त्या वासंतिक श्वासांची वर्दळ अजून आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 10 May, 2012 - 02:53

गझल
त्या वासंतिक श्वासांची वर्दळ अजून आहे!
गंधोत्सव कधीच सरला; दरवळ अजून आहे!!

आटल्या मोठमोठाल्या सा-या नद्या परंतू......
द्यायला दिलासा मजला, मृगजळ अजून आहे!

कण रणरणते वाळूचे, की, म्हणू माणसे ही?
त्यांच्यातच मानवतेची हिरवळ अजून आहे!

आई, वडील दोघांची तसबीर फक्त आहे;
इतकीच बंगल्यामध्ये अडगळ अजून आहे!

काळजात माझ्या होते पडझड घडीघडीला;
हृदयाची धडधड म्हणते: वादळ अजून आहे!

मंदीर यशाचे माझ्या गेले कुठे कळेना;
त्याच्या पायाभरणीचा कातळ अजून आहे!

बघताना वाट सख्याची गतप्राण जाहली ती;
गालावर ओघळलेले काजळ अजून आहे!

मी पुढे, माझिया मागे माझे नशीब येते;
पण, त्याच्या चालीमध्ये मरगळ अजून आहे!

पारवा तिच्या मौनाचा घुमतो मनात माझ्या;
ती झुळूक कधीच गेली.....सळसळ अजून आहे!

>>-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

काळजात माझ्या होते पडझड घडीघडीला;
हृदयाची धडधड म्हणते: वादळ अजून आहे!

बघताना वाट सख्याची गतप्राण जाहली ती;
गालावर ओघळलेले काजळ अजून आहे!

मी पुढे, माझिया मागे माझे नशीब येते;
पण, त्याच्या चालीमध्ये मरगळ अजून आहे!>>>

सुंदर. मरगळ फार सुंदर. अडगळ हा शेरही आवडलाच

पारवा तिच्या मौनाचा घुमतो मनात माझ्या;
ती झुळूक कधीच गेली.....सळसळ अजून आहे!>> पारवा आणि झुळूक यातील नेमके कनेक्शन लक्षात आले नाही. पुन्हा वाचून पाहतो

मतल्यात दोन्ही ओळी साधारण तेच सांगताहेत असे वाटले, पुन्हा वाचून पाहतो

गझल नेहमीप्रमाणेच मोहक

धन्यवाद

छान

भूषणसाहेब! धन्यावाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल!

“पारवा तिच्या मौनाचा घुमतो मनात माझ्या;
ती झुळूक कधीच गेली.....सळसळ अजून आहे!”>>

“पारवा तिच्या मौनाचा”.....इथे ती म्हणजे कोण? तर दुस-या ओळीत म्हटले आहे की, ती झुळूक, जी कधीच निघून गेली. झुळूक येते व निघून जाते! जणू काही तिला काही बोलायचे असून ती मौनातच होती. पण तिचे मौनच जणू पारव्यासारखे माझ्या मनात घुमत राहिले! सळसळत राहिले! इथे मौनातील बोलणे वारंवार मनात रेंगाळत राहते, म्हणून त्याला पारव्याच्या घुमण्याची उपमा दिली आहे. झुळुकीमुळे होणारी सळसळ म्हणजे झुळुकीच्या मौनाचे जणू बोलणे जे अजून माझ्या मनात चालू आहे!

आता माझ्या मतल्याकडे वळतो.....
त्या वासंतिक श्वासांची वर्दळ अजून आहे!
गंधोत्सव कधीच सरला; दरवळ अजून आहे!!
या शेरात रेंगाळण्याची प्रक्रिया मला अभिव्यक्त करायची होती. वसंतातील गंधयुक्त श्वास म्हणजे वासंतिक श्वास, किंवा सुखाच्या गंधाने भारलेले श्वास त्यांची वर्दळ अजून चालू आहे! कारण गंधोत्सव म्हणजे वसंत वा सुखाचे दिवस सरले तरीही त्या वसंतातल्या वा सुखाच्या आठवणींचा दरवळ अजूनही येत आहे!
माणूस सुखाचे दिवस नेहमी आठवत असतो. याच मानवसुलभ भावनेला अभिव्यक्त करण्यासाठी मी वसंत, गंधोत्सव, श्वास, दरवळ,वर्दळ या प्रतिमांचा वापर करून मतल्यातील दोन्ही मिसरे एकजीव केल्या आहेत व त्यातून माणसाची सुखास वारंवार आठवण्याची सवय indirectly सूचीत केली आहे!

पुनश्च प्रतिसादाबद्दल धन्यावाद! लोभ असावा......
...............प्रा. सतीश देवपूरकर

कारण गंधोत्सव म्हणजे वसंत वा सुखाचे दिवस सरले तरीही त्या वसंतातल्या वा सुखाच्या आठवणींचा दरवळ अजूनही येत आहे!>>

प्रोफेसर साहेब, सहमत आहे. दोन्ही ओळी वेगळ्या आहेत. पण आता मला (माझे आधीचे मत - दोन्ही ओळी साधारण तेच सांगतायत की काय असे वाटणे - हे मत बदलून) असे वाटत आहे की दुसरी ओळ स्वतंत्ररीत्या सगळेच सांगत आहे

असो, आपल्याशी चर्चा नेहमीच आल्हाददायक ठरते हे नक्की

गझल खूप आवडली ...........
ही रचना मात्रावृतात आहे की अक्षरगणवृत्तात हे मात्र मला निश्चितपणे समजले नाही़.....प्लीज समजू शकेल का?
वृत्तांतकथन म्हणजे काय हे ही समजले नाही

बेफिकीर,

जे आहे ते सरळ सांगणे

दोन ओळींच्यामधे विचार करायला वाव नाही. बर्‍याचदा सानी मिसरा हा उला मिसर्‍याचे कंटीन्युएशन म्हणून आलेला आहे असे वाटले. गझलेत बर्‍याच अंशी स्वतंत्र अर्थ असणारे दोन मिसरे आशयाने एकत्र बांधले जातात असा माझा समज आहे.

चूभूद्याघ्या.

आले लक्षात, वेगळा विचार आहे

धन्यवाद

म्हणजे जे आहे ते सरळ आहे तसे सांगणे असे तुम्ही म्हणत आहात असे मी गृहीत धरतो

विदिपा,

तरीही मला अशा शेरांची (माझे किंवा प्रोफेसर साहेबांचे नसावेत) उदाहरणे द्या जे तुम्ही म्हणता तसे आहेत

धन्यवाद

सगळे रेशन, भाजीपाला, महिन्याला आई पाठवते
प्रपंच निम्मा चालवायला माझा, अख्खी हयात खपते

कानांमध्ये वारे शिरले, दौड मारली बछड्यांनी पण
आठवणींची झुळुक लागता गाय केवढ्यांदा हंबरते

जमावाचा कधी झालोच नाही हेच चुकले
कळाले एकट्याने सारखे निभणार नाही

सगळेच पाहिले नाहीत पण वर दिल्यासारखे माझेच अजून बरेच शेर आहेत व त्यावर आपली ऐलपैलवर चर्चाही झालेली आहे.

विशेषत: माझी उरल्यासुरल्या वासना ह्या शिर्षकाची गझलच तशी आहे आनंदाच्या कडमडीमधे काही शेर आणि मी बेरड होण्याचे पक्के ठरवत आहे मध्येही तसा भाव प्रत्येक शेरात आला आहे.

धन्यवाद!

इतरांचे शेर मीच कोट करणार नाही.

अर्थातच शेर आवडलेले आहेत व आत्ताही वाचल्यावर आवडलेच

माझी शंका अशी आहे की आपल्या वरील शेरांत वृत्तांतकथन नाही असे आपण कशामुळे म्हणत आहात

(दोन ओळींत विचार करायला वाव आहे हे मान्य आहे)

धन्यवाद

भांडताना यापुढे माणूसकी ठेवायची आहे
एकदा बोलायची संधी तुलाही द्यायची आहे

मी तुझ्याइतकाच तेजाळीन ह्याची शाश्वती नाही
मात्र हा काळोख पुसण्याची धुरा पेलायची आहे

वरील शेर संवादात्मक आहेत असे मला वाटते. ह्यात कथा सांगीतलेली नाहीये, अनुक्रमे उपरती झाल्याची भावना आणि ताकदीबद्दल शंका असली तरी निर्धार सांगीतलेला आहे.

हे असे झाले आणि ते तसे झाले - अशा टाईप शेर नाहीत असे वाटते - अर्थातच सापेक्ष मत.

माझ्या दृष्टीने आशय भिडण्याला सुंदर दिसण्यापेक्षा जास्त महत्व आहे. शेराच्या प्रेमात पडणे नको आहे, मन डचमळले पाहिजे.

येत्याच समरकाली त्या कोरड्या 'अखाती'
गवतास गर्द 'हिरव्या' फुटतील रक्त पाती

हा शेर असेल तर .............तो भविष्यकथन करतो असे मला वाटते...हे वृत्तान्तकथन नक्कीच नसावे

माझ्या "नाँस्त्रदमस आणि मान्सून" या कवितेतल्या या ओळी आहेत

तज्ञांचे मत सामजू शकेल का...............

हे असे झाले आणि ते तसे झाले - अशा टाईप शेर नाहीत असे वाटते>>

असे असू नये ते विदिपा

आपण जो अर्थ घेत आहात तो माझ्यामते भिन्न आहे

Happy

==================

कथाकथन आहे याचा (गझलकारांना अभिप्रेत) अर्थ हा असतो की 'बातम्या' दिलेल्या आहेत.

अन्यथा, कथाकथन (निदान कथानक) हे प्रत्येक शेरात असते व असणार.

(काही झाले की भटसाहेबांच्या शेराचे उदाहरण दिले जाते त्याप्रमाणेच मीही बापुडा)

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याचे छळले होते

जरी ओठांवरी येती नभाचे शब्द स्वच्छंदी
मला बोलायची बंदी तुला ऐकायची बंदी

तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी

हे शेर 'बातम्या' नाही आहेत.

=========================================

बातम्यावाले शेर मी 'लययळा' केले. मग कोणीतरी सांगितले आणि शिकलो.

एक आपले शिकलेले मत ठोकतो:

गझलेत फक्त आशय नव्हे तर आशय मांडण्याची शैली, प्रतिमा, शब्दसौंदर्य या सर्वांचा एकत्रित परिणाम होतो. काही शेर आशयाने साधारण व लहजाने उत्तम असे होतात आणि गझल रसिक फक्त आशयाला नव्हे तर या सर्वच घटकांना दाद देतात. आपला गाय हंबरण्याचा आणि आईने संसारासाठी खपण्याचा शेर, हे दोन्ही शेर असेच आहेत. आपण ते अभिव्यक्तीतून खुलवलेले आहेत. प्रोफेसरसाहेबांचे (मी कोट केलेले ) शेर (माझ्यामते) आशयापेक्षा (व त्यातील कथानकापेक्षा) त्यातील अभिव्यक्तीने खुललेले आहेत. जसे नशीब मागे मागे येऊनही मरगळलेलेच असणे हे नावीन्य मिळाले इत्यादी.

(अर्थात, हे म्हणणारा मी कोण)

====================================

धन्यवाद व चुभुद्याघ्या

येत्याच समरकाली त्या कोरड्या 'अखाती'
गवतास गर्द 'हिरव्या' फुटतील रक्त पाती>>

कोरड्या आखाती हिरवे गवत कसे असेल असा तांत्रिक प्रश्न सोडला तर या ओळी फार आवडल्या

भूषणजी,

सहमत आहे.

मी ही ह्या गोष्टी तुम्ही, ढवळे, चित्तरंजन, समीर, ज्ञानेश वगैरे लोकांकडून शिकलो आहे व शिकत आहे(कुणाचे नाव राहिले असल्यास क्षमस्व!)

हे म्हणणारे तुम्ही कोण हे आम्हाला ठरवू द्या.

अवांतर - प्रोफेसरांच्या गझलेवर चर्चेचे मुद्दे काढण्यात तसा काही अर्थ नसतो, कारण मुद्दा काढणार्‍याला शेर आवडले असले तरच ते चर्चेत भाग घेतात किंवा आम्ही त्यांच्या प्रगाढ ज्ञानापुढे त्यांना खुजे वाटत असू.

गझल बरी वाटली. लयीत वाचता आली नाही.

कण रणरणते वाळूचे, ही तशी माणसे सारी = २८ मात्रा.
पण इथेच मानवतेची हिरवळ अजून आहे = २६ मात्रा.

अशी काहीतरी गडबड झालीये असे दिसते.
चूक भूल द्यावी घ्यावी.

ज्ञानेश, मी या ओळी सोडून अनेक ओळींच्या मात्रा तपासल्या, मलाही यती सर्वत्र समान ठिकाणी येत आहे असे वाटत नव्हते Proud

पण तुम्ही नेमक्या ओळी पकडल्यात

मी पुढे, माझिया मागे माझे नशीब येते; गालगागा लगागागा गागालगा लगागा २६

पारवा तिच्या मौनाचा घुमतो मनात माझ्या; गालगाल गागागागा ललगाल गालगागा २६
मात्रा जुळतात. पण लगावली जुळत नाहीत

जामोप्या, मात्रावृत्तात लगावली समान असण्याची गरज नाही परंतू लयीत वाचता आले पाहिजे.

ज्ञानेश +१.

“पारवा तिच्या मौनाचा”.....इथे ती म्हणजे कोण? तर दुस-या ओळीत म्हटले आहे की, ती झुळूक, जी कधीच निघून गेली. झुळूक येते व निघून जाते! जणू काही तिला काही बोलायचे असून ती मौनातच होती. पण तिचे मौनच जणू पारव्यासारखे माझ्या मनात घुमत राहिले! सळसळत राहिले! इथे मौनातील बोलणे वारंवार मनात रेंगाळत राहते, म्हणून त्याला पारव्याच्या घुमण्याची उपमा दिली आहे. झुळुकीमुळे होणारी सळसळ म्हणजे झुळुकीच्या मौनाचे जणू बोलणे जे अजून माझ्या मनात चालू आहे!>>>>>> भूगा केलात राव डोक्याचा. . . तुम्ही बरे आहात ना बेफि?

Pages