निरभ्र

Submitted by तेजूकिरण on 15 October, 2012 - 15:16

"पुजा,पुजा आहेस कुठे ?" धावत,धावत पुर्णिमा आणि पुनीत तिच्यासमोर येउन उभे राहीले. दोघांच्या हातात भरपूर shopping bags आणि चेहयावर ओसंडून चाललेला उत्साह.

"हे बघ, मी सकाळ्च्या विधींसाठी हा dress घेतलाय, अगदी TV मधल्या त्या serial च्या नायिकेसारखा आहे ना? आणि हा necklace बघ ना, हा ना मी खास, हळदीच्या कार्यक्रमाला माझ्या निळ्या dress वर घालायला आणला आहे. छान आहे ना गं, आणि हा चुडीदार मी reception ला घालणार..." पुर्णिमा ची बड्बड चालूच होती. पुनीत सुद्धा काही काही दाखवत होता उत्साहात. सर्व घर आंनदाने भरलं होतं. कारणच तसं होतं. पुजाचं लग्नं आता काही दिवसांवर आलं होतं.

आठ महिन्यापुर्वी , मीनाआत्याने अनिकेतचं स्थळ आणलं होतं. खरं म्हणजे, अनिकेतच्या आईने पुजाला मीनाआत्याकडे पाहीलं आणि तिथेच मीनाला सांगितलं
"आमच्या अनिसाठी ही मुलगी खुप आवडलीय मला, तुझं काय मत?"

मीनाच्या तर मनातलंच बोलल्या होत्या अनिकेतच्या आई. ती फक्त बोलायला घाबरत होती, कारण कुठे कारख्नानीसांचं एवढं श्रीमंत कुटुंब आणि कुठे आपण? पण अचलाबाई स्वतःच म्हणाल्या तेव्हा मात्र तीला खुप आनंद झाला.
कधी एकदा वहिनीला हे कळवते अस झालं तीला.

दहा वर्षांपुर्वी तीचा दादा अचानक गेला, त्यानंतर तीन मुलांना सांभाळत एकटाच संसार ओढत होती तीची वहीनी.मीना कधी जमेल तशी थोडी मदत करायची, पण तिच्याही मध्यमवर्गी संसारात ती कीतीशी मदत करणार?
दादा गेला तरीही वहीनीने तीला माहेरपणाला कधीही पारखं केलं नाही. आईकडे जावं त्या हक्काने ती वहीनीकडे जात असे. तिच्या नवयाला सुद्धा वहीनींबद्द्ल खुप आदर होता. मीनाने त्याच दिवशी वहीनीकडे जाऊन बातमी दिली.

सुधाचा विश्वासच बसेना. तशी पुजा कुणालाही आवडेल अशीच होती. तिच्या सौंदर्याची तर ख्याती होती गावात. तरीही खुप मनमिळावू आणि थोडीशी लाजाळुच होती ती, त्यामुळेही ती पट्कन कुणाच्याही मनात भरायची.
नियतीने सुधीरला तिच्यापासुन हिरावलं तेव्हा पुजा होती बाराची आणि धाकटी दोघं नऊ आणि सात. सुधीरच्या बँकेने तिला नोकरी दिली आणि तिने एकटीचा संसार सुरु केला. सोबतीला हवे तेव्हा तिचे दादा-वहीनी आणि मीना आणि तिचा नवरा होतेच. शिवाय तीची मुलंही खूप गुणी होती. पुजाचं लग्नं आज ना उद्या करायचच तर होतं. पण...

नंतर पहाण्याचा कार्यक्रम झाला. कारखानीस मंडळी खुपच खुश होती. मुलगी पसंत पडली सर्वांनाच. मग मुलीची पसंती विचारण्यात आली. सर्व घटना एवढया भराभर घडत होत्या की पुजाला काय होतय हेच कळेनासं झालं होतं.
नुकतच तिचं MSc चं वर्ष संपलं होतं आणि ती आता नोकरीच्याच शोधात होती. तिच्या लग्नाची काळजी आईला होतीच. अनिकेत तर खुपच देखणा होता आणि कारखानीसांच्या घरात न आवडण्यासारखं काहीच नव्हत.... प्रश्न होता फक्त...पण...पण तिने होकार दिला...तश्याच गोंधळलेल्या मनःस्थितीत.

मग सगळं कसं व्यवस्थीत पार पड्त गेलं. नवऱ्यामुलाकड्ची माणसं खुपच समजुतदार होती. तशीच हौशी सुद्धा. सुधाने आपल्या परिस्तीतीला जमेल तेवढ्या हौसेने साखरपूडयाचा कार्यक्रम केला. तोही त्या मंडळींनी गोड मानून घेतला. खुप कौतुक करत होते प्रत्येक गोष्टीचं. पुजा खरच खुप नशिबवान होती. कुणालाही हेवा वाटावा. सगळं कसं स्वप्नातल्यासारखं घडत होतं, पण पुजा दिसावी तितकी आनंदी दिसत नव्हती.खरं म्हणजे फारसं कुणाच्या लक्षातच आलं नाही,
एक सुधा सोडुन !!
पण सुधाने त्या गोष्टीकडे मुद्दामच लक्ष नाही दिलं. खरं तर ती पुजाशी जास्तं बोलायचं पण टाळत होती. एकदा का हे कार्य सुखरुप पार पडलं की ती मोठ्ठया जबाबदारीतून मोकळी होणार होती.

काही दिवस तो विषय टाळणं जमलं सुधाला, पण एक दिवस, पुजा आपणहूनच बोलायला आली सुधाशी. आता टाळणं शक्य नाही हे बघितल्यावर, पुजाला फारसं बोलु नं देता, तिला जवळ घेउन सुधा म्हणाली
"मला कळतय, काय चालालंय तुझ्या मनात, समजु शकते गं मी. पण माझं एक ऐकशील ? जी गोष्ट आपण दोघींनी ईतके वर्ष सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे, ती आता कशाला काढायाची? शिवाय ते आता कुणालाही कळणारही नाही. का भरलेल्या जखमा ऊकरुन काढुन स्वताःलाच त्रास करुन घेतेस ? आणि जर का, हे लग्न त्या कारणाने मोडलं, तर तुझं आयुष्य नासेलंच पण तुझी भावंडही बिथरतील. समजतय ना मी काय म्हणतेय ते ?
तुमचे बाबा गेले त्यानंतर मोठ्या हिंमतीने काढलेत मी हे दिवस. तुझी पण मला खुप मदत झाली गं. एवढ्या लहान वयातही माझी मैत्रिण बनून राहीलीस आणि मला सावरलस तू. एवढा मोठा आघात सहन केला मी तो केवळ तुम्हा मुलांकडे बघुनच. आता जर का हे सगळं विस्कटून गेलं तर कशाच्या आधारावर जगू आपण ? समजून घे मला माझ्या बाळा. मलाही कुणाला फसवायचं नाहीय पण, जी गोष्ट कधी कळणंच शक्य नाही कुणाला ती काढावीच का? तुझ्या आयुष्यात जे घडलं तो केवळ एक अपघात होता. विसरणं कठीण आहे पण विसरायला हवं. असं समज आपल्या बाबतीत दैवाने जो अन्याय केलाय त्याची भरपाई म्हणूनच अनिकेतसारखा जोडीदार आणि कारखानीसांसारखं घर मिळतय तुला"

मग ती आईच्या कुशीत शिरुन खुप रडली आणि दोघी मायलेकी एकमेकींचं सांत्वन करत बराच वेळ तिथेच बसुन रहिल्या.

साखरपूड्यानंतर अनिकेत तीला रोज फोन करु लागला, एक दोन दिवसांनी संध्याकाळचं तिला भेटायलाही येत होता. सुरवातीचा संकोच जाउन आता ती दोघे मोकळेपणाने बोलत होते. तो तिची थट्टा पण खूप करायचा. मग तीही खोटं खोटं रुसुन त्याला सतवायची.

अनिकेत जीजूंवर तिची भावंडही खुश होती. तो पुनीतबरोबर क्रिकेट्च्या मॅचेस बघायचा मग खुप वादावादी चालायची आणि पुर्णिमा तर त्याच्याबरोबर सर्व TV कलाकारांना भेटून खुपच आनंदात होती.
पुजाला कधी कधी वाटायचं, पुर्णिमा, पुनीतला बाबांचा सहवास फारसा मिळालाच नाही, अनिकेत बरोबर ते दोघे तो हरवलेला आनंद शोधताहेत. अनिकेत सुद्धा त्यांचे सगळे लाड पुरवायचा. सुधाला खुप कौतुक वाटायचं याचं.
अनिकेतची मोठी बहीण लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली होती त्यामुळे अनिकेतही तसा एकटाच वाढला, त्यामुळे तोही पुजाच्या भावंडांबरोबर रमायचा.

आनिकेतचे मम्मी,पप्पा तर खुपच मोकळ्या स्वभावाचे होते. तेही वारंवार सुधाची, पुजाची चौकशी करायचे. पुजाला काही ना काही कारणांनी घरी बोलवून तिचं खुप कौतुक करायचे. सर्व नातेवाईकांना तीची अभिमानाने ओळख करुन द्यायचे. तिने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा ईतकं कौतुक व्हायचं की पुजा अगदी लाजुन जायची. आणि मग अनिकेतला ती खुपच आवडायची.

असेच दिवस चालले होते. त्या विषयावर ती पुन्हा आईशी कधी बोलली नाही. ते सगळं विसरुन अनिकेत बरोबर नव्याने जिवन जगण्यासाठी ती उत्सुक होती. त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे हे तर तिला दिसतच होतं. ती खरच भाग्यवान होती. तरिही ती कधी कधी खूप धास्तवायची. तीला कसलीतरी खूप भिती वाटायची. लग्नाचे दिवस जसजसे जवळ यायला लागले तसे तीची भिती वाढायला लागली.
केळवणं सुरु झाली,मैत्रिणि तिची खुप थट्टा करु लागल्या. वरुन कितीही दाखवलं तरी ती मनातून खुपच धास्तावली होती.

एके दिवशी अनिकेतबरोबर ती त्यांच्या आवडत्या जागी, समुद्रकीनारी बसली होती. अनिकेतने तिचा हात हातात धरला होता आणि ती दोघेही मावळत्या सुर्याकडे पहात होती, निशःब्द.
त्या क्षणी तीला जाणवलं, की याने कीती विश्वासाने हातात घेतलाय आपला हात? याच्या स्पर्शात कीती पावित्र्य आहे. गेल्या सात, आठ महिन्यात कित्येक वेळा आपण दोघे एकटे असू पण याने चुकनही आपल्याला त्या अर्थाने कधी स्पर्श केला नाही. आपला संयम याने कधीही ढळू दिला नाही. त्याच्या प्रेमात कीती आदर होता? या विचाराने ती एकदम दचकलीच. मनात आत आत लपवून ठेवलेली भिती उसळून वर आली.

काय होतय कळायच्या आतच पुजा रडायलाच लागली. बावरलेला अनिकेत तीला कुशीत घेऊन समजाऊ लागला. मग तो तिला हळूच गाडीन घेउन आला, तिला पाणी देउन हळुच थोपटुन म्हणाला "ए, वेडाबाई, आईचं घर सोडायचं म्हणून आत्ताच रडतेस काय? आणि दूर कुठे जाणार आहेस ? गावातच तर आहोत. रोज भेटु शकशील आईला. हो की नाही ? तुला काळजी वाटतेय का, पुनीतचं शिक्षण, पुर्णिमाचं लग्नं सगळं कसं होईल ? अगं ती आता आपली जबाबदारी नाही का? मुलं मोठी झाली की आई-वडीलांना मदत करतातच. आणि लग्नानंतर तु जशी मम्मी-पप्पांची मुलगी तसाच मी सुद्धा तुझ्या आईचा मुलगाच नाही का? मग रड्तेस काय अशी ? चल, वेडे, पुस डोळे !!"

तीने भरलेल्या डोळ्यांनी अनिकेतकडे पाहीलं.कीती काळजी होती त्याच्या नजरेत. तिला दुःखी पाहुन तो कीती घाबरला होता. आणि त्याच क्षणी तिने निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी अनिकेत आणि मम्मी-पप्पा तिला गावाबाहेरच्या फॅक्टरीत स्टाफची ओळख करुन द्यायला नेणार होते. सकळीच गाडी येणार होती.

रात्री जेवणाच्या टेबलवर सर्वांच्या तोंडी लग्नाचाच विषय होता. बेळगावहून मामा-मामी आले होते. मीनाआत्या आणि तिची मुलं होती. आईची खास मैत्रिण सीमामावशी होती. सगळे खुप आनंदात होते. आईला तर ती कित्येक वर्षांनी एवढी आनंदी बघत होती. बाबा गेल्यानंतर प्रथमच ती ईतकी सुन्दर दिसत होती. मुलीच्या येणाऱ्या सुखाचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं, मुळातच सुंदर असलेलं तीचं रुप आणखीनच उजळलं होतं. पुजा बराच वेळ आईकडे बघत राहीली. सीमामावशीबरोबर लग्नाच्या दिवशीचा प्रोग्राम ठरवण्यात गुंग झाली होती ती.

सकाळी लवकर उठायचं निमित्त करुन पुजा त्या गऱ्हाड्यातून बाहेर पडली आणि आपल्या खोलीत आली. टेबललॅम्प लावून ती लिहायला लागली.

"अनिकेत ,
प्रिय लिहिलं नाही, तो अधिकार मला नाही. मी असं का म्हणतेय ते तुला हे पत्र वाचून कळेल.
आपण गेले आठ महिने एकमेकांना ओळखतो ,आपल्या लग्नाची तयारी जोरदार चालू आहे. तुझ्या डोळ्यांत मी अपार प्रेम पाहीलय. सगळ कसं अगदी आदर्श आहे. पण जसं दिसतय तसं सगळं नाहीय. मी, जीला तु तुझी जीवनसंगिनी निवडलस, तुझ्या आई-वडिलांनी आपली भावी सुन म्हणुन पसंत केलं ती मी तुमच्या लायक नाही.

अनिकेत, मी कुमारिका नाही.

हो, तुला धक्का बसला असेल. हे मी तुझ्यापासून लपवायला नको होतं. पण माझी हिंम्मतच नाही कधी. मी तुम्हा सर्वांची खूप अपराधी आहे.
त्या गोष्टीची आठवणदेखील मला विलक्षण वेदना देते , पण आज मी तुला माझ्या आयुष्यातल्या अतिशय घ्रुणादायक प्रसंगाबद्दल सांगणार आहे.
मी तेव्हा सोळा वर्षांची होते,आई आणि आम्ही भांवंड कोकणात आज्जीकडे रहायला गेलो होतो.आईची रजा संपली म्हणून आई पुर्णिमा,पुनीत ला घेउन परत गेली आणि मी अजुन थोडे दिवस आजीकडे राहीले. मी परत यायच्या आद्ल्याच दिवशी , आजीने मला न्हाणीवरुन धुवायचे कपडे आणायला पाठवले आणि तिथे गावातल्या खोताचा उनाड मुलगा टपून बसलेला होता.बेसावध क्षणी त्याने मला पकडून....मी खूप झगडले , पण काहीही नाही करु शकले.
उध्व्स्त मनाने परत आले. आई सुद्धा खुप दुःखी झाली. दोघींनी हे दुःख गिळायचं ठरवलं. खुप खुप कठिण होतं, पण शेवटी सर्वांवर काळ हेच औषध. हळूहळू आम्ही सावरलो. पण मनावरच्या त्या जखमा कधीच भरल्या नाहीत. आईला त्रास नको म्हणुन मी सगळं विसरल्याचं दाखवू लागले.
पण तु मला जो सन्मान दिलास आणि माझ्यावर प्रेमाची एवढी उधळण केलीस,
तेव्हा मी माझ्या मनाला नाही फसवू शकले,
मी तुला, तुझ्या मम्मी-पप्पांना नाही फसवू शकत.मला माफ़ करा.
मी तुमच्या पवित्र घरात येण्यास लायक नाही.
-- पुजा.

पत्र लिहून पुजा पलंगावर पडली.मनात विचारंचं काहूर माजलं होतं. एकीकडे खुप मोकळं वाटत होतं आणि त्याच वेळी उदास वाटत होतं. ती विचार करत राहीली "अनिकेतवर आपण एवढ प्रेम कधी करायला लागलो हेच कळलं नाही. आता त्याच्याशिवाय जगणं किती कठीण जाईल". आपल्याच विचारांशी झुंजत ती कधितरी झोपी गेली.

सकळी सुधा तिला उठवत होती "पुजा, अग उठ, त्यांची गाडी यायची आहे ना आज? लवकर तयार हो. पुर्णिमाने खास तुझ्यासाठी ती लेमन कलरची साडी ईस्त्री करुन ठेवलीय झोपण्यापुर्वी. म्हणत होती, पुजाला काही कळत नाही कधी कुठचे कपडे घालायचे ते. आज मालकीण म्हणून जाणार आहेस फॅक्टरीत. अनिकेतच्या आई कश्या असतात टापटीप. तुलाही शीकायला पाहीजे बाई आता हे सगळं." आईचा उत्साह अगदी ऊतु चालला होता.
क्षणभर तीच्या मनात आपण करतोय ते बरोबर आहे का , असा विचार डोकावुन गेला.
पण मग तीने वेळ न दवडता, तयारी सुरु केली. मनात उगीचच काही विचार येऊ नयेत म्हणून तोंडाने काहीतरी गुणगुणत राहीली. सुधा तिच्याकडे कौतुकाने बघत नाश्त्याची तयारी करायला गेली.

ड्राय्व्हर आल्याची वर्दी देत पुनीत तिच्याकडे आला तेव्हा ती हातात लिफाफा घेऊन तयारच होती. "आई , मी येते गं" असं म्हणत ती गाडीत जाऊन बसली. ड्रायव्हरने गाडी वळणावर नेताच, ती पटकन म्हणाली "ईथेच थांबवा" बुचकळ्यात पडलेला ड्रायव्हर तिच्याकडे पहात म्हणाला "पन दादांनी बंगल्याकडं आनायला सांगितली हाय गाडी. तिथनच जानार हायेत फ़ॅक्टरीत" तशी ती म्हणाली "हो, ठाऊक आहे मला, पण मला इथे एक काम आहे, मी ते आटोपून येतेच. तु हे पत्र नेऊन दे त्यांना, जा तू" तिच्याकडे विचित्र नजरेने पहात जरा नाराजीनेच त्याने तिला उतरवले आणि तो गेला.

तिथेच थोडं थांबुन मग ती चालत घरी आली. नशिब, तिला आत येताना कुणी पाहिलं नाही. ती तशीच आतल्या खोलीत जाऊन पडून राहीली. खूप रडू येइल असं वाटत होतं, पण आवंढा गळ्यातच येउन थांबला होता.
सगळं संपलं होतं.

काही वेळ ती तशीच पडून राहीली. आई, मामी, आत्या, सीमामावशी सगळ्या गच्चीवर पापड, फेण्या वाळत घालण्यात गुंग होत्या. ती हळूच खिडकिशी आली आणि आश्चर्याने पहातच राहीली. समोर गाडीतून अनिकेत आणि त्याचे मम्मी-पप्पा उतरत होते. ड्रायव्हरने आपला निरोप देण्यात काही चुक केल्यामुळे हे आपाल्याला इथे न्यायला आले की काय ?
काहीच न सुचून ती बाहेर आली.

तिच्याकडे पहात , अनिकेतच्या आई म्हणाल्या
"ईतकं लहान केलंस आम्हाला मुली तू?"
गोंधळ्लेल्या चेहऱ्याने ती बघतच राहीली. तेव्हा तिला जवळ घेत त्या बोलू लागल्या "अग, तु अपवित्र कशी? जीचं मन इतकं निर्मळ , ती अपवित्र ? आमची सुन , आमची मुलगी आणि अपवित्र ? अगं, इतके महीने बघतोय तुला आम्ही, तुझ्यासारखी गुणवान जोडीदार माझ्या मुलाला लाभल्याबद्द्ल रोज आभार मानते मी सिद्द्गिविनायकाचे.

अगं ज्या नरधामाने ह्या कोवळ्या निष्पाप जिवाचा छळ केला तो राजरोस फिरतोय समाजात आणि तू , तूझा काहीही दोष नसताना हे ओझं वागवतेयस मनावर ? तुला वाटलं की केवळ तुझं शरीराला कुणाचा स्पर्श झाला म्हणून तू अपवित्र झालीस ? त्याच्या हाताने या शरीराला स्पर्श केला असेल पण तुझ्या गंगेसारख्या पवित्र आत्म्याला कुठे विटाळू शकला तो? मी, माझ्या कुटुंबाने , माझ्या अनीने तुझ्यातल्या गुणांना पसंत केलय पोरी. तुझा अनिकेत तुझ्यावर प्रेम करतो , तु आवड्तेस त्याला, तु जशी आहेस तशी"
ती अनिकेतच्या आईच्या कुशीत शिरुन फ़क्त रडत राहीली.
कित्येक वर्ष मनावर असलेलं मळभ निघून जात होतं. धो धो पावासानंतर आकाश निरभ्र होतं तसं वाटत राहीलं.
पाठीवरुन फिरणारा पप्पांचा हात आणि हळूच तिच्या डोक्यावर ठेवलेला अनिकेतचा, तिच्या अनिकेतचा, हात तिला अधिकच हळवं करत होता.

बोलण्याच्या आवाजाने घरातले सगळेच खाली आले होते आणि काहीही उलगडा न होऊन आ वासून समोरचे द्रुष्य फक्त बघत होते. समजलं होतं ते फक्त सुधाला. ती सगळं कळून चूकली की आपण ही गोष्ट या देवमाणसांपासून लपवून किती मोठी चूक करत होतो.
धक्क्याने तोल जाऊन ती पडणारच होती तेवढ्यात अनिकेतने तिला सावरले आणि तिने त्याच्या छातीवर डोकं ठेऊन आपल्या अश्रूंना वाट करुन दिली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा तुझ्या लेखणीतून उतरलेली एक छान कथा, तेजू!
मी तुला नेहमी म्हणतो त्याप्रमाणेच तुझं कथा ओघवती ठेवणं खूप छान असतं.

>> अगं ज्या नरधामाने ह्या कोवळ्या निष्पाप जिवाचा छळ केला तो राजरोस फिरतोय समाजात आणि तू , तूझा काहीही दोष नसताना हे ओझं वागवतेयस मनावर ?
आपल्या समाजातला तो एक अत्यंत विचित्र प्रकार आहे Sad

लिहीत रहा !

''अगं ज्या नरधामाने ह्या कोवळ्या निष्पाप जिवाचा छळ केला तो राजरोस फिरतोय समाजात आणि तू , तूझा काहीही दोष नसताना हे ओझं वागवतेयस मनावर ? तुला वाटलं की केवळ तुझं शरीराला कुणाचा स्पर्श झाला म्हणून तू अपवित्र झालीस ? त्याच्या हाताने या शरीराला स्पर्श केला असेल पण तुझ्या गंगेसारख्या पवित्र आत्म्याला कुठे विटाळू शकला तो? मी, माझ्या कुटुंबाने , माझ्या अनीने तुझ्यातल्या गुणांना पसंत केलय पोरी. तुझा अनिकेत तुझ्यावर प्रेम करतो , तु आवड्तेस त्याला, तु जशी आहेस तशी"
......हा परिच्छेद खूप आवडला.

तुम्हा सर्वान्चे मनापासून आभार. पौर्णिमा , ही कथा माझ्या ब्लॉग वरुन घेतली आहे. तुम्ही कदचीत तिथे वाचली असेल. धन्यवाद!