रात्रीचं जेवण

Submitted by मुंगेरीलाल on 22 October, 2012 - 13:43

“बरं, ऐक न मी काय म्हणते”

“का....य? सांग ना”

“सकाळच्या चार पोळ्या आहेत, एक भाकरी शिल्लक आहे”

“बरं मग?”

“आईचा उपास आहे आणि बाबांचं पोट बरोबर नाही”

“अरे वा. छान छान”

“छान छान काय, लक्ष कुठंय तुझं?”

“अगं ऐकतोय ना? आता काय रंगीबेरंगी दिवे लागायला पाहिजेत का माझ्या कपाळावर बस-स्टँडवरच्या वजन यंत्रासारखे?”

“.........”

“ठीक आहे, सॉ......री. बोल, नक्की काय म्हणायचंय तुला?”

“२ मुठीचा भात टाकू की ब्रेड आणतोस कोपऱ्यावरून?”

“भाताला ब्रेड पर्याय कसा होऊ शकतो? कुस्करून खायचाय का सगळ्यांनी वरणात?”

“वरण वाटीभरच आहे, भाजीही थोडीशीच आहे”

“चालेल तेव्हढी मला”

“ते देऊन टाकलं मी बाईला दुपारीच. तू सकाळीच नावं ठेवली होतीस भाजीला”

(मग मघाशी वाटीभर आहे म्हणाली होतीस ते?....)

(जसं काही तूपण कधीच थाप मारत नाहीस....)

“मग कसा खाणार भाताबरोबर ब्रेड? सॉरी, कशाबरोबर खाणार ब्रेड?”

“मिसळ करू? तुला लागेल ना तेव्हढी भूक?”

“१ तासानी मला किती भूक लागेल ते आत्ता कसं सांगू मी?”

“बाहेर जाऊ या का?”

“बाहेर? मी आत्ताच जीवघेण्या ट्राफिक मधून आलोय, अंग आंबलय माझं”

“ठीक आहे, पिठलंच टाकते”

“थांब, मला जरा सुचू दे. जाऊ कुठंतरी जवळ”

“बदलू मी कपडे?”

“अन त्या चार पोळ्याचं काय?”

“उद्या फोडणीची पोळी”

“आणि ती एकुलती एक भाकरी?”

“मी खाईन, मला भाकरी शिळीच आवडते”

“आणि आईचा उपास?”

“त्या स्ट्रोबेरी-शेक पिते म्हणाल्या”

“बाबांचं पोट बिघडलंय ना पण... त्याचं”

“त्यांनी गोळी घेतलीये संध्याकाळीच”

“म्हणजे आधीच ठरलंय तुमचं सगळं”

“नाही तर नको, सांग भाजी काय करू? एक ढोबळी मिरची आहे, अर्धा दुध्या...”

“ठीक आहे, चला बाहेर”

“चला :-)”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>एक ढोबळी मिरची आहे, अर्धा दुध्या>> Lol नवरा हुशार आहे. त्याला समोर काय येणार ह्याची कल्पना वेळीच आली.
आमच्याकडे संभाषणात दुसर्या पार्टिचा सहभाग नसल्याने फतवा मलाच काढावा लागतो. मुलं असली हाताशी की बरं असतं Proud

बरंय तुमच्याकडे.
आमच्यात' हे ' यायच्या आतच त्या चपात्या भाकरी हळकून ठेउन त्यांचा मुरी नावाचा एक भयानक पदार्थ झाला असता, तो लांबून बघूनच मी उपास डिक्लेअर केला असता.
मुलाने मॅगी खाल्ली असती:)
असता म्हणजे हल्ली आमच्याकडे हे असंच होतं. Happy
इतरांच्या उपासाने नी पोट बिघडण्याने माझे वजन छान आटोक्यात यायला लागलंय.
शिळासप्तमी साजरी करून ह्यांचं वजन वाढू लागलंय.

एक अहिराणी एसेमेस टाईप केल्याशिवाय रहावत नाही इथे Wink

नवरा: खावाले काय बनाडस?
बायको: तुम्ही सांगशात ते!
नवरा: खिचडी बनाड.
बायको: रातनी अजून पडेल शे.
नवरा: मंग बट्टं बनाड
बायको: पोरे तोंड नही लावतंस.
नवरा: बोंबिल शेत का?
बायको: सोम्मारना दिन इसडं नको.
नवरा: वरन चिखल्या बनाडस?
बायको: रात नं खातंस का काइ बी?
नवरा: नै ते मंग उडीदनी दाल बनाडस?
बायको: तुमनं पॉट गुब्बारा धरंस..
नवरा: कढी बनाडस?
बायको: दही नै शे.
नवरा: मंग काय बनाडस?????
.
.
.
.

बायको: तुम्ही सांगशात ते!

>> आमच्याकडे संभाषणात दुसर्या पार्टिचा सहभाग नसल्याने फतवा मलाच काढावा लागतो. मुलं असली हाताशी की बरं असतं>>> आमच्याकडे सुद्धा मी फतवाच काढते.

>>एक ढोबळी मिरची आहे, अर्धा दुध्या >>>> Biggrin

अशी मारामारी होतेच कधी कधी....
पोरं पिझ्झा वर भागवून घेतात.. पण तो आम्हाला नको असेल तर होतच हे....
नाहीतर तुझी सामानाची यादी बरोबरच नसते.. किंवा आधी का नाही सांगितलस येतानाच ऑफीसहून आणलं नसतं काही..असे एकमेकांना दोष देणं सुरु होतं.. Proud

Pages