसा सोन्यारुप्यानं भरलेला. लक्षमीची अशीच किरपा राहु दे रे माज्या राजावर!! म्या तर म्हनलं त्यो विंद्रद्येव पण फिका पडलं आता. मग ती समदी मंडळी मांडवात आली. पुन्यांदा औक्शन झालं. या खेपेला मिशेलआक्कांची खनानारळानं ओटी भरली. पोरीस्नी कुकु लावून गजरा घातला. बो भाऊला पन पेडा भरवला. मांडवातल्या कट्ट्यावर लई गर्दी झाली व्हती. त्यामदीच वाट काडत सायेब खुर्चीवर जाऊण बसले.

मग सगळा सोहळा झाक झाला. गावच्या साळंतल्या पोट्ट्यांनी गानं घातलं. येका तालात, येका सुरात जयघोष केला. शीरीफळ, धोतराचं पान, अन हार-तुरे झाले. त्यांच्या हारमधनं सायबांचा चेहरा कसा चिवड्यात लाडू ठेवल्यावानी दिसत होता. मंग लई भाष्नं झाली. शेवटी सायेब हुभे राह्यले. म्हनाले, "ठांकू, ठांकू, ठांकू." पुन्यांदा समदीकडं पाहून "ठांकू, ठांकू, ठांकू." पन आमचा कल्ला काई थांबिचना. मंग हात उगारला अन जोरात ब्यॅटिंग सुरु केली.
ह्ये भाषन आमचे मायबोलीकर रमेसदादा भिडेंनी लिहून दिलं व्हतं बरं का.
(रमेश भिडे | 7 November, 2012 - 10:31)
"माझ्या प्रिय बंधू भगिणींणो,

आज म्हंजी माझ्या आयुक्षातला एक लई म्हतवाचा दिवस हाय. जसा आणेक वर्सापूर्वी लांब तिकड भारतात रामान रावणाला बान मारून त्येच्याकडून विजय मिळवला तसाच विजय आज देवी यमाई कृपेन आमालाबी मिळाल्येला हाय. त्या रूमन्यान मायंदाळ परयत्न क्येला आमाला हरविन्याचा पण त्येला ठाव नाय की आमी बी लाल मातीत लंगोट लावून कुस्ती खेळल्याल पैलवान हाये. असा पट काढून दीन व्हय सुखासुखी....

बर त्ये सम्द जाऊद्या. आज मी हित तुमा समद्यानचे आभार मानायला आलेलू हाय. तुमी समद्यानी माज्यासाठी आपलेपनान वोटिंग क्येलत, काहीकाही ठिकाणी दोनदोनदा तीनतीनदा बी क्येलत त्याबद्दल मी तुमचा लई आभारी हाय. मायला, आता बगा मी तुमचा गाव कसा बदलून टाकतो. आज हितच या शुभमुहूर्तावर तुमच्या गावासाठी मी पंधरा संडास मंजूर करतोय. आजपासून या गावातला येक बी मानूस रस्त्यावर बस्नार न्हाई म्हंजे न्हाई. थांबा थांबा, इतक्यात टाळ्या नका वाजवू. अजून बाकी हाय. आज रोजी खास तुमच्यासाठी मी येक धरन बी हितल्याहित शांक्शन करतूय. गावात नदी नसली तर काय झालं? धरन पायजेल म्हंजे पायजेल. फूडल्या येळी निवडून आलो की नाय गावात नदी आणली तर नाव बदलून दीन.

बराय मंडळी आता रजा घ्येतो तुमची. असाच लोभ ठ्येवा गरिबावर. फूडच्या गावात जायचं हाय. तिथ बी लोक खोळंबलीयात......जय वाशिंगटन, जय अमरिका. ग्वाड ब्ल्येस अमरिका."

अशा टाळ्या कडाडल्या चहुअंगांनी की बास. निस्ता किलॅप, किलॅप, किलॅप. शरातून आलेल्या पेपराच्या लोकांणी खचाखचा फोटू काडले. परत ढोल-ताशे सुरु झाले. आनि समदी मंडळी फुडच्या पोग्रामसाठी निगाली. सभेनंतर गावजेवनाचा जंगी ब्येत व्हता. मांडवाच्या पल्याड्ल्या अंगाला चुली धगधगल्या व्हत्या. गव्हाची हुग्गी, वांग्याचं बरबट, भात, अन आमटी. त्यासाटी समदी गर्दी तिकडं पांगली. भरपेट जेवनानंतर मडोनाबाई आलीच. टाण, टाण, टाण करत लावनीचा पोग्राम पन लई रंगला.

म्हैनोन म्हैन्ये चाललेला हा धुमाकुळ असा पार पडला. उंद्यापास्न परत आमचा गाव हाये अन आमी हैच की.......अन गावातली हागणदारी पन!!! Happy

समाप्त.
----धनश्री केळकर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जातीयवादी शक्तींविरूद्ध पुरोगामी आघाडीने मिळवलेला हा विजय आहे. कालीफोर्नियाचे कोंकण करायचे आश्वासन पूर्ण केलेल्या व आमचे स्फुर्तिस्थान असलेल्या सौ. डाअ‍ॅनताई फाईनस्टाईन, मार्गदर्शक श्री. माईकरावजी होंडा, राष्ट्रीय नेते श्री जॉन्भाउ केरी, मा सौ हिलरीताई क्लिंटन व बाईंडर महिला आघाडी यांच्या सौजन्याने हा वरचा फ्लेक्स आज अशा रीतीने या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी फ्लेक्स सलून मधे काही लोक गंध, काही लोक दाढ्या व सर्व लोक बीयर गाल वाढवायला गेलेले आहेत. आले की त्यांचे फोटो लावूच.

आवडलं.
बराकभाऊंचा सूट बदलून पांढरा सदरा, त्यावर सोन्याची चेन, बोटात दोन चार जाडजुड अंगठ्या, डोक्यावर भगवा फेटा असा मेकोव्हर करा की .

धोतर हव होत....................सासर च धोतर .. कोंडके स्टाईल Lol

कशाला नि कसं लावायचं पोस्टर सांगा बगू. ना दाढी ना मिशा ना गॉगल. गॉगल शिवाय मजा नाही राव. आणि थोडी दाढी आणि भरघोस मिशांशिवाय मुळात गॉगलला शोभा नाही. फेटा बिटा तर नाहीच - ते एक सोडा, पण अबिनंदनाच्या पोष्टरावर चेहरा कसा घवघवीत दिसला पायजेल. आता ओबामाच्या चेहर्‍याकडे बघून 'तुमच्यासाठी कायपन!' असं पन म्हणवत नाय. कुनासाठी कायपन करायला चेहर्‍यासकट सारं कसं जोरदार पायजेलाय. म्हणून असा चेहरा पोस्टरवर शोभतच नाही हे या प्रसंगी या व्यासपीठावर आम्ही ठामपणे प्रतिपादन करू इच्छितो. असे चेहरे तुमच्याकडे नसतील तर आमच्याकडे मागा, आम्ही देतो. म्हणजे आऊटसोरसिंग का किंग का काय ते करा, पण कायतरी करा. आमचं उगवतं युवाफळीनेतृत्व लई मजबूत. योग्य त्या चेहर्‍यालाच तुम्ही निवडून दिले पायजेल अशी विनंती करून दोन शब्द संपवतो. जय माराष्ट्र.

..

Pages