गौरी

माझ्या धाकट्या बहिणीने लिहिलेली ही कथा या आधी हितगुजवर प्रसिद्ध केली होती. इथे पून्हा टाकते आहे.
*************************************************
एक दिवशी भर दुपारी मी स्टेशन वर उतरले. कुठुन आले होते आठवत नाही पण उतरले. धक्क्यांमधुन सावरत, ट्रेन मधुन उतरणार्‍र्या आणि चढणार्‍या गर्दीतुन कुठल्या दिशेने चालायला सुरूवात करायची आहे हे ठरवण्यासाठी आधी स्वतःला एका जागेवर उभे केले आणि मझे लक्ष एका आकर्क्षक व्यक्ती कडे गेले.

...खादीचा लांब कुडता, पांढरी पडलेली निळ्या रंगाची जीन्स, खांद्याला लटकवलेली एक पिशवी की शबनम की असेच काहीतरी लटकत होते ज्यात बरेच जास्तीचे सामान कोंबले होते. कुडत्याला बटनपट्टीपाशी एक गॉगल लटकत होता. डोक्यावरचे केस जवळ जवळ सगळे पांढरे झाले होते आणि लहानपणी घामोळ्या येऊ नयेत म्हणुन कापतात तसे बारीक कापले होते. म्हणजे नवरात्रात सहाव्या-सातव्या माळेला गहु जितपत वाढतात तेव्हढे. मला वाटते ह्या सगळ्यात आधी दिसली ती हातातली सिगरेट. गुरुदत्त स्टाईल मधे कपाळावर आठ्या घालुन झोकात सिगारेट ओढत ट्रेन ची वाट न बघता स्टेशन वर उभं असलेल ते सुंदर ध्यान मला बघत रहावसे वाटले.

मी एकटक बघत आहे हे लक्षात येउनही माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन थंडपणे उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे मी दुर्लक्ष करुन निघुन जाउच शकत नव्हते.

आमचं मन तेव्हढ्यात पचकले, "जाउन बोल तरी नाहीतर चल घरी. उगाच आपलं उन्हातान्हात, गर्दीत इथे येड्यासरखं उभं रहायचं." पण काय बोलु ? ओळख नाही, पाळख नाही. बर ज्यांच्यासमोर मी ट्रेन मधुन उतरले त्यांना विचारता पण येणार नाही, "कल्याण गेली ?". मी विचारात सतानाच पावलांनी 'ध्यानाच्या' दिशेने चालायला सुरुवात केली आणि अर्ध्या मिनीटात मी ध्यानाच्या एकदम समोर. आमच्या थोबाडाचा टाइम सेन्स एकदम भारी, ताबडतोब प्रश्न बाहेर आला, "मी तुम्हाला कुठेतरी पाहीलयं असं वाटतं आहे, नाव काय आपलं?" ध्यान उत्तरलं, "गौरी देश्पांडे". मी डोळे विस्फारुन, तोंड बंद करायचं विसरुन बघतच राहीले. बॅकग्राउंड ला बाजुने येणार्‍या जाणार्‍या ट्रेन्स ची धाडधाड धाडधाड, एकदम फ़िल्मी स्टाईल.

तेव्हढ्यात कोणीतरी ट्रेन पकडण्यासाठी धावत आले आणि मला धक्का मारुन गेले. त्या धक्क्यासरशी मी जरा शुद्धीवर आले. डोळे नेहेमीच्या आकारात आले, तोंडही बंद झाले. बघीतले तर आजुबाजुचे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. गर्दीतल्याच एक बाई माझ्याजवळ येउन म्हणाल्या, "बरं वाटत नाहीये का तुला ?" मी नकारार्थी मान हलवुन त्यांना म्हंटलं, "मी ह्यांच्याशी बोलायला थांबले आहे." ह्या वाक्यावर बाई घाबरल्यासारख्या मागे सरकुन निघुन गेल्या.

देशपांडे बाई म्हणाल्या, "चल आपण तुझ्या घरी जाता जाता बोलु. एक गोष्ट सांगते तुला." आम्ही रिक्षाने गेलो. बाईंची चालत जाण्याची तयारी होती पण मला चालणं शक्यच नव्हतं. रिक्षात त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. एक दोनदा मी फ़क्त ऐकता ऐकता हं म्हणाले तर रिक्षावाल्याने चमत्कारीक नजरेने मागे वळुन पाहीले. घर येईपर्यंत त्यांची गोष्टही संपली. बाई जरा विचीत्रच वाटल्या. घरापर्यंत आल्या आणि म्हणे, "आता वर नही येत, उशीर होईल. रात्री प्रियाकडे जेवायला जायचयं".

माझ्या डोक्यात त्यानंतर बराच वेळ फक्त मुंग्या !!!