ऋणानुबंधांच्या...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

फार फार वर्षांपूर्वी Accenture कृपेने राणीच्या राज्यात जाण्याचा योग आला. पहिलीच onsite खेप होती. भारतातुन ह्या project वर गेलेले मी आणि एक नितीन असे दोघेच होतो. तो दक्षिणेकडचा म्हातारा, कंटाळवाणा दिसणारा मनुष्य होता. नंतर मला कळाले की तो माझ्याच वयाचा आणि सरस विनोदबुद्धी असलेला होता/आहे. पण सुरुवातीला तरी तो काही बोलत नसे. माझी त्याची ओळख करुन दिल्यावर चेहर्‍यावर हसुही न आणता, "Nice to meet u" म्हणाला आणि वळून कामात मग्न. त्यानंतर मीच त्याला बळेच जेवायला वगैरे विचारत असे. कारण असे कुणी न/कमी बोलणारे भेटले की त्या व्यक्तीला बोलते करणे अथवा मी बोलते राहुन वातावरण जिवंत ठेवण्याची जबाबदारी मी स्वतःहुन शिरावर घेते. असो, ह्या मनुष्याची गोष्ट आरतीला सांगत असताना (मी इथे कशी एकटी आहे आणि मला कसा कंटाळा येतो असे रडताना) तीने मला मायबोली विषयी सांगितले. त्यानंतरच्याच वीकांतला माबोकरांचे एक ए वे ए ठी पण होणार होते, त्याला मी जावे असे तीने सुचवले. एका मायबोलीकराने तीला स्थळ्/काळ इ माहिती इ-पत्राने पाठवली होती. ही सगळी माहिती तिने मला पाठवली आणि माबो करांना माझ्याविषयी सांगितले.

जिथे ए वे ए ठि ठरले होते ते Hyde Park माझ्या घरापासून जवळच होते. मी शनिवारी सकाळीच त्या इ-पत्राची प्रत घेउन Hyde Park कडे निघाले. नेमकाच रस्त्यात पाउस लागला. लंडनच्या हवामानशी फारशी ओळख नसल्याने मी अर्थातच छत्री वगैरे तयारीत नव्हते. ऑक्टोबरच्या थंडीला पूरेल असे एक जॅकेट तेव्हढे होते. बस थांब्यापासुन चालत बागेच्या ठरलेल्या दारापर्यंत जाईपर्यंत मी चींब भिजले. पोचल्यावर बघितले तर कुणीच नव्हते. तिथल्या चहाच्या टपरीत चहा घेत होते तो कुठुन तरी मराठी बोलणे कानावर पडले. बघितले तर टपरीच्या मागच्या बाजुला अजुन १-२ मंडळी उभी होती- पूर्णिमा, अमित (दांडेकर) आणि अभिजीत (अभिषेक ?). त्यांना निथळताना बघुन काय आपण मुर्खासारखे छत्री न घेता निघालो असे वाटणे एकदम बंद झाले. मग ओळखी वगैरे करुन घ्यायचा कार्यक्रम सुरुच होता तो मिलिंद (आगरकर) आला. तो एकदम साहेबासारखे कपडे करुन आला होता. मग बाकी मंडळींनी, "अरे हा तर कपडे घालून आला" असे विनोद (?) केले व मला, आम्ही असेच बोलतो, मनावर घेऊ नकोस वगैरे वार्निंगा दिल्या. मग हळूहळू प्रसाद (शिरगावकर), समीर, अभिजीत, ह्रिषक्या आणि कुटुंब (अपूर्वा ?) असे जमा झाले.

त्यानंतरचे ३-४ तास कसे गेले ते कळलेच नाही. गप्पांच्या नादात Hyde Park ला २-३ चक्कर मारुन झाल्या. इतका व्यायाम केल्यावर सगळ्यांनी तिथेच एका दुकानात भरपूर हादडले. मग पूर्णिमा, प्रसाद व मिलिंदला महाराष्ट्र मंडळाच्या नाटकाच्या तालमीला जायचे असल्याने ते जायला निघाले. फारसे काही काम वा प्लॅन नसल्याने त्यांच्याबरोबर आम्ही पण सगळे. पून्हा लागलेल्या झडीने प्रसादच्या पावसावरील कविता त्याच्याच मुखे ऐकायचा योग पहिल्याच भेटीत आला Happy अभि़जीतनेही पाऊस ह्या विषयावरील कविता सादर केल्या. ही माझी मायबोलीकरांशी पहिली ओळख. परक्या भूमीत आग्रहाने मराठीतच बोलणारे, एकदम खेळीमेळीने, आपुलकीने बोलणारे मायबोलीकर मला एकदमच आवडले. दिवसभराच्या ओळखीतच त्यांनीदेखील "प्रेमाने" माझे नाव, "चाबुक" ठेवले. चाबकाचे फटके ओढल्यासारखे सटासट बोलते म्हणून Happy

मग काय घरी गेल्यावर मी maayaboli.com वर गेले आणि झोकात चाबुक नावाचा ID काढला. परंतु मराठीत लिहीणे अवघड जात होते. मग मी फक्त रोमात राहु लागले. लंडनमधील बाकी सर्व माबोकरांशी संपर्क होताच. दर शुक्रवारी सर्वजण बेकर स्ट्रीटवर ग्लोब मधे जमत. गप्पां-टप्पा, एकमेकांची खेचणे वगैरे कार्यक्रम मनसोक्त झाले की कुणा एकाच्या घरी जेवणे व राहिलेले अपेयपान (त्या पुढच्या शुक्रवारी आधी गेल्यावेळी कोण कोण कामातुन गेलेच्या चर्चा ;)). मी सहसा ग्लोबमधुनच परत येत असे कारण माझ्या घरासमोरच Victoria Coach Station होते. तिथे फार चित्र-विचीत्र लोक दिसत व मला रात्रीची एकटीने जायची फार भीती वाटे.

पूढे दिवाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. इथे महाराष्ट्र मंडळाची सुद्धा बरीच मंडळी होती. हे सगळे लोक एकदम साहेबी कपडे घालून आले होते. माझ्यासह सर्व मायबोलीकर झक्कास भारतीय कपड्यांमधे होते (प्रसादने ह्रिषक्याचा कुर्ता वेळेवर परत न करता स्वतःच घातला असल्याने तो बिचारा चहा-सदरा घालून आला होता Proud ). हा कार्यक्रमही छानच झाला. पण तिथे झालेल्या काही गोष्टी खूपच मनाला लागल्याने त्या दिवसापासून मी मायबोलीकर आणि मायबोली दोन्ही सोडले. ग्लोबला जाणे बंद केले. मिलिंदा आणि दामिट सोडले तर बाकी सर्वांशी संपर्क जवळ जवळ तोडला.

लंडनहुन वर्षभराने परत आल्यावर आरतीच्या ओळखीतुन अजून काही माबोकरांशी ओळखी झाल्या. पण दुधाने तोंड पोळले असल्याने मी ती ओळख हाय्-हॅलोच्या पूढे नेली नाही. तीला मात्र फार प्रेम होते/आहे सर्व माबोकर मित्र/मैत्रिणींचे आणि मायबोलीचे Happy ह्याच दरम्यान एकदा दिनेशदांशी ओळख झाली. मला तेव्हा मनात माबोकरांविषयी आकस असल्याने मी बाइकवर बसुनच नुसते त्यांना हाय केले आणि झुरर्र निघून गेले. त्यांनी अर्थातच मनावर घेतले नसावे Happy

पूढे लग्न झाल्यावर अमेरिकेत आल्यावर थोडेच दिवसांनी आरतीने घेतलेल्या एका मुलाखतीला प्रतिसाद द्यायचा म्हणून मी तो चाबुक आयडी पून्हा वापरायचा/जिवंत करायचा प्रयत्न केला पण त्या आयडीशी जोडलेला इ-पत्र पत्ता हरवल्यामूळे व्यर्थ Sad मग माझी मोठी बहिण मला कधी-कधी म्हणते त्या नावाने, सिंड्रेला आयडी काढला (गुन्हा कबूल- मी चाबुकचा ड्यु आयडी आहे ;)). तेव्हाच धाकट्या बहिणीने लिहिलेली गौरी देशपांडे यांच्या वरील कथा मी मायबोलीवर प्रसिद्ध केली. त्या कथेच्या प्रतिसादात एका रसिक मायबोलीकराशी झालेल्या प्रश्नोत्तरांनी फारच मनस्ताप झाला. कशाला पून्हा एकदा मायबोलीच्या भानगडीत पडले असेही वाटले. कसे असते, एखादी घटना घडते तेव्हा आपण त्यात सहसा आपलीच बाजू बघतो आणि लाउन धरतो. समोरच्याची बाजू समजुन घेणे हे जरा अवघडच. स्वतःची चूक ओळखून कबूल करणे हे तर अगदीच दुर्मिळ. त्या न्यायाने मी परत एकदा मायबोलीवर बहिष्कार टाकला. तेव्हा, ऍडमिन असे कसे चालवुन घेतात, मायबोलीवर गटबाजी चालते वगैरे वगैरे विचार मनात येणे हे ओघाने आलेच Happy

पण म्हणून गुलमोहोर वरील साहित्य थोडीच सोडता येते. वाचन तर माझा (तेव्हाचा) एकमेव छंद. त्यामूळे रोमात येणे चालूच होते. बहिणीच्या कथेला प्रतिसाद मिळाले की काय बघायला त्या पानावर पण नियमीत जात होते. बरेचदा ती कथा आणि प्रतिसाद वाचल्यावर एकदा कधीतरी वाटले उगीच इतके टाकून बोलले मी. पूढे कामात अतिशय व्यस्त असल्याने मायबोलीचा जरा विसरच पडला Sad

दरम्यान आम्ही दोघे ईशानची वाट बघत होतो. माझ्या ड्यु-डेटच्या पंधरा दिवस आधी घरी असताना मी मायबोलीवर रोमातुन पोष्टात प्रवेश केला Wink तेव्हापासनं रोमातुन पोष्टात, पोष्टातुन गुलमोहोरात, गुलमोहोरातुन सगळीकडे (पडीक) अशी वाटचाल चालु आहे. माझ्या लेखनाला आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादांनी (हुरळून जाउन) अजून लिहायचा हुरुप आलाय Happy वेगवेगळ्या बाफवर, विचारपुशीत, संपर्कात, ऑरकुटवर, ए वे ए ठि, पुस्तके/पाककृती देण्या-घेण्यात माझेही मित्र-मैत्रिणी झालेत, बरेच भले-बुरे अनुभव गाठीशी आलेत आणि आता माझी एक फार जुनी मैत्रिण म्हणते, तुला बाई फार प्रेम त्या मायबोलीचे आणि मायबोलीकरांचे. मी पण म्हणते तीला, "आहेच मुळी, जगबुडी आली की आम्हीच असणार आहोत २४ टक्क्यांमधे" Happy

विनोदाचा भाग सोडला तर मायबोलीकर नसलेल्यांना मायबोलीची महती कशी सांगावी हा जरा प्रश्नच पडतो मला. नवर्‍याला सुद्धा जरा वेळच लागला हे समजवायला की हे मराठीतले ऑर्कुट नाही, हा एक परिवार आहे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर प्रेम करणार्‍या मराठी माणसांचा. त्याला प्रश्न पडला होता, आरतीच्या बहिणीला बाळ होणार म्हणून तोत्तोचान सारखे पुस्तक GS ने का पाठवले ? एखादा असता तर पुस्तकाचे नाव सांगून गप बसला असता. (शिवाय "त्या" गावचा असल्यामूळे त्याला कोणी दोषही दिला नसता Wink ) हळुहळु येतेय लक्षात त्याच्या आणि माझ्याही Happy गेल्या वेळी बँगलोरमधे स्पोट झाले नी बातम्या वाचता वाचता मला म्हणाला, "कोई मायबोलीकर है बँगलोरमे ? सब ठीक है ना ?"

{ते जूने, लंडनमधे भेटलेले माबोकर दिसत नाहीत अजिबात माबोवर आता किंवा फक्त कवितांच्या बाफवर असतात जिथे मी सहसा जात नाही. आहात का कुणी ?}

विषय: 
प्रकार: 

>>कोई मायबोलीकर है बँगलोरमे

म्या हाय की!! Happy कधी येतासा?? Happy
मस्त!

नवराही 'दुरुन' का होईना माबोकर झाला म्हणायचा नाहीतर 'कोई मायबोलीकर है बंगलोरमें' कशाला म्हणाला असता? Wink

Happy मस्त लिहीता सिंड्रेलाताई.
परिवारच आहे हा आपला सर्वांचा.

सिंड्रेला/चाबुक,
मस्त उतरलाय तुझा मायबोलीवरचा प्रवास....

काहीतरी "जादू" आहे या मायबोलीत आणि इथल्या माणसांत Happy
आणि त्याचमुळे एखाददुसरा वाईट अनुभव नाही तोडू शकत हे नातं!

अशीच लिहित रहा Happy

प्रतिसादांबद्दल धन्यवाद Happy

नवराही 'दुरुन' का होईना माबोकर झाला म्हणायचा >>> लग्नात हाताला हात लावुन "ममं" म्हणायला शिकवले ना त्याला भटजींनी ते चांगलेच लक्षात ठेवलेय त्याने Wink

छानच लिहिलंय गं सिंडे!!!

ओळख देख नसलेल्या लोकांनी लिहिलेलं मनावर घ्यायचं नाही, शक्यतोवर कुणाच्या भानगडीत पडून दुखवायला जायचं नाही, आणि ओळख झालेल्यांनी देखिल कधी काळी कमीजास्त लिहिलं तर एका डोळ्यानं वाचून दुसर्‍या डोळ्यातून बाहेर टाकायचं अशी काही पथ्य पाळली की मायबोली सुखकर होते हे कळून चुकलंय! Happy (जाणाता अजाणाता आपल्याकडून कुणी उगाच दुखावलं गेलं तर मनापासून माफी मागणं पण कमीपणाचं वाटायला नको हे मायबोलीवर येऊन शिकायला मिळतं).

..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

<<<हे मराठीतले ऑर्कुट नाही, हा एक परिवार आहे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर प्रेम करणार्‍या मराठी माणसांचा. >>>

अगदी खरंय....

बाकि मस्त लिहिलंय... Happy

सिंड्रेला,
मस्त लिहीलंयस. एकदम मनमोकळं. खूप आवडलं Happy

एकदम मस्त..आणी खरंच जे मायबोलीकर नाहीत त्यांना मायबोली विषयी सांगणे फार कठीण जाते...मलाही बरेच अनुभव आलेत याचे... पण
हे मराठीतले ऑर्कुट नाही, हा एक परिवार आहे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर प्रेम करणार्‍या मराठी माणसांचा.

तुमचं हे एक वाक्य बरंच काही सांगुन जातं...:)

मस्त लिहीलयसं गं!!

छान लिहिले आहेस आंबटगोड अनुभव. so you were destined to ultimately become a hardcore मायबोलीकर. Happy
आता माझे फारसे येणे होत नाही, पण आपल्यापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, भागातल्या interesting लोकांना भेटायचा हा छान platform आहे. अर्थात, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणाप्रमाणे इथेही सर्व प्रकारचे लोक भेटणारच, आयडीपलिकडच्या माणसाला जाऊन कोणाला भेटायचे कोणाला नाही हेही हळूहळू लक्षात येतेच...

छान लिहिते आहेस, आता दिवाळी अंकात काहीतरी खुसखुशीत वाचायच्या प्रतिक्षेत आहे..

सिंड्रेला, छान लिहिलं आहेस... मनापासून एकदम!!

वा मस्तच लिहीले आहेस. मजा आली वाचायला. ...

खुपच छान लिहिले अहे तुम्ही.

सर्वांना खूप्-खूप धन्यवाद. मृ, GS, अगदी खरे बोललात Happy सहसा, "दिल पे मत ले यार" किंवा आपल्या माबोच्या भाषेत, दिवे घेऊन राहिलं की आपला नी बाकीच्यांचा पण वावर सुखाचा होते हे खरं Happy

आयडीपलिकडच्या माणसाला >>> हे आवडलं Happy

धाकट्या बहिणीने लिहिलेली गौरी देशपांडे यांच्या वरील कथा मी मायबोलीवर प्रसिद्ध केली.>>> लिंक मिळु शकेल का?

छानच लिहिलयस ग सिं. अग माबोमुळे इतके ऋणानुबंध जुळलेत ना कि एखाद्या गावात पहिल्यांदा जायचे असेल तर तिथे कुणी माबोकर आहे का ह्याची मी पहिली चौकशी करते. किंवा एखाद्या ठिकाणी दुरचे नातेवाईक जरी असले तरी आपल्या जवळच्या माबोकरांकडेच उतरायला संकोच वाटत नाही.

बायदवे, मिलींदा आता बँगलोरात आहे. आणि हा डॅमिट तर २००० साला पासुन माझ्यासाठी गायब आहे. पण जर कधी UK ला जायचा योग आला तर त्याचा पत्ता नक्किच काढेन Wink

सुप्रिया, कथा इथे टाकली आहे.

अमृता, धन्यवाद. अगं मी डॅमिटला पहिल्यांदा भेटले ते २००२ च्या ऑक्टो. मधे. त्यानंतर वर्षभर बरेचदा त्याला माबोवर बघितला. गेल्यावर्षी ईशान झाल्यावर त्याचा मेल आला होता. बघते शोधुन इ-पत्र पत्ता असेल माझ्याकडे. असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy मिलींदा बँगलोरात कधी पोचला ?

अग २००२ नंतर म्हणजे जुई झाल्यावर, मी देशात असताना नसायचे ग मायबोलीवर....
मिलींदा हल्लिच गेला देशात परत. गेल्या महिन्यात कळल बँगलोरला गेल्याचे. माझ्या ऑरकुटात आहे बघ तो.

अरे , हे तर मिसलं होत की Happy
छान लिहिलयस सिंड्रेला . प्रत्येकाचे अनुभव थोड्याबहूत फरकाने सेमच आहेत.
मध्यंतरी मला पण वाटत होते की इथे येउच नये , काय मिळतं आपल्याला इथे येउन वर कोणी काही वेगळी प्रतिक्रिया दिलीच तर आपण उगीच त्या गोष्टीचा विचार करत राहणार थोडा वेळ का होइना ..
आपल्याला आपआपले व्याप्,टेंशन्स काय कमी असतात का म्हणून इथे येउन अजून वाढवून घ्या ...पण नंतर काही लोकांना भेटायचा योग आला त्यातून सगळं कळात गेलं की हे येवढ काही मनावर घेण्यासारख नाही अन मग माझा विचार परत बदलला . माबो करांच्या भेटीत प्रत्येक वेळेला काही तरी नविन गोष्टी कळल्या. मी तरी या प्लॅटफॉर्म कढे बरच काही शिकवणारा एक शिक्षक ह्याच नजरेने पाहतो . बर्‍याच नविन गोष्टी कळल्या इथे येउन . चांगले वाइट निवडणे आपल्याच हातात असते ना शेवटी ! चांगले ते घ्यावे अन वाइट ते सोडून द्यावे Happy

-----------------------------------------
सह्हीच !

छान लिहिलंय. मी माबोकर झाल्यावर मला माबो म्हणजे जगभरातल्या, विशेषत: भारताबाहेरच्या मराठी भाषिकांना एक विरंगुळा आणि मराठी साहित्य वाचनाचा आनंद देणारी माबो असंच वाटलं होतं....पण जेव्हा उसगावात राहणा-या नातवाला माबोकर मावशीने अस्सल मराठी मेतकूट्,बर्फी पाठवली, गावातलीच अजून एक माबोकर मावशी लाड करायला मिळाली आणि प्रत्यक्ष एकमेकांना मदत करणं, एकत्र जमून धमाल करणं पाहिलं, मला आस्थेनी चौकशी करणा-या माबोकर भाच्च्या मिळाल्या तेव्हा माबोचं मनापासून कौतुक वाटलं.

विनोदाचा भाग सोडला तर मायबोलीकर नसलेल्यांना मायबोलीची महती कशी सांगावी हा जरा प्रश्नच पडतो मला. नवर्‍याला सुद्धा जरा वेळच लागला हे समजवायला की हे मराठीतले ऑर्कुट नाही, हा एक परिवार आहे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर प्रेम करणार्‍या मराठी माणसांचा.>>>>
हे खूप आवडले. Happy

मोठ्ठ्या संयमाने वाईट अनुभव लिहीले नाहीत याबद्दल तुमचे अभिनंदन.
तरीहि मायबोलीवर परत येऊन लिहीता, आनंद झाला.

मायबोली इतके जवळचे मला कुणि नाही.

खूप छान!
मलाही प्रश्न पडतो मायबोलीबद्दल नॉनमायबोलीकरांना काय सांगायचं असा. आणि मी लग्नाच्या आधीपासूनच माबोवर आहे, पण नवर्याला फार काही माहिती नव्हती. हल्ली हल्लीच जरा कळयला लगलं आहे त्यालाही.

सिंडी, छान लिहिलं आहेस. अगदी मनापासून Happy
सुरुवातीला मायबोलीकर होणं कठीण वाटत असेल कदाचित पण माबोकर झाल्यावर मायबोलीमय होणं फार सोपं आहे. आजकाल कुणाशीही गप्पा मारताना मायबोलीचे उल्लेख टाळताच येत नाहीत इतकी मायबोली भिनली आहे माझ्यात !
इथली वाट दाखवल्याबद्दल पूनमचे स्पेशल आभार Happy

अरे!!! हा लेख सिंड्रेला तू लिहिलायस, यावर विश्वासच बसत नाहीये.... काय गं ए शहाणे, स्वतः सासुरवास भोगून आता दुसर्‍यांवर करतेस काय गं??? Wink नाव सिंड्रेला आणि वागतेस मात्र तिच्या दुष्ट बहिणींसारखी Proud

असो, मायबोलीची झिंग, व्यसन लागते, ती आपली वाटते, तिच्यातल्या काही लोकांशी ऋणानुबंध निर्माण होतो, काहींविषयी मनात कायमचा आकस बसतो, कधी कधी इतका मनःस्ताप होतो, की मायबोली सोडून द्यावीशी वाटते, पण तिचे व्यसन लागल्याने झक मारत परत यावंसं वाटतं तिच्याकडे.... ह्या सगळ्यातून सगळेच जातात का? मायबोली आपलीशी वाटण्याचा प्रवास सुखकर कधीच आणि कुणाचाच होऊ शकणार नाही का? Uhoh

बाकी खरोखर छान लिहिलेस... हे वाचून एकच गाणं आठवलं.... "क्योंकी सास भी कभी बहू थी"....आम्हा डेली सोप फॅन्सना दुसरे काय आठवणार म्हणा???? Proud

Pages