"स्त्रीत्व"

Submitted by जाह्नवीके on 30 October, 2012 - 06:22

नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का? .......
तुम्ही म्हणाल आज हे काय नवीनच??
पण जेव्हा अनेक उभी राहिलेली, कोलमडलेली घर दिसतात आजूबाजूला.....पुन्हा जगायला शिकलेली माणसं भेटतात, तेव्हा मला माझ्या आईचं एक वाक्य आठवतं...."घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत......."

मला वाटतं काळ कितीही बदलला, पुढारला, तरीही हे सत्य बदलायचं नाही..ज्या वयात मी आईचं हे वाक्य ऐकलं, ते वय म्हणजे माझ्या डोक्यात स्त्री स्वातंत्र्याच वारं असण्याचं होतं.....त्यामुळे अर्थातच मी त्याकडे फारसं लक्ष दिलंच नव्हतं.....शाळेतून कॉलेजात जाताना कुठे भान असतं या असल्या गोष्टींचं? पण तरीही आईच्या या वाक्याने मनात प्रश्न मात्र नकीच निर्माण झाले.....की का बाईनच प्रत्येक जबाबदारी घ्यायची? त्याच्या यशाचं श्रेय तिला एकटीला नाही तर मग अपयशाचं खापर का तिच्याच डोक्यावर?? वगैरे वगैरे......
पण हळूहळू जसजसा विचारांचा व्याप वाढत गेला, भोवतालची माणसं निरखायची, बघायची सवय लागली, तसं आईच्या म्हणण्याचा विचार करायला लागले..प्रत्येक घरातली आई, आजी, बायको, सून या "निर्णायक" भूमिकांमध्ये असणाऱ्या स्त्रियांचं कुटुंबातल स्थान किती मोलाचं आहे? आणि त्यांच्यावरच्या जबाबदारया ही किती मोठया..त्या त्या वेळी जर ते निर्णय कसे घ्यावे याची अंगभूत समज किंवा कुणाची तरी मदत घेउन योग्य ते निर्णय घेण्याचं भान त्या स्त्रीला नसेल तर परिस्थिती मोठी बिकट येउ शकते. बऱ्याचदा या निर्णयाच्या सोंगट्या उधळल्या जातात ते एकाच गोष्टीमुळे....प्रत्येकाला एकाच बाजूचं नाणं हवं असतं.. दोन्हीकडून हक्काचाच छापा असलेलं...पण कर्तव्याचे काटे?? त्याचं काय??

माझं असं अजिबात म्हणणं नाही की सगळं बायकांनीच बघितलं पाहिजे पण आपल्या "पितृप्रधान" संस्कृतीत सुद्धा वर्षानुवर्षे "घर सावरायची" जबाबदारी स्त्रियांवरच का आहे? ती कदाचित त्यांच्या अंगी नैसर्गिकपणे असलेल्या गुणांमुळे...ते गुण म्हणजे भावना आणि व्यवहार यांची योग्य वेळेला योग्य ती सांगड घालण्याचे .....कुठलेच एका टोकाला जाउन घेतलेले निर्णय चुकायची शक्यताच जास्त.....आणि या सगळ्याचा स्त्रीच्या लोकार्थाने सुशिक्षित असण्याशी काहीही संबंध नसतो हे माझं मत.......कारण मी अनेकदा कमी शिकलेल्या बायकांनाही व्यवहारीपणे वागताना बघितलंय....आपल्या जवळपासच अशी अनेक उदाहरणं असतात.......

माझी एक शाळेतली मैत्रीण आहे........शाळेत असेपर्यंत मला माहीतच नव्हतं की तिची आर्थिक परिस्थिती काय असावी.....कारण शाळेत बरोबर असत असू तेवढंच...कधी तिच्या घरी जायचा संबंध आला नाही..घरही जवळच असली तरी तिचं घर आलं की ती वळून जात असे....आणि उद्या भेटू अशी खूण करून मी माझ्या रस्त्यानी पुढे.......पण शाळा संपली, कॉलेजही संपलं.....एकदा ऑफिसला जात असताना तिची आई मला रस्त्यात भेटली.....मला त्यांना बघून थोडंसं आश्चर्य आणि खूपसा धका बसला..कारण त्यांचे कपडे काही चांगल्या घरातल्या बाईचे म्हणता येतील असे नव्हते......कुतूहलापोटी मी एके दिवशी त्या मैत्रिणीच्या घरी गेले...तिला न सांगताच.....आणि मी बघतच राहिले......फक्त १० बाय १० ची एक खोली...तिथेच कम्प्युटर, कपाट, एक कॉट असं "घराचं इंटिरियर" होतं...... आज मला समजलं की तिची आई जवळच्याच एका ऑफिस मध्ये केरवारे करते.....तिचे बाबा दारू प्यायचे त्यामुळे त्यांचीही अशीच छोटीशी का होईना पण नोकरी गेलेली होती. ती स्वतः पुण्याच्या एका नामवंत कॉलेज मध्ये कमर्शियल आर्ट्स करत होती आणि तिचा भाऊही अ‍ॅनिमेशन चा छोटासा कोर्स करत होता.....त्याची फी?? त्याच इन्स्टिट्युशन मध्ये ऑफिस बॉय ची नोकरी करून!!!! हे सगळच माझ्या अपेक्षेच्या बाहेरच होतं.....कारण आपल्या एका मैत्रिणीची आई म्हणजे बॅन्केत, एखाद्या खाजगी ऑफिसात, स्वतःचाच छोटा उद्योग किंवा डोक्यावरून पाणी गृहिणी.... एवढीच मी कल्पना करू शकत होते........
मला आत्ता तिच्या आईचा "खमकेपण" जाणवलं......एवढी अवघड परिस्थिती असूनही बाईच्या चेहऱ्यावर सतत हास्य........!!! आत्ता कुठे मला माझ्या आईच्या बोलण्याचा अर्थ उमगत होता....थोडासा.....

याच उलट आणखी एक परिचयातल कुटुंब..........ज्यातल्या आईने आपल्या मुलांना अभ्यास केलाच पाहिजे.....तो वेळेवरच झाला पाहिजे.........किमान इतकं शिक्षण झालंच पाहिजे.....या नियमात बांधलं नाही.....वारा वाहील तशी त्या मुलांची आयुष्य वाहत गेली......पुढे मुलांची लग्नही झाली पण दोन्ही सुनाच घराची जवळपास सगळी आर्थिक जबाबदारी घेत होत्या......"नोकरी करणाऱ्याच सुना हव्यात" या हक्काच्या मागची बाजू मात्र सासुबाईना दिवसेंदिवस नकोशी व्हायला लागली.....कारण त्यात लादलेलं किंवा सक्तीचं अवलंबित्व होतं.....माझी मुलं ठेवतील तसं मी राहीन असं म्हणत म्हणत या सासूबाई सुनेने घेतलेल्या २ बी एच के फ्लॅट मध्ये कधी राहायला आल्या, हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही..........आणि मग फक्त धुसफूस.......अर्थात स्वतःशी....हे का झालं?...... कारण कधीच "आई तुझं हे चुकतंय" हे मुलांनी सांगितलं नाही आणि नवरयानेही नाही ...यातूनच "मी करते तेच बरोबर" किंवा "आम्ही नाही का संसार केले?" हे वाढीला लागलं......हो ना......केलेच .......पण कसे केले?

ज्या वृक्षाच्या आधाराने छोट्या झाडांनी तग धरायचा ती झाडच वृक्षाचा आधार झाली.....आधार देणं महत्त्वाच आहेच पण तो अशा प्रकारे द्यायला लागावा हे वाईट आहे.
मला वाटतं, एक स्त्री..........तिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो?
म्हणून वाटलं की "नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का?" का त्याबरोबरच स्वतःचं असं "बाईत्व" भिनलं पाहिजे?
तसं जर होईल, तरच त्या भिनण्यालाही नशेची धुंदी न येता गाढेपणाची उंची येईल.....आदर न मागता मिळेल आणि उतारवयातलं अवलंबित्व सुद्धा उपभोगता येईल......भोगावं लागणार नाही....

हे झाले आपले माझे विचार.....माझं वय आणि अनुभव अगदीच थोडा आहे...पण हे मनातले काही प्रश्न आहेत.......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे प्रकार थोड्या फार प्रमाणात सर्वत्र आहेत. काही ठीकाणी तर याही उलट स्थिती आहे. तीथे स्त्री ईतर कामे बघते वा पुरुष घरकामात मदत करतो.
आताच्या परिस्थीतीत मात्र दोघेही आपल्या परीने एकमास सहाय्य करीत आहेत.
ज्या घरात व्यसनी पुरुष आहे त्या घराचे चित्र मात्र अजुनही विदारक आहे.

जाह्नवी, स्त्रीत्व, पुरूषत्त्व जाऊन एक समर्थ, जबाबदार व्यक्तिमत्व असावं बघ.
कित्येक पुरूष पत्नी निर्वतल्यानंतर मुलाना आई बाबा दोघाम्चे प्रेम देताना पाहिलेय.
कित्येक पुरुषाना अपंग आजारी पत्निची सेवा करत एकट्याने घराचा भार उचलून मुलाना योग्य मार्गाला लावताना पाहिलेय.
जबाबदारी , मग ती घराची असो कामाची वा मुलांची , योग्य तर्हेने पार पाडणे यात स्त्री - पुरूष असा भेद नसावा.

मला हा लेख लिहिण्यामागे हेच अपेक्षित होत की माझ्या मनातले प्रश्न सोडवले जावेत....ते इथे होईल नक्कीच!!

हे झाले आपले माझे विचार.....माझं वय आणि अनुभव अगदीच थोडा आहे...पण हे मनातले काही प्रश्न आहेत.......>>> जाह्नवी, तुझ्या विचारांना चालना द्यायला अजून थोडे प्रश्न देऊ का?

माझं असं अजिबात म्हणणं नाही की सगळं बायकांनीच बघितलं पाहिजे पण आपल्या "पितृप्रधान" संस्कृतीत सुद्धा वर्षानुवर्षे "घर सावरायची" जबाबदारी स्त्रियांवरच का आहे?>> घर सावरायची जबाबदारीमधे स्त्रीकडे कुठलीही निर्णयक्षमता नसायची. नुसती जबाबदारी होती, हक्क कसलेच नव्हते. त्यामुळे त्या जबाबदारीचे कितीही गोडवे गायले तरी उपयोग शून्य.

तिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो?
मुलांच्या घडण्या-बिघडण्यामागे एकट्या स्त्रीलाच का बरे जबाबदार धरावे? ज्या घरामधे मुलं बिघडतात त्यामधे आईचीच चूक असते का?

दुसरा म्हणजे तू स्त्रीत्वाबद्दल लिहिते आहेस पण पूर्ण लेख मातृत्वावरती आहे. स्त्री ही आई असण्यापलिकडे अजून बरंच काही आहे हेदेखील लक्षात घे.

>> जाह्नवी, स्त्रीत्व, पुरूषत्त्व जाऊन एक समर्थ, जबाबदार व्यक्तिमत्व असावं बघ.
+ १
>> "पितृप्रधान" संस्कृतीत सुद्धा वर्षानुवर्षे "घर सावरायची" जबाबदारी स्त्रियांवरच का आहे?
माझ्या मते हे जुनं झालं... division of labor वगैरे... मलातरी सध्याच्या कुटुंबांमधे (३०-३५ वयाचे नवराबायको) समान सहभाग आढळतो, मोठ्या आर्थिक निर्णयांपासून मुलांच्या संगोपनापर्यंत.

कदाचित "घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत......." या गोष्टीचे अ‍ॅड्व्हर्स परिणाम माझ्या खूप जवळच्या परिघात आहेत...त्यामुळे माझ्या डोक्यात हेच विचार आपोआप तयार झालेत....पण ते एकान्गी असतील तर मी प्रयत्नपूर्वक बदलले पाहिजेत......

धन्यवाद म्रुदुला, नन्दिनी, साती..... Happy

कदाचित "घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत......." या गोष्टीचे अ‍ॅड्व्हर्स परिणाम माझ्या खूप जवळच्या परिघात आहेत>> याला उलट करून बघ. "अख्खं घर रूळावर राहण्यासाठी बाईने खमकं रहायला हवं." थोडक्यात तिने त्या घराला वाहून घेतलेलं असावं. म्हणजे ती बाई जगते त्या घरासाठी. तिला वेगळं स्वतंत्र अस्तित्व नाहीच. त्याच घरातल्या पुरूषाला मात्र मनमानीपणा करता येऊ शकतो. पण बाईला ते स्वातंत्र्य नाही. का? तर "घर" रूळावर रहावं म्हणून.
घर एकट्या बाईच्या जीवावर तर बनत नाही ना? संसार दोघांचाही असतो. मग??? दोघांनीही खमकं रहायला हवं. तर घर रूळावर राहील आणि पुढच्या स्टेशनला पोचेल Proud

माझे प्रश्न सुट्लेत ......... Happy
खूप अनुभवी आणि वयानेही मोठी मन्डळी आहेत इथे म्हणून म्हटल जरा उपदेश आणि सल्ले मिळतील......पण कट्ट्यावर टोमणे सुध्धा मिळालेत.......धागा सम्पवला तरीही चालेल........ Proud

घर सावरण्याची इच्छा आणि तेवढी ताकद बाईतच जास्त असते, हेच जास्त दिसते.
आई व्यसनी असेल अशी उदाहरणे फारच थोडी पण आईचे अकाली निधन झाले असेल तरी एकट्या बाबांना घर सावरणे जड जाते. अनेकदा मग मुलगीच, अकाली मोठी होऊन, हातभार लावते.

जान्हवी, इथे लिहिणार नव्हतोच, कट्ट्याचं नाव आलं म्हणून लिहावं लागलं. यात "टोमणे" कुठे आहेत ते सांगू शकाल ?

धन्यवाद दिनेशदा,

मला वाटल की मला आलेले अनुभव फक्त मलाच आलेत की काय?

ताईंना संयुक्ताचा रस्ता दाखवा. >>>>>>>>> हा धागा सन्युक्तात मुद्दामच टाकला नाही कारण फक्त बायकान्नी वाचावा अस वाटल नाही.....

स्त्रीत्व, पुरुषत्व, स्त्री च्याच वाट्याला अमुक - तमुक इ. वळणांवरून गाडी नेहेमीच्याच स्टेशन्स ला लागणार हे नक्की. जान्हवी ला असल्या जुन्या चर्चांची लिंक्स देऊया का? Happy
पुन्हा पुन्हा तेच तेच दळण नको!

"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत... पण त्याचे काही वाईट परिणाम तिच्या नवर्‍यावरही होतात.......... कधितरी संसाराचं ओझ वाहणार्‍याचं हमालाचं रुप त्याला येऊ शकत....... मला वाटतं, घर दोघाचंही असतं... मग एकट्याने खमकेपणा घेऊन काय उपयोग.......

>>तिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो?

जाह्नवी, एकांगी अश्या अर्थाने म्हटले की वरच्या वाक्यात आल्याप्रमाणे, स्त्रीने आयुष्यात मुले _घडवणे_ हे महत्त्वाचे काम मानायला हवे असे गृहीतक जाणवले. यात समाविष्ट झालेली गृहीतके म्हणजे स्त्रीने मुले होऊ देणे हे महत्त्वाचे आहे. तिनेच संगोपनही करायला हवे. तिच्याकडे अशी जादूई शक्ती आहे की ती आपल्या मुलांना घडू/ बिघडू देऊ शकते. वगैरे. संगोपन/ पालकत्व हा मनुष्य असण्याचा केवळ एक पैलू आहे. संपूर्णत्व नाही.

बाकी, दुसरे म्हणजे असे मुलांना _घडवता_ येत असेल असे वाटत नाही. नाहीतर एकाच घरातली भावंडे इतक्या विविध स्वभावाची निपजली नसती.

<<नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का? .......>>

देवाकडून म्हणा किंवा निसर्गाकडून, स्त्रीत्व व अजून काहिही मिळालं तरी तेव्हढच पुरेसं नसतं. जे मिळालय ते जोपासाव लागतं आणि त्या अनुषंगाने स्वतःला घडवावं लागतं.

<<"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत.......">>

हज्जारदा अनुमोदन ह्या वाक्याला.

<< की का बाईनच प्रत्येक जबाबदारी घ्यायची? त्याच्या यशाचं श्रेय तिला एकटीला नाही तर मग अपयशाचं खापर का तिच्याच डोक्यावर?? वगैरे वगैरे......>>

पूर्वीच्या काळात घर सांभाळायची जबाबदारी एकट्या स्त्रीचीच समजली जायची त्यामुळे घर एकत्र बांधून ठेवायच, चालवायचं श्रेय मात्र स्त्रीलाच दिलं जायचं.

<< पण कर्तव्याचे काटे?? त्याचं काय??>>
स्वतः बघितलेली आणि अनुभवलेली उदाहरणं लक्षात घेता, घरच्या कर्त्या स्त्रीचा शब्द मोडणं पुष्कळदा कर्त्या पुरुषालाही कठीण जात असे.

<<ते गुण म्हणजे भावना आणि व्यवहार यांची योग्य वेळेला योग्य ती सांगड घालण्याचे .....कुठलेच एका टोकाला जाउन घेतलेले निर्णय चुकायची शक्यताच जास्त.....आणि या सगळ्याचा स्त्रीच्या लोकार्थाने सुशिक्षित असण्याशी काहीही संबंध नसतो हे माझं मत.......कारण मी अनेकदा कमी शिकलेल्या बायकांनाही व्यवहारीपणे वागताना बघितलंय....>>

संपूर्ण नव्हे पण बर्‍याच अंशी सहमत. डीसीजन मेकिंग ही प्रोसिजर भावना विचारात घेत नाही. दूरदर्शी फायदा हा एकमेव उद्देश असणारा निर्णय व्यावहारीकदृष्ट्या अचूक होय. पण इथे एलिमेन्ट येतो तो भावनांचा. अर्थात ईमोशन कोशन्ट ("EQ") चा. Happy आणि त्याबाबतीत बायकांना तोड नाहीच. व्यवहारीपणा बहुत्येक सोसलेल्या हालअपेष्टांतून येत असावा.

<<शाळेत असेपर्यंत मला माहीतच नव्हतं की तिची आर्थिक परिस्थिती काय असावी>>

ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत असं स्त्री ठरवते त्यांच्याबाबतीत ती मौन पाळू शकते, अगदी अनंत काळापर्यंत.

<< एक स्त्री..........तिने फक्त आपली मुलं नीट घडवली किंवा नाही घडवली तर परिणामांमध्ये किती फरक पडू शकतो? >>

जमीन अस्मानाचा. आपल्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणार्‍या व्यक्ती या आपल्या सर्वात जवळच्या व्यक्ती असू शकतात. म्हणजे मला म्हणायचय की जवळच्या व्यक्ती आपल्या आयुष्यावर सर्वाधिक आणि लॉन्ग लास्टींग (कदाचित एव्हर लास्टिंगही) परीणाम करु शकतात. उदाहरणादाखल कोणत्याही यशस्वी माणसाचं चरीत्र वाचा.

<< म्हणून वाटलं की "नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का?" का त्याबरोबरच स्वतःचं असं "बाईत्व" भिनलं पाहिजे? >>

जस आधी म्हंटलय तसं. नशिबाने, गुणसुत्रांमुळे, उत्क्रांतीच्या प्रक्रियेने आणि आनुवांशिकतेने आपण बर्‍याच गोष्टी कमावतो. त्यांचा वापर करुन घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्या माहिती असायला हव्यात. जर आपल्याला आपल्या स्ट्रेन्ग्थ्ज माहिती नसतील तर आपण त्या वापरु कश्या शकू ?

पण मला खरं तर जाणून घ्यायला आवडेल की नक्की स्त्रीत्व म्हणजे काय अभिप्रेत आहे? बाह्य शरीरापेक्षाही ही मानसिकता जास्त आहे. त्या दिवशी पुपुवर आगावाने टाकलेली टेस्ट घेउन पहाच. नैसर्गिकरीत्या स्त्रीला ज्या गिफ्टस् मिळाल्यात त्यांचा यथायोग्य वापर करणं, ते स्किलसेटस् डेव्हलप करणं आणि त्यात आपल्याकडे जे नाहीये ते कसं डेव्हलप करता येईल ते पहाणं हे दोघांनाही लागू पडतं ना ?

सृजनाची शक्ती, भावनांचा वापर करण्याची क्षमता, चिकाटी, सहनशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, आपली चूक कबूल करण्याची सवय हे मला जाणवलेले काही.

आता माझ्या कट्ट्यावरच्या कॉमेन्टबद्दल. अर्थात मॅनमेड अमेन्डमेन्डस् विषयी. ते वाक्य व त्यातला विनोद समजण्यासाठी थोडे.

कंपनीची बॅन्कॉकमधली टूर. टिफनी शोमधून बाहेर पडलो. बर्‍याच जणांनी त्या शोमधल्या "टू पीस"मधल्या स्त्रीयांबरोबर पैसे देउन फोटो काढून घेतले. बसमध्ये बसल्यावर आमची टूर गाईड म्हणाली "गमतीची गोष्ट म्हणजे या शोमध्ये एकही बाई नव्हती" Proud (टिफनी शो हा ट्रान्स जेन्डर्सचा डान्स शो प्रसिद्ध आहे) सगळ्या फोटोवाल्यांचे चेहरे खरेखुरे फोटो काढण्यासारखे झाले होते. मात्र हे ट्रान्स जेन्डर्स ही मानवी कौशल्याची कमाल होती

आमची गाईड ही आमच्या ग्रुपची चांगली मैत्रीण झाली होती. देशाच्या आर्थिक व राजकीय परिस्थीती पासून
ते सांस्कृतिक प्रश्नांपर्यंत कसलही उत्तर देउ शकणारी ती 'मुलगी' आमच्याएव्हढ्या मुलाची आई होती Happy टूरीस्टच्या चेहर्‍याकडे बघून तो कसली चौकशी करणार आहे हे ओळखणार्‍या तीला आंमचे प्रश्न मात्र ओळखता आले नव्हते.

तीच्याशी गपा मारत असताना आम्ही एक प्रश्न तीला विचारला. "जर एव्हढ्या जवळून स्त्री व पुरुषातला फरक ओळखता येत नसेल तर नक्की ओळखायचं कसं ?" ह्यावर तीच उत्तर अगदी मनापासूनचं होतं "नैसर्गिक स्त्री ही आकारात कुठेतरी ईम्परफेक्ट असतेच. ट्रान्सजेन्डर्स मात्र निसर्गनिर्मित नसल्याने अगदी पर्फेक्ट शेपमध्ये असतात"....

मला वाटतं या नैसर्गिक अपूर्णतेतच माणासाच्या प्रगतीच्या धडपडीच मूळ असावं नाही ?

धन्यवाद बागुलबुवा.....
प्रत्येक मुद्दा विचार करण्याजोगाच आहे.

म्रुदुला....तुम्ही वर जी मत मान्डलीत, तीच थोड्या फार फरकाने मलाही वाटत होती परन्तु त्यात आत्तापर्यन्त आलेल्या अनुभवान्मुळे गोन्धळ होता. म्हणूनच माझ्याशी पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या माणसानकडून ही मत पारखून घ्यायचा विचार या लेखामागे होता. Happy

जाह्नवीके +१ <"घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत......."> - म्हणजे अवघड प्रसंगातून गृह्स्वामिनी मार्ग काढते; नाहीतर नशिबाचे भोग म्हणून भोगत रहाते. यावाक्यामधून स्त्रियांनी खंबीर रहावे, प्रसंगी घरातील पुरुषाला वेसण घालावी असे सूचित आहे असे वाटते.

बागुलबुवा +१ - उत्तम मुद्दे.

नंदिनी | 30 October, 2012 - 17:04 नवीन
कदाचित "घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत......." या गोष्टीचे अ‍ॅड्व्हर्स परिणाम माझ्या खूप जवळच्या परिघात आहेत>> याला उलट करून बघ. "अख्खं घर रूळावर राहण्यासाठी बाईने खमकं रहायला हवं." थोडक्यात तिने त्या घराला वाहून घेतलेलं असावं. म्हणजे ती बाई जगते त्या घरासाठी. तिला वेगळं स्वतंत्र अस्तित्व नाहीच. त्याच घरातल्या पुरूषाला मात्र मनमानीपणा करता येऊ शकतो. पण बाईला ते स्वातंत्र्य नाही. का? तर "घर" रूळावर रहावं म्हणून.
घर एकट्या बाईच्या जीवावर तर बनत नाही ना? संसार दोघांचाही असतो. मग??? दोघांनीही खमकं रहायला हवं. तर घर रूळावर राहील आणि पुढच्या स्टेशनला पोचेल

माफ करा, मी थोडा असहमत आहे तुमच्याशी.
वर ठळक केलेला भाग जो आहे, त्यात मला थोडी अडचण वाटते आहे. नंदीनीजी, अहो, बाई खमकी असेल तर त्या पुरुषाला मनमानी करता येत नाही. याने रंगढंग सुरू केले की ती दुर्गावतार धारण करते. सबब, नवरे ठिकाणावर रहातात. हिने ढील दिली की त्यांचा पतंग उडतो मग. (जगातले ९९% पुरुष बाताखामा असतात अन उरलेले १% खोटे बोलतात, असा आमच्या एका मित्राचा सिद्धान्त आहे.)

दोघे खमके असलेत, तर वकील श्रीमंत होतात, अन पोटगी द्यावी लागते Wink

(खमक्या बाताखामा) इब्लिस

***

बागुलबुवा,

तीच्याशी गपा मारत असताना आम्ही एक प्रश्न तीला विचारला. "जर एव्हढ्या जवळून स्त्री व पुरुषातला फरक ओळखता येत नसेल तर नक्की ओळखायचं कसं ?" ह्यावर तीच उत्तर अगदी मनापासूनचं होतं "नैसर्गिक स्त्री ही आकारात कुठेतरी ईम्परफेक्ट असतेच. ट्रान्सजेन्डर्स मात्र निसर्गनिर्मित असल्याने अगदी पर्फेक्ट शेपमध्ये असतात"....

ते 'नसल्याने' हवंय का?

रच्याकने, 'बाटगा मुसलमान जास्त कांदे खातो' अशी जुनी म्हण आहे, त्यानुसारच हे टीजी/सीडीज जरा जास्तच मेकप, कपडे, विभ्रम, इ. किंबहुना टिपिकल (कामातुर) 'पुरुषाला' जशी टिपिकल 'स्त्री' अभिप्रेत असते, तसे वागतात. किमाण अशा शोज मधे, असे माझे निरिक्षण आहे. (प्रॉस्टिट्यूशन तिथे लिगल आहे, अन टीजींचे प्रमाण त्यात भरपूर आहे.)

(निरिक्षक) इब्लिस

***
अरे हो!
ते राहिलंच.
छाण ललित लेखण. पुलेशु @ धागाकर्ती Lol

धन्यवाद ईब्लिस...... Happy

अवांतर-----
इथे अंगोलात माझ्या नवर्‍याच्या ऑफिसात मेन बॉस ची सेक्रेटरी आहे....तिचं नाव ईब्लिस आहे..... Proud

जान्हवी, अग आपली मतं आपल्या आजूबाजूच्या समाजाकडे बघून होतात. आपल्या विशिष्ठ वर्गाबाहेर महिलासक्षमीकरण असू शकते.

पण आपल्या पीढीसाठी काही गोष्टी करण्यासारख्या -
१. लिंगसापेक्ष अपेक्षा आणि परिमाणे न ठेवणे.
२. कोणत्याही व्यक्तीच्या कुठच्याही निर्णयाला तो/ ती आणि समाज ह्या चौकटीत न तोलणे.

आणि अमा किंवा निम्बी तुला डिवचत नाहीयेत तर जाणीव करून देत आहेत की आधी माबोवरचे बरेच वाच आणि तरीही प्रश्ण पडले तर नक्की विचार.

मला पुरुषाचा जन्म घेतला याची नेहमी खंत वाटते ते स्त्रीला मिळालेल्या मातृत्वाच्या वरदानाकडे पाहून...

उद्या मी माझ्या अपत्याला कितीही प्रेम दिले तरी...... माझा त्याच्यावर माझ्या बायकोएवढाच समसमान हक्क असला तरी..... त्याची नाळ त्याच्या आईशीच म्हणजे माझ्या बायकोशीच जोडलेली असणार.... ते तिच्याशीच जवळीक साधून असणार....

शेवटी राहतो तो एकच प्रश्न - उद्या मी जेव्हा रात्री दुकानाला टाळे मारून घरी परत येईन तेव्हा या दमलेल्या बाबाची कहाणी ऐकायला माझी मुलगी जागी असेल का? Sad

- अविवाहीत अंड्या

Pages