हांडवो.. [ओट्स चा]

Submitted by सुलेखा on 11 October, 2012 - 13:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी ओट्स..
[ओट्स ओव्हन/मावे /कढईत हाताला गरम लागतील इतपतच भाजुन घ्या..]
१/४ वाटी उडिद डाळ..
१/४ वाटी मूग डाळ..
१/४ वाटी मसूर डाळ..
१/४ टी स्पून मेथीदाणा..
२ टे.स्पून इडली रवा..
१ हि.मिरची..
१ टी स्पून किसलेले आले..
३-४ लवंगा..
१/२ टी स्पून दालचिनी पुड..
१/४ टी स्पून मिरे पूड..
१ वाटी किसलेला दूधी ..
२ लहान गाजराचा किस..
४ टेबलस्पून भाजलेले तीळ..
३ टेबलस्पून भाजुन भरडलेले दाणे..
प्रत्येकी १-१ टी स्पून मोहोरी व जिरे..
१/२ टी स्पून हिंग..
७-८ कढीपत्त्याची पाने..
थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली..
१/२ वाटी आंबट दही..
१ टी स्पून तिखट..
१ टी स्पून हळद..
अर्ध्या लिंबाचा रस..
अर्धी वाटी तेल..
मीठ चवीनुसार..
लागले तर २ टेबलस्पून पाणी..
१ इनो /फ्रुट सॉल्ट पाउच..
खोबरे+कोथिंबीर+ हि. मिरची+लिंबू रस +जिरे+मीठ याची चटणी.
टोमॅटो सॉस..
कैरी/लिंबू/मिक्स लोणचे..

क्रमवार पाककृती: 

"हांडवो " वन -डिश-मील आहे.यात मी ओट्स चा वापर केला आहे..
मूग डाळ-उडदाची डाळ व मसूर डाळ व मेथीदाणा एकत्र करून ,धुवुन गरम पाण्यात अर्धा तास भिजवुन ठेवा.
इडली रव्यात थोडेसे पाणी घालुन ठेवा.२ मिनिटांनी रवा खाली बसला कि वरचे पाणी फेकुन पुन्हा थोडेसे दुसरे पाणी त्यात घालुन रवा भिजायला ठेवा..
आता दूधी व गाजर किसुन घ्या..
भिजवलेल्या तिनही डाळी एका रोळीत ओतुन त्यातले पाणी काढुन टाका..
सर्व डाळी,हि.मिरची,आले,लवंगा मिक्सरमधे पाणी न घालता किंचित जाडसर/रवाळ वाटुन घ्या.त्यात इडली रवा घालुन एकदा मिक्सर फिरवुन घ्या.
वाटलेल्या मिश्रणात दही,दूधी व गाजराचा किस,ओट्स ,१ टी स्पून हळद घालुन चमच्याने एकत्र कालवा..
चवीनुसार मीठ,कोथिंबीर,दाण्याची भरड,दालचिनी पूड्,मिरे पूड घाला.
तेलाची हिंग-जिरे-मोहोरी व हळद घालुन फोडणी करा . गॅस बंद करा.तयार फोडणीत कढीपत्त्याची पाने हातानेच तोडुन टाका.२ टे.स्पून तीळ घाला. आता यातील अर्धी फोडणी एका वाटीत काढून ठेवा व उरलेली अर्धी फोडणी, तयार मिश्रणावर १ टी स्पून तिखट घालुन त्या तिखटावर ओता..आता सर्व मिश्रण चमच्याने छान एकत्र कालवुन घ्या.लिंबाचा रस घालुन पुन्हा एकदा कालवा.. हे मिश्रण सरभरीत असावे.जर घट्ट वाटत असेल तर १ किंवा २ चमचे पाणी लागेल तसे टाकावे.. कारण किसलेल्या दूधी ला पाणी सुटते.त्यामुळे पाणी जरुर लागेल तितकेच टाकावे..
आता मंद गॅसवर एक तवा व त्यावर एक लहान नॉनस्टीक पॅन तापायला ठेवा.त्यावर १ टीस्पून तेल पसरुन घ्या.
मिश्रणापैकी अर्धे मिश्रण एका दुसर्‍या भांड्यात घ्या ..या मिश्रणात इनो फ्रुट सॉल्ट १ टी स्पून घालुन चमच्याने छान फेटुन घ्या.. मिश्रण पॅन मधे ओता च चमच्याने जाडसर ,गोलाकार पसरा .. वरुन १ टेबलस्पून तीळ व एक टी स्पून तेलाची फोडणी सगळीकडे पसरवा.
पॅन वर झाकण ठेवा..
साधारण ५ मिनिटे मंद गॅसवर शिजु द्या..त्यानंतर झाकण काढुन ,उलथन्याने उलटवा..[खालची बाजु सोनेरी /कुरकुरीत भाजली गेलेली दिसली पाहिजे.]आता झाकण न ठेवता दुसरी बाजु भाजा..असाच उरलेल्या मिश्रणात इनो फ्रुट सॉल्ट आणि वरुन तीळ घालुन दुसरा हांडवा भाजुन घ्या.
handava.JPG
गरम हांडवा एका प्लेट मधे काढुन घ्या..चौकोनी वड्या कापुन चटणी / सॉस /लोणचे ,वाफाळलेली गरम कॉफी किंवा चहा बरोबर आस्वाद घ्या..

अधिक टिपा: 

नेहमीच्या हांडव्यापेक्षा मी थोडा कमी जाड हांडवा केला आहे..त्यामुळे हांडवा भाजल्यानंतर ओट्स चा कुरकुरीत पणा छान जाणवला..ओट्स भाजुन घेतल्याने व इडली रवा घातल्याने कुरकुरीतपणा येतो..
तूर,मसूर,मूग ,चणा डाळ यापैकी कोणत्याही व कितीही डाळी घेतल्या तरी चालेल.पण उडदाची डाळ मात्र हवीच.
तसेच किसलेला भोपळा,पानकोबी,बटाटा,बीट,गाजर,पालक/कसुरी मेथी काहीही चालेल.
पापडी दाणे /ओले शेंगदाणे/कॉर्न /काजु घालता येतील.
लसूण पेस्ट ही घालता येईल..
लिंबू रस मात्र हवाच..
तेलाचे प्रमाण कमी करता येईल..
ओव्हन मध्ये, केक ट्रे मधे ही भाजता येईल.

माहितीचा स्रोत: 
नेहमीच्या हांडव्यावरुन स्व-प्रयोग केला .चवीला छान झाला.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त...

<<आता मंद गॅसवर एक तवा व त्यावर एक लहान नॉनस्टीक पॅन तापायला ठेवा...

हे कळालं नाही, तव्यावर ठेवलेल्या पॅनमधे ५ मि. मधे असं कुर्कुरीत मंद गॅसवर होइलका??, तुम्ही केलय म्हण्जे होतच असणार फक्त नीट कळत नाहीये ही स्टेप

सही आयडिया सुलेखाताई!

मस्त दिसतोय हांडवो !

नक्की करुन बघणार Happy

मी हांडवो मधे थोडी बडीशेप घालते. छान स्वाद येतो Happy आणि हांडवो बेक करते.

सुलेखा, अतिशय सुरेख.
या ना त्या मार्गाने ओट्स पोटात जावे म्हणतात.
ओटसच्या मूळच्या गिळगिळितपणामूळे लोकांचा नावडता पदार्थ आहे हा, पण तुमच्यासारखे लोक हे एकदम सुसह्य बनवतात Happy

अर्पणा, गॅसवर तवा थोडासा तापवुन त्यावर पॅन ठेवायचे व गॅस मंद ठेवायचा आहे.आच कमी हवी म्हणजे हांडवा आतपर्यंत छान भाजला जाईल्..तवा न ठेवल्यास खालचा लेयर लौकर भाजला जाउन करपेल व त्याच्या वरचा आतला लेयर कच्चा राहील..आधीच ओट्स भिजले कि त्याचा "गिचका"होतो..ओव्हन मधे बेक केल्यास हीट कमी ठेवता येते..
लाजो,अगदी बरोबर ..बडीशोप व धणे ही घालतात..

सह्ही सुलेखा!!!!
मला हांडवो आत्तापर्यंत कधीही मनासारखा जमलेला नाही. ही कृती मस्त आहे. आंबवायची भानगड नसल्याने जमेल असे वाटते आहे.
ओव्हनचे सेटींग सांगणे.

मंजुडी, २०० डीग्री सेंटीग्रेड वर प्री-हीटेड ओव्हन मधे साधारण २० मिनिट ठेवावा.१५ मिनिटानी सुरी घालुन चेक करावा..

छानच. उडदाची डाळ नाही घेतली तरी चालेल असे वाटतेय, कारण ओटसला थोडा चिकटपणा असतोच. पण मग तूकडे पडतील असे वाटतेय. प्रयोग करायला हवा.

दिनेशदा,एकवेळ तांदूळ / इडली रवा नाही घेतला तर चालेल.पण उडदाची डाळ बाकी जिन्नस बांधुन ठेवायला हवीच..ओट्स चे प्रमाण जास्त असल्याने इथे इनो घालुन तितकेसे फुगले नाही.ओट्स तांदुळासारखे फुगतही नाहीत्.पण चव मात्र अप्रतिम होती. ओट्स वगळुन वेगवेगळ्या डाळी,ची चव ही जाणवत होती.