जीवना! वाटे तुला का वावडे माझे?

Submitted by सतीश देवपूरकर on 17 October, 2012 - 12:08

गझल
जीवना! वाटे तुला का वावडे माझे?
हे तुझ्यासाठीच तुटते आतडे माझे!

मीच माझी दिलखुशीने दुर्दशा केली;
हे तुला कळणार नाही त्रांगडे माझे!

गाव हाकेच्याच होते अंतरावरती;
ऎनवेळी पाय पडले तोकडे माझे!

शेर माझे थेट शिरले काळजामध्ये....
शब्द गझलेतील होते रांगडे माझे!

चालतो नाकासमोरी नेहमी रस्ता;
का कुणी सांगा करावे वाकडे माझे?

ना स्वत:साठीच काही मागणे देवा!
हे जगासाठीच आहे साकडे माझे!!

या इथे, छत्तीस वर्षे नोकरी करतो.....
शोधतो अद्यापही मी बाकडे माझे !

भाकरी मजला मिळाली ती कृपा ह्यांची;
प्यार हे मजला घमेले फावडे माझे!

उत्तरे नाही मिळाली कैक प्रश्नांची;
आजही भिजतेच आहे घोंगडे माझे!

हास-या या चेह-यावरती नका जावू;
झाकले हृदयात सारे मी तडे माझे!

आजही लालित्य नाही जीवनामध्ये!
राहिले गिरवायचे काही धडे माझे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users