काळजामधे श्वासांची सळसळ अजून आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 6 October, 2012 - 14:25

गझल
काळजामधे श्वासांची सळसळ अजून आहे!
हृदयात, तुझ्या स्वप्नांची वर्दळ अजून आहे!!

मी हुबेहूब पाचोळा आहे दिसावयाला!
प्राणात परंतू माझ्या वादळ अजून आहे!!

वाटचाल अजून चालू? चटके बसून सुद्धा!
वाळूतच कोठे कोठे हिरवळ अजून आहे!!

व्रण वरवरच्या जखमांचे झाले फिके परंतू.....
हृदयामधील जखमांची जळजळ अजून आहे!

दररोज नव्या जोमाने आक्रमतो रस्ता मी.....
पण, मधेच वाटत आहे.....मरगळ अजून आहे!

मी अतीत या हातांनी पेटवले होते ते......
लोटली युगे त्याला! पण, हळहळ अजून आहे!

घर पडके का होईना....तग धरून आहे ना!
वर नांगर फिरून सुद्धा, कातळ अजून आहे!!

ओढणी तुझी ओझरती बिलगून काय गेली.....
पळभरच्या सहवासाचा दरवळ अजून आहे!

मी तृषार्त आकांक्षांचा! अखंड धावत आहे!
नवनवीन क्षितिजांचे ते मृगजळ अजून आहे!!

मी रोज मनाचे कप्पे आवरतो ना चुकता;
का तरी वाटते मजला? अडगळ अजून आहे!

नाकार लाख तू प्रीती माझी दुनिये पुढती
डोळ्यात तुझ्या पण, माझे काजळ अजून आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओढणी तुझी ओझरती बिलगून काय गेली.....
पळभरच्या सहवासाचा दरवळ अजून आहे!

मी तृषार्त आकांक्षांचा! अखंड धावत आहे!
नवनवीन क्षितिजांचे ते मृगजळ अजून आहे!!

मी रोज मनाचे कप्पे आवरतो ना चुकता;
का तरी वाटते मजला? अडगळ अजून आहे!

नाकार लाख तू प्रीती माझी दुनिये पुढती
डोळ्यात तुझ्या पण, माझे काजळ अजून आहे!

>>>>>> खुप सुंदर

मी हुबेहूब पाचोळा आहे दिसावयाला!
प्राणात परंतू माझ्या वादळ अजून आहे!!

शेर आवडला.

अनेक शेरांत लय सापडली नाही. काही ओळींत मात्रांचा घोळ वाटला.
(मोजून पाहिले नाही.)

दररोज नव्या जोमाने आक्रमतो रस्ता मी.....
पण, मधेच वाटत आहे.....मरगळ अजून आहे!
>> सहज, सोपा, थेट, त्याचमुळे आवडला.

मात्रांचा आणि लयीचा घोळ मलाही वाटला..

हा काय प्रकार आहे राव! Uhoh

मी तुमच्या याच जमीनीतील या गझलेचे विडंबन येथे टाकलेले होते तर आता ही नवीनच गझल

आणि मी विडंबनही अगदी तुमच्या त्या मूळ गझलेतील मात्रादोषांबरहुकुम केलेले होते, मात्रा मुद्दाम चुकवल्याही होत्या एक दोन ठिकाणी! Sad

आता वाचणे आले ना पुन्हा

बेफिकीरजी!
ज्या मूळ गझलेवर आपण विडंबन बेतले आहे, त्या मूळ गझलेत फक्त एकाच ओळीत, म्हणजे तिस-या शेरातील उला मिस-यातल्या दुस-या अर्धचरणात दोन मात्रा जास्त झाल्या होत्या. हे मला कबूल आहे.

ही चूक घाईघाईत माझ्याच शेरावर चिंतन करताना व पोस्ट करताना धांदलीत झाली. मी उला मिस-याची माझीच अभिव्यक्ती बदलू पहात होतो!

मूळ उला मिस-यात ही चूक नव्हतीच!

मी दिलेला तिसरा शेर असा होता..............

रणरणते कळ वाळूचे, (ही) तशी माणसे सारी!
पण, इथेच मानवतेची, हिरवळ अजून आहे!!

माझा मूळ शेर असा होता....................

माणसे वाळवंटाच्या वाळूसमान झाली! (१४+१२=२६ मात्रा)
पण, इथेच मानवतेची हिरवळ अजून आहे!!

ही माझी मूळ गझल दिनांक १५-०५-१९९९ यादिवशी लिहिलेली असल्याची नोंद माझ्या डायरीत सापडली!
काल पोस्ट केलेल्या गझलेत, तेच माझे वृत्त, तेच काफिया व तोच रदीफ आहे.

पहिले चार शेर कधी तरी १९९६ साली लिहिलेले असावेत असे डायरीवरून दिसते.

एक दिवस मूड लागल्यावर, म्हणजे २५ जुलै २००१२ला (१६वर्षांनंतर), मी तिच्यात उरलेले ७ शेर टाकून एकूण ११ शेरांची गझल पूर्ण केली व ही गझल मी काल(०६/१०/१२) रात्री ११-११.३० वाजता मायबोलीवर पोस्ट केली.

दोन्ही गझलांत मात्रावृत्त वापरले आहे जे २६ मात्रांचे आहे.
नाव माहीत नाही, जाणकारांनी सांगावे.

लय १४+१२=२६ मात्रा अशी आहे!

टीप: भूषणराव, आपण केलेले विडंबन आवडले.
आता अजून एक विडंबन करणे आले ना पुन्हा!
Best luck!

...........प्रा.सतीश देवपूरकर
................................................................................

ज्ञानेशजी, आनंदयात्रीजी..........................

हे मात्रावृत्त आहे.
१४+१२=२६ मात्रा, अशी लय आहे!

माझ्यामते, ही गझल निर्दोष आहे.

तरी पण, आपणास कुठे मात्रांचा घोळ वाटला असेल, तर कृपया सांगाल का?
म्हणजे आम्हास त्वरीत दुरुस्ती करता येईल.
लय, कुठे नेमकी तुटलेली वाटते, तेही सांगावे, म्हणजे आम्ही लयदुरुस्तीही करू शकू!

टीप: उर्वरीत शेरांवर, दोघेही काही बोलला नाहीत! काही खटकत असेल तर नि:संकोचपणे सांगावे, आम्हास आमचे खयाल तपासून घेता येतील!

>.............प्रा.सतीश देवपूरकर

फॉन्ट बोल्ड केल्याने नेमकं काय होतं देव जाणे!!
<<

वयाची ४०शी पार झाली की जवळचं वाचायला चष्मा लागतो. फाँट बोल्ड अन मोठा असला की वाचायला सोपे जाते. आपले पाहून इतरही तसेच करतील व आपल्याला चांगले दिसेल अशी सूप्त इच्छा असते.

(अनुभवी) इब्लिस

फॉन्ट बोल्ड केल्याने नेमकं काय होतं देव जाणे!<<<<<<
काय होते ते देवपूरकर जाणे...............
डोळेझाक टळते!
...........प्रा.सतीश देवपूरकर

मात्रा मोजल्या. २६ आहेत. माझा मात्रांचा मुद्दा संपला.

पण तरीही लय सगळीकडे सुलभ येत नाहीये.
१४ मात्रांनंतर सहज पॉझ येणं अपेक्षित होतं, ते अनेक ठिकाणी होत नाहीये. १४ मात्रांमध्येही सगळीकडे सहजपणा जाणवला नाही.

ज्ञानेशजी, आनंदयात्रीजी..........................
आम्ही ही गझल वारंवार मोठ्याने म्हणून पाहिली.
कुठेही, कोणत्याही मिस-यात वा अर्धमिस-यात आमच्या कानास तरी लयभंग वा असुलभता जाणवली नाही.
तरी देखिल लयभंग वा लयीचा ओबडधोबडपणा जाणवत असेल, तर तो नेमका कुठे जाणवतो ते कृपया कळवावे, म्हणजे आम्हास फेरफार करता येतील!
........प्रा.सतीश देवपूरकर