“ पुणे ते पानिपत ” भाग ११ : पानिपत, पानिपत आणि पानिपत

Submitted by सारन्ग on 20 October, 2012 - 07:13

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408

“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : http://www.maayboli.com/node/36732

“ पुणे ते पानिपत ” भाग १० : http://www.maayboli.com/node/38586

गुरुजी, आज थेट कानात पाणी, पहिल्यांदा उठवलं नाही तुम्ही.
बाजीराव, दुसरा राउंड सुरु झालाय.
उठलो,उठलो करत मी अंगावर घेतलेले दोन रग बाजूला केले.
घ्या,घ्या अजून ४-४ रग घेऊन झोपा, मग कशाला झोपा मोडतील ,, इति गुरुजी
मी आपला गुपचूपपणे अंथरून- पांघरूणाच्या घड्या घातल्या आणि बाहेर आलो.
आता कडाक्याच्या थंडीत २-२ रग अंगावर घेऊन झोपण्यात जी मजा आहे, ते दुसऱ्याला काय कळणार.
बाहेर येऊन बघतो तर अंघोळीला कडकडीत तापवलेल पाणी होतं.
देव भलताच प्रसन्न आहे वाटतं, चक्क आज देखील अंघोळ.
तेवढ्यात गुरूजींनी नवीन बातमी सांगितली. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील कार्यक्रमाला येणार असल्याने पानिपतची बलिदान भूमी बंद करण्यात येणार असल्याचं कळलं.
आता पुढं जे होईल ते पुढंच पुढं बघू, पण सध्या पानिपत गाठू या विषयावर सर्वांच एकमत झालं आणि मोहीम पानिपतच्या दिशेने मार्गस्थ झाली. सकाळी देखील तेथील लोकांनी नाश्ता करून जाण्यासाठी खूप खूप आग्रह केला पण वेळ कमी असल्याने आम्ही नाश्ता न करताच निघालो.
अपघात झाल्यापासून मी गाडी चालवली नव्हती त्यामुळे आज मात्र मी गाडी चालवणारच असल्याचं स्वागतला सांगितलं. कारण एखाद्या गोष्टीची मनानं एखादा भीती घेतली कि ती गोष्ट करणे फार अवघड होऊन बसते आणि ती रिस्क घ्यायला मी तयार नव्हतो. २०,००० + किमी च्या वर गाडी चालवली आहे, त्यामुळे ती एखादे वेळा पडणारच त्यात वावगे असे काही नाही म्हणत परत गाडी चालवायला घेतली.

झिंझोली पासून पानिपत साधारण १२० किमी आहे. अमृतसरकडे जाताना पानिपत मध्ये घुसलं की सुनौती नावाची एक पाटी लागते.तिथून साधारण ५ किमी वर बाजारपेठ आहे. वाटेत एक दर्गा लागतो व त्या दर्ग्यापासून साधारण २ किमी वर आहे ती शहीद वीरांची भूमी अर्थात पानिपतच्या युद्धाचे स्मारकं. ते “काला आम” या नावाने ओळखले जाते. सध्या तिथे तो आंब्याच झाड आहे ते मुळचं नव्हे. हा वृक्ष १ ऑगस्ट १९९२ रोजी हरयाणाचे राज्यपाल धनिक लाल मंडल यांनी लावला. या ठिकाणी इतका मोठा रक्तपात झाला की रक्ताचे पाट वाहिले गेले आणि या झाडाला येणाऱ्या आंब्यांचा रंग बदलून लाल भडक असा दिसू लागला म्हणून या आंब्याला काला आम म्हणून ओळखले जाऊ लागले. ( असं मी ऐकलं आहे, खरं-खोट माहित नाही, जाणकारांनी प्रकाश टाकावा, हि नम्र विनंती )
११ च्या सुमारास पानिपत गाठलं. आज १४ जानेवारी २०१२. बरोबर पानिपतच्या युद्धाला २५१ वर्ष पूर्ण होत होती. पानिपत नाव जरी कुठे वाचालं तरी अंगावर सरसरून काटा उभा राहतो आणि आज तर आम्ही प्रत्यक्ष त्या युद्धभूमीवर होतो. प्रत्येकाच्या डोक्यात काय विचारचक्र सुरु होते ते ज्याचे त्यालाच माहिती. अर्थात जवळपास सर्वांच्याच मनात तेच विचार असणार.
देवीचे मंदिर :
11DSCN3507.JPG11DSCN3509.JPG
सर्वात प्रथम आम्ही देवी मंदिरात जाऊन देवीच दर्शन आणि नंतर जवळ असलेल्या मंदिरात जाऊन शंकराचं दर्शन घेतलं. येथील शिव मंदिर हे पानिपतच्या युद्धानंतर मागे राहिलेले मंगल रघुनाथ यांनी बांधल्याच सांगितलं जातं.
प्रतिभाताई येणार असल्या तरी त्यांचा कार्यक्रम दुपारी ३ च्या सुमारास होता त्यामुळे आमचा काला आम कडे जाणायचा मार्ग खुला झाला. वाटेत पोलीस बंदोबस्त होताच. पण फार काही त्रास झाला नाही. पानिपत बद्दल लिहायचं झालं तर १-२ भाग कमी पडतील. विश्वास पाटील यांनी “पानिपत” मध्ये सगळं काही मांडलच आहे, तरी देखील

पानिपतविषयी थोडेफार :
भारताच्या हरियाना राज्यातील एक शहर. दिल्लीपासून साधारण ९० किमी वर असून राष्ट्रीय महामार्ग १ वर आहे. या शहराचा इतिहास जातो तो थेट महाभारताच्या कालखंडात.ज्या वेळेस धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन करायचे ठरवले त्यावेळेस पांडवाना यमुनेचा पश्चिमेकडील भाग, हस्तिनापुर साम्राज्याच्या बदल्यात वाटणी मध्ये देण्यात आला. या भागामध्ये पांडवांनी स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर पाच शहरे वसवली.
१. पांडुप्रस्थ अथवा पानप्रस्थ – सध्याचे पानिपत
२. स्वर्णप्रस्थ – सध्याचे सोनीपत
३. इंद्रप्रस्थ – सध्याची दिल्ली
४. बागप्रस्थ – सध्याचे बागपत, येथेच अब्दालीने यमुना ओलांडण्याचे साहस दाखवले.
५. तिलप्रस्थ – सध्याचे तिलपत
प्रस्थ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ठिकाण, जागा असा होतो.

इतिहासामध्ये पानिपतला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले ते येथील निर्णायक ठरलेल्या युद्धांमुळे. जर का ही युद्धे झाली नसती अथवा या युद्धांचे निकाल वेगळे लागले असते, तर आज या भारताचा इतिहास आणि भूगोल, हो भूगोलपण पूर्णपणे वेगळा असता हे सांगण्यास कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

पानिपतचे पहिले युद्ध -
पानिपतचे पहिले युद्ध झाले ते २१ एप्रिल १५२६ रोजी. याच युद्धाने भारतात मुघल सत्तेचा पाया घातला. हे युद्ध दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि काबुलीस्तानच्या तिमुरीड साम्राज्याचा( तिमूर हा या साम्राज्याचा निर्माणकर्ता (१३३६ ते १४०५ ) ) सुलतान बाबर यांच्या मध्ये लढले गेले. युद्धाअगोदर दोन्ही सैन्य एकमेकांपुढे आठवडा उभे होते. शेवटी बाबरचा रात्री हल्ला करायचा डाव फसला आणि इब्राहीमने दुसरी दिवशी युद्ध सुरु केले. हे युद्ध बाबरने त्याच्या तोफखान्याचा अतिशय नियोजनबद्ध वापर करून जिंकले.या युद्धानंतर लोधी घराण्याचा अस्त झाला. ( १४५१ ते १५२६ ) दारूगोळा आणि तोफखान्याचा वापर करून लढलेले हे अतिशय सुरवातीच्या युद्धांपैकी एक. इब्राहिम लोधीकडे त्याचा तोफखाना नव्हता आणि तोफांच्या आवाजांची सवय नसलेले लोधीचे हत्ती, आवाज ऐकून गोंधळून गेले आणि हत्तींनी स्वतःच्याच सैन्याला चिरडले. पण उपलब्ध साधनांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की तोफखान्यापेक्षा नियोजनाचा या युद्धात बाबरला फायदा झाला. या युद्धामध्ये बाबरने “तुलुघमा” या युद्धतंत्राचा वापर केला. अरबी भाषेत “तुलुघमा” याचा अर्थ विभागने असा होतो. या युद्धतंत्रात सैन्य डाव्या, उजव्या आणि मध्य भागात विभागले जाते. हे भाग देखील नंतर पुढचा आणि मागचा अशा भागात विभागले जातात. अशा प्रकारे अल्प सैन्य वापरून प्रतिस्पर्ध्याला सर्व बाजूंनी घेरण्यात येते. मधल्या फळीतील पुढच्या भागात गाड्या असत, या एकमेकांना बांधलेल्या असून त्या जनावरांना जोडलेल्या असतं. या गाड्यांच्या मागील भागात तोफा असत, या तोफांच्या शेजारी तोफजीचे तोफेच्या उष्णतेपासून संरक्षण होण्यासठी एक चाके असलेली संरचना असते. त्यामुळे या तोफा विविध दिशेला वळवता सुद्धा येऊ शकतात. या दोन कारणांमुळे बाबरचा तोफखाना धोकादायक ठरतो. या प्रकारच्या रचनेमुळे बंदुका आणि तोफा स्वतः लक्ष्य न ठरता निवांतपणे चालवता येत असतं. जड तोफांची तोंडेदेखील या प्रकारच्या रचनेमुळे सहज वळवता येत असतं. इब्राहीम लोधी युद्धभूमीवर लढता लढता मरण पावला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला एकटे टाकून युद्धभूमीवरून पळ काढला. असे म्हणतात कि अजून एक तास इब्राहीम जिवंत राहिला असता तर विजयी झाला असता, कारण बाबरकडे राखीव दल नव्हते आणि त्याचे सैनिक वेगाने थकत चालले होते.
अर्थात जर- तर च्या गोष्टीना इतिहासात महत्व नसते.

बाबर आणि लोधीची तुलना :

मुघल साम्राज्य :
प्रमुख : बाबर – जन्म २३ फेब्रुवारी १४८३, अन्दिजन, उझबेकिस्तान येथे तर मृत्यू २६ डिसेंबर १५३० आग्रा येथे.
रथीमहारथी - चिन तुमुर खान ( सेनापती, युद्धात मधली फळी सांभाळत असे )
उस्ताद अली कुली ( तोफखान्याचा प्रमुख )
मुस्तफा रूमी ( बंदुकधारी सैन्याचा प्रमुख )
असद मलिक हस्त खान व राजा संघर अली खान – जनजुवा राजपूत वारसदार, बाबर आणि यांची पहिली भेट १५२० साली झाली नंतर हे पानिपतच्या १ ल्या युद्धात मुघल फौजेला येऊन मिळाले. पुढं खानव्याच्या लढाईमध्ये पण लढले.
सैन्य : घोडदळ – २४,०००
पायदळ – ३,०००
तोफा – २०
मृत/जखमी : ४,०००
लोधी साम्राज्य :
इब्राहीम लोधी – हा एक अफगाण होता. १५१७ ते १५२६ या कालखंडात त्याने उत्तर भारतावर राज्य केले.
राजा हसन खान मेवातपती – खान्झाडा राजपूत, खानव्याच्या लढाईमध्ये मृत्यू १५ मार्च १५२७. याच्या घराण्याने सुमारे २०० वर्षे मेवात वर राज्य केले. असे म्हणतात कि फिरुझ शहा तुघलकाने १३७६ मध्ये याच्या घराण्याला धर्म बदलण्यास भाग पाडले. नंतर याचा मुलगा नहेर खान याने मुघलांचा प्रतिनिधी या नात्याने मेवातवर राज्य केले.
सैन्य :
घोडदळ – ४०,०००
पायदळ – ३०,०००
हत्ती – १,०००
मृत/जखमी : २०,०००

पानिपतचे दुसरे युद्ध :

पानिपतचे दुसरे युद्ध हे ५ नोव्हेंबर १५५६, रोजी सम्राट हेम चंद्र विक्रमादित्त्य उर्फ हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झाले. खरे पाहता, हे युद्ध हेमू आणि अकबराचे सेनापती बैरम खान यांमध्ये झाले म्हणणे उचित ठरेल. युद्धावेळी अकबराचे वय अवघे १४ वर्षे होते.
हेमूने दिल्ली जिंकल्याच कळताच बैरम खान दिल्ली परत मिळवण्याच्या हेतूने दिल्लीवर चालून येण्यास निघाला. हेमुला याची कुणकुण अगोदरच लागली असल्याने हेमुने आपल्या सैन्यासह पानिपतच्या दिशेने कुच केली होती.
आणि ५ नोव्हेंबर १५५६ रोजी या दोन्ही सेना एकमेकांना भिडल्या. जेष्ठ इतिहासकार कीन यांच्या मतानुसार, अकबर आणि त्याचा रक्षणकर्ता बैरम खान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. अकबर बरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे असा बैरम खानचा सैन्याला आदेश होता.
हेमू स्वतः सैन्याचे नेतृत्व करत होता, हेमूच्या सैन्यात सुरवातीला १५०० हत्ती आणि तोफखाना होता. हेमू ने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ३०,००० च्या घोडदळाला घेऊन कुच केली होती. या घोडदळामध्ये राजपूत आणि अफगाणांचा भरणा होता. सैन्याचा आणि अफगाणांचा उत्साह वाढवण्यासाठी हेमूने त्यांना जहागिरी म्हणून जमिनी दिल्या होत्या आणि त्याच्या खजिन्याची द्वारे उघडली होती. अशा प्रकारे त्याने अतिशय कर्तबगार असे सैन्य एकत्र केले होते.
अकबराचे सैन्य :
नाममात्र प्रमुख : अकबर
प्रत्यक्ष प्रमुख : बैरम खान,याचा मुलगा, अब्दुल रहीम खान हा अकबराच्या दरबारातील “नऊ” रत्नांपैकी एक होता.
तिरंदाज असलेले घोडदळ प्रमुख : मोहम्मद कासिम
मुघलांच्या केंद्रस्थानी असलेल्या पायदळ, घोडदळ यांच्यामध्ये
उस्ताद अली कुली खान ( तोफखान्याचा प्रमुख ) हा पानिपतचे १ ले युद्ध लढला होता. अकबराच्या आजोबांबरोबर
हुसेन कुली खान, मोहम्मद साजिद खान पूर्वांची, शाह कुली खान महरूम, मीर मोहम्मद बरका, कासिम खान नियास्पोरी व सईद मोहम्मद बरका असे महारथी होते.
सर्वात पुढे असलेल्या सैन्यामध्ये मेहमूद खान बुडूस्की, कक्साल खान, हुसेन कुली बेग, शाह कुली बेग महराम आणि समाजी खान होता.
मुघलांची उजवी फळी सिकंदर खान उझबेग सांभाळत होता तर डावी फळी अब्दुल्ला खान सांभाळत होता.
हेमुचे सैन्य :
प्रमुख अर्थात हेमू ‘
तोफखाना प्रमुख: मुबारक खान आणि बहादूर खान
हत्तीदल :
हसन खान फौजदार
मैकल खान
इखतीयार खान
संगरम खान आणि कपन
उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत होता. केंद्रस्थानी जातीने हेमू आणि भगवान दास होते.
आता सैन्याची रचना पाहू,
जस आपण बघितलं, तशी ही दोन्ही सैन्ये डावी, उजवी आणि मधली आघाडी अशी विभागली गेली. अकबरातर्फे हुसेन कुली बेग, शाह कुली खान महरूम सर्वात पुढची फळी सांभाळत होते, तर शाह कुली बेग महराम, हुसेन कुली खान, अली कुली खान हे मधली फळी सांभाळत होते. कोणत्याही युद्धात (अगदी क्रिकेटमध्ये पण ) मधली फळी ही अतिशय महत्वाची मानली जाते. मधल्या फळीच हे काम असतं की जसे प्रमुखाला शत्रुपक्षाची बाजू कमकुवत झाल्याचे निदर्शनास येते मधली फळी पुढच्या फळीला बाजूला करत वाऱ्याच्या वेगाने शत्रुपक्षात घुसते आणि शत्रुपक्षाची मधली फळी एकमेकांपासून विभक्त करते. दुसरं काम अस की जर पुढची फळी पडली तर मधली फळी येणाऱ्या शत्रुपक्षाला स्वतःच्या अंगावर घेते.
शाह बदाग खान आणि शाह अब्दुल माली हे राखीव तुकडी सांभाळत होते.
हेमुतर्फे हेमू आणि भगवान दास मुख्य आघाडी सांभाळत होते तर उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत होता. हेमुने या लढाईच्या अगोदर २२ युद्धे जिंकली होती, त्याच्या आघाडीच्या फळीत सुमारे १००० हत्ती होते. हेमुचे सैन्य अनुभवी होते तसेच हत्तींनी आणि शस्त्रांनी सुसज्ज होते. हत्तीच्या सुळ्याना जांबिये लावले गेले होते.
हेमुचं सैन्य मुघालांपेक्षा काकणभर सरसच होते. पण मुघलांच सैन्य धोकादायक बनलं होत ते त्यांच्या घोडदळामध्ये असणाऱ्या तिरंदाजांमुळे. घोडदळ तिरंदाज हे अतिशय धोकादायक मानले जातात, ते शत्रुपक्षावर एका ठराविक अंतरावरून बाणांचा वर्षाव करत राहतात. यामुळे शत्रुपक्ष गोंधळतो आणि या दलाच्या मागे लागतो आणि त्यांना तेच हवे असते. अशा प्रकारे शत्रुपक्ष विखरला की त्यांना हरवणे सोपे जाते.
आता प्रत्यक्ष काय घडले पाहू :
यात अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही सैन्याच्या मधोमध एक खंदक होता जो हत्ती ओलांडून जाऊ शकत नव्हते.
सर्वात प्रथम हेमुने हत्तींच्या सहाय्याने हल्ला चढवला तो मुघलांच्या डाव्या आणि उजव्या फळीवर जी अब्दुल्ला आणि सिकंदर खान सांभाळत होते. मुघलांच्या पायदळाला हत्ती आवरेनासे झालेले बघताच मोहम्मद कासिम त्याचं तिरंदाज असलेले घोडदळ घेऊन अब्दुल्ला खानच्या मदतीला जातो. तिरंदाज बाण मारून हत्तींना जायबंदी करायचा प्रयत्न करत असतानाच वाऱ्याच्या वेगाने उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत, मुघलांच्या डाव्या आणि उजव्या फळीवर तुटून पडतात.
अजून हेमू आणि भगवान दास मुख्य आघाडी सांभाळत आहेत. आत्ता फक्त हत्तीदलचं पुढे आहे.
या दरम्यान वेगवेगळी झालेली हत्तीदलं युद्धाच्या केंद्रस्थानी सरकू लागतात. हे बघताच मुघलांची मधली फळी खंदकाकडे सरकू लागते. हिचं संधी आहे हे बघून हेमू वेगाने आक्रमण करतो. आता दोन्ही दले खंदकापुढे येऊन थांबतात. हेमूच्या सैनिकांनी जरी खंदक पार केला तरी आता त्यांना हत्ती साथ देऊ शकणार नाहीत. हे कळताच मुघलांची मधली फळी खंदकाच्या विरुद्ध बाजूला चिटकून राहते तर हेमुचे हत्तीदल परत एकदा वेगवेगळे होऊन डाव्या आणि उजव्या बाजूला सरकू लागतात. भगवान दास आणि हिंदू-अफगाणी सैन्य हेमुच्या मागे येऊन उभे आहे.
इकडे अब्दुल्ला खान (मुघल डावी फळी ) शादी खान कक्करला (हेमू उजवी फळी ) मागच्या बाजूने केंद्रस्थानी ढकलतोय तर दुसऱ्या बाजूला रामयाला (हेमू डावी फळी ) सिकंदर खान उझबेगने (मुघल उजवी फळी ) केंद्रस्थानी ढकललंय. याचवेळेस मुघलांची शाह कुली बेग महराम, हुसेन कुली खान, अली कुली खान असलेली मधली फळी विभागून वाऱ्याच्या वेगाने बाहेर पडते आणि खंदकाच्या दोन्ही टोकांना असलेल्या हत्तीदलाला जाऊन भिडते. आता हेमुचं सैन्य सर्व बाजूंनी घेरलं गेलं आहे.
आणि जे घडू नये ते घडते, भगवान दास आणि हेमुचे भरवशाचे वीर शादी खान कक्कर, रामया पडतात.
हेमू अजूनही सैन्याला हत्तीच्या अंबारीत बसून लढाईला प्रवृत्त करतोय. त्याचं वेळेस एक बाण हेमूच्या डोळ्यातून आरपार जातो आणि हेमू बेशुद्ध होऊन अंबारीत कोसळतो. शाह कुली खान जो हेमूच्या हत्तीच्या जवळचं असतो त्याच्या काहीतरी अतर्क्य घडल्याचं लक्षात येतं. सैन्याच्या सहाय्याने तो हत्तीच्या माहुताला पकडतो आणि हत्तीवर असलेल्याच नाव विचारतो. माहूत नाव सांगतो, हेमू पडल्याचं कळताच हेमुचे सैन्य विखरते. हेमुला बेशुद्ध अवस्थेत मुघलांच्या छावणी मध्ये घेऊन जाण्यात येते. अकबर हेमुला मारायचे नाकारतो पण बैरम खान हेमुचं शीर कापून काबूलला तर धड दिल्लीला रवाना करतो.
अबुल फझल (अकबरनामाचा लेखक ) म्हणतो, जर अकबराने हेमुला जीवनदान देऊन स्वतःच्या सैन्यात घेतले असते तर अकबरची दृष्टी आणि हेमुचं सामर्थ्य वापरून काय जिंकता आलं नसत ?
हेमूच्या पळणाऱ्या सैन्याला इस्कंदर खानने पाठलाग करून पकडले. त्याच्या हातात सुमारे १००० हत्ती आणि अनेक सैनिक लागले. युद्धानंतर हेमुची बायको दिल्लीमधील हाताला येतील तेवढे जडजवाहीर घेऊन निसटली,तिचा इस्कंदर खानाने पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
( काही ठिकाणी हेमू युद्धभूमीवरच मरण पावल्याचा उल्लेख आहे.)
विशेष : अकबरच्या सैन्याचा १५५६ मध्ये आग्रा आणि दिल्ली येथे पराभव केल्यानंतर हेमुने उत्तर भारतामध्ये “हिंदू राज्य ”, “विक्रमादित्य ” या नावाने सुरु केले. ७ ऑक्टोबर १५५६ मध्ये दिल्लीमधील जुन्या किल्ल्यामध्ये हेमुचा राज्याभिषेक झाला आणि हेमू “सम्राट हेम चंद्र विक्रमादित्य ” या नावाने ओळखला जाऊ लागला होता.

संदर्भ : http://sumitsoren1983.blogspot.no/p/war-room.html

पानिपत चे तिसरे युद्ध -
हे युद्ध, पौष शुद्ध अष्टमी. बुधवार, १४ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाण अहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. १८ व्या शतकात लढल्या गेलेल्या मोठ्या युद्धांपैकी हे एक. या लढाईमध्ये उत्तरेला मराठे तर दक्षिणेला अफगाण होते. हे युद्ध मराठ्यांनी गोलाईच्या तंत्राने खेळले. मराठ्यांबरोबर असलेले बाजारबुणगे आणि यात्रेकरू यांचे रक्षण करण्याच्या हेतूने त्यांनी यामध्ये गोलाईचा वापर केला. मराठ्यांच्या सैन्याला मिळणारी रसद अब्दालीने तोडली होती त्यामुळे सैन्यात दुष्काळ पडला होता, त्यामुळे भाऊंनी गोलाईचे तंत्र वापरत दिल्लीकडे कुच करावयाचे ठरवले. अब्दाली दक्षिणेला असल्याने साहजिकच सैन्याला अब्दालीच्या सैन्याशी दोन हात करूनच दिल्लीकडे सरकावे लागणार होते. (गोलाची लढाई = गोलाई )
मराठा मार्ग :
ग्वाल्हेर, मध्य प्रदेश : ३० मे १७६०
दिल्ली – १ ऑगस्ट १७६०
कुंजपुरा, हरयाणा – १० ऑक्टोबर १७६०
अब्दाली मार्ग :
अब्दालीच्या अलिगढ वरून निघालेल्या सैन्याने खालीलप्रमाणे कूच केली.
बाघपत – २५ ऑक्टोबर १७६०
सोनपत - २७ ऑक्टोबर १७६०
समालखा - २८ ऑक्टोबर १७६०
दक्षिण पानिपत - ३१ ऑक्टोबर १७६०
मराठा व्यूहरचना:
गोलाच्या लढाईचा नकाशा इब्राहीम गारदी आणि समशेर बहाद्दराने, भाऊंच्या नजरेखाली बनवला होता. पश्चिम दिशेला पानिपतच्या अंगाला मल्हारराव होळकर कमान सांभाळणार होते तर होळकरांची पूर्वेची बाजू जनकोजी व महादजी शिंदे सांभाळणार होते. मराठा सैन्याची डावी बाजू इब्राहिमखान आणि दमाजी गायकवाड सांभाळणार होते.इब्राहिमखान बरोबर किंबहुना थोडी मागे विंचुरकरांची पथके होती. इब्राहीमखान हा तोफखान्याचा प्रमुख असल्याने सर्वात पुढे त्याचे दल होते. तोफखान्याच्या मागे असलेल्या घोडदळाच्या मागे ३०,००० अननुभवी सैनिक होते.
तोफखाना शत्रुपक्षाला खिंडार पाडेल आणि त्या जागेमधून पूर्ण मराठा सैन्य दिल्लीकडे कूच करेल अशी प्रारंभी योजना होती. सदाशिवराव भाऊ गोलाच्या मध्यभागी असून भाऊंच्या बरोबर विश्वासराव होते तर त्यांच्या उजव्या हाताला यशवंतराव पवार व अंताजी माणकेश्वर होते.
कुणाबरोबर किती सैन्य होते ? :
इब्राहिमखान गारदी : ८,००० बंदूकधारी सैनिक(घोडदळ) आणि १५० तोफा
दमाजी गायकवाड : २,५०० घोडदळ
विठ्ठलराव विंचुरकर : १,५०० घोडदळ + कुंजपुरयाला दाखल झालेले २,००० अफगाण ( कॅडमॅड पथक )
सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव : १३,००० घोडदळ आणि सोनजी भापकर, तुकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, अंताजी माणकेश्वर, सुभानराव माने, संताजी वाघ, दादाजी दरेकर, सहजी झांबरे, खंडेराव नाईक-निंबाळकर, बाजी सुपेकर, ढमढेरे, काकडे, शिंदे, कडू, कामथे, मुठे, हरफळे, कदम, शितोळे, धायबर, चव्हाण असे अनेक नामवंत मराठा सरदार
सटवोजी जाधव : १,५०० घोडदळ
समशेर : १,५०० घोडदळ
यशवंतराव पवार : १,५०० घोडदळ
जनकोजी व महादजी शिंदे : १०,००० पायदळ
मल्हारराव होळकर : १०,००० पायदळ `
गोलाच्या मागील भागात : ७,००० पायदळ
हे सर्व सैन्य २ मैल रुंद आणि ३ मैल लांब (मागची बाजू ) अस पसरलं होतं.
मराठा सैन्य :
तोफा : २०० ( महाकाली, तकदीर – नावाजलेल्या तोफा )
घोडदळ : ४०,०००
पायदळ : १५,०००
बाजार बुणगे : २ ते ३ लाख
अब्दाली व्यूहरचना:
आजचा जो सानौली रस्ता आहे त्याच्या दक्षिणेला काही मीटर अंतरावर अब्दालीचे सैन्य होते. अब्दालीने सैन्याची मांडणी सुरवातीला तिरकस पद्धतीने केली होती. जसे युद्धाला तोंड फुटले तसा या मांडणीने चंद्र्कोरीचा आकार धारण केला. अब्दालीच्या सैन्याची मधली फळीची कमान त्याचा सेनापती शाह वली पेलणार होता. अब्दालीच्या सैन्याची उजवी फळी बरखुरदार व अमीरबेग सांभाळत होते. यांना हफिझ रहमत खान, दुंदेखान आणि बंघास खान सहाय्य करत होते.यांच्याच डाव्या हाताला रोहिले होते. तर डावी फळी नजीब सांभाळत होता. सुजा उद्दौला मोक्याच्या प्रसंगी फितुरी अथवा काही वेडेवाकडे पाऊल टाकू नये म्हणून अब्दालीने त्याला नजीब आणि शाह वलीच्या मध्ये ठेवले होते.तर नजीबाच्या उजव्या बाजूला, म्हणजेच डाव्या बाजूच्या शेवटच्या टोकाला शहापसंद खान होता. तर फौजेच्या मागील भागात दीड कोसावर एक उंचवटा धरून अब्दाली नजर ठेऊन होता. अब्दालीचा जनानखाना आणि इतर बेगमा ४ कोस मागे होत्या.
मुख्य तोफची : रहमान बारकझाई
कुणाबरोबर किती सैन्य होते ? :
नजीबखान : १५,००० पायदळ
सुजा उद्दौला : ३,००० घोडदळ आणि ६० तोफा
शहावली, अताईखान, गाझी : १९,००० घोडदळ
शहापसंद खान : ५,००० घोडदळ
बरखुरदार व अमीरबेग : ४,००० घोडदळ, १४,००० पायदळ आणि तोफखाना
राखीव दल : १०,००० घोडदळ
या सैन्याने ७ कोस भरेल असा चंद्रकोरीचा आकार धारण केला होता.
अब्दाली सैन्य :
तोफा : १३०
घोडदळ : ४२,०००
पायदळ : ३८,०००
राखीव दल : १०,०००
बाजार बुणगे : १०,०००
काय घडलं प्रत्यक्ष युद्धभूमीवर:
डाव्या आघाडीवर :
साधारण १० च्या सुमारास युद्ध सुरु झाले, सर्वात प्रथम इब्राहीमखान त्याच्या सैन्यासह बरखुरदारखानाला जाऊन भिडला. साधारण एका तुकडीमध्ये १००० सैनिक असतं. इब्राहिमखानाने त्याच्या २ तुकड्या (२०००) घेऊन अजून डाव्या बाजूला चालं केली जेणेकरून बरखुरदारखानाचे सैन्य समोरासमोर सापडावे. अन्यथा इब्राहीमखानाच्या सैन्याला डाव्या बाजूने घोडदळाला भिडावे लागले असते आणि त्याच्या राहिलेल्या ७ तुकड्यांसह (७,०००) बरखुरदारखानाच्या १४,००० पायदळाला आणि ४,००० घोडदळाला तो समोरासमोर भिडला. तोफांचा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही, तोफांचे गोळे शत्रुपक्षाला ओलांडून पलीकडच्या बाजूला पडत आहेत हे लक्षात येताच त्याने तोफखाना बंद करून त्याच्या ७ तुकड्या पुढे घुसवल्या. इब्राहीमखानाने अपेक्षा केल्याप्रमाणेच बरखुरदारखानाने त्यच्या काही तुकड्यांना घेऊन अगदी डाव्या बाजूने वेढा टाकला. पण त्याचे २,००० सैनिक अगोदरच डावी बाजू धरून होते. १२३० वाजेपर्यंत इब्राहीमखानाने त्याच्या ८,००० सैनिकांच्या मदतीने १२,००० रोहिले गारद केले होते.मराठ्यांना विजय दिसू लागला. बाकीचे रोहिले जीव वाचवण्यासाठी पळू लागल्याचे बघताच विंचुरकर आणि गायकवाडांना स्फुरण चढले आणि त्यांनी त्यांचे ६,००० चे सैन्य गोल तोडून पुढे घुसवले. जसे घोडदळाने गारद्यांना ओलांडले, त्यांच्या बंदुका बंद पडल्या, बंदुका बंद पडल्याचे बघताच इनायत खानाचे सैन्य मागे फिरले आणि रोहील्यानी गोळीबार सुरु केला. इकडे डाव्या बाजूला घुसलेल्या बरखुरदारखानाच्या सैन्याने गारद्यांची उत्तरेची वाट रोखली. दारूगोळा मागच्या मागेच राहिला. इकडे इनायतखानाने विंचुरकर आणि गायकवाडांना तडाखा दिला.अहमद बंगष पठाण, इनायत खान, दुंदेखान उरली सुरली पथके घेऊन पुढे चाल करून आला. इकडे उत्तरेची रोखलेली वाट मोकळी करण्यासाठी मागे फिरलेल्या गारद्यांच्या पाठीवर येऊन हि पथके आदळली.
एका घटकेत होत्याचे नव्हते झाले. इब्राहीम चारही बाजूंनी घेरला गेला. त्याचा भाऊ फत्तेखान त्याच्या डोळ्यादेखत मारला गेला. अवघे ३०० गारदी त्याच्याबरोबर उरले होते. विंचुरकर आणि गायकवाड उरली सुरली पथके घेऊन भाऊंच्या दिशेला पळत सुटले.
मधल्या फळीत :
सकाळी साडेनऊच्या आसपास शहावली आणि भाऊसाहेब एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंचा तोफखाना सुरु झाला. अफगाणांनी जम्बुरे, सुतरनाळा, साहीन, सहांग, गरनाळा यांचा सांडणीस्वारांच्या मदतीने योग्य वापर करून भाऊंना शिकस्त दिली. यशवंतराव पवारने गोविंदपंताना यमसदनी धाडणाऱ्या अताई खानास व त्याच्या ३ हजार सैन्यास पाणी पाजले. अफगाण घाबरून पळू लागले, शहावलीला मोठा शह बसला, भाऊंच्या सैन्याने अफगानांच्या मधल्या फळीला मोठे खिंडार पडले होते, भाऊंचा दिल्लीकडे निघायचा रस्ता साफ झाला होता.
पण सूर्याच्या दक्षिनायनाने घात केला होता, सूर्याची किरणे मराठ्यांच्या डोळ्यावर येऊ लागली, सकाळपासून लढून थकलेली माणसे, जनावरे तहानेने गलितगात्र झाली. काही तहानेने, भुकेने कोसळली.
अब्दालीला त्याचा पराभव स्पष्ट दिसू लागला, अब्दालीचा जनानखाना अजून २ कोस मागे सरकून पळण्याच्या तयारीत होता.अब्दालीने याच वेळी त्याचे ४ हजाराचे राखीव दळ धाडले. पडलेले खिंडार परत बुजवले गेले. दुपारी साधारण २ च्या सुमारास विश्वासराव पडले, इकडे भाऊंनी हत्तीवरून घोड्यावर मांड टाकली. अब्दालीने किझलबक्ष नावाच्या गुलामांच्या प्रत्येकी २ हजारांच्या ३ तुकड्या बाहेर काढल्या. भाऊंची मधली फळी तिन्ही बाजूंनी घेरली गेली.
दरम्यान इब्राहीम खान पकडला गेला. गारद्यांनी पराक्रमची शर्थ केली होती. अशीच शर्थ प्रत्येक पथकाने केली असती तर..........
यशवंतराव मुरारबाजीसारखा लढत होता, विंचुरकरांच्या कॅडमॅड पथकाने बाजू बदलली.

उजव्या आघाडीवर :
दुपारी ३ च्या सुमारास नजीब आणि शिंदे-होळकरांची पथके एकमेकांशी भिडली. जनकोजी, तुकोजी शिंद्याची काही पथके सोडली तर, शिंदे-होळकरांच्या बाकी पथकांनी पळ काढला.

मधली फळी आणि भाऊसाहेब एकटे पडले होते, बरखुरदारखान आणि अमीर बेग नदीच्या बाजूने पुढे घुसले होते, शहापसंद खान खाली सरकला होता, नाजीबाचे १२,००० सैन्य डाव्या हाताला , तर समोरून शहावली आणि त्याला येऊन मिळालेले राखीव दल, तर उजव्या हाताने इनायत खान, दुंदेखान यांच्या फौजांनी मधली फळी गुदमरली. विठ्ठलराव विंचुरकर, होळकरांच्या पाठोपाठ पळू लागले होते, जनकोजी पकडला गेला होता, भाऊ पडले.
अब्दालीने निसटता विजय मिळवला होता. इब्राहीमखानसारख्या कोहीनुराचा मृत्यू वाचताना देखील डोळ्यातून आसवे गळतात. हजारो बाजारबुनग्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अनेक आया-बहिनींची अब्रू लुटण्यात आली. अनेक स्त्रियांनी विहिरींमध्ये उड्या मारून जीवन संपवले, तर काहींनी मिळेल त्या हत्यारांनी आत्म-बलिदान दिले.
बाकीच्यांचे काय झाले असेल हा विचार आज देखील करवत नाही, त्या भयाण रात्रीने किती हंबरडे ऐकले असतील, त्या रात्री किती विनवण्या झाल्या असतील घृष्णेश्वराला, महालक्ष्मीला, वाईच्या गणपतीला, पांडुरंगाला, तुळजा भवानीला....................
त्या रात्री काय घडले असेल आणि काय नसेल हे सांगता येत नाही, अशा गोष्टी कुणी लिहून ठेवत नाही, त्या ज्याच्या त्यानेच अनुभवायच्या असतात अर्थात कल्पनाविश्वावर..................................

संदर्भ : पानिपत - विश्वास पाटील
(टीप : एकूण सैन्य आणि प्रत्येकी सैन्य यांच्या अंकांमध्ये तफावत असू शकते.)

आजही पानिपत आणि आसपासच्या भागात साडे आठ लाख मराठा लोक राहतात आणि ते रोड मराठा या नावाने ओळखले जातात. आम्ही ज्या वेळेस पानिपतावर पोहचलो त्यावेळेस “मराठा समाज संघाचे” लोक “काला आम” येथून शहीद झालेल्या ज्ञात-अज्ञात वीरांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहून परतताना दिसले. खरचं फार बरं वाटलं हे बघून. कोणालातरी जाणीव आहे त्या ज्ञात-अज्ञात वीरांची, ज्यांनी या देशासाठी आपले प्राण वेचले. आम्हाला बघून त्यातील कितीतरीजण परत आमच्याबरोबर “काला आम” येथे आले. लहान-थोर, महिला, वयस्कर पुरुष सगळेच होते त्यामध्ये.

पानिपतवर भेटलेला "रोड मराठा " समुदाय :
11DSCN3513.JPG
मी गाडी लावून आत मध्ये जातच असताना दोन साधारण माझ्याचं वयाची मुले माझ्याजवळ आली.
भैय्या, आप मराठा हो ? मराठा हो आप?
हा......पुढंच वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्यातल्या एकाने मला कडकडून मिठी मारली.
जसं की त्याला वर्षानुवर्षानंतर “आपलं” म्हणावं अस कोणीतरी भेटलं असावं.
खरचं, अशा नाजूक प्रसंगी मनाची अवस्था फार बिकट होते. मला काय बोलावं तेच सुचेना.
देखा, बोला था ना मैने मराठा है ये ,,, तो त्याच्या मित्राला म्हणाला. मग त्याच्याशी देखील गळा-भेट झाली.
मग पुढे आप महाराष्ट्र में किधर रहते हो ?
हमे भी आना है वहा, एक बार. अभी तो यही बस गये है, हमे मराठी भी नही आती.
वगैरे बोलण झालं.
पानिपतच्या युद्धात शहीद झालेल्या कुणाचेतरी आपण वंशज आहोत याचा सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता.
असे काही अनुभव आयुष्यात खूप काही देऊन जातात. कधी कधी आयुष्य खूप निरर्थक आहे असे वाटतं तेव्हा हे जपलेले क्षण आयुष्य जगण्याची एक नवी उर्मी देतात.
काय नातं होत त्यांच्या आणि माझ्यामध्ये, पण ते दोघ आम्ही तिथून निघेपर्यंत माझ्या सोबत होते.
भैय्या, अगली बार भी आना, बहोत अच्छा लगा, आपको मिलके.
देखते है, हो सका तो जरूर आऊंगा म्हणत मी त्यांचा निरोप घेतला.
11DSCN3514.JPG11DSCN3515.JPG
“काला आम” ठिकाणी अजितने स्वतः बनवलेली तोफेचे ५ बार उडवून व नंतर सर्वानी २ मि. स्तब्ध उभे राहून या पानिपतच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली वाहिली. अजितच्या या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे या तोफेचा पल्ला सुमारे २ किमीचा आहे. ( अस तो म्हणतो, त्या तोफेमधून बाहेर पडणाऱ्या चेंडूचा वेग बघता तो १ किमी पेक्षा नक्कीच जास्त असावा.) त्यानंतर गुरूजींच एक छोटसं पानिपतच्या वीरांची महती सांगणार भाषण झालं.
काला आम स्मारक :
11DSCN3518.JPG

त्यांनतर
हिंदवी स्वराज्य संकल्पक, शहाजी महाराजांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
हिंदवी स्वराज्य मार्गदर्शक, राजमाता जिजाऊसाहेबांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
हिंदवी स्वराज्य संवर्धक. छत्रपती संभाजी महाराजांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर विश्वासराव पेशव्यांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर इब्राहिमखान गारद्यांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर दत्ताजी शिंद्यांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
वीरसेना धुरंधर समशेर बहाद्दरांचा ..............विजय असो, विजय असो, विजय असो
पानिपतच्या मातीत शहीद झालेल्या ज्ञात अज्ञात वीरांचा..............विजय असो, विजय असो, विजय असो

11DSCN3530.JPG

अशाच असतील का जम्बुरे, सुतरनाळा, साहीन, सहांग, गरनाळा ?
11DSCN3532.JPG

अशा घोषणा झाल्यावर मोहीम काला आम च्या पवित्र भूमीवरून निघाली. निघायच्या अगोदर काला आम परिसरातील भिंत ओलांडून मागच्या बाजूस गेलो, सभोवताली नजर टाकली, मुठभर माती उचलून कपाळाला लावली, थोडी कपड्यांना लावली. ती माती हातात घेऊन क्षणभर उभं राहिलो. आयुष्यात कधी न अनुभवलेली एक विचित्र अशी मनाची स्थिती झाली. कदाचित हीच अवस्था अनुभवण्यासाठी येथे आलो आहे असे वाटले.
आणि साधारण १५३० ला काला आम परिसर सोडला. तिथूनच साधारण ५०० मी अंतरावर एक सपाट मैदान होते, तेथे सर्वानी गाड्या लावल्या. आणि आम्ही २५० जण एकत्र बसलो.
२५० जण, नुसतेच महाराष्ट्रातील नाही तर गोवा, कर्नाटक राज्यातील सुद्धा यांमध्ये होते. हिंदूच नाही तर मुस्लीम सुद्धा होते. सर्वात लहान १० वर्षाचा तर सर्वात वृद्ध ७२ वर्षाचे. असा सर्व प्रकारचा वयोगट या मोहिमेमध्ये होता. जसे पानिपतच्या युद्धामध्ये जे लढले ते सर्व मराठा होते, तेथे मराठा म्हणजे धर्म अथवा जात नव्हती, त्या युद्धामध्ये देशासाठी लढणारा प्रत्येकजण मराठा होता, मग तो हिंदू असो वा मुस्लीम, ब्राह्मण असो वा शूद्र. तसेच आम्ही सर्वजण मराठा होतो.

सर्वात प्रथम गुरुजी उभे राहिले, हात जोडून त्यांनी सुरवात केली,
हा लहान तोंडी मोठा घास घेताना, हि मोहीम यशस्वी होईल का नाही याची मनात धाकधूक होतीच. पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हि मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेत अनेक बरे- वाईट अनुभव आपल्या वाट्याला आले. इंदोर सारखे शहर जे एकेकाळी मराठ्यांचे महत्वाचे ठाणे होते, त्या शहरातून तुम्हा लोकांची जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही सारखा प्रतिसाद तर बऱ्हाणपूरसारखे शहर जे मोगलांचे महत्वाचे ठाणे होते, ज्या ठिकाणी आपला पाय मातीवर न पडता कायम लोकांनी उधळलेल्या फुलांवरच पडला, भेडीया सारख्या छोट्याशा गावात १ तासाच्या आत त्या लोकांनी जेवायची व्यवस्था केली. असेच अनुभव आपल्याला घडवत असतात. आयुष्यात कितीतरी वेळा आपलेच परके होता तर कितीतरी वेळा परकेच आपलेसे करतात. कितीतरी जणांच्या गाड्या पडल्या, तुटल्या. कितीतरी लोकांना खरचटले, मुका मार लागला, काहींचे हात गळ्यात आले आणि हे सर्व होऊनसुद्धा तुम्ही सर्वजण येथपर्यंत आलात याचा मला सार्थ अभिमान आहे. खरचं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हत की अशा लोकांना घेऊन एवढे लांबचे अंतर दुचाकीवरून पार करू शकू, पण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले. तुम्हा सर्वांचा मी खूप खूप ऋणी आणि आभा..........आणि गुरुजींच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली.

खरचं या क्षणाला आम्ही सर्वजण भावनाविवश झालो होतो.
नंतर नफिसा उभी राहिली, तिने देखील तिच्या भावना मांडल्या. जवळपास सर्वांनाच भावना मांडताना अश्रू अनावर होत होते. आज कितीतरी जण मोहीम सोडून परत पुण्याला जायला निघणार होते, तर काहीजण मोहिमेबरोबर पुढे प्रस्थान करणार होते. नाफिसाचे, “खरतर मोहीम संपूच नये” अस वाटतयं हे शेवटचं वाक्य जवळपास सगळ्यांच्या मनातील होत.
आणि आजच मोहिमेतील एका सदस्याला त्याच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याची बातमी कळाली. त्यांना देखील तातडीने परतावं लागणार होतं.
अशी हि सुखदुःखानीभरलेल्या मोहिमेचा पूर्वार्ध या ठिकाणी संपत होता.
काही जण राजस्थान मार्गे पुण्यात परत जाणार होते. आम्ही मात्र मोहिमेबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. पाहिलं कारण म्हणजे दोन जड सॅक घेऊन पुढंच अंतर कापणं बऱ्यापैकी अवघड काम होतं आणि दुसर म्हणजे आमची मोहिमेबरोबर एक प्रकारची नाळ जोडली गेली होती आणि ती इतक्या लवकर तुटावी असे आम्हाला वाटत नव्हते.

पानिपत हे माझ्यासाठी असे नाव आहे कि जे नुसते कानावर पडले तरी अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ते नाव एकदा कानावर पडले कि पुढचे काही क्षण सुजा, नजीब, अब्दाली, भाऊ, जनकोजी, इब्राहीम खान, गोविंदपंत दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर, नानासाहेब, पार्वतीबाई , समशेर अशी सगळी मंडळी मनामध्ये गर्दी करतात. त्या क्षणाला नक्की काय झालं असेल, काय बोलणं झालं असेल त्यांच्यात, असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.. एका एका मोहरयाचा विचार केला तरी मनं अस्वस्थ होतं. इब्राहीम खान तू निदान माझ्यासाठी तरी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा नायक होतास, आहेस आणि राहशील. तुला उपमा द्यायची झालीच तर नेताजी पालकरची द्यावीशी वाटते.( कधी कधी ती देखील कमी पडेल की काय असं वाटतं ) समशेरा तू जे सहन केलसं ते नुसतं ऐकूनचं शहारे येतात. कृष्णाचं सामर्थ्य झाकावं तर ते मराठ्यांनीच. बापासारखा तुही महापराक्रमी असशीलच रे, कदाचित त्याहूनही जास्त, पण आयुष्यात नशीब नावाची देखील एक गोष्ट असते ती कमी पडली.
अब्दाली खिलाडूवृत्तीने मी मान्य करतो की तू एक कुशल योद्धा नक्कीच होतास. तुझं त्यावेळचं यमुना ओलांडण आठवलं आणि आजची जरी यमुना बघितली तरी तू काय धाडस केलं असशील याची कल्पना येते. तुझं ते राखीव तुकडी मागं ठेवणं, शहावलीला मुख्य जागी उभं करून, तुझ मागे राहून संपूर्ण युद्ध क्षेत्रातील हालचालीची बारकाईने पाहणी करणं आणि पहाटेच्या प्रहरी जेवणं बनत असताना तू काढलेले उद्गार "मरणाच्या दारात असतानाही जे लोक एकमेकांच्या हातची भाकरी खात नाहीत आणि एकत्र स्वयंपाक करु शकत नाहीत ते एकीने काय लढणार?” ( आता यात देखील बरेचं वादाचे मुद्दे आहेत, जसे एकत्र स्वयंपाक करावयचा झाल्यास लागणारा वेळ हा वैयक्तिक जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या कितीतरी पट अधिक असतो ) फक्त झालं एवढंच या बुद्धिबळात तू अगदी प्यादांचाही योग्य वापर करून घेतलास. आमचे मात्र हत्ती, घोडे, उंट आणि वजीर आपापल्याच तंद्रीत पळत राहिले आणि शेवट व्हायचा तोच झाला. “शह”

खरचं पानिपतच्या प्रत्येक मोहरयाच वर्णन करायला शद्ब कमी पडतील. भाऊ, कितीही लोकांनी तुम्हाला दोषी ठरवलं, तरी ते पाप मी कधीच करणार नाही. कारण वातानुकुलीत यंत्राच तापमान २५ वर ठेऊन पराभवाची कारणे लिहीन फार सोप काम आहे. त्या भूमीवर जाऊन लाखांच्या वर बाजार-बुणग्यांच रक्षण करत करत, पोटात अन्नाचा कण नसताना तलवार फिरवायला वाघाचं काळीज असावं लागतं. आपणं जो इथ बसून विचार करतो की अरे भाऊ ने असे केले पाहिजे होते, तसे केले पाहिजे होते, या गोष्टी काय त्यांना कळल्या नसतील. युद्धाचे प्रमुख या नात्याने किती वेळा त्यांनी व्यूहरचना आखली असेल? किती वेळा अनुभवी माणसांबरोबर मसलत केल्या असतील ? किती काळोख्या रात्री जागवल्या असतील ? ह्या सगळ्याची नोंद तुम्हा आम्हाला कोठेच सापडणार नाही. हे सगळ अनुभवण्यासाठी त्या त्या व्यक्तीरेखेमध्ये शिरून विचार करण गरजेचे आहे. त्या वेळेस नेमके तिथे काय होत असेल याचे आपण फक्त तर्क करत राहतो. आपण नुसता इतिहास वाचतो आणि ते तो घडवतात हा मूळ फरक लोकांनी लक्षात घ्यावयास हवा. पानिपतमध्ये आपल्या लोकांनी काय भोगले याची एक झलक अनुभवण्यासाठी फक्त २ दिवस उपाशी राहून बघा. एखाद्याला अविवेकी, अविचारी म्हणनं फार सोप असतं, कधी कधी वाटतं, राजे बर झालं तुम्ही त्या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, जर त्या दिवशी चुकूनही काही बरं-वाईट घडलं असतं, तर या लोकांनी तुम्हाला देखील अविवेकी, अविचारी म्हणण्यास कमी केलं नसतं आणि मग राजांचे निर्णय कसे चुकले, जुनी –जाणकार माणसे कसे त्यांना अफझलखानाची भेट घेऊ नये म्हणून सांगत होती यांसारखी शेकडो कारणे द्यायला सुद्धा हे कमी पडले नसते. हे तर फक्त अफझलखान भेटीचं झालं, हेच पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणे अथवा आग्र्याहून सुटका या प्रसंगाना लागू होते. म्हणजे विजय झाला तर उदो उदो आणि पराभव झाला तर नाचक्की हे कुठल्या तत्वात बसतं. ( यामध्ये भाऊ आणि राजांची तुलना करायचा कुठलाही हेतू नाही ) हीच गोष्ट भाऊंना देखील लागू होते, जर त्यादिवशी विजय प्राप्त झाला असता तर एक असामान्य योद्धा वगैरे वगैरे लिहून भाऊंच्या वर सुद्धा अगणित रकाने लिहिले गेले असते. ( याचा अर्थ पराभवाची कारणे शोधूच नये असे नाही पण त्यावेळी तसे निर्णय का घेतले गेले? त्यांच्याही काही मजबुरी असतील इ.चा जास्त विचार व्हावयास हवा आणि त्या कारणांचे “शवविच्छेदन” नको आणि भाऊंचे तर नकोच नको )

पानिपत युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे “दक्षिण्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढवले.मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रूस्तम आणि इस्फिंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्य”

पानिपतवर असतानाच आम्ही २५० लोकांनी मराठी भाषेतील “पानिपत झाले” हा वाक्प्रचार आयुष्यात पुन्हा कधीही न वापरण्याची शपथ घेतली. जिथे माझे वाड-वडील पोटात अन्नाचा कण नसताना केवळ हिंदुस्तानच्या मातीसाठी प्राणपणाने लढले, त्यांच्या या देदीप्यमान पराक्रमाचा अभिमान बाळगण्याचा सोडून आम्ही “पानिपत झाले” हा वाक्प्रचार कसा काय वापरू शकतो. काय म्हणतं असतील त्यांचे आत्मे? क्लेश नसेल का होतं त्यांना ? बाकी महाराष्ट्राचं मला माहित नाही, पण पानिपतावर उपस्थित असलेल्या त्या २५० जणांपैकी एकाचीही जीभ आता “पानिपत झाले” हे २ शब्द उच्चारण्यास कधी धजणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे.

पानिपत मधील बघण्यासारखी अजून काही ठिकाणे :
पानिपत संग्रहालय : पानिपतच्या युद्धांमध्ये ज्या प्रमुख घटना घडल्या, त्या घटनांवर या संग्रहालयामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे.
काला आम
देवी मंदिर
हेमुचे समाधी स्थळ
इब्राहीम लोधीची कबर
कबुली बाग
सालार गुंज दरवाजा
वेळेच्या अभावी आम्ही फक्त काला आम आणि देवी मंदिर या दोनच स्थळांना भेटी दिल्या.
हेमुचे समाधी स्थळ आहे , इब्राहीम लोधीची कबर आहे आणि आमच्या भाऊंच, त्यांच मात्र काहीच नाही. ह्याच फार वाईट वाटत.

पानिपतवर जाण्याची हि माझी पहिलीच वेळ होती, पण आता इथून पुढे जात राहीन, कधी मित्रांना घेऊन, कधी आई-बाबांना घेऊन, ती पवित्र भूमी दाखवण्यासाठी जिथे माझ्या बापजाद्यानी शेवटचा श्वास घेतला, शेवटची घटका मोजली. ते माझे पूर्वज असतीलही किंवा नसतीलही, पण एक महाराष्ट्रीय या नात्याने मी शक्य तितक्या पद्धतीने मराठ्यांचा हा देदीप्यमान पराक्रम लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन.

( माझं इतिहासच ज्ञान अगदी तोकडं आहे आणि पानिपतला जायच्या अगोदर मला हे युद्ध अब्दाली आणि सदाशिवरावभाऊ पेशवे यांमध्ये झाले होते, याच्या व्यतिरिक्त बाकी काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे लेखनामध्ये काही चुका राहून गेल्या असल्यास त्या जाणकारांनी निदर्शनास आणून द्याव्यात ही नम्र विनंती )

जे आम्हाला सोडून निघाले होते त्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिभाताईंचा कार्यक्रम सुरु झाला होता. मोहिमेतील काहीजण तिकडे देखील गेले होते. आम्ही मात्र मोहीम सोडून जाणाऱ्या लोकांना शेवटचा निरोप देण्यासाठी थांबलो होतो.
सर्व काही आटोपून निघण्यास संध्याकाळचे ५ वाजले, पानिपतपासून कुरुक्षेत्र सुमारे ७० किमी वर आहे. राष्ट्रीय महामार्ग १ सोडायचा नाही. वाटेत कर्नाल लागते. पानिपतच्या बाहेरच्या टोल नाक्यावर सर्वानी थांबायचं ठरलं होतं. सर्वजण आले की मग एकत्रच निघणार होतो. आम्हाला सर्वाना थांबलेलं बघून एक ट्रक्टर शेजारी येऊन थांबला.
भैय्या, मराठा हो क्या ? त्याने आमच्यातील कुणालातरी विचारले.
तेवढ्यात आमच्यातील एकाची नजर त्याच्या ट्रक्टर च्या पुढे “मराठा” लिहिलेल्या शब्दांवर गेली.
हम भी मराठा है ! त्याचे उत्तर
मग परत एकदा त्याच्याशी गप्पा झाल्या. त्याच्या बोलण्यातून असे कळले की काही वर्षापर्यंत या लोकांना आपण कोण, कुठले, कुठून आलो काहीच माहित नव्हते. त्यामुळे हे लोक लपून लपून राहायचे. सहसा ते मराठा आहेत हे कोणाला सांगायचे नाहीत. पण त्यांना त्यांचा इतिहास कळल्यानंतर आता ते गर्वानी आम्ही मराठा आहोत म्हणून सांगतात. नंतर देखील आम्हाला काही वाहने दिसली ज्यांच्यावर “मराठा” असे लिहिले होते. हे लोक त्या भागात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. आता हे लोक तेथे मोठ-मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. त्याने सांगितलेल्या गोष्टी ऐकून बर वाटलं. त्या लोकांची आडनावे मात्र वेगळी आहेत, कदाचित अपभ्रंश झाला असावा.
मग त्याच्या ट्रक्टर समोर बसून सगळ्यांचे फोटोसेशन झालं.
11DSCN3537.JPG
एव्हाना जवळपास सगळेजण आले होते. थंडी पण पडायला लागली होती. आत निघायच्या अगोदर एक चहा मारू आणि निघू म्हणत आम्ही जवळच असलेल्या एका ढाब्यामध्ये घुसलो. चहा- बिस्कीट खून ताजेतवाने झाल्यावर साधारण रात्री ७ च्या सुमारस पानिपत सोडले. आता पुढंच लक्ष्य होतं कुरुक्षेत्र.
आता मी आणि अमर एका गाडीवर होतो तर स्वागत आणि रुपेश एका गाडीवर होते. ही गाड्यांची अशी अदलाबदली कायमच चालू असायची. थंडी पण बऱ्यापैकी असल्यामुळे आम्ही पण गाड्या निवांत चालवत होतो. रात्री ९ च्या सुमारास आम्ही कुरुक्षेत्र गाठलं. कुरुक्षेत्रमध्ये प्रवेश करतानाच, प्रवेशद्वारावर श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असतानाचे भले मोठे शिल्प आहे. आजचा मुक्काम एका जाट धर्मशाळेत होता. धर्मशाळेत पोहचता पोहचता ०९३० वाजले. तिथे गेल्यावर नेहमीप्रमाणे गाद्या आणि पांघरून घेऊन येणे इ. कामांना सुरवात झाली. आज प्रचंड थकल्यामुळे कधी एकदा झोपतो असे झाले होते, जेवायची पण काही इच्छा नव्हती. स्वागत आणि रुपेशचा अजून काही पत्ता नव्हता, तेवढ्यात ते देखील आले. मी आल्याआल्या नेहमीप्रमाणे camera, mobile charging ला लावलेच होते. तेवढ्यात स्वागत आला, साऱ्या सॅक कुठे आहे?
सॅक, ती तर तुझ्याकडेच होती.
अरे चहा पिल्यानंतर मी अमरला दिली होती.
मग त्यालाच विचार की
अमरयाला सॅक त्याच्याकडे दिली होती याचा पत्ताच नव्हता.
नाही बे, तू माझ्याकडे कधी दिली? ..........अमर
अरे, चहा पिल्यानंतर तुमच्या टेबलवर ठेवली होती आणि तुला म्हणालो पण होतो अमरया, सॅक आठवणीने घेऊन ये म्हणून. इति स्वागत
झालं, म्हणजे हे महारथीं सॅक धाब्यावरचं ठेऊन आले होते. मी पटकन माझं जाकीट चेक केलं. Mobiles, Camera त्यांचे chargers, पाकीट एवढचं काय माझा ब्रश, vaseline इत्यादी किरकोळ गोष्टी पण माझ्या माझ्याकडे होत्या, स्वाग्या, माझ्या महत्वाच्या गोष्टी तर माझ्याकडे आहेत, सॅक मध्ये नॅपकीन, रुमाल आणि एकदा दुसरा शर्ट असेल जाऊ दे आता गेला तर, तुझ्या गोष्टी बघं.
मोबाईल आहे रे माझा माझ्याकडे पण I-pad सॅक मध्येचं आहे.
आई ग,,, चला, आता परत पानिपतवर राजे.
खरं तर मला जायची मुळीचं इच्छा नव्हती. पण मैत्रीच्या नात्याला स्फुरण आलं आणि रात्री १० वाजता आम्ही दोघे परत एकदा पानिपतच्या दिशेने निघालो.
हे कमी होत की काय म्हणून आता पावसाला देखील सुरवात झाली होती.
स्वाग्या, असू दे निवांत जाऊ, तू नको गाडी चालवू आता, तुझ मनं त्या I-pad मध्येचं असणारं, एकतर त्या उसा तून I-pad घेऊन ये, काहीही झालं तरी आणचं, म्हणून किती जीव काढला होतास ते माझं मला माहितेय. त्यामुळे आता निवांत मागे बस. जे होईल ते बघू. म्हणून मी गाडीला किक मारली आणि आम्ही परत आमच्या पानिपतच्या दिशेने निघालो.

पावसाने देखील आता बऱ्यापैकी जोर धरला होता, मी गाडी शक्य तितक्या सावकाश चालवत होतो. एके ठिकाणी रस्ता ओलांडताना बराचं चिखल झाला होता, मी गाडी शक्य तितकी हळू केली, पण चिखलामुळे गाडी घसरलीच. वेग १० पेक्षा ही कमी होता त्यामुळे गाडी अलगद एका बाजूला झुकली आम्ही आमच्या पायांवर गाडी कशी बशी सावरली. आता मात्र गाडी चांगल्या रस्त्याला लागली असल्याने काळजीचे काही कारण नव्हते, गाडीचा वेग आता वाढवला. रात्री ११४५ च्या सुमारास पानिपत गाठले आणि एकदाचा तो धाबा सापडला आणि विशेष म्हणजे धाबा उघडाच होता. आम्ही गेल्या-गेल्याच धाब्याच्या मालकाने, आप अपना बॅग क्यू छोडके गये यहां ? म्हणून प्रश्न केला.
भैय्या, भूल गये थे.
छोटे, उनका बॅग दे. त्याने बॅग नीट आतमध्ये ठेवली होती.
पावसाचा जोर अजूनच वाढला होता. आता पोटात कावळे देखील ओरडायला लागले होते. आता इथेच काहीतरी खाऊ आणि निघू असा विचार करून आम्ही जेवायला बसलो. शक्य होईल तितक्या लवकर जेवण आटपले, परत एकदा त्या ढाबा मालकाचे आभार मानले, त्याला बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ केली, पण ती त्याने नाकारली आणि परत कुरुक्षेत्राच्या दिशेने निघालो.

चालव, बाबा आता गाडी , मला जाम झोप आली आहे. मी मागे बसतो, मी स्वागतला म्हणालो.
आता हा गाडी व्यवस्थित चालवणार याची मला खात्री होती.
साधारण तासाभरानंतर एका टोल नाकयाजवळ चहा प्यायला आम्ही गाडी थांबवली. शेजारीच रस्त्यावर काम करणाऱ्या एका मजुराचे घर होते, तो त्याच्या घराच्या पडवीत शेकत बसला होता. आम्ही देखील मग जरा चहा पिऊन आणि शेकून स्वतःला गरम केलं. आता मला देखील तरतरी आली होती.
चल स्वाग्या, घेतो मी गाडी म्हणत मी गाडी घेतली. कुरुक्षेत्र गाठायला साधारण १ तास लागेल असा माझा अंदाज होता. इथून पुढे मी किती वेळ गाडी चालवत होतो हे मला देखील माहित नाही. माझी नजर फक्त डाव्या बाजूला कुरुक्षेत्राच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या श्रीकृष्ण-अर्जुनाला शोधत होती. पण श्रीकृष्ण-अर्जुन दिसायचे काही नाव घेईनात. आता डोळ्यावर झोप देखील प्रचंड येऊ लागली होती. स्वागत पण शांत होता, त्याला देखील झोप आवरत नसावी. वाटेत एक मोठा पूल लागला, आणि अचानक मनात अब्दालीने ही नदी कशी ओलांडली असेल असा विचार आला, आणि अचानक .........
अब्दालीच सोड, तू हा पूल कधी ओलांडला होतास रे, कुरुक्षेत्र गाठताना.
खरचं की.......
आता गाड्यांची वर्दळ पण कमी होती. वाटेत एक ट्रक थांबलेला दिसला, मग त्या ट्रक वाल्याला कुरुक्षेत्र अजून किती लांब आहे विचारलं.
कुरुक्षेत्र,,,,,, वो तो पीछे रह गया, आप लोग २५ किमी आगे आ गये है !
कल्याण........... दुसरं काय ?
परत गाडी मग वळवली, आत स्वागतपण पेटला होता, तू काय झोपेत गाडी चालवतोस का ? तू एवढ मोठ प्रवेशद्वार चुकवलंसच कसं ? आणि ब्ला ब्ला ब्ला
आता मला देखील आवरलं नाही आणि मग मी पण
एकतर सॅक विसरायची स्वतः, इथं माझ्या झोपेचा खेळ-खंडोबा झालाय, तुझ्यासाठी इतक्या लांब आलो आणि मी पुढं बसून झोपा काढतो तर तू मग बसून काय गाडी चालवत होतास का? आणि ठीक आहे मला नाही दिसलं प्रवेशद्वार तुला तरी दिसलं का ? आणि ब्ला ब्ला ब्ला
या सगळ्या बाचाबाचीत दोघांच्याही झोपा चांगल्याच उघडल्या होत्या आणि शेवटी दोघानाही एकदम इतक्या वेळ ज्याचा शोध होता ते श्रीकृष्ण-अर्जुन दिसले.
बाहेर गाड्या चालवण्याचा एक फायदा असतो, माणूस आपोआपच रस्ते लक्षात ठेवायला शिकतो. त्यामुळे ती जाट धर्मशाळा आतमध्ये असून देखील एकदाही न चुकता आम्ही बरोबर तिथे पोहचलो.
पहाटेचे ०३३० वाजले होते. सर्वांनाच मेल्यासारख्या झोपा लागल्या होत्या आणि शेवटी आम्ही देखील अंथरुणात घुसलो.
आजचा प्रवास : ४२९.८ किमी
उद्याचा प्रवास :
कुरुक्षेत्र – लुधियाना – जालंधर – वाघा सीमा – अमृतसर - सुवर्ण मंदिर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१४ जाने १७६१ -पानिपत हे वाचल्यावर डोळ्यातून फक्त अश्रुधाराच वाहू लागतात....
हा भर ओसरल्यावरच वाचेन सगळं.......

पानीपतात राहिलेले मराठा आणि तामीळनाडु मधल्या अनेक भागात असलेले मराठी. इंदोर मधले मराठी हे आजही छ. शिवाजी महाराज प्रस्थापित मराठी राज्याची निषाणी आहे.

खरचं पानिपतच्या प्रत्येक मोहरयाच वर्णन करायला शद्ब कमी पडतील. भाऊ, कितीही लोकांनी तुम्हाला दोषी ठरवलं, तरी ते पाप मी कधीच करणार नाही. कारण वातानुकुलीत यंत्राच तापमान २५ वर ठेऊन पराभवाची कारणे लिहीन फार सोप काम आहे. त्या भूमीवर जाऊन लाखांच्या वर बाजार-बुणग्यांच रक्षण करत करत, पोटात अन्नाचा कण नसताना तलवार फिरवायला वाघाचं काळीज असावं लागतं. आपणं जो इथ बसून विचार करतो की अरे भाऊ ने असे केले पाहिजे होते, तसे केले पाहिजे होते, या गोष्टी काय त्यांना कळल्या नसतील. युद्धाचे प्रमुख या नात्याने किती वेळा त्यांनी व्यूहरचना आखली असेल? किती वेळा अनुभवी माणसांबरोबर मसलत केल्या असतील ? किती काळोख्या रात्री जागवल्या असतील ? ह्या सगळ्याची नोंद तुम्हा आम्हाला कोठेच सापडणार नाही. हे सगळ अनुभवण्यासाठी त्या त्या व्यक्तीरेखेमध्ये शिरून विचार करण गरजेचे आहे. त्या वेळेस नेमके तिथे काय होत असेल याचे आपण फक्त तर्क करत राहतो. आपण नुसता इतिहास वाचतो आणि ते तो घडवतात हा मूळ फरक लोकांनी लक्षात घ्यावयास हवा. >>>>> किती लाखमोलाची गोष्ट सांगितलीस तू इथे....

केवळ या वाक्याकरताच तुला सलाम, सलाम आणि सलाम....

या युद्धात वीरगती प्राप्त झालेले सर्व मराठे वीर केवळ अशक्य या कोटीतले..... असे अनेक वीर असतील ज्यांची नावेही कदाचित इतिहासात मिळणार नाहीत - त्या सर्वांनाच मानाचा मुजरा, साश्रुपूर्ण आदरांजली....

तुझ्यामुळे आम्हा सर्वांनाच पुणे ते पानिपत प्रवास घडला.... याकरता तुझे शतशः, सहस्रशः आभार......
ही मोहीम ज्यांनी काढली, राबवली त्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.... सर्वच प्रशंसेला, कौतुकाला, आदराला पात्र आहेत......

जय महाराष्ट्र.....
जय भवानी जय शिवाजी....
हर हर महादेव.....

मनाच्या खूप खोलवरून आलाय हा भाग. अप्रतिम..

खरचं पानिपतच्या प्रत्येक मोहरयाच वर्णन ......... हा परिच्छेद डोळे कोरडे ठेऊन वाचणे अशक्य आहे.

अप्रतिम सारंग,

डोळे भरुन आले वाचताना!

पानिपत नुसते कानावर पडले तरी अंगावर रोमांच उभे राहतात .गेली सात आठ वर्श मी आणि माझा धाकटा भाऊ वर्शातुन एकदा पितृ पक्षात न चुकता पानिपत ला जावुन काला आम च्या स्मारका समोर एक पणति लावुन येतो.त्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सर्व मराठि विरांना आमच्या कडुन एक छोटिशी आदरांजली म्हणुन. प्रत्येक वेळि न चुकता डोळ्यात पाणि येते.आम्ही करतो ते चुक की बरोबर ह्याची कल्पना नाही,पण एक अनामिक समाधान मिळतं.

प्रतिसादाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद
मनाच्या खूप खोलवरून आलाय हा भाग >>>>> Wink
सुखदा >>>>>> सलाम तुला आणि तुझ्या भावाला, माझ्या हातून देखील अशी सेवा होवो, हिचं त्या विधात्यास विनंती

गेली सात आठ वर्श मी आणि माझा धाकटा भाऊ वर्शातुन एकदा पितृ पक्षात न चुकता पानिपत ला जावुन काला आम च्या स्मारका समोर एक पणति लावुन येतो.त्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सर्व मराठि विरांना आमच्या कडुन एक छोटिशी आदरांजली म्हणुन. >>> ग्रेट, ग्रेट........ अशी जाण क्वचितच कोणाला असेल......
त्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मराठे वीरांच्या आत्म्यांना भरुन येत असेल -.... आपली आठवण कोणाला तरी आहे तर .....
नाही चिरा नाही पणती - एवढीही दुरावस्था नाहीये तर....

सुखदा ८ - तुम्ही अबोलपणे खूपच मोठे काम करीत आहात - यानिमित्ताने कळले तरी आम्हा सर्वांना....... तुम्हाला अनेकानेक धन्यवाद, सलाम, नमस्कार, सर्व....

सारंग -
या लेखमालेने तू आम्हा सर्व वाचकांना जे एक अपूर्व समाधान दिले आहेस ते शब्दात वर्णन करता येण्यासारखे नाहीये... हे सगळे वर्णन केवळ केवळ आहे -ही मोहीम, त्यामागची संकल्पना, ज्यांनी त्यात भाग घेतला हे सर्वच कल्पनेबाहेरचे व अतिशय हृद्य असे आहे.....
यापुढे जेव्हा जेव्हा पानिपत शब्द वाचनात येईल तेव्हा तेव्हा तुझ्या या लेखमालेचे नक्कीच स्मरण होईल.......
जय भवानी, जय शिवाजी....
हर हर महादेव....

राजे सारंग, मोहिम फते केलीत. सुंदर वृतांत लिहोन काढलात. तुमचे सगळे भाग एका बैठकीत वाचून काढले.

असेच मोहिमा करीत रहाणे! ऐसेचि पुण्य जोडिंत रहाणे!!

-जय भवानी! जय शिवाजी!!

अप्रतिम लेख !!!! वातानुकुलीत यंत्राच तापमान २५ वर ठेऊन पराभवाची कारणे लिहीन फार सोप काम आहे. फारच योग्य वाक्य.मीही झाशीला गेले आहे. 'ती उडी मारलेली' जागा पाहून असेच मन भरून आले होते. पानिपत चे वर्णन खूपच रंजक! युद्धाचे वर्णन वाचताना मराठी मन हळवे झाले.....कुठे तरी नाळ जोडली गेलेली असते अस म्हणतात......