"वेडाबाई"

Submitted by -शाम on 31 October, 2012 - 11:50

उरी अमृताचा पान्हा गोड गळ्यात अंगाई
देवा साऱ्यांना मिळू दे माझ्या आईवानी आई....|

वितभर पोटासाठी जायी तुडवीत रान
मोळी घेऊन यायची दरी डोंगरामधून
गंध तापल्या रानाचा तिच्या घामातून वाही.....|

दंड घातल्या साडीचा घेई नेटका पदर
लावी रुपया एवढे कुंकू गोऱ्या भाळावर
कधी सोन्यानाण्यासाठी डोळा पाणावला नाही...|

धान उसनं-पासनं अर्ध्याराती दळायची
नावं घेत लेकरांची ओवी ओवी घुमायची
घास भरवी पिलांना एक चिऊ वेडाबाई...........|

नाही कधी जुमानलं तिने दुखणं-खुपणं
घरट्याच्या सुखासाठी दिलं उधळून जिनं
सोसलेल्या दुःखापोटी बोल कडू झाला नाही.....|
.
.
.

जन्मोजन्मी तुझ्यासाठी कुस तुझीच मागेन
कुणी पुसता “कुणाचा” नाव तुझेच सांगेन
तुझ्यापोटी जन्मा आलो कुण्या जन्माची पुण्याई....|

..........................................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम शामदादा

देवा साऱ्यांना मिळू दे माझ्या आईवानी आई....>>> +११११११११११११११११११११११११११११

वितभर पोटासाठी जायी तुडवीत रान
मोळी घेऊन यायची दरी डोंगरामधून
गंध तापल्या रानाचा तिच्या घामातून वाही.....| ...................आह्ह!!!

केवळ सुपर्ब!!!! सुपर्ब!!!

गंध तापल्या रानाचा तिच्या घामातून वाही.....|

कुणी पुसता “कुणाचा” नाव तुझेच सांगेन

सोसलेल्या दुःखापोटी बोल कडू झाला नाही.....|

-- या ओळी सुंदर! खूप आवडल्या!

व्वा!

कविता आवडली.

गंध तापल्या रानाचा तिच्या घामातून वाही.....| व्वा व्वा

ह्यावरून माझा एक शेर आठवला, सहज देत आहे.....

कष्टाचा पोवाडा बिल्कुल सांगावा लागत नाही
इतक्या आवेगाने त्याची बंडी भिडते घामाला

रचना सुंदरच आहे

नाही कधी जुमानलं तिने दुखणं-खुपणं
घरट्याच्या सुखासाठी दिलं उधळून जिनं

ऐवजी
लावलं पणाला जिनं कसे वाटेल?

डोळ्यांच्या कडा पाणावल्या वाचता वाचता
>>>अगदी अगदी..

खूप छान... आत पर्यंत पोचली. Happy

वेडाबाई मिसगाईड करतय >>> +१

खूप खूप आभार दोस्तांनो !

कुठलीही अवांतर चिरगुटं न चघळता दिलेल्या प्रतिसादांबद्दल खूप खूप अभिनंदन!!!

ज्यांच्या शंका आहेत त्यांना उत्तरंही माहीत आहेतच त्यामुळे मी काही बोलणे गरजेचे वाटत नाही,
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार!

खूप जिवाजवळची कविता..
कशी अशी असते ही आई ? का इतके कर्मदरिद्री असतो आपण की सर्व समजूनही तिला गृहितच धरत राहतो ती असेपर्यंत? ती संपल्यावर सारं संपणार आहे हे माहीत असूनही..?
शब्द ऋण तरी फेडलेत .

ही ही निवडक १० मध्ये.

तुझे लिखाण वाचण्यासाठी मी येतो आणि तू न्याय देतोस सदा
लेखणी थांबवु नकोस.
शुभेच्छा तुला Happy

Pages