"स्त्रीत्व"

Submitted by जाह्नवीके on 30 October, 2012 - 06:22

नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का? .......
तुम्ही म्हणाल आज हे काय नवीनच??
पण जेव्हा अनेक उभी राहिलेली, कोलमडलेली घर दिसतात आजूबाजूला.....पुन्हा जगायला शिकलेली माणसं भेटतात, तेव्हा मला माझ्या आईचं एक वाक्य आठवतं...."घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत......."

मला वाटतं काळ कितीही बदलला, पुढारला, तरीही हे सत्य बदलायचं नाही..ज्या वयात मी आईचं हे वाक्य ऐकलं, ते वय म्हणजे माझ्या डोक्यात स्त्री स्वातंत्र्याच वारं असण्याचं होतं.....त्यामुळे अर्थातच मी त्याकडे फारसं लक्ष दिलंच नव्हतं.....शाळेतून कॉलेजात जाताना कुठे भान असतं या असल्या गोष्टींचं? पण तरीही आईच्या या वाक्याने मनात प्रश्न मात्र नकीच निर्माण झाले.....की का बाईनच प्रत्येक जबाबदारी घ्यायची? त्याच्या यशाचं श्रेय तिला एकटीला नाही तर मग अपयशाचं खापर का तिच्याच डोक्यावर?? वगैरे वगैरे......
पण हळूहळू जसजसा विचारांचा व्याप वाढत गेला, भोवतालची माणसं निरखायची, बघायची सवय लागली, तसं आईच्या म्हणण्याचा विचार करायला लागले..प्रत्येक घरातली आई, आजी, बायको, सून या "निर्णायक" भूमिकांमध्ये असणाऱ्या स्त्रियांचं कुटुंबातल स्थान किती मोलाचं आहे? आणि त्यांच्यावरच्या जबाबदारया ही किती मोठया..त्या त्या वेळी जर ते निर्णय कसे घ्यावे याची अंगभूत समज किंवा कुणाची तरी मदत घेउन योग्य ते निर्णय घेण्याचं भान त्या स्त्रीला नसेल तर परिस्थिती मोठी बिकट येउ शकते. बऱ्याचदा या निर्णयाच्या सोंगट्या उधळल्या जातात ते एकाच गोष्टीमुळे....प्रत्येकाला एकाच बाजूचं नाणं हवं असतं.. दोन्हीकडून हक्काचाच छापा असलेलं...पण कर्तव्याचे काटे?? त्याचं काय??

माझं असं अजिबात म्हणणं नाही की सगळं बायकांनीच बघितलं पाहिजे पण आपल्या "पितृप्रधान" संस्कृतीत सुद्धा वर्षानुवर्षे "घर सावरायची" जबाबदारी स्त्रियांवरच का आहे? ती कदाचित त्यांच्या अंगी नैसर्गिकपणे असलेल्या गुणांमुळे...ते गुण म्हणजे भावना आणि व्यवहार यांची योग्य वेळेला योग्य ती सांगड घालण्याचे .....कुठलेच एका टोकाला जाउन घेतलेले निर्णय चुकायची शक्यताच जास्त.....आणि या सगळ्याचा स्त्रीच्या लोकार्थाने सुशिक्षित असण्याशी काहीही संबंध नसतो हे माझं मत.......कारण मी अनेकदा कमी शिकलेल्या बायकांनाही व्यवहारीपणे वागताना बघितलंय....आपल्या जवळपासच अशी अनेक उदाहरणं असतात.......

माझी एक शाळेतली मैत्रीण आहे........शाळेत असेपर्यंत मला माहीतच नव्हतं की तिची आर्थिक परिस्थिती काय असावी.....कारण शाळेत बरोबर असत असू तेवढंच...कधी तिच्या घरी जायचा संबंध आला नाही..घरही जवळच असली तरी तिचं घर आलं की ती वळून जात असे....आणि उद्या भेटू अशी खूण करून मी माझ्या रस्त्यानी पुढे.......पण शाळा संपली, कॉलेजही संपलं.....एकदा ऑफिसला जात असताना तिची आई मला रस्त्यात भेटली.....मला त्यांना बघून थोडंसं आश्चर्य आणि खूपसा धका बसला..कारण त्यांचे कपडे काही चांगल्या घरातल्या बाईचे म्हणता येतील असे नव्हते......कुतूहलापोटी मी एके दिवशी त्या मैत्रिणीच्या घरी गेले...तिला न सांगताच.....आणि मी बघतच राहिले......फक्त १० बाय १० ची एक खोली...तिथेच कम्प्युटर, कपाट, एक कॉट असं "घराचं इंटिरियर" होतं...... आज मला समजलं की तिची आई जवळच्याच एका ऑफिस मध्ये केरवारे करते.....तिचे बाबा दारू प्यायचे त्यामुळे त्यांचीही अशीच छोटीशी का होईना पण नोकरी गेलेली होती. ती स्वतः पुण्याच्या एका नामवंत कॉलेज मध्ये कमर्शियल आर्ट्स करत होती आणि तिचा भाऊही अ‍ॅनिमेशन चा छोटासा कोर्स करत होता.....त्याची फी?? त्याच इन्स्टिट्युशन मध्ये ऑफिस बॉय ची नोकरी करून!!!! हे सगळच माझ्या अपेक्षेच्या बाहेरच होतं.....कारण आपल्या एका मैत्रिणीची आई म्हणजे बॅन्केत, एखाद्या खाजगी ऑफिसात, स्वतःचाच छोटा उद्योग किंवा डोक्यावरून पाणी गृहिणी.... एवढीच मी कल्पना करू शकत होते........
मला आत्ता तिच्या आईचा "खमकेपण" जाणवलं......एवढी अवघड परिस्थिती असूनही बाईच्या चेहऱ्यावर सतत हास्य........!!! आत्ता कुठे मला माझ्या आईच्या बोलण्याचा अर्थ उमगत होता....थोडासा.....

याच उलट आणखी एक परिचयातल कुटुंब..........ज्यातल्या आईने आपल्या मुलांना अभ्यास केलाच पाहिजे.....तो वेळेवरच झाला पाहिजे.........किमान इतकं शिक्षण झालंच पाहिजे.....या नियमात बांधलं नाही.....वारा वाहील तशी त्या मुलांची आयुष्य वाहत गेली......पुढे मुलांची लग्नही झाली पण दोन्ही सुनाच घराची जवळपास सगळी आर्थिक जबाबदारी घेत होत्या......"नोकरी करणाऱ्याच सुना हव्यात" या हक्काच्या मागची बाजू मात्र सासुबाईना दिवसेंदिवस नकोशी व्हायला लागली.....कारण त्यात लादलेलं किंवा सक्तीचं अवलंबित्व होतं.....माझी मुलं ठेवतील तसं मी राहीन असं म्हणत म्हणत या सासूबाई सुनेने घेतलेल्या २ बी एच के फ्लॅट मध्ये कधी राहायला आल्या, हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही..........आणि मग फक्त धुसफूस.......अर्थात स्वतःशी....हे का झालं?...... कारण कधीच "आई तुझं हे चुकतंय" हे मुलांनी सांगितलं नाही आणि नवरयानेही नाही ...यातूनच "मी करते तेच बरोबर" किंवा "आम्ही नाही का संसार केले?" हे वाढीला लागलं......हो ना......केलेच .......पण कसे केले?

ज्या वृक्षाच्या आधाराने छोट्या झाडांनी तग धरायचा ती झाडच वृक्षाचा आधार झाली.....आधार देणं महत्त्वाच आहेच पण तो अशा प्रकारे द्यायला लागावा हे वाईट आहे.
मला वाटतं, एक स्त्री..........तिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो?
म्हणून वाटलं की "नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का?" का त्याबरोबरच स्वतःचं असं "बाईत्व" भिनलं पाहिजे?
तसं जर होईल, तरच त्या भिनण्यालाही नशेची धुंदी न येता गाढेपणाची उंची येईल.....आदर न मागता मिळेल आणि उतारवयातलं अवलंबित्व सुद्धा उपभोगता येईल......भोगावं लागणार नाही....

हे झाले आपले माझे विचार.....माझं वय आणि अनुभव अगदीच थोडा आहे...पण हे मनातले काही प्रश्न आहेत.......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाह्नवीताइ,
इब्लिस हे स्पेसिफिकली पुरुष नांव आहे. गूगलून बघा. तिथे मुलीचे नांव इब्लिस कसे, हे समजून घ्यायला आवडेल.

घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत....<<<

आमच्या मित्रवर्तुळातील एका कुटुंबाची दोन वर्षापूर्वी झालेली अवस्था पाहून हे वाक्य असे म्हणावेसे वाटते.

घरातली बाई नुसती बाईसारखी वागली तरी घर रुळावर राहतं

बेफिकीर,

मला खमकी म्हणजे बाईसारखी खंबीर असं वाटतं. खंबीरपणा हा स्त्रीपुरुष दोघांचाही गुण आहे. स्त्रीकडून स्त्रीसारखा व्यक्त होतो तर पुरुषाकडून पुरुषी आवृत्ती व्यक्त होते.

आ.न.,
-गा.पै.

जान्हवी

पुरुषाचा जन्म तुलनेने सुखाचा आहे हे मान्य करूयात. निसर्गाने मादीकडे जबाबदा-या टाकल्याने पूर्वी कधीकाळी कामाची विभागणी अशी झाली असावी कि बाहेरची जड, कष्टाची आणि धोक्याची कामे पुरुषाने करावीत आणि त्यांच्या बाळाचा स्वभाव स्त्री ने करावा. अश्मयुगापर्यंत त्यात काही चूक नसणार. पण माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म बनवले आणि त्याच्या नियमांमधे तो फसत गेला. त्यातून ज्या काही चुका झाल्या त्याचं भरून न येणारं नुकसान म्हणजे आजची पुरुषप्रधान मानसिकता आणि श्रेष्ठत्व / कनिष्ठत्वाच्या रुजलेल्या कल्पना.

यातून बाहेर पडणं मात्र स्त्रीच्या हातात आहे. आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार करणं हे निसर्गतःच तिला सहजशक्य असल्याने बदल दिसून येताहेत. अर्थात जिथे बाईपर्यंतच बदल पोहोचलेला नाही तिथे वाट पहावी लागेल.

>> यातून बाहेर पडणं मात्र स्त्रीच्या हातात आहे. आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार करणं हे निसर्गतःच तिला सहजशक्य असल्याने बदल दिसून येताहेत. अर्थात जिथे बाईपर्यंतच बदल पोहोचलेला नाही तिथे वाट पहावी लागेल.
>>> +१

ह्याला म्हणतात सोशल कंडीशनिंग जे बदलण्यात आपण सहभागी होऊ शकतो.

जाह्नवीताइ,
इब्लिस हे स्पेसिफिकली पुरुष नांव आहे. गूगलून बघा. तिथे मुलीचे नांव इब्लिस कसे, हे समजून घ्यायला आवडेल.>>>>>>>>>>>>>>>>>>>>

ईब्लिस हे मुलीचंच नाव असल्याचे काही धागे आंतरजालावर मिळाले...
त्याबद्दल ची अधिक माहिती----------ईब्लिस हे सर लान्सलॉट्/लॅन्सलॉट (ब्रिटीश राजा आर्थर च्या अत्यंत विश्वासू माणसांपैकी एक) च्या बायकोचे नाव आहे.
पण आफ्रिकन नावांमध्ये काही ठिकाणी ते मुलाचे नाव असल्याचीही नोंद दिसून येते...पण त्याच्या अर्थाची माहिती म्हणावी अशी उपलब्ध नाही.
पण कुराण मधे "एव्हील" म्हणून ईब्लिस या शब्दाचा उल्लेख आहे....

IBLIS: The Jinn who disobeyed Allah Ta’ala and was expelled from His mercy. It was Iblis who tempted Adam and his wife Hawwa (Eve), peace be on them, to approach the forbidden tree. He is also known as Shaitan (Satan). See Shaitan. See Holy Qur’an, Al-Baqara (2):130, 135. Surah 19 of the Holy Qur’an. (लिंक)

परमेश्वर तो आहे की ती? असा एक वाद आहे. तसा आता सैतान तो की ती, हा नवा वाद निघणारे का? Wink

(लै इच्चार करून आयडी बनवलेला) इब्लिस

Pages